भाग-१
क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली. नेहमीच्या तिच्या तारसप्तकाच्या सुराची सवय असलेल्या मला या हलक्या आवाजाने इतका धक्का बसला की मी जेंव्हा त्यातून सावरलो तोपर्यंत तिने माझ्याकडून गोव्याच्या ललित रिसोर्टच बुकिंग करून घेतलं होतं.
नाश्ता आमच्या पॅकेजमध्ये असल्याने सकाळी सातला त्यांचं restaurant सुरु व्हायच्या आधीच दरवाजाबाहेर उभ राहण्याचा बेत मी केला होता. पण हिने आणि माझ्या दोन सुपुत्रांनी माझी कल्पना ऐकून खेड्यातल्या येड्याकडे पहावं तशी प्रतिक्रिया दिल्याने मी माघार घेतली आणि सात पाचला आत जाण्याचे ठरवले. सर्व पंचतारांकित हॉटेलात असतात तसा तिथला नाश्ता अगदी भरगच्च होता.
आमची ही, ऋजुता दिवेकर वाचते. तिने सांगितलं की ऋजुता म्हणते, "सणासुदीला सर्व खा. मनात कुठलीही अपराधी भावना ठेवू नका". इतके ऐकताच, ऋजुता खाण्याबद्दल पुढे काय बोलते ते ऐकायला न थांबता मी सरळ आपली प्लेट घेऊन काउन्टर पर्यंत पोहोचलो सुद्धा. तिथून निघालो तो थेट साडेदहा वाजता. आणि मग ऋजुताला वाईट वाटू नये म्हणून हाच शिरस्ता, मी पुढचे सगळे दिवस पाळला.
अंमळ जास्त नाश्ता झाल्यामुळे जरा डोळा लावून पडतो न पडतो तोच पोहायला जाऊन आलेली मुलं, 'बाबा भूक लागली' असा घोषा लावायची. आणि मग इतक्या मोठ्या हॉटेलात त्यांना एकटं कसं सोडणार म्हणून मग त्यांच्याबरोबर जेवायला जाणं हे माझं एक रोजचंच काम झालं. माझी पोरं पण अशी बिलंदर की तिथे पाच restaurant आहेत, तर रोज वेगवेगळ्या ठिकाणी जायचा हट्ट धरायची. आता सुट्टीवर त्याचं मन कसं मोडायचं? म्हणून नाइलाजाने मला त्यांच्याबरोबर जावं लागत होतं. पानात काही पडू नये हा नियम मी जरी कटाक्षाने पळत असलो तरी अजून मुलांच्या ते लक्षात आलेले नाही त्यामुळे त्यांच्या पानात राहणारे पदार्थ देखील मलाच संपवावे लागत होते.
त्याशिवाय स्विमिंग पूलच्या तीरावर बसलो असताना तिथल्या अर्धवस्त्रांकित गौरकाय सुन्दरींकडे टक लावून बघणे चांगले दिसणार नाही म्हणून आपल्याला ज्याचे दर्शन आवडते आणि आपण त्याच्याकडे पहात असलो की बायको पण आपल्या खाली मान घालून बसलेल्या नवऱ्यावर खूष असते, अश्या माझ्या आवडीच्या विविध खाद्य पदार्थांचा समाचार घेत मी दोन जेवणातला वेळ घालवला.
या सर्वातून मला पुन्हा एक जोरदार धक्का दिला तो माझ्या पोरांनीच. शेवटच्या दिवशी ही स्पा मध्ये गेली असताना मी त्यांच्या तावडीत सापडलो आणि हॉटेलचा फेरफटका मारायचे ठरवले. बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, खुल्या आकाशाखाली मांडलेला अर्धा पुरुष उंचीच्या सोंगट्यांचा बुद्धीबळाचा डाव वगैरे बघत आमची यात्रा हॉटेलच्या आत असलेल्या जिम पर्यंत गेली. मोठा मुलगा आत शिरला म्हणून मी आणि धाकटा पण आत शिरलो. तिथली सगळी उपकरणे आणि मोठमोठ्या सौष्ठवपटूंचे फोटो बघून फार कौतुक वाटले. "काय बुवा या माणसांची दुर्दम्य इच्छाशक्ती, काय ती त्यांची मेहनत आणि काय ती त्यांची देहयष्टी !!" असे विचार माझ्या मनात येत होते. माझा स्वभावच असा आहे. कुणाचं काही चांगलं बघितलं की मला उगीच भरून येतं, मन तृप्त होतं, दयाळू देवावरचा विश्वास वाढतो, सगळीकडे चांगलं होतंय या आनंदाने मी प्रचंड खूष होऊन जातो.
त्याच खुषीत, "तुम्ही पण असाच व्यायाम करून चांगलं शरीर कमवा. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं. लोकमान्य टिळकांनी तर एक वर्ष शाळा सोडून प्रथम शरीराकडे लक्ष दिले होते. तुम्ही शाळा नका सोडू पण भरपूर व्यायाम करा"… वगैरे उपदेश मुलांना करायचे ठरवले आणि त्यांच्या मागे धावत गेलो. तर मोठा धाकट्याला म्हणत होता, " चल हट. बाबाला नाही येणार करता. त्याने तर फेब्रुवारी मध्ये घेतलेली सायकल ऑगस्ट मध्ये विकून पण टाकली. त्याचं पोट मोठं आहे. त्याला जिम पण नाही करता येणार."
तिथे जवळपास असलेल्या लोकांना ही माझीच मुले आहेत हे कळू न देता, शक्य तितके पोट आत घेऊन, त्यांच्या मागे मागे चालत मी तिथून बाहेर पडलो.
अपूर्ण … पुढे चालू ठेवता येईल अशी आशा
भाग ३
प्रतिक्रिया
5 Dec 2015 - 11:05 am | एस
:-) माझीच ष्टुरी वाचतोय की काय असं वाटलं! ;-)
5 Dec 2015 - 11:08 am | सुबोध खरे
उत्तम
5 Dec 2015 - 11:14 am | सस्नेह
धमाल लेख.
5 Dec 2015 - 11:18 am | यशोधरा
भारीच एकदम! खुसखुशीत लिहिलंय!
5 Dec 2015 - 11:20 am | रिम झिम
पुढे नक्की चालू ठेवा..
(जाहिरात - आम्ही येथे लिहीतो)
5 Dec 2015 - 11:50 am | आनंदराव
मस्त.
पोरे नाही त्या ठिकाणी लाज काढतात.
निरागसच असतात बिचारी.
त्यांना काय कळणार कि वाढलेले पोट आत घ्यायला किती त्रास पडतो ते !
5 Dec 2015 - 12:00 pm | बाबा योगिराज
भेष्ट ना. आवड्यास. पुलेशु.
5 Dec 2015 - 12:15 pm | मित्रहो
मजा आली
आमचेही असेच होते. आम्हीही खूष होतो आणि अंगावर मूठभर मास चढत जात.
चला आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.
5 Dec 2015 - 12:43 pm | जातवेद
आणखी येऊ द्या.
5 Dec 2015 - 1:01 pm | सिरुसेरि
छान लेख. हिरोची एंट्री कधी होणार .
5 Dec 2015 - 1:26 pm | उगा काहितरीच
चालू द्या ... पुभाप्र !
5 Dec 2015 - 1:44 pm | अजया
=))खमंग आणि खुसखुशीत.पुभाप्र.
5 Dec 2015 - 3:13 pm | नीलमोहर
एक एक वाक्य म्हणजे अनमोल रत्नं आहेत :)
और आने दो.
5 Dec 2015 - 3:32 pm | खटपट्या
पूभाप्र
7 Dec 2015 - 12:15 pm | पद्मावति
खूपच मस्तं खुसखुशीत लिहिलंय.
7 Dec 2015 - 1:49 pm | पियुशा
जियो काका , मस्त लिहिलय पु भा प्र :)
8 Dec 2015 - 7:44 pm | पैसा
खुसखुशीत!!