प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
18 Feb 2016 - 9:27 pm

दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते. पण त्याआधी घडलेल्या घटना या एकमेकांना लागलेल्या असतात...

आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, जगात सर्वत्रच पण भारतात सध्या ज्या पद्धतीने माध्यमे विचार पेरायचे काम जोमाने करत आहेत ते पहाताना, या पुस्तकातील एक विशिष्ठ भाग आठवला आणि येथे सांगावासा वाटला.

१९८४ ची गोष्ट आहे. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा काळ. रिपब्लिकन पक्षाकडून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन हे फेरनिवडणुकीस उभे होते. त्यांच्या विरोधात डेमोक्रॅटीक पक्षाकडून वॉल्टर माँडेल उभे होते. प्रचाराची रणधुमाळी चाललेली होती. त्यावेळेस किंबहूना त्यानंतर देखील जवळपास वीसएक वर्षे तीन पब्लिक चॅनल्सवरून तीन अमेरीकन पत्रकारांचे अमेरीकन जनतेवर राज्य होते - सिबीएस चॅनलचे डॅन रादर, एनबीसी चॅनलचे टॉम ब्रॉको आणि एबीसी चॅनलचे पिटर जेनिंग्ज. हे तिनही पत्रकार आपापल्यापरीने दिग्गज होते. संध्याकाळी साडेसहाला त्यांच्या बातम्या असत शिवाय इतर विशेष कार्यक्रम होत असत. निवडणुकीचा काळ तर माध्यमांसाठी आणि त्यातील राजकीय पत्रकारांसाठी खूपच महत्वाचा! १९८४ चा काळ हा असाच होता.

ह्याच काळात सिरॅक्युस युनिव्हर्सिटीमधील एक मानसशास्त्रावरील प्राध्यापक, ब्रायन म्युलेन यांनी बातम्यांचे श्रोत्यांवर होणारे नकळत परीणाम यावर संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी या तिनही वार्ताहारांच्या ३७ चित्रफिती गोळा केल्या, ज्यात दोन्ही उमेदवारांवर भाष्ये केलेली होती. मग स्टॅटीस्टीक्सच्या संशोधनाला अनुसरून त्यांनी "रँडम" प्रेक्षकवर्गाला गोळा केले आणि या चित्रफिती दाखवल्या. या प्रेक्षकवर्गाला हे संशोधन काय आहे याची अजिबात कल्पना दिलेली नव्हती. नंतर त्यांना या तिनही वार्ताहारांच्या हावभावावर आधारीत निरीक्षण सांगायला सांगितले. हे निरीक्षण २१ गुणांवर आधारीत होते. म्हणजे विशिष्ठ उमेदवाराबद्दल बोलताना वार्ताहाराचे हावभाव कसे होते? जितके कमी गूण तितके भाव नकारात्मक तर जितके जास्त गूण तितके सकारात्मक. त्यातून बाहेर आलेले विश्लेषण फारच रोचक होते.

सिबीएसच्या डॅन रादर यांचे चेहर्‍यावरील भाव आणि बातम्या देण्याची पद्धती ही दोन्ही उमेदवारांसाठी समान होती. मोंडेल १०.४६ तर रेगन १०.३७ इतकी समान. एन बी सी च्या टॉम ब्रॉकोंच्या चेहर्‍यावरील भाव देखील बर्‍यापैकी सारखेच होते - माँडेल ११.२१ तर रेगन ११.५०. मात्र एबीसीच्या पिटर जेनिंग्जबाबत वेगळेच घडले - माँडेल १३.३८ तर रेगन यांना १७.४४! या प्रेक्षकवर्ग या तिन्ही वार्ताहारांच्या वेगळ्या (आनंदी-दु:खी) बातम्या (कंट्रोल सेगमेंट) देखील दाखवल्या गेल्या. त्यात देखील या तिन्हींबद्दल तेच निरीक्षण दिसले!

नक्की पिटर जेनिंग्ज वेगळे काय करत होते? तर टॉम ब्रॉको आणि डॅन रादर यांच्या पेक्षा त्यांच्या आविर्भावात रेगन यांच्या बातम्या देताना अधिक सकारात्मकता, आनंद दिसत होता. गंमत म्हणजे इतर वेळेस एबीसी चॅनल हे रिपब्लीकन आणि रेगन या दोन्हींवर कडक टिका करणार्‍या बातम्यात पुढे होते. म्हणजेच त्यांचा प्रेक्षकवर्ग हा रिपब्लिकन असण्याची शक्यता फारच कमी होती. अर्थात याच संशोधनात पुढे हे देखील सिद्ध झाले की एबीसीचे तत्कालीन राजकीय वृत्तपरीक्षण बघणारे हे इतर दोन चॅनल्स पेक्षा रेगन-रिपब्लिकन्सना मते देण्यात अधिक होते!

फक्त किंचीत अधिक प्रसन्नता आणि त्याचा परीणाम मात्र विचारशक्तीहून अधिक. कदाचीत पिटर जेनिंग्जना पण इतके वाटले नसावे. (म्हणूनच ते या संशोधकास आणि संशोधनास शिव्या देण्यात कमी पडले नाहीत!).

ह्याच संशोधकाने असाच प्रयोग नंतरच्या जॉर्ज एच बुश (डब्लूचे वडील) विरुद्ध ड्युकॅकसच्या निवडणुकीच्या वेळेस केला. आणि तेच निष्कर्ष परत आले.

त्यांनी अजून एक प्र्योग केला ज्यात रँडम विद्यार्थ्यांचे गट तयार केले. त्यांना बाजारात नव्याने आलेला हेडफोन दिला आणि तो घातलेला असताना तत्कालीन प्रसिद्ध गाणी "संशोधनासाठी" म्हणून ऐकवली. अर्थात विद्यार्थ्यांना माहीत नव्हते नक्की काय संशोधन ते... पण एका गटास डोके वर-खाली (हो-हो स्टाईल) करायला सांगितले, दुसर्‍या गटाला "नाही-नाही" असे आडवे हलवायला सांगितले तर तिसर्‍या गटाला स्थीर ठेवण्यास सांगितले. तो कंट्रोल ग्रूप होता. विद्यार्थी तसे गाणे ऐकताना करत होते. मात्र दोन गाण्यांच्या मधे, मग हळूच बातमी सांगितली गेली की ज्यात कॉलेजच्या फी मधे काहीशे डॉलर्सनी वाढ करणे जरूरीचे आहे म्हणून चर्चा होती.... नंतर या तिन्ही गटांना प्रश्न विचारताना, या फीवाढीप्रस्तावावरून देखील विचारले. तर काय आढळले? - "हो-हो" असे डोके हलवणारी मुले फीवाढीस नकळत तयार झाली होती. "नाही-नाही" असे हलवणार्‍यांना फी अजून कमी करून हवी होती तर ज्यांनी डोके स्थीर ठेवले होते त्यांना सध्याचीच फी योग्य वाटत होती!

या सगळ्याचा अर्थ काय? तर लेखक म्हणतो त्याप्रमाणे प्रभावी विक्रेता हा कसा विकू शकतो आणि हावभाव-हालचाल या कधी कधी शब्दांपेक्षा देखील प्रभावी ठरू शकतात...

आता यातून आपण (त्यात मी देखील आलो) काय शिकावे? बातम्या बघत असताना अथवा वाचत असताना, त्यावर आपल्याला, ज्याला क्रिटीकल थिंकीग म्हणता येतील असे प्रतिप्रश्न करत वाचता येतात का? का आपण लगेच विश्वास ठेवतो? एखादी बातमी एका चॅनल/वर्तमानपत्रा कशी दिली आहे आणि दुसर्‍यात कशी आली आहे हे देखील बातमीच्या गांभिर्यतेनुसार आणि मते तयार करण्याआधी बघणे महत्वाचे ठरते...

The Tipping Point

समाजजीवनमानतंत्रराजकारणशिक्षणप्रकटनविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

18 Feb 2016 - 10:28 pm | उगा काहितरीच

इंटरेस्टिंग! मार्केटिंग मधे जॉब करणाऱ्या व्यक्तीला याबद्दल अजून जास्त माहिती असावी. (वैयक्तिक मत बातम्या सांगणारे न्युट्रल असावेत . जसेकी निलम शर्मा, बुद्धभुषण गायकवाड , मार्क लीन, अशोक श्रीवास्तव, वगैरे वगैरे. उगाच आक्रस्ताळे नसावेत नावं सांगायची गरज नसावी ;-) )

गामा पैलवान's picture

19 Feb 2016 - 3:03 am | गामा पैलवान

विकास,

नेमक्या याच कारणासाठी मी बातम्या कधीही 'बघंत' नाही. फक्त ऐकतो.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Feb 2016 - 10:24 am | ज्ञानोबाचे पैजार

आजकाल वर्तमानपत्रा मधल्या बातम्या वाचताना पण हाच अनुभव येतो. एकच बातमी दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रात अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेली असते. ( हे लिहिताना सामना वि पुढारी अशी तुलना माझ्या मनामध्ये निश्चितपणे नाहीये. पण तथाकथित बड्या आणि निपक्षपाती वृत्तपत्रांच्या बाबतीतही हाच अनुभव येतो.)

वृत्तवाहिन्यांबद्दल न बोलणेच श्रेयस्कर.

सत्य काय आसेल याची बहुतांश वेळेस कल्पनाच करावी लागते.

पैजारबुवा,

तर्राट जोकर's picture

19 Feb 2016 - 12:41 pm | तर्राट जोकर

ते टाईम्सनाऊ चा न्युजआर असेल तर तीही सोय नाही...

व्यक्तिशः बातम्या बघणे, वाचणे सोडून दिलेले अहे

मुक्त विहारि's picture

19 Feb 2016 - 10:51 am | मुक्त विहारि

+१

१९५०च्या दशकातल्या बातम्या अद्याप सुरुच आहेत.

१९७०च्या सुमारासचे गाय-वासरू अद्याप पंजा दाखवत आहे.

१९८०च्या सुमारासचे दाऊद प्रकरण पण अद्याप सुरुच आहे.

असो,

"तयार बातम्या वाचणारे होण्यापेक्षा, बातम्या तयार करणारे व्हा."
इति बाबा महाराज, डोंबिवलीकर, ह्यांच्या "तुम्ही आणि तुमचे मन उर्फ आत्मानुभव, एक गरज आणि शक्ती....." ह्या अप्रकाशित १२३४६ ह्या छोटेखानी पुस्तिकेतून साभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2016 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक लेख !

मानवी मन हवे तसे वळवून घेण्यासाठी "मसालेदार अर्धसत्य" हे नेहमीच "पूर्ण सत्य/असत्यापेक्षा" जास्त सार्वकालीक प्रभावी साधन राहीले आहे.

त्याचा उपयोग...

१. असलेल्या/नसलेल्या(बनवलेल्या) सोईस्कर मोहरीचा पर्वत करायला आणि गैरसोईस्कर असलेला पर्वत केवळ क्षुद्र मोहरीचा दाणा आहे किंवा तो आस्तित्वातच नाही असे म्हणायला करता येतो.

२. "मी प्रथम दगड मारला होता" हे एकदाही न सांगता/नाकारून/लपवून ठेऊन "त्याने मला मारले" असा हजारदा गळा काढण्यासाठी अर्धसत्याइतके प्रभावी शस्त्र नाही !

३. स्वतःवरचे आरोप हे खरे तर एखाद्या जनसमुदायावरचाच हल्ला आहे असे भासवून त्या जनसमुदायाला भडकवण्यासाठी करता येतो.

मुख्य म्हणजे जेव्हा जनता हे अर्धसत्याचे राजकारण "न समजण्याइतकी" / "समजून घेण्यास तयार नसण्याइतकी" साधीभोळी (पक्षी : बुद्दु / तात्पुरत्या स्वार्थाने अंध झालेली) असली तर मग चलाख लोक तिच्यासमोर अर्धसत्ये मांडून आपली पोळी भाजून घेण्याची पर्वणी साधणारच. हे सार्वकालीक सत्य आहेच. पण, सद्या दुर्दैवाने, याच नेहमीच्या नाटकाचे जोरदार यशस्वी प्रयोग चालले आहेत. :(

विकास's picture

19 Feb 2016 - 8:10 pm | विकास

"वाढलेली असहीष्णुता" हे संदर्भात एकदम चपखल उदाहरण आहे!

तरी देखील अति झालं अन् हसू आलं असे काहीसे डाव्यांचे होऊ लागणार आहे असे वाटू लागले आहे!

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 12:45 pm | गॅरी ट्रुमन

रोचक लेख.

प्रसारमाध्यमे एखाद्या पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करायचा प्रयत्न नक्कीच करत असतात हे तर अगदीच उघड आहे.पण तो प्रयत्न किती प्रमाणात यशस्वी होतो हे पण बघणे महत्वाचे ठरेल.

अमेरिकेतील १९८४ च्या निवडणुकांविषयीची लेखात दिलेली ही गोष्ट मला माहित नव्हती.त्यावेळी अमेरिकेत रोनाल्ड रेगन हे प्रचंड लोकप्रिय अध्यक्ष होते.१९८४ च्या निवडणुकांमध्ये एलेक्टॉरल कॉलेजमध्ये रेगन यांना तब्बल ५२५ तर वॉल्टर मोन्डेल यांना केवळ १३ मते मिळाली होती.डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया आणि वॉल्टर मोन्डेल यांचे मिन्नेसोटा ही राज्ये सोडली तर इतर सर्व राज्यांमधून रेगन यांचा (त्यापैकी अनेक राज्यांमध्ये दणदणीत) विजय झाला होता. वॉल्टर मॉन्डेलने मिन्नेसोटात केवळ ०.२% मते जास्त घेतली म्हणून त्या राज्यात त्यांचा विजय झाला. रेगनना तब्बल ५८% मते मिळाली होती. मला वाटते की १९३६ मध्ये फ्रॅन्कलीन रूझवेल्टने यापेक्षा मोठा विजय मिळवला होता. अन्य कोणालाही इतका मोठा विजय मिळवणे त्यापूर्वी आणि त्यानंतर शक्य झालेले नाही.ही निवडणुक म्हणजे लॅन्डस्लाईड इलेक्शनचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की रेगनचा इतका मोठा विजय झाला असेल तर त्यात एका प्रसारमाध्यमाचा हात किती असेल? म्हणजे अन्यथाही रोनाल्ड रेगन यांची अमेरिकेत लाट होतीच त्याचवेळी पीटर जेनिंग्जने रेगनना अनुकूल पध्दतीने बातम्या दिल्या यावरून प्रसारमाध्यमे मतदारांना (विशेषतः अमेरिकेतल्या) प्रभावित करू शकतात असे म्हणता येईल असे वाटत नाही.

अमेरिकेतलेच उदाहरण द्यायचे झाले तर १९३६ मध्ये न्यू यॉर्कमधील लिटररी डायजेस्ट या नियतकालिकाने जनमत चाचणी प्रसिध्द केली होती.ही निवडणुक होती अध्यक्ष फ्रॅन्कलीन रूझवेल्ट (डेमॉक्रॅटिक) विरूध्द आल्फ्रेड लॅन्डन (रिपब्लिकन). या चाचणीसाठी तब्बल १ कोटी लोकांची मते विचारात घेतली होती. १९४० मध्ये अमेरिकेची लोकसंख्या १३ कोटी यावरून १९३६ मध्ये घेतलेली ही चाचणी किती मोठी होती हे लक्षात येईल.या चाचणीने आल्फ्रेड लॅन्डन यांचा दणदणीत विजय होणार असे भाकित केले होते (लॅन्डन यांना ५७% मते आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये ३७० मते तर रूझवेल्ट यांना १६१ मते). या जनमतचाचणीला मतदानापूर्वी ३-४ दिवस आलेल्या अंकामध्ये बरीच प्रसिध्दी दिली गेली होती.अनेक वर्तमानपत्रांनीही त्याविषयीच्या बातम्या छापल्या होत्या. प्रत्यक्षात झाले काय? तर रूझवेल्ट यांना सुमारे ६१% मते आणि इलोक्टोरल कॉलेजमध्ये ५२३ मते तर लॅन्डन यांना ३६% मते आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये अवघी ८ मते मिळाली. आपण भारतातल्या २००४ मधील जनमतचाचण्या फसल्या त्याला मोठे अपयश म्हणतो.त्याच्या कित्येक पटींनी मोठे अपयश १९३६ च्या लिटरली डायजेस्ट च्या या चाचणीचे होते.या चाचणीला मतदानापूर्वी ३-४ दिवस इतकी प्रसिध्दी मिळूनही अमेरिकन मतदार त्यामुळे प्रभावित झाले नाहीत.

भारतातले उदाहरण घ्यायचे झाले तर १९९६ मध्ये तामिळनाडूत जयललितांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी राज्यात जयललिताविरोधी लाट होतीच.त्याचवेळी रजनीकांतने "लोकांनी जयललितांना परत निवडून दिले तर देवही माफ करणार नाही" अशा स्वरूपाचे विधान केले होते.अनेकांना असे वाटले होते की रजनीकांतने मते फिरवली.पण प्रत्यक्षात तसे नव्हते हे १९९८ मध्ये सिध्द झालेच. पुढे २००४ मध्ये रजनीकांतने एन.डी.ए ला पाठिंबा जाहिर केला होता आणि पी.एम.के च्या उमेदवारांना पाडा असे आवाहन केले होते.तरीही पी.एम.के चे सगळे उमेदवार निवडून आलेच. तेव्हा १९९६ मध्ये मुळात जयललितांविरूध्द एवढी मोठी लाट होती त्या बाजूचेच मत रजनीकांतने मांडल्यामुळे रजनीकांत मोठ्या प्रमाणावर मते फिरवू शकतो असे चित्र उभे करण्यात रजनीकांत समर्थक यशस्वी झाले. तसेच १९८४ च्या अमेरिकेतील निवडणुकांच्या संदर्भात म्हणता येईल का?

तेव्हा प्रसारमाध्यमे त्यांच्या बाजूने लोकांना प्रभावित करायचा प्रयत्न करतातच.पण अमेरिकेसारख्या देशात मतदार त्यामुळे प्रभावित होतात का आणि किती प्रमाणावर हा प्रश्न आहेच. भारतातही सर्व प्रसारमाध्यमांनी मोदींविरोधी प्रचार करूनही २००२, २००७ आणि २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मोदीच जिंकले होते.

गामा पैलवान's picture

19 Feb 2016 - 6:34 pm | गामा पैलवान

रंजक आणि रोचक प्रतिसाद आहे. आवडला.
-गा.पै.

रंजक आणि रोचक प्रतिसाद आहे. आवडला.
+११

हे संशोधन जे केले गेले होते, ते रेगन कशामुळे जिंकले या संदर्भात नव्हते. यात मतदार चाचण्या घेतलेल्या नव्हत्या. तो उद्देश देखील नव्हता. तर ते एक समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय संशोधन होते ज्यात केवळ विशिष्ठ पद्धतीने दिलेल्या बातम्यांचा त्या वाचणार्‍यांच्या/पहाणार्‍यांच्या-ऐकणार्‍यांच्या मनावर काय परीणाम होऊ शकतो हे अभ्यासले गेले.

थोडक्यात एबीसीचा प्रेक्षकवर्ग हा रेगन यांच्या एकूण मतांमधील नगण्य असेल किंवा नक्कीच होता. पण एबीसी, एनबीसी, सिबीएस यांच्या वार्ताहारांच्या (अँकरमन) प्रेझेंटशन ने कसा प्रभाव पडला हे यात समजून घेतले होते. यात त्यांनाच का घेतले? कारण त्या चॅनल्सची आणि या व्यक्तींची लोकप्रियता, (पब्लीक चॅनल्स असल्याने) अ‍ॅक्सेसेबिलिटी आणि त्यावेळच्या (किंबहूना २००० सालातल्या सुरवातीच्या काही वर्षांपर्यंत) लोकांची असलेली त्या विशिष्ठ बातम्या बघण्याची सवय. इतकेच होते.
-----------------

तेव्हा प्रसारमाध्यमे त्यांच्या बाजूने लोकांना प्रभावित करायचा प्रयत्न करतातच. पण अमेरिकेसारख्या देशात मतदार त्यामुळे प्रभावित होतात का आणि किती प्रमाणावर हा प्रश्न आहेच.

केवळ प्रसार माध्यमेच नाही तर कोणीही प्रभावीत करताना कसे करू शकतात ह्याचे हे निरीक्षण आहे. जे वृत्तवाहीन्यांना लागू आहे तेच चित्रपट-संगीत-नाटकांना पण लागू आहे. अत्यंत अलगदपणे विविध संदेश पसरवले जाऊ शकतात. त्यावरून भारतात वाद-विवाद पण घडलेले आहेत. (मुद्दा भरकटेल म्हणून उदाहरणे देत नाही. ;) ) तसेच दुसरे उदाहरण भारतात भरपूर देता येईल ते म्हणजे, विविध पंथांच्या अथवा स्वतःचेच पंथ करणार्‍या, "लखोबा लोखंडेचे" अवतार असलेल्या बुवा-बाबांचे. ते अशाच पद्धतीने जनतेला स्वतःच्या प्रभावाखाली आणतात आणि फायदा घेतात. (अर्थात सन्मान्य अपवाद सोडून)

भारतातही सर्व प्रसारमाध्यमांनी मोदींविरोधी प्रचार करूनही २००२, २००७ आणि २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मोदीच जिंकले होते.

तेच तर डाव्यांचे दु:ख आहे. ;) माध्यमांद्वारे आम्ही पब्लीकला "मॅनेज" करू शकतो हा डाव्यांचा आत्मविश्वास होता. पण २००२ सालापासून टक्केटोणपे खात मोदींनी नंतर तयार झालेल्या समाजमाध्यामांचा "आउट ऑफ बॉक्स" प्रमाणे उपयोग करून बाजी मारली.

त्यात डाव्यांकडून अजून एक अक्षम्य चूक झाली. गांधीहत्येपासून वापरत असलेले "गिल्ट बाय असोसिएशन" चे शस्त्र ते मोदींच्या निमित्ताने तमाम मध्यास असलेले अथवा मध्याच्या उजवीकडे झुकलेल्या सुशिक्षित, तरूण आणि नवश्रीमंतांच्या विरोधात कळत-नकळत वापरू लागले. वास्तवीक सगळे काही मोदी समर्थक नव्हते. मोदी भक्त तर अजिबातच नव्हते आणि आजही नाहीत. उद्देश हा, की ते मोदींना सोडतील आणी डाव्यांच्या कळपात जातील. पण झाले भलतेच... अर्थात हा आता इतिहास झाला.

आरोह's picture

20 Feb 2016 - 1:18 am | आरोह

माध्यमांनी मोदींना अति शिव्या घातल्यामुळे त्यांना त्याचा पुरेपूर उपयोग झाला ..."उसके दुश्मन है बहोत तो आदमी अच्छा हि होगा " असेच काहीतरी झाले असणार मोदींच्या बाबतीत..

धाग्यावर मी हा प्रतिसाद दिला होता. तोच इथे चोप्यपस्ते करतोय:

जगातल्या कुठल्याही लोकशाही असलेल्या देशात मीडियाला ३ वास्तव तत्वे (realities ) लागू पडतात -
१. मीडियासाठी वाईट बातमी ही नेहमीच चांगली बातमी असते. Bad News is always Good News.
२. मीडियाची बांधिलकी ही शेवटी बातमी आणि ती प्रसिद्ध करण्यासाठी असलेली स्पर्धा आणि त्यातून येणारे टीआरपी किंवा वाचकांची संख्या यांच्याशी असते. शेवटी तोही एक व्यवसाय आहे आणि नफा कमावणे हा त्यांचाही उद्देश आहे.
Commitment of media is always to news and profit generation from the dissemination of such news.
३. माहिती हा मीडियाचा प्राणवायू आहे पण त्याचा अतिरेक त्यांना आवडत नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण, मुद्देसूद माहिती दिलीत, तर त्यात मीडियाला अजिबात रस नसतो. जेव्हा ही माहिती लपवली जाते, तेव्हा मीडियाचा त्यातला इंटरेस्ट जागृत होतो.

भारतातील प्रसारमाध्यमं भाजपविरोधी आहेत असं म्हणायला जागा आहे, पण उजव्या विचारसरणीचे पक्ष हे जगभरात मीडियाच्या टीकेचे धनी ठरलेले आहेत. भाजप एकटाच नव्हे.
अमेरिकन प्रसारमाध्यमं डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने जास्त लिहितात. जाॅर्ज बुश, निक्सन, रेगन - यांच्यावर टीका होण्याचं एक कारण ते रिपब्लिकन पक्षाचे होते हेही आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टी किंवा लिबरल पार्टीपेक्षा काँझर्व्हेटिव्ह पक्षावर टीका नेहमीच जास्त होते. भाजप याच पठडीतला, उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. आणि बिगर-काँग्रेसी सरकार यायची ही आपल्या देशातली फक्त सहावी वेळ आहे - १९७७, १९८९, १९९६, १९९८, १९९९ आणि आता २०१४. त्यामुळे भाजपच्या पाठीराख्यांना ही टीका बोचरी वाटणं साहजिकच आहे कारण इतकी वर्षे अशीच टीका काँग्रेसवर होत होती. आता सुपातले जात्यात आले आहेत, एवढाच काय तो फरक आहे. यावरून एक मस्त किस्सा आहे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जाॅन्सन म्हणाले होते की मी व्हाईट हाऊसजवळून वाहणा-या पोटोमॅक नदीच्या किना-यावर फेरफटका न मारण्याचं कारण मीडिया लगेच छापेल - राष्ट्राध्यक्षांना पोहता येत नाही.

विकास's picture

20 Feb 2016 - 6:00 pm | विकास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जाॅन्सन म्हणाले होते की मी व्हाईट हाऊसजवळून वाहणा-या पोटोमॅक नदीच्या किना-यावर फेरफटका न मारण्याचं कारण मीडिया लगेच छापेल - राष्ट्राध्यक्षांना पोहता येत नाही.

हा हा! मस्तच!

मीडियासाठी वाईट बातमी ही नेहमीच चांगली बातमी असते. Bad News is always Good News.

या संदर्भात असे देखील म्हणातात की, "माणूस कुत्र्याला चावला तर बातमी असते. कुत्रा माणसाला चावला तर नाही!" :)

वरील लेखात आणि त्यातील संशोधनात टिका हा मुद्दा नाहीच! कारण एबीसी वृत्तवाहीनी म्हणून रेगन वर जास्त टिका करत असे. पण केवळ वृत्तनिवेदकाच्या (अँकरमन या अर्थाने) हावभावाचा पण कसा सकारात्मक प्रभाव पडू शकतो इतकाच मुद्दा.

भारताच्या बाबतीत जरा वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत. भाजपावर अथवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षावर टिका केली म्हणून अडत नाही. किंबहूना तशी करणे हे खर्‍या पत्रकाराचे काम असते. पण ती टिका जेंव्हा खोटी असते अथवा लॉजिक सोडून असते तेंव्हा पत्रकारीतेची नैतिकता सोडली गेलेली असते. दुर्दैवाने तसे भारतात खूप झालेले आहे. असो.