(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज)
********
प्रती :- शंभरातील एकास...
प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं.
सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा.
परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे. मग टपरीवर नेऊन त्यानं मला चहा पाजला.
हे एक थोरच आहे.
प्रभुणे येतो अधुनमधुन रुमवर. त्याच्या बापसाने म्हणे दोन लग्न केली होती. दोन बायका एकाच घरात. त्यांची सात आठ पोरबाळं. कुठलंही पोर कुणालाही प्यायचं. याला अजुन माहीतीचं नाही हा नक्की कुठल्या आईचा.
ही एक भलतीच गोष्ट झाली.
रात्री जेवायला गेलो. मेसमध्ये फीस्ट होती. सुरेश शेजारीच बसला होता. त्याच्या ताटातली दह्याची वाटी मला देत म्हणाला, नुसतचं पाणी आहे. ईथल्या गायी म्हशी आटल्या वाटतं. मी म्हणालो, नंतर सिगरेट पिऊया. उदाहरणार्थ माझी खीरीची वाटी त्याला दिली.
सिगारेटीही महाग झाल्यात आजकाल. नाक्यावरुन बीडीचं बंडल आणलं. सुरेश म्हणाला, मला नको. मी म्हणालो, चालतयं. सुरेश निघुन गेला. मग खिडकीपाशी खुर्ची घेऊन बिड्या ओढत बसलो. एक एक करत बंडलच संपवल. टेबलावर एक मुंगळा फिरताना आढळला. हाताने धरत त्याला वहीवर ठेवला. पेनाच्या टोकाने त्याच्याशी खेळत बसलो. एकाएकी हातावरुन सदऱ्याच्या बाहीत शिरला वगैरे. नको तिथे चालला वगैरे. पुन्हा पकडुन वहीवर ठेवला वगैरे. तो आता वहीच्या खाली चालला वगैरे. पुन्हा त्याला पकडलं वगैरे. आता याला कुस्तीसाठी नवीन मुंगळा पकडला पाहीजे वगैरे. सगळ्या खोलीत वगैरे शोधत फिरलो. शेवटी फडताळात वगैरे एक सापडलाच. त्याला वहीवर ठेवायला घेऊन आलो तर हा पहिला गायब. का हाच होता तो. शेवटी त्याला खिडकीबाहेर टाकुन दिलं वगैरे. यातच रात्र गेली. आजही समाजशात्राचा अभ्यास बोंबलला. पहाटे थोडावेळ झोपलो तर सुरेश दारात हजर. बहिणीच्या लग्नाला स्टेशनवर जायचय, तो म्हणाला. अख्खा दिवस मी तारटवल्या डोळ्यांनी घालवला.
आता हे खुपच झालं.
तू एक काम कर, आधी बी.कॉम वगैरे पुर्ण कर. मंजिरीसोबत जास्त फिरु नकोस. जाम लफडेबाज आहे ती. बाजारात सुधाकर तिला घेऊन फिरत होता. दिवसभर. म्हणजे सिनेमा वगैरे पाहिला दोघांनी. संध्याकाळी किशोर तिच्या रुमवर गेलता. नोटस् वगैरे आणायला. बराच वेळ बाहेर आला नाही असे सुरेश म्हणाला. रात्री मला ती पुलाखालच्या काळोखात बसलेली दिसली. रामदासच्या पुढे. नागवीच.
गेल्या महीन्यात ट्रिपला महाबळेश्वरला गेलो होतो. मित्रांबरोबर.
महाबळेश्वर
एक प्रचंड हिरवगार टेकाड. समोर कायम घोंगावणारा वारा. त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी स्पॉटांमागुन स्पॉट पाहतो आहे.
एका स्पॉटात भलीमोठी दरी. अक्राळविक्राळ. खालुन थेट शिखराकडे पाहते आहे. काय पाहते आहे? झाडाझुडपांनी फार फार वेढलेली. मध्येच उजाड ओबडधोबड माळरान.त्या बोडक्या माळरानाकडे मी टक लावुन पाहतो आहे. या माळरानावरचं दगडांचा हिशोब मांडलाय. मी पुन्हा खाली पाहतोय. एवढी मोठी दरी नजरेच्या एका टप्प्यात पाहता येत नाही वारंवार डोळे फिरवावे लागतात. अतिशय हिरवळ. आणि गारठा. हा गारठा घोंघावण्याऱ्या वाऱ्यासमवेत झेपावत येतो. आणि मला बधीर करुन जातो. ही बधीरता शब्दात मोजता येणार नाही. मी तसाच पायरीवर बसतो. प्लीज किप मी वॉर्म, माझ्यावर दया कर. ही दरी आपली किव करणार नाही. ही लिक्विड नायट्रोजन पोटात गोठवुन बसली आहे.
पुन्हा दुसऱ्या स्पॉटकडे. तशीच भव्य दरी. तिसरीही तशीच. दर स्पॉटवर तेच.
एका स्पॉटवर गच्च हिरवळ आहे. मी कितीही आत गेलो तरी संपणार नाही. त्या जंगलात मी इकडे तिकडे फिरलो. ईथे खरच काही नाही.
या गारठलेल्या बधीरतेत रोमांचाला सीमा नाही. ईथे तर फक्त एक दिवसाचा खेळ.
गेल्या आठवड्यात तुझ्या घरी गेलतो. हात मागायला. तुझा बाप म्हणाला, कामधंदा काय करता, नोकरी वगैरे. मी म्हणालो, गावाकडे शेती आहे, ट्रँक्टर आहे, चार म्हशी आहेत, दुमजली घर आहे. तुझा बाप म्हणाला, असा कसा तुमच्या गळ्यात आम्ही धोंडा बांधायचा.
हे थोरच आहे.
माझं आयुष्य असं हे खुंटीला बांधलेलं. तुझ्याही प्रेमात पडु वाटलं म्हणुन पडलो. तुला कोणी धोंडा वगैरे म्हटल्यालं आपल्याला नाही आवडणार. तरीही तुझ्याशीच पाट लावणार. उदाहरणार्थ हे चुकच आहे. म्हणजे बरोबर.
कळावे
शंभरातील दुसरा...
प्रतिक्रिया
29 Sep 2015 - 1:11 am | उगा काहितरीच
जमतय जमतय !
29 Sep 2015 - 9:06 am | किसन शिंदे
कोसला वाचली नाही त्यामुळे लेख डोक्यावरून गेला. बाकी तुमच्या कथेतल्या, लेखातल्या स्त्रीया ह्या व्यभिचारीच का असतात असा सहजच प्रश्न मनात डोकावून जातो.
29 Sep 2015 - 9:18 am | एस
'कोसला'ही अशीच निरर्थक वाटली होती.
29 Sep 2015 - 10:07 am | प्रचेतस
अगदी अगदी.
कोसला, बेडेकरांची रणांगण ह्या निष्कारण उदो उदो झालेल्या कादंबऱ्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
29 Sep 2015 - 10:54 am | सौंदाळा
+१
कोसला अर्धवट वाचुन सोडुन दिली होती.
29 Sep 2015 - 12:54 pm | पैसा
रणांगणबद्दल बोलियाचा काम नै! तुम्ही आपले दर्पणसुंदर्या शोधा त्यापेक्षा! =))
29 Sep 2015 - 9:42 pm | अजया
रणांगण आणि कोसला बद्दल पण नका हो बोलू! सातवाहनकालिन काहीतरी वाचा पाहू.दर्पणा काय म्हणते?
29 Sep 2015 - 9:52 pm | प्रचेतस
हॅर्टा हॅर्टा
त्यापेक्षा अनंत सामंतांची एम् टी आयवा मारू सरस वाटते. कोसलाच्या सांगवीकरपेक्षा लव्हाळीतला सर्वोत्तम सटकर सरस वाटतो. हे ही थोरच.
बाकी दर्पणा अगदी मजेत आहे. सारखीच आरशात बघत असते. कल्जी करू नये. :)
29 Sep 2015 - 10:43 pm | पैसा
सारखी आरषात बघणारी काय करायची? दुसरी कोणी शोधा. अभिसारिका, वासकसज्जा वगैरे!
29 Sep 2015 - 10:51 pm | प्रचेतस
=))
29 Sep 2015 - 10:17 pm | बोका-ए-आझम
रणांगण आणि सत्तांतर या मराठीतल्या सर्वकाळजबरदस्त (all time great) कादंब-या आहेत. लव्हाळी तर भयावह सुंदर आहे. कोसलाच्या बाबतीत सहमत. अर्थात ती नेमाड्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे. बाकीच्या अगदीच फालतू.
29 Sep 2015 - 10:37 pm | प्रचेतस
सत्तांतर माडगूळकरांची का?
जबरी आहे. अर्थात त्यांच्यावर सत्तांतराच्या बाबतीत कल्पनाचौर्याचा आरोपही झाला होता.
29 Sep 2015 - 10:42 pm | बोका-ए-आझम
बाकी आनंद यादवांची नटरंग, उत्तम बंडू तुप्यांची झुलवा आणि राजन गवस यांची चौंडकं या पण बाप कादंब-या आहेत. त्याबद्दल कधीतरी लिहायचंय.
29 Sep 2015 - 10:33 am | यमन
मस्त जमलंय .
पु ले शु
29 Sep 2015 - 11:04 am | दिवाकर कुलकर्णी
कोसलाचा जो उदोउदो झालाय ते आकलनाच्या बाहेर आहे,
मारुतिच्या बेंबित विंचू चावून् फजिता लपवण्यासाठी गारगार वाटत सांगणार्या गोष्टी सारखं ते वाटतं
ना शेंडा ना बुडखा ,डझनावारी चिकित्सेची पुस्तकं काही पी एच ड्या कोसलावर,अनेक भाषात भाषातंर काय,
साहित्य आकादमिचा पुर्सकार काय,निव्वल बकवास,
एका मित्रान कोसला वाचायला दिलं पण अट घातली,एक शेवटपर्यंत सक्तिनं वाचायचं आणि दुसरी अट
पुन:परत आणून द्यायचं नाही,असा सूड त्यान घेतला वगैरे वगैरे
१००तल्या९९चांहि सूड उगवला गेलाय पण मारुतिची बेंबी दुसरं काय
खरं म्हणजे हा शिल्या कढीला उत आहे पण ,
तुमचं विडबन झकास
आज कोसला का आठवली?
29 Sep 2015 - 11:19 am | यमन
त्याची कारणं …
एकदम वेगळा जॉनर .
त्या वेळेच्या तरुणांच्या बोली भाषेत लिहिलेली .
साधे विषय . पण धीट मांडणी .
मी वाचायला घेतली आणि एका बैठकीत संपवली .
समीक्षण करण हा हेतू नाहीये .
तुमच्या मताचा ही आदर आहेच . पण कौतुक जरा जास्तच झालंय हे ही खरंच .
29 Sep 2015 - 12:03 pm | आनन्दा
सहमत.. कोणत्याही कलाकृतीचे मूल्यमापन त्या काळाच्या कसोटीवर झाले पाहिजे. नाहीतर सगळेच कालबाह्य दिसू लागते.
29 Sep 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रत्येकामधे एक पांडुरंग सांगवीकर लपलेला असतो. कोणाला तो सापडतो कोणाला नाही. कोसला कदाचित ओव्हररेटेड असेलही पण तरिही भयानक आवडते. हे थोर आहे. बाकी कोसलाकारांचं बाकीचं लेखन कटाक्षानी टाळलय.
29 Sep 2015 - 12:53 pm | प्यारे१
+१११
थोरांशी सहमत. ;)
29 Sep 2015 - 3:47 pm | यमन
मनातलं बोललात कॅप्टन राव !!
30 Sep 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
उदाहरणार्थ पोरांना थोर म्हणणारे प्यारे खरे थोर.
30 Sep 2015 - 7:05 am | प्यारे१
म्याड च आहेस. उदाहरणार्थ २३४८ वेळा सांगायला हवं तुला की थोरपणा वयावर अवलंबून वगैरे नसतो.
-सांगवीकर पांडुरंगाभेटी लंपन पै आला
29 Sep 2015 - 7:42 pm | जव्हेरगंज
रात्री एक लेख टाकला. तिकडं म्हणाले, अस्सल पेक्षा चोखंदळ वगैरे. ईकडे म्हणाले, अस्सल हेच भंकस वगैरे. कुणी म्हणालं, डोक्यावरुन गेली. दुसरा म्हणाला, अगदी अगदी. तिसरा म्हणाला, सुड वगैरे ऊगवलाय. मग यमन म्हणाला, पुलेशु
हे थोरच आहे.
29 Sep 2015 - 10:37 pm | पैसा
तिकडचं तिकडे ठुवायचं. हिकडचं हिकडे. थोर कुणी आसू. तिकडे लै इंटुक लोक आहेत असं कोनतरी म्हनलेलं यकदा!
29 Sep 2015 - 9:43 pm | अजया
कॅप्टनशी तीव्र सहमती!
29 Sep 2015 - 9:58 pm | बिन्नी
कोसला आवडतं पुस्तक आहे. नक्कल बरी जमली आहे
29 Sep 2015 - 10:30 pm | मारवा
कोसला भयंकर आवडत पुस्तक
शैली छान उचललीत
भन्नाट विडंबन
मजा आ गया
एकदा जीए दवणे अस काहीतरी कॉकटेल करुन दाखवा राव
मजा येइल
29 Sep 2015 - 10:39 pm | पैसा
जीए + दवणे? _/\_
29 Sep 2015 - 10:44 pm | बोका-ए-आझम
माघाच्या थंडीतील रमलखुणा वगैरे ? हे थोरच आहे! ;)
29 Sep 2015 - 10:32 pm | मारवा
हा आय डी असा
जव्हेरगंज
याचा अर्थ प्रेरणा काय हो ?
30 Sep 2015 - 2:43 pm | बॅटमॅन
पानिपत कादंबरीत शिंद्यांच्या हत्तीचे नाव जव्हेरगंज असते.
30 Sep 2015 - 2:30 pm | दिवाकर कुलकर्णी
कॉकटेल ऑलरेडी होऊ लगलंय भालचंद्र नेमाडे व अशोक नायगावकर यांच
30 Sep 2015 - 6:14 pm | जव्हेरगंज
अरे हो की! मलाही ते वगैरे वगैरे लिहीताना नायगावकरच पुढं दिसले. तसाही दोघांत काही विशेष फरक नाही. उदा. मिश्या वगैरे.
सर्व प्रतिसादकांचे आभार!
30 Sep 2015 - 6:54 pm | विजुभाऊ
कोसला स्टाईल आवडली. मात्र कोसला मधे असणारी लेखकाची कुठेच न नेणारी स्थिती तुम्ही दाखवली असती तर उदाहरणार्थ थोर वाटले असते.
30 Sep 2015 - 8:24 pm | जव्हेरगंज
हेच माझ्याही लक्षात आले होते. पण बाण अगोदरच सुटला होता :)
1 Oct 2015 - 5:11 am | मदनबाण
लेखन आवडले. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Star
1 Oct 2015 - 11:10 am | दिवाकर कुलकर्णी
कोसलाच्या यशासाठी ? पुलनाहि वेठीला धरलं हेतं
त्यांच्याकडून चार ओली लिहुन घेतल्या होत्या,ते असो
वगैरे वगैरे ,
तरुणाईला आकर्षित करणारे असेस दुसरे लेखक भाऊ पाध्ये
मला स्वत:ला जास्त भावतात ,दोघेहि थोडे फार समकालिन असावेत
त्यांच्या वासुनाका स्टाईलने कोणी लिहू शकेल काय?
दोघेहि एकदम भिन्न प्रव्रुत्तीचे त्या उभयतांची तुलना करण्याचा अजिबात हेतु नाही,
9 Oct 2015 - 8:59 am | रातराणी
छानच लिहिता. ते पोपट बिपट लिहिण्यात कशाला एनर्जी घालवायची?
9 Oct 2015 - 9:23 am | जव्हेरगंज
धन्यवाद रातराणी, तो पोपट नकळतपणे लिहीला. अंदाजच लागला नाही कसा वटलाय याचा. :)