(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा)
भाग १ - http://misalpav.com/node/26930
भाग २ - http://misalpav.com/node/26938
३) मै जानता हू के तू गैर है मगर यूही
आठव्या इयत्तेत तुकड्यांची सरमिसळ होवून नवीन तुकड्या बनल्यावर अपर्णा आणि अजित एका वर्गात आलेत. वर्गातील अनेक मुली अजितसाठी नवीन होत्या. मुलींबद्दल खूप आकर्षण वाटावं असंच ते वय होतं. अजितला सुध्दा काही सुंदर मुली आवडू लागल्या. पण हळूहळू इतर मुलींचा विसर पडून फक्त अपर्णाच आवडू लागली. ती सर्वात सुंदर नक्कीच नव्हती. पण आकर्षक होती. काहीशी अबोल.
अजित सहसा तिच्याशी बोलला नाही. मुलींशी कसे बोलावे हे त्याला फारसे समजत नसे आणि तसंही त्या शाळेत मुला-मुलींची मैत्री फारशी होत नसे.
नववी-दहावि पर्यंत अजितला खात्री वाटू लागली की फक्त आकर्षण नव्हे तर अपर्णावर त्याचे खूप प्रेम आहे. पण तिच्यापर्यंत त्या भावना कशा पोहोचवव्यात ते त्याला कळत नव्हते. तिला बघून बेचैनी वाढत राही. हळूहळू काही वर्गमित्रांना त्याच्या मनातील भावना कळाल्या. पण तिला अजून त्या कळायच्या होत्या. अजित अभ्यासू मुलगा होता, वर्गात नेहमी चांगला क्रमांक मिळवत असे. त्यामुळे आपल्या कडे देखणे रुप नसले तरी आपल्या हुशारीवर अपर्णा नक्कीच फिदा होवू शकेल अशी आशा त्याला वाटायची. परंतू दहावीच्या वर्षी तिला आपल्या मनातल्या भावना सांगून तिला प्रपोज करायचा मोह त्याने टाळला. काही गडबड होवून अभ्यासावर परिणाम होवू नये किंवा शाळेत आपले नाव खराब होवू नये म्हणून त्याने तो धोका पत्करला नाही. शिवाय असे काही केले आणि ते घरी कळाले तर त्या मध्यमवर्गीय घरात आई-वडीलांची काय प्रतिक्रिया असेल त्याची भिती पण होतीच.
अशा मनस्थितीत अभ्यास होणे कठीण होते तरी त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीची परीक्षा दिली. परीक्षेनंतर सुटीत रोज सायंकाळी तो तिच्या घरा पासून थोड्या अंतरावर उभे राहून ती दिसण्याची वाट बघत असे. ती दिसली की आनंदून जात असे. "मी माझा" या चारोळी कवितांच्या संग्रहाने त्या काळात त्याला मोहिनी घातली.
दहावीचा निकाल लागला, अपेक्षेप्रमाणेच त्याने घवघवीत यश मिळवले होते. अकरावीकरिता प्रवेश घेताना काही मित्रांनी त्याला सुचवले की अपर्णा कोणत्या महाविद्यालयांत प्रवेश घेते ते बघ आणि तिथेच तु घे. काहींनी त्याच्याकरिता माहिती मिळविण्याचा प्रयत्नही केला. पण अजितला शिक्षणात तडजोड करायची नव्हती. त्याच्या मते जे चांगले महाविद्यालय होते तेथेच त्याने प्रवेश घ्ययचे ठरवले.
अशा प्रकारे दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतला.
अजितला नवीन ठिकाणि अनेक सुंदर मुली दिसत, त्या आवडतही, त्यांच्याबद्दल आकर्षण ही वाटायचे. पण प्रेम मात्र त्याने फक्त अपर्णाकरिताच राखून ठेवले होते.
आता ति त्याला फारशी दिसत नसे. अखेर त्याने ठरवले की व्हॅलेंटाईन डे ला तिला प्रपोज करायचे. कॉलेजातले वातावरण मोकळेपणाचे असते आणि असे व्हॅलेंटाईन डे ला प्रपोज केले आणि तिचा जरी नकार असला तरी निदान "प्रपोज करणे" ती खेळकरपणे घेईल अशी त्याची अटकळ होती.
अल्पशा पॉकेटमनीमधून बचत करुन त्याने तिच्यासाठी भेटकार्ड घेतले. मनाची पुर्ण तयारी करुन तो तिच्या महाविद्यालयात गेला. त्याने तिला भेटकार्ड दिले. तिने ते घेण्यास नकार दिला, पण त्याने "निदान कार्ड स्विकारायला काय हरकत आहे?" असे म्हणून तिला ते स्विकारायला लावले. एवढे करुन तो त्याच्या महाविद्यालयाकडे निघून गेला. तिचा नकार उघडच होता पण निदान आपण आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवू शकलो याचे त्याला काहीसे समाधान वाटत होते. फारसा काही विचार न करता तो सायंकाळी घरी पोहोचला. आणि त्याला मोठा धक्क बसला. अपर्णा आणि तिची आई त्याची तक्रार घेवून घरी आलेल्या होत्या. अर्थातच घरी आई-वडीलांची प्रतिक्रिया खूप टोकाची होती. "बारावीला नीट अभ्यास करुन , चांगले यश आणि इंजिनिअरींगला प्रवेश मिळवेन" असे त्याने कबूल केल्यावर आई-वडीलांनी तिखट प्रतिक्रियांचा मारा कमी केला.
अपर्णाबद्दल चे प्रेम, तिने आपले प्रेम नाकारल्याचे दु:ख आणि आपली तक्रार करुन तिने प्रेमाचा अपमान केला याचा राग अशा भावनांची त्याच्या मनात सरमिसळ होवून गेली. आई-वडीलांनीसुध्दा आपले प्रेम समजून न घेता त्याला "फालतूपणाचे" लेबल लावल्याचा राग त्याच्या मनात बसला.
अशातच बारावीचे वर्ष सुरु झाले , त्याने जोमाने अभ्यास सुरु केला. कोचिंग क्लासमध्ये "एक हुशार विद्यार्थी" म्हणून तो सरांचा आवडता होता, सरांनीही त्याच्याकडे विशेष लक्ष देत त्याच्याकडून खूप सराव करुन घेतला. पुन्हा एकदा त्याने चांगले यश मिळवले, इंजिनियरींगला प्रवेश घेतला. आई-वडील आनंदात होते.
त्याच्या मनात अजूनही अपर्णाबद्दल खूप प्रेम आणि आकर्षण होते.तिने सायन्स ला प्रवेश घेतला होता. आता अनेकदा ती त्याला रेल्वे स्थानकावर दिसत असे. पण तिला पुन्हा भेटून तिची समजूत काढायचे धाडस मात्र त्याच्याकडे नव्हते. पण "ती जवळच रहाते आहे, इंजिनियरींग पुर्ण झाल्यावर नोकरीला लागून मी तिला भेटेन, अजूनही मी तिच्यावर प्रेम करतो असे तिला जेव्हा कळेल तेव्हा तिला माझ्या प्रेमाबद्दल विश्वास वाटेल आणि ती त्या प्रेमाचा स्वीकार नक्कीच करेल" अशी स्वप्ने तो रंगवत राही. या सकारात्मक विचारांसोबतच , "आई-वडीलांनी माझ्या प्रेमाला फालतूपणाचे लेबल लावले, आता बघा मी पण माझ्या भूमिकेवर कसा चिवट रहातो ते, कितीही वर्ष गेलीत तरी मी तिचच नाव घेत राहीनं, ती मिळाली किंवा नाही मिळाली तरी तिच्यावरच प्रेम करत राहीन, मग तरी यांना मुलाचे मन कळेल. एरवी यांना मुलगा म्हणजे फक्त चांगले टक्के मिळवून यांचे नाव उज्ज्वल करित असला पाहिजे...मुलाच्या सुखदु:खाशी यांना काही घेणे-देणे नाही" असे काहीसे नकारात्मक विचार त्याच्या मनात घोळत राही.
शैक्षणिक यशात त्याने सातत्य राखले. विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) जणू त्याच्या हाताचा मळ होता. पण प्रेमात आपण उत्तीर्ण होवू की अनुत्तीर्ण याची त्याला खात्री नव्हती. इंजिनियरिंगच्या दुस-या वर्षाला असताना त्याला स्थानकावर ती फारशी दिसली नाही. कदाचित तिच्या वेळा बदलल्या असतील असा त्याने विचार केला. तिस-या वर्षात असतानाही अनेक महिने तिचे दर्शन न झाल्याने तो अस्वस्थ झाला. मग एकदा एक जुना वर्गमित्र भेटला त्या मित्राने अजितला सांगितले की "अपर्णाचे लग्न झाले" अजितचा विश्वासच बसत नव्हता. कसे ?कधी ? आणि शिक्षण चालू असताना मध्येच लग्न का केले? ई अनेक शंका त्याने काढल्या. मग एक दिवस ते दोघे मित्र इतर मित्र-मैत्रिणिंकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत खूप भटकले. तिचे लग्न झाले आहे इतकीच माहिती खात्रीने मिळाली. कुणाच्या मते तिचे कुणावर तरी प्रेम जडले आणि आई-वडीलांना ते कळाले म्हणून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न दुस-या कुणाशी तरी लावले तर कुणाच्या मते ज्याच्यावर प्रेम होते त्याच्याशीच लावले. पण खात्रीने कुणालाच माहित नव्हते. खरतर अधिक खोलात जाण्यात काही अर्थ नव्हता तरी अजितची धडपड चालू होती. तसेच तिचा एखादा फोटो मिळावा म्हणून तो प्रयत्न करु लागला. अखेरीस एका मित्राने तिचा चौथ्या इयत्तेतील एक ग्रुप फोटो त्याला मिळवून दिला.
अजितच्या भावविश्वात मोठी पडझड झाली होती , त्याने एकांतात अनेकदा अश्रू ढाळले.
पुन्हा इंजिनियरींगच्या परीक्षा येत राहिल्या, त्याला घवघवीत यश मिळत होते. आईवडील त्याच्या यशाने आनंदून जात. पण मनात त्याने जे दु:ख कुरवाळत ठेवले होते त्याची कुणाला कल्पना नव्हती. तिला कधी विसरायचेच नाही हे त्याने ठरवले होते. पहिले प्रेम हेच आयुष्यातले सर्वस्व हेच तो समजत होता.
इंजिनियरिंग नंतर त्याला नौकरी मिळाली. तो काम करत असे त्या विभागाची कधी हॉटेलमध्ये पार्टी होत असे. त्या विभागात त्याचा महेश नावाचा एक सहकारी होता . महेशचा आवाज खूप चांगला होता, आणि मुकेश त्याचा आवडता गायक होता. पार्टीत एकदा गाणे म्हणायचा आग्रह झाला तेव्हा महेशने "कभी कभी" हे गाणे म्हंटले. त्यानंतरही कधी पार्टीत वगैरे अजित महेश ला तेच गाणे म्हणायचा आग्रह करत असे आणि "मै जानता हू के तू गैर है मगर यूही" ही ओळी महेशसोबत गाताना अपर्णाच्या आठवणींत हरवून जाई...
प्रतिक्रिया
10 Feb 2014 - 7:28 pm | आदूबाळ
प्रपोज केल्यावर आईला घरी तक्रार करणार्या मुली लय ड्यांजर. हा रूल ऑफ थंब न पाळल्याचे परिणाम...
10 Feb 2014 - 8:35 pm | आत्मशून्य
छान!
10 Feb 2014 - 8:50 pm | जेपी
आवडले .
10 Feb 2014 - 11:26 pm | मुक्त विहारि
ही पण कथा आवडली...
11 Feb 2014 - 7:17 am | स्पंदना
तीनही भाग आत्ताच वाचले.
मला मूळ सुंबरान बद्दल वाचायला मिळेल का? नाही तर तुम्हीच लिहा ना.
11 Feb 2014 - 12:10 pm | मराठी कथालेखक
सुंबरान फार उत्कट चित्रपट आहे, तुम्हाला पहायला मिळाला तर नक्की बघा.
मी विचार करतो आहे की सगळ्ञा कथा लिहून झाल्यावर शेवटच्या भागात सुंबरान ची कथा थोडक्यात लिहीन
11 Feb 2014 - 8:30 am | खटपट्या
मस्तै !!!
11 Feb 2014 - 10:52 am | रोहन अजय संसारे
झकास आवडली कथा , college चे दिवस आठवले.
छान छान असाच कथा येत राहू देत.
11 Feb 2014 - 4:01 pm | कवितानागेश
आवडली कथा. :)