माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच. घाल घाल शिव्या घातल्या आणि असभ्य भाषेत 'आता इथेच उत्सर्जनही करून टाक' अशा आशयाचा डायलॉग मारला. तो एकदम गांगरलाच. तोंडातल्या तोंडात 'तुम्हारा क्या जाता है, सब फेकते है' असं काहीबाही बोलू लागला. आमचा वाद वाढायला सुरुवात झाली तसा त्याचा आवाज सुद्धा वाढायला लागला. तिथेच साध्या कपड्यात एक पोलीस बसला होता. त्याने त्याला गप्प केलं.
या प्रकारानंतर जेव्हा माझं घरी गेल्यावर डोकं शांत झालं, तेव्हा मी या गोष्टीचा खूप विचार केला. आज माझं डोकं ताळ्यावर नव्हतं, म्हणून दुस-या कोणाचा तरी राग मी त्याच्यावर काढला. एरवी माझं डोकं ताळ्यावर असताना मी अशी समज कोणालाही का देत नाही? अगदीच अरेरावीच्या भाषेत नाही, पण सौम्य आणि समजूतीच्या भाषेत स्वच्छतेचं महत्त्व लोकांना सांगायला काय हरकत आहे?
माझ्या मित्र-मैत्रीणींपैकी कोणी कचरा खाली टाकला की मी त्यांना तिथेच झापायला सुरुवात करतो आणि त्यांनी फेकलेला कचरा त्यांनाच उचलायला लावतो. जर त्यांनी नाहीच उचलला, तर त्यांना खजील करण्यासाठी मी तो कचरा उचलून कचरापेटीत टाकून येतो. बहुतांशी वेळा खजील होणं सोडा, पण निर्लज्जपणे माझी टर उडवली जाते. 'माझाच कचरा का उचललास, तो बघ तिकडे सुद्धा कचरा पडलाय, तो सुद्धा उचल, अख्खा रस्ता साफ कर.' मी त्यांना समजवायचा निष्फळ प्रयत्न करतो, की एखाद्याने फेकलेला कचरा त्याच्या समोर उचलल्याने त्याच्या मानसिकतेत फरक पडेल अशी अपेक्षा असते, त्याच्या अपरोक्ष तो उचलल्याने कचरा फेकणा-याच्या मनात काय फरक पडणार आहे? त्याला समज कशी येणार? पण ही साधी गोष्ट काही त्यांच्या डोचक्यात शिरत नाही. खिल्ली उडवत बसतात.
जर माझ्या ओळखीच्या मंडळींना समजावताना नाकी नऊ येतात, तर अनोळखी लोकांना कितीही गोड शब्दांत सांगितलं, तरी काय परिणाम होणार, अशी शंका मनात येते, आणि मग संकोचापोटी मी कोणालाही स्वच्छतेचं महत्त्व सांगण्याच्या फंदात पडत नाही.
याचा मी कचरा फेकणा-याच्या दृष्टीने विचार करून पाहिला. आपल्या ओळखीच्या माणसाने आपल्याला समज द्यायचा प्रयत्न केला की 'गप रे' असं म्हणून आपल्याला दुर्लक्ष करता येऊ शकतं. पण अनोळखी माणसाशी बोलताना तो ज्या आवेशाने बोलतोय, त्याच किंवा त्याच्यापेक्षा शक्यतो कमी आवेशात बोलण्याचा शिष्टाचार पाळावा लागतो. निदान, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणा-या 'हुच्चभ्रू' लोकांनी तरी तो पाळावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी वाटतं, की ओळखीच्या माणसांपेक्षा अनोळखी लोकांना समजावणं जास्त सोपं आणि यशस्वी होऊ शकतं. पण ही समोर दिसणारी, कचरा फेकणारी व्यक्ती हे शिष्टाचार पाळणारी असेलच, असा आडाखा तरी कशावरून बांधायचा? वर्णावरून? कपड्यांवरून? वावरावरून? कशावरून?
कधीकधी मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. आपल्या भारत देशाच्या महान, प्राचीन अशा संस्कृतीचे आपण मारे गोडवे गात असतो. पाश्चिमात्य देशांतला, युरोप-अमेरिकेतला सांस्कृतिक दर्जा आपल्या मानाने तसा ब-यापैकी "निसर्गाच्या जवळचा" वाटतो मला. कुटुंबव्यवस्थेच्या बाबतीत तर आपण नक्कीच चांगले आहोत त्यांच्यापेक्षा. म्हणजे मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याकडे जास्त वाव आहे. असं असूनही त्या देशांतली सार्वजनिक स्वच्छता आपल्या मानाने एवढी चांगली कशी? आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छतेबाबत संस्कार का होत नाहीत? आपली सुसंस्कृत विचारसरणी, मानसिकता, एवढी गलिच्छ कशी? आणि जर पूर्वी कोणी एके काळी स्वच्छतेचं महत्त्व आपल्याही देशात सगळ्यांच्या आचरणात होतं, तर मग ते संस्कार पुढच्या पिढ्यांना देताना ही मंडळी कुठे आणि कशामुळे कमी पडली? दारिद्र्य? शिक्षणाचा अभाव? कंटाळलो या नेहमीच्या कारणांना. कुठलीही सामाजिक समस्या असो, फिरून फिरून शेवटी गरिबी आणि अशिक्षण यांच्याच उंबरठ्यांवर येऊन ठेचकाळते.
पण मध्यमवर्ग किंवा श्रीमंत वर्ग अशिक्षित आहे का? गरीब आहे का? की त्यांचे पूर्वज अडाणी आणि गरीब होते, त्यांच्यात संस्कार करण्यात कसर राहिली, असं म्हणून गप्प बसायचं आपण? गरीब परिस्थितीत वाढून शिक्षण आत्मसात केलंत, धनसंपत्ती कमवलीत, स्वतःचं सगळं चांगलं चांगलं, छान-छान केलंत, मग आपल्या आजुबाजुचा परिसरही छानछान असावा, असं कोणालाच वाटू नये? लाज वाटते अशा समाजात आपण राहतो याची.
राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही इथे असताना इथली परिस्थिती बदलण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केलात का? तिथे सगळं चांगलं आहे कारण तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या मानसिकतेत बदलत्या काळानुसार योग्य तो बदल घडवून आणून परिस्थिती बदलण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांचा इतरांनी आदर केला. आपल्याकडे स्वतः कोणाला प्रयत्न करायला नको, आणि दुसरा करतोय तर त्याला तो धड करू द्यायला नको, अशी विकृत प्रवृत्ती आहे(आणि हे मी परदेशांत न जाता, किंवा तिथे जाण्याचा कुठलाही हेतू मनात न बाळगता म्हणतोय बरं का). ही प्रवृत्ती बदलायला हवी. आणि ती देशाला रामराम ठोकून बदलता येणार नाही. इथे राहून प्रयत्न करायला हवेत, लोकांना बोलूदेत काय हवं ते. माझ्या व्यक्तिगत पातळीवर सांगायचं तर माझ्या परीने मी प्रयत्न करत आलोय, करत राहणार आहे. मी सार्वजनिक स्वच्छतेची सगळी तत्वं पाळतो, त्यामुळे मला दुस-यांना समज देण्याचा नैतिक अधिकार आहे. हा अधिकार इतरांनीही लवकरात लवकर मिळवावा, आणि एके दिवशी तो अधिकार बजावायची वेळच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, या आशेला मनात बाळगून मी हे लेखन थांबवतो.
प्रतिक्रिया
4 Aug 2014 - 4:28 pm | प्रकाश घाटपांडे
याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी. आपण प्रबोधनाच फुगा कष्टाने फुगवायचा अन कुणीतरी त्याला फक्त टाचणी लावयची. प्रबोधन व शिक्षा या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने उपाययोजना हवी.मला तर हे भाबडे स्वप्न वाटते.
4 Aug 2014 - 4:52 pm | सविता००१
लोकल मधे तर हा अनुभव जवळ जवळ दररोज येतो. आपण सांगायला गेलो तर व्हीलन ठरतो चक्क! परवा एक मुलगी शीच पर्समधले नको असलेले कागद, रॅपर्स आणि काय काय खिडकीतून बाहेर टाकत होती. तिच्याकडे पाहिलं तर म्हणाली की क्या हुआ? बाहर फेक रही हू. मग सरळ म्हणाले- सब कचरा प्लास्टिक का है! जब वॉटर क्लॉगिंग होगा तब आप जैसे लोगों की वजह से हम सबको भुगतना पडेगा! तर म्हणे सब ऐसाही करते है! काय म्हणणार? जर सीट्खाली कुणी कचरा टाकायला लागलं तर मात्र उचलायलाच लावते मी. आणि बहुतेक वेळा इतर जणीही येतात माझ्याबरोबर. पण एकूण चित्र निराशाजनकच आहे
4 Aug 2014 - 5:00 pm | यशोधरा
लेख आवडला.
4 Aug 2014 - 5:22 pm | स्वप्नांची राणी
ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही हे ईतरांना सांगता त्याच नैतिक अधिकाराने एखाद्या परदेशात राहुन आलेल्या / राहणार्या व्यक्तीला हे सांगण्याचा अधिकार का नाही? 'तुम्ही परदेशात राहणारे लोकचं ईथे येउन वाहतुकीचे नियम मोडता किंवा तिकडे बरे शिक्षेच्या (मराठीतली) धाकानी थुंकत नाही, ईथे आल्याबरोबर थुंकता ई.ई.' स्विपींग स्टेटमेंट्स जसे केले जातात तसाच सूर शेवट्च्या पॅराचा वाटतोय. बाकी लेख खूप कळकळीनी लिहिलाय हे जाणवलं.
परदेशात जाण्यापुर्वी ३५ वर्षे ईथेच होते. तेंव्हा या विषयावर अगदी आम्च्या सोसायटीपासुन प्रयत्न केलाय. अगदी बेसिक गोष्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. त्यासाठी आधी '२-२ कचरा बादल्या कोण ठेवणार? फाल्तु खर्च..' ई. ऐकले म्हणुन पदरमोड करुन घरटी एक एक्स्ट्रा कचरा बादली आणुन दिली. अपेक्षा ईतकीच होती की ओल्या कचर्याच्या बादलिच्या तळाशी वर्तमानपत्राचा एक तुकडा लावावा जेणेकरुन कचरा नेणारीला पण सोयीचे होइल. हाईट म्हणजे त्यावर पण 'रद्दीचे पैसे बुडतायेत..' असली कारणे दिली गेली. कसाबसा हा प्रकल्प लोकांच्या गळी उतरवण्यात तब्बल ५ महिने यशस्वी झालो. पण हाय रे दैवा ...परदेशात गेलो आणि सुट्टीवर आले होते तेंव्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. आणि आता परदेशस्थ झालामुळे काही बोलण्याचा अधिकार मी गमावून बसले होते.
'राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा..' ईतकच सांगते की ईथे लाज वाटते म्हणुन परदेशी जाणं ईतक सोप्प नहिये हो....
माफ करा..पण या फोरम ला देशी-परदेशी असं क्षुद्र वळण देण्याची ईच्छा नाहिये. आपल्या एकूण 1,236,344,631 लोकसंख्येपैकी सुमारे फक्त २५,०००,००० लोकं परदेश्स्थ भारतिय आहेत. ईतकेच ध्यानात घ्यावे.
4 Aug 2014 - 5:25 pm | यसवायजी
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता. पण...
राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?
याचा कडक निषेढ.
बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही.
अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.
4 Aug 2014 - 5:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य बोललास.ह्यांचे एक मित्र युरोपचा दौरा करून आले होते. तेथे प्रत्येक स्टेशनावर्,स्टेशनाबाहेर कचर्याचे डबे योग्य अंतरावर ठिकठिकाणी ठेवले होते.गर्दीच्या ठिकाणी, शॉपिंग मॉलच्या बाहेर्,आतही तीच परिस्थिती.
रस्त्यावर कचरा टाकू नका सांगणे ठीक पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको?
पान खाणे ही आपली परंपरा पण पानाच्या गादीबाहेर थुंकण्याची व्यवस्था नसेल तर लोक थुंकणारच ना? थुंकू नयेत म्हणून गुटखा,पानमसाल्यावर बंदी घालण्याची हिंमत आहे? तर ती ही नाही.
तो दाणे खाणारा कुणी होता, त्या डब्यात कचरा टाकायची व्यवस्था होती? की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्याचा डबा शोधत?
4 Aug 2014 - 5:54 pm | वडापाव
हो बॅगेतच ठेवाव्यात
4 Aug 2014 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्याचा डबा शोधत?
अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही.
कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही.
हा प्रश्न भारतात विचारणार्यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)
4 Aug 2014 - 7:17 pm | यसवायजी
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको?
प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची.
एक उदा. बघा.
न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले.
मजा बघा..
फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.
4 Aug 2014 - 7:24 pm | रेवती
भयानक सहमत. आधी आधी व्यवस्थाही तशीच ठेवण्याचा विमान व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो हो, नंतर लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर ते दुर्लक्ष करायला लागतात, हळूहळू सर्व्हीसवर परिणाम झाल्याच्या बोंबा लोकांकडून ऐकायला येतात पण काय करणार? वेळेत विमान सुटले आणि सगळे वेळेत झाले तर ठीक पण दोनेकवेळा काही अपरिहार्य कारणाने (हवामान) विमान जेंव्ह दुसर्या तळावर उतरवण्याची वेळ आली तेंव्हा या कचराकुंडीत बसणे असह्य झाल्याची चिडचिड चालली होती. आपणच कचरा करायचा व आपणच चिडायचे याला कोण काय करणार?
4 Aug 2014 - 5:59 pm | बॅटमॅन
ऑफ कोर्स अधिकार आहे. परदेशातल्यांनी बोलायचं काम नै म्हण्णारी लोकं तद्दन यूसलेस असतात. स्वतः कै करायचंही नै अन इतरांनी सांगितलेलं ऐकायचंही नाही. बरं हे इतर म्हंजे कुणी परदेशातले नव्हेत, हिकडचेच थोड्या वर्षांपूर्वी तिकडं गेलेले लोक. ते परके होतीलही कदाचित काही शे वर्षांनी. पण आत्ता तरी ते आपलेच आहेत. उगा फुकटचा माज आहे झालं.
4 Aug 2014 - 5:35 pm | कवितानागेश
आपण जिथे रहातो तो परिसर "आपला" समजत नाही, हा प्रॉब्लेम असावा.
4 Aug 2014 - 6:38 pm | स्वप्नांची राणी
+१ माउ!! 'आपला' समजलं तर स्वच्छता ई. ची काही नैतिक जबाबदारी येत असावी. 'आपल्या बापाचा...' समजलं तर "कोई क्या कर लेगा.."
4 Aug 2014 - 5:50 pm | वडापाव
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता. सरसकटीकरणाचा उद्देश नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खुपायला नको. आणि ट्रेनमध्ये कचरापेटी नाही म्हणून कचरा वाटेल तिथे टाकायची काय गरज? खिसा नावाची गोष्ट असते कपड्यांना. घरी घेऊन जावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा.
4 Aug 2014 - 5:57 pm | बॅटमॅन
स्वदेशातले दांभिक का बरे वगळलेत? दांभिक नामक जमात पुण्यभू मातृभूमध्ये अस्तित्वातच नाही असा नोबेलप्राप्त शोध तर नै ना ओ लावलात?
4 Aug 2014 - 6:02 pm | वडापाव
उर्वरित लेख.
4 Aug 2014 - 5:55 pm | राही
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात.
१)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.
4 Aug 2014 - 6:03 pm | सूड
ह्म्म!!
4 Aug 2014 - 6:10 pm | वडापाव
बरोबर आहे. पण कोणी कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसलं की डोकं फिरतं. शक्य तितक्या चांगल्या भाषेत सांगतो. नेहमी जमतंच असं नाही.
4 Aug 2014 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
शांतपणे "शिकलेले दिसता. मग असे का केलेत?" असे विचारतो. ९०% लोक खजील होतात. पण त्यातले १०% लोकच कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. उरलेले ८०% दुसर्या वेळेस तसे करणार नाहित असा विचार करून संघर्ष ताळतो.
पण जे १० टक्के उद्दामपणा दाखवतात त्यांना चार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने "अशिक्षित" आणि "संस्कृतीहीन (uncivilised, antisocial)" असल्याचे सांगतो.
4 Aug 2014 - 6:42 pm | रेवती
हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?
हे वगळता बाकी लेख आवडला. लै बोलून झालय आधीच! जाऊ दे! जुने धागे बघावेत. खोदकाम करावे लागेल पण सापडतील. त्यावरील पूर्वीच्या सदस्यांची (त्यात मीही आलेच) वादावादी वगैरे वाचायला मिळेल. बराच शब्दकचरा झाला होता! ;)
4 Aug 2014 - 7:04 pm | यसवायजी
वरच्या लेखात आणी परवाच्याच या लेखात एक साम्य आहे. जरी उद्देश चांगला असला तरी ही 'मास'साठी दिलेली भाषणे वाटतात. परदेशी जाणार्यांना, मॉलमध्ये फिरणार्यांना, एसीत बसणार्यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो.
पण कंट्रोल उदय कंट्रोल..
(नॉन्-एशीतला,देशी,ब्लू कॉलर कामगार)- SYG
4 Aug 2014 - 7:52 pm | सूड
>>परदेशी जाणार्यांना, मॉलमध्ये फिरणार्यांना, एसीत बसणार्यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो
काही अंशी का होईना, सहमत !!
4 Aug 2014 - 8:05 pm | मराठे
एक दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या स्काऊटची काही ग्रूप-अॅक्टीविटी होती म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की, प्रत्येक मुलाला पिशवी, हातमोजे देऊन शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा गोळा करणार होते. हे कळल्यावर दोन तीन भारतीय पालक मुलाला घेऊन परत गेले! मुलं आनंदाने एकत्र काम करत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याकडे असतो एवढा कचरा इथे नसतो हे पण खरं म्हणा.
(ही गोष्ट गंमत म्हणून घरी आई बाबांकडे फोन केला तेव्हा बोललो तेव्हा नातवाला 'असलं' काम करायला लावल्याबद्धल त्यांनी मलाच झाप झाप झापलं.)
5 Aug 2014 - 1:59 am | प्रभाकर पेठकर
मला वाटतं मोठ्ठा सामाजिक बदल घडविताना २० वर्षांवरील लोकांना लक्ष्य करण्याऐवजी लहान मुलांना लक्ष्य करावे. त्यांना 'घडवावे'. मातीचे काठ ओले असताना वळविता येतात तद्वत ह्या मुलांवर योग्य ते संस्कार केले तर भविष्यात 'चांगले' संस्कार करणारे पालक तयार होतील आणि सामाजिक बदलाचे सुपरिणाम दिसू लागतील. प्रत्येकाने स्वतः बरोबरच आपल्या मुलांवर असे प्रत्यक्ष कृतीचे संस्कार करावेत आणि सुज्ञ समाजाचे स्वप्न साकार होताना पाहावे.
परदेशात गेल्यावर अनेक बाबतीतला संस्कृतीतला 'वेगळेपणा' दिसायला आणि जाणवायला लागतो. अप्रत्यक्षरित्या आपले प्रबोधनच होते. भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्या लोकांची उदासिनता आपल्याला सलत राहते. आपण स्वच्छतेचे (नव्याने शिकलेले नियम) पाळतोच पण इतरत्र दिसण्यार्या चित्रावर भाष्य करून लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांना विरोध करून, त्यांचा पाणउतारा करून आपण समाज प्रबोधन करू इच्छिणार्या 'शिक्षकां'नाच समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे होईल. भारतात राहणारे आणि परदेशातून परतलेले भारतिय ह्या सर्वांनीच पुढाकार घेऊन ही समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे सुशिक्षित/अशिक्षित सर्वच जणं देवस्थानांच्या पदयात्राकाढून रस्त्यांवर कचरा आणि नदीकाठी मलमुत्र विसर्जन करतात. का? तर म्हणे त्याने (पदयात्रेने) आत्मिक समाधान मिळतं. अत्मिक समाधान आणि इच्छाशक्तीत वाढ करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? ह्याचा विचार करावा. आणि खरोखर हा एकच मार्ग असेल तर वरील अस्वच्छता कशी टाळता येईल ह्याचा विचार करावा.
त्याच बरोबर पैसे भरून वापरायची स्वच्छतागृहे सर्वत्र असावीत. ते नगरपालिका/परिषदांनी उपलब्ध करून द्यावे. हि गोष्ट अगदी खरी आहे की परदेशात (युरोप-अमेरिकेत. त्यालाच आपण परदेश मानतो आणि संबोधितो) ठिकठिकाणी अगदी स्वच्छ स्वच्छ्तागृहे असतात. ठिकठिकाणी कचर्याच्या पेट्या असतात. अगदी रेल्वेतही पाहिल्या आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी, जसे बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बाग-बगिचे इत्यादी इत्यादी, सफाई कामगार 'काम करीत' फिरत असतात. जनता आणि प्रशासन दोघांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे.
मुंबईतली सुलभ शौचालये त्या मानाने बरी असतात. पुण्यात जी सार्वजनिक मुतारी नांवाची गोष्ट असते त्याच्या १० फुटांच्या परिसरातही पाऊल ठेवता येत नाही. अगदी अडलेल्या माणसाने काय करायचे? शेवटी नाईलाजाने त्यालाही कुठेतरी उभ्या केलेल्या ट्रकच्या मागे जाऊन कार्यभाग अक्षरशः 'उरकावा' लागतो. हल्ली जरा बरेच मॉल्स झाल्याने तिथली स्वच्छतागृहे तरी बरी असतात असा अनुभव आहे. पुण्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कधी पाहिली नव्हती. पण त्यांची अवस्थाही (बाहेरुनच) पुरुष स्वच्छतागृहांपेक्षा कांही वेगळी दिसत नाही.
तात्पर्य, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा (त्या साठी स्वतः चांगले वागा) आणि प्रशासनालाही सोयी पुरवायला भाग पाडा.
प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर सरकार बंदी घालते. म्हणजे जनतेने अमुकएक मायक्रॉन खालील पिशव्या वापरू नयेत नाहितर १०००/- रुपये दंड वगैरे घोषित करतात. अरे पण त्याच्या निर्मितीवरच का बंधन घालीत नाहीत? गुटखा, तंबाखू, पान ह्याच्या निर्मितीवरच बंदी का आणित नाहीत? इथे मस्कतमध्ये गुटखा, तंबाखू, पान ह्यावर बंदी आहे. चोरून मिळतात ह्या गोष्टी पण पकडले गेल्यास सरळ तुरुंगवास असल्याकारणाने चोरून खाणार्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे शेकड्यात मोजता येणार नाही एव्हढे कमी आहे. त्यामुळे कुठेही पचापच थुंकल्याचे सडासमार्जन नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह चांगली आहेत. शिवाय प्रत्येक मॉल, उपहारगृहाला स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. आणि तिथे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माणसे वरचेवर भेटी देऊन व्यवस्था नीट ठेवली आहे की नाही हे तपासतात.
असो. मी तरी इथे मस्कतात येऊन आणि 'परदेश' वार्यांमधून बरेच कांही शिकलो आणि भारतात आल्यावर हेच सर्व नियम स्वतः पाळतो आणि इतरांनीही पाळावेत म्हणून आग्रही असतो. माझ्या मुलालाही अगदी ४-५ वर्षांचा असल्यापासून ह्या सवयी लावल्या आहेत. आणि गरज भासल्यास नातवालाही चांगल्या सवयी लावेन.
5 Aug 2014 - 10:14 am | कविता१९७८
लेख आवडला , पण मला ही वाटतंय की कदाचित तुम्ही त्या मुलाला रागाच्या भरात बोलण्याऐवजी व्यवस्थीत शब्दात समज दिली असती तर कदाचित त्याने ऐकलं असतं कारण तुम्ही त्याला भर ट्रेन मधे असे बोललात तर त्यालाही इगो हर्ट झाला असेलच की, कुणालाही असे अनोळखी माणसाने भडकणे आवडत नाही.