"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?"
"अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?"
बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं..
खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग....
उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु. भेटल्यावर आनंदाने नमस्कार म्हणायचा...नाव ऐकलं की...
"आपण बसत जाउ रे रियाजाला, आठवड्यातुन एकदा तरी"
"हो रे अमोल, पण तुझ्याबरोबर वाजवायचं म्हटलं कि जरा टेंशन येतं रे"
"अरे असं नको म्हणू..त्या निमित्तानी दोघांचा रियाज पण होइल रे..."
"येस्स.....या रविवार पासुन नक्की बसु, करतो तुला फोन"
तो रविवार कधिच आला नाही.
त्याची खरी ओळख झाली कॉलेज संपल्यावर. एका गीतरामायणाच्या कार्यक्रमासाठी तो बासरीच्या साथीला होता. त्याला कुठल्याही कार्यक्रमात घेताना नवीन माणूस जरा बिचकयचा.
कलाकार म्हणून कितिही तयारीचा असला तरी 'डोळस' नव्हता ना!!
त्याने घातलेला काळा चष्मा बघितला कि समोरच्याच्या मनात नाना प्रश्न यायचे...बासरी नीट वाजवेल हो, पण ह्याच्याशी स्टेजवर संवाद कसा साधणार?, एखादं गाणं अचानक बदललेलं ह्याला कसं सांगणार? जाण्या-येण्याची सोय काय करायची ह्याची...पण अमोलनी सगळ्या गोष्टी आधीच सोडवलेल्या असायच्या. प्रॅक्टीस/कार्यक्रमाचं ठिकाण तो कळवायला सांगायचा आणी बहुतेक वेळेला सगळ्यांच्या आधी एकटा तो हजर असायचा..तो नाही म्हणून कधीही ऐनवेळेला धावपळ झाली नाही....
लौकिक अर्थानं डोळे नव्हते त्याला, पण स्टेजवर सगळ्यात 'डोळस' तोच असायचा....
एका कार्यक्रमाला स्टेजवर बसत होतो....माझी तबल्याची जुळवाजुळव चाललेली होती....बाकीच्यांची ऐनवेळेसची तयारी...माईक सिस्टिम यथातथाच होती.. काही केल्या hamming थांबेना...कुठलंही वाद्य वाजवलं की स्पिकरमधून शिट्टी सुरु नाना प्रकार करुन झाले, माईक सिस्टिमविना गाणं म्हणूया इथपर्यंत बोलणी सुरु झाली.
अमोल एकच वाक्य बोलला:
"अरे, व्हायोलीनचा माईक आणी डावा स्पिकर एकमेकांकडे तोंड करुन लावलेत, चेक कर ना एकदा"
आम्ही सगळे डोळस एकमेकांकडे बघत राहीलो, इतकी साधी गोष्ट अपल्याला कशी दिसली नाही..
तो काळा चष्मा घालुन अमोलला अख्खं स्टेज दिसत होतं...लावलेले माईक दिसत होते आणी कदाचीत आमचे चेहरे पण......
फारतर १०-१२ कार्यक्रम केले असतील आम्ही एकत्र. गीतरामायण, मराठी गझल, सुगम संगीत, वेणास्वामींचे अभंग सगळ्यात तो महत्वाचा भाग होता. ५-१० कार्यक्रम कसेबसे केलेल्या 'कलाकारांच्या कला' बघीतल्या की असं वाटायचं की अमोलसारख्यांनी किति माज केला पाहीजे...कुंदगोळ ला सवाई मधे बासरी वाजवलेला अमोल आमच्यासारख्यांमधेसुद्धा तितकाच जीव लावुन बासरी वाजवायचा...
'काय वाजवायचं?' यापेक्षा 'किति आणी कुठे वाजवायचं' हे कळणं हे उत्तम साथीदाराचं लक्षण मानतात. हेच त्याचं बलस्थान होतं. आपल्याकडे असलेल्या व्यंगाचा कधीच त्यानं नकारात्मक उच्चार केला नाही.
"१५ आणी २० तारखेला काय करतोयस रे?"
"आहे मोकळा, बोल ना"
"गीतरामायणाचे २ कार्यक्रम आलेत, प्राधिकरणात असतील, जमेल?"
"हो, प्रॅक्टीसचं कसं काय?"
"सांगतो १-२ दिवसांत...मानधन किति सांगु तुझं?"
"अरे, तु आणलेला कार्यक्रम आहे...तु मला आठवणीनं फोन केलास मला मिळालं मानधन"
"इतकं मोठं नका करु पंडीत....मागच्या वेळेसचे धरू?"
"चालेल की, भेटू मग"
साधारण २-३ मिनिटांत हा फोन संपला. दुपारी ३-४ वाजता झाला असेल हा फोन.
रात्री १० च्या दरम्यान एका ओळखीच्या काकांचा फोन आला...
"अरे, काशिधाम मधे तुमचा कार्यक्रम झाला होता तेव्हा बासरीला कोण होतं रे?"
"अमोल देवगांवकर, का हो?"
"अरे देवा, शेवटी बातमी खरीच म्हणायची की......"
"म्हणजे?"
"अॅक्सिडेंट झाला अरे त्याचा....गेलाय तो"
चक्रावुन गेलो.......
"अहो काय बोलताय? आज दुपारी बोललो त्याच्याशी"
"अरे, तो आणी त्याचे बाबा पुण्याला चालले होते स्कुटीवरुन, नाशिक फाट्याला नवीन पुलापाशी झालं....."
अजुनही नाशिक फाट्याच्या पुलाजवळून गेलो तर धस्सं होतं.........
पु. लं च्या रावसाहेबांसारखं ओरडावसं वाटतं " कशाला भेटलास रे.........?"
अमोलशेठ, जायला नको होतं तुम्ही....आठवण येते हो...........
प्रतिक्रिया
12 Dec 2013 - 8:10 pm | ज्ञानव
"गमावणे" मग ते कुठ्ल्याहि नात्यातले असो "पाणावल्या"शिवाय राहत नाही..
12 Dec 2013 - 8:34 pm | वडापाव
हेच म्हणतो.
शीर्षकामुळे कट्यार आठवली.
12 Dec 2013 - 8:36 pm | वडापाव
युथ फेस्टच्या फोक ऑर्केस्ट्रामध्ये डोळस लोकांपेक्षा आंधळे वादकच नेहमी जास्त प्रभावशाली वाटत आले.
13 Dec 2013 - 1:15 pm | बहुगुणी
तुमच्या लेखातून तुम्ही उत्तम श्रद्धांजली वाहिली आहे.
अशा अपघातांच्या बातम्या नेहेमीच वाचनात येतात, प्रत्येक 'जाण्या'मागे केवळ एक आयुष्य अकाली खुडलं जातं इतकंच नसून कधीकधी एक अमूल्य कलाकार कायमचा थांबला आहे ही जाणीव सुन्न करणारी आहे.
20 Dec 2013 - 7:13 pm | पंडित मयुरेश ना...
खरच निलेश तु खुप छान लेख लिहिला आहेस.....मला हि देखील कल्पना आहे कि कदाचीत तुला आणखिही काहि लिहायचे असेल पण शब्द सापडत नसतील.......
मुळात तु म्हणलास अगदी तसच अमोल हि काहि खुप बोलका नव्हता......बोलकी होती ति त्याची बासरी.....बोलकी होती ती त्यची प्रत्येक कार्यक्रमाला असलेली साथ.......
आणि म्हणुनच कदाचीत इतरांसाठी जरी तो अंध असला तरी आपल्यासाठी प्रत्येक कार्यक्रमातील त्याची उपस्थिती डोळस होती.........
अमोल सारखा बासरी वादक कलाकार गेल्याच दु।ख निश्चितच आहे पण त्याहि पेक्षा एक चांगला मित्र, मार्गदर्शक, पाठिरखा गेल्याच दु।ख अधिक आहे............
22 Dec 2013 - 3:02 pm | llपुण्याचे पेशवेll
चटका लावणारी बातमी. आमच्या मंदिरात २ वर्षापूर्वी एक कार्यक्रम झाला होता. त्यातले बासरीवादकही अंध होते. माझा मित्र हर्षू गावकर तबल्याच्या साथीला होता. वाजवता वाजवता एकदा बासरीवादकाला फीट आली. पण हार्मोनियम वाजवणार्या साथिदाराने लगेच औषध दिलायवर २-४ मिनिटांत परत कार्यक्रम पूर्ववत चालू झाला.
तेच का हे देवगावकर? बातमी शोधायचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही गूगलून.
विनम्र श्रद्धांजली.
23 Dec 2013 - 9:20 pm | तिरकीट
झालंही असेल..... पण त्याला हा त्रास होत असावा. १-२ जणांकडुन ऐकलं होतं असं काहीतरी...
22 Dec 2013 - 3:16 pm | प्यारे१
:(
वाईट.
23 Dec 2013 - 10:39 pm | आतिवास
काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही - वाईट वाटलं :-(