अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ३)
लेखाच्या मागील भागात आपण सुकापूरला जावून आलो. आता त्यापुढचा प्रवास आपण करूयात.
सुकापूरहून निघून पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) पर्यंत पोहोचेपर्यंत सायंकाळचे ६ वाजायला आले. पिंपळनेर हे एक मोठे व्यापारी गाव आहे. माझ्या बायकोचे हे मामाचे गाव. त्या गावात मी एक दोन वेळा यापुर्वी राहीलोही होतो. आजूबाजूला पुर्णपणे आदिवासी भाग, डोंगर असलेला हे गाव. गावातील लोकं एकूणच प्रेमळ. जेवणानंतर 'गोटीसोडा' पिण्याचा फार आग्रह करतात. अर्थात हे उल्लेख मी मागे राहीलो त्यासंदर्भात आलेले आहेत.
पण आता मला तेथे राहता येणार नव्हते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. घरापासून लांब आलेलो असल्याने घरची जास्तच ओढ लागलेली होती. त्यातच अनोळखी भागात जाण्याची अनामिक भिती, पुढील प्रवासाच्या तजविजीची काळजी लागलेली होती. पिंपळनेरपासून निघून नवापूर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. नवापूर हे माझ्या सासूरवाडीचे गाव. या गावाचा उल्लेख यापुर्वी मी येथे 'दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन' असा लेख लिहून केलेलाच आहे, तो आपल्या लक्षात असेलच. मी माझ्या प्रवासाचे नियोजन नकाशात पाहून केलेले होते. (माझ्या प्रवासाचा नकाशा) त्यातल्या बर्याचशा आश्रमशाळा ह्या नंदुरबारच्या आसपास होत्या. त्यामुळे मला नवापुरला मुक्कामाला सोईचे जाणार होते.
मला पिंपळनेरहून नवापुरला (चरणमाळ घाटामार्गे) जाणारी बस मिळाली. पिंपळनेरहून नवापुर (म्हणजेच पुढे सुरत कडे) ला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे चरणमाळ घाटामार्गे व दुसरा म्हणजे कोंडाईबारी ह्या घाटामार्गे. (कोंडाईबारी मार्गे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ६ आहे.) दोन्ही मार्गादरम्यान सदर घाट/ बारी लागतात. निसर्गाने या भागात त्याच्या संप्पत्तीची भरभरून उधळण केलेली आहे. आपण शहरी लोक ज्या 'अनटच्ड- व्हर्जीन' असा निसर्ग शोधतो, तो येथे आहे. कोकणात असा निसर्ग आहे पण तेथेही व्यापाराचा शिरकाव झालेला आहे. ज्यांना खरोखरच
निसर्गापुढे लिन व्ह्यायचे आहे ते पर्यटक वृत्तीचे लोक या भागात भेट देवून आपली भुक भागवू शकतात. (या दोन्ही रस्त्यांवरून मी बर्याचदा प्रवास केलेला असल्याने हे मी अधिकाराने सांगतो आहे.)
भरपुर सागाने हरित असलेली वने, पाण्याने भरलेले ओढे, नाले व नद्या. मध्येच दिसणारे डोंगर. उत्तम शेती. त्याचबरोबर प्रेमळ आदिवासी समाज, त्यांच्या वैशिठ्यपूर्ण शैलीने चित्रांकीत केलेल्या झोपड्या असले या भागात असणारे दृष्य आपल्या नजरेला तर सुखावतेच पण प्रवासाचा त्रास पण घालवते. फक्त त्या कडे त्या नजरेने पहाण्याची वृत्ती हवी. अर्थात हे मी दिवसा केलेल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे.
माझा सध्याचा प्रवास हा संध्याकाळी घडत होता. साधारणत: ८ वाजेच्या दरम्यान मी नवापुरला पोहचलो. जेवण केल्यानंतर मी माझ्या येण्याचे प्रयोजन माझ्या सासरेबुवांना सांगीतले. माझे सासरे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंजर होते. पुर्वी त्यांनी नोकरीच्या काळात घोड्यावरून हा सगळा भाग पालथा घातलेला होता. त्यामुळे या भागात कसे फिरायचे याबद्दल ते अधीक चांगले सांगू शकत होते. माझ्याकडील आश्रमशाळांच्या गावांची यादी बघीतल्यानंतर त्यांनी मला होणार्या प्रवासाची कल्पना दिली. बसने प्रवास केल्यास प्रत्येक ठिकाणी बस जात नसल्याने मला जवळपासच्या गावाच्या फाट्यावर उतरून शाळेत जावे लागणार होते. बर्याचशा शाळा नव्याने तयार झाल्याने त्यांनाही माहीत नव्हत्या. बरे त्या शाळा काही एकाच मार्गावरील गावातल्या नव्हत्या. थोडक्यात बसने प्रवास केल्यास एका दिवसात एकच शाळेत जाणे शक्य होते. मला तर जास्त दिवस यात वाया घालवण्याची इच्छा नव्हती. मी त्यांना मोटरसायकलवरून हा प्रवास करण्याबद्दल त्यांना सांगितले. काळजीपोटी त्यांनी त्यास नकार दिला. एकतर या भागात मी अनोळखी, रस्ते माहित नाही, त्यातच मोटरसायकल प्रवास. सासूबाई तर जाण्यास नकार देत पुण्याला कंपनीत फोन करून हे काम न करण्याबद्दल आग्रही होत्या. पण मी स्विकारलेले काम पुर्ण करणे मला भाग होते. हा काही माझा पहिलाच मोटरसायकलवरून लांबचा प्रवास नव्हता. आधीच्या कंपनीत असतांना मी हायवेने मैलोगणती एकट्याने प्रवास केलेला होता. अगदी पावसात मोटरसायकलवरचा कित्येक किमी चा प्रवासाचा अनूभव माझ्या पाठीशी होता. त्यामूळे ठाम निर्णय घेवून त्यांना मी मोटरसाकल घेवूनच पुढिल प्रवास करण्याबद्दल सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला. त्यानंतर त्यांनी मला प्रवासास होकार दिला.
दुसर्या दिवशी सकाळी आन्हीके आवरून मेहूण्यांची मोटरसायकल (TVS Suzuki AX 100 R) माझ्या ताब्यात घेतली. गाडीचे मेंटेनन्स नुकतेच केलेले होते. मी हवा चेक करून पेट्रोल भरून घेतले. मला हेल्मेट असल्याशिवाय मोटरसायकल चालवणे आवडत नसल्याने त्यांच्याकडचे हेल्मेट घेतले. त्याची काच तुटलेली असल्याने पुढे मला माझा गॉगल कामाला आला. (मला हेल्मेट ची ईतकी सवय लागलेली आहे की मला कोणी मला 'हेल्मेट घालून झोप' असे सांगीतले तरी मी झोपू शकेन. कंपनीत बर्याचशा लोकांना मी हेल्मेट घालण्याची सवय लावून दिली आहे. असो.) गाडीच्या डिक्कीत ताईंनी केलेला जेवणाचा डबा, नकाशाचे पुस्तक आदी ठेवले. गाडीचे मेंटेनन्स किट टुल बॉक्स मध्ये ठेवले व गाडीला किक मारली. माझी पुढील शाळा 'नवापाडा' या गावाची होती.
क्रमश:
प्रतिक्रिया
8 Dec 2009 - 7:48 am | sujay
चला, गडी एकदाचा मोटरसायकल वर बसला.
शेठ जरा मोठ मोठ भाग लिवा की आन भरभर बी टाका.
वाचनोत्सुक,
सुजय
8 Dec 2009 - 8:39 am | पाषाणभेद
नुकतीच ही लिंक मिळाली. अर्थात या लेखाशी त्याचा काही संबंघ नाही. तरीही वाचनीय आहे. (केवळ दुर्गूण दाखवण्यासाठी नाही तर त्यात अनेक चांगल्या गोष्टींचाही उल्लेख आहे.)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
8 Dec 2009 - 9:30 am | विजुभाऊ
हे नक्की तुमच्या प्रवसाचे वर्णन आहे / तुमचे नातेवाईक कसे आहेत्/कोठे आहेत याचे वर्णन आहे की तुमच्या कामाचे वर्णन आहे?
8 Dec 2009 - 10:08 am | पाषाणभेद
लेख मोटरसायकलवरील आहे. आता मोटरसायकल कोठून आली, कशी आली हे तर आपल्याला समजायला म्या उल्लेख क्येला आन हा उल्लेख केवळ एकदाच येवू शकेल.(फारफार तर दोनदा - पहिल्यांदा मो.सा. त्यांच्याकडून घेतली व नंतर प्रवासानंतर परत केली तेव्हा.)
नाहीतर तुम्हीच म्हणाल की मो.सा. कुणाची होती, (चोरीची होती का?)
नुसतेच कामाचे वर्णन केले तर ते ऑफीसात केलेले रिपोर्ट टाकले असते येथे. :-)
अन मी कॅमेरा नेलेला नसल्याने फोटो पण टाकता आलेले नाहीत. क्षमस्व. पण निसर्ग फार मस्त होता. सातपुडा तर बेभान करणारा.
:-)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
8 Dec 2009 - 9:41 am | प्रभो
दगडफोड्या शेवटी का होईना मोटरसायकलीवर बसला......आता लिही बाबा पुढं
(गाडीवरचा प्रवास वाचण्याच्या इच्छेत)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
8 Dec 2009 - 2:46 pm | ऍडीजोशी (not verified)
उत्सुकता निर्माण होते आहे.
9 Dec 2009 - 5:19 pm | राकेश वेंदे
शेवटी तुम्हाला मोटार-सायकल मिळाली आणि इकडे आम्हाला हसू फुटले. हाऊ लेख तर मस्तच व्हयेल शे भाऊ, उत्सुकता लागलीय खरी :)
8 Dec 2009 - 4:08 pm | ज्ञानेश...
सातपुड्यात मोटरसायकलवर फिरणे तसे रिस्की आहे, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. एकतर रस्ते बेक्कार, त्यात 'पावरे' लोकांची भीती.
(दिवसा हे लोक प्रेमळ भासतात, पण संध्याकाळ झाल्यावर रिस्क घेऊ नये. अर्थात, यात त्यांचा काहीच दोष नाही. ही त्यांची जीवनशैली आहे!
त्यात तुमची बाईक अँटिक! ;) )
असो.
थोडे मोठे भाग लिहावेत, ही विनंती.
9 Dec 2009 - 4:22 am | मीनल
हा भाग लहान वाटला.
तरी माहितीपूर्ण आहे.
वैशिठ्यपूर्ण शैलीने चित्रांकीत केलेल्या झोपड्यांचा फोटो पाहायला आवडला असता.
मीनल.