[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ]
प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय?
Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात. ते असो. त्या हातचलाखीबद्दल पुन्हा कधीतरी).
तोंडातले जीवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड तयार करतात आणि या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे इनॅमल विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. या इनॅमलला पडलेल्या छिद्रामध्ये अजून अन्नकण अडकतात, अधिकाधिक जीवाणू ऍसिड हल्ला सुरू ठेवतात, छिद्र वाढत राहते, दाताचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. दाताची कॅविटी आकाराने लहान असतानाच ती डेन्टिस्टकडून भरून घेणे उत्तम. कारण दाताला एकदा छिद्र पडले की ते ( जखम भरल्याप्रमाणे) आपोआप भरून येऊ शकत नाही. कारण दाताला त्वचेप्रमाणे पुनरुत्पादन क्षमता नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पण जेव्हा वेदना नसते त्याकडे सामान्यत: दुर्लक्ष केले जाते हे वैश्विक कटूसत्य आहे.
इनॆमल पोखरून जीवाणू डेन्टीन नावाच्या दाताच्या दुसर्या थरात प्रवेश करतात, इथे क्वचित वेदना सुरू होते, गोड खाताना थोडा काळ वेदना होते, पण लगेचच थांबते. दातांमध्ये चांदी किंवा कॉम्पोझिट भरण्याची ही योग्य वेळ आहे. पण यापुढेही थांबल्यास जीवाणू दाताच्या नसेत शिरतात ( pulp exposure)
आणि असह्य वेदना सुरू होतात.
प्रश्न 2 : कीड लागणे टाळण्यासाठी काय करावे?
हे समजून घेण्याआधी कीड कशी पसरते हे आधी सांगतो.----
हे चित्र पाहिल्यावर हे लक्षात येईल की कीड लागण्यासाठी १. जीवाणू २. दाताचा पृष्ठभाग ३. अन्नातली साखर ४. प्रक्रियेसाठी लागणारा वेळ या चार गोष्टी आवश्यक आहेत. यातली एकही गोष्ट नसेल तर कीड लागणार नाही.
याचा अर्थ कीड टाळण्यासाठी या चार घटकांपैकी जमेल त्या एखाद्या किंवा सार्या घटकांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१.आपण तोंडातले जीवाणू संपवू शकत नाही कारण निरोगी तोंडातही जीवाणू असतात ( Normal oral microflora). २.आपण दातांचा पृष्ठभाग / इनॅमल फ़्लुराईड पेस्टच्या वापराने थोडासा बळकट करू शकतो ज्यायोगे त्याला सहज कीड लागणार नाही किंवा कीड लागायच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही प्रक्रिया उलटवता येईल. ( अर्थातच दुखर्या दाताच्या मोठ्या छिद्राला फ़्लुराईडचा उपयोग होणार नाही). ३.अन्नातली साखर / पिष्टमय पदार्थ : यावर नियंत्रण आणणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. दातांच्या पृष्ठभागावर अडकून राहू शकतील असे गोड पदार्थ कमी खाणे, ( उदा. चॉकलेट्स आणि चिकट मिठाई टाळणे). दोन जेवणांमधले स्नॅकिंग किंवा सतत गोड पदार्थ चरत राहणे टाळणे आणि तंतुमय पदार्थ ( कच्च्या भाज्या, फ़ळे) खाणे महत्त्वाचे. ४. प्रक्रियेचा वेळ : आणि क्वचितच गोड पदार्थ खाल्ले तर लगेचच ब्रशचा वापर करून चिकट अन्नपदार्थ चुळा भरून दातावरून काढून टाकणे. आता हे लगेच म्हणजे किती लगेच? तर लहान मुलाच्या एका हातात चॉकलेट असेल तर दुसर्या हातात ब्रश हवा. चॉकलेट संपले की ब्रशिंग सुरू झाले पाहिजे तरच कीड टाळता येईल. अशा प्रकारे आपण चौथ्या घटकावर नियंत्रण आणू शकतो.
लहान मुलांमधील कीड टाळण्याचे उपाय १. आहारावरती नियंत्रण : बाळांना बाटलीने दूध शक्यतो देऊ नये, विशेषत: झोपताना गोड दूध रात्रभर वरच्या दातांवरती साठून राहते आणि “ नर्सिंग केरीज” उद्भवतात ----
बाटली द्यायचीच असेल तर झोपताना बिनसाखरेच्या पाण्याची बाटली द्यावी. गोड कमी, थेट साखर नको,चॉकलेटे मिठाया, स्नॅकिंग बंद. तंतुमय पदार्थ , कच्च्या भाज्या फ़ळे उत्तम.
२. होम केअर : रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी ब्रशिंगची सवय मुलांना लावणे आणि मुलांसमोर स्वत: रोज रात्री दात ब्रश करण्याचा आदर्श घालून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. लहान बाळांसाठी बेबी ब्रश वापरावा, किंवा मूल एक वर्षाचे होईपर्यंत झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. मुले किमान पाच वर्षांची होइपर्यंत पालकांनी स्वत: त्यांचे दात ब्रश करून द्यावेत. या निमित्ताने दातांची तपासणी पालकांना करता येते आणि दातांवरचे काळे डाग, खड्डे, फ़टी या दात दुखायला सुरू होण्यापूर्वीच शोधता येतात. थोड्या मोठ्या मुलांसाठी त्यांना फ़्लॉसिंग शिकवणे आणि फ़्लॉसिंगची सवय लावणे दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
३. दंतवैद्याकडच्या भेटी : आधी लिहिल्याप्रमाणे दाताची कीड वेदना सुरू होण्यापूर्वी ओळखून फ़िलिंग करणे आणि होम केअर शिकून घेण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी नियमित दंतवैद्याच्या भेटी घेतल्यास उत्तम. (पण अर्थात आपल्याकडे ती संस्कृती यायला वेळ आहे). दातांची ताकद वाढवायला दाढांवर फ़्लुराईड लावयची ट्रीटमेन्ट लहान मुलांच्यात केली जाते. किंवा कीड लागण्यापूर्वीच पक्क्या दाढांमध्ये रेझिन सीलंट लावले जाते, ज्यामुळे दातांत अन्नकण अडकत नाहीत आणि कीड लागत नाही.
प्रश्न ३ सीलंट आणि फ्लुराईड ट्रीटमेन्ट म्हणजे काय?
बरेचदा डेन्टिस्ट लहान मुलांच्या पक्क्या दाढांमध्ये सीलंट्स भरायला सांगतात. सीलंट्स लावणे ही एक दात किडणे टाळण्यासाठी डेन्टिस्टकडे केली जाणारी उपचार पद्धती आहे.दाढांचा चावण्याचा पृष्ठभाग सपाट नसतो तर तो उंचसखल असतो , ज्यावर खोलगट रेघा असतात. ( Pits and fissures)----
या खोलगट रेघांमध्येच अन्न अडकते आणि कीड लागायची प्रक्रिया सुरू होते. दात किडण्यापूर्वीच या खोलगट रेघा एका रेझिन मटेरियलने भरल्या तर अन्न अडकणार नाही आणि कीड लागणे टाळता येईल या उद्देशाने लहान मुलांच्या पक्क्या दाढा उगवतानाच ( म्हणजे सुमारे सहा ते सात वर्षे वयाला) या दाढा सीलंटने भरून घ्याव्यात.
----
प्रश्न ४ फ़्लुराईड ट्रीटमेन्ट म्हणजे काय?
लहान मुलांच्या दाताच्या इनॅमलची ताकद वाढवण्यासाठी फ़्लुराईड वापरले जाते. साधारणपणे लहान मुलांची दाताची सर्व फ़िलिन्ग्ज करून झाल्यानंतर फ़्लुराईड ट्रीटमेन्ट केली जाते. फ़्लुराईड जेल, फ़ोम किंवा वॉर्निश या माध्यमात उपलब्ध असते.डेन्टिस्ट छोट्याशा ट्रेमध्ये फ़्लुराईड मटेरियल लावून मुलांच्या दातावर मिनिटभरासाठी लावून ठेवतात. हे फ़्लुराईड इनॅमलमध्ये पोचण्यासाठी त्यानंतर काही काळ ब्रश करू नये असे सांगितले जाते.---
काही मुलांमध्ये कीड लागण्याचे प्रमाण जास्त असल्यास दर सहा महिन्यांनी फ़्लुराईड लावण्याचा सल्ला दिला जातो
प्रश्न ५
लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... हल्लीच्या पिढीत कीड जास्त का दिसते? दातांची कीड अनुवांशिक असते का ?
गेल्या पिढीशी तुलना करता हल्लीच्या मुलांचे दात जास्त किडतात, हे खरे आहे का? खरे असल्यास का?
दाताला कीड का लागते हे या लेखात वरती लिहिले आहे. हल्लीच्या मुलांच्या दाताला कीड लागण्याचे महत्त्वाचे कारण या पिढीचा बदलता आहार आणि दात साफ़ करायच्या (नसलेल्या) सवयी हे आहे.
हा प्रश्न दवाखान्यामध्ये साधारणपणे लहान मुलांच्या आजोबा- आज्जींकडून विचारला जातो. त्यांचा बोलण्याचा रोख साधारणपणे असा असतो की --- “आम्ही आणि आमची भावंडे यांना कधी लहानपणी दातांची दुखणी झाली नाहीत. आम्हीही दोन तीन लहान मुले वाढवली, त्यांना कधी त्रास झाला नाही आणि या एवढुशा पाच वर्षांच्या पोराला तुम्ही तीन तीन रूट कॅनाल ट्रीटमेन्ट करायला सांगताय..”
आजोबांचं म्हणणं बरोबर असतं. मी ते मान्यच करतो. मग त्यांना सांगतो , “एवढुशा मुलाला मग का बरं इतक्या कॅविटीज झाल्या असतील? त्याची कारणं तर शोधूयात. हा मुलगा रोज काय काय जेवतो? आणि दोन जेवणांमध्ये काय काय खातो? “ मग पुष्कळ उत्तरे मिळतात. ९५ % शहरी मुलांमध्ये चॉकलेट्स, अनेक प्रकारचे केक्स आणि पेस्ट्रीज, बिस्किट्स, वेफ़र्स आणि त्याचे विविध प्रकार, बर्गर्स अणि कोला आणि एकूणच जोरदार जंक फ़ूड असते. “हा मुलगा जेवतच नाही मग तो वेफ़र्सच खातो, टीवी बघत एका बैठकीत कुरकुरेचं पाकीट संपवतो, रोज कोल्डड्रिन्क पितो, झोपताना त्याला चॉकलेट खूप आवडतं “वगैरे
मग मी विचारतो, तुम्ही यातलं काय काय खात होता? अर्थातच उत्तर येतं, “ आमच्या वेळी असलं काही नव्हतं आणि असलंच तर कधी आमच्यापर्यंत आलंच नाही .. आम्ही कच्च्या भाज्या ( काकडी, गाजर, बीट इ.इ.) आणि कधी कधी फ़ळं खायचो ” ... मग मी त्यांना सांगतो की तंतुमय पदार्थ, कच्च्या भाज्या आणि फ़ळे आहार म्हणून शरीराच्या वाढीसाठी चांगली असतातच शिवाय दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम असतात. त्यामुळे हेच अन्न तुमच्या नातवाने खाणे महत्त्वाचे आहे. आणि ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाच करायचे आहे. कोणताही डॉक्टर त्याला रोज खायला घालणार नाहीये. आता हे जंक फ़ूड शून्यावर आणणे अगदी आदर्श असले तरी प्रत्यक्षात शक्य होईलच असे नाही. मात्र क्वचित एखादे चॉकलेट मुलाने खाल्लेच तर लगेच ब्रश करून दात आणि दाढा स्वच्छ करायला हव्यात.
आहार खूप उत्तम आणि योग्य असला आणि शिस्तशीर ब्रशिंगच्या सवयी नसल्या तर कदाचित तुम्ही कीड लागण्यापासून स्वत:ला वाचवू शकालही पण आहारही वाईट ( कचरान्न शब्द कसा वाटतो?) आणि ब्रशिंगच्या योग्य सवयीही नाहीत तर मग मात्र तुम्ही त्या मुलाच्या चार पाच वर्षाच्या वयामध्ये किडलेल्या दाढा घेऊन डेन्टिस्टाच्या वार्या करायची तयारी ठेवली पाहिजे. या सार्याचा अर्थ इतकाच की आहार आणि ब्रशिंगच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या. पिढीचा यात काहीही संबंध नाही.
याचबरोबर नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दाताची कीड अनुवांशिक असते का? याचे उत्तर” दातांची कीड अनुवांशिक नाही” असे आहे पण कीड लागण्याची कारणे वाढवणार्या सवयी मात्र कुटुंबात सर्वांना सारख्या असतात . भरपूर गोड खाणे, दोन जेवणांच्या मधल्या वेळात चॉकलेट्स, बिस्किट्स असे गोड चरत राहणे, रात्री झोपताना दात ब्रश न करता आईस्क्रीम / कोल्डड्रिंक पिऊन झोपणे अशा आहाराच्या वाईट सवयी आणि रात्री ब्रशिंग आणि फ़्लॉसिंग न करायच्या वाईट सवयी या एका कुटुंबात सर्वांनाच असतात. त्यामुळे समजून उमजून या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल करेपर्यंत दातांची कीड लागण्याच्या सवयी पुढच्या पिढीतही दिसत राहतात
( क्रमशः )
सर्व छायाचित्रे जालावरून साभार
पूर्वप्रसिद्धी : फेसबुक पानावर
https://www.facebook.com/joglekardental
प्रतिक्रिया
23 Jun 2014 - 2:39 pm | मुक्त विहारि
पु भा प्र.
23 Jun 2014 - 3:01 pm | भावना कल्लोळ
धन्यवाद.
23 Jun 2014 - 3:07 pm | रेवती
चांगली माहिती. लेखन सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
23 Jun 2014 - 3:20 pm | अनुप ढेरे
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दलही येऊद्या. चित्रविचित्र टूथ्पेस्टांच्या जाहिराती दिसतात. त्यांचा कितपत फायदा होतो>
23 Jun 2014 - 3:50 pm | भडकमकर मास्तर
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दल >>>>>> तत्त्व तेच. गोड आहार शक्यतो नको / कमी आणि खाल्ल्यास लगेच सफाई. सफाईचे उपाय ब्रशिंग फ्लॉसिंग आणि फटी असल्यास इन्टरडेन्टल ब्रश. वेळेतच टाका घातल्यास पुढचे नऊ वाचतात इ.
टूथपेस्ट्स्बद्दल लिहिणार आहेच. ( जाहिराती अधिक सत्य थोडे .. ट्विस्टेड लॉजिक इ.इ.इ.)
23 Jun 2014 - 4:00 pm | आयुर्हित
कोठे होता आत्तपर्यंत?
खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद.
25 Jun 2014 - 1:36 pm | प्यारे१
>>> कोठे होता आत्तपर्यंत?
वेगळ्या 'मोड'मध्ये असावेत. ;)
>>> खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद.
+३२ (अक्कलदाढांसकट)
23 Jun 2014 - 5:15 pm | असंका
मास्तर जी, वर एका फोटोमध्य एक काळा बाण काढलेला आहे- ज्याच्यामध्ये दातांमधील भेगात अन्न अडकलेले दाखवलेले आहे. ती किड लागण्याची सुरुवात आहे का?
23 Jun 2014 - 6:25 pm | भडकमकर मास्तर
काळा बाण दाखवला आहे तिथे एक खोलगट काळी रेघ तयार झालेली आहे, जिथे कीड लागायला सुरुवात झालेली आहे.
या भेगांमध्ये अन्न अडकत राहून कीड अजून वाढत राहते. आणि मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला. खरेतर त्याच्या फार आधीच किडायला सुरुवात झालेली असते.
25 Jun 2014 - 4:28 pm | असंका
धन्यवाद....!
25 Jun 2014 - 4:51 pm | ऋषिकेश
बरीच जुनी गोष्ट आहे (५-७ वर्षे झाली असतील) पण वरील वाक्यामुळे आठवली.
असाच एक तुकडा तोंडात आला नी तो ज्या दातामागून निघाला तिथे जीभेला खड्डाही जाणवत होता. घाबरून लगेच डेंटिस्ट गाठला. तेव्हा कळले की ते एनॅमल नसून "टार्टार" होते. तोवर टार्टार वगैरे प्रकार माहितच नव्हते.
अजून सुदैवाने एनॅमल न पडल्याने टार्टारहून ते वेगळे कसे ओळखावे हे समजलेले नाहीये.
23 Jun 2014 - 7:14 pm | आतिवास
सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख. आवडला.
24 Jun 2014 - 12:02 am | सुबोध खरे
मास्तर
फारच छान, मुद्देसूद आणि फापट पसारा नसलेले लिहिले आहे.
रच्याकने-- आपल्या ताजमहालाला वीट लावण्याचा कोणताही हेतू नाही परंतु एक स्वानुभवाचे बोल म्हणून लिहित आहे. मी स्वतः गेली तीस वर्षे तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपत नाही (मग रेल्वेने प्रवास करत असो कि दुसर्याच्या घरी असो )किंवा प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरल्याशिवाय राहत नाही तरीही माझे सर्व दात चांदी भरलेले /रूट कॅनाल केलेले किंवा ब्रिज बसवलेले आहेत. (२८ +२ अक्कल दाढा) आणि या सतत होणार्या दन्तक्षयासाठी मी ए एफ एम सी आणि नायर रुग्णालयाच्या विकृती विज्ञान विभागात(ओरल पैथोलोजी) सल्ला (आणि विचार विनिमय) घ्यायला गेलो असता तेथे केलेल्या तपासणीत माझ्या लाळेची पी एच कमी ( आम्लीभूत) आढळली. यामुळे दात किडण्याचे प्रमाण जास्त असावे से त्यांचे मत पडले. यावर वाचन केले असता हि गोष्ट अनुवांशिक असल्याचे वाचल्याचे आठवते. (माझ्या आई वडिलांचे दात फार लवकर खराब झाले आहेत)
सुदैवाने माझी दोन्ही मुले आपल्या आईवर गेली असल्याने त्यांचे दात इतक्या सहज किडत नाहीत तरीही त्यांना रात्री दात घासल्याशिवाय मी झोपू देत नाही.
24 Jun 2014 - 1:50 am | रेवती
अगदी अगदी! खूप पूर्वी भडकमकर मास्तरांना मी हेच प्रश्न विचारले होते की माझ्या आजीचे दात फार लवकर खराब झाले, आईचेही झाले. त्यानंतर मी व माझ्या मामेबहिणींच्या दातांच्य ट्रीटमेंटा झाल्या. कंटाळा आला होता. त्यावर मास्तरांनी साधारण दोनेक वर्षापूर्वी असे काही नसून , अधिक काळजीपूर्वक दात घासण्याबद्दल व्य. नि. केला. मग मला जास्तच सिरियस होऊन रोजचे दोनदा ब्रश करणे (जे आधीही करायचे पण आता बारकाईने), फ्लॉसिंग, इंटर्डेंटल काळजी घ्यावी लागली आणि गेल्या दोन वर्षात एक अक्कलदाढ काढण्याव्यतिरिक्त कणभरही वेगळी ट्रीटमेंट करावी लागली नाही. तुमची व माझी तब्येत, अनुवंशिकता वगैरे वेगळे आहे हे मान्यच पण मास्तरांना आपण दोघांनीही विचारलेल्या प्रश्नातला सारखेपणा आढळला म्हणून लिहिले. याउलट माझ्या नवर्याचे दात फारच चांगले आहेत. त्याला आजपर्यंत फक्त एकदा अक्कल्दाढ तिरकी आल्याने काढावी लागली होती. आता हे लाळेची पी एच चे प्रकरण नवीनच समजले.
24 Jun 2014 - 2:16 am | भडकमकर मास्तर
तुमचे म्हणणे योग्य आहे ... लाळेचा पी एच हा दंतक्षयावर परिणाम करणारा एक घटक आहे.
इनॅमलच्या पृष्ठभागावरती मिनरलायझेशन आणि डिमिनरलायझेशनचा खेळ सतत सुरू असतो, त्यात विरघळणार्या इनॅमलचे रिमिनरलायझेशन करण्यात लाळ आणि त्यातली काही मिनरल्स यांचा सहभाग असतो. पण काही अनाकलनीय कारणांमुळे एखाद्याची लाळच आम्लीभूत असली तर मात्र रीमिनरलायझेशन तितक्या वेगाने होत नाही म्हणून कीड लागायचे प्रमाण जास्त असते.काही आजारांमध्ये जेव्हा लाळ बनण्याची प्रक्रिया बिघडते आणि तोंड कोरडे पडते, त्या रुग्णांमध्येसुद्धा कीड लागायचे प्रमाण फार जास्त असते.
अर्थात लाळेच्या पी एचचा दंतक्षयावर खरंच इतका फरक पडतो का यावर शास्त्रज्ञ ( नेहमीप्रमाणे) उल्टंसुल्टं बोलत असतात. आता या लेखातली खालील वाक्यं बघा .
The study showed that pH and buffering capacity had a weak correlation with caries activity. Hence it can be speculated that other factors like micro flora, diet and retention of food might have dominated the buffering capacity to initiate caries, which is a multifactorial disease [12]. Similar results were seen in a study conducted by Tuhunoglu who showed no correlation between pH values and caries activity regardless of the age and gender. They were dependent upon individual and environmental variations. The results of the current study was in contrast to the study conducted by Ericsson which showed that salivary buffering capacity has a negative relationship with caries incidence [13]
म्हणजे लाळेच्या वाहण्याच्या प्रमाणाचा नक्की परिणाम होतो पण कमी पी एचचा होतो की नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा असावा वगैरे वगैरे...
( हा सारा वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी मी लाळेबद्दल लिहिणे टाळले
शिवाय पीएच आणि अनुवांशिकतेची भानगड कळाली तर रुग्ण जितकी दातांची काळजी घेतात आणि घरी सफाई करतात, तीही बंद करतील..आता नाहीतरी कीड लागणारच आहे तर कशाला कष्ट घ्या? वगैरे वगैरे )
तुमच्यासारखा रुग्ण जो लेखात लिहिलेली सर्व काळजी नियमितपणे घेतो तरीही त्याच्या दातांना सतत कीड लागते ( असा रुग्ण भेटण्याचे प्रमाण कमी म्हणजे अगदीच कमी असते) अशा माणसाला मीही सांगतो, " हम्म्म... तुमच्या लाळेचा पी एच कमी असणार "
24 Jun 2014 - 6:52 am | रेवती
धन्यवाद हो मास्तर! माझ्या लाळेच्या पि एच चा प्रश्न असेलही पण तुम्ही साम्गितल्या दिवसापासून मी जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने माझे जवळ जवळ सगळे प्रश्न सुटलेत. आता मी आधी जो काय गलथानपणा केलाय त्याचे परिणाम भोगावे लागणारच, पण आता फार काळजी वाटत नाही. अर्थातच आमच्या मुलाचे दात स्वच्छ ठेवण्याबाबतीत आम्ही शक्य तितके काटेकोर आहोत.
24 Jun 2014 - 9:24 am | भडकमकर मास्तर
जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने
झालात हो अमेरिकन पक्के !!! (असे आदर्श रुग्ण बघून एक भारतीय डेन्टिस्ट म्हणून ड्वॉले पानावले )
24 Jun 2014 - 3:18 pm | रेवती
हा हा हा. होय.
24 Jun 2014 - 3:56 pm | अनुप ढेरे
दाताची काळजी घेणारे डेंटिस्टसाठी आदर्श रुग्ण असतात? की उलटं ;)
24 Jun 2014 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहितीपूर्ण लेख. अजून येऊ द्या.
24 Jun 2014 - 7:46 am | यशोधरा
माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
24 Jun 2014 - 8:31 pm | किसन शिंदे
माहीतीपूर्ण लेख. आणि पुन्हा लिहायला सुरूवात केल्याबद्दल मास्तरांना धन्यवाद.
24 Jun 2014 - 9:16 pm | इनिगोय
या विषयावर लिहिल्याबद्दल अनेक आभार.
मला काही प्रश्न आहेत..
दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचं वय नेमकं काय? ही प्रक्रिया किती महिने/वर्षं सुरू राहते? माझ्या मुलाचा (आता साडेसहा वर्षे) एकच दात आठेक महिन्यापूर्वी पडून तिथे नवा आलाय. नंतर जैसे थे. हे कशामुळे असेल? बाकी काही तक्रार नसल्याने डाॅक्टरकडे नेलेलं नाही.
रेझिन सिलंटचा वर उल्लेख आला आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? कितपत खर्चिक उपचार आहे?
सतत च्युईंग गम चघळण्याने दातांवर काय परिणाम होतो?
25 Jun 2014 - 1:56 pm | भडकमकर मास्तर
दुधाचे दात पडून नवीन यायचं नेमकं वय : प्रत्येक दातासाठी वय वेगळं असतं ...ढोबळमानाने सांगायचं तर
समोरचे दात सहा ते नऊ वर्षे या काळात पडतात आणि दुधाच्या दाढा दहा ते बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत पडतात. त्याच काळात पक्के दात यायलाही सुरुवात होते. पक्के पटाशीचे दात सहा ते सात पूर्ण होताना येऊ लागतात, त्याच काळात पक्क्या दाढाही येऊ लागतात.( पहिली पक्की दाढ सातव्या वर्षी येते ). याचाच अर्थ या काळात तोंडात काही कायमचे दात असतात आणि काही दुधाचे दात. या काळाला म्हणजे सहा ते बारा या वयोगटाला मिश्रदातांचा काळ म्हणतात. बर्याच पालकांना वाटतं की सर्व दुधाचे दात एकदम पडतात आणि सर्व कायमचे दात एकदम येतात.तसे होत नाही.
सात ते आठ वयापर्यंत पटाशीचा दात आला नसेल तर तसे फारसे काळजी करण्यासारखे नसते. आत दात थोडा उशीरा तयार होतो आणि उशीरा येतो. पण एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दाखवा, "दात मागे उगवत नाहीना, एकच दात आत अडकून राहिला नाहीये ना, एक्स रे काढायची गरज आहे का " हे तो डेन्टिस्ट ठरवेल...
( त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या दाढा बर्या आहेत का ते बघून घ्या, कारण दुखेपर्यंत उपचार वाढत जातो आणि आधी दाखवलं असतं तर बरं झालं असतं असं ऐकून घ्यावं लागतं. ;) दुधाच्या दाढा बारा वयापर्यंत टिकवायच्या असतात हे लक्षात ठेवावं. )
सतत च्युइंग गम चघळणे : शुगरफ्री च्युइन्ग गम लाळेचा प्रवाह वाढवते आणि कीड लागायला प्रतिबंध करते असे म्हणतात. जिथे अगदीच ब्रश करणे शक्य नसते तिथे कधीतरी गम चावायला हरकत नाही पण मी तरी ब्रशला पर्याय म्हणून दररोज गम चावा असे सांगणार नाही. याबद्दलचा विदा कदाचित गमच्या बाजूने असेलही. ;)
25 Jun 2014 - 1:58 pm | भडकमकर मास्तर
रेझिन सीलंटचा दुष्परिणाम नाही. ड्रिल न करता केलेलं ते एक फिलिंगच आहे.
खर्चिकही नाही. साधारणपणे मोठ्या फिलिंगच्या निम्मा खर्च येतो .
25 Jun 2014 - 7:15 am | मदनबाण
वाह... चला भमाच्या लेखणीचा उपवास सुटला तर ! ;)
पुढच्या भागाची वाट पाहतो... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
25 Jun 2014 - 11:03 am | ऋषिकेश
आभार.
लेख उत्तम. आता असे जाहिर सल्ले (ते ही विना फी :P) देताच आहात तर एक प्रश्न विचारतो.
माझ्या मुलीला झोपताना पाण्यात किंचित मध लागतो (फ्लेवर - वास येण्यापुरता पुरतो) (साधारण १२५ मिलीला पाव - किंवा त्याहूनही कमी - चमचा मध). हे दातांना अपायकारक आहे का?
चला जरा डॉक्टरांना रडवूया: आम्ही भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग करून घेतो - तसं जवळच्या डेंटिस्टाकडे तीन वर्षाचं प्याकेजच लावलं आहे. :D
आता प्रश्नः
दर सहा महिन्यांनी आमची डेंटिस्ट माझ्या दातांना टार्टार जमुनही कशी छोट्टीशी कॅविटीसुद्धा नाही याचे आश्चर्य व्यक्त करते. तिच्या मते माझे टार्टार हे टेन्शनमुळे जमते (असेल बॉ - तसेही माझी वृत्ती शंकेखोर आहे) पण या प्रमाणातील टार्टार असल्यावर छोटीश्शी कॅविटी तरी हवी बॉ (असे काहिशा लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय याविचाराने मी गाल पुढे करतो तर ती तोंडात नवे अवजार खुपसते.. ते असो!)
तर प्रश्न असा की मी दाताला ब्लिचिंग करून घेत नाही - फक्त क्लीनिंग करून घेतो. हे ब्लिचिंग खरंच गरजेचं आहे का? मला दात शुभ्र दिसले नाहि तरी चालतील. त्या व्यतिरिक्त त्या ब्लिचिंगचा काही उपयोग?
25 Jun 2014 - 11:47 am | भडकमकर मास्तर
१. मध पाणी : काहीही गोड रात्री देताना जरा काळजीच गरजेची आहे. आता या डायल्यूशनचा मला अंदाज येत नाहीये तरीही झोपताना शेवटी स्वच्छ पाण्याने दात ब्रश करावेत हे बरे.माझ्या एका मित्राच्या मुलाला रात्री झोपताना टॉनिक पिऊन झोपायच्या सवयीने समोरचे दात किडायला सुरुवात झाली होती.
भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग
आले आले अश्रू आले ..
ब्लीचिंग : दाताची सफाई आवश्यक उपचार आहे. ब्लीचिंग ही एक चैन किंवा ऐश आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेन्ट.
ब्लीचिंग आवश्यक आहे का? अजिबात नाही. मॉडेलिंग करणारे लोक, अभिनेते वगैरेंनी करून घ्यावीच. स्माईल बरे दिसते. लग्नसमारंभ वगैरेंमध्ये उत्सवमूर्तींनी वगैरे करून घ्यावेच. चार पाच हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर करावे. हौस म्हणून. अम्रीकेत साधारणपणे दोनतीनशे डालरच्या पुढे खर्च येतो. दोन तीन वर्षांनी हा शुभ्रपणा कमी होतो मग होम ब्लीच करावे. ( डेन्टिस्ताने दिलेल्या ट्रे मध्ये सोल्यूशन दातावर लावून रात्रभर ठेवायचे )
25 Jun 2014 - 2:30 pm | ऋषिकेश
आभार!
दाताच्या काळजीपोटीच रात्रीचे दूध सोडवायला पाणी देऊ लागलो. मात्र मधपाणी पिता पिताच ती झोपते (आताशी २ वर्षांची आहे) त्यामुळे नंतर दात घासणे कठीण आहे. मात्र सकाळी उठल्यावर आवडीने दात घासते व घासून घेते.
तरीही आता तुम्ही सांगताय तर ती सवय बंद करायच्या मागे नक्की लागतो.
ब्लिचिंग बाबत अंदाज होताच म्हणून कटाक्षाने नाही म्हणत होतोच.
पुनश्च आभार!
25 Jun 2014 - 5:20 pm | भडकमकर मास्तर
ब्रश करत न येणार्या छोट्या बाळांसाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत.
त्यामुळे "नंतर दात घासणे कठीण आहे." तरीही सफाईला पर्याय नाही कारण रात्रीत प्लाक न निघाल्याने दात किडायला सुरुवात होते
25 Jun 2014 - 1:41 pm | प्यारे१
>>> आमची डेंटिस्ट
>>> लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय
आणि
>>> तीन वर्षाचं प्याकेजच
असे काही शब्दसमुच्चय दिसले.
धन्यवाद! ;)
25 Jun 2014 - 6:14 pm | पाषाणभेद
बरेच आहात की.
बाकी लेख महत्वाचा आहेच. इन्ट्राडेंटल ब्रश भारतात मिळतात का? घ्यावा म्हणतोय.
26 Jun 2014 - 11:19 am | भडकमकर मास्तर
मिळतो की... एवढा काय महाग पण नसतो... पण मेडिकलवाले ठेवायचा कंटाळा करतात... मग त्यांना सांगून आणवावा लागतो इतकंच...
उदाहरणार्थ .. थर्मोसील प्रोक्झाब्रश
25 Jun 2014 - 5:59 pm | रेवती
अभिनंदन ऋ!
मला दर सहा महिन्यांनी क्लिनिंग प्रकार भारतात असताना माहितच नव्हता. तू छान काम करतोय्/करवून घेतोय्स.
25 Jun 2014 - 2:34 pm | arunjoshi123
माहितीपूर्ण. आभार.
25 Jun 2014 - 6:20 pm | विटेकर
धन्यवाद ..
सध्या बायकोच्या दाढांचे दोन ब्रीज करायचे आहेत, खर्चिक तर आहेच पण किती त्या तक्रारी !
पूर्वी काळजी न घेतल्याचे परिणाम !
27 Jun 2014 - 10:31 pm | पैसा
अतिशय उत्तम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद!
5 Jul 2015 - 12:40 am | संदीप डांगे
उपयुक्त माहिती सोप्या शब्दात सांगितल्याबद्दल धन्यवाद!