विचित्रवीर्याची विचित्र कहाणी
चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने)
यापूर्वीची कथा:
कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १)
मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
मदनकेतु उवाच:
मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे?
नारदमुनी उवाच:
अरे, ती तर एक मोठी कथाच आहे. सांगतो, ऐक. विचित्रवीर्याचे खरे नाव चित्रवीर्यच होते. अरे, आपल्या मुलाचे ‘विचित्रवीर्य’ असे विचित्र नाव कोण ठेवील बरे? तूच विचार कर. तर सत्यवतीचा हा मुलगा वयात येईपावेतो ‘चित्रवीर्य’ या नावानेच ओळखला जात असे. त्याचा मोठा भाऊ चित्रांगद याला गंधर्वांनी ठार केल्यामुळे घाबरून तो हस्तिनापुराबाहेर पडेनासा झाला. देवव्रत राज्यकारभार उत्तम प्रकारे सांभाळत असल्याने चित्रवीर्याला काहीच काम नसायचे. सत्यवतीचा आता तोच एकुलता पुत्र उरलेला असल्याने ती त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपू लागली. सत्यवती भीष्माच्या राजकारभारात फारशी दाखल घेत नसली, तरी चित्रविर्याला शिस्त लावण्याचा वा ताब्यात ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, तर त्याला विरोध करत असे. परिणामी चित्रवीर्य मोठा झाल्यावर भोगविलास, करमणूक, निद्रा, भोजन, सुरापान, यापलिकडे काहीएक करीनासा झाला.
चित्र २: अजिंठा
आपल्या करमणुकीसाठी तो दूरदूरच्या जंगलातून सैनिकांकरवी मोठमोठे चित्रविचित्र प्राणी पकडवून आणून त्यावर थाटाने आपली मिरवणूक काढायचा.
सत्यवतीला देखील कधीकधी अरण्यातील पूर्वायुष्याची आठवण येई. मग ती प्रासादातच पाळलेल्या व्याघ्रादि वन्य श्वापदांना बघायला जाई.
चित्र ३: चित्रकार: Rudolph Ernst (1854-1932)
चित्रवीर्य अहोरात्र करमणुकीतच मश्गुल असल्याने राज्यशास्त्र, शस्त्रविद्या, युध्दकला, इत्यादी त्याला काहीच ठाऊक नव्हते. आपल्यासारखेच चार उडाणटप्पू टोळभैरव त्याने संगतीला जमवले होते, त्यांच्या संसर्गाने तर तो फारच चेकाळला. कवींनी म्हटलेच आहे:
तोयाचे परी नावही न उरते संतप्त लोहावरी
ते भासे नलिनी-दलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी
ते स्वातीस्तव अब्धि-शक्ती-पुटकी मोती घडे नेटके
जाणा उत्तम-मध्यमाधम दशा संसर्ग-योगे टिके
(वामन पंडित - स्फुट श्लोक, वृत्त: शार्दूलविक्रीडित)
विचित्रवीर्याचे वागणे आणि त्याच्या सवयी फार विचित्र होत्या. कधी सर्व दासींना पुरुष वेष धारण करावयास लावून स्वत: स्त्रीवेष घेऊन त्यांचेशी व्यवहार करावा, तर कधी निरनिराळ्या प्राण्याची सोंगे त्यांना घेण्यास लावावीत, असा त्याचा क्रम असे.
चित्र ४: Auguste Racinet's Le Costume Historique, १८७६-१८८८.
चित्र ५,६ व ७: छायाचित्रकार: Lennette Newell
त्याला रात्री भयंकर स्वप्ने पडत, आणि जागेपणी चित्रविचित्र भास होत. कधी त्याला आपल्याला मोठमोठे टोकदार पंख असून आपण एका उंच कड्यावर अडकले आहोत असे वाटून तो जोरजोरात किंचाळू लागे, तर कधी आपण एका नावेतून जात असून सभोवती पाण्यात बुडत असलेली माणसे व तरंगती कलेवरे दिसून त्याची बोबडी वळे .
चित्र ८ ते ११ चित्रकार: Gustave Doré ( 1832 – 1883)
कधी स्वत:चेच तुटलेले मुंडके हातात धरून विवस्त्र उभा असलेला वृद्ध भीष्म, कधी हातात लांब परशू घेऊन घोड्यावरून द्रुतवेगाने उडत येत असलेला मृत्यू, तर कधी महाभयंकर विचित्र पशु त्याला दिसून त्याची पाचावर धारण बसे.
अशी काही वर्षे गेली. त्याचेपासून त्याच्या दासींना संतति होऊ लागली. परंतु हळुहळू सत्यवती आणि देवव्रत हे चिंतेत पडू लागले, कारण त्या दासींपैकी कुणाला खूळ लागले, कुणाला अपस्माराचे झटके येऊ लागले, तर अन्य दासींना कोणत्या ना कोणत्या व्याधींनी वेढले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या संततींपैकी कुणी जन्मांध, कुणी पंडुरोगाने ग्रस्त, कुणी तीन पायांचे, कुणी कुबड असलेले, कुणी मर्कटमुद्रेचे, तर कुणी हातपाय चिकटलेले, असे विचित्र निपजू लागले.
हा वेळ पावेतो सत्यवतीला पाराशरापासून झालेला पुत्र व्यास, हा कृष्णद्वीपावर मोठा आश्रम स्थापून विद्याध्यायन करणारा ऋषी म्हणून विख्यात झालेला होता. त्याच्या त्या आश्रमात नाना विषयांबद्दल संशोधन चालत असे. तोच आता या समस्येचे समाधान करू शकेल, असे वाटून भीष्म त्याला भेटायला चित्रवीर्यास सोबत घेऊन प्रवासास निघाला. नदीतटाकी जाताना त्यांना अद्भुत दृष्ये दिसली, ती अशी:
करी व्याघ्र शब्दासि एके ठिकाणी
कडेलोट चाले खळाळोनि पाणी
पडे ओघ खाली जळांचा कडाडे
न त्या साहता मही ही धडाडे /१/
कडे तूटलें एक ठायासि खाली
मदें मत्त-दंती-कदंबे निघाली
तशा हत्तिंना पाहता शैल-काया
गमे मेघ जाती तळीं काय राया /२/
गुहेमाजि जे नीजले सिंह त्यांला
महत्तोय-शब्दें गमे शत्रु आला
प्रति-स्पर्धितेने स्वयं गर्जिताती
तया ऐकता श्वापदे दूर जाती /३/
तपस्वी उभे राहिले एक-पायी
तसे बैसले नेत्र झांकोनि काही
नसे मांस देही त्वगस्थी च राहे
दिसे एक डोयी जटा भार वाहे /४/
किती पर्ण भक्षोनिया राहताती
जितेन्द्रीय कोणी सदा ब्रम्ह ध्याती
किती वायू-भक्षी किती धूम्र-पानी
किती देह टाकोनी जाती विमानी /५/
(नरहरि कृत ‘गंगारत्नमाला’ वृत्त: भुजंगप्रयात )
चित्रवीर्यास नेहमीचे विलासी जीवन सोडून इतक्या दूर मजल दर मजल करत प्रवास करणे फार कष्टाचे वाटत होते. नेहमी दासींनी वेढला राहणारा आता भोवताली सर्वत्र सैनिक, घोडे, धूळ, रथांचा खडखडाट, वगैरेंनी अगदी कावून गेला. वाटेत कुणी सुंदर युवती दिसली की चित्रवीर्य अगदी घायकुतीला येत असे, पण भीष्माची कडक शिस्त आणि त्याचा दरारा, यामुळे त्याचे मनोरथ मनातच रहात.
चित्र १३: चित्रकारः William-Adolphe Bouguereau (1825-1905)
शेवटी मजल-दरमजल करीत भीष्माचा लवाजमा व्यास-आश्रमी पहुचला.
चित्र १४ : राजपूत शैलीतील चित्र इ.स. १७२५.
भीष्माने महर्षी व्यासांना वंदन करून चित्रवीर्याची समस्या कथन केली . व्यासाने चित्रवीर्याची नाडीपरिक्षा करून याच्या वीर्यात काहीतरी दोष असला पाहिजे, असे निदान केले. मग सुमेरु पर्वतात मिळणार्या दुर्लभ ‘लेणस’ नामक, पलिकडील वस्तू सहस्त्रपटीने वृद्धिंगत करून दर्शवणार्या पारदर्शी स्फ़टिक- भिंगातून तपासणी करता त्या रेतात काही विचित्र प्रकारचे जीवाणू तरंगत असल्याचे दिसून आले.
चित्र १५,१६: विचित्र सूक्ष्म जीवाणू
मग व्यासाने चित्रवीर्यास अनेक प्रकारची पथ्ये पाळण्यास सांगून औषधोपचार सुरु केला, आणि अधिक तपासणी आणि उचित औषधी शोधण्यासाठी त्याचे वीर्य एका वेळूच्या नलिकेत साठवून, ती नलिका मेणाने घट्ट बंद करून घेऊन बर्फाळ जागेत सुरक्षित ठेवली.
चित्रवीर्याच्या वीर्यातील दोष, आणि त्याचा दासींवर आणी संततीवर होणारा विचित्र परिणाम, ही गोष्ट लवकरच षटकर्णी होऊन कुचेष्टेने लोक त्याला ‘विचित्रवीर्य’ असे म्हणू लागले, आणि मग त्याचे तेच नाव रूढ झाले.
**********
सत्यवती ही मुलाची धीवरकन्या खरी, परंतु तिला आता राजेशाही थाटात रहाण्याची गोडी लागलेली होती. गंगेप्रमाणे पुन्हा आपल्या वनवासी माता-पित्याकडे जाणे तिच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते. तसेच आपले हे वैभव कायम राहून आपल्या पुढल्या पिढ्यांनाही ते यावच्चंद्रदिवाकरौ लाभावे, यासाठीही ती आसुसलेली होती. त्यासाठी चित्रवीर्याचे लवकरात लवकर लग्न लावून देऊन गादीला वारस मिळवण्याची तिला घाई लागली होती, परंतु चित्रवीर्याच्या विचित्र व्याधीमुळे त्याला कुणीही आपली मुलगी देण्यास तयार होईना. गंगा वा मत्स्यगंधेप्रमाणे एकादी वनकन्या सुद्धा मिळणे दुरापास्त झाले. स्वयंवरातून कुणी राजकन्या स्वत: जिंकून आणण्याची तर त्याची कुवत नव्हतीच. सत्यवती अगदी चिंताग्रस्त झाली, आणि तिने दूरदेशीच्या राजघराण्यातील मुली चित्रवीर्यासाठी कसेही करून आणण्यासाठी देवव्रतास गळ घातली.
देवव्रताला खरेतर असे काही करणे आवडत नव्हते, परंतु तो आजन्म अविवाहित रहाणार होता. तेंव्हा विचित्रवीर्याचा विवाह होऊन त्याला पुत्रप्राप्ती होणे, ही काळाची गरज होती. सरतेशेवटी त्याने सत्यवतीचे म्हणणे मान्य केले, आणि दूरच्या काशी राज्यातून - जिथवर अद्याप विचित्रवीर्याबद्दल बातमी पोहोचली नसावी, असे त्याला वाटत होते - ऐन स्वयंवराच्या वेळी काशीराजाच्या तीन मुली: अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे हरण करून आणले.
चित्र १७: ‘अंबा अंबिका अंबालिका’ (मल्याळी सिनेमाचे पोस्टर)
देवव्रताचे भव्य रूप, त्याचा पराक्रम वगैरेंवर त्या तिघी भगिनी मोहित झाल्या. थोरली अंबा तिच्या बहिणींना म्हणाली: अहो, असा पती आपणा तिघींना एकसमयावच्छेदेकरून लाभावा, हे खचितच आपले सौभाग्य होय:
“जो धैर्ये धर-सा, सहस्त्र-कर-सा तेजें, तमा दूर-सा
जो रत्नाकर-सा गभीर, शिर-सा भूपां, यशो-हार-सा
ज्ञाता जो सरसावला नव-रसा-माझारि शृंगार-सा
लाभे दिव्य पती असाचि आपणां, त्याते स्तवू फार-सा ”
(प्रेरणा: रघुनाथ पंडित)
... जो पर्वताप्रमाणे अचल- धैर्यवान, सूर्याप्रमाणे तेजस्वी, अज्ञानरूपी अंध:कारापासून दूर असलेला, समुद्राप्रमाणे गंभीर, राजांमधे श्रेष्ठ, यश हेच ज्याचे आभूषण - असा सत्कीर्तिवान, नवरसांमधें जसा शृंगार-रस प्रमुख, तसा सर्व ज्ञानीजनात प्रमुख असा ज्ञाता असलेला दिव्य पती आपल्याला लाभत आहे, त्याचे आपण खूप स्तवन करुया ”.....
परंतु हस्तिनापुरास पहुचल्यावर मात्र जेंव्हा त्यांना विचित्रवीर्याचा छंदीफंदीपणा, आणि त्या नतद्रष्टाशी लग्न लावण्यासाठी आपल्याला आणलेले असल्याचे समजले, तेंव्हा त्या अगदी हताश झाल्या.
त्या तिघींपैकी अंबा इजला आपला विवाह ‘शाल्व’ नामक राजाशी व्हावा, असे वाटत होते. भीष्माच्या न्यायप्रियतेविषयी ऐकून तिने ही गोष्ट त्याच्या कानी घातल्यावर त्याने तिची बोळवण केली, आणि अंबिका व अंबालिका यांचे लग्न विचित्रवीर्याशी लावून दिले. तिकडे अंबेचा स्वीकार शाल्वाने न केल्याने तिने आत्मदाह करून घेतला.
त्या सुंदर, सुशील, सुलक्षणी, अक्षतयोनि कुमारिका बघून विचित्रवीर्य अगदी उतावळा झाला, परंतु व्यासांनी त्याच्यावर जो उपचार चालवला होता, तो पूर्ण झाल्याखेरीज त्याला त्या कन्यांशी व्यवहार करण्यास सत्यवती आणि भीष्माने कठोरपणाने रोखले. परिणामी तो फारच चेकाळला, आणि नाना वेडाचार करू लागला. त्यातच अचानक त्याच्या छातीत मरणांतक कळा येऊन तो गतप्राण झाला.
झाले. सत्यवतीचे स्वप्न धुळीला मिळाले. तिची दोन्ही मुले आपल्या पित्याच्या भेटीस यमसदनी गेली. आता काय करावे, हे तिला व भीष्मालाही कळेनासे झाले. भीष्माने आपला निश्चय मोडून अंबिका आणि अम्बालिकेशी व्यवहार करून पुत्रोत्पत्ती करावी, असा आग्रह सत्यवतीने धरला, परंतु भीष्मास ते मान्य नव्हते. तथापि पूर्वी व्यासाने विचित्रविर्याचे रेत वेळु-नलिकेत संग्रहित करून नेलेले असल्याचे भीष्मास स्मरण झाले, आणि औषधिप्रयोगाने ते वीर्य आता निर्दोष झाले असल्यास वेळुयोनियोगाद्वारे गर्भसंभव होऊ शकतो किंवा कसे, याविषयी व्यासास पृच्छा करण्याचे त्याने ठरवले.
चित्र १८: ‘महाभारत’ चित्रकार: पै. मकबूल फिदा हुसेन. (१९१५-२०११)
(क्रमश:)
टीप: या लेखातील चित्रे त्या त्या प्रसंगांना अनुरूप वाटली, म्हणून घातलेली आहेत. मूळ चित्रांचा त्यांचेशी संबंध असेलच, असे नाही.
प्रतिक्रिया
8 Feb 2014 - 11:54 pm | प्रचेतस
हा भागही मस्त झालाय. चित्रेही अगदी अनुरूप.
बाकी महाभारतानुसार अंबिका आणि अंबालिका ह्या दोन बायका मिळाल्यानंतरच विचित्रवीर्य मदांध झाला आणि भोगातिरेकाने त्याला रोग होऊन त्यातच त्याचा अकाली अंत झाला.
9 Feb 2014 - 8:55 am | चित्रगुप्त
@वल्ली:
अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाहप्रसंगी त्या मुलींचे, विचित्रवीर्याचे, तसेच भीष्म आणि सत्यवती यांचे वय किती किती असावे?
9 Feb 2014 - 8:21 pm | प्रचेतस
वयांचा काहीच अंदाज लावता येत नाही तरी पण लग्नाच्या विचित्रवीर्य लहान होता असा उल्लेख आहे. म्हणजे साधारण षोडषवर्शीय असावा. अंबिका, अंबालिक्चे वयही साधारण तितकेच असावे. विचित्रवीर्य आणि भीष्मात एक पिढीचा फरक नक्कीच होता. सत्यवती साधारण भीष्माच्या वयाचीच असावी.
8 Feb 2014 - 11:58 pm | बॅटमॅन
चित्रगुप्तांनी जेवढे लेख लिहिले त्यांत हा सर्वोत्तम झाला आहे. चपखल चित्रे, तितकेच वेधक वर्णन आणि योग्य तिथे ओक टच यामुळे लेख नुसता वाचनीय नाही तर मुहुर्मुहु: प्रेक्षणीय झालेला आहे.
त्यात वामनपंडित, रघुनाथपंडित आणि नरहरींच्या काव्यांचा उल्लेख पाहून तर जो आनंद झाला, व्व्वाह!!!!!!! हॅट्स ऑफ चित्रगुप्तजी. ते श्लोक पुन्हापुन्हा वाचून आनंद घेतो आहे.
त्या गंगालहरीमधला तो 'सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटावही एकदा येऊद्या, फाऽऽऽऽर मजा येईल बघा.
चित्रे शब्दापरी होती शब्दही होति चित्रसे |
आस्वादीं लोपती शब्द, चित्रगुप्तहि होतसे ||
10 Feb 2014 - 8:46 am | चित्रगुप्त
@ बॅटमॅनः
‘सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटाव आत्ताच वाचला. बहारदार आहे खरा. कटाव म्हणजे काय, याबद्दल माहिती द्यावी.
वामनपंडित, रघुनाथपंडित, नरहरीं, मोरोपंत वगैरेंच्या रचना म्हणजे मराठी भाषेची अमूल्य लेणी आहेत. अलिकडे हे सर्व विस्मृतीत गेलेले आहे, त्यांचा पुन्हा प्रसार व्हायला हवा. या लेखाचे निमित्ताने त्यातले थोडेसे वाचले, आणि हल्ली कुणाला फारश्या ठाऊक नसलेल्या चित्रकारांची चित्रे हुडकली, त्यातून अद्भुत आनंद लाभला.
‘कवित्व शब्द-सुमनमाळा, अर्थपरिमळ आगळा’ ही समर्थोक्ति सार्थ करणा्या रघुनाथ पंडितांच्या … ‘जो धैर्ये धरसा’ … या मूळ रचनेत, “ धर-सा, कर-सा, दूर-सा, शिर-सा, हार-सा, सरसा-वला, नव-रसा, शृंगार-सा, फार-सा” मध्ये जी ‘र-सा’ ची रसाळ मौज उडवलेली आहे, तशी या भरजरी पैठणीला मधेच लावलेल्या आमच्या ‘लाभे दिव्य पती असाचि आपणां’ च्या ठिगळामधे जमलेली नाही.
मल्याळी सिनेमाच्या पोस्टर मध्ये डावीकडे भाला घेऊन उभा असलेला किरीट धारी कोण असावा? (तो त्या तिघीं पेक्षा वयाने लहान वाटतो, त्याअर्थी भीष्म नसावा).
10 Feb 2014 - 12:05 pm | बॅटमॅन
कटाव म्हणजे नक्की कसे, याची थोडीशीच कल्पना आहे. यालाच 'कडाका' छंद असेही नाव आहे. महाराष्ट्र सारस्वतात नमूद केल्याप्रमाणे हा छंद मूळचा हिंदी काव्यातला आहे. त्याला मराठीत आणण्याचे श्रेय जाते कटावसम्राट अमृतरायांना. एका ओळीत साधारणपणे १६ मात्रा असाव्यात असे वाटते-पादाकुलक स्टाईल. पण बाकीचे नियम काय कसे हे माहिती नाही, ते पाहिले पाहिजे. बघून सांगतो.
अमृतरायांची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे. औरंगाबादेस कुणा विसा मोरो नामक गृहस्थाकडे हे कारकून म्हणून नोकरी करीत.यांचा मूळ स्वभाव एकदम थट्टेखोर होता. असेच एकदा विसा मोरोबरोबर काही मतभेद झाल्यावर त्याची नोकरी त्यांनी सोडून दिली. टवाळ तर होतेच, एकदा रस्त्याने जाताना मध्वमुनीश्वर नामक संतांची चेष्टा केली. मध्वमुनीश्वर म्हणाले, बा अमृतराया, नावाप्रमाणेच तुझी वाणी अमृतमयी आहे. अशा टवाळकीत तीस वाया नको घालवू. मग अमृतरायांना उपरती झाली आणि ते आध्यात्मिक काव्यरचनेकडे वळले. कीर्तनकारांत त्यांचे कटाव लै फेमस होते. नानासाहेब पेशव्यांच्या काळात हे होते आणि यांच्याबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्यांचे कटाव लिहायला चारपाच लेखनिक बसत, पण तरीही त्यांच्या प्रतिभेच्या ओघापुढे लिहिता लिहिता ते हतबल होत- सर्व टिपून घेणे निव्वळ अशक्यच. कदाचित पेशव्यांनीही त्यांचे कीर्तन ऐकले असण्याची शक्यता आहे , पण नीट संदर्भ पाहिला पाहिजे. हे वारले असावेत बुलढाणा जिल्ह्यातील फतेखेरडा ऊर्फ साखरखेरडा या गावी, कारण त्यांची समाधी तिथे आहे.
वरील सर्व माहिती महाराष्ट्र सारस्वत अन नवनीतामधून घेतलेली आहे.
10 Feb 2014 - 12:14 pm | बॅटमॅन
अन रघुनाथपंडितांच्या काव्यात तुम्ही म्हणता तशी बहार आहे खरीच. एखाद्या कुशल जवाहिर्याने अगदी बारीक कलाकुसर करावी तशी कारागिरी त्यात दिसते, असे सारस्वतकारांनी जे त्यांच्याबद्दल म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. अतीव चपखल वर्णने वाचून जो आनंद लाभतो तो केवळ अपूर्व आहे. उदा. न लराजाच्या येण्याची चाहूल लागताच दमयंतीच्या सख्या उठून लगबगीने बाहेर जातात त्याचे वर्णनः
"गजबजोनि समस्त तिच्या सख्या
गजगमां उठल्या तिजसारिख्या
पदर सावरितां नृपबाळिका
झळकती हृदयीं मणिमाळिका"
आणि दमयंतीस नल समोर दिसल्यावर काय होते ते सांगणारा हा श्लोकः
"प्रगट तिज पुढारा जाहला राजमौळी
वरि पदर न घेता चंद्र जैसा झळाळी
निजहृदयनिवासी काय बाहीर आला
निरखुनि दमयंती तेवि मानी तयाला"
रघुनाथपंडितांची शहामत अशासाठी की मोरोपंत अन वामनपंडित हे कवी टनावारी इतर काव्ये रचून गेलेत, पण रघुनाथपंडितांनी फक्त एक २४० श्लोकी नलदमयंती स्वयंवराख्यान लिहून दिगंत कीर्ती मिळवली. नवनीतात परशुरामतात्या गोडबोल्यांनी ते अख्खेच्या अख्खे समाविष्ट केले यातूनच त्याचे महत्त्व दिसून येते.
9 Feb 2014 - 12:55 am | निनाद मुक्काम प...
काका ,तुस्सी gr8 हो
10 Feb 2014 - 3:08 pm | चित्रगुप्त
प्राचीन साहित्य, चित्रकला यांचे स्वतःची कल्पनाशीलता आणि सृजनशीलता यांचेशी मिश्रण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मिपामुळे असे प्रयोग करण्यास वाव मिळून वाचकांच्या प्रतिसादातून आणखी नवनवीन कल्पना सुचत जातात, हे सर्व फार आनंददायक आहे.
9 Feb 2014 - 9:35 am | मदनबाण
वाचतोय.
9 Feb 2014 - 11:46 am | खटपट्या
अत्यंत रोचक,
पु भा प्र
9 Feb 2014 - 12:35 pm | जेपी
नेहमीप्रमाणे जबरदस्त .
बाकी ते स्वप्नांची चित्रे फारच भयानक आहेत .
11 Feb 2014 - 9:55 am | चित्रगुप्त
@जेपी:
ही चित्रे ज्या फ्रेंच चित्रकाराने (Gustave Doré - १८३२-८३) काढलेली आहेत, तो त्याच्या काळातील अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. (मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते ) त्याची चित्रे असलेले पहिले पुस्तक त्याच्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. पुढे त्याने बायबल, तसेच मिल्टन, दान्ते, शेक्सपीयर, एडगर आलन पो, टेनिसन, कूलरिज, व्हिक्टर ह्यूगो, बाल्झाक आणि अन्य अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी अद्भुत चित्रे बनवली. त्याकाळी छपाईसाठी चित्रे बनवणे अतिशय किचकट, मेहनतीचे आणि अतीव कौशल्याचे काम असायचे. असे असूनही त्याने हजारो चित्रे बनवलेली आहेत. त्याची पुस्तके आता संग्रहालयातील दुर्मिळ, मौल्यवान कृती म्हणून जपण्यात येतात.
रौद्र-भयानक-अद्भुत रस , हे त्याच्या चित्रात विशेषेकरून असतात.
1 Jan 2015 - 3:26 pm | नरेंद्र गोळे
मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते >>>> छे!
इलस्ट्रेटर = निरूपणकार
आर्टिस्ट = कलाकार
आणि
पेंटर = रंगारी
हे तीन स्वतंत्र शब्द प्रचलित असतांना उगाच मराठीस दूषणे काय म्हणून द्यावीत?
5 Jan 2015 - 7:55 pm | सूड
दिल्लीकर हायत त्ये, इसारलं असत्याल!! ;)
6 Jan 2015 - 8:00 am | चित्रगुप्त
आर्टिस्ट = कलाकार हे ठीक
परंतु इलस्ट्रेटर = निरूपणकार आणि पेंटर = रंगारी हे दोन्ही शब्द विशेषतः चित्रकलेच्या संदर्भात पुरेसे योग्य नाहीत.
निरूपण हे व्याख्यान इत्यादिच्या स्वरूपातही असते, तसेच रंगारी म्हटला, की तो घरे वगैरे रंगवणारा, हा अर्थ ध्वनित होतो, पेक्षा चित्रकार हा शब्द जास्त योग्य.
6 Jan 2015 - 10:25 am | नरेंद्र गोळे
पण मग तुम्हीच समर्पक पर्यायी शब्द का नाही शोधून काढत? तयार करत?
9 Feb 2014 - 1:14 pm | आदूबाळ
पण येवढा सगळा उद्योग करूनही एक पंडुरोगी आणि एक जन्मांध अशीच संतती झाली की! हे व्यासांचे अपयश की कसे?
10 Feb 2014 - 7:56 pm | चित्रगुप्त
@आदुबाळ :
महाभारतात अनेक स्त्रियांवर अन्याय केला गेलेला दिसतो, त्याचे हे एक उदाहरण आहे.
अंध आणि पंडुरोगी संतती बद्दल व्यासाने अंबिका आणि अंबालिका यांच्या डोक्यावर खापर फोडले. व्यासाने त्यांचेशी केलेल्या व्यवहाराचे वेळी म्हणे एकीने डोळे मिटून घेतले, आणि दुसरी भीतीने पांढरी पडली, म्हणून अशी संतती झाली. तसे असते, तर धृतराष्ट्र खुद्द आंधळा, आणि गांधारीने आजन्म डोळ्यांवर पट्टी बांधलेली, त्यामुळे त्यांची सर्व मुले आंधळी व्हायला हवी होती.
(‘व्यवहार’ : लहानपणी मी एका मित्राकडे खेळायला जायचो, त्या वाड्यातल्या काही वृद्ध स्त्रिया आपापसात दबल्या आवाजात काहीतरी बोलत असायच्या. कुणी जवळ आले, की बोलणे थांबवायच्या. थोडेबहुत जे कानावर पडायचे, त्यात ‘व्यवहार’ हा शब्द बरेचदा यायचा. आम्हाला काहीच कळायचे नाही. अलिकडे डॉ . आनि बेझंट यांनी विद्यार्थ्यांपुढे दिलेल्या महाभारतावरील व्याख्यानांचा तात्कालीन मराठी अनुवाद वाचताना ‘अंबिका व अंबालिका यांचेशी ‘व्यवहार’ करून पुत्रोत्पत्ती’ असा शब्दप्रयोग वाचल्यावर एकदम लहानपणीचे आठवले. या शब्दाचा असा उपयोग पूर्वी केला जायचा, हे ठाऊक नव्हते).
‘विचित्रवीर्य’ असे विचित्र नाव, आणि धृतराष्ट्र- पंडूचे जन्मजात वैगुण्य, यातूनच या लेखाची कल्पना सुचलेली आहे.
9 Feb 2014 - 7:42 pm | मुक्त विहारि
वाचत आहे....
(क्रमश:) वाचून आनंद झाला....
9 Feb 2014 - 9:28 pm | अर्धवटराव
बहारदार लेखन. चित्रांनी चार चांद लावले.
9 Feb 2014 - 9:49 pm | प्यारे१
लईच घोळ हाय राव! ;)
भारी लिहीलंय. अर्धवट रावांच्या बरोबर आमचेही चार चाँद घ्या!
9 Feb 2014 - 11:10 pm | लॉरी टांगटूंगकर
लै उत्तम!!!! धागा नेहमीप्रमाणेच आवडल्या गेल्या आहे.
9 Feb 2014 - 11:36 pm | आत्मशून्य
सुपरहिट नक्कि!
10 Feb 2014 - 8:22 pm | विवेकपटाईत
चित्र सोबत असल्या मुळे वाचताना अधिक आनंद मिळाला. धन्यवाद.
10 Feb 2014 - 9:06 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
चित्रकाराचा कुंचला, कवीच्या कल्पना विलासाचा शब्दसंग्रह व कथाकाराचा मानवी गुंतागुंतीच्या संबंधाचा रेखीवपणा, असा त्रिवेणी संगम आपल्या लेखमालेत या भागात सादर झाले आहे.
11 Feb 2014 - 11:01 am | चित्रगुप्त
आमचा आगामी लेख: मिपा महाकट्टा- सोनाक्षीबाला 'पेन्थेसिलिया' समवेत.
11 Feb 2014 - 12:37 pm | बॅटमॅन
क्या बात!!!! आतुरतेने प्रतीक्षेत !!
5 Jan 2015 - 7:53 pm | प्रसाद गोडबोले
हा लेख कुठाय ?
6 Jan 2015 - 9:12 am | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/node/27210
हाच बहुतेक
11 Feb 2014 - 12:30 pm | तिमा
आवडला हे सांगायला नकोच. विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. तो फोटो आपण स्पिलबर्गला का पाठवत नाही ? कदाचित आपल्या पटकथेवर तो एक महान चित्रपट काढेल.
11 Feb 2014 - 12:45 pm | पैसा
चित्रं आणि पंडिती काव्य यांचा उपयोग करून मस्त कथानक रचलेत! प्रतिक्रिया वाचूनही फार मजा आली! एका आनंददायी धाग्यासाठी बहुत धन्यवाद!
11 Feb 2014 - 1:32 pm | अनुप ढेरे
वा ! मस्तं ! मजा आली वाचून
11 Feb 2014 - 3:34 pm | शिद
सचित्र कथा आवडली... पु. भा. प्र.
29 Dec 2014 - 9:24 pm | चित्रगुप्त
आपुला धागा वर आणि, तो येक मूर्ख.
31 Dec 2014 - 7:14 pm | तिमा
धागा वर आणल्यामुळे आनंदच झाला. पण पुढचा भाग कधी दिसलाच नाही. शिवाय तो सोनाक्षी साम्य धागा ही आलाच नाही. आता २०१५ मधे हे संकल्प पूर्ण करा.
सर्वाच मिपाबंधुंना आणि भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
1 Jan 2015 - 3:52 pm | बॅटमॅन
अहो खालचे प्रतिसाद पहा की. धाग्याची लिंक दिलीय तिथे चित्रगुप्तांनी.
31 Dec 2014 - 8:54 pm | शशिकांत ओक
तो एक मूर्ख कि पढत मूर्ख?
31 Dec 2014 - 10:05 pm | चित्रगुप्त
सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .
हा धागा ०३/०३/२०१३ ला प्रसिद्ध झालेला आहे.
http://www.misalpav.com/node/27210
(यातील काही खास फोटो संपादकांच्या सल्ल्याप्रमाणे काढून टाकावे लागलेले आहेत)
1 Jan 2015 - 6:10 pm | तिमा
चित्रगुप्ताच्या नजरेतून काही सुटत नाही. आमच्या सुटले वाटतं!
1 Jan 2015 - 3:30 pm | नरेंद्र गोळे
विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. >>>> अगदी! अगदी!!
कल्पनारम्य लेख आहे.
कल्पना तरी कशा?
हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले |
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले ||
लेख आवडला.