दिवस १
नव्या प्रोजेक्ट मधला पहिला दिवस. जवळ जवळ १०० लोकांची टीम; त्यातली आपली टीम १२ जणांची. फ्लोअर वर भिरभिरणारी नजर, कोणी खास दिसतय का बघण्यासाठी. पण छे, कोणिच तसं दिसत नाही, सगळ्या अमराठीच आहेत.
पुढचा कुठलातरी दिवस
वेलकम लंच, त्यात दिसणारी ती, पण फार लांबच्या टेबलवर. गेले आठवडाभर कुठे लपली होती देव जाणे. फ्लोअर वर कुठे बसते बघायला पाहिजे. छे, परत ऑफिसमधे कुठेच दिसली नाही.
पुढचा कुठलातरी दिवस
सकाळी डेस्कवर बॅग ठेऊन ब्रेकफास्टसाठी बाहेर पडताना दाराजवळ दिसली. हाय, काय ते दिसणं, तो ड्रेस, चालणं, ते मोकळे केस, फुल फिदा. आपल्यातली असेल काय? तशीच दिसते. माहिती काढायला हवी.
चहाची वेळ, आज पण कोणाचा तरी बड्डे, मेल येऊन पडलाय, चला केक कटिंगला. १०० लोकांच्यात ईवेंटला काय तोटा नाही, बड्डे, रिटर्नड फ्रॉम होम/ परदेश, गॉट एन्गेज्ड/ मॅरीड, ब्लेसड्ड विथ बेबी बॉय/ गर्ल, लास्ट डे ईन ऑफिस, कायच्या काय.
पुढचा कुठलातरी दिवस
शेवटी आज ती दिसलीच फ्लोअर वर, परत फिदा, अवर्णनीय. आजचा दिवस छान जाणार. फिल्टरपाशी पाणी भरायला जाणार आहे बहूतेक. आपणपण जाणारच आहोत. ती परत जाईस्तोवर थांबावे काय? काय संबंध, झाली तर होऊदे नजरानजर. पण हाय काय ती नजाकत, सबंध वेळ खाली मान घालून उभी होती. आज आपण बाटली विसळायचे पण विसरून गेलो.
पुढचा कुठलातरी दिवस
आज दिवसात ३-४ केक कटिंग, साला काम करतात की नुस्ती खादाडी दिवसभर? आपले काय जातय, ती दिसते ना! पण अजून नाव नाही कळले, तिला बोलताना पाहिले आहे पण ऐकले नाही. कुणाला डायरेक्ट कसं विचारायचं तिच नाव गाव वगैरे. हे केक वाले मेल कधी कामाला येणार, १० मिनीटात नाव हुडकून काढू तिचं. ह्म्म, ही नाही, ही नाही, ही नाही, ही नाही. उरली अनोळखी फक्त ३ नावं. घरी फेसबूक वरून हुडकून काढू लगेच कोण ती.
तीनही नावं सर्च मधे टाकून बघितली, ही त्यातली कोणच नाही. मायला तीचं नावच नसतं काय सेलिब्रेशनच्या मेल चेन मधे? ही काय फाल्तूगिरी आहे.
पुढचा कुठलातरी दिवस
सेक्युरिटी पाशी कुठल्याश्या मुलाला घेऊन ती कसलीतरी ऐंट्री करत होती, तिच्या प्रोजेक्टमधे कोणितरी नविन आलेला दिसतोय.
चला कामं संपली. तिच्या सकाळच्या ऐंट्रीवरनं तिचं नाव कळेल काय? च्यायला, त्या सिक्युरिटीवाल्याकडं ३-४ रजिस्टर असतात. कशाच कुठलं असतय कुणास ठाऊक. आणि सकाळची ऐंट्री आत्ता सापडणार आहे का? गेला हा चान्स गेला. सकाळीच सुचायला पाहिजे होतं हे.
पुढचा कुठलातरी दिवस
पहिल्या पार्टीनंतर कुठल्याच पार्टीमधे दिसली नाही, काय प्रोब्लेम असेल तिचा? पहिली लंच पार्टी होती आणि बाकिच्या सगळ्या डिनर. रात्रीचं घरी जायला अवघड म्हणून येत नसणार. हे साले वरचे लोकं दारू प्यायला पाहिजे म्हणून रात्रीची पार्टी ठेवतात आणि वरून बिल कॉमन. ह्यांच्या आयला ह्यांच्या. आपलापण बड्डे जवळ यालाय, दुपारची असेल तरच पार्टी देणार मी, कुणाबरोबर का क्लब करेनात.
ती पण पित असेल काय, बाकिच्या सगळ्या पितातच की. नाही नाही, बघ तरी राजा तिच्याकडं, वाटतं तरी काय तसं? काय माहित असू पण शकतय, परवाच्या पार्टीत त्या टवळ्या काय गटागटा रिचवत होत्या, बापरे. तरी बरं त्यातली एकीनं कार आणली होती. ती चालवणार म्हणून ती पिणार नाही म्हणे, कल्याण आहे.
पुढचा कुठलातरी दिवस
हाच तो रोज इवेंटचे मेल पाठवणारा. काय काम आहे? हं, कुणाची एंगेजमेंट? अमूक ढमूक. कोण हे महाशय, मी नाय ओळखत त्याला. आणि त्याच्याकडू स्वीट्स अॅट माय डेस्क चा मेल येऊनसुधा हा प्राणी का सगळ्यांना दारोदार सांगत हिंडतोय स्वत:च्याच भावाचाच साखरपूडा झाल्यासारखा? कामं आहेत लई आम्हाला चल भाग यहा से. आज ती कुठं दिसलीच नाही. फिल्टरपाशी ४-५ चकरा मारून बघितल्या, पण छे, आजचा दिवसच बेक्कार.
पुढचा कुठलातरी दिवस
चारचा चहा, चला विंडो एल; अव्या मा़कडा बिल्डींगखाली ये.
ये ना गं लिफ्ट लवकर, अजून दुसर्याच मजल्यावर आहे. आली, आली, अगं आई गं ही पण आली. आज पण तशीच ईर्र्जिस्टेबल. नाही नाही मी लिफ्टचं दार बंद नाही होऊ देणार, बाकिचे थांबू शकतात ५-१० सेकंद, ती पोहचोपर्यंत. अव्याचा मजला आला, अव्या आला नाहि म्हणजे मिळवलं, हुश्श! दुसर्या फ्लोअरच्या कॅन्टीनसाठी पब्लीक उतरली. मी दारातून मागे सरकलो पब्लीकला जागा करायला तर ही अंतर वाढवायला पार दुसर्या कोपर्यात. मी अगाऊ वाटलो काय तिला? नाहीरे, मुलगीच संस्काराची ती, आपलं काय चुकलं नाय.
चल अव्या, आज चहा नको, मस्त पैकी फुल्ल कॉफी पिऊ, दरिद्री कुठचा, चल मीच पाजतो रडू नको.
माझा वाढदिवस
ऐशब्बास, मेल पाठवून झालेला आहे. बड्डे विश करण्यासाठी रिघ लागली आहे. मुली पण आल्या, अगदी हात हातात घेऊन विश करू लागल्या. आईशप्पथ, ती पण आहे. तिने आज घातलेला पिवळा ड्रेस खासच आहे; माझा फेवरेट.
'हॅप्पी बर्थडे'
'थँक यू'
पण तिनं नुसतच बोलूनच विश केलं. दिवसाच्या शेवटी एका पण मुलीचा स्पर्श लक्षात राहिला नाही.
चला आता त्या इवेंट मॅनेजरशी भांडायला मोकळे, पार्टी दुपारची करायला. तुमच्या आयला तुमच्या, मराल एक दिवस दारू पिऊन पिऊन. काहितरी करा जावा तिकडं, हे घ्या माझे पैसे, मी काय येत नाही माझ्या पार्टीमधे. हां आत्ता कसं, कर शेडयुल दुपारी.
पुढचा कुठलातरी दिवस
बोंबलायला इतके दिवस, आठवडे, महिनेपण झाले हिचं नाव, गाव काय कळायला मार्ग नाय. एकतर आपली टीम वेगळी, त्यात ती बसायला लांब. हा ह्याला विचारूया, हा बाहेर कुणाला सांगणार नाही मी विचारलं म्हणून.
'अरे वो लडकी कौन है पता है क्या? नही मतलब, बाकी सभी के नाम पता है सिर्फ उसिका नही पता| कही पे बाहर भी नही आती, दिनभर बहोत काम करती रहती है|'
'अच्छा वो, नही पता रे| भाई सौ से जादा तो लोग है इधर|'
अरे कर्मदरिद्री माणसा, प्रोजेक्ट सोड, फ्लोअर सोड, अख्ख्या बिल्डींगमधे तरी तिच्या एवढी आकर्षक मुलगी तुला दिसली आहे का दुसरी? आणि तू म्हणतोस किस किस के नाम याद रखू, युजलेस! जा जीव दे जा!
इकडे इवेंट मॅनेजर डूख धरून बसलाय. तुझी पार्टी दीड महिन्यांनी त्या मॅनेजरच्या बरोबर क्लब करणार म्हणतोय. मी देतोय ना पैसे राजा, कर ना या आठवड्यात माझी दुपारी. नाहीच म्हणे, आता तो मॅनेजर काय दुपारची होऊ देणार नाही. पेताड्या लेकाचे!
पुढचा कुठलातरी दिवस
डेस्कवर बॅग टाकून नाष्ट्याला पळलं पाहिजे. दोन्हीपैकी कुठली लिफ्ट लवकर खाली येती बघूया. आली आली, ही आली. ती पण आली, चला ह्याच्यातच घुसूया, डोर क्लोसिंग. अरे थांब, बाजूच्या लिफ्ट्मधून माझा फेवरेट पिवळा ड्रेस बाहेर येतोय. उगाचच घाई केली. पण हे काय, त्यातुन बाहेर येणारा एक हात बाजूच्या मुलाच्या हातात आहे! आईचा घो! माझे दोन्ही हात डोक्याच्या मागं, लिफ्ट बंद, मी हवेत लिफ्टमधे.
डोर क्लोसिंग, अरे थांब राजा थांब, हा माझाच मजला आहे. अनबिलीवेबल, शब्दच काय शिवी पण फूटत नाहिये तोंडातून. आज काय काम नाही, आज हाल्फ डे. बॅग टाकू आणि अव्याला फोन करून बाहेरच वेळ काढू. नाहितर त्याला तरी कुठे कामं असतात. माझ्या डेस्ककडे जाताना तिकडं नकोच बघायला, उगाच तिची याद.
वेट अ मिनीट, ही कोण आहे? साला ती कोणी तरी वेगळीच होती. आईचा, उभ्या जन्मात ऐकल्या नसतीत तेवढ्या सगळ्या शिव्या तोंडात जमा! तिज्याईला, जीव भांड्यात का कशात तो पडला एकदाचा. और गिरा भी तो क्या गिरा, वाहवा, जैसे खिलता गुलाब जैसे शायर का ख्वाब जैसे....
पण आज हाल्फ डे च आणि काम बंद.
अव्या चहा, भिकारी माणसा कधितरी पाकिटात पैशे ठेवत जा रे.
पुढचा कुठलातरी दिवस
परत पाणी भरताना दिसली, नजरा नजर नाही. खाली बघणे वगैरे.
आज परत केक कटिंग. तिकडे पण दिसली. ग्रुप फोटो मधे माझ्या बाजूलाच १ जण सोडून उभी होती. चोरून माझ्याकडेच पाहात होती काय? कॅमेर्यावाल्या पोरगीला धरून तिच्याकडचे फोटो चेक करायला पाहिजेत. पायर्या उतरताना माझ्यापुढे.
एं हा पण ड्रेस चांगला आहे, फेवरेट नं. २.
१ दिवस
आज सकाळी सकाळी ह्या नालायक माणसाचे तोंड का दिसावे? आधिच प्रोजेक्ट मधे छळतोय ते काय कमी आहे?
'ये लो चोकलेट|'
'किस खुशी मे?'
'वो लडकी है ना, उसका बड्डे है|'
'कौन है ये? मै नही जानता|'
'अरे वो है ना देख, उसके ओपोजिट साईड मे जो बैठी है, उसको सब लोग विश कर रहे है|'
ओह माय गॉड, आज तिचा वाढदिवस आहे?? चला तोंड गोड करूया.
'मेरे लिये भी एक और लेके आना|'
तु म्हण रे, बोल. आज तुझे सगळे गुन्हे माफ.
'अरे आज उस लडकी का बड्डे है, जाना है क्या विश करने?', हा आणि कुठून उपटला मधे. चल बाबा चल, तु पण चल. नाहितर मला एकटच जाणं जरा अगाऊपणाचं वाटतय.
'हॅप्पी बर्थ डे (स्वीटहार्ट)'
'थँक यू'
हात पुढे करावा का? तिचे तर हात डेस्कच्या खाली आहेत आणि तिने पण मला हात दिला नव्हता, कदाचीत तिला असं शेकहॅन्ड आवडत नसावं.
'हॅप्पी बर्थ डे'
'थँक यू'
नालायका, नतद्रष्ट माणसा तिचा हात हातात घेतलासच कसा तू? तू तर तिला पहिल्यांदाच भेटतोयस आणि तिला आवडत नाही हे सगळं! आज तिचा वाढदिवस नसता तर बुकलून काढला असता तुला. आता फक्त डेस्कवर चल तु!
आईला, तिच्या वाढदिवसाचा मेल आला असेलच कि. हे हे हे, गावणार आता तिचं नाव गावणार. नाव गावलं की गावं गावलं, आणि मग सगळचं गावलं.
चला, हं बघूया. अरे वा, काय नाव आहे अमूक ढमूक, थोडं पुरूषी वाटतयं. मराठी नसणार, नसली तर नसली आमच्या घरी चालतय!
हे नाव कधीतरी ऐकल्यासारखं वाटतयं. याआधि तिचा कुठला ईवेंट तर झाला नसल. पक्क आठवतयं याआधी तिचा एकदा 'स्वीट्स अॅट माय डेस्क' झालाय. पण कशासाठी? हां, बॅक फ्रॉम होम टाऊन असणार, नाहितर बर्थडे असेल. हो बर्थडेच असेल. असा कसा मिस केलेला तेव्हा मी तिचा बर्थड. हं असूदे. बाकी बिनकामाचे काय मेल आलेत बघू.
वेट अ मिनीट. तिचा बर्थडे तर आजच आहे. मग तो काय होता? नाव कॉपी पेस्ट सर्च. ह्म्म, बरोब्बर एका महिन्यापुर्वी,
'गॉट एंगेज्ड!'
प्रतिक्रिया
29 Nov 2015 - 3:07 am | एस
अरेरेरेरे! :-)
छान लिहिलेय.
29 Nov 2015 - 3:32 am | बाबा योगिराज
खासच लिहिलय...
आवड्यास.
29 Nov 2015 - 4:30 am | रेवती
छान लिहिलय.
29 Nov 2015 - 7:12 am | कंजूस
तारारारारुरुरु तारारारारुरुरु तारारारारुरुरु
मस्त।
29 Nov 2015 - 7:37 am | अमीबा
लेखन आवडले.
29 Nov 2015 - 7:37 am | दमामि
मस्त!!
29 Nov 2015 - 9:00 am | गवि
फारच खास. जियो..!!
29 Nov 2015 - 9:59 am | बोका-ए-आझम
पाणी भरताना दिसणं तर खासच! फुल गांव की गोरी ष्टाईल!
29 Nov 2015 - 10:12 am | आतिवास
छान लिहिलं आहे.
अवांतर -
आज हाल्फ डे.
यातल्या 'सिग्नेचर' शब्दावरून इथले आणि अन्य एका संस्थळावरचे काही आयडी आठवले ;-)29 Nov 2015 - 11:28 am | तुषार काळभोर
शून्याच्या आधीच (मनातल्या मनात) संपुष्टात येतात :प
29 Nov 2015 - 11:47 am | मित्रहो
अशा कित्येकांची लग्ने आपल्याला जळवत होतात. काही काही तर लग्न करुनच जॉइन होतात. शेवटी आपले लग्न होइल तेंव्हाही असेच कुणीतरी जळेल, कुणाचे तरी विचारायचे राहून गेले असेल.
29 Nov 2015 - 11:48 am | आदूबाळ
हात लेका...
झकास लिवलंय
29 Nov 2015 - 1:28 pm | रातराणी
गुलाबी डायरीतल अत्तराचा घमघमाट सुटलेल पान! सह्ही लिहलय! :)
29 Nov 2015 - 1:53 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय.
30 Nov 2015 - 12:11 pm | मीता
मस्तं लिहिलंय
30 Nov 2015 - 12:19 pm | बॅटमॅन
कल्पड झाला रे....पण छान लिहिलंय.
30 Nov 2015 - 12:38 pm | सस्नेह
लेटबद्दल अरारारा. पुढच्या टायमाला टायमात सेटिंग लावायला सुबेच्चा !
30 Nov 2015 - 12:39 pm | मांत्रिक
मस्त लिहिलंय.
30 Nov 2015 - 12:44 pm | पद्माक्षी
मस्त
30 Nov 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लिहिलंय ! मनातली खळबळ मस्त उमटली आहे लेखनात.
30 Nov 2015 - 12:59 pm | नीलमोहर
हॅपी एंडिंग असेल असं वाटलं होतं पण..
भारी लिहीलंय.
30 Nov 2015 - 1:06 pm | आनन्दा
मस्तच..
30 Nov 2015 - 1:14 pm | नाखु
लिहिलयं !!!
पुलेशु आणि पुढील ........स शुभेच्छा !!!
30 Nov 2015 - 1:26 pm | दिपक.कुवेत
छ्या सगळा मूड घालवलात...
30 Nov 2015 - 1:52 pm | जातवेद
का हो?
30 Nov 2015 - 5:53 pm | मितान
मस्तंच !
30 Nov 2015 - 10:35 pm | अजया
झकास ! बेटर लक नेक्स्ट टाईम!
30 Nov 2015 - 10:58 pm | पैसा
छान लिहिलंय!
1 Dec 2015 - 10:49 am | जातवेद
बाकी काल्पनिकवाला ढ़िस्कलेमर राहून गेलाय वरती याची चाणाक्ष वाचकांनी नोंद घ्यावी.
1 Dec 2015 - 11:47 am | साधा मुलगा
सुरेख लिखाण ! स्टोरी ऑफ माय लाइफ़ !
1 Dec 2015 - 12:26 pm | इशा१२३
मस्त लिहिलय!
2 Dec 2015 - 11:09 am | असंका
अगदी फुल्बाजीसारखं झालं. म्हणजे शेवट हो.
झगमग झगमग चालू होती पण एक सेकंदात विझली.
2 Dec 2015 - 11:20 am | जेनी...
सुंदर मांडणी :)
आवडला लेख .....!
2 Dec 2015 - 4:03 pm | नूतन सावंत
छान लिहिलंय.
2 Dec 2015 - 4:59 pm | आदिजोशी
असे अनेक घायाळ पाहिलेत. प्रत्येक नवे पाखरू ही त्यांच्यासाठी नवी सुरुवात असते.
""एक दिन अपुनके मोहल्ले में हेमा आयी..."
पासून ते
""अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आयी...""
धमाल :)
3 Dec 2015 - 12:43 pm | उगा काहितरीच
मस्त खुसखुसीत लेख...
-कार्यकर्ता (उपाशी मित्र मंडळ)
3 Dec 2015 - 2:09 pm | रायनची आई
मस्त लिहिलय.. ह्या लेखाला कंफ्युज्ड अकौंटंट यानी दिलेली फुलबाजी ची उपमा पण खासच..
3 Dec 2015 - 4:29 pm | विश्वव्यापी
कथा मस्त , कॉलेज चे दिवस आठवले .१९८४ विल्सन कॉलेज. मुंबई .
सदियाँ गुजरी तेरी याद भी आई न हमें ,
पर ऐसा भी नहीं के हम तुम्हे भूल गए I
भूल जानेका हौसला न हुआ ,
दूर रहके भी वह जुड़ा न हुआ I
3 Dec 2015 - 5:01 pm | जातवेद
वाह वा!
3 Dec 2015 - 5:07 pm | यशोधरा
अरारा! कित्ती दुत्त दुत्त सगळे!
3 Dec 2015 - 10:09 pm | जातवेद
बघा ना, सदैव =)
3 Dec 2015 - 5:55 pm | मी-सौरभ
आवडेश
3 Dec 2015 - 6:53 pm | शिव कन्या
लिवण्याची ष्टेल आवडली.
3 Dec 2015 - 10:10 pm | जातवेद
=)