मुलाखत- स्पेशल एज्युकेटर- वेगळ्या मुलांसाठी.

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
18 Nov 2016 - 10:30 am

.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

1
लहान मूल हळूहळू मोठे होत जाताना पाहणं ही त्याच्या भोवतालच्या माणसांसाठी फार आनंददायक गोष्ट असते. वेगवेगळ्या आवाजांना, त्यांच्या नावाला, आपल्या बोलण्याला त्यांचे प्रतिसाद देणं हेही खूप सुखावह असतं. त्याचे नवीन नवीन शब्द शिकून बोलून आपल्याशी संवाद साधणं हेही फार आश्वासक असतं, आपल्याला अजून अजून नवीन स्वप्न पहायला प्रवृत्त करणार्‍या या गोष्टी आपण प्रत्येकच लहान मुलांच्या बाबतीत गृहीत धरलेल्या असतात. कारण ही सगळी वाढ अशा प्रकारे होत जाणं हा निसर्गाचा नियमच आहे!

पण काही मुले मात्र वेगळी निघतात! तान्ही असतानाच काही खेळण्यांना प्रतिसाद देतात पण हाकेला नाही. अशा वेळेस काही पालक 'मूड नसेल त्याचा' असा समज करून घेऊन सोडून देतात. काहीजण नुसतंच 'हूं हूं' करतात. पण काही मुले उशीराच बोलतात, पण त्यांना सगळं समजतंय, हवं ते बरोबर मागून घेतोय, जेवतोय, खेळतोय, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, असा समज असल्याने घरातले फारसं मनावर घेत नाहीत. कधीकधी तर सगळं नॉर्मल वाटत असणारे मूल अचानक गप्प गप्प होत जातं. तंद्री लावून बसतं. ही परस्पर संवादातली दरी हळूहळू वाढत जाते आणि मग पालकांच्या लक्षात येतं की काहीतरी चुकतंय. आणि नक्की काय होतंय हे मुलांना विचारून उपयोग नसतो, कारण मुलं बोलतंच नसतात! मग करणार तरी काय? आणि कळणार तरी कसे? त्यानंतर सतराशेसाठ तपासण्या, वेगवेगळे डॉक्टर्स यांच्या चक्रातून निघून कधीतरी एखाद्या रोगाच्या नावाचे निदान होतं. त्यानंतर मग सुरू होते थेरेपी! मुलाला बोलतं करण्यासाठी योग्य उपचार!

अशीच स्पीच थेरेपी आणि विशेष प्रशिक्षण देणार्‍या एका मैत्रिणीशी अमिता कुलकर्णी हिच्याशी केलेली ही सल्लामसलत; अमिता जवळपास २० वर्षे नव्या मुंबईत या क्षेत्रात काम करतेय.

प्रश्न: मुलांना असलेले ऐकण्यातले आणि बोलण्यातले हे दोष साधारणपणे कधी लक्षात येतात? आणि त्यासाठी तपासण्या कुठल्या करतात?
उत्तर : ऐकू येण्याचे कार्य कसे सुरू आहे हे तपासण्यासाठी 'अ‍ॅकॉस्टिक एमिशन इव्हॅल्युएशन' ही तपासणी पहिल्या २४ तासातही करता येते. आपल्याकडे ही फारशी केली जात नाही. ऐकण्यातला दोष इतक्या लवकर लक्षात आला तर अगदी तीन महिन्याच्या बाळाला सुद्धा हिअरिंग एड लावता येतं. अश्या वेळेस त्याचे बाकीचे शिकणे सोपे जात असल्याने स्पीच थेरेपीही वेळेवर सुरू करून मुलांची वाढ नॉर्मल मुलाच्या बरोबरीने होऊ शकते. ऑटिझम मात्र दीड ते दोन वर्षे वयाच्या मुलांमध्ये दिसू शकतो. प्रगती करणारी मुलं हळूहळू पुन्हा मागे मागे जातात. बोलेनाशी होतात. हसणं रडणं हे असंबद्ध होतं. इतरांमध्ये मिसळेनाशी होतात. कुणाकडे बघायलाही त्यांना आवडत नाही. अशी लक्षणं दिसली तर लगेच उपाय सुरू करायला हवेत. याशिवाय बोलण्याचे कार्य मेंदू करू शकत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ५ ते ६ वर्षे वयाच्या मुलांची ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री हे तपासणी करता येते. त्याप्रमाणे त्यांचे पुढचे उपचार सुरू करता येतात.

प्र.: कुठल्या प्रकारच्या आजारांमध्ये स्पीच थेरेपी उपयोगी पडते?
उ.: स्पीच थेरेपी म्हणजे भाषा आणि वाचा समजून घेऊन त्या वापरणे. हे उपचार लहान मुलांमध्ये कर्णबधिर मुले, बोबडी मुले, ऑटिस्टिक मुले, मतिमंद मुले, सेरेब्रल पाल्सी झालेली मुले किंवा तोतरेपणा किंवा अडखळत बोलणार्‍यंसाठी देता येतात. त्याशिवाय मोठ्यांमध्ये पॅरलिसिस, डिमेन्शिया, अ‍ॅफेझिया या आजारांमध्येही हे उपचार द्यावे लागतात.

प्र.: उपचार कशा पद्धतीचे असतात? कर्णयंत्राशिवाय इतर कुठल्या वस्तू किंवा यंत्र वापरतात का?
उ. : १. श्वासाचे काही व्यायामप्रकार असतात. त्यात मुख्यतः खोल श्वास घेऊन शांतपणे सोडणं आणि शिथिलीकरण हे केलं जातं.
२. जीभ आणि तोंडाच्या स्नायूंचे व्यायाम असतात. त्यात फुगे फुगवणं, जिभेच्या वेगवेगळ्या हालचाली शिकवणं हेही येते.
३. विशिष्ट अक्षरांचे उच्चार परत परत करणं, तोंडात चमचा धरून काही अक्षरे बोलणं हेही उपयोगी ठरतं. यासाठी टंग डिप्रेसर असतो, तोही वापरतात.
४. आरशात बघून बोलणं आणि बोलणं रेकॉर्ड करून पुन्हा ऐकून ते सुधारणं या गोष्टी तर आपल्या आपणही करता येतात.
५. याशिवाय ऑटिस्टिक मुलांमध्ये त्यांना तोंड वापरायचा कंटाळाच असल्याने त्यांचे खाण्याचे कामही नीट होत नसतं. त्यांना चावण्याची क्रियाही शिकवावी लागते. चिक्कीसारखे पदार्थ खायला देऊन ते काम थोडंफार सुधारू शकतं.
एकदा तोंडाचे स्नायू नीट काम करायला लागले की बोलणं ही सुधारू शकतं. त्यासाठी वेगवेगळे व्यायाम महत्त्वाचे ठरतात.
तोतरेपणाबद्दल 'किंग्ज स्पीच' नावाचा एक सिनेमा आहे. तो बघण्यासारखा आहे. बर्‍याच वेळेस बोलण्याचे प्रॉब्लेम्स असणारी माणसे गाताना मात्र चांगली गाऊ शकतात. या गुणाचा उपयोग करून या सिनेमातले पात्र मोठ्या आवाजात गाणे ऐकण्यासाठी हेडफोन्स कानाला लावून मग भाषण द्यायची प्रॅक्टिस करतो!
त्या, त्या पेशंटचा कल बघून थेरेपी देताना अश्या युक्त्यांचाही वापर करावा लागतो. या उपचारांमध्ये सरसकटीकरण करता येत नाही.

प्र. : या प्रकारच्या एकंदरीत उपचारांमध्ये ऑक्युपेशनल थेरेपीही असते का?
उ. : कर्णबधिरांसाठी लिप रिडिंग, ओठांच्या हालचालींवरून शब्द समजून घेणे हे शिकवता येते, शिवाय हल्ली कॉक्युलर इम्प्लान्ट कानात बसवतात. त्यामुळे आवाजाची जाणीव होते व शब्द ओळखण्यास मदत होते.
ऑटिस्टिक, मतिमंद, किंवा लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या मुलांसाठी मात्र बर्‍याच गोष्टी खेळातून शिकवाव्या लागतात, आणि त्यातूनच त्यांच्या मेंदूच्या कार्याला वळण द्यावं लागतं. त्यांच्यासाठी अर्थपूर्ण आणि काही रिझल्ट देणारे, एखादे कोडे सोडवल्यासारखे आणि विचार करायला, पूर्ण गोष्टीचे आकलन करून घ्यायला प्रवृत्त करणारे असे खेळ द्यावे लागतात.
याशिवाय जिग्सॉ पझल, बॅलंसिंग, एक्सरसाइज बॉल, रोप लॅडर, ट्रम्पोलिन, झोपाळा, घसरगुंडी अशा खेळातूनही बर्‍याच गोष्टी शिकवता येतात. याशिवाय त्यांच्या डाव्या आणि उजव्या मेंदूचे संतुलन होऊन त्यांनी एकत्र काम करण्यासाठी दोन्ही हात वापरायला उद्युक्त करावं लागतं. यात दोन्ही हातांनी कामे करणं, डाव्या बाजूची कामे उजव्या हाताने आणि उजव्या बाजूची कामे डाव्या हाताने असेही शिकवतात.

प्र.: या आजारांबद्दल समजल्यावर पालकांच्या प्रतिक्रिया कशा असतात? थेरेपीसाठी येतात तेव्हा त्यांचे प्रश्न काय असतात? या मुलांना सांभाळण्याच्या वेगळ्या पद्धतींमुळे त्यांचे पालक गोंधळून जात असतील ना?
उ. : आधी तर आजाराचा अंदाज आला तरी पालक डिनायलमध्येच जातात. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देताना आणि धीर देताना डॉक्टर आणि थेरेपिस्ट यांना बरेच कष्ट पडतात. त्यानंतर बर्‍याच वेळेस पालकांची मन:स्थिती 'व्हाय मी? ' अशीच असते. शिवाय नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यापासून लपवण्याकडेच बहुतेक सगळ्या लोकांचा कल असतो. त्यासाठी जबरदस्तीने मुलांना नॉर्मल शाळेत घालायची घाईही करतात. त्यात समस्या अजून कठीण होते. त्यापुढे परिस्थितीचा स्वीकार करून प्रत्यक्ष उपचार सुरू करण्यात मध्ये पुष्कळ वेळ वाया गेलेला असतो.

प्र. : पालकांकडून आणि शिक्षकांकडून या मुलांसाठी काय करणं अपेक्षित आहे?
उ. : सगळ्यात आधी डॉक्टरकडून आजाराचे नक्की स्परुप समजून घेणं गरजेचे आहे. आणि त्यानंतर थेरेपिस्टकडून उपचारांचे स्वरूपही लक्षात घ्यायला हवं. कर्णबधिर असोत वा ऑटिस्टिक, त्यांच्याशी संवाद करण्याची पद्धत अगदी वेगळी असल्याने पालकांच्या व शिक्षकांच्याही याबाबतीतल्या विशेष शिक्षणाला पर्याय नाही.
या मुलांना जास्त वेळ द्यावा लागत असल्याने आई किंवा वडील यांना सुरुवातीला तरी पूर्ण वेळ मुलासोबत असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन व्यवहारातल्या त्यांच्या सर्व गोष्टी त्यांना स्वतःला करायला शिकवणे. हे खूप पेशन्सचे काम आहे. पण अत्यावश्यक आहे.
शी, शू लागल्यास सांगणे आणि आपले आपण जाऊन करून नंतर स्वतःच स्वच्छ करून परत येणे, भूक लागली की सांगणे आणि आपल्या हातांनी नीट जेवणं, कपडे घालणं आणि ते अंगावर नीट सांभाळणं, अंघोळ नीट करून बाहेर येणं या गोष्टी शिकवायलाच काही महिने जाऊ शकतात.
आणि बहुसंख्य पालक या गोष्टीतच नाही ते लाड करतात आणि समस्या अजून बिकट करतात.
त्याशिवाय बर्‍याच पालकांच्या पचनी न पडणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शालेय अभ्यासाचा आग्रह न धरणं.
शालेय अभ्यास यायलाच हवा हा आग्रह या मुलांच्या बाबतीत धरणं वेडेपणाचे आहे. त्याचा त्यांना उपयोग नाही. आणि १५ ऐवजी विसाव्या वर्षी मूल दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालं तरीही त्यांच्या नंतरच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नसतो. त्यांनी स्वयंपूर्ण होणं, रोजच्या मुख्य गोष्टींसाठी कुणावरही अवलंबून न राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. शिवाय बर्‍याच गोष्टींचे कन्सेप्ट्स त्यांना वेगवेगळ्या खेळांतूनच समजावून द्यावे लागतात. त्यामुळे शाळेचा रुक्ष व एकमार्गी अभ्यासक्रम त्यांना फार कठीण जाऊ शकतो.
त्याशिवाय भाषा समजणं हीच मुख्य समस्या असल्याने त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देणं सोयीचे आहे. नाहीतर दोन किंवा तीन भाषांमधले शब्द शिकताना त्यांचा फार गोंधळ होतो. कर्णबधिर मुले लिप रीडिंग करून भाषा, शब्द आणि उच्चार शिकत असतील तर एका वेळेस केवळ एकाच भाषेतून त्यांच्याशी संवाद ठेवणे आवश्यक असते आणि ऑटिस्टिक किंवा स्लो लर्नर मुलांना एक गोष्ट शिकवली की तीच फार पक्की होते. हे अक्षरांच्या बाबतीत झालं तर त्याच्या अनुषंगाने इतर गोष्टी शिकवणं कठीण जातं. एका ऑटिस्टिक मुलाला नॉर्मल शाळेत केजी मध्ये घातलं होतं. नंतर शाळेतून काढून थेरेपी सुरू केली. तोपर्यंत त्याचे ए फॉर अ‍ॅपल हे पक्के ठरले होते त्यामुळे ए फॉर एरोप्लेन किंवा ए फॉर अ‍ॅक्स हे त्याला पटतच नव्हतं. त्याला "सी ए टी कॅट" हे सांगणं देखिल शक्य नव्हतं. सी ए टी लिहिल्यावर तो "सी फॉर कप, ए फॉर अ‍ॅपल, टी फॉर ट्री! अमिता रॉन्ग! " असे सांगत होता.

त्यापेक्षा त्याला नेहमीच्या वस्तू आणि त्या वस्तूंच्या नावांचे शब्द कसे दिसतात त्याच्या पाट्या किंवा चिठ्ठ्या दाखवून त्याच्याशी संवाद सुरू केला असता, तर सगळंच जास्त सोपे गेले असते.

प्र. : पण या मुलांना नॉर्मल शाळेत घालूच नये का? किंवा कुठल्या शाळेत घालावं हे कसे ठरवता येईल?
उ. : एक लक्षात घ्यावं की शाळा ही मुख्यतः सोशलायझेशनसाठी आहे. मुख्य शिक्षणाची जबाबदारी पालकांवर, त्याखालोखाल थेरेपिस्ट आणि शिक्षक यांच्यावर आहे. मुलांना योग्य सवयी लावणं आणि कन्सेप्ट्स पक्क्या करणं हे काम पालकांनाच करावं लागतं कारण तेच त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ असतात. थेरेपिस्ट फक्त टेक्निक सांगू शकतात.
त्यामुळे शारीरिक समस्या नसेल तर नॉर्मल शाळा चालू शकते. नाहीतर त्या त्या प्रकारची स्पेशल स्कूल्स बघावीत. पण प्रॉब्लेम्स सिव्हेअर असतील तर मुलांना इन्टेनसिव्ह थेरेपी आणि होमस्कुलिंग हेच करावं लागतं.
पण अशा मुलांच्या सोशलायझेशनसाठी वेगळे प्रयत्न करणंही गरजेचे आहे,

प्र.: ऑटिस्टिक मुलांना शिकवताना कुठल्या वेगळ्या गोष्टी करतात?
उ.: या मुलाना अर्धवट आणि वरवरची माहिती देऊन चालत नाही. त्यांना त्याचा अन्वयार्थ लावता येत नाही. त्यामुळे बोलताना अर्थपूर्ण बोलणं गरजेचे असते. कुठलीही गोष्ट करायला सांगताना त्याबद्दल पूर्ण माहिती देणं आवश्यक ठरतं. आणि ती रिजल्ट ओरिएन्टेड असावी. त्यातून त्यांना इंटरेस्ट वाटतो.
ही मुलं खूप जास्त प्रमाणात टच सेन्सिटिव्ह असतात. त्याप्रमाणे खेळ निवडावे लागतात. बहुतेक सगळ्याच गोष्टी प्ले थेरेपीमधूनच शिकवल्या जातात. म्हणजे त्यांना आपण खेळतोय असंच वाटायला हवं, आपण काहीतरी शिकतोय याचे टेन्शन देऊन चालत नाही.

प्र.: अश्या थेरेपिस्ट होण्याच्या करियरसाठी नवीन मुलं कुठले कोर्सेस करू शकतील?
उ.: हे कोर्सेस पॅरामेडिकल ब्रॅन्चमध्ये आहेत. स्पीच थेरेपीचा १२वी नंतर ४ वर्षाचा कोर्सही आहे.
फिजिओथेरेपी आणि ऑक्युपेशनल थेरेपीचे १२वी नंतरचे कोर्सेस आहेत. या विज्ञानशाखेत १२वी केलेले असावे. कारण त्यात अ‍ॅनाटॉमी आणि काही इनस्ट्रुमेन्ट्स वापरायला शिकवतात. या विषयांच्या नेट, सेट परीक्षाही आहेत.
ऑडिओमेट्रीचा कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर करता येण्यासारखा २ वर्षाचा कोर्सही आहे. बी एड करून स्पेशल एज्युकेटरचा कोर्स करता येतो.

प्र. :कुठल्याही गोष्टी खेळातून शिकवण्याची पद्धत ही खरं तर सगळ्याच मुलांना जास्त उपयोगाची ठरेल का?
उ. : नक्कीच. कारण सध्याची भाषा लिहिणे-वाचणे शिकवण्याची पद्धत अतिशय रुक्ष आणि निरर्थक आहे. त्यात मुलं फार कंटाळतात. फार कमी मुलं अशा पद्धतीनीसुध्दा सहज शिकू शकतात. जास्तीत जास्त मुले सगळ्याच गोष्टीत पाठांतर करण्यावर भर देतात. त्यांची स्मरणशक्ती वापरतात. पण समजणं, विचार करणं, आणि त्यातून पुढे कुठलीही कृती करणं ही कामे मात्र अर्धवट होतात.
त्यामुळे खरं तर सगळ्याच मुलांना शिकवण्याची पद्धत जास्त सोपी आणि खेळकर केली तर नॉर्मल आणि विशेष मुले यांच्या वेगळ्या शाळांचीही गरज पडणार नाही. आपल्या मेंदूची सगळी कार्ये वापरायला शिकणं, फक्त बघून, फक्त ऐकून, फक्त स्पर्शाने किंवा फक्त गंधाने काही गोष्टी समजून घेणं हे सगळ्याच मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक आहे. शिक्षणाचा अश्या समग्र दृष्टीने विकास केला तर निदान सुरुवातीच्या काळात तरी अश्या विशेष आणि नॉर्मल दोन्ही प्रकारच्या मुलांना एकत्र खेळत शिकता येईल. ते त्यांच्या वाढीसाठी जास्त पोषक ठरेल.

**********************************************************
1
.
.
_________________
.
.
(बालदिन लेखमालिकेत अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)

समाजजीवनमानशिक्षणविचारमाहितीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

व्यवस्थित वाचण्यासाठी वाखुसाआ. धन्यवाद या लेखाबद्दल.

धन्यवाद माऊ.. वाचनखुण साठवली आहे.

पाटीलभाऊ's picture

18 Nov 2016 - 2:31 pm | पाटीलभाऊ

वाचनखुण साठवली आहे.

उत्तम मुलाखत माऊ. धन्यवाद.

माहितीपूर्ण मुलाखत. धन्यवाद माऊ.

बोका-ए-आझम's picture

18 Nov 2016 - 6:54 pm | बोका-ए-आझम

वाखुसाआ!

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 7:36 pm | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण, उत्तम मुलाखत.
स्वाती

दिपुडी's picture

18 Nov 2016 - 8:04 pm | दिपुडी

माझी भाची ३ वर्षांची आहे परंतु अजूनही स्पष्ट बोलत नाही .आई बाबा आजी आबा दीदी इतकेच शब्द स्पष्ट बोलू शकते
व इतर शब्द पटकन तिऱ्हाईत माणसाला कळतच नाहीत .डॉक्टरी उपचारांची गरज आहे का ?

थोडा धीर धरा, कारण काही बाळांना बोलावे असे खूप वाटत असते पण, मोठी लोक पाहून ती अबोल होतात. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे. जर खूपच वाटले तर डॉकटरी सल्ला नक्की घ्यावा त्यात काही वाईट नाही.

कवितानागेश's picture

19 Nov 2016 - 4:59 pm | कवितानागेश

सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही.
भरपूर चावावे लागेल असे पदार्थ द्या आणि जीभेने वेडावून दाखवण्याचे खेळ खेळा.
मुख्यतः ज्या योगे तिला तोंडचे मसल्स वापरायची सवय होईल आणि अक्षरे उच्चारायची इच्छा होईल असे खेळ खेळा.
शिवाय कसली भीती बसली नाहीये ना, हेही पहावे लागेल.

उपचारांबाबत नक्की माहीत नाही, पण डॉक्टरांना दाखवण्यात नुकसान काही नसावे. आमच्या शेजार्‍यांचीही मुलगी आधी फार कमी शब्द बोलायची, पण तिला बोललेले सर्व काही समजायचे. आता मात्र ती अफाट बोलते :)

मुलाखत खूप माहितीपूर्ण आहे! इथे देण्यासाठी धन्यवाद.

इतक्या थेरपीज उपलब्ध आहेत हे नव्याने समजले. मुलाखत आवडली माऊ.

दिपुडी's picture

19 Nov 2016 - 9:35 am | दिपुडी

निओ१ रुपी .धन्यवाद

दिपुडी's picture

19 Nov 2016 - 10:29 pm | दिपुडी

सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही.>>>>खरे म्हणजे भाची नेहमीच्या वस्तुंना प्रतिशब्द वापरते अर्थात ते स्पष्ट नसतातच .म्हणेज गाडीला जीजी ,बिस्किटला अदा, गार्डनला पियू असे खूप आहेत.
मात्र ऐकू येणे व समजणे या क्रिया एकदम ओक्के आहेत

पद्मावति's picture

19 Nov 2016 - 10:33 pm | पद्मावति

खूप छान मुलाखत. धन्यवाद.