उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचण्याला ४-५ वर्षे होऊन गेली असावीत. होय! हे यासाठीच असं लिहीलंय कारण, माझ्या लहानपणी म्हणजेच ९० दशकाच्या सुरूवातीला मुलाला शाळेत घालायचं असेल तर आत्ताच्या सारखं त्याचं वय न पाहता उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचला की मुलगा शाळेत जाण्यायोग्य झाला असेच समजायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी नावाचं भीती घालणारं पुस्तक अजून अभ्यासाला आलं नव्हतं. ९२ चा विश्वचषक पाकड्यांनी जिंकून वर्षे-दोन वर्षे उलटली होती. तेव्हाच्या भारतीय संघात ८३ चा विश्वचषक जिंकून देणारे एक दोन जण कारकिर्दीच्या आपल्या शेवटच्या टप्प्यात खेळत होते. नेमकं त्याच वेळी, न जाणो कशी काय, मला क्रिकेट या खेळाची गोडी लागायला सुरूवात झाली आणि मी क्रिकेट 'ऐकायला' सुरूवात केली होती.
एखाद्या घरात मोठ्या आवाजात सुरू असलेला 'सिलोन' कंपनीचा भला मोठ्ठा रेडिओ, त्याभोवती कोंडाळ करून बसलेली, झोपलेली, उभी राहीलेली, आणि टाचणी पडल्यावरही आवाज यावा इतक्या शांत वातावरणात एकाग्रतेने क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकणारी पाच-पन्नास डोकी आणि प्रत्येक षटकारा-चौकारानिशी जोरजोरात ओरडत, हसत ऐकमेकांना दिलेल्या टाळ्या! अशा 'क्रिकेट संस्कारी' वातावरणात ते पाहण्याची, ऐकण्याची आणि खेळण्याची बीजं माझ्या मनात रोवली गेली. भारतीय दुरचित्रवाणी क्षेत्रात तोपर्यंत फारशी क्रांती झाली नसल्याने 'टिव्ही' हा प्रकार फार दुर्मिळ मानला जात होता. बहुतेक श्रीमंतांच्याच घरी ही टिव्ही नावाची गंमत आढळून यायची. किंबहूना घरी टिव्ही असणं हेच श्रीमंत असल्याचं मापदंड मानले जाई. त्यामुळे क्रिकेटचं जे काही बाळकडू मिळालं ते रेडिओच्या माध्यमातूनच! भारताचा सामना असला की, शेजार्या-पाजार्यापैंकी एकाच्या तरी घरातून रेडिओची ती खरखर ऐकू यायची. स्टेशन व्यवस्थित लागून धावतं समालोचन ऐकू येण्यासाठी आटापिटा चालायचा. यथावकाश रेडिओ सुरू होऊन समालोचन व्यवस्थित सुरू व्हायचं अन् अचानक जमलेल्या १५-२० माणसांचं त्या घरमालकालाही कोडं पडायचं.
'ओह! दॅट्स अ फोर!! अ वंडरफुल स्केअर ड्राइव्ह!!' असं म्हणत समालोचक ओरडला की जमा असलेली सगळी टाळकी 'चौका..चौका' करत आनंदाने ओरडायची. तेव्हा फलंदाजी करणार्या फलंदाजाने आपल्या बॅटने चेंडू ठोकत बॉन्ड्रीच्या म्हणजे रेषेच्या बाहेर मारला आहे आणि त्याला एकदम चार धावा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे 'क्रिकेट' उर्फ बॅटबॉल या खेळातलं माझं ज्ञान वृद्धींगत होत होतं. अन् त्याच वेळी ते ऐकण्याबरोबर खेळण्याकडेही लक्ष लागू लागलं.
७-८ रूपयांना मिळणारा लाल रंगाचा रबरी चेंडू घेण्याची ऐपत नसायची म्हणून मग साठवलेल्या १-२ रूपयातून प्लॅस्टिकचा टणक हिरवा चेंडू अन् तो ही नसेल तर शिंप्याकडून आणलेल्या चिंध्यांपासून बनवलेला चेंडू आणि लाकडाचं 'फळकूट' बनवून वेडं-वाकडं बॅट-बॉल खेळायला सुरूवात केली होती. भारतीय संघांच्या कर्णधारपदी मो. अझरूद्दीन येईतो छतावर उभारणार्या अॅल्युमिनियमच्या ऐन्टिनासकट १४ इंचाची ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगातली ओनिडाची भली मोठी खोकीही तुरळक सर्वसामांन्यांच्या घरात दिसू लागली होती. आत्तापर्यंत फक्त रेडिओवर ऐकलेले धुरंदर फलंदाज आता चेहर्यासकट आकाराला येवू लागले होते. नव्या स्थित्यंतराला सुरूवात झाली होती. रेडिओचा दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा सामना दृश्य स्वरूपात दाखवणार्या टिव्ही नावाच्या नव्या चमत्काराकडे वळला होता.
ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्ही आल्यानंतर त्यावर भारताचा सामना पाहणे म्हणजे एक मोठी पर्वणी ठरू लागली होती. सामना सुरू झाला रे झाला की एकदम टिव्हीसमोरची जागा पकडायची हे प्रत्येकजण मनोमन ठरवायचा, पण प्रत्येकालाच ते शक्य होत नसायचं. भारताची फलंदाजी सुरू व्हायची. सलामीचे नवज्योत सिध्दू आणि मनोज प्रभाकर गेले म्हणजे तिसर्या चौथ्या नंबरवर 'एस्.आर.तेंडूलकर' नावाचा कुरळ्या केसांचा, गोरा गोमटा पोरगा एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट घेऊन मैदानात उतरायचा. थोडाफार खेळायचाही, कधी कधी ५०-६० धावाही करायचा. पण त्याचं ते खेळणं अजून मनात ठसलेलं नव्हतं. दरम्यान भारत-पाकिस्तान-श्रीलंकेने संयुक्तरित्या विश्वचषक स्पर्धा भरवण्याचे ठरवल्यानंतर भारतात क्रिकेटचे वारे जोरदार वाहू लागले होते.
हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाने केलेले प्रयत्न थोडे कमी पडले. एकूण मालिकेत सचिन तेंडूलकरने केलेल्या ५२३ धावांच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. यात दोन शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. दुर्दैवाने भारत उपांत्य फेरीचा सामना हरला याची परिणीती भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळाले होते. सचिनने केलेली मेहनत वाया गेली होती. विश्वचषक मालिकेत त्याने केलेल्या सर्वाधिक धावा ही एक नांदी होती...पुढे येणार्या सुवर्णयुगाची! सचिन तेंडूलकर नावाच्या फलंदाजाची फलंदाजी बघणं आनंदाची पर्वणी ठरू लागलं होतं. त्याच्या खेळातून मनाला एक वेगळाच आनंद मिळायचा. ९६ ते ९८ ही तीन वर्ष सचिन तेंडूलकरच्या फलंदाजीतला सुवर्ण काळ म्हणता येतील अशी होती. लागोपाठ तीनही वर्षी हजाराच्या वर धावा करत त्याने आपल्या फलंदाजीत सातत्य राखले होते. त्याची फलंदाजी सर्वार्थाने बहरली ती याच कालखंडात.
९८ च्या सुरूवातीला शारजात भरलेली तिरंगी कोका-कोला स्पर्धा.! भारताबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ कोकाकोला कप जिंकण्यासाठी आसूसलेले होते. ऑस्ट्रेलिया त्यांच्या तडफदार(?) खेळामूळे आधीच फायनलला पोचली होती. तर न्यूझीलंडही जवळजवळ पोहचण्याच्या तयारीतच होती, पण सचिनच्या त्या दोन वादळी खेळ्यांमूळे भारत फायनलला तर पोचलाच पण त्याचबरोबर फायनलला ऑस्ट्रेलियाच्या तोंडातला विजयाचा घासही त्याने अक्षरशः हिसकावून आणला. कॅस्प्रोविच, फ्लेमिंग, वॉर्न, लेमन, मुडी या सगळ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची त्याने अशी काय धुलाई केली, की सामन्यात एका क्षणी सगळे ओस्ट्रेलियन अगदी खेळाडू रडवेले झाले होते. सचिनच्या सच्च्या चाहत्याइतकेच भारतातल्या कोणत्याही क्रिकेटप्रेमी माणसाला सचिनच्या सर्वोत्तम खेळींविषयी विचारलं तर क्षणाचाही विलंब न करता तो ९८ च्या शारजा स्पर्धेचा, ऑस्ट्रेलिया संघाचा, मैदानात आलेल्या वादळाबरोबरच या दोन्ही वादळी खेळींचा, आणि वॉर्नच्या केलेल्या धुलाईचा नक्कीच उल्लेख करेल. या स्पर्धेपासूनच माझ्या मनातल्या देव्हार्यावर 'सच्या' नावाचा देव विराजमान झाला.
या स्पर्धेच्या महिनाभर आधी भारतातल्या तिरंगी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बॉब्वे आले होते. त्या स्पर्धेदरम्यान सच्याची ऑस्ट्रेलियाविरूध्दची आणखी अविस्मरणीय खेळी या लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात सहज तरळून गेली. ऑस्ट्रेलियाच्या माफक २२२ धावांना प्रत्यूतर देताना सचिनने अवघ्या ८९ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. यात पहिल्यांदाच त्याने एका डावात सात उत्तुंग षटकार लगावले जे त्या डावातल्या त्याच्या एकुण चौकारापेक्षाही जास्त होते. जबरदस्त!! हा एकच शब्द योग्य होता सचिनच्या या शतकासाठी!
कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच अनेक गोलंदाजांबरोबर त्याचा सामना रंगला होता. अनेक गोलंदाजांबरोबर बॅटच्या साहाय्याने त्याने केलेली लढाई हा नेहमीच माध्यमांच्या चर्चेचा विषय राहिला होता. गोलंदाज, मग तो शेन वॉर्न असो वा अॅलन डोनाल्ड, अब्दुल कादिर असो वा शोऐब अख्तर! त्याने सगळ्यांच्याच गोलंदाजीची पिसं काढली. झिम्बॉब्वेच्या हेन्री ओलोंगोबरोबरचं त्याचं द्वंद्व आठवतंय का? ९८ च्याच दिवाळीदरम्यान शारजात भारताच्या सुरूवातीच्या एका सामन्यात सचिनला गोलंदाजी करायला आलेल्या नवख्या ओलोंगाने बॉऊन्सर टाकून सचिनची विकेट काढली. अन् त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा करतात तसा आनंद मैदानावर नाचून साजरा केला. सच्याला आऊट केला म्हणून त्याला लै म्हणजे लै शिव्या टाकल्या होत्या तेव्हा. झेलबाद झाल्यानंतर माकडासारख्या नाचणार्या ओलोंगाकडे बघत मैदान सोडणार्या शांत संयमी सचिनच्या चेहर्यावर एक निर्धार दिसत होता. एक असा निश्चय, जो त्याच्या पुढच्याच सामन्याला भारतातल्या अख्ख्या क्रिकेटप्रेमींना आणि ओलोंगालाही पाहायला मिळाला. या सामन्यात सचिनने ओलोंगाला असा काही धुतला की बास रे बास! ओलोंगाच्या गोलंदाजीची पिसं काढत ६ षटकात साडेआठच्या सरासरीने ५० धावा कुटल्या गेल्या.!! दिवाळीनंतरची आतषबाजी तिकडे शारजात मैदानावर साजरी झाली होती.
कारकिर्दीच्या या सुवर्ण टप्प्यावर असताना शारीरीक व्याधींमुळे आणि ९९ च्या विश्वचषकादरम्यान वडिलांच्या स्वर्गवासामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी हानी झाली. पण अशा खडतर कालखंडातही आपल्या क्रिकेटच्या साधनेत त्याने खंड पडू दिला नाही. इंग्लंडमधल्या विश्वचषकादरम्यान वडिलांच्या जाण्यामुळे स्पर्धा अर्धवट टाकूनच त्याला भारतात परत यावे लागले. अंतिम कार्य उरकल्यानंतर पुन्हा स्पर्धेत जाण्याचा त्याचा निर्णय सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारा होता. पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला.
सचिन तेंडूलकरला त्याच्या सर्वोत्तम खेळींविषयी विचारले असता, २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सेंच्युरीयनवर पाकिस्तान विरूध्दच्या उपांत्य सामन्यात केलेल्या ९८ धावांचा तो आवर्जून उल्लेख करतो. या सामन्यापर्यंत विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द न हारण्याची भारताची अजेय परंपरा सचिनच्या त्या ९८ धावांमुळे इथेही कायम राहीली. पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम! डोळ्याचं पारणं फिटावं इतका तो फटका सुंदर होता. फ्लिक, पुल, स्क्वेअर ड्राईव्ह, हुक, स्ट्रेट ड्राईव्ह या प्रमुख शस्त्रांप्रमाणेच आत्तापर्यंत न पाहीलेलं सचिनच्या भात्यातलं एक सुंदर शस्त्र होतं ते!! सचिनच्या श्रेष्ठत्वाचा दाखला देणारं त्या सामन्यातलं विरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तरच्या संभाषणाचा किस्सा वीरूच्या तोंडून अलिकडेच ऐकायला मिळाला होता, तसेच काही लेखात वाचायलाही मिळाला होता.
२४ फेब्रुवारी २०१०! सख्खा मामा किडनीच्या दुखण्यामूळे इस्पितळात अगदी शेवटच्या घटका मोजत होता. डायलिसिसवर ठेवलं होतं त्याला! संध्याकाळी त्याला पाहायला गेलो तेव्हा अतिशय वेदनादायी परिस्थितीत इस्पितळातल्या खाटेवर कण्हत पडला होता. प्रचंड दु:ख होत होतं मनात, त्याला त्या स्थितीत पाहताना. तशाच रडक्या चेहर्याने इस्पितळाच्या बाहेर पडलो. वाटेत एका हॉटेलबाहेर भरपूर गर्दी जमली होती म्हणून उत्सूकतेपोटी पाहायला गेलो तो हॉटेलातल्या टिव्हीवर भारताचा सामना सुरू होता. १९० पार करून सचिन एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा होता. समोर दक्षिण अफ्रिकेसारखा बलाढ्य संघ.! एक एक धाव काढत हळूहळू त्याने सईद अन्वरचा १९६ धावांचा विक्रम मागे टाकला आणि द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. अखेर लॅन्ग्वेल्टच्या बाहेर जाणार्या चेंडूवर पॉईन्टच्या दिशेने सचिनने चेंडू मारला आणि....ऐतिहासिक क्षण!!! एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज बनला. मनातल्या दु:खाला त्याच्या द्विशतकाने मिळालेला थोडासा दिलासा हा शब्दांपलिकडचा होता. सुख आणि दु:खाच्या अजब हिंदोळ्यावर झोके घेत, द्विधा मनस्थितीत मी त्या गर्दीतून बाहेर पडलो.
भारतीय क्रिडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'सचिन तेंडूलकर' नावाचा खेळिया त्याच्या उच्च दर्जाच्या खेळाने तो पाहणार्याला एक अवर्णणीय आनंद देत आणि आपलंस करत अखेर २६ नोव्हेंबर २०१३ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि एका भारतीय संघातल्या एका सुरेख पर्वाची सांगता झाली. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरच्या शांत आणि संयमी वाहण्यातून त्याने अनेक खेळाडूंना वस्तूपाठ घालून दिला. एकदिवसीय सामन्याबरोबर, पाच दिवसांच्या पारंपारीक खेळात सच्च्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. येत्या काळात काही विक्रम कदाचित मोडतीलही, तर काही अबाधित राहतील. पण त्याच्या चाहत्याच्या मनातील 'या सम हाच' ही भावना मात्र चिरंतर राहील!
*आजच्या ४१ व्या वाढदिवशी माझ्यातर्फे त्याला अनेकानेक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
24 Apr 2014 - 2:55 am | आत्मशून्य
आवडला हे.वे.सा.न.ल.
24 Apr 2014 - 2:57 am | किसन शिंदे
:)
24 Apr 2014 - 4:04 am | आनन्दिता
माझ्यासाठी तर आजही सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन हेच समीकरण आहे. लेख आवडला..
24 Apr 2014 - 4:43 am | स्पंदना
सचिनच्या खुप सगळ्या भावछटा ज्या मलासुद्धा जाणवतात तुम्ही येथे सुंदररित्या रेखाटल्या आहेत.
मस्त! अन सच्याला वा.दि.च्या शुभेच्छा!!
24 Apr 2014 - 5:05 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहेस! एकदम आवडलं.
24 Apr 2014 - 4:49 pm | मूकवाचक
+१
24 Apr 2014 - 5:32 am | विकास
लेखन एकदम आवडले!
पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला.
त्याच्या खेळापेक्षाही (म्हणजे ते कमी आहे असे नाही) पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्याबद्दल आदर वाटतो. आजही आपीएल ची दुबईतली मॅच सोडून तो केवळ मतदानासाठी मुंबईला येत आहे. हॅट्स ऑफ!
24 Apr 2014 - 10:31 am | सुबोध खरे
मी तेंडुलकरचा चाहता असूनही मला एक प्रश्न पडला
वाढदिवस नसता तर काही हजार रुपये खर्च करून तो मतदानासाठी मुंबईत आला असता का? आणि एका मतासाठी एमिरेट्स सारख्या विमान कम्पनीला पैसे देणे हे कितपत व्यवहार्य आहे.(एखादेवेळेस खासदार असल्याने एयर इंडियाचे तिकीट फुकट असेल म्हणून कि काय?)
तात्पर्य:- आपण क्रिकेटची म्याच पहावी. क्रिकेटर काय करतो ते नव्हे. त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका
24 Apr 2014 - 1:46 pm | शिद
+१११११ अगदी अगदी.
पण मी जेव्हा असे म्हणतो त्यावेळी माझे बरेसचे सचिन भक्त मित्र माझ्यावर अगदी तुटून पडतात जसा शारजाला सचिन शेन वॉर्न वर तुटून पडला होता. :)
24 Apr 2014 - 1:59 pm | प्यारे१
आजच्या दिवशी सचिन बरोबर त्यांनाही वाढदिवसाच्या 'शुभेच्छा' द्या.
किस्ना लेख आवडला रे!
24 Apr 2014 - 4:48 pm | टवाळ कार्टा
केलेच पाहिजे...इथे घरात बसुन मतदान न करणार्यांना काहितरी कळुदे यातुन
24 Apr 2014 - 8:19 pm | विकास
सचीनने का केले हे केवळ त्यालाच माहीत. पण मला खात्री आहे की प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस तो घरी नसणार. काही हजार रुपये त्याच्यासाठी काहीच नाहीत. कदाचीत तो (भारतरत्न + खासदार म्हणून मिळणारा)सरकारी पैसा वापरत देखील नसेल कारण त्याला गरज नाही. छपन्न प्रायोजक पैसे देतील.. पण केवळ सचीनच नाही तर कुठलिही सेलिब्रीटी व्यक्ती असे वागते तेंव्हा कळत-नकळत लोकांपुढे एक आदर्श ठेवत असते. सचीन ने ते नक्की केले असे वाटते. शहारूख, अमिर खान यांनी देखील मतदान करून पब्लीसिटी केली तरी म्हणूनच काही गैर वाटत नाही. नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...
25 Apr 2014 - 6:19 pm | प्रसाद१९७१
मला पण माझ्या कंपनी ने अमेरिका सोडा अगदी बंगलोर ला जरी पाठवले असते कामा साठी तरी मी मतदाना साठी आलो नसतो. तुम्ही तरी आला असता का?
25 Apr 2014 - 6:16 pm | प्रसाद१९७१
आणि त्यात एव्हडे कौतुक करण्यासारखे काय आहे. कार्गील चे युद्ध चालू असताना, हाच माणुस पाकीस्तान शी वर्ड कप मधे मॅच खेळत होता.
25 Apr 2014 - 6:19 pm | टवाळ कार्टा
जसे बाकी नेते शोबाजी करत नव्हते...बालीवुड बंद होते...सास-बहु मालिका बंद होत्या
25 Apr 2014 - 6:22 pm | प्रसाद१९७१
नव्हते ना बंद. पण ती लोक पाकीस्तान शी मॅच खेळत नव्हती.
भारताचे सैनिक मरतायत आणि ही माणसे त्या मारणार्या देशाशी मॅच खेळतायत. :-(
सचिन तेंव्हा अलरेडी सो कॉल्ड देवत्वाला पोचला होता, त्यामुळे तो Hard Stand घेण्याच्या परिस्थितीत होता. एखाद्या नविन खेळाडुने नाही घेतला तर समजु शकतो.
25 Apr 2014 - 6:31 pm | टवाळ कार्टा
बर खेळला मॅच ... त्यात मैदानावर पाकिस्तानला "हरवले"च ना
साले बांग्लादेशी इथे येउन आपल्याच डोक्यावर मिर्या वाटतात ... तेही दररोज...त्यासाठी काय करायचे मग??
"टगे" मु*यची गोश्ट करतात...त्यासाठी काय करायचे मग??
फक्त सचिन उलट उत्तर देत नाही म्हणुन काहिही बोलायचे
25 Apr 2014 - 6:34 pm | टवाळ कार्टा
आणि "भारताचे सैनिक मरतायत" यासाठी **त दम नसणारे नेते जबाबदार आहेत...वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर सैनिक मरणे जाउदे...त्यांच्या सावलीलासुध्धा पाकडे टरकले असते
24 Apr 2014 - 8:24 am | प्रचेतस
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. सचिनच्या कित्येक अविस्मरणिय खेळ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या पण शेवटी शेवटी त्याला खेळतांना पाहाणे म्हणजे दाढा पडलेल्या सिंहाने गवत खाण्यासारखे वेदनादायी वाटत होते.
28 Apr 2014 - 3:52 pm | अविनाश पांढरकर
+१
24 Apr 2014 - 8:43 am | मदनबाण
सुरेख !
माझ्या मनातलं आवडत क्रिकेट आता कुठेतरी हरवलय ! :(
24 Apr 2014 - 9:42 am | इरसाल
मस्त लिहीलेस मनातल्या भावनाच उतरवल्यात.
असे पण एप्रिलमधे ग्रेट लोकांचे बड्डे असतात. ;)
24 Apr 2014 - 10:17 am | सुहास झेले
सुंदर लिवलंय किसन द्येवा... अगदी मनातलं :)
24 Apr 2014 - 10:18 am | टवाळ कार्टा
सचिन....सचिन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न
24 Apr 2014 - 12:00 pm | चावटमेला
अगदि अगदि. बाकि काही म्हणा, पण ह्या एका फटक्याने भारत-पाकिस्तान सामन्यांतली हवाच काढून घेतली :)
24 Apr 2014 - 1:09 pm | बाबा पाटील
एका खेळियाने...घातलेले गारुड आयुष्यभर मनावरुन उतरणार नाही.स्वतः खेळतो,त्यामुळे अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला ते केवळ अशक्य याची पुर्ण जाणिव आहे.म्हणुनच सचिन सम कोनी नाही.दोन ते अडिच दशक शाररिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस टिकवन केवळ अतुल्य.देवा माझ्या आयुष्यात या माणसाचा खेळ मला पहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद.
28 Apr 2014 - 1:49 pm | जे.पी.मॉर्गन
>>अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला......<<
+१ बाबा. बोलिंग मशीनसमोर "ओव्हरपिच आउटसाइड ऑफ" बॉल पडणार माहिती असतानासुद्धा ताशी १४० कि.मी. नी आलेल्या बॉलला बॅट लावता आली नाही तेव्हा क्रिकेट सोडलं. तेव्हापासून कुठल्याही क्रिकेटपटूला .... खरंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूला शिव्या घालणं बंद! समोरून येणारा बॉल अडवायला फे फे उडते.... मागे जाणार्या बॉलला दिशा देणं केवळ ह्यूमनली इम्पॉसिबल. बाकी लोकं बोलणारच. बोलूदेत! :-)
30 Apr 2014 - 1:43 pm | बाबा पाटील
जे कार्यकर्ते सचिनच्या बॅटींगला शिव्या घालतात ना त्यांच्या हातात बॅट देवुन गेला बाजार एखाद्या क्लबच्याच बोलर पुढे उभे करावे बघुयात काय होत.साला एक सेंटीमिटर्ने तरी पाय हलेल की नाही आणी हलला तर बॉल दिसेल की नाही त्यांनाच ठावुक
30 Apr 2014 - 4:08 pm | बेकार तरुण
सचिन ला शिव्या घालायचि फॅशन आहे. २४ वर्शापासुन चालु फॅशन आहे ती
24 Apr 2014 - 1:38 pm | दिपक.कुवेत
सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
24 Apr 2014 - 1:57 pm | तुमचा अभिषेक
आजच्या पिढीतील आयपीएलमध्ये गेल मॅक्सवेल सारख्यांची फटकेबाजी बघत वाढलेल्यांना कदाचित सचिनच्या फटकेबाजीचे लोक का एवढे कौतुक करतात हे कधी समजणार नाही. पण हे ९०च्या दशकातील क्रिकेटप्रेमींनाच माहीती की सचिन काय अवलिया होता. अगदी तसेच जसे माझ्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही की संथ खेळणारा गावस्कर हि काय हस्ती होती. या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. वेस्टैंडीजच्या तोफखान्याला थंड करणारा गावस्कर असो वा पुर्ण भरातल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणारा सचिन असो यांची कामगिरी निव्वळ आकड्यात मोजणे हा त्यांचा अपमानच. फार मोठा विषय आहे सचिन म्हणजे, तुर्तास हॅपी बड्डे सचिन !!!
24 Apr 2014 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा
@या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. >>> +++++१११११
सुडुक मोड ऑन>>>
किसनदेवांनी सचिनदेवा'वर लिवलेला लेख अवडला!
सुडुक मोड ऑफ>>>
=))
24 Apr 2014 - 2:08 pm | मृत्युन्जय
कडक रे. मस्तच.
24 Apr 2014 - 2:26 pm | सूड
संपादकीय वाचतोय असं वाटावं इतका परफेक्ट झालाय!! *OK*
24 Apr 2014 - 2:32 pm | मी_आहे_ना
मस्त झकास लेख, प्रत्येक शब्दागणिक सचिनच्या खेळ्या डोळ्यांसमोर येउन गेल्या. काही काळ तो 'विकेट' मिळवणारा हुकमी गोलंदाजही होता (५-३२ सर्वोत्तम). मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची! खरंच एखाद्या वर्षापासून एकदिवसिय (आणि आता १६ नोव्हें २०१३ नंतर कसोटीतही) भारतीय संघात 'ते' नाव नाही बघून चुकल्यासारखं होतं.
तेंडल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
24 Apr 2014 - 4:33 pm | बॅटमॅन
लेख मस्त आवडला.
सॅऽचिन टेंडोल्कर हॅज हिट द बॉल अ माइल हाय!!! सॅऽचिन टेंडोल्कर इज द मॅस्टर ऑफ द गेम, व्हॉट ए वंऽडफुल स्ट्रोक बाय दि लिटल मास्टर!! शोएब बॉल्स अ यॉर्कर अँड सॅऽचिन टेंडोल्कर हॅज व्हॅक्ड इट ओव्हर मिड्विकेट!!!!
हे असले कायबाय ऐकताना जे खत्रा फीलिंग यायचं त्याची बरोबरी अजून कशानेही होऊ शकत नाही.
24 Apr 2014 - 3:35 pm | समीरसूर
आवडला...
24 Apr 2014 - 4:21 pm | जोशी 'ले'
झक्कास लिहलयं किसन... कणेकर, संझगिरी या पैकी कुणाला आऊटसोर्स नव्हता केला ना हा लेख? :-)
कुठेसं वाचलेलं आठवतंय कि ब्रॅड हाॅग ने त्याला पहिल्यांदा आउट केल्यावर खुप जल्लोष केला व दिवसाचा खेळ संपल्यावर त्या बाॅल वर सचिन ची स्वाक्षरी घ्यायला गेला तर त्यावर सचिन ने लिहलं वन्स इन द ब्ल्य मुन...त्या नंतर त्या बाॅलर समोर तीसएक मॅच खेळला पण त्याला परत व्हिकेट काही मिळाली नाहि सचिनची...
24 Apr 2014 - 5:04 pm | पैसा
तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
24 Apr 2014 - 8:55 pm | वपाडाव
तेंडुलकर आणी लेख दोन्ही...
24 Apr 2014 - 9:44 pm | किसन शिंदे
बाब्बौ!!!
अहोभाग्य माझे आपण माझ्या धाग्यावर पायधूळ झाडलीत ते!! :)
24 Apr 2014 - 9:38 pm | निनाद मुक्काम प...
जबरी लेख
पंचतारांकित विश्वात आपले असामान्यत्व गुणामुळे अनेक खेळातील दिग्गज पैसा , प्रसिद्धी , मदिरा मदिराक्षी मध्ये रमतांना पहिले आहे.
अश्यात आपले मध्यमवर्गीयपण जपत आपल्या विनम्र व विनयशील स्वभावामुळे समोरच्याला आपला चाहता बनविण्याचे कसब ह्याची देही ह्याची डोळा मुंबई , लंडन मध्ये कितीतरी वेळा पहिले आहे.
देवत्व बहाल झाल्यावर सुद्धा ते डोक्यात जाऊ न देणाऱ्या तेंडल्या माझ्यासाठी अवतारी पुरुष आहे.
25 Apr 2014 - 6:08 pm | टवाळ कार्टा
आवडेश :)
25 Apr 2014 - 8:05 pm | आनन्दिता
आपले असे अनुभव वाचायला आवडतील...
24 Apr 2014 - 9:48 pm | शुचि
क्रिकेटचे वेड नाही पण लेख आवडला. छान जमलाय.
27 Apr 2014 - 8:03 am | प्रशांत
लेख आवडला
27 Apr 2014 - 3:06 pm | मुक्त विहारि
आवडला.
27 Apr 2014 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनाची शैली छान. लेख आवडला.
बाकी सच्या फ्यान क्लबला असे उमाळे अधुन मधुन येतच राहतील असे वाटते. ;)
अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत !
-दिलीप बिरुटे
27 Apr 2014 - 4:21 pm | प्रचेतस
सरांशी सहमत.
त्याजबरोबर सच्याच्या किट ब्यागेतला त्या साधुबाबांचा फोटू सुद्धा.
28 Apr 2014 - 1:08 pm | मधुरा देशपांडे
अगदी अगदी. हेच आलं होतं मनात.
लेख मस्त झालाय. आवडला.
28 Apr 2014 - 12:19 am | चाणक्य
छान लिहीलय
28 Apr 2014 - 9:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी
साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात.
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!!
टेक अ बो मास्टर __/\__!!
28 Apr 2014 - 10:37 am | सुहासदवन
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!!
पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.
28 Apr 2014 - 2:54 pm | श्रीगुरुजी
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.
28 Jan 2016 - 3:21 am | एक एकटा एकटाच
लेख आवडला.