दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)

Primary tabs

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 10:08 am

१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता. बोट तिच्या अफाट ताकदीच्या इंजिनच्या जोरावर अविरत पाणी कापत पुढे पुढे जात असते. त्यामुळे तयार झालेल्या लाटांचा हळुवार आवाज येत असतो. बस्स ! डोक्यावर अशक्य घनदाट तारे !

मी मुंबईला वाढलो असल्यामुळे इतके तारे आणि अशी शांतता कधीच अनुभवली नव्हती. मी जेव्हां बोटीवर नवा होतो तेव्हां मला याचं जितकं अप्रूप वाटायचं तितकंच अजूनही वाटतं. डोक्यात फिलॉसॉफिकल विचार येऊ लागतात. हे जे तारे मला दिसताहेत तो प्रकाश कोट्यावधी वर्षांपूर्वी तिथून निघाला आहे. महाप्रचंड आकाराचं हे विश्व. त्यात कस्पटासमान एक पृथ्वी. त्यावरच एक कणमात्र जीव आपण. ‘नगण्य’ हा शब्द देखील कौतुकाचाच वाटावा इतकं छोटं आपलं या विश्वातलं स्थान. मात्र आपला मान, अपमान, आवडी, निवडी, यश, अपयश यातच आपण किती गुंतलेलो असतो नाही? जॉन रस्किननं म्हटलंच आहे, “A man all wrapped up in himself makes a very small package.” असो.

काही महिन्यांपूर्वीच आमच्या कंपनीने ही बोट तिच्या आधीच्या ग्रीक मालकाकडून विकत घेतली होती. ग्रीक बोटींची रचना बाकीच्या बोटींपेक्षा त्या काळी जरा वेगळी असायची. जगभर कॅप्टन आणि चीफ इंजिनिअरच्या केबिन्स एकाच डेकवर (ब्रिजच्या खालचा डेक. ब्रिज म्हणजे जिथून बोट चालवतात ती जागा. ही सगळ्यात उंचीवर असते) असतात. कॅप्टनची उजवीकडे, चीफ इंजिनियरची डावीकडे. ग्रीक बोटींवर मात्र कॅप्टनच्या डेकवर रेडियो ऑफिसरची केबिन असायची. कॅप्टनच्या खाली चीफ ऑफिसरची, रेडियो ऑफिसरच्या खाली चीफ इंजिनियरची. या फरकाचं व्यवस्थित कारण ग्रीक नाविकही सांगू शकत नाहीत.

मी चीफ इंजिनियर. माझ्या केबिनमध्येच माझं ऑफिस होतं. सकाळच्या वेळेस मी काही काम करीत बसलो होतो. दहा वाजले होते. इतक्यांत ‘धाऽऽड्’ असा अति प्रचंड स्फोट झाला ! कानाशेजारीच दिवाळीचा सुतळी (अ‍ॅटम) बॉम्ब फुटावा तसा आवाज ! इतका मोठा आवाज मी आयुष्यांत त्यापूर्वी अन् त्यानंतर कधीही ऐकलेला नाही. मी ताडकन् उभा राहिलो आणि माझ्या धक्क्यानी खुर्ची मागे कोलमडली पण आवाजच आला नाही. मला वाटलं मी बहिरा झालो!

नक्की इंजिन रुममध्ये स्फोट झालाय्. माझ्या पोटात गचकन् गोळा आला. बोटीची इंजिन रूम मुख्यतः पाण्याखाली असते, आणि सर्व बाजूंनी बंदिस्त असते. जर इतक्या उंच माझ्या केबिनमध्ये एवढा दणका आला तर प्रत्यक्ष इंजिन रुममध्ये काय भयानक परिस्थिती असेल ! माझा सगळा स्टाफ तिथे काम करीत होता. ते तर सगळे जागच्या जागीच ........ नको ! तो विचारच नको ! मी धावत सुटलो. इंजिन रूमच्या भिंती आणि दरवाजे स्टीलचे असतात. माझी अपेक्षा अशी की मी इंजिन रूमचा दरवाजा उघडीन तेव्हां धुराचे लोट अन् ज्वाळा मला दिसणार ! दरवाजाला हात लावून अंदाज घेतला. आश्चर्य म्हणजे अजिबात गरम नव्हता. काळजीपूर्वक उघडला. धूर नाही, आग नाही ! इंजिन नेहमीच्याच दादरा तालात ‘धधक् धधक् धधक् धधक्’ व्यवस्थित चालू होतं. मी बहिरा झालो नव्हतो तर ! इंजिन स्टाफची पळापळ चालली होती पण काहीच out of place दिसंत नव्हतं. इतक्यात सेकंड इंजिनियरनी मला पाहिलं आणि ‘सर्व काही ठीक आहे’ अशी खूण केली.

माझी चूक माझ्या लक्षांत आली. स्फोट ऐकल्यावर मी पूर्वग्रहच करून घेतला होता की इंजिनमध्ये स्फोट झाला असावा. प्रत्यक्षांत मात्र आवाज माझ्या डोक्यावरून आला होता. उलटा वळून वरच्या दिशेनी धावत सुटलो.

माझ्या डेकवर पोहोचलो तेव्हां कानावर एक अमानुष असा आवाज आला ! ती हाक नव्हती, किंचाळीही नव्हती. हंबरडा होता ! आऽऽऽऽऽह, आऽऽऽऽऽह ! मी कॅप्टनच्या डेकवर पोहोचलो तर सॉ मिलमध्ये जसा लाकडाच्या भुशाचा दर्प येतो तसा दर्प आला. समोरच आमचा स्टुवर्ड पुतळ्यासारखा उभा. तोंडाचा आ वासलेला. भीतीनी थिजलेला, रेडियो रूमकडे एकटक पहात होता. त्याच क्षणी आमचा रेडियो ऑफिसर 'जोसेफ' रेडियो रुममधून भेलकांडत बाहेर पडला. उजव्या हातांनी पोट घट्ट धरलेलं. डावा हात लुळा. पोटातून बदाबदा रक्त वाहात होतं ! त्या रक्तानी पँटचा वरचा अर्धा भाग ओलाचिंब ! चेहर्‍याच्या डाव्या भागावर असंख्य छोट्या छोट्या जखमा. अजिबात निर्व्यसनी आणि रोज भरपूर व्यायाम करणार्‍या जोसेफची शरीरयष्टी बळकट. त्याचं मनगट साधारण माणसाच्या दुप्पट आकाराचं. त्याच्या डाव्या मनगटांत आरपार भोक पडलेलं !

स्फोट झाला की आग अपरिहार्यच. “जो, जो” हाक मारत मी त्याचे खांदे धरले पण तो मला आवरत नव्हता. मी स्टुवर्डला सांगितलं, “याला बाहेर झोपव आणि कॅप्टनला ब्रिजवरून लगेच बोलाव. मी आगीचं पहातो.”

आधुनिक बोटींना बुडण्यापेक्षा जास्त धोका असतो तो आगीचा. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मशिनरी आणि इक्विपमेंट ठासून भरलेली असते. शिवाय बोटीवर फायर ब्रिगेड आपणच, डॉक्टर आपणच, म्युनिसिपालिटी सुद्धा आपणच. आग विझवण्यासाठी फायर एक्स्टिंग्विशर उचलला आणि रेडियो रूममध्ये डोकावलो. आग नाही, धूर नाही, जळल्याचा वास नाही, काहीच नाही. जोसेफची खुर्ची नाही. रेडियो इक्विपमेंट देखील नाही ! आं? असं कसं? दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्फोट होऊन निदान मिनिटभर तरी झालंच होतं. आत्तापर्यंत इथे खूप जण जमायला हवे होते. मी एकटाच कसा? अशा अतर्क्य आणि हीरोगिरीच्या गोष्टी फक्त स्वप्नातच होतात. हे स्वप्न तर नसेल? हो. बहुदा स्वप्नच आहे. मला हायसं वाटलं. परत बाहेर आलो. जोसेफ आणि स्टुवर्ड दिसले नाहीत. पण जमिनीवर रक्त भरपूर. खाली बसून त्याला हात लावून बघितला. रक्त खरं होतं. श्शिट !!

अलार्मच्या घंटा आणि भोंगा वाजायला लागला. कॅप्टनला बातमी समजली होती.

परत रेडियो रूममध्ये शिरलो. रेडियो रुमला एक खिडकी होती. बोटीवरच्या भिंती स्टीलच्या, खिडक्या छोट्या आणि भक्कम असतात. त्यांना ‘पोर्टहोल’ असं म्हणतात. स्टीलच्या भिंती वाईट दिसतात म्हणून त्यांना लाकडी पॅनेलिंग केलेलं असतं. या पोर्टहोलच्या शेजारी भिंतीला दीड फूट व्यासाचं भोक पडलेलं होतं. सर्व रेडियो सामुग्रीचा चक्काचूर होऊन जमिनीवर सडा पडला होता. फाइल्सचं कपाटही नाहिसं झालं होतं. त्यातल्या कागदांचे बारीक बारीक तुकडे आणि पॅनेलिंगच्या लाकडाचा भुगा होऊन त्यांनी या रेडियो सामुग्रीच्या सड्याला स्नोफॉल झाल्याप्रमाणे आच्छादून टाकलं होतं. आठदहा वायर्स छतापासून सापांसारख्या लोंबकळत होत्या.
त्या काळात कॉम्प्यूटर्स बोटींवर फारसे दिसायचे नाहीत. आमच्या बोटीवरचा पहिलावहिला कॉम्प्यूटर आम्ही नुकताच व्हॅन्कूवरला विकत घेतला होता. त्याची स्थापना अर्थातच रेडियो रुममध्ये झाली होती. त्या दशकात पंजाबमध्ये खालिस्तान प्रकरण जोरांत होतं. व्हॅन्कूवरमध्ये पंजाबी इमिग्रंटस प्रचंड प्रमाणात. आमची बोट भारतीय. आमच्या बोटीवर बॉम्ब लावण्याची धमकी तिथल्या पोलिसांकडे आलेली होती. त्यामुळे आम्हाला कोणालाही जमिनीवर पाऊल देखील ठेवायला परवानगी मिळालेली नव्हती. या नव्या कॉम्प्यूटरमध्ये बॉम्ब ठेवला गेला असणार आणि जोसेफनी तो ‘on’ करताक्षणी त्याचा स्फोट झाला असणार असा मी कयास बांधला.

काही का असेना, बोटीला जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं. आता बोटीला धोका नव्हता. जोसेफकडे जाणं जास्त महत्वाचं होतं. मी मागे वळलो. जोसेफच्या केबिनकडे माझं लक्षं गेलं आणि मी दचकलोच ! त्याच्या केबिनचं दार, कपाट, लिहिण्याचं टेबल, झोपायचा पलंग, काहीच नव्हतं ! केबिनची समोरची भिंत (ही देखील स्टीलची) फुटून मोठं भगदाड पडलं होतं.

या भगदाडातून मला बोटीचा डेक दिसत होता. एक खलाशी हातात डोकं धरून बसला होता. त्याच्या सोबतीला आणखी एक खलाशी होता. बाकी आठ दहा खलाशी (बहुदा अलार्मच्या घंटा ऐकून) लगबगीनी परत येत होते.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! एक बॉम्ब मागची भिंत फोडून आत आला असणार. ही भिंत फोडताना बॉम्बचे तुकडे तुकडे झाले. हे तुकडे रेडियो रुमचा नाश करून जोसेफच्या केबिनमध्ये शिरले, सामानासकट पुढची भिंत फोडून बाहेर गेले. टॉर्चचा प्रकाश जसा पसरत जातो तसं या बॉम्बच्या विध्वंसाच्या वर्तुळाची त्रिज्या आत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत वाढत वाढत गेली होती. यातला एखादा तुकडा डेकवर साधारण दोनशे फुटावर काम करीत असलेल्या खलाशाला लागला असणार.

मग आम्ही सारे अजून जिवंत का? बॉम्ब फुसका निघाला म्हणून?

पॅसिफिक महासागराच्या मधोमध आपल्या बोटीवर बॉम्ब? प्रश्न इतका भन्नाट होता की उत्तर सुचण्याची शक्यताच नव्हती.

आता इथे करण्यासारखं काहीच नव्हतं. जोसेफच्या मागावर निघालो. दुर्दैवानी माग काढणं अगदी सोपं होतं. कारण वर ब्रिजकडे जाणार्‍या पायर्‍या रक्ताळल्या होत्या. ब्रिजवर पोहोचलो.

कॅप्टनला झालेल्या प्रकाराची कल्पना दिली. जोसेफ कोचावर आडवा होता. छाती भात्यासारखी चालली होती. पोटावरचा हात तो काढू देत नव्हता. कॅप्टननी वैद्यकीय सामान आणायला लोक पिटाळले होते. मालवाहू बोटींवर डॉक्टर नसतो. प्रथमोपचाराचं प्रशिक्षण हीच आमच्या डॉक्टरी ज्ञानाची तुटपुंजी पुंजी. वेगवेगळे अपघात, आजार वगैरे बाबतीत काय आणि कशी ट्रीटमेंट द्यावी, बँडेजेस् कशी बांधावी याबद्दल सचित्र आणि अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं Ship Captain’s Medical Guide नावाचं पुस्तक असतं. पोटाची जखम नळासारखी वाहात होती. पुस्तकात बघून बँडेज आणि घट्ट पट्टे लावून रक्तस्त्राव थोपवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. डाव्या हाताले टूनिके (Tourniquette) लावलं. हातातला रक्तस्त्राव लगेचच आटोक्यात आला. थोड्या वेळानी पोटाचा सुद्धा. चेहर्‍यावरच्या जखमा भेसूर दिसत होत्या पण त्या धोक्याच्या नव्हत्या. सुदैवानी डोळेही वाचले होते.

आपण सोन्याची पूजा करतो, पण खरं तर रक्ताएवढं मौल्यवान दुसरं काही नाही.

जोसेफ restless होता. पण जसजसा वेळ जायला लागला तसा त्याचा चेहरा निस्तेज व्हायला लागला. त्याच्याशी बोलून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करीत होतो. पण बोलताना आपलेच शब्द किती पोकळ आणि निरर्थक आहेत याची क्षणाक्षणाला जाणीव होत होती.

बोटीवरची बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याची मुख्य साधनं सगळी खलास झाली होती. संकटकाळात बोट सोडून जाण्यासाठी ज्या life boats असतात त्यात देखील एक एक रेडियो असतो. पण त्या काळी हे रेडियो सुद्धा रेडियो रुममध्ये ठेवण्याची प्रथा होती. ते देखील खलास झाले होते. ब्रिजवर एक VHF (Very High Frequency) रेडियो होता. याची क्षमता साधारण चाळीस मैलापर्यंत असते. कॅप्टन संपर्काचा अविरत प्रयत्न करीत होता. अमेरिकन नौदलाला बोलावत होता. आम्हाला रडारवर कित्येक बोटी दिसत होत्या. म्हणजे त्यांना आमचं transmission नक्कीच ऐकू जात होतं. तरीही उत्तर येत नव्हतं. संकटात असलेल्या बोटीच्या हाकेला दुसर्‍या बोटीने ऐकू येऊनही उत्तर दिलं नाही असं कधीच, म्हणजे अजिबात कधीच होत नाही. मग आजच असं का? कॅप्टन पुनःपुन्हा अमेरिकन नौदलाला बोलवतो आहे हे मला ऐकू येत होतं पण त्यांनाच का, ते तेव्हां माहित नव्हतं. पण आणीबाणीची वेळ आपापलं काम व्यवस्थित करण्याची असते. चांभारचौकशांची नव्हे.

आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनी जखम घट्ट बांधून त्याचा पोटाचा बाह्य रक्तस्त्राव जवळजवळ थांबवला खरा, पण आंतरिक रक्तस्त्राव चालूच राहिला असणार. जोसेफ हळुहळु क्षीण होत चालला होता. “प्लीज, मला जगायचंय, मला मुलीला भेटायचंय रे !!” त्याच्या शब्दांनी काळजावर खर्रकन् करवतंच चालत होती. आपल्या समक्ष आपला मित्र हळुहळु बुडतोय. आपली मदत मागतोय आणि आपण काहीच करू शकत नाही? स्वतःची अन् स्वतःच्या असहायतेची, नपुसकत्वाची किळस आली ! त्याला पोकळ धीर देणं सुरूच होतं. “हे बघ, सुदैवानी तुझं ब्लीडिंग थांबलं आहे. आपण बोट होनोलुलुच्या दिशेनी वळवली आहे. तिथे पोहोचूच. तुझे कपडे अन् टूथ ब्रश घेऊन मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येतो. आणि हो. पत्र लिहायला कागद पेनही घेतो.”

त्याला तीन वर्षाची मुलगी होती. सगळ्यांचंच आपापल्या बायकामुलांवर प्रेम असतं. पण याचं खासच होतं. तो न चुकता रोज बायकोला एक पत्र लिहायचा ! प्रत्येक पत्रांत मुलीकरता चित्रं काढायचा ! बोट बंदराला पोहोचली की वीस पंचवीस पत्रं एकदम पाठवायचा. आम्ही त्याचं नाव ‘लव्ह बर्ड’ असं ठेवलं होतं. पण त्याला त्याची अजिबात फिकीर नव्हती.

धन्य त्या मायलेकी ज्यांना दर महिन्याला पंचवीस पत्रं मिळायची !

या प्रसंगाच्या दोन महिने आधीपर्यंत माझी पत्नी शुभदा बोटीवर होती. प्रेग्नंट राहिल्यामुळे ती उतरून घरी परतणार होती. जोसेफ अतिशय मितभाषी. त्याच्याकडून एकसंध वाक्य वदवायचं म्हणजे कर्मकठीण. पण त्या काळांत तो शुभदाला बाळाची काळजी कशी घेतात, त्यात बापाची भूमिका काय असते, मुलांचे लहानमोठे आजार, त्यामुळे होणारी जागरणं, त्यात त्रासाबरोबरच आनंद कसा असतो, वगैरेचं भरपूर वर्णन करायचा. हिला देखील ते ऐकायला आवडायचं.

याच्याही आधी चार वर्षं आम्ही तिघं (मी, शुभदा आणि जोसेफ) दुसर्‍या एका बोटीवर एकत्र होतो. आमचं नुकतंच लग्न झालं होतं. जोसेफचं लग्न होऊन दोन वर्षं झाली होती. तेव्हां त्यानी आम्हाला आमच्या दृष्टीने अविश्वसनीय अशी एक गोष्ट सांगितली होती. (याचा उल्लेख पुढे होईलच). माझ्या डोळ्यासमोर या सर्व आठवणींचा चित्रपट. आतड्याला पीळ पडला.

आता त्याला आम्ही बोललेलं काही कळंत नव्हतं. पाणी पाहिजे का विचारल्यावर उत्तर दिलं नाही.

मूर्खा, त्याला पाणी नको आहे. प्राण हवे आहेत प्राण ! देऊ शकशील? गणेशचतुर्थीला पीतांबर नेसून लुटुपुटूची प्राणप्रतिष्ठा करतोस अन् स्वतःला धन्य समजतोस ! आत्ता त्याची खरी जरूर आहे ! येईल करता?

आपल्याकडे जे आहे ते दुसर्‍याला देणं हा दानधर्म. दुसर्‍याला ज्याची नितांत जरूर आहे ते त्याच क्षणी त्याला देणं ही खरी मदत ! करू शकशील? प्रश्नंच प्रश्न ! उत्तरं आहेत कुठे?

एकदम् जोसेफनी उठायचा जिवापाड प्रयत्न केला. पण ते त्याच्या शक्तीपलीकडचं होतं. पण तेवढ्याशा हालचालीनी पुन्हा रक्तस्त्राव सुरू ! आम्ही आणखी दोन बँडेजेस वापरून लगेच थांबवला. बेअक्कल आम्ही! रक्त आम्ही थांबवलंच नव्हतं. ते आपोआपच बंद झालं होतं.

कारण त्याचं हृदयच थांबलं होतं !

लगेच आम्ही cardiac massage आणि mouth to mouth respiration सुरू केलं. अन् ते वैद्यकीय मदत येईपर्यंत अविश्रांत चालूच ठेवलं. आम्ही जरी मानायला तयार नसलो तरी सत्य असं होतं की आमच्या गचाळ पहार्‍यातून यमदूतांनी आमच्या लव्ह बर्डला उचलून नेलं होतं.

गोष्ट अजून पुढे बरीच आहे पण आत्तापर्यंत जे झालं ते का – हे कळण्यासाठी चोवीस तास मागे जाणं जरूर आहे.

जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां तो कुठे आणि केव्हां होणार आहे याची महिती ठराविक रेडियोलहरींवर (frequency) प्रसारित करतात. संदेश घेण्याचं काम रेडियो ऑफिसरचं. त्याची दखल घेऊन आपापला मर्ग बदलण्याची जबाबदारी बोटींची असते. त्याप्रमाणे अमेरिकन नौदलाने सर्व माहिती प्रसारित केली होती.

जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले. पण परमेश्वराच्या राज्यात चुकीला क्षमा नाही.

पहाटे पाच वाजता अमेरिकन नौदलानी आमच्याशी संपर्क साधून विचारलं, “तुम्ही इथे काय करताय?”

“काय करतोय म्हणजे? व्हँकूवरहून सिंगापूरला चाललो आहोत.”

“आमचा सराव काही तासांत सुरू होणार आहे. तुम्ही मार्ग बदलून आता उत्तरेचा रस्ता धरा म्हणजे सरावाच्या परिघातून लवकरांत लवकर बाहेर पडाल.”

आमची बोट उत्तरेकडे वळली. सकाळी आठ वाजता लष्करानी आम्हाला कळवलं, “तुम्ही सरावाच्या आयताच्या बाहेर पडलेले आहात. आता तुम्हाला पश्चिमेकडे जायला हरकत नाही.”

लष्करानी सरावासाठी आयताकृति क्षेत्र ठरवलेलं होतं. पूर्व-पश्चिम शंभर मैल, उत्तर-दक्षिण साठ मैल. म्हणजे आता आम्ही या आयताच्या उत्तर बाजूनी बाहेर पडून, पश्चिमेकडे चाललो होतो. या आयतामध्ये नौदलानी दोन भंगार बोटी ठेवल्या होत्या. त्यावर अर्थातच माणसं नव्हती. विमानं, पाणबुड्या आणि बोटींनी या दोन भंगार बोटींवर मारा करायचा होता.

आम्ही बाहेर पडल्यावर त्यांचा सराव सुरू झाला. आमच्या बोटीची दिनचर्या देखील नेहमीप्रमाणे सुरू झाली. डेकवर आणि इंजिनरुममध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क झाले.

निष्काळजीपणे असं सरावाच्या परिघांत शिरणं ही आमच्या बोटीच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट होती. त्याबाबत कॅप्टननी जोसेफला फैलावर घेतला.

मी, कॅप्टन आणि जोसेफ यांचा एक रोजचा ठरलेला शिरस्ता असायचा. मी पावणेदहा वाजता ब्रिजवर जायचो. कॅप्टन तिथे असायचाच. कॉफी पितापिता दिवसाच्या कामाबद्दल चर्चा करायचो. तोपर्यंत जोसेफही तिथे यायचा. पाठवायचे संदेश, टाइप करायची पत्रं वगैरेंचा मसुदा घेऊन तो साडेदहाच्या सुमारास रेडियोरुमकडे रवाना व्हायचा आणि मी इंजिनरूमकडे.

स्टुवर्डचं काम म्हणजे आमच्या केबिनस्, ऑफिसेस् वगैरे साफ करणं, जेवण टेबलावर लावणं, क्रॉकरी कटलरी धुणं वगैरे. तो या रेडियो ऑफिसरच्या पाऊण तासाच्या गैरहजेरीचा उपयोग करून त्याच वेळेत रेडियोरूम अन् रेडियो ऑफिसरची केबिन साफ करायचा. त्याही दिवशी त्याने नेहमीप्रमाणे साफसफाई सुरू केली.

लक्ष्य डोळ्यानी बघून त्यावर नेम धरून क्षेपणास्त्र डागण्याची पद्धत (अमेरिकेच्या आरमाराच्या बाबतीत तरी) कधीच कालबाह्य झाली होती. रडारवर लक्ष्याचे अक्षांश, रेखांश, आकार, वेग वगैरे एकदा कॉम्प्यूटरमध्ये भरून क्षेपणास्त्र सोडायचं अन् विसरायचं. (Fire and Forget) ते आपलं काम बिनचूक करणारच.

एका वैमानिकानी एकशेवीस मैलावरून ‘हारपून’ नावाचं मिसाइल डागलं. ते सणाणत निघालं. मात्र त्या मूर्खानी भंगार बोटीच्या अक्षांश रेखांशाऐवजी आमचे टाकले होते ! जेव्हां असा सराव चालतो तेव्हां एक मोठी युद्धनौका सूत्रसंचालन करीत असते. त्यांच्या लक्षांत आलं की एक मिसाइल चुकीच्या दिशेनी निघालं आहे. अशा नियंत्रणाबाहेरच्या मिसाइलला Rogue Missile असं म्हणतात. त्याला थांबवण्याचा एकच उपाय. तो म्हणजे विमानानी त्याला गाठून पाडायचं. काम महाकर्मकठीण. हवेत असलेल्या दोन एफ १६ विमानांना हे काम देण्यात आलं. तेव्हां आमच्या बोटीपर्यंत मिसाइलला पोचायला चार मिनिटं लागणार होती.

त्या दिवशी मला काही महत्वाचं काम असल्या कारणानी मी ब्रिजवर उशिरा जायचं ठरवलं होतं. आम्ही दोघं ब्रिजवर असणार या अपेक्षेनं जोसेफ नेहमीच्या वेळेस ब्रिजवर आला. मी नव्हतो. झालेल्या निष्काळजीपणामुळे खजील होता. काही न बोलता पटापट कॉफी संपवून तो रेडियोरूमकडे रवाना झाला.

मिसाइल पाडण्यासाठी दोन फाइटर्स निघाली. आमची बोट पश्चिमेकडे चालली होती. मिसाइल पूर्वेकडून, म्हणजे आमच्या पाठीमागून येत होतं. फाइटर्स दक्षिणेकडून, म्हणजे आमच्या डावीकडून येत होती. त्यांची एकमेकाशी भेट आमच्या बोटीजवळच काटकोनात होणार होती. मिसाइल आपटायला आता तीन मिनिटं बाकी होती. मिसाइल आणि विमानं यांच्यात जीवघेणी शर्यत सुरू झाली होती.

अत्युच्च तंत्रज्ञानानी बनवलेली तीन आयुधं ! महासंहाराकरता निर्माण केलेली. तिघांनाही आपापलं काम फत्ते करण्यासाठी फक्त एकच संधी मिळणार होती.

युद्धनौकांना फोडण्यासाठी बनवलेलं हे मिसाइल. त्याच्यापुढे आमची बोट म्हणजे किस पेड की पत्ती ! आमचं नशीब की हे मिसाइल सरावासाठी बनवलं असल्यामुळे त्यात दारुगोळा नव्हता. पण कुठेही लागलं तरी ते आरपारच जाणार म्हटल्यावर बोटीवर सुरक्षित जागा अशी नाहीच. कॅप्टनची पत्नी आणि मुलगी धरून बोटीवर एकूण एकोणतीस जीव. पातळ धाग्यांच्या आधारानी लोंबकळणार्‍या एकोणतीस कठपुतळ्या. कोठला धागा कापायचा आणि कोणता नाही हे नियती कशाच्या आधारावर ठरवत असेल? आणि कधी? शेवटच्या क्षणी?

काळ रोरावत आमच्या दिशेनी येत होता. आता एकच मिनिट. नियतीनी टाकलेले फासे अजून घरंगळंत होते ! आम्ही सगळे मात्र अज्ञानाच्या रजईच्या उबेत निवांत होतो.

जोसेफ रेडियो रुमपाशी पोहोचला. स्टुवर्डची साफसफाई सुरूच होती. दोन मिनिटात संपवून निघतो असं त्यानी सांगितलं पण जोसेफची थांबायची तयारी नव्हती. त्यानी जरा घुश्श्यांतच “आज काम नाही झालं तरी चालेल पण लगेच चालू लाग” असा आग्रह धरल्यामुळे नाखुशीनीच स्टुवर्ड रेडियो रुममधून बाहेर पडला. लगेच जोसेफ आत शिरला. बसण्यासाठी खुर्ची मागे ओढली मात्र !

“धाऽऽड !”

आपल्या ओठांवर एक सावज उभं आहे असं बघून मृत्यूनी जीभ फिरवली होती. तितक्यांत अदलाबदल झाली होती ! स्टुवर्डचा पुनर्जन्म झाला होता ! मात्र त्यासाठी मोजायला लागलेल्या किमतीचं मोजमाप करायचं म्हटलं तर कोणाच्या फुटपट्टीनी करायचं? स्टुवर्डच्या पत्नीच्या का जोसेफच्या?

मदतीसाठी आमचा आक्रोश सुरूच होता. मात्र एकही बोट आम्हाला उत्तर देत नव्हती. जणु सगळ्यांनी आपापले रेडियो बंदंच करून ठेवले होते ! याचं कारण आम्हाला काही दिवसांनी होनोलुलुच्या वर्तमानपत्रांमधून कळलं. अमेरिकन रणनीतीमधला तो एक भाग आहे. प्रत्येक लढाईचे वेगवेगळे प्लॅन्स केलेले असतात. प्लॅन १ फसला तर प्लॅन २. तो ही शक्य नसेल तर प्लॅन ३. मात्र अगदी अनपेक्षित असं काही झालं तर सर्वांनी पूर्णपणे मौन (Radio Silence) पाळायचा. कमांडर नवीन परिस्थितीला योग्य असा चौथा प्लॅन बनवतो आणि सार्‍यांना कळवतो. मगच पुढचं पाऊल. आमच्या बाबतीत तसंच झालं होतं. त्यात वीस मिनिटं वाया गेली होती. त्याची भीषण किंमत जोसेफला मोजावी लागली होती !

अर्ध्या तासानी आरमाराचं Medevac Helo (Medical Evacuation Helicopter) आमच्या बोटीवर उतरलं. खूपंच सामुग्री घेऊन तिघे आले होते. त्यांनी लगेच उपचार सुरू केले. इलेक्ट्रिक शॉक देऊन हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला. इ.सी.जी. मशीन लावलं. बोट कायम थरथरंत असते. त्यामुळे की काय, आलेखात छोटी छोटी शिखरं दिसत होती. आमच्या आशा पालवल्या. शरीरयष्टी भरदार असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेल्यास तो वाचण्याची शक्यता आहे असं आम्हाला सांगून त्याला हेलिकॉप्टरने घेऊन गेले. मात्र त्याच्याबरोबर आमच्यापैकी कोणालाही घेऊन जाण्यास नकार दिला.

आमचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटलाच होता. आमच्या सोबतीला एक डिस्ट्रॉयर दिली गेली. आम्ही होनोलुलु बंदराच्या दिशेनी निघालो. अमेरिकन नौदलानी भर समुद्रात (In International Waters) भारतीय बोटीवर चुकून बॉम्ब टाकला म्हणजे आता राजकीय प्रश्न निर्माण होणारच. त्यामुळे आम्ही पाठवलेले संदेश डिस्ट्रॉयरकरवी वॉशिंग्टन, तिथून दिल्ली, तिथून आमच्या कंपनीत पोहोचायचे. उत्तरदेखील तसंच. असा द्राविडी प्राणायाम होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित न केल्यामुळे (आणि आम्हाला आशा लावल्यामुळे) कॅप्टननी ‘अत्यवस्थ’ (Grievously Injured) असा निरोप पाठवला. कंपनीला तो रात्री तीन वाजता मिळाल्यावर त्यांनी लगोलग तो जखमी झाल्याची बातमी त्याच्या पत्नीला कळवली. मात्र वर्तमानपत्रांना सगळ्या बातम्या इत्यंभूत मिळतात. त्यांचं कामच आहे ते.

सकाळी तिने इंग्रजी पेपर उघडला तर त्यात नावासकट त्याच्या मृत्यूची वार्ता ! कल्पना करा त्या बिचारीची काय अवस्था झाली असेल ती ! तिनी लगेच कंपनीला फोन लावला पण त्यांच्याकडे अजून ‘अत्यवस्थ’ अशीच माहिती होती.

कंपनीकडेच खरी माहिती असणार नाही का? ह्या पेपरवल्यांना काय, काहीतरी सनसनाटीच हवं असतं छापायला ! बिचारी !

काल आम्ही जोसेफला पोकळ धीर देत होतो. आज त्याच्या पत्नीवरही तीच वेळ आली होती !

तिची लगेचच हवाईला जाण्याची तीव्र इच्छा साहाजिकच होती. पण ही Human Interest Story होवू नये म्हणून अमेरिकन सरकरने तिला येऊ दिलं नाही. अशा कामात सरकारी यंत्रणा तरबेज असते. सर्वच देशांची.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जोसेफसाठी काही करू शकले नव्हते. त्यांनी त्याचं डेथ सर्टिफिकिट बनवून त्याच्या फाइलला ठेवलं. आश्चर्य म्हणजे ही फाइल दोन दिवस कुणालाच सापडे ना ! आमच्या कंपनीचा एजंट, वकील यांची धडपड चालू होती पण नौदल चुपचाप. त्यामुळे दोन दिवस त्या बिचारीला किती तणाव आणि खोटी आशा !

आम्हाला होनोलुलुला पोहोचायला अठरा तास लागणार होते त्यात एक वेगळंच नाट्य ! जेवणाची इच्छा कोणालाच नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास स्टुवर्ड आढ्याकडे पाहात आपल्या बिछान्यावर आडवा झाला होता. संध्याकाळी आठ वाजता कोणाच्या तरी लक्षांत आलं की तो अजिबात हललेला नाही. त्याचे डोळे उघडे, पण निर्विकार ! काहीच हालचाल नाही. हाका मारल्या, गदागदा हलवलं, चिमटे काढले, गुदगुल्या केल्या, ढिम्म ! श्वासोश्वास, पल्स, ब्लड प्रेशर व्यवस्थित. पण आता आम्हाला काळजी नव्हती. आमच्या बरोबरच एक डिस्ट्रॉयर होती ना ! लगेच त्यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरला बोलावणं धाडलं. अहो आश्चर्यम् ! त्यांनी डॉक्टर पाठवण्याचं साफ नाकारलं !

“काही झालं तर?” आम्ही.

“तर पुन्हा संपर्क करा.” ते.

“यूरीनही होत नाही.”

“नाहीतरी तो पाणी पीत नाहिये. काही होणार नाही. काळजी करू नका.”

थंडी नको म्हणून त्याच्या केबिनचं एअर कंडिशनिंग बंद करून टाकलं, दोन दोन तासांच्या ड्यूट्या लावल्या, सारखं त्याच्याशी कोणीतरी बोलत राहाण्याची व्यवस्था केली आणि झोपलो.

रात्री कधीतरी एकदम दचकून जागा झालो. घामानी ओलाचिंब झालो होतो. आधल्या दिवशीचं सर्व नाट्य मी तसंच्या तसं स्वप्नांत पाहिलं होतं ! मनांत आलं, तुझ्याविषयी इतकं घाणेरडं स्वप्न मी पाहिलं ही गोष्ट जोसेफला सांगणं योग्य होणार नाही.

स्वप्नंच होतं ना? नक्कीच ! मी बिछान्यात आहे ना? मग दुसरं काय असणार? अस्वस्थ झालो. केबिनमधून बाहेर आलो तसा सॉ मिलचा दर्प अजून येत होता. वर त्याच्या केबिनमध्ये गेलो. मृत्यूचा नंगा नाच झालेलं स्टेज तसंच अस्ताव्यस्त पसरलेलं होतं ! परत केबिनमध्ये आलो, रडलो अन् झोपलो.

दुसर्‍या दिवशी होनोलुलुला पोहोचताच डोक्यावर न्यूज चॅनेल्सची हेलिकॉप्टर्स. बंदरात दाखल झालो तर न्यूज चॅनेलच्या ट्रक्सची गर्दी ! त्यात स्टुवर्डसाठी एक रुग्णवाहिका देखील होती. हायसं वाटलं. स्टुवर्डची अवस्था अजून जैसे थे होती. मात्र आता त्याचे डोळे हालचाल टिपत होते.

मिलिटरी पोलिसांचा पहारा बोटीभोवती लागला. न्यूजवाल्यांना बोटीवर यायला परवानगी नव्हती. शिपिंग कंपन्यांना प्रत्येक बंदरात ऑफिस ठेवणं शक्यच नसतं. ज्या ज्या बंदरात बोट जाते तिथे एक एजंट नेमावा लागतो. झाल्या प्रकारामुळे वकीलही नेमावा लागला होता. त्याप्रमाणे नेमलेले एजंट, वकील, नौदलाचे अधिकारी वगैरे मंडळी बोटीवर आली, त्याचबरोबर रुग्णवाहिकेतली नर्सही आली. पेशंटला तपासलं आणि एक गॅरंटीचा (indemnity) कागद पुढे केला. (मी स्वेच्छेने हॉस्पिटलात जायला तयार आहे वगैरे वगैरे). स्टुवर्डने त्यावर सही करण्याचा प्रश्नच नव्हता. कॅप्टन त्यावर सही करू लागताच तिने ‘ऑब्जेक्शन मिलॉर्ड’ चा आडता घातला. नियमांप्रमाणे जर पेशंट बेशुद्ध असेल तरच स्थानिक पालक त्यावर सही करू शकतो. हा बेशुद्ध नाही अन् सही देखील करंत नाही. मी याला घेऊन जाऊ शकंत नाही !

अनपेक्षित धक्क्यांची मालिका काही संपत नव्हती.

आमच एजंटही काही करायला तयार दिसेना. ती निघून जायला लागली. कॅप्टननी चीफ ऑफिसरला सांगितलं, “मी हेड ऑफिसला फोन लावतो. तोपर्यंत तू काहीही करून हिला अडवून ठेव.” चीफ ऑफिसर हरहुन्नरी. तो धावतच अँब्यूलन्सकडे गेला. पेशंटच्या ऐवजी आपणच त्यात आडवं व्हावं असा त्याचा प्लॅन. तिथे पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाही आणि किल्ली इग्निशनमध्येच आहे. लगेच त्यानी काढून घेतली. आसपास न्यूज चॅनेल्सचे दहा ट्रक्स होते. दृष्य दहा वेगवेगळ्या कॅमेर्‍यांनी टिपलं गेलं.

नर्सबाई खरं तर वकीलच व्हायच्या. त्यांनी अगम्य वकिली भाषेत आकांत मांडला. ‘Unlawful Detention’ येवढेच शब्द मला कळले. माझ्या दृष्टीनी ते स्टुवर्डलाच जास्त चपखल बसत होते.

चीफ ऑफिसर अन् नर्सबाई नाकाला नाक लावून कमरेवर हात ठेवून एकमेकावर गुरकावत होते. अँब्यूलन्सची किल्ली पासिंग द पार्सलचा खेळाप्रमाणे मजल दरमजल करंत कॅप्टनपर्यंत पोहोचली.

मी आणि चीफ ऑफिसर शक्यतो शांत स्वरात तिचं मन वळवायचा प्रयत्न करंत होतो. टीव्ही कॅमेर्‍यांना खाद्य.

एका रेडियो स्टेशनची बाई आमच्याकडे आली आणि म्हणाली, “या गोष्टीचा तुम्हाला नसता त्रास होईल. तुम्ही या बाईला जाऊ द्या. इथे समाजकारणात चांगलं वजन असलेली भारतीय स्त्री आहे. ती तुम्हाला यातून मार्ग काढून देईल.”

तोपर्यंत कॅप्टन आणि आमचा वकीलही खाली आले होते. या भारतीय बाई पंच्याऐंशी वर्षांच्या. त्यांचा नवरा अमेरिकन. हवाईमधलं बडं प्रस्थ. त्यांच्या सल्ल्यानी आम्ही अँब्यूलन्सला सोडून दिलं. अर्ध्या तासात दुसरी अँब्यूलन्स आली आणि बिनबोभाट स्टुवर्ड हॉस्पिटलमध्ये रवाना झाला.

थोड्याच वेळात दोन लष्करी गाड्या आल्या. रियर अडमिरल किंवा तत्सम होता. छाती भरून रंगीबेरंगी मेडल्स. आमचं सांत्वन झालं. आम्ही तुमची बोट रिपेअर करणारच आहोत, आणखी काही हवं का - असं विचारल्यावर आम्ही - आमचे सर्वांचे कुटुंबीय नक्कीच काळजीत असतील त्यामुळे बोटीवर टेलिफोन कनेक्शन्स द्यावीत - अशी मागणी केली.

हात्तिच्या, एवढंच ना ! असं म्हणून आपल्या बरोबरच्या कमी मेडल्स असणार्या adjutantला लगेच तीन फोन लावण्याची आज्ञा देऊन, उद्या भेटू असं सांगून नाहिसा झाला. पुढे बोट दुरुस्त होईपर्यंत बारा दिवस आम्ही होनोलुलुला होतो. मेडॅलिस्ट परत आला नाही आणि फोनही बसवले गेले नाहीत.

स्टुवर्डला सायकियॅट्रिक ट्रीटमेंटची जरूर होती आणि याला तर इंग्रजीचा गंधही नाही ! शोधाशोध करून एक भारतीय वंशाचा सायकियॅट्रिस्ट सापडला. मग असं कळलं की त्याचे आजोबा भारतातून इथे आले होते. याला स्वतःला हिंदीची तोंडओळखही नाही. आहे त्या स्थितीत कोठलीही एअरलाइन स्टुवर्डला न्यायला तयार नव्हती. मध्येच उठून दंगा सुरू केला तर? आता क्रियेटिव्ह थिंकिंगची जरूर होती.

पूर्वी सर्व स्टुवर्डस् आणि स्वयंपाक्यांचा एक म्होरक्या असायचा. त्याला म्हणायचे चीफ स्टुवर्ड. मग असं ठरलं की या चीफनी हॉस्पिटलात जायचं, डॉक्टर चीफशी इंग्रजीत बोलणार, चीफनी भाषांतर करायचं. उत्तराची अपेक्षा नव्हतीच !

सकाळी दहा वाजता चीफ स्टुवर्ड इस्पितळात गेला. दुपारी दोन वाजता परतला. आम्ही प्रगती विचारल्यावर म्हणाला, “साब, ये डॉक्टर ऐसे यँग-यँग करके बात करता है, मुझे तो कुछ समझता ही नही था.”

“अरे शहाण्या, मग तू इतका वेळ तिथे काय केलंस?”

“मैं उसको अलग अलग तरीकेसे एक ही बात बताता था. तू जल्दी उठ जा. नही तो तेरी नौकरी चली जाएगी.” एकाच समस्येकडे पहाण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हटके !

शेवटी भारतातून एक डॉक्टर आणि दोन Male Nurses आले, त्याला sedate करून मधोमध बसवून घेऊन गेले. पुढे तो पूर्णपणे बरा होऊन परत बोटीवर नोकरीला लागला.

जोसेफचा पार्थिव देह भारतास पाठवण्यात आला. पुढल्या वर्षी अमेरिकन सरकारनं त्याच्या बायकोला आणि मुलीला चांगल्यापैकी नुकसानभरपाई जाहीर केली (अन् टप्प्याटप्प्याने दिली देखील) की ज्या योगे त्यांना जोसेफची उणीव निदान सांपत्तिक बाबतीत तरी जाणवू नये. मात्र ज्या पैशांनी तिचं दुभंगलेलं आयुष्य सावरलं जायला हवं होतं त्या पैशांमुळेच पुढे तिला एका वेगळ्याच अग्नीपरीक्षेला सामोरं जावं लागलं. पण त्याची जागा तिच्या खाजगी आयुष्यात आहे. या हकीकतेत नाही.

अमेरिकन नेव्हीनी आमची बोट दुरुस्त करून दिली अन् आम्ही क्रिसमसच्या दिवशी तिथून रवाना होऊन सिंगापूरला आलो. तिथे एका भारतीय बोटीवरचा स्टाफ भेटला.

त्यातला एक जण म्हणाला, “तुमचा चीफ इंजिनियर मारला गेला ना?”

“चीफ इंजिनियर? मी तिथला चीफ इंजिनियर. कोणी सांगितली तुम्हाला ही चुकीची बातमी?”

“बातमीत रेडियो ऑफिसर म्हटलं होतं. पण आम्ही बोटीचे फोटो पाहिले. चीफ इंजिनियरची केबिन उध्वस्त झालेली स्वच्छ दिसंत होती.”

मी काहीच बोललो नाही. दुर्घटना घडून आता एक महिना होत आला होता. मात्र त्या दिवशीपर्यंत ही बाब माझ्या डोक्यातच आली नव्हती. ती बोट ग्रीस सोडून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशाची असती तर जोसेफच्या जागी माझी केबिन असती. प्रत्येक जण आपापलं नशीब अन् कमनशीब घेऊन येतो हेच खरं.

या घटनेच्या चार वर्ष आधी जेव्हां आम्ही एकाच बोटीवर होतो तेव्हां जोसेफनी मला अन् शुभदाला सांगितलं होतं की त्याचा हात एका हस्तरेखा तज्ञानी पाहिला होता. वयाच्या चौतीसाव्या वर्षी गंभीर अपघाताची शक्यता सांगितली होती. हे माहीत असूनसुद्धा लग्न केलं ही मी चूकच केली असं तो म्हणायचा. आम्ही त्याला सांगायचो, “चौतीसाव्या वर्षी काहीही होणार नाही. मग तुला वाटेल की त्याचं गणित चुकलं असेल. पस्तीसाव्या वर्षी झाला तर? तेव्हांही काही होणार नाही. मग छत्तीसाव्या? अशी आयुष्यभर काळजी करशील. त्यातून तू अबोल. अबोल लोक आतल्या आत कुढतात, अन् ब्लडप्रेशर, डायबिटिस वगैरे हकनाक निर्माण करून ठेवतात. ताकद नेहमी वळलेल्या मुठीत असते. उघड्या हातात नाही. दाखवायचा कशाला कुणाला?”

आमचा दोघांचाही भविष्यवेत्त्यांवर विश्वास तेव्हांही नव्हता, सुदैवानी आताही नाही. मात्र चौतीसाव्या वर्षी स्वतःच्या पायानी चालत जाऊन, दुसर्‍या माणसाला अजाणतेपणी मृत्युमुखातून बाहेर ओढून त्याच्या जागी जोसेफ माझ्याच समोर मृत्यूला भेटला हे मात्र मी कधीही विसरू शकणार नाही.

लेखबातमीअनुभवकथाभाषाkathaaप्रवासदेशांतरसामुद्रिक

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

22 Mar 2016 - 11:11 am | प्रमोद देर्देकर

बापरे काय काय अनुभव आले आहेत हो तुम्हाला तुमच्या आयुष्यात. तुमच्या लिखाणाची हतोटी चांगली आहे. पु. भा. प्र.

माझीही शॅम्पेन's picture

22 Mar 2016 - 11:39 am | माझीही शॅम्पेन

किस्सा वाचून अगदी सुन्न झालो , समुद्राच्या मध्या वर अस काही झाल तर काय करणार अक्षर्षा: पाचावर धारण बसली वाचून ....कोणाचा मृत्यू कधी आणि कशामुळे येईल हे सांगता यायच नाही ..:(

अत्रन्गि पाउस's picture

22 Mar 2016 - 11:44 am | अत्रन्गि पाउस

हे असले काही वाचवत नाहीये ....पटकन पुढचा भाग टाका ...
हॉरिबल ....

मृत्युन्जय's picture

22 Mar 2016 - 11:48 am | मृत्युन्जय

लेख वाचुन मन सुन्न झाले खरेच. बिचारा जोसेफ.

मी तर ऐकुन होतो की परदेशात मानवी जीवनाची किंमत अमूल्य आहे. पण या केस मध्ये नर्स आणि अमेरिक नौदल या दोघांचीही वागणूक बघितली की त्यांच्यात शून्य माणुसकी आहे असे वाटते . ती मानवी जीवनाची किंमत वगैरे त्यांच्या नागरिकांसाठी. इतर लोक किडे मुंगी अशी त्यांची मानसिकता आहे असे वाटते. हरामखोर साले

नाखु's picture

22 Mar 2016 - 11:55 am | नाखु

दंडवत बाकी काही नाही...

विलक्षण अनुभव आणि तितकेच प्रांजळ कथन !

जोसेफबाद्दल अनुकंपा आहे आणि तीव्र विषादही (त्याची काही चूक नसताना).

जमीनीवरचा सुरक्षीत (?) नाखु

एस's picture

22 Mar 2016 - 11:59 am | एस

सुन्न!

(एक सूचना, ही लेखमालिका असल्याने शीर्षकात तसा उल्लेख प्रत्येक भागात करा. उदा. 'बोटीवरील दिवस : दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)' असे.)

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 12:06 pm | नाना स्कॉच

हा लेख वाचुन सहज अंतरजालावर "MV JAG VIVEK" असे टाइप केले तेव्हा
एसोसिएटेड प्रेस च्या आर्काइव्ज मधे बातमी सापडली . डोके आउट झाले हो! आमची खरेच काही बोलायची औकात नाही

अजुन थोड़ा सर्च करता एक छोटे कत्रण मिळाले (द डेली, दिनांक 14/12/1988)

.

आपला अन जोसेफ चा असलेला ऋणानुबंध लक्षात घेता, आपण हा लेख लिहिलात म्हणजे आपण आपला मित्रशोक काही प्रमाणात पचवलात अन खंबीर झालात असा ग्रह झाल्यामुळे ही कॉमेंट पोस्ट करतोय, सदरहु कॉमेंट चा आपणांस त्रास झाल्यास किंवा वाटत असल्यास आपण प्लीज मला माफ़ करा, अन संपादक मंडळाने तड़क हा प्रतिसाद उड़वावा ही नम्र विनंती करतो

-नाना

स्नेहांकिता's picture

22 Mar 2016 - 12:53 pm | स्नेहांकिता

बधिर करणारा अनुभव ! नाविक जीवन म्हणजे एखादी साहसकथाच.

वगिश's picture

22 Mar 2016 - 1:42 pm | वगिश

दाहक आहे अनुभव

भाऊंचे भाऊ's picture

22 Mar 2016 - 2:05 pm | भाऊंचे भाऊ

.

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2016 - 2:06 pm | टवाळ कार्टा

भेंडी... :(

स्नेहांकिता's picture

22 Mar 2016 - 2:09 pm | स्नेहांकिता

टक्या तुला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2016 - 2:19 pm | टवाळ कार्टा

i m speechless :(

स्नेहांकिता's picture

22 Mar 2016 - 3:19 pm | स्नेहांकिता

भेंडी = speechless ???
ओके ओके ...

खतरनाक अनुभव! अगदी स्तंभित करणारा. आपण ताकदीने लिहिला आहे. आपण अशा जगावेगळ्या अनुभवांवर एखादे पुस्तक लिहायला हवे. अनंत सामंत यांच्या 'एम ती आयवा मारू' आठवतेय आपले लेख वाचतांना. ती कादंबरीदेखील रोमांचक होती.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 2:34 pm | मराठी कथालेखक

विलक्षण

मदनबाण's picture

22 Mar 2016 - 3:10 pm | मदनबाण

जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले.
लष्करानी आम्हाला कळवलं, “तुम्ही सरावाच्या आयताच्या बाहेर पडलेले आहात. आता तुम्हाला पश्चिमेकडे जायला हरकत नाही.”
मात्र त्या मूर्खानी भंगार बोटीच्या अक्षांश रेखांशाऐवजी आमचे टाकले होते !
त्या दिवशी मला काही महत्वाचं काम असल्या कारणानी मी ब्रिजवर उशिरा जायचं ठरवलं होतं.
स्टुवर्डची साफसफाई सुरूच होती. दोन मिनिटात संपवून निघतो असं त्यानी सांगितलं पण जोसेफची थांबायची तयारी नव्हती. त्यानी जरा घुश्श्यांतच “आज काम नाही झालं तरी चालेल पण लगेच चालू लाग” असा आग्रह धरल्यामुळे नाखुशीनीच स्टुवर्ड रेडियो रुममधून बाहेर पडला. लगेच जोसेफ आत शिरला.
ती बोट ग्रीस सोडून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशाची असती तर जोसेफच्या जागी माझी केबिन असती.

म्रूत्यू हेच अंतिम सत्य आहे, जन्म आणि मॄत्यू यांच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य... हे असंच का होतं? या बद्धल मला नेहमीच नवल वाटते.भूकंप होतो, टोले जंग इमारती कोसळतात, अपघात होतात... धड धाकट,दांडगी माणसे पार्थीव देह म्हणुन ओळखली जातात पण नाजूक तान्ही बाळं मात्र या अश्या अपघातात अनेकदा बचावलेली सुद्धा दिसुन येतात... कशी ? का ? अनेक जण घटना घडणारे स्थान आयत्या वेळी सोडतात आणि काही जण कारण नसतानाही तिथे थांबायचे ठरवतात आणि काळाचा घास बनतात.सगळच अगम्य !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne

मधुरा देशपांडे's picture

22 Mar 2016 - 3:14 pm | मधुरा देशपांडे

सुन्न करणारा अनुभव आणि तेवढीच जबरदस्त लेखनशैली.

असंका's picture

22 Mar 2016 - 5:20 pm | असंका

दैव जाणिले कुणी...

बोका-ए-आझम's picture

22 Mar 2016 - 5:41 pm | बोका-ए-आझम

पु.लं.चं अपूर्वाई मधलं वाक्य आठवलं - आपण नाही पोळीकडे हात नेत आणि पापडाचा तुकडा मोडून तोंडात टाकत?
रच्याकने जग विवेकची कंपनी Great Eastern का हो?

शान्तिप्रिय's picture

22 Mar 2016 - 6:00 pm | शान्तिप्रिय

स्वीट टॉकर सर
थरारक!
तुमची लेखनशैली अप्रतिम!

----/\-------
तुम्हाला भेटु शकलो परवा माझे भाग्य समजतो.
बर आणखी एक.....
शुभदा ताईंना जमल्यास ती सुंदर कविता लिहायला सांगा कट्ट्याच्या प्रतिसादात.

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 6:24 pm | उगा काहितरीच

बापरे !भयानक अनुभव ... लिहीण्याची शैली पण आवडली.

सटक's picture

22 Mar 2016 - 6:50 pm | सटक

काही अनुभव आयुष्य बदलून टाकणारे असतात! जबरदस्त लिहिले आहे तुम्ही!

खिळवून ठेवणारी लेखनशैली आणि जबरदस्त डिटेलिंग असणारं वर्णन.
तुमच्याजवळ अनुभवांचा खजिनाच आहे.

सुमीत भातखंडे's picture

22 Mar 2016 - 7:32 pm | सुमीत भातखंडे

काय अनुभव म्हणायचा का काय हा?....भयंकर.
तुम्ही लिहिता जबरदस्त....खिळवून ठेवता एकदम.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Mar 2016 - 7:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्तं अनुभव. चायला. हाय एक्स्प्लोसिव्ह मिसाईल असतं तर सगळ्यांचचं अवघड झालं असतं काम.

सुबोध खरे's picture

23 Mar 2016 - 12:18 pm | सुबोध खरे

चाचणीसाठी असलेल्या क्षेपणास्त्रात डमी वॉरहेड ( फुसकी स्फोटके) असतात त्यामुळे त्याचा स्फोट होत नाही.

वाचून कसंतरीच झालं. कशा प्रसंगांतून गेलात. स्पीचलेस होणं हेच योग्य वर्णन.

जव्हेरगंज's picture

22 Mar 2016 - 7:57 pm | जव्हेरगंज

जबरदस्त लिखाण !

सुबोध खरे's picture

22 Mar 2016 - 8:19 pm | सुबोध खरे

भयानक अनुभव
मृत्यू समोर पाहणे हे अतिशय वेदनादायक असते. आपल्या भावना बोथट होऊन जातात.

चांदणे संदीप's picture

22 Mar 2016 - 8:25 pm | चांदणे संदीप

वाईट प्रसंग.... वाचताना सगळ डोळ्यासमोर येत होत आणी वाईट वाटत होत. तुम्ही जसे हतबल होता त्याक्षणी त्या परिस्थितीसमोर, तसेच, वाचतानाही जाणवत होते की पुढे वाईटच वाचायला मिळणार आहे पण वाचतच गेलो...

Sandy

अजया's picture

22 Mar 2016 - 8:41 pm | अजया

सुन्न करणारा अनुभव :(

सर मी स्वता:ला खुप भग्यवान समजतो.तुमच्यासारखे लोक मला भेतले.
वीशेस मह्न्जे तुम्ही खुप छान पध्तीने अनुभव प्रकट करता .प्रणाम तुम्हाला.

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2016 - 9:00 pm | श्रीरंग_जोशी

एका अतिशय दुर्दैवी घटनेचे खूप ताकदीने केलेले वर्णन आहे हे.

माहितगार's picture

22 Mar 2016 - 9:19 pm | माहितगार

!! वरील बहुतांश प्रतिसादांशी सहमत.

पैसा's picture

22 Mar 2016 - 9:58 pm | पैसा

सुन्न करणारे लिखाण.

विकास's picture

22 Mar 2016 - 10:20 pm | विकास

माहीत नसलेल्या जोसेफची गोष्ट सांगून अस्वस्थ केलेत... लेखनशैली छानच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2016 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयंकर अनुभव !

बोटीवर खूप अनुभवसमृद्ध जीवन जगलात आणि ते शब्दांत इतरांसमोर उभे करण्याची ताकद तुमच्याकडे आहे !!

प्रदीप's picture

24 Mar 2016 - 2:59 pm | प्रदीप

संपूर्ण सहमत.

सतिश गावडे's picture

22 Mar 2016 - 11:07 pm | सतिश गावडे

सुन्न करणारा अनुभव.
तुम्ही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होतात त्यामुळे तुम्ही स्वतः या प्रसंगाला कसे सामोरे गेले असाल याची कल्पनाही करवत नाही.

धनंजय माने's picture

23 Mar 2016 - 12:04 am | धनंजय माने

थरारक अनुभव आणि तुम्ही तितक्याच धाडसाने तुम्ही त्याला तोंड दीलेत.

जोसेफसाठी वाईट वाटले. आता त्याची मुलगी व पत्नी ठीक आहेत का? मुलगी मोठी झाली असेल.
तुमची लेखनशैली अगदी जबरदस्त आहे.
मृत्युंजयजी, परदेशात जिवाची किंमत आपल्याकडे असते त्यापेक्षा जरा बरी असते पण सगळे सोयिनुसार बदललेही जाते. कोणालाही कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नसते.

यशोधरा's picture

23 Mar 2016 - 1:14 am | यशोधरा

सुन्न करणारा अनुभव.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 1:36 am | तर्राट जोकर

सुं... करत आलेल्या मिसाईलने.... सुन्न करुन टाकलं.

जोसेफला भावपूर्ण श्रद्धांजली. :(

रामपुरी's picture

23 Mar 2016 - 2:06 am | रामपुरी

जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां तो कुठे आणि केव्हां होणार आहे याची महिती ठराविक रेडियोलहरींवर (frequency) प्रसारित करतात
याचा कधीच विचार केला नव्हता. हवाई दलाच्या सरावावेळी पण असंच करावं लागत असेल...

सुबोध खरे's picture

23 Mar 2016 - 12:16 pm | सुबोध खरे

जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां
नौकानयन मंत्रालयापासून आंतर राष्ट्रीय जहाज वाहतुकीच्या नियान्त्रानालायापर्यंत सर्वाना बातमी दिलेली असते आणी स्थानिक मच्छीमार समित्यांना सुद्धा त्याची आगाऊ सूचना दिलेली असते. माझा मित्र आय एन एस गोदावरी जहाजावर डॉक्टर असताना सरावासाठी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर डागण्याच्या( SURFACE TO SURFACE MISSILE) क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी मुंबईच्या थेट पश्चिमेकडे २०० मैलावर एक चौरस ठरवला होता. तशी सूचना वरील सर्व लोकांना दिली होती. अशा वेळेस प्रत्यक्ष क्षेपणास्त्र डागण्याच्या वेळेस तेथे असलेल्या लक्ष्याच्या बाजूस एक जहाज असल्याचे जाणवले म्हणून क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित करून त्या जहाजाची तपासणी करण्याचे ठरले. जेंव्हा त्या जहाजाचा पाठलाग चालू केला तेंव्हा ते पळू लागले. या वर गोदावरीच्या कॅप्टन ने हेलीकॉप्टर पाठवले आणी मशिन् गन ने त्या बोटीच्या पुढे गोळ्या डागल्यावर ते पाण्यात उभे राहिले. हे दुबई वरून येणारे तस्करी करणारे होडके(DHOW) होते आणी त्यात बोटीच्या तळाशी १८ कोटी रुपयाची चांदी मिळाली. त्यांना पकडून अंमलबजावणी संचालनालयाकडे( ED) सुपूर्द करण्यात आले.
सर्व साधारणपणे जेंव्हा पोलीस किंवा तटरक्षक दल जेंव्हा अशी तस्करी पकडत तेंव्हा त्यात मिळणाऱ्या रकमेच्या १० % रक्कम त्या जहाजाच्या कर्मचार्यांना मिळत असे.
दुर्दैवाने नौदलाला असे पैसे देण्याचा कोणताही "नियम" नसल्याने सरकार कडून आमच्या नौसैनिकांना एक दमडी सुद्धा मिळाली नाही. एकदा असा "अपवाद" करावा (one time exception)या नौदलाच्या अर्जाला सरकारी बाबू लोकांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या.
उलट त्या होडक्याच्या सव्यापसव्यात दोन दिवस गेल्याने दोन दिवस अजून समुद्रात क्षेपणास्त्र तयारी साठी काढावे लागले.

धनंजय माने's picture

23 Mar 2016 - 10:31 pm | धनंजय माने

अरेरे, १८ कोटी म्हणजे तुम्हाला सर्वांना मिळून १ कोटी ८० लाख मिळाले असते.

एक एकटा एकटाच's picture

23 Mar 2016 - 7:08 am | एक एकटा एकटाच

बापरे

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2016 - 8:43 am | प्राची अश्विनी

बापरे! काय भयानक अनुभव आहे! लिहिण्याची शैलीसुद्धा खिळवून ठेवणारी आहे.

स्वीट टॉकर's picture

23 Mar 2016 - 10:26 am | स्वीट टॉकर

सर्व़जण,

धन्यवाद.

नाना स्कॉच - तुमच्या प्रतिसादात काहीही गैर नाही. जर मला प्रतिसादांचा त्रास होणार असं वाटलं असतं तर मी लेखच लिहिला नसता. जे झालं ते दुर्दैवी होतं यात शंकाच नाही. पण 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे!" हे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या आंतरजालावरच्या शोधामुळे बाकीच्या वाचकांना आणखी माहिती मिळाली. धन्यवाद!

बोका-ए-आझम - बरोबर आहे. ग्रेट ईस्टर्न कंपनी. त्यांच्या सगळ्या बोटींची नावे 'जग' या शब्दापासून त्या काळी सुरू व्हायची. मी तिथे दहा वर्षं नोकरी केली.

शांतिप्रिय आणि वसन्त चव्हाण - कृपया 'भेटून धन्य झालो' वगैरे लिहून मला लाजवू नका. आपण मिसळपाव आवडणारे मित्रमैत्रिणी आहोत आणि तसेच राहू या !
ती कविता शुभदाने लिहिलेली नव्हती. तिने कधीही कविता केलेली नाही. मात्र खूपच पाठांतर आहे. प्रतिसादात ती कविता टाकेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो - हाय एक्स्प्लोझिव असतं तर कठीण होतं की नाही मला माहीत नाही, मात्र ही हकीकत तुम्हाला वाचायला मिळाली नसती एवढं नक्की!

रेवती - मोबाइल, ई मेल वगैरेंच्या आधीचा तो काळ. त्यांच्या कुटुंबाशी एक वर्षभर संपर्क होता. हळुहळु नाहिसा झाला.

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2016 - 12:32 pm | टवाळ कार्टा

पुस्तक लिहा ओ...भारी लिहिता तुम्ही

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2016 - 1:59 pm | श्रीगुरुजी

जबरदस्त अनुभव! लेखनशैली आवडली.

जहाजावरचे अजून अनुभव लिहा.

चाणक्य's picture

23 Mar 2016 - 2:57 pm | चाणक्य

भयानक अनुभव. बिचारा जोसेफ.

हेमंत लाटकर's picture

23 Mar 2016 - 9:17 pm | हेमंत लाटकर

सुन्न करणारा अनुभव. जहाजावरील अजून अनुभव लिहा. वाचायला आवडेल.

स्रुजा's picture

23 Mar 2016 - 9:27 pm | स्रुजा

बाप रे ! हाँट केलं असेल या अनुभवाने तुम्हाला.. जोसेफ बद्दल वाईट वाटलं :(

तुमच्या लेखन शैलीचं कौतुक वाटतं. ही सीरिज वाचते आहे पहिल्या लेखापासुन पण प्रतिसाद मात्र द्यायला जमलं नव्हतं. तुम्ही लिहीत राहा. फार छान लिहीताय.

प्रसंग समोर घडला असे वाटले, धक्कादायक वास्तव.

पण प्रसंग इतका दु:खदायक आहे कि शब्द सुचत नाहिए काय म्हणावं ते.

मिपावर तुमचा राबता असु द्या.

अर्धवटराव's picture

24 Mar 2016 - 12:39 am | अर्धवटराव

त्या हजारो टन गव्हाचं काय झालं ? इतका प्रचंड अन्नसाठा उशीरा पोचल्यामुळे काहि वेगळेच प्रॉब्लेम्स झाले नसतील ना.

स्वीट टॉकर's picture

24 Mar 2016 - 11:07 am | स्वीट टॉकर

सर्वजण,
पुन्हा धन्यवाद!

सुबोध खरेसाहेब,
नेव्हीला दहा टक्के न मिळणं हे blatantly unfair! आपली न्यूसंस व्हॅल्यू सिद्ध करणं काही बाबूंकडून शिकावं!

अर्धवटराव,
आपल्या बिचार्‍या जनतेला अर्धपोटी राहाण्याची सवयच आहे. थोडे दिवस जास्त! भारतात परतल्यावर तो सगळा गहू आणि सबंद बोट (आमच्या सहित) रेडियोअ‍ॅक्टिव्हिटीसाठी तपासली गेली. (आपल्या नौसेनेनी ते काम केलं.) नशिबानी काही मिळालं नाही. मगच गहू उतरवला गेला आणि आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2016 - 2:27 pm | बिपिन कार्यकर्ते

लिहा! लिहा!

हे निव्वळ अनुभवकथन नाहीये. बरंच खोल आहे पाणी! :)

आज तुमचे चारही लेख वाचले. छानच लिहिले आहेत.
हा लेख वाचताना सुन्न झाले होते.
शेवटचा इंग्रजीचा वाचला. कल्पना खूप आवडली.
सागरी जीवनाचे आम्हाला अप्रूप! त्याविषयीचे तुमचे लेखन वाचायला खूप आवडते आहे.
धन्यवाद!

नूतन सावंत's picture

24 Mar 2016 - 7:25 pm | नूतन सावंत

देव तारी त्याला कोण मारी.ती बोट ग्रीक बनावटीची नसती तर.....
जोसेफचा मृत्यू मात्र जीवनाची क्षणभंगुरता अधोरेखित करून गेला.
पुभाप्र.

जुइ's picture

1 Apr 2016 - 4:29 am | जुइ

सुन्न झाले हे वाचून.

गामा पैलवान's picture

1 Apr 2016 - 11:45 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकर,

आपली यावर इतरत्र चर्चा होऊन गेली आहे. इथल्या वाचकांसाठी तिचा गोषवारा डकवतो.

---------------------- गोषवारा सुरू ----------------------------------

विकीवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा हे सापडलं : http://www.nytimes.com/1988/12/13/world/us-rocket-hits-indian-ship-accid...

हारपून एका एफ/ए - १८ हॉर्नेट विमानावरून डागलं गेलं होतं. त्या प्रकारची विमानाची ती तुलनेने नवी आवृत्ती (एफ/ए - १८ सी वा डी) असावी. अधिक माहिती इथे आहे : http://www.fas.org/man/dod-101/sys/ac/f-18.htm या दुव्यावर विमानावर जे हारपून क्षेपणास्त्र डकवता येते त्याचा दुवा मिळतो : http://www.fas.org/man/dod-101/sys/smart/agm-84.htm तिथे क्षेपणास्त्राकडून लक्ष्य कसे गाठले जाते त्याची माहिती दिली आहे.

दुर्दैवाची गोष्ट अशी की हारपूनवर स्फोटके नव्हती. ती असती तर एफ-१६ च्या व्यत्ययी हल्ल्यात त्यावरील स्फोटके पेटून ते वेळच्या वेळी (कदाचित बरंच आधीही) नष्ट झालं असतं! दैवाचा असाही एक खेळ!

या घटनेतल्या एका योगायोगाचं नवल वाटतं. लेखकाने अपघाताचं वर्णन केलंय त्यात आग वा धूर नव्हता हे स्पष्ट आहे. त्यावरून आघातसमयी क्षेपणास्त्रात इंधन नव्हतं ही नौदलाने दिलेली माहिती खरी दिसते आहे. हे क्षेपणास्त्र उंचावरून प्रवास करत नसून समुद्राच्या पृष्ठभागाजवळून जातं. इंधन संपल्यावर ते लवकरच समुद्रार्पण होतं. उंचावरून प्रवास करणारं क्षेपणास्त्र अंगभूत फेकीमुळे थोडं दूरवर जाऊ शकतं. तसं या हारपूनचं नाही.

प्रश्न असा आहे की बरोब्बर जगविवेक नौकेपर्यंतच पुरेल इतकं अचूक इंधन क्षेपणास्त्रात कसं भरलं गेलं असावं? हा नक्की योगायोगच आहे ना?

थोडी आकडेमोड केली.
हारपूनचा वेग = ताशी ८५५ किमी
लक्ष्यापासून अंतर १२० मैल = १९२ किमी

हारपूनचा प्रवासकाल = (१९२ ÷ ८५५ ) तास = ०.२२४५६ तास = ८०८.४२ सेकंद

तर सुमारे ८१० सेकंदांपैकी फक्त शेवटचे २४० सेकंद हारपूनला हाकून लावण्यात कामी आले. म्हणजे पहिले ५७० सेकंद ( = साडेनऊ मिनिटे) केवळ निर्णय घेण्यात खर्ची पडले. अमेरिकेसारख्या प्रगत नौदलासंदर्भात हा कालावधी पटण्याजोगा नाही. हेच जर १२० नॉटिकल मैल असतील तर जास्तच वेळकाढूपणा झाला म्हणायचा!

---------------------- गोषवारा समाप्त ----------------------------------

अतिरिक्त विसंगती येणेप्रमाणे :

तुम्ही लेखात म्हणालात की :

>> जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले.
>> पण परमेश्वराच्या राज्यात चुकीला क्षमा नाही.

याउलट विकिवर हे सापडलं :

>> A Notice to Mariners had been issued warning of the danger, but Jagvivek left port before
>> receiving the communication and subsequently strayed into the test range area, and the
>> Harpoon missile, loaded just with an inert dummy warhead, locked onto it instead of its
>> intended target.

जोसेफकडून खरोखरच संदेश हुकले होते का? का विकीवर अर्धवट माहिती दिलीये?

धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

स्वीट टॉकर's picture

6 Apr 2016 - 2:08 pm | स्वीट टॉकर

मी वेगवेगळ्या वेळेस जे प्रतिसाद दिले होते ते चिकटवतो म्हणजे वाचकांना सोपं जाईल.

१. हारपूनचा मार्ग तेव्हां तरी वळवता येत नव्हता हे मला नक्की माहीत आहे. याला दोन दाखले आहेत.

अ. मी ज्या एफ १६ बद्दल लिहिले होते त्यांनी मिसाइलला आमच्या बोटीशेजारीच गाठलं आणि त्यावर strafing देखील केलं पण त्याचा उपयोग झाला नाही. या गोष्टीला अशा बारीक फांद्या बर्‍याच आहेत पण गोष्ट अति लांब झाली की ती कंटाळवाणी होण्याची शक्यता असते म्हणून मी त्यांना छाटलं आहे.
ब. अमेरिकेनी पाकिस्तानला ही हारपून मिसाइल्स दिली आहेत. त्यामुळे आमची बोट परत भारतात परतल्यावर इंडियन नेव्हीचे experts आमच्या बोटीवर investigation साठी आले होते. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. हे मिसाइल originally पृष्ठभागावर आलेल्या पाणबुड्यांविरुद्ध वापरण्यासाठी बनवलं गेलं होतं. (पृष्ठभागावर आलेली पाणबुडी आणि छोटी बोट यात मिसाइलच्या दृष्टीनी काय फरक आहे हे काही मला माहीत नाही.) किमतीनी अतिशय स्वस्त असल्याकारणानं ते खूपच popular झालं. त्यांच्या investigations नुसार आमच्या बोटीला लागायच्या आधीच त्यातलं इंधन संपलं होतं. त्याचा वेग आणि उंचि झपाट्यानी कमी होत होती. आम्ही आणखी थोडे दूर असतो तर ते harmlessly पाण्यात पडलं असतं.

२. सगळ्या फांद्या लिहिणे worth होणार नाही. त्यातली एक लिहितो.

डेकवर जे खलाशी काम करंत होते त्यामध्ये एक अर्धवट मनुष्य होता. त्याची मतं इतकी भन्नाट होती की त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नसत.

तो म्हणाला की बोटीवर लागलेला बॉम्ब नक्की पाण्याच्या आतून आला !! 'असं तुला का वाटतं?' असं विचारल्यावर तो म्हणाला की आवाज आल्यावर जेव्हां त्याने मागे बघितलं तेव्हां त्याला बोटीच्या मागे अर्धा मैल शंभरएक कारंजी दिसली. तिथूनच तो बॉम्ब आला असणार. आम्ही नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केलं.

नंतर अमेरिकन न्यूजपेपर्सनी ही न्यूज शोधून छापली. त्या एफ १६ नी बॉम्बला आमच्या बोटीच्या जवळ असताना गाठलं होतं. त्याच्यावर strafing ही केलं होतं. आमच्या खलाशानी त्या strafing मुळे पाण्यात निर्माण झालेली कारंजी बघितली असणार. याचा अर्थ अमेरिकन नेव्हीला आमच्या बोटीला exactly कधी आणि कुठे मिसाइल लागलं हे ठाऊक होतं. तरी नुसतं उत्तर द्यायला वीस मिनिटं लावली. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला साडेनऊ मिनिटं लागली असली तर त्यात फारसं नवल मला वाटत नाही.

दुसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी जी चार मिनिटं mention केली आहेत ती देखील नेव्हीकडून मिळालेल्या माहितीवरच आधारित आहेत. ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांची चूक होती की त्यांनी सराव परिघाच्या बाहेरच्या बोटीवर बॉम्ब टाकला. लपविण्यासाठी खोटं सांगितलं देखील असेल.

३. बोटीला संदेश येण्यासाठी बंदरात असण्याची आवश्यकता नसते. म्हणून तर रेडियो ऑफिसर लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला मिसाइल लागलं तेव्हां आम्ही टेस्ट रेंजच्या बाहेर होतो.

या दोन्ही बाबतीत विकी वरची माहिती बरोबर नाही. विकी ही जनरल माहिती पुरतीच ठीक आहे.

ही केस कोर्टापर्यंत पोहोचली नाही. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून जोसेफच्या फॅमिलीला आणि आमच्या कंपनीला नौदलाने पैसे दिले.

गामा पैलवान's picture

7 Apr 2016 - 10:00 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकर,

माहितीबद्दल धन्यवाद. :-) माझ्या मनातली शंका सांगून या अन्वेषणाचा समारोप करतो. ज्यांना पुढे अन्वेषण करायचे आहे त्यांनी खालील प्रश्न गांभीर्याने घ्यावा म्हणून सुचवेन.

तर प्रश्न आहे की : नेमकं जगविवेक बोटीपर्यंत पुरेल इतकंच इंधन क्षेपणास्त्रात भरलं गेलं. हा नक्की योगायोगच आहे का? की मुद्दाम केलेली खेळी आहे?

मी इथे थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

शित्रेउमेश's picture

8 Apr 2016 - 2:09 pm | शित्रेउमेश

भयंकर सुन्न करणारा थरारक अनुभव...!!

नमकिन's picture

3 Jun 2016 - 10:20 pm | नमकिन

नुकतेच झालेले संचलन प्रसंगी IST की GMT वेळेच्या गोंधळामुळे airstrip closed नव्हती, असा काही प्रकार ATC व नौसेना समन्वय अभाव, दोषारोप झालेले आठवतायत. एखादे प्रवासी विमान सापडले असते तर भारतीय सेना व नागरी उड्डयन संघाचे धिंडवडे निघाले असते. पुढे जीवितहनीची कल्पना करवत नाहीं
ऊमद्या सहका-याला इतर कुणाच्या दुर्लक्ष, बेजबाबदारीमुळे प्राणास मुकावे लागणे व त्याचा न्याय निवाडा न होणे हे फार संतापजनक व क्लेषकारक.
पुलेशु