(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा)
भाग १ - http://misalpav.com/node/26930
भाग २ - http://misalpav.com/node/26938
भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981
भाग ४ - http://misalpav.com/node/27025
५) "प्यार मिला प्रीत मिली मेरे यार को ,बड़ी प्यारी जीत मिली मेरे यार को"
अनिल एका प्रेमभंगाच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण काहिशा एकलकोंड्या अनिलचे कशातच मन लागत नव्हते. दिवसा नोकरीच्या ठिकाणि वेळ निघून जाई. पण नंतर एकलेपणाचा त्रास होई. सिगारेटी फुंकूनही चित्त था-यावर रहात नव्हते.
शेवटी काहीतरी सकारात्मक करावे असा त्याने विचार केला. शिक्षणाची आवड त्याला होतीच शिवाय नोकरीतही बदल करायची इच्छा होती. म्हणुन मग त्याने अर्धवेळ शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
सक्तीचे नसले तरी अनिल नियमितपणे वर्गाला जात असे. या वर्गात अनिलसह चार मुले आणि चार मुली होत्या. हळूहळू अनिलची सगळयाशी ओळख झाली.
त्यातच एक होती निशा. दिसायला सामान्य असणा-या निशाकडे आधी अनिलचे फारसे लक्ष गेले नाही .पण प्रसंगानिमित्ताने ओळख वाढू लागली. निशाच्या आई-वडीलांचे ती ९-१० वर्षांची असतानाच निधन झाले होते. तीन बहिणीत ती सर्वात लहान होती. काही वर्षे तिने तिच्या मामांकडे राहून काढले होते. त्या काळात तिच्या मामींचे तिच्याशी वर्तन फारसे चांगले नव्हते. तिची सर्वात थोरली बहीण भारती ताई अजून अविवाहित होती तर मधल्या बहिणीचे मात्र भारतीने लग्न करुन दिले होते. निशा आता भारती सोबत रहात होती. दोघींच्या वयात सुमारे ५-६ वर्षांचे अंतर होते.भारती प्रेमळ असली तरी निशाला तिचा धाकही असे. भारती नोकरी करुन घर चालवत असे. तर निशा अजून स्वतःच्या पायावर उभी नव्हती. अर्थिक परिस्थिती बेताचीच होती. हे सगळे समजल्यावर अनिलच्या मनात निशाबद्दल एक खास हळवा कोपरा निर्माण झाला. निशाच्या घरी तो अधून मधून जात असे. हुशार, अभ्यासू आणि मवाळ स्वभावाच्या अनिल बद्दल भारतीचे ही मत चांगले होते.
निशा आणि अनिल मैत्रीच्या धाग्यांनी बांधले गेले. अनिलला निशा मनापासून आवडू लागली होती. ती देखील त्याच्याशी मोकळेपणाने वागत असे. अनेक गोष्टी खास त्याला सांगत असे. अनिल कधी लेक्चर ला येवू शकला नाही तर निशाकडून नोट्स घेण्याऐवजी तिच्याकडे आपली वही देवून तिलाच नोट्स लिहण्याचा आग्रह करी. ती पण त्याचा हा हट्ट पुर्ण करायची. आणी मग आपल्या वहीतले निशाचे सुंदर अक्षर तो एकांतात बघत राही.
पण एक दिवस तिने त्याला आपल्या प्रियकराबद्दल म्हणजे भास्करबद्दल सांगितले. तेव्हा अनिलने स्वतःच्या व मैत्रीच्या मर्यादा जाणल्या आणि मानल्याही. आपल्या मनातल्या निशाबद्दलच्या भावना केवळ मैत्रीच्याच आहेत हे त्याने स्वतःला बजावले. तसेच तिला तिच्या प्रेमात सर्वतोपरी मदत करायचेही त्याने ठरवले. भास्कर दुस-या शहरात रहात होता. तर निशाकडे मोबाईल नव्हता. आता भास्कर कधी अनिलच्या मोबाईलवर फोन करुन निशाशी बोलत असे. तर कधी भास्कर शहरात आल्यावर निशा "अनिलकडे अभ्यासाला , प्रोजेक्टची चर्चा करायला चाललीये" असं भारती ताईला सांगून भास्करला भेटायला जाई. या बनवाबनवीची अनिलला माहिती असायची आणी कधी निशाला उशीर झाल्याने भारतीचा त्याच्याकडे फोन आला तर तो योग्य प्रकारे वेळ निभावून न्यायचा. आपली निशाला मदत होते आहे, निशाने आपल्यावर विश्वास ठेवला या भावनेनेच त्याला आनंद मिळत होता.
दरम्यान निशाला नोकरी मिळाली. तिने मोबाईल घेतला. अनिलला निशाशी सतत बोलत रहावेसे वाटे. पण निशा आता व्यस्त असायची. अनेकदा लेक्चरला पण येत नसे. कधी तिने कॉल घेतला नाही किंवा sms ला उत्तर दिले नाहि किंवा "नंतर कॉल करते" असे म्हणून कॉल केला नाही की तो अस्वस्थ व्हायचा. कधी तिच्याशी भांडायचा. तिने कॉल वा sms केले, अगदी मिस्डकॉल जरी दिला तरी त्याला खूप बरे वाटायचे. मग आधी केलेल्या भांडणासाठी माफी मागायचा. एकदा त्याच्या अशा चिडचिडण्याला वैतागून तिने त्याचा फोन घेणे बंद केले. काही दिवस तिने त्याच्याशी पुर्ण अबोला धरला. त्याला स्वतःच्या वागण्याचे वैषम्य वाटत होते आणि तिच्या अबोला धरण्याने तो अस्वस्थ झाला. अर्थात गाढ मैत्रीतले अंतर टिकणारे नव्हतेच. ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. त्यानेही झाल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली. मात्र यावेळी तिने त्याला बजावले कि असे पुन्हा होता कामा नये. त्यानेही ते मान्य केले.
मग त्याने विचार केला की "आपल्या अशा नेहमीच्या अस्वस्थ होण्याने आपण निशाला त्रास देत आहोत. 'तिचे सुख, तिचा आनंद' हेच आपल्या साठी सगळं काही असून आपण वागतो मात्र उलटंच... पण यावर उपाय काय, तिच्याशी काही दिवस बोललं नाही तर वाढणा-या अस्वस्थतेला आवर कसा घालावा" ...उपाय सापडला. याआधी घरचे त्याला लग्नासाठी आग्रह धरत होते. पण आधीच्या प्रेमभंगाच्या आठवणींनी करपलेल्या मनात लग्नाचा विचार रुजत नव्हता. पण आता त्याला वाटले की आपल्या आयुष्यात कुणीतरी असावी की ज्यामुळे आपण निशाच्या विचारांनी अस्वस्थ होणार नाही , आणि तिला आपल्या वागण्याचा ,चिडचिड करण्याचा त्रास होणार नाही. या विचारांनी त्याने वधू-वर सूचक वेबसाईट वर खाते उघडले. थोड्या दिवसांत त्याला दुस-या शहरांत राहणारी स्मिता मिळाली. दोघे अधून मधून भेटू लागले, पण सध्याचा कोर्स वगैरे पुर्ण होईपर्यंत मला लग्न करता येणार नाही असे अनिलने स्मिताला सांगितले. स्मिताने ते मान्य केले. विविध विषयांवर गप्पा मारताना अनिलकडून अनेकदा निशाचा उल्लेख होत असे. हळूहळू स्मिताला जाणवू लागले की निशाचे अनिलच्या आयुष्यातील स्थान फक्त एका मैत्रीणीचे नाही. तिने त्याबद्दल त्याला छेडले असता अनिलला आपल्या भावना लपवणे कठीण गेले. स्मिता दुखावली गेली. त्याने अनेक प्रयत्न करुन तिची समजूत घातली.
दरम्यान भारतीचे लग्न ठरले. तिचे सासर त्याच शहरात काही अंतरावर होते. तरी आता निशाच्या काळजीने ती भावूक होत असे. लग्नाला काही दिवस राहिले असताना, अनिलला ती म्हणाली "मी गेल्यावर निशाची काळजी घे.." अनिलकरिता हे सारेच दिवस भारलेले होते. भारतीचे लग्न झाले, तरी ती घरी (माहेरी) वरचेवर येवून जात असे. निशाची जबाबदारी हे अजूनही तिचे प्रथमकर्तव्य होते.
शैक्षणिक वर्षाचे काही महिने बाकी असताना अचानकपणे एक दिवस भारतीला निशाच्या प्रेमाबद्दल कळाले. तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने लगेचच निशावर बंधने लादली, काही दिवस तिला कामावरही जावू दिले नाही. अनिलचा किंवा भास्कर यांचा निशाशी संपर्क होत नव्हता. भास्कर अस्वस्थ झाला होता. अनिलने त्याला धीर दिला. एक दिवस निशाच्या घरी जावून अनिलने भारतीचे याबाबत मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण उलट त्याच्या या वकीलीमुळे त्यानेच भारतीचा रोष ओढवून घेतला. भारतीने आता गावाहून मामाला बोलविण्याची तयारी चालू केली. मामा आणि इतर कुणी नातेवाईक येण्याआधी हालचाल करणे आवश्यक होते. अनिल आणि भास्करने मिळून नोंदणी विवाहाचे सगळे नियोजन केले. नोंदणी विवाह करायचा पण निशाने लगेच घरी काही सांगायचे नाही, विवाहाची माहिती लपवायची आणि शैक्षणिक वर्ष संपून परीक्षा वगैरे होईपर्यंत भारती वा ईतर नातेवाईकांच्या हो ला हो मिळवून दिवस काढायचे असे ठरले.
ठरल्याप्रमाणे काही मित्रांच्या साक्षीने नोंदणी पध्दतीने आणि मंदिरात विधीवत लग्न पार पडले. पाणीदार डोळ्यांची आणि लाघवी व्यक्तीमत्वाची निशा साडीत अधिकच लोभस दिसत होती. आपल्या प्रिय निशाचा तिच्या प्रियकराशी लग्न लावून देताना अनिल हळवा झाला होता पण निशाच्या सुखाकरिता आपण धडपडत आहोत या भावनेने सुखावला होता. तिनेही त्याचे मनापासून आभार मानले. भटजींच्या सूचनेवरुन लग्नात तात्पुरत्या "मामा बनलेल्या" एका मित्राला वाकून नमस्कार केल्यानंतर तिने भावूक होवून अनिलला पण वाकून नमस्कार केला
निशाचे मामा घरी आल्यावर मात्र तिच्याकरिता कटकटी वाढू लागल्या , तिच्यावर सतत दबाव होता. तिला होणा-या त्रासाने भास्करही हळवा झाला. अखेर निशाने निर्णय घेतला आणि अनिलच्या साक्षीने ती भास्करसोबत त्याच्या शहराकडे निघून गेली. इकडे "निशा नाही" हे समजल्यावर भारती, मामा आणि इतर नातेवाईक यांचे धाबे दणाणले. त्यांनी रात्री उशिराने अनिलला गाठले त्याच्याकडे विचारणा केली, त्याच्याशी वाद केला. अखेर अनिलने नोंदणी प्रमाणपत्राची प्रत त्या नातेवाईकांच्या तोंडावर मारली तसे त्यांचे अवसान गळाले. पुढे त्यांनी निदान आता समाजासमोर विधिवत लग्न लावूयात म्हणून निशा आणि भास्करची मनधरणि केली आणि पुन्हा एकदा विधिवत लग्न लागले.
परीक्षा जवळ येत होती. निशाचा अभ्यास , प्रोजेक्टचे काम ई सगळे बाकी होते. त्याकरिता ती परतली. भारतीने जरी लग्न लावून दिले असले तरी तिचा निशावरचा राग गेला नव्हता. त्यामुळे तिच्या घरचे (म्हणजे माहेरचे) दरवाजे निशाला बंद होते. त्यामुळे ती एका दुरच्या नातेवाईकाच्या घरी उतरली. हे घर अनिलच्या घरापासून जवळच होते. त्याने परीक्षेकरिता सुटी घेतली. अभ्यासाकरिता निशा तास न तास अनिलकडे असायची. तिचा हा सहवास त्याच्याकरिता लाख मोलाचा होता. ती एकदा भावूक होत त्याला म्हणाली "असं वाटतं की आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत" तिचे ते शब्द त्याने ह्रुदयात जपले.
परीक्षा संपली. निशा आपल्या घरी परतली. भास्कर आणि निशाने अनिल व स्मिताला आग्रहाने भेटीला बोलावले. स्मिता पण मनतली जुनी अढी विसरुन अनिलसोबत त्या दोघांकडे आली.
नंतर निशाला नवीन नोकरी मिळाली. तर भास्करने अधिक अर्थिक प्रगतीसाठी परदेशी नोकरी मिळवली व तो पुढे निघून गेला. निशा काही महिने नोकरी करत तेथेच राहिल आणि नंतर भास्कर कडे जाईल असे ठरले होते.
आता अनिलने स्मिताशी लग्नाचा विषय स्वतःच्या घरी काढला, घरच्यांनी होकार दिला. पण त्याचवेळि त्याच्या घरी काही वेगळ्या कौटुंबिक समस्या उभ्या राहिल्या , आणि त्यांबद्दल कळल्यावर स्मिताच्या आईने घूमजाव करत लग्नाला विरोध केला. स्मिता कधी आईला समजावत होती तर कधी स्वतःच गोंधळुन जात होती. अशा प्रकारे दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव होकार-नकाराच्या हिंदोळ्यावर होता. याबद्दल त्याने निशाला सांगितले, तिने त्याला घरी बोलावले. विमनस्क स्थितीत तो तिच्या घरी गेला. तिच्यासमोर त्याला अश्रू आवरता आले नाही. तिने त्याची समजूत घातली आणि "मी स्मिताशी बोलू का , तिला समजवू का?" असे तिने विचारले. त्यावर त्याने "तू नको बोलूस" असे सांगितले. स्मिताच्या मनात पुर्वी निशा आणि अनिलच्या नात्याबद्दल जी अढी निर्माण झालि होती त्याबद्दल तो नकळतपणे बोलला. निशाला काहीसा धक्का बसला.
पुढे अखेर अनिल-स्मिताचे लग्न मोडलेच. त्याला काही सुचेनासे झाले , कुणाचातरी आधार हवाहवासा वाटायचा. तो निशाला फोन करायचा. पण निशा आता त्याच्याशी जास्त बोलणे टाळू लागली. अनेकदा ती त्याचा फोन घेत नसे. तो अजूनच सैरभैर झाला. तिच्याशी भांडू लागला. तो म्हणायचा "तू फक्त माझ्याशी बोल, क्वचित भेट , अजून काही तर मी तुला मागत नाही" तर ती म्हणायची की "तु स्मिताबद्दल होत नाहीस तितका हळवा माझ्याबद्दल का होतोस ? मला याचा त्रास होतो.." अशा प्रकारे विसंवाद वाढतच होता.
निदान भास्करकडे म्हणजे परदेशी जाण्यापुर्वी तरी निशा एकदा भेटेल अशी त्याला आशा होती. पण ते ही झाले नाही.
निशाशी मैत्री तुटल्याची वेदना खूप काळ अनिलच्या काळजात खूपत राहिली. काळ सरला, अनिल आपल्या आयुष्यात स्थिरावला, त्याने लग्नही केले. पण आजही "निशाला कधी आपली आठवण येत असेल का" असा विचार त्याच्या मनात येत रहातो.
"छुपाऊँगी आँसू कैसे भीगेंगे कंगना" म्हणणा-या भावूक आणि निरागस अंजली सारखीच आपली निशा असावी आणि आपण "ये मन जीवन प्यार के ही रंग में रंगना,हँस देगी तेरी चूड़ी खनकेंगे कंगना" म्हणत,आपले अश्रू लपवत तिच्या डोळ्यातल्या आनंदात हरवून जावं असंच त्याला नेहमी वाटे. . . .पण निशा ते समजू शकली नाही.
प्रतिक्रिया
20 Mar 2014 - 11:49 pm | खटपट्या
चांगलीय कथा
21 Mar 2014 - 1:28 am | आत्मशून्य
.
21 Mar 2014 - 3:30 am | स्पंदना
हा अनिल मला आवडला. किती भावूक आहे.
21 Mar 2014 - 4:29 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
21 Mar 2014 - 5:19 pm | मुक्त विहारि
आवडली....
28 Mar 2014 - 4:38 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
30 Mar 2014 - 12:15 am | पैसा
चांगली कथा. असेही लोक असतात नाही!
17 Jun 2014 - 1:55 pm | कवितानागेश
२१८१ वाचने, ५ प्रतिक्रिया. :)
18 Mar 2016 - 9:51 pm | मराठी कथालेखक
सध्या मी या सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध लिहण्याचा प्रयत्न करत आहे.. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असू द्या...
धन्यवाद
26 Mar 2016 - 1:42 pm | मराठी कथालेखक
या कथेचा काल्पनिक उत्तरार्ध
4 Sep 2019 - 12:24 am | सुचिता१
सगळ्या कथा वाचल्या. तुमची शैली खूप ओघवती आहे. कथेत ला सच्चेपणा मनाला भिडला.
तुमचे नवीन लेखन बर्याच दिवसात वाचले नाही. पुलेशु!!!
4 Sep 2019 - 3:55 pm | मराठी कथालेखक
सुचिताजी , मनःपुर्वक धन्यवाद.
हो.. बरेच दिवसात नवीन काही लिहिणे झाले नाही हे खरंय.. शशक स्पर्धेत माझी पूर्ण-अपूर्ण ही कथा होती पण ती बहुधा कुणाला फारशी आवडली नाही.
त्यानंतर अजून काही कथालेखन केलं नाही. एका कथेचं सुत्र आहे डोक्यात पण शेवटी हलकासा विनोदी ट्विस्ट असलेली कथा मला कितपत जमेल याबद्दल थोडी शंका आहे. ..बघू..
7 Sep 2019 - 11:59 am | श्वेता२४
आवडली.
7 Sep 2019 - 1:21 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
8 Sep 2019 - 11:53 pm | शशिकांत ओक
अहो कल्पनेच्या बाहेर सुंदर रचली आहेत.
प्लीज तिला या पुढे कल्पनेचा पतंग लाऊ नका...!
9 Sep 2019 - 10:00 pm | मराठी कथालेखक
हो.. अगदी सत्य घटनाच आहे ही.
निशा असं का वागली याची रुखरुख , बोच अनिलच्या मनाला कायम आहे , पण लेखक म्हणून मला निशा जे वागली त्याबाबत तिचीही काही बाजू असेल का याचा विचार करावासा वाटला म्हणून निशाची बाजू तिच्याच तोंडाने तिच्या शब्दांत ती अनिलकडे कधीतरी व्यक्त करते अशी एक कल्पना मी केली आणि ती या धाग्यात रंगवली.
इथे सत्य घटनेला कल्पनेचे पंख लावून एक धागा वाढवण्याचा उद्देश नव्हता तर निशाच्या मनाच सकारात्मकपणे विचार करण्याचा तो एक प्रयत्न होता.
10 Sep 2019 - 2:53 am | शशिकांत ओक
बरोबर आहे.
सृजनशीलता ती हीच.