चॅलेंज भाग ३
दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली.
“लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय.
बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”. मी या महिन्यातल्या केसेसची लिस्ट सांगायला सुरुवात केली. तर म्हणाले, “ते नाही रे, तुमचं चॅलेंज काय या महिन्याचं?” मी उडालोच! म्हटलं यांना कुठून कळलं! गेल्या महिन्यात मी सारखा स्टेप्स किती झाल्या म्हणून मोबाईल बघत होतो. त्यामुळे दोघा चौघांना आपल्या चॅलेंजबद्दल कळलं. मग नर्सेसच्या एका ग्रूपनेसुद्धा ते सुरू केलं. अशी त्याची थोडी पब्लिसिटी झाली. सरांच्यांही कानावर गेलं. सत्याच्या चॅलेंजमुळे आता थाप मारायचीही सोय नाही!! मग सांगून टाकलं, ‘महिनाभर सतत खरं बोलण्याचं चॅलेंज आहे’. “मग..... any difficulties so far?” सरांनी पुढचा गुगली टाकला. घ्या !! म्हणजे मला खरं बोलताना काय प्रॉब्लेम येतोय हे मी सर, अनास्थेटिस्ट, मेडिकल स्टूडंट्स, नर्सेस, वॉर्डबॉय्ज अश्या सगळ्यांसमोर सांगू!! त्यापेक्षा मी खरंच नाही का बोलणार ! नशीब पेशंटला G A (जनरल अनास्थेशिया – पूर्ण भूल) दिला होता. तो शुद्धीत असता तर ‘हा डॉक्टर नेहेमी खोटं बोलतो की काय’ म्हणून टेन्शन आलं असतं बिचार्याला... सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यावंच लागणार होतं म्हणून मी नाईलाजाने म्हटलं “हो, येतात थोडेफार प्रॉब्लेम्स.” मेडिकल स्टूडंट्सना समोरच्या ऑपरेशनपेक्षा जास्त इंटरेस्ट माझ्या खरं बोलताना येणार्या प्रॉब्लेम्समधे होता हे त्यांच्या चेहर्यावर मला स्पष्ट दिसत होतं.
“प्रत्येक ऑपरेशनच्या आधी पेशंट आणि त्यांचे नातेवाईक कन्सेंट फॉर्मवर सही तर करतात पण विचारतात की काही धोका नाहीये ना? adverse effect होणार नाही ना? आता काय सांगायचं त्यांना! adverse effect कशाचा नाहीये सर! डोकं दुखतं म्हणून अॅस्प्रीन घेतली तरी रक्तस्रावाचा धोका आहे. पण होण्याची शक्यता किती... पण प्रत्येक पेशंटला मी एवढं सगळं समजावत बसलो तर पेशंट्सची एवढी मोठी रांग पूर्ण कशी होणार?” एपिडर्मिस (त्वचेचा आतला layer) शिवत शिवत मी म्हटलं. मला वाटलं आता तरी विषय संपेल, पण नाही... सरांनी मला पुढे विचारलं, “मग तुला काय वाटतं शौनक, काय करायला पाहिजे?”
“काय माहीत” म्हणून मी खांदे उडवले, मग म्हटलं, “May be, गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. जास्त डॉक्टर्स असले पाहिजेत. पेशंट्स सुशिक्षित असले पाहिजेत”
“ते तर झालंच, पण आता हा आपला पेशंट सतीश कुमार, याच्या बद्दल आपलं उद्दिष्ट काय आहे सांग?”
“याचा इन्ग्वाइनल हर्निया आपल्याला फिक्स करायचाय.” मी लगेच उत्तर दिलं.
“नो....नो.... शौनक, आपलं उद्दिष्ट आहे की या सतीश कुमारने परत ठणठणीत व्हावं, या हर्नियासाठी किंवा यातून उद्भवलेल्या अजून कशासाठी परत हॉस्पिटलला यायची वेळ याच्यावर येऊ नये. आपण सगळे ‘रोगा’चा इलाज करत असतो. आपल्याला ‘रोग्या’चा इलाज करायचाय. शरीराचा इलाज आपण करतोच. पण त्याच्या मनाचा इलाज करण्यासाठी, मनाला ताकद द्यायला हवी. मनाला ताकद कशी येईल, जर डॉक्टरने जुजबी का होईना पण तेव्हढी खरीखुरी माहिती त्याला दिली, त्याला समजावलं आणि ट्रीटमेंटचा फायदा पटवून दिला तर त्याच ट्रीटमेंटला पेशंटचं शरीर जास्त चांगलं रिस्पॉंन्ड करतं असं रिसर्च दाखवतो.”
“अगदी बरोबर आहे, म्हटलंच आहे, प्रज्ञापराधात् रोगः मग जर रोग नेहमी सुरू मनाच्या, प्रज्ञेच्या अपराधाने होतो तर इलाजामध्येसुद्धा मनाचा विचार करायलाच हवा ना.” आमच्या अनास्थेटिस्ट पंडित मॅडमसुद्धा आता आमच्या संभाषणात सहभागी झाल्या. नंतर त्या आणि श्रीखंडे सर Hollistic approach of health (आरोग्याचा समग्र दृष्टीकोन) वगैरे काय काय बोलू लागले. मी झाली तेव्हढी शाळा पुरे म्हणून दिगंतचा मौनमवाला पवित्रा घेतला आणि चुपचाप समोरच्या पेशंटवर फोकस केलं. सांगायची गोष्ट ही की सध्या पेशंट्सना ऑपरेशनच्या आधी थोडी जास्त माहिती देणं सुरू केलाय. बघूया फरक पडतोय का.
मी नेहेमीप्रमाणे हॉस्टेलवरून घरी फोन केला. आईने विचारलं “या रविवारी तू मोकळा आहेस का?” असा प्रश्न आला की मी सावध होतो. आणि नेहमी बघून सांगतो, असं उत्तर देतो किंवा सरळ आधीच ऑन कॉल आहे म्हणून ठोकून देतो. पण आता ते शक्य नव्हतं. मी दबकत “हो आहे” म्हटलं. “अरे चारूच्या मुलीचं, प्रीतीचं लग्नं आहे. तिने खूप आग्रहाने आपल्याला सगळ्यांना बोलावलंय. तू ओळखतोस सुद्धा प्रीतीला.” “आई मला खूप कंटाळा येतो या असल्या फॉरमॅलिटीजचा. दोन दिवस तर मी येतो घरी. मला नको ना जबरदस्ती करू तिकडे यायची”. आईला बहुतेक वाईट वाटलं असावं, पण ती लगेच म्हणाली, “बरं राहूदे. मी आणि बाबा जाऊन येऊ.” दुसर्या दिवशी मला बाबांचा फोन, “तुम्ही फार मोठे झाला आहात आता”
“काय झालं बाबा?” मी विचारलं.
“जेव्हा जेव्हा आम्हांला तुला कुठे घेऊन जायचं असतं, तेव्हा तू ऑन कॉल असतोस (!) मग आम्ही काही म्हणूच शकत नाही. पण आता तर मोकळा आहेस तरीही तू यायला बघत नाहीस. कारण काय तर कंटाळा येतो. तुझी आई, तुला वाढवताना तिला कंटाळा नसेल आला कधी? पण काही कमी केलं तिने कधी? तुझा अभ्यास चालायचा तेव्हा पाण्यापासून सगळं हातात आणून द्यायची, अजूनही देते. तू वाचत जागणार आणि ती तुला चहा करून द्यायला जागणार. तू तिकडे परीक्षा देणार आणि ही इकडे अथर्वशीर्षाची आवर्तनं करत बसणार. बरं करते तेही सगळं शांतपणे. कधी त्याची टिमकी वाजवून तुला सांगणार नाही. पण तुला समजायला नको आता? तिच्या आनंदासाठी एक लहानशी गोष्ट नाही करू शकत! बरं वाटेल तिला तिचा मुलगा तिच्याबरोबर लग्नाला आला तर. कंटाळा म्हणे....” माझी बोलती बंद. आपण सत्य बोलतो तेव्हा ते रिबाउंड येऊन आपल्याला स्वतःला सुद्धा लागू शकतं हे माहीत नव्हतं. बाबांच्या बोलण्यात पॉइंट होता. त्यामुळे मी शनिवारी घरी गेलो. आणि रविवारी लग्नालासुद्धा गेलो. दोन तासांचीच तर गोष्ट होती. आईला खूप बरं वाटलं आणि म्हणून मलासुद्धा !
शनिवारी मी घरी गेलो तेव्हा अजून एक झोल झाला. मी Game of Thrones चे भाग download करून ठेवले होते. दुपारी जेवणं झाल्यावर मी माझ्या खोलीत कॉम्पुटरवर ते बघत बसलो होतो. नेमका एक ऑकवर्ड शॉट लागायला आणि बाबा खोलीत यायला एकच गाठ. घाईत ती स्क्रीन मिनीमाईझही होईना.
“काय हे दिवसा ढवळ्या..... आई घरात आहे एव्हढी तरी लाज बाळगा जरा....” बाबांनी माझा पार उद्धारच केला.
“बाबा, असं काही नाहीये, स्टोरीलाइनसुद्धा खूप चांगली आहे त्याची.” माझा सफाई देण्याचा असफल प्रयत्न.
“स्टोरीलाईन ‘सुद्धा’ !!! हे केस आहेत ना माझे” बाबांनी त्यांचे डोक्यावरचे पांढरे केस चिमटीत धरून मला दाखवले, आणि म्हणाले, “हे उन्हात पांढरे नाही झालेयत. स्टोरीलाईन सांगतायत”
बाबा तणतणत खोलीतून निघून गेले. ते मला अहो जाहो करू लागले म्हणजे त्यांचा फ्यूज उडलाय समजायचं. स्टोरीलाइनसुद्धा चांगली आहे हे अर्धसत्य झालं का?”
शौनकच्या या प्रश्नाला मीराने “हद्द आहे” म्हणून बायकांच्या ठेवणीतल्या eyeroll ने उत्तर दिलं. अवनी हसू लागली. दिगंत म्हणाला, “बॅट्समनला बेनिफिट ऑफ डाउट दिलं जातं तसं शौनकलासुद्धा देऊया. पुढे वाच”
शौनक पुढे वाचू लागला.
“ही झाली दुपारची गोष्ट. संध्याकाळी आई खोलीत आली. मी पुस्तक वाचत बसलो होतो. तिने विचारलं, “शौनक मी पार्लेश्वरला जातेय, येतोस?” आईला बाईकवर यायचं नसतं. जाते तर रिक्षानेच. मग मी कशाला पाहिजे!”
“गाढवा, काकूना तुझ्याबरोबर वेळ घालवायचा असतो. तू घरी जातोस दोन दिवस, त्यात अर्धा वेळ तुझ्या खोलीत, काय करणार त्या!” दिगंतने शौनकला खडसावलं.
“ओके ओके, chill... मी गेलोच शेवटी. मी कां कू करणार इतक्यात बाबा म्हणतात कसे, “त्याला कशाला विचारतेस सुधा. तो बिझी आहे. त्याची सीरिअल बघायची असेल”
“कोणती रे?” आईने कुतूहलाने विचारलं.
“काही नाही गं, चल जाऊन येऊ आपण” म्हणून मी उठलो आणि आईबरोबर गेलो.
पार्लेश्वरच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतलं. नमस्कार करताना मी आईकडे पाहिलं. एखाद्या जवळच्या कुणाला भेटल्यावर हळवं व्हावं तशी ती त्या मूर्तीकडे पहात होती. खरं तर माझ्यासाठी ती ‘गणपतीची मूर्ती’ होती. तिच्यासाठी तो ‘गणपती’ होता. मला आठवलं मेडीकलच्या पहिल्या वर्षी दाभोळकर सर सांगायचे, डिसेक्शनच्या आधी वाचून या, The eyes do not see what mind doesn’t know. भक्तीमधेही तोच प्रकार असावा.
त्यानंतर आम्ही बाजूला शंकराच्या मंदिरात गेलो. तिथे थोडे बसलो. मग पुन्हा गणपती मंदिरात आलो तर इथे कुणा जोशीबुवांचं कीर्तन चालू झालं होतं. “बसूया रे पाच मिनिटं” म्हणून आई जाऊन बसली. मला ऑप्शनच नव्हता. मग मीसुद्धा बसलो. ‘सत्य, प्रेम आणि आनंद हेच परमेश्वराचे मूळ नियम आहेत अश्या अर्थाचं काहीतरी बुवा सांगत होते. ‘अगदी आजच्या काळातसुद्धा लहान गोष्टींपासून ते मोठ्या घडामोडींपर्यंत मानवाला खर्या प्रगतीसाठी सत्याचाच आधार असतो. असत्य निरीक्षणांवर आधारलेले शोध कधी मानवाचा खरा विकास करू शकतील का?’ इथपर्यंत मला समजलं. पुढे ते सांगू लागले, ‘सत्य म्हणजेच ईश्वर, प्रेम म्हणजेच ईश्वर, आनंद म्हणजेच ईश्वर’ आता मला सगळं बंपर जायला लागलं. मग मी आईला “चल ना जाऊया” म्हणून कुजबुजत सांगितलं. “चल, चल, बराच वेळ झाला, तुला उशीर झाला का रे?” बाहेर येता येता आईने मला विचारलं. “उशीर नाही गं, पण मला काही समजत नव्हतं” मी खरं तेच सांगितलं. आई खळखळून हसली. माझ्या बोलण्याने ती अशी हसते तेव्हा छान वाटतं.” शौनकची ही बाजू सहसा समोर येतच नसे. तो वाचताना मीरा एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पहात होती. दिगंत आणि अवनी शौनकचं वाचन ऐकत होतेच पण मीराची काय प्रतिक्रिया आहे ते बघायला ते अधून मधून तिचा चेहराही न्याहाळत होते.
“नाही नाही म्हणत बरंच लिहिलयस की रे” दिगंत शौनकला म्हणाला.
“आता शेवटचा भाग आहे” शौनक म्हणाला “हा काही व्यक्तिशः माझा अनुभव नाही पण सत्याच्या विषयाला धरून आहे म्हणून.... आमच्या वॉर्डला काही कॅन्सर पेशंट्सही असतात. Oncologist (कॅन्सरतज्ञ) त्यांची ट्रीटमेंट करत असतात. त्यांत हा पन्नाशीचा माणूस आहे. आतड्यांचा कॅन्सर आहे. शरीरभर पसरलेला आहे. तो खूप विव्हळत असतो. त्याची बायको दिवसभर त्याच्या सोबत असते. त्याला धीर देत असते, की “डॉक्टर म्हणालेयत आता बरं वाटेल. दुखणं कमी होईल” कसं होईल दुखणं कमी!! मेटामॉर्फिन पर्यंत सगळं देऊन झालंय. He is beyond that. ती कसल्या कसल्या पोथ्या वाचत असते. त्याला दिलासा देत असते. काहीतरी चमत्कार होईल अशी आशा तिला वाटते की सगळं माहीत असूनही ती हे करते आहे? माझ्याकडे कुठलंच उत्तर नाही. इतकी वर्षं इतके रोग, इतके रोगी, आणि इतके मृत्यू पाहून माझं मन आता बधीर झालंय. पण नव्यानेच वॉर्डला यायला लागलेले एकोणीस, वीस वर्षांचे मेडिकल स्टूडंट्स मृत्यूला असं आजूबाजूला रेंगाळताना बघून दडपून जातात. राऊंड्स घेताना अश्याच एका मुलीने मला विचारलं, “अजून किती दिवस सर...... कित्ती कळवळतोय तो.” मी म्हटलं, “The truth is, I don’t know!” त्यावर अगदी अनायास दुसर्या एका स्टूडंटच्या तोंडून आलं, “They say, Life is a beautiful lie but death is the painful truth”
शौनकचं वाचून संपलं. “तुझी ही सिरीयस बाजू बघितली नव्हती शौनक” अवनी म्हणाली. “तेच, तूसुद्धा फिलॉसॉफर झालास की रे” दिगंतने हसून म्हटलं. अभिप्रायाच्या अपेक्षेने शौनकने मीराकडे पाहिलं पण ती तिच्या कॉफीच्या कपच्या आतच पहात होती. मध्येच नजर उचलून तिने फक्त शौनककडे पाहिलं पण बोलली काहीच नाही. ‘हिचं काहीतरी बिनसलंय नक्कीच’ शौनक आणि दिगंत दोघांच्याही मनात एकाच वेळेस एकच विचार आला.
“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं.
क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/
प्रतिक्रिया
8 Aug 2017 - 7:38 am | एस
तुम्ही स्वतः डॉक्टर असल्याने त्या व्यवसायाशी संबंधित बाबी फार खुबीने तुमच्या लेखनात मांडता. छान झालाय हा भागही. पुभाप्र.
8 Aug 2017 - 7:40 am | aanandinee
http://www.misalpav.com/node/40456 चॅलेंज - भाग 2
http://www.misalpav.com/node/40441 चॅलेंज - भाग १
8 Aug 2017 - 8:13 am | पिलीयन रायडर
छान झालाय हा ही भाग! पुढचा पटकन टाका.मीराला काय झालंय? हे वाचायचंय.
8 Aug 2017 - 8:52 am | यशोधरा
आवडलं.
8 Aug 2017 - 9:52 am | हर्मायनी
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतेय..
8 Aug 2017 - 10:33 am | प्रीत-मोहर
मस्तच झालाय हा भाग!!
पुभाप्र
8 Aug 2017 - 10:49 am | शलभ
छान लिहिताय.. लवकर येऊ द्या पुढचे भाग..
8 Aug 2017 - 1:29 pm | संग्राम
पुढच्या भागाची वाट बघत आहे
8 Aug 2017 - 1:44 pm | स्मिता.
आधीच्या भागांवर प्रतिसाद द्यायला जमलं नाही पण लेखमाला आवर्जून वाचत आहे. हा ही भाग खूप छान झालाय. पुभाप्र.
8 Aug 2017 - 3:29 pm | शित्रेउमेश
छान झालाय हा ही भाग! पुढचा पटकन टाका...
8 Aug 2017 - 10:25 pm | चष्मेबद्दूर
मीराच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
9 Aug 2017 - 12:18 pm | अरिंजय
पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
9 Aug 2017 - 12:18 pm | अरिंजय
पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
9 Aug 2017 - 3:19 pm | आदिजोशी
एका पाठोपाठ एक वाचले. सगळे भाग आवडले. पु. भा. शु.
16 Aug 2017 - 3:54 pm | शित्रेउमेश
पुढचा भाग कुठे आहे????