मम सुखाची ठेव...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
28 Sep 2008 - 10:27 am

किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या
या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!

मम सुखाची ठेव....

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारूडही तिनंच घातलं आम्हाला...!

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतीस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!

आणि तिचा तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!

ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...

शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!

--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.

कलासंगीतसंस्कृतीकवितावाङ्मयसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

28 Sep 2008 - 10:36 am | कलंत्री

लता दिदी म्हणजे महाराष्ट्राची ठेव आहे. एखादी ठेव एकदा की बॅकेत जमा केली की कधीही जावे आणि व्याज घेत जावे अशी.

एकदा की एखादी तान आवडली की आनंदाचा ठेवा घेत जावा अशी.

आनंदाचे डोही आनंद तरंग...

तात्याची कविता मनाला भावली. आजचा दिवस फक्त दिदीसाठीच

मुक्तसुनीत's picture

28 Sep 2008 - 10:41 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !
तात्या , "घायल की गत घायल जाने" हे या लिखाणाच्या बाबतीत एकदम १०० टक्के खरे !

धनंजय's picture

29 Sep 2008 - 8:33 am | धनंजय

तात्यांनी भाव स्वरांच्या पायर्‍या चढत सुंदर व्यक्त केला आहे.

ऋषिकेश's picture

28 Sep 2008 - 10:39 am | ऋषिकेश

लतादिदिंना अनेक शुभेच्छा!

"मम सुखाची ठेव" आहे!

तात्या, मनापासून आलेली ही कविता खुप आवडली :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Sep 2008 - 11:05 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपलं हे संगीताला धरून झालेलं लेखन वाचून मी थक्क झालो.आपल्याला मानलं बुवा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2008 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वरसाम्राज्ञी विषयी ...किंचीत कवी, आपण सुंदर शब्दात आमच्याच भावना मांडल्या आहेत.

कवी ग्रेस, यांचे लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर स्वगत माहेराहुनि गलबत आले वाचण्यासारखं आहे.

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

कवी ग्रेस, यांचे लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर स्वगत माहेराहुनि गलबत आले वाचण्यासारखं आहे.

खरंच सुंदर लिहिलं आहे....

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2008 - 3:05 pm | बिपिन कार्यकर्ते

ग्रेस...

सर, ग्रेसचा दुवा बघितला. सुंदर आहे.

बिपिन.

शशिकांत ओक's picture

28 Sep 2008 - 11:32 am | शशिकांत ओक

लता आजींना,
८०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या स्वरांनी आपण आम्हाला जिंकले आहेत. आमचे बालपण, तारुण्य आणि आता संध्याकाळच्या कातरवेळी, आपल्या सुरांची साथ शांत रात्री सुखावते.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा।
गोडी गायनाची लावते वेड जीवा ।।

केशवराव's picture

28 Sep 2008 - 11:17 pm | केशवराव

लता साठी ' लता आजी ' हा उल्लेख खटकतो. लताचे वय विचारात घ्यायचे का? तिच्या स्वराला वय आहे का?

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2008 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या...

खूपच छान लिहिलं आहेस, येत नाही म्हणता म्हणता. तुझ्या भावनेतील सच्चाई आणि आर्तता जाणवण्या इतपत छान लिहिलं आहेस.

बिपिन.

मंदार धारप's picture

28 Sep 2008 - 5:39 pm | मंदार धारप

तात्या,

डोळ्यात पाणी आलं रे.
ह्याहून दुसरं लतादीदींचं महात्म्य ते काय वर्णावं.

क्या बात है.........................

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Sep 2008 - 5:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाहवा तात्या! अगदी मनातल॑ रेखाटल॑ आहेत! लतादिदी नावाच्या चमत्काराला आम्ही केव्हा॑च शिरसाष्टा॑ग नमस्कार घातला आहे..

रामदास's picture

28 Sep 2008 - 6:46 pm | रामदास

फारच सुरेख लेख.
सविस्तर लिहीतो.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्राजु's picture

28 Sep 2008 - 7:50 pm | प्राजु

हे तुमचे शब्दांचे बुडबुडे अतिशय तरल आणि पारदर्शी आहेत. साधारण बुडबुड्यांमध्ये पाहिलं तर स्वतःच प्रतिबिंब दिसतं पण या तुमच्या बुडबुड्यांमध्ये केवळ अन केवळ लतादिदी, त्यांचं गाणं... आणि त्यांच्या आवाजातलं दिव्यत्व दिसतं आहे.
अतिशय सुरेख लेखन.
लतादिदीचं गाण्म म्हणजे ... आपल्यासाठी "अनंत हस्त कमलाकराने, देता किती घेशील दो कराने" असं आहे.. किती घ्यायचं हो.. झोळीच फटून जाईल पण तिच्या स्वरतला गोडवा.. त्याला अंतच नाही.
दिदिना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

28 Sep 2008 - 9:48 pm | मनीषा

लता दिदीं बद्दल सर्व भारतीयांना जे वाटते तेच तुम्ही शब्दबद्ध केले आहे .
सुंदर !!!

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 10:51 pm | प्रभाकर पेठकर

लता ताईंच्या वाडदिवसा निमित्त अत्यंत औचित्यपूर्ण, सुंदर, काव्यात्म लेखन. आवडले. अभिनंदन.
रागरागीणींबाबत औरंगजेब असलो तरी लता ताईंचे गाणे ऐकणे, आस्वाद घेणे ,त्या सुरांवर विहरणे हा सुखानुभव त्यांच्या प्रत्येक गाण्यात अनुभवला आहे.

केशवराव's picture

28 Sep 2008 - 11:23 pm | केशवराव

तात्या, आमच्याच भावनां शब्द बद्ध केल्यात. एकदम खूष ! लता बद्दल लिहीताना मन भरून येते. तिचा वाढ दिवस साजरा करण्यात तरी काय पॉईंट आहे?

नंदन's picture

29 Sep 2008 - 2:50 am | नंदन

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!

- क्या बात है! अप्रतिम!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

29 Sep 2008 - 3:35 am | चतुरंग

अप्रतिम स्फुट! जियो तात्या!!

चतुरंग

वैशाली हसमनीस's picture

29 Sep 2008 - 6:48 am | वैशाली हसमनीस

तात्या,
कविता फारच चांगली जमली आहे.खरोखरच सर्व भारतीयांनी लतादीदींना लाखो दंडवत घातले तरी कमीच पडतील असे व्यक्तिमत्व !

विसोबा खेचर's picture

29 Sep 2008 - 12:06 pm | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे अनेक आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

प्रदीप's picture

6 Apr 2009 - 12:54 pm | प्रदीप

षड्ज, गांधार, रिषभ.... हे सगळे मला अडाण्याला फारसे समजत नाही. पण हे जे लिहीले आहे,

तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!

त्यात सारे काही मला जे वाटते तेही आले. आणि हीच भावना अनेक मानवांची आहे.

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2009 - 5:02 pm | सुधीर कांदळकर

म्हणतों. अगदीं माझ्या मनांतलें.

सुधीर कांदळकर.

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 1:00 pm | पाषाणभेद

वा वा तात्या. दिदींच्या वाढदिवसाला ही काव्य कुसुमांची माला आवडली.
- पाषाणभेद

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 2:38 pm | विसोबा खेचर

विशालराव, प्रदीपराव आणि पाषाणभेद,

आपल्या प्रतिक्रियेबदल ऋणी आहे..

तात्या.

विशाल कुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 5:07 pm | विशाल कुलकर्णी

लता आजींना

निषेध ! लता अजुन १०० वर्षे लताच राहणार आहे.
तात्या कविता संदरच आणि ग्रेसच्या स्वगताचा तो दुवा...क्या बात है, डॉक्टरसाहेब, धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)