शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?)
आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला. त्यात, ‘जलतरण, आरोहण, धावणे आणि उड्डयण’ अशा चार क्षमताविषयांचा समावेश केला. आता एवढ्या भरमसाठ प्राण्यांचा कुठे वेगवेगळा विचार करीत बसा, म्हणून सगळ्या प्राण्यांनी सगळे विषय अनिवार्यपणे घेतलेच पाहिजेत, असा नियम केला. झालं, शाळा सुरु झाली!
बदक पोहण्यात एकदम सराईत! अगदी त्याच्या गुर्जींपेक्षा सरस! उड्डयनातही त्याला फारशी अडचण आली नाही. धावताना मात्र, त्याचे अतोनात हाल होत! पळताच येत नसे. धावण्यात सुधारणा व्हावी म्हणून, शाळा सुटल्यावर थांबून त्याने धावण्याचा सराव करणे, सक्तीचे करण्यात आले. एवढेच नव्हे तर, धावण्याच्या सरावासाठी वेळ मिळावा, म्हणून त्याचे पोहणे बंद केले. धावण्याचा उघड्या जमिनीवर सराव करताना, त्याच्या पायांच्या बोटांमधील पडदे पार फाटून गेले. फाटक्या पंज्याने पोहताना, त्याला प्रचंड वेदना होत. त्यामुळे पोहण्यात अव्वल असूनही, फाटक्या पंज्यामुळे त्याला ‘क’ श्रेणीवर समाधान मानावे लागले. पण शाळेत, ‘सामान्य, साधारण’ असण्याला जास्त मान्यता होती. म्हणून बदकाखेरीज इतरांना खेदखंत काही वाटले नाही! बिचारे बदक मात्र मनातून खचून गेले. आपल्या फाटक्या पंज्याकडे ते केविलवाणे होऊन पहात रहायचे.
धावण्यात ससोबाचा हात [पाय] कोण धरणार? सुसाट वेगाने स्वारी धावायची! पण पोहण्याच्या तासाला, त्याचे अस्से भिजले मांजर व्हायचे कि त्याला nervous breakdown चा सामना करावा लागला.
खारूताईची गोष्टच निराळी! आरोहनात उत्तम. सरसर झाडामाडांवर चढाउतरायची. पण सगळेच विषय अनिवार्य असल्याने तिला उड्डयनाच्या तासाला कंपल्सरी उडावे लागे. तिला जमत नसतानाही गुर्जी तिला बळेबळे उडायला लावायचे. ती बिचारी धप्पकन कोसळायची! कधी एकदा हा तास सरेल, आणि कधी आपला छळ संपेल, असे होऊन जायचे तिला! अतिश्रम आणि थकव्यामुळे ती प्रवीण असलेल्या आरोहण कौशल्यावर मात्र विपरित परिणाम झाला. त्यात तिला ‘क’ श्रेणी मिळाली. खारुताई कायमची हिरमुसली!
गरुडाची गणना ‘problem child’ मध्ये होई . उड्डयनाच्या तासाला त्याची उत्तुंग झेप, आकाशातील भरारी, तन्मयतेने केलेला विहार, पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवी. उंच उंच झाडांच्या शेंड्यांवर तो अगदी सहज, डौलाने बसे. ‘झाडांच्या शेंड्यांशी कसे पोहचावे’ याबाबतीत त्याची, आपल्या गुर्जनवर्गाहून वेगळी आणि स्वतंत्र मते होती आणि त्यांवर तो ठाम असे! असा ‘problem child’ हाताळणे, गुर्जनवर्गाला एकूण कठीण! मग त्याला करडी शिस्त लावण्यासाठी, जालिम उपाय सुरु केले.
शैक्षणिक वर्षाखेरीस बाजी मारली, ती मात्र बेडकाने! पोहण्यात ‘अ’, धावण्यात ‘ब’! फुटभर चढून हातभर श्रेणी मिळवण्यात त्याच्याइतका हातखंडा दुसऱ्या कुणाचा नव्हता! झाडाच्या बुंध्यावर हातभर चढल्यावर आरोह्नाचे गुण मिळायचे आणि तिथून टुन्नकण उडी मारली कि उड्डयनाचे गुण मिळायचे. (त्याच्या या उडीसमोर गुर्जनवर्गास गरुडाची झेप ‘ह्या’ वाटायची!) त्यात त्याने ‘क’ श्रेण्या मिळवल्या. अशा रितीने तो ‘सर्वकौशल्यसंपन्न’ म्हणून घोषित झाला. त्याचा सत्कार करून त्याला पारितोषकही देण्यात आले!
भटक्या आणि शिकारी कुत्र्यांना शिक्षा म्हणून नेहमी वर्गाबाहेर उभे केले जायचे. आपण नेहमीच वर्गाबाहेर असतो तर, असेच शाळेबाहेर का न पडावे, असा कल्पक विचार करून ते एक दिवस शाळेबाहेर पडले, ते कायमचे!
पण बाहेर पडताच त्यांनी आपली झुंड बनवली. झुंडीने विचार केला – फाडणे, चावे घेणे, वासावरून माग काढणे, जमीन उकरणे, पाठलाग करणे, इत्यादी आपल्या उपयोगाचे विषयच शाळेत नव्हते, तर शाळेने आपल्याकडून इतकी भरमसाठ फी घेतलीच कशाची? म्हणून मग त्यांनी ‘फी परत पायजेल’ म्हणून शाळेविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला. अर्थात, निकाल त्यांच्या विरुद्ध लागला. पण ते खचले नाहीत!
उलट, तेव्हापासून ते अधिक जोमाने झुंड बांधणीच्या कामाला लागले. थोड्याच दिवसात, त्यांनी घुशी, घुबडं आणि कोल्ह्यांच्या संगनमताने त्याच जंगलात नवीन खाजगी शाळा सुरु केली. गुणवत्तेचे सगळे मानदंड मोडीत काढून , आज ती शाळा यशस्वीपणे चालू आहे!
प्रतिक्रिया
29 May 2015 - 9:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नुकतचं तोत्तोचान वाचुन संपवलयं. रिलेट करतोय.
29 May 2015 - 10:11 pm | लालगरूड
लेख आवडला.. whatsapp वर शेअर करू शकतो का?
29 May 2015 - 10:17 pm | सस्नेह
इसापनीती आठवली..
29 May 2015 - 10:23 pm | शिव कन्या
लाल गरुड .... हो, करा शेअर.
29 May 2015 - 10:28 pm | शिव कन्या
तोतोचान आणि तिचा शिक्षक, तिची ती शाळा सगळ्यांना हवी तर आहे, पण त्यासाठी हवा तो धीर, आपल्या मुलांकडे गुंतवणूक म्हणून न पाहता, मूल/ माणूस म्हणून बघण्याची तयारी कुणाची आहे ?
29 May 2015 - 10:45 pm | एस
‘The Animal School’ पुन्हा या स्वरूपात वाचूनही आवडली. या प्रश्नावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.
29 May 2015 - 10:51 pm | जानु
सध्या शिक्षणाच्या क्षेत्रात खुपच बदल होत आहेत. बर्याच बाबत आपणही अंधारात आहोत. यावर एक वेगळा धागा असावा. नविन माहिती बाबत धन्यवाद.
2 Jun 2015 - 1:00 am | रुपी
मार्मिक लिखाण..
2 Jun 2015 - 1:09 am | श्रीरंग_जोशी
एकदम मार्मिक.
2 Jun 2015 - 4:18 am | सौन्दर्य
आपल्या पाल्याला बत्तीस कला आणि चौसष्ठ विद्या याव्यात असं वाटणाऱ्या प्रत्येक पालकासाठी एक अत्युत्तम गोष्ट.
2 Jun 2015 - 8:58 am | मुक्त विहारि
मुले आणि सुसंस्कारीत माणसे, विचार-मथंनातून आणि स्वतःची आकलन शक्ती वापरून बरेच काही आत्मसात करतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात, असा स्वानुभव आहे.
2 Jun 2015 - 9:01 am | नूतन सावंत
पालकांनी वाचली पाहिजे अशी गोष्ट.
2 Jun 2015 - 9:09 am | मुक्त विहारि
ते बिचारे मुलांचे गुण कसे वाढतील? ह्याच विचारात दंग असतात.
शास्त्र आणि गणित येणे, हेच खरे शिक्षण, असे बर्याच पालकांना वाटते.
2 Jun 2015 - 10:38 am | झकास
मी सुद्धा एक पालक आहे. आणि माझी मुले अजून पहिलीत सुद्धा पोहोचली नसल्याने मला बरंच काही वेगळं करण्याचा वाव आहे असं माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना वाटतं. म्हणजे माझ्या मुलांना marks च्या race मध्ये मी तरी ढकलू नये असं त्यांना वाटतं. आणि मला सुद्धा त्यात अयोग्य काहीच वाटत नाही.
आता एक पालक म्हणून मी फक्त त्यांच्या शालेय जीवनाचा विचार न करता साहजिकच त्यांच्या आयुष्याचा विचार करतेय. मग भारतात राहून त्यांना जर व्यवस्थित राहायचा असेल, म्हणजे आत्ता त्यांना ज्या गोष्टींची सवय आहे त्यात काही compromise न करता जगायचं असेल तर त्यांना खरंच marks च्या race मधून बाजूला होऊन चालेल का? मी IT मध्ये आहे. १० पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. तरी सुद्धा मला अजून सुद्धा दहावीचे marks विचारले जातात. माझ्या सध्याच्या क्षमता, माझा अनुभव ह्या पेक्षा जास्त महत्त्व त्या गोष्टींना आहे. मग पुढे जाऊन माझ्या मुलांच्या बाबतीत असंच होणार. गुणपत्रिका महत्त्वाची आहे हे जर मला आत्ता स्पष्ट दिसतंय तर मी कशी काय माझ्या मुलांना त्यापासून दुर ठेवणार?
आणि स्वतःचा व्यवसाय करायचा म्हटला तर त्यात किती अडचणी असतात ते इतक्या जवळच्या लोकांकडून ऐकलंय कि मी त्याय हात सुद्धा घालू इच्छित नाही. मग मुलांना शास्त्र/गणित नाही आलं आणि त्यांची आकलन शक्ती खूप छान असेल; ते अगदी street-smart असतील. पण त्यांच्या भविष्याची थोडीतरी चिंता मला पालक म्हणून वाटणारच.
त्यातून आता मध्यम मार्ग म्हणून आम्ही मुलांना दोन्ही कडे concentrate करायला सांगू पाहतो. त्यांना आता शाळेत तर marks मिळवावेत असा आमचा आग्रह; अधिक street smart बनावेत असाही प्रयत्न. म्हणजे मुलांची वाट.
ह्यातून खरंच काही मार्ग आहे का? मला काही मार्ग दिसला तर खरंच हवाय. आणि मला तो मार्ग implement करण्यासाठी वेळ आहे, तयारी आहे. प्रश्न असा आहे कि त्यासाठी ज्या गोष्टी मला आत्ता आणि त्यांना नंतर compromise कराव्या लागतील त्यासाठी मनाची तयारी कशी करावी?
2 Jun 2015 - 11:27 am | मुक्त विहारि
पैसा, प्रतिष्ठा, समाधान की रात्रीची शांत झोप?
इथे मी, माझ्या मुलांच्या बाबतीत, एक पालक म्हणून मत मांडत आहे.
पैसा ====> आज नाही तर उद्या नक्कीच येतो.येस्स्स्स्स्स्स्स १००%. मेहनत + आवड + गुरु, ह्या त्रिसुत्रीवर, पैसा विराजमान असतो.(शाळेत शिक्षक असतात, तर जगांत गुरु असतात आणि उत्तम गुरु तुमचा तुम्हालाच शोधावा लागतो.)
माझ्या ओळखीतले असंख्य जण बर्यापैकी पैसे राखून आहेत, आणि त्यापैकी अनेक जण दहावीत जेमतेम गुण मिळवलेले आहेत.पण ते सगळेच ह्या त्रिसुत्रीवर पैसे कमावतात.
प्रतिष्ठा====> तुमचे सुसंस्क्रुत मन + तुमच्या कामातील तुमची आवड + तुम्ही सुयोग्य मार्गाने मिळवत असलेला एखादा रुपया, हीच माझ्या द्रुष्टीने प्रतिष्ठा.
समाधान ====> कालच्या पेक्षा माझा आजचा दिवस अधिक उत्तम पार पडला. आज काही तरी नविन शिकलो, हेच माझे समाधान.
शांत झोप ====> आज ठरवलेली सगळी कामे व्यवस्थित पार पडली, उद्याच्या कामाची यादी तयार आहे.त्यापैकी अर्ध्या कामांची पुर्व तयारी झोपण्यापुर्वीच केलेली आहे.अचानक येणार्या कामासाठी १-२ तास हातचे राखून ठेवले आहेत.अशावेळी शांत झोप लागणारच.
मुलांच्या शालेय मार्कांत मला कधीच रस न्हवता आणि पुढे पण नाही.योग्य वेळ येताच, त्यांच्या यशाचा मार्ग, त्यांचा त्यांनाच सापडेल.
माझ्या मुलांनी कुणाकडे हात पसरण्यापेक्षा, हमालगिरी करून, पोटा-पाण्या पुरते पैसे मिळवले तरी त्यात मला, एक पालक म्हणून समाधानच आहे.
2 Jun 2015 - 11:38 am | संदीप डांगे
१० पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. तरी सुद्धा मला अजून सुद्धा दहावीचे marks विचारले जातात. माझ्या सध्याच्या क्षमता, माझा अनुभव ह्या पेक्षा जास्त महत्त्व त्या गोष्टींना आहे.
>> हे जरा पटत नाहिये.
असो.
माझ्या निरिक्षणानुसार मुलांना मार्कांच्या रेसमधे ढकलणारे पालक स्वतः फार चमक दाखवू शकलेले नसतात. त्यांच्या सीमीत अनुभव, ज्ञानानुसार त्यांना असं वाटतं की आपण अजून जास्त चांगले मार्क मिळवले असते तर इतर यशस्वी लोकांसारखे झालो असतो. ते आपल्या मुलांचं होऊ नये म्हणून आटापिटा करतात. प्रत्यक्ष आयुष्यात विविध क्षेत्रात यशस्वी लोक दिसत असतांना केवळ निवडक दोन चार क्षेत्राकडेच हमखास यश देणारे म्हणून झापडबंद पद्धतीने बघत असतात. पालकांच्या अदूरदर्शीपणा आणि हट्टाचा मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.
मुलांना मार्कांच्या रेसमधे उतरवावे की नाही याबद्दल द्विधा मनस्थिती असलेल्या पालकांना असं सांगावं वाटतंय की प्राप्त शिक्षणव्यवस्था ही मार्काधारित आहे. ही एक स्पर्धा आहे फक्त. प्रत्यक्ष जीवन नाही. या एकमात्र स्पर्धेवर जीवन अवलंबून नाही. यात मुलाने कितीही रट्टा मारून मार्क्स मिळवले तरी आयुष्यात येणार्या इतर स्पर्धा संपणार नाहीत. जगातले सगळे यशस्वी लोक याच मार्कांच्या स्पर्धेत चमकून यशस्वी झालेले नाहीत. हां आता कुणाला अॅवरेज यश मिळवायचे असेल, सुरक्षित नोकरी आयुष्य, जास्त ताणतणाव, श्रम नको असतील तर शालेय मार्क्स दाखवून आयुष्यभर नोकर (नोकरीही उद्योजकाप्रमाणे करणारे वेगळे) बनून राहायचे असेल तर मार्कांशिवाय पर्याय नाही.
शालेय मार्क्स व्यक्तीची योग्यता कधीही दाखवू शकत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. जगात फक्त वेगाने धावण्याच्याच स्पर्धा असत्या तर सचिन तेंडूलकर कधीच महान झाला नसता. किंवा क्रिकेटच खरा खेळ आहे म्हटले असते तर सायना नेहवालला कुणीच यशस्वी म्हटले नसते.
माझा सल्ला: शालेय जीवनात पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करणे, शिस्त आणि अनुशासन अंगी बाणवणे, विषय समजून घेऊन त्याबद्दल अभ्यासक्रमाबाहेरचं साहीत्य मिळवून अभ्यासणे, मार्कांच्या मागे लागतांना इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वत:शी स्पर्धा करणे हे सर्व करावे. हळूहळू स्वतःचा रुचीविषय उमगत जातो, त्यातून करीअरच्या वाटा निघत जातात. आपल्या आवडत्या विषयात आनंद आणि पैसे मिळवून देणारं काम शोधलं जातं. आयुष्य परिपूर्ण जगल्या जाऊ शकतं. आणि हे कुणासोबतही होऊ शकतं. अगदी ३५% मिळवणार्या सो कॉल्ड 'ढ' मुलासोबतही.
2 Jun 2015 - 11:57 am | मुक्त विहारि
वाक्या-वाक्याशी सहमत...
2 Jun 2015 - 1:00 pm | काळा पहाड
सचिन तेंडुलकर, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ज हे वन ऑफ केस होते. ते स्वतःच लेजंड्स होते आणि जर मायक्रोसॉफ्ट मध्ये कोणी मार्क विचारत असेल तर दुर्दैवी आहे. पण बर्याच भारतीय कंपन्या असे एच आर नोकरीला ठेवतात ज्यांची बौद्धीक क्षमता, पेटीबाहेर विचार करण्याची क्षमता आणि गुणवत्ता पारखण्याची क्षमता मर्यादित असते. माझ्या ओळखीतल्या एकानं फायनान्शियल मार्केट मधली एक अतिशय हेवा वाटावी अशी परीक्षा पास केलेली आहे, तो अशा प्रॉडक्ट वर काम करतोय ज्याचे तज्ञ इथे मिळत नाहीत आणि तो स्वतः अतिशय हुशार आहे. पण इन्फॉसिस नं त्याला बारावीला ५०% मार्क मिळाले होते म्हणून त्याचा इंटर्व्ह्यूच घेतला नाही. इन्फॉसिस च्या त्या एच आर ला त्या प्रॉडक्टचं आणि त्याचे तज्ञ किती दुर्मिळ आहेत याचं ज्ञान नसणार. त्यांच्या दृष्टीनं तो मिळाला नाही तर ६०% मार्क मिळालेला एक जावाचा रिसोअर्स तिथे टाका आणि काम भागवा असं असणार. त्यामुळे अर्थातच त्या व्यक्तीला काही फरक पडणार नाही. पण ही जनरल टेंडन्सी हे दाखवते की अत्यंत सामान्य दर्जाचं काम करणारी ही जमात एखाद्या कंपनीचं नुकसान कशा प्रकारे करू शकते.
2 Jun 2015 - 1:57 pm | संदीप डांगे
प्रस्तुत सेलीब्रीटींची नावं एक उदाहरण म्हणून दिली जातात. एकमेव म्हणून नव्हे. तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यात अशी हजारो माणसे असतात ज्यांचं जीवन शालेय मार्कांवर अवलंबून नसतं. ज्यांच्यात खरंच काही टॅलेंट असतं त्यांना 'दुसर्यांनी घेतलेल्या परिक्षांमधल्या तिसर्याने दिलेल्या मार्कांवरून चौथ्याने जज करून पाचव्याने नोकरीवर ठेवावं' अशी परिस्थिती यशस्वी होण्यापासून रोखत नसावी.
प्रस्तुत लेजंड्स लेजंड्स होते म्हणून ते यशस्वी झाले असे म्हणणे धाडसाचे आहे. माझ्या मते प्रत्येकात असे गुण असतातच. पण वेगवेगळ्या बाह्यप्रभावांना बळी पडून लोक स्वत्व गमावतात आणि मेंढरासारखे इतर लोक काय करून 'सेटल' झालेत त्याची केविलवाणी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. एकाला कठीण वाटणारे काम दुसर्याला कठीण वाटेलच असे नसते. चित्रकलेत हुशार असणारा इंजिनीअरींग ड्राइंग्समधे तोंडघशी पडेल. काही विशेष क्षमता किंवा नैसर्गिक कल नसल्याने काम करण्यास कठीण वाटते मग तेच लोक या क्षेत्रात हुशार लोकांची आवश्यकता असते असं पसरवायला सुरुवात करतात.
जे स्वतःचं वेगळेपण ओळखू शकतात, त्याला महत्त्व आणि सन्मान देऊ शकतात तेच आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून यशस्वी होतात. प्रत्येक जण अगदी बिल गेट्सच झाला पाहिजे अशी अपेक्षा नसावी. पण ते होऊ शकत नाही म्हणून मायक्रोसॉफ्ट मध्ये आयुष्य काढावे, सेटल व्हावे, निवृत्तीसाठी पैसे गोळा करावे इतकीही क्षृद्र महत्त्वाकांक्षा नसावी. जगात प्रत्येकासाठी त्याच्या क्षमतेनुसार काम आहे. पूर्ण क्षमतेने ते काम केले तर आनंद आणि पैसाही मिळतो. पण लोक तसे काम शोधण्यापेक्षा सुरक्षितता, कंफर्ट्झोन, सामाजिक मान्यता या गोष्टींना महत्त्व देतात. भारतीय आयटी याचं उत्तम उदाहरण आहे.
एखादा हुशार ऑटोमोबाईल इंजिनीअर स्वतःचं गॅरेज टाकून दणकट कमावत असेल तरी समाज एखाद्या महिंद्रा वैगेरेमधे असलेल्या ट्रेनी इंजीनीअरला जास्त मान देतो.
तुम्ही दिलेल्या उदाहरणात कम-अक्कल एचआरने केलेल्या उद्योगात एका तज्ञ माणसाची संधी गेली ती एक वन-ऑफ केस समजायला पाहिजे.
2 Jun 2015 - 3:51 pm | मुक्त विहारि
......स्वतःचं गॅरेज टाकून दणकट कमावत असेल तरी समाज एखाद्या महिंद्रा वैगेरेमधे असलेल्या ट्रेनी इंजीनीअरला जास्त मान देतो.
सहमत....
आमच्या चुलत-चुलत भावाचेच उदाहरण डोळ्यासमोर आले.
3 Jun 2015 - 12:10 pm | नाखु
कष्टाने, उत्तम नावलौकीक असलेल्या केटरींग व्यवसायाकडेही अजून फार आदराने पाहीले जात नाही.
बहीणीच्या केटरींग व्यवासायात सक्रीय हात्भार लावताना
अनुभव आलेला भाऊ नाखुस
2 Jun 2015 - 10:50 am | खटपट्या
खूपच उद्बोधक कथा....
2 Jun 2015 - 11:03 am | अजया
अतिशय मार्मिक कथा.
3 Jun 2015 - 1:51 am | पि.के.
सन्दिप & मुवि..........सहमत्...मध्यम वर्गीय लोकान्ची गुण आधरित मनसिकता बदल्न्यास वेळ् लागेल.
3 Jun 2015 - 12:11 pm | सुबोध खरे
मध्यम वर्गीय लोकान्ची गुण आधरित मानसिकता बदल्न्यास वेळ् लागेल.
एक महत्त्वाची गोष्ट -- आजही दहावी बारावी किंवा स्पर्धा परीक्षेत गुण मिळवून चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला तर वयाच्या २२-२३ ला मूल चांगली नोकरी मिळवून लवकर स्थिर स्थावर ( "सेटल" म्हणायचं) होतं. त्यामुळे आयुष्यभर कष्ट काढून बरी परिस्थिती मध्ये आलेल्या मध्यमवर्गीय पालकांना पन्नाशीच्या आसपास "मानसिक" स्थैर्य मिळते हि वस्तुस्थिती डोळ्या आड करता येणार नाही. आणि हा राजमार्ग आहे हि वस्तुस्थिती आपण नजरेआड करू शकत नाही. मार्कांना महत्त्व नाही हे म्हणणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या मुलांना चांगले गुण मिळालेले नसतात हिह एक वस्तुस्थिती. ( यात मीही एक आहे) माझ्या मुलाला आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला असता तर मला काय तो नको होता काय?
असो. गुण हे व्यावसायिक यशात फार तर १० % सहभागी असतात हे वाक्य मी फार पूर्वी पासून सांगत आलो आहे. आणी हे वाक्य बोलण्यासाठी मी आंबट द्राक्षे म्हणून बोलत नसून वस्तुस्थिती म्हणून बोलत आहे. ( लौकिकार्थाने माझे व्यावसायिक यश बर्यापैकी आहे).
अत्यंत हुशार पण एकलकोंडी असणारी माणसे पुढे काय करतात या प्रश्नच शोध घेताना मला असे आढळले कि हि माणसे शिक्षण संस्था मध्ये प्राध्यापकी करताना किंवा संशोधन क्षेत्रात अनभिज्ञ असे राहून काम करीत असतात. त्यांच्या हुशारी मुळे त्यांना जे मिळायला हवे होते (उदा भरपूर पैसा नावलौकिक प्रसिद्धी किंवा बर्याच वेळेस त्यांना स्वतःला हवे) ते मिळवण्यात अपयश येते. अशी अनेक माणसे मला आय आय टी मध्ये किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकी करताना आढळली.किंवा पैश्यासाठी कोचिंग क्लासेस मध्ये रतीब टाकताना आढळली. आणि या लोकांना त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या गोष्टींची मंजुरी मिळवताना त्यांच्या पेक्षा अर्ध्या लायकीच्या लोकांची मनधरणी करायला लागते हेही पाहिले. या सर्व अनुभवांती माझे मत असे बनले आहे कि केवळ पुस्तकी किंवा अध्ययन विषयक ( academic ) यश यापेक्षा व्यावसायिक यश हे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना सुरुवातीपासून अशा विषयांचे व्यवहार ज्ञान देणे आवश्यक आहे. मूल "विद्यार्थी" होणे जास्त आवश्यक आहे. याचा अर्थ मुलाने "परीक्षार्थी" होऊच नये असा नाही. परीक्षेत यश जरूर मिळवावे त्याने मार्ग जास्त सुकर होतो हि वस्तुस्थिती.
पण ते मिळाले नाही तर मी माझ्या मित्रांमध्ये मागे पडतो हि खंत बाळगणारे पालक आपण होऊ नये हि आपण काळजी घेतली पाहिजे.
3 Jun 2015 - 1:32 pm | संदीप डांगे
अगदी योग्य प्रतिसाद.
माझेही मत असेच आहे. शाळेत असतांना विद्यार्थ्याने मार्क मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावीच. कारण मिळवलेले मार्क्स नाही तर ती मेहनत करण्याची प्रवृत्ती आयुष्यात यशस्वी होण्याचे गमक असते. शालेय जीवनात मार्क्सना महत्त्व दिले नाही तर आळशीपणा, बेफिकिरवृत्ती, वेळकाढूपणा, बेजबाबदारपणा अशा घातक वृत्ती स्वभावात येऊ शकतात. त्यामुळे अभ्यासाचा रोख मार्कांपेक्षा मेहनत करण्याची पद्धत, सातत्य आणि दृष्टीकोन यावर असावा. बोनस म्हणून चांगले मार्क्स मिळतात ते वेगळे.
3 Jun 2015 - 1:45 pm | अविनाश पांढरकर
मस्त चालु आहे चर्चा!
3 Jun 2015 - 3:43 pm | तेजाभाई
प्रत्येक पालकाने हे वाचायला पाहिजे .
3 Jun 2015 - 6:20 pm | अद्द्या
मला असलेल्या अत्यंत कमी अनुभवावरून हे सांगतोय .
काहीही झालं तरी एखादी (मग ती कोणतीही असो ) डिग्री असावीच . मुलाला / मुलीला आवडत्या साईड ची एक डिग्री तरी मिळवावीच , त्यानंतर स्पेशलैजेशन कोर्स /सर्तीफिकेट /मास्टर्स करू शकतोच . भारतातल्या एखाद्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी हवी असेल तर वरील गोष्टी हव्यातच , नाही तर वर काही जणांनी सांगितल्या प्रमाणे अनुभव येतात.
हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा , इतकेच मार्क हवेत आणि इतकाच नंबर हवा ह्या फंदात, मुलाकडे लक्ष असावं पालक म्हणून. पण त्याच्या मागे हात धुवून नका लागू , त्याला / तिला खेळू द्या , चित्रकला गाणी किंवा एखादं वाद्य आवडत असल्यास ते शिकू द्या , पण बाजूचा अभ्यास सोडून इतर ५ गोष्टीत चांगला आहे म्हणून माझा मुलगा /मुलगी ७ गोष्टीत चांगला असावा हा अट्टाहास नको .
3 Jun 2015 - 8:33 pm | विवेकपटाईत
आजच्या (१५ वी पर्यंतचा) ९०% शिक्षणाचा व्यवहारी जगात काहीच फायदा होत नाही. पण बदल कोण करणार हाच प्रश्न आहे
3 Jun 2015 - 9:50 pm | शिव कन्या
वाचून चर्चेत सहभागी होत आहात त्याबद्दल आभार. काही कळीचे मुद्दे संदीप, आद्या, सुबोध, झकास, काळा पहाड आणि मंडळींनी मांडलेत. या एकूण व्यवस्थेत आपण आपल्या पाल्यावर आणखी काही भर टाकून, आपल्या असल्या-नसल्या अपेक्षा त्याच्यावर/ तिच्यावर लादत नाही ना, याचा जरा त्रयस्थपणे विचार झाला तर मुलांचे जगणे खरोखर सुखावह होईल.
4 Jun 2015 - 1:20 am | गणेशा
खुप उशीरा वाचला हा धागा.. एकदम मस्त आहे.. आवडला.. नक्की वाचावा असा..
6 Nov 2015 - 5:12 pm | सुमीत भातखंडे
विषय. आजच्या तारखेला भारताततरी मार्कशीट हा प्रकार महत्व राखून आहे.
अनेक मा.तं. कंपन्यांमधे अग्रीगेट फर्स्ट क्लास ही पूर्वअट असते. काही ठिकाणी तर दहावी/बारावीची टक्केवारी सुद्धा पकडली जाते.