तो तसा ऊंचीने बेताचाच,पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचा.त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात शिकणारी मुलं त्याच्याकडे शंका घेऊन येत.भौतिकशास्त्र आणि गणित हे त्याचे आवडते विषय....
तो तसा गरीब घराण्यातला,पण घराणं सुशिक्षीतांच होतं,त्याचे वडील व्यवसायाने शिक्षक होते..
त्याच्या वर्गातील सर्वच मुले कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक होती.त्यातल्या त्यात बुद्धीमान मुलं ही IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत.आपल्या मित्रांबरोबर हयानेही IIT च्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला.ह्या मुलांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं किंवा फ़ारशी पुस्तकही नव्हती त्यांच्या जवळ.म्हैसूर गावातल्या एका दगडी मंडपाखाली असलेल्या सावलीत ही सर्व मुलं बसायची अभ्यास करतं.सगळ्या मुलांना मार्गदर्शन करण्याचा काम्ही ह्याचच होतं.सगळी मुलं प्रश्न्पत्रिकेमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत ;पण ते सर्व प्रश्न हा मात्र लीलया सोडवून द्यायचा! कधीतरी तो एकटाच झाडाच्या सावलीत बसून IIT त शिक्षण घेण्याची स्वप्न बघायचा.त्या वेळी तो फ़क्त सोळा वर्षाचा होता.
प्रवेश परीक्षेचा दिवस,तो नातेवाईकांकडे बंगलोरला आला होता.परीक्षा संपल्यावर नातेवाईकांनी त्याला विचारलं ,"काय रे,कशी गेली परीक्षा ??"
त्यावर तो म्हणाला "ठीक होती.."
यथावकाश त्या प्रवेशपरीक्षेचा निकाल लागला.त्याने त्यात सतरावा क्रमांक मिळवला होता.कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण !!!! त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता.तो आपल्या वडीलांकडे गेला.ते वर्तमानपत्र वाचत बसले होते.
"अण्णा,मी सतरावा आलो."
"अरे वा ! फ़ारच छान..पोरा"
"मला IIT त जायचयं.."
त्याचे वडील पेपर वाचता वाचता थांबले,त्यांनी मान वर केली आणि जड स्वरात म्हणाले,
"तू खूप बुद्धीमान आहेस,पोरा.तुला आपली आर्थिक परिस्थीती ठाऊकच आहे,मला पाच मुलींची लग्न करायची आहेत आणि तीन मुलांची शिक्षणं.माझी साधीशी नोकरी...तुला IIT तं पाठवणं मला नाही झेपायचं.तू म्हैसूरमध्ये राहूनच शिकायचं ते शिक ..."
आपल्या इतक्या बुद्धीमान मुलाला ह्या कारणासाठी नाही म्हणणं त्यांना फ़ारच जड गेलं,पण आपल्या मुलाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणं त्यांना भाग होतं...पण त्या काळी परिस्थीतीच अशी होती. त्या काळात मोठं कुटूंब आणि कमावता माणूस एकच असं चित्र समाजात सर्वत्र दिसून येई.
सोळ्या सतरा वर्षाच्या कोवळ्या मुलाची निराशा झाली.त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.IITचं स्वप्न हातात गवसेल ,असं वाटत असतानाच निसटून ते दूर गेलं.त्याचं ह्रदय वेदनेनं भरून गेलं...
अखेर तो दिवस उजाडला.त्याचे वर्गमित्र मद्रासला निघाले .तो आपल्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा निरोप घ्यायला रेल्वे स्टेशन वर गेला.सगळ्यांच्याच आनंदाला नुसतं उधाण आलं होतं...नवीन हॉस्टेल मध्ये रहाणं...नवीन अभ्यासक्रम.पण ह्या सर्वांशी त्याचा संबंध नव्हता.तो तिथे शांतपणे ऊभा होता.कोणातरी एकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तो म्हणाला ."तुला खरं तर प्रवेश मिळायला हवा होता.."
त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही.त्याच्या मनात राग ,द्वेष अशा भावना नव्हत्या,तो मनात स्वत:शीच विचार करत होता,"IIT मध्ये शिकून बाहेर पडलेली मुलं आयुष्यात यश मिळवतातं हे खरय.पण खरं तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून त्याला वेगळं वळण लावणं हे खरं तर कोणत्याही संस्थेच्या हातात नसून आपल्या हातात असतं..."
त्यानंतर त्याने अपार मेहनत केली.आपलं सर्व लक्ष फ़क्त ह्या गोष्टीवरच केंद्रीत केलं.आपल्याअ खाजगी आयुष्याची,आरामाची,चैनीची कशाचीही पर्वा नव्हती त्याला.त्याने आपली धनसंपत्ती इतरांच्या उपयोगात आणली.आयुष्यात त्याला वर येण्यासाठी जात ,धर्म ,राजकीय हितसंबंध इत्यादी गोष्टींची कधीच गरज भासली नाही.
एका शाळाशिक्षकाच्या मुलाने आपल्या देशबांधवांना एक गोष्ट दाखवून दिली,'माणसाला कायदेशीर मार्गाने आणि नितीधर्मांचं पालन करून संपत्ती मिळवण शक्य असतं.त्याने आपल्यासारख्याच सुस्वभावी आणि मेहनती लोकांना गोळा करून त्यांच्यासमेवत काम केलं..
भारतातील सॉफ़्टवेअर उद्योगाचा तो प्रणेता बनला.त्याने येथे इन्फ़रमेशन टेक्नोलॉजीची लाट आणली.आज तो साधेपणाचे,उत्कृष्ट्तेचे आणी न्यायतेचे प्रतीक बनला आहे.
'बुद्धीमत्तेची शक्ती आणि नीतिमूल्यांची प्रेरणा ' असं त्याच घोषवाक्य आहे.
हा मुलगा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून Infosys कंपनीचे संस्थापक आणि आत्ताचे संचालक , श्री नारायण मूर्ती....
पुस्तक--गोष्टी माणसांच्या
मूळ लेखिका -- सूधा मूर्ती
अनुवाद-- लीन सोहोनी
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 6:38 pm | मनीषा
inspiring आहे . नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती हे दोघेही स्व कर्तुत्वाने यशाच्या शिखरावर पोचले पण तरी सुद्धा इतके नम्र आणि निगर्वी आहेत .. खरोखरीची महान माणसे
सुधा मुर्तीं च Wise and Otherwise सुद्धा एक वाचनीय पुस्तक आहे .
24 Oct 2008 - 6:57 pm | चतुरंग
आपण दिलेली माहीती चांगली आहे परंतु हे मूळ पुस्तक जसेच्या तसे उतरवणे मिपाच्या धोरणात बसत नाही!
मूळ लेखासंबंधी तुमचे काही स्वतःचे विचार असतील, टिप्पणी असेल तर ती इथे देणे जास्त योग्य आहे.
पुढच्या वेळी लेखन करताना कृपया ही गोष्ट लक्षात घेऊन लिहा अन्यथा नाईलाजाने लेखन अप्रकाशित करावे लागेल!
धन्यवाद.
चतुरंग
24 Oct 2008 - 7:01 pm | विसोबा खेचर
मिपाचे माननीय संपादक चतुरंग यांच्या सूचनेची कोतवालांनी योग्य ती नोंद घ्यावी..
आपल्याबद्दल कटपेस्ट साहित्य मिपावर प्रकाशित करण्याबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत..
असो,
तात्या.
24 Oct 2008 - 9:20 pm | प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/