खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.
ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत. राजा भरत, ह्या प्रदेशावर राज्य करत असे, म्हणून ह्या भूभागास ’भारत’ असे म्हटले जाई आणि त्यात वास्तव्य करणार्यात मानवांना ’भारती’ म्हणजे भरत राजाचे प्रजाजन म्हटले जाई.
आज पृथ्वीवरील सर्व मनुष्य वसाहतींत एक पुरातन संस्कृती भरतखंडात नांदत आहे. त्यामुळेच आज, मानवी अनुभवाचा मोठा कालखंड लाभलेले क्षेत्र भारत आहे. इजिप्त, ग्रीक, चीन यांसारख्या देशांतही अनेक पुरातन संस्कृती अस्तित्वात आहेत. मात्र त्या देशांतील संस्कृतींनी जपलेल्या मानवी-अनुभवलेखनाच्या पद्धती आपल्याइतक्या समृद्ध नाहीत. म्हणूनच आज आपल्या संस्कृतीस, कालांतरापासूनचे सर्व ज्ञान, निरंतर आणि अखंडित स्वरूपात सांभाळून ठेवण्यात दैदिप्यमान यश लाभलेले आहे. कसे ते आपण पाहू या.
भारतात जीवनातील सर्व अनुभवांचे वर्णन करण्यास समर्थ अशा भाषेचा विकास झाला. संस्कृतीसोबतच विकसित होत गेली ती संस्कृत भाषा. मात्र त्या काळी लिहिण्याची माध्यमे सीमित असत. भूर्जपत्रे, तालपत्रे ह्यांचा वापर अनुभवलेखनार्थ केला जाई. तरीही भारतीयांनी सर्व अनुभव सूत्ररूपांनी जपण्याचे धोरण ठेवले. अनुभवाचे सार सूत्ररूपे लिहिले जाई. मात्र पिढ्या-दर-पिढ्या वंशसातत्याने ते ज्ञान टिकून राहावे ह्यासाठी मुद्रित, लिखित, नाशिवंत माध्यमांचा वापर न करता, गेय सूत्रांत बद्ध केलेले ते अनुभवसार, मौखिक गुरूशिष्य-परंपरेने अभ्यासले, राखले, विकसित केले आणि हस्तांतरित केले जाई.
बळी तो कान पिळी’ ह्या नैसर्गिक न्यायास मनुष्याने बुद्धीसामर्थ्याचे आधारे विफल ठरविले. एरव्ही अशक्त, दुर्बळ ठरणारा मनुष्य; त्याच्या अलौकिक बुद्धीसामर्थ्याने इतर सर्व शक्तिमान प्राण्यांहूनही सरस ठरला. मात्र मनुष्या-मनुष्यांतील वैमनस्यांत दोन्हीही बाजूंच्या बुद्धीवैभवाने, दोन्हीही पक्षांचा निरंतर र्हासच होत राहिला. ह्यावर उपाय म्हणून, परस्पर-सामंजस्याने मनुष्यमात्रांनी समाजशील राहून सृष्टीच्या निसर्गवैभवाचा आस्वाद घ्यावा, असा सुवर्णमध्य निघाला. सर्व मनुष्यांच्या एकत्रित बुद्धिमत्तेच्या तुलनेत एकट्या मनुष्याची बुद्धी तोकडी पडू लागली आणि मानवी सत्ता-साम्राज्यांचा उदय झाला. अशा साम्राज्यांत, प्रत्येक व्यक्तीने कशाप्रकारे यम-नियमांचे पालन केले असता सर्वात इष्ट, सर्वजनपरितोषक, संपन्न जीवनमान साकारता येईल ह्याचा शोध मग सर्वच समाज घेत राहिले. व्यक्तींनी व्यक्तींपुरते आणि समाजाचा घटक म्हणून कसे वागले असता सर्व प्राणिमात्रांचे कमाल हित साधले जाईल, त्या वर्तनास ’केवळ’ वर्तन म्हटले जाऊ लागले. ’मुक्त’ वर्तन मानले जाऊ लागले. असे जीवन जगण्याच्या संधीस मग ’कैवल्य किंवा मोक्ष’ प्राप्ती समजले जाऊ लागले.
अशा कैवल्याची किंवा मोक्षाची उद्दिष्टे मग निश्चित करण्यात आली. काय होती ती उद्दिष्टे? आज असे निस्संशयपणे सांगता येईल की ती उद्दिष्टेः
सर्वे सुखिनः संन्तु । सर्वे सन्तु निरामया: ॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःखभाग भवेत् ॥
अशा शब्दांत बांधण्यात आलेली होती. ह्या शब्दांचा अर्थ असा आहे की, सर्व सजीव सुखी व्हावेत, सर्व सजीव निरामय जीवन जगू शकावेत, सर्व सजीव कुशल राहावेत, कुणासही दुःख वाट्याला येऊ नये. प्रत्येकाने ह्या उद्दिष्टांना मनात ठेवून त्या धोरणास सुसंगत वागल्यास; असे जीवन प्रत्येकास खरेच साधता येईल, असाही विश्वास त्यामुळे निर्माण झाला.
आदर्शवत् आचार कसा असावा ते सांगणारे आचारधर्म अस्तित्वात आले. ते न पाळल्यास मानवी सत्तांनी, ते न पाळणार्यांस दंडनीय ठरवले. त्याकरता दंडसंहिता निर्माण झाल्या. दंडसंहितेत न लिहिलेल्या नियमांकरता नैतिकतेची बंधने घालून पापपुण्याच्या संकल्पना प्रचलित करण्यात आल्या. मात्र इथे तो विचार करायचा नसून, केवळ आदर्श मानवी आचरण कसे असावे ह्याबाबत आपल्या पुरातन संस्कृतीत, जो शोध घेतला गेला आणि जे नवनीत त्यातून प्राप्त झाले त्याचाच विचार इथे करायचा आहे.
अनेक आचरणसूत्रांच्या समुच्चयाने संपन्न झालेल्या संहितेस मग योग म्हणू लागले. योगाचे वर्णन अष्टांग-योग असे केले जाऊ लागले. अष्टांगयोगानुसार वर्तन करत गेल्यास प्रत्येकासच, कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशा निष्कर्षांप्रत आपले पूर्वज आलेले दिसतात.
भारतीय ब्रह्मविद्येचे लेखन वेळोवेळी, सूत्ररूपे होतच राहिले. गीतेत कृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशास, व्यास मुनींनी शब्दबद्ध करून ठेवलेले आहे. गीतेतील, अनुष्टुभ छंदात लिहिलेले, ६९७ श्लोक, ब्रह्मविद्येचे सर्व सैद्धांतिक पैलू सविस्तर उलगडून दाखवण्यास समर्थ आहेत. त्याचप्रमाणे पतंजली मुनींनी १९५ योगसूत्रांत लिहून ठेवलेली योगसूत्रे जीवनातील अनुभवसाराचे प्रात्यक्षिक पैलू शब्दबद्ध करतात. मात्र सूत्रांत सांगितलेले वर्ण्य विषय, उत्तम भाषाज्ञानाशिवाय सहजी आकलनयोग्य, राहत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्टीकरणार्थ आपले वेद, आपली पुराणे, आपले योगशास्त्र इत्यादींची भर आपल्या संस्कृतीत सतत पडत गेली. १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न जनजीवनाची गुरूकिल्ली, ह्या सर्व संहितांत मिळून भारतीय समाजाने आजही मुख्यतः मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेली आहे.
पातंजल योगसूत्रांचे वर्णन योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांनी, भारतीय मानसशास्त्र असेच केले आहे. पतंजलीमुनींनी सूत्रबद्ध केलेला योग म्हणजेच अष्टांगयोग. अष्टांगयोगात कैवल्य म्हणजेच मोक्षप्राप्तीचा मार्ग; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या टप्प्यांनी प्रगत होतो; असे सांगितलेले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य हे पाच यम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत. दैनंदिन जीवनात यम-नियमांचे पालन करणे, अष्टांगयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. अशाप्रकारे व्रतस्थ जीवन जगत असता करावयाच्या आसनांनाच हल्ली ’योग’ असे संबोधले जात असल्याने त्यांचे वर्णन वेगळ्याने करण्याची आवश्यकता नाही.
मात्र इथे एवढेच नमूद करायला हवे की, योगासने ही सावकाशपणे, शरीरास कुठेही त्रास न होता, पण शरीराची प्रत्येक स्वायत्तता हळूहळू विकास पावत राहावी अशा प्रेरणेने करायला हवीत. योगासनाच्या अंतीम स्थितीत सहा मिनिटे टिकून राहता यायला हवे. सुमारे तासभर कुठलाही व्यायाम केल्याने रक्तदाब सुमारे १० मिलिमीटर पार्याइतक्या प्रमाणात वाढत असतो, तर कुठलीही योगासने सुमारे तासभर केली असता रक्तदाब सुमारे १० मिलिमीटर पार्याइतक्या प्रमाणात कमी होत असतो, असे प्रत्यक्षात आढळून आलेले आहे. आसनांचा उद्देश, समाधीसाधनार्थ एकाग्रताप्राप्तीसाठी, शरीर संपूर्ण शिथील करून, इष्ट ते आसन दीर्घकाळ टिकवून धरण्याची क्षमता प्रस्थापित करण्याचा असायला हवा.
अशी क्षमता प्रस्थापित झाल्यावर, मग श्वासनियंत्रण शिकून घेण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता असते. पतंजली मुनींच्या सूत्रांनुसार पूरक, कुंभक आणि रेचक अशा श्वसन अवस्थांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य मिळवणे हा प्राणायामाचा उद्देश असायला हवा. परिसरात सहज सामावून जायचे असेल तर, कुठलेही काम करत असता श्वासप्रच्छवास संथ आणि नियमितपणे होत राहायला हवा. तरच प्रत्याहारास योग्य अशी पोषक अवस्था निर्माण होऊ शकते.
अशी अवस्था निर्माण झाल्यावर, धनुष्यास प्रत्यंचा लावून, बाण सोडण्यापूर्वी जसा प्रत्यंचेत धरून, तो खेचून घेत असतात, तशी एकतानता आणि अचूक नेम साधण्याची प्रक्रिया, म्हणजेच प्रत्याहार. ह्याचाच व्यावहारिक अर्थ स्वस्थचित्त होणे, दत्तचित्त होणे आणि सावधचित्त होणे असा होतो.
ह्या प्रक्रियेत ज्या विषयावर ध्यान करायचे आहे, त्यावर नेम धरायचा असतो. त्या विषयाची निश्चिती म्हणजेच ’धारणा’ होय. प्रत्येक व्यक्तीस स्वतःपुरते कार्यक्षेत्र नक्की झाले म्हणजे त्याची धारणा पक्की झाली असे म्हणता येईल.
धारणा ज्या विषयावर पक्की झालेली असेल त्या विषयावर मग मन एकाग्र करत जाण्याने ’योगः कर्मसु कौशलम्’ साध्य होत असते. अशी कौशल्यप्राप्ती हाच योग होय. त्याच विषयाच्या ध्यानात मग जीव गुंतू लागतो. एकाग्रता साधत जाते. व्यक्तीस जेव्हा अशी एकाग्रता साधत असते, तेव्हा समाधी लाभते, कैवल्य किंवा मोक्ष प्राप्त झाला असे म्हणता येते. प्रत्येक व्यक्तीस अशाप्रकारे मोक्षप्राप्ती झाली, तर सर्व समाजासच कैवल्यलाभ होऊन समाज स्थिरपद, सुखमय जीवन जगू शकतो. असेच ईप्सित मनाशी धरूनच अष्टांगयोगाची संहिता सिद्ध झालेली आहे.
निरामय, निरोगी जीवनात अष्टांगयोग कैवल्यप्राप्तीचा मार्ग दाखवतो. मात्र विकारवशात् मनुष्याला त्या मार्गावरून चालणे शक्य होत नाही. त्यास पुन्हा आरोग्यप्राप्ती करवून देण्यासाठी आयुर्वेद निर्माण झाला. पतंजली मुनींनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता. मात्र अशा अभ्यासाची उद्दिष्टे राजा रंतिदेवाच्या खालील उक्तीत स्पष्टपणे अभिव्यक्त होतात.
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवम् ।
कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥
ह्याचा अर्थ असा आहे की, मला राज्य नको, स्वर्ग नको, पुनर्जन्मही नको, मात्र सर्व दुःखपीडित प्राण्यांची दुःखे लयास जावोत अशीच माझी इच्छा आहे.
अशा प्रकारे कैवल्यप्राप्तीच्या मार्गावरून वाट चालत असता किंवा पुन्हा आरोग्यप्राप्त करत असताही, सदोदित प्राप्त होत राहणार्या अनुभवाची नोंद आपल्याच भावी काळाकरता, तसेच आपल्या भावी पिढ्यांच्या माहितीकरता, लिहून ठेवण्यास आवश्यक असणारे भाषाशास्त्रही पतंजली मुनींच्या अभ्यासाचा विषय होते.
पतंजली महामुनी हे व्याकरणभाष्याचे कर्ते, योगदर्शनाचे प्रणेते व आयुर्वेदातल्या चरक परंपरेचे जनक होत. भारतात होऊन गेलेल्या अग्रगण्य विद्वानांत पतंजलींची गणना होते. म्हणूनच त्यांना नमन करतांना राजा भर्तृहरीने आपल्या ’वाक्यपदीय’ ग्रंथाच्या प्रारंभी पुढील श्लोक लिहिला आहे.
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलिरानतोस्मि ॥
योगाने चित्ताचा, पदाने (व्याकरणाने) वाणीचा व वैद्यकाने शरीराचा मल ज्याने दूर केला, त्या मुनिश्रेष्ठ पतंजलीला मी अंजलिबंध करून नमस्कार करतो. पातंजल योगसूत्रांच्या प्रथम पादातील २४ वे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.
क्लेशकर्मविपाकाशयैः परामृष्टः पुरूषविशेषः ईश्वरः ।
योगशास्त्रात; अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेष हे पाचही क्लेश मानलेले आहेत. ज्यांच्यामुळे व्यक्ती कर्तव्यास तत्पर होत असतो. कर्म केले की मग त्याचे फळही मिळत असतेच. चांगले किंवा वाईट. त्यास विपाक म्हणतात. ते फळ मिळेल अशी सूप्त आशाही मनात असतेच. ती आशा म्हणजेच आशय. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेष हे पाचही क्लेश; त्यांच्या प्रेरणेने करावी लागणारी कर्मे; त्या कर्मांमुळे लाभणारी त्यांची फले; आणि त्या फलांच्या दुःख-आनंद पर्यवसानांप्रती मनात असलेली आशा म्हणजेच आशय ह्या सगळ्यांपासून अलिप्त असलेले पुरूष म्हणजे ईश्वर. ईश्वराच्या ह्या व्याख्येस गृहित धरूनच, प्रत्येक मनुष्यास ईश्वरत्वाचा अधिकार पोहोचतो. तो ईश्वर होऊ शकत असतो.
प्रत्येकाने ईश्वरच व्हावे. अशा ईश्वराने सर्व प्राणिमात्रांना पसायदान द्यावे. ज्यायोगे सर्व प्राणिमात्र चिरंतन, निरामय, सुखमय जीवन जगू शकतील, अशी प्रार्थना ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या समारोपात लिहून ठेवलेली आहे. इथे हे नमूद केले पाहिजे की, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांच्याच परिभाषेत ’भावार्थदीपिका’ होय. म्हणून गीतेचा मराठीत केलेला उद्बोध (अनुवाद) म्हणजेच ज्ञानेश्वरी. हे लक्षात घेता ह्या सार्या वाक्-यज्ञाने संतोष पावून प्रत्येक व्यक्तीतील ईश्वराने समाजास काय द्यावे ह्याचे केलेले स्पष्ट विवेचन म्हणजे ’पसायदान’. त्यामुळेच ते इथे उद्धृत केल्यास वावगे ठरणार नाही. उलट सुसंगतच ठरेल.
पसायदान
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज ज्ञावे । पसायदान हे ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी इये । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
अशा रीतीने काय साध्य करायचे आहे ह्याबाबत व्यक्ती आणि समष्टी ह्यांच्या कर्तव्यांचे निर्धारण झाले, तरीही त्याची माहिती समस्तांस, सतत होत राहणे गरजेचे आहे. नाहीतर प्रत्येक व्यक्ती आणि समष्टीही, अपेक्षित, ईप्सित वर्तनाहून निराळे वागत राहतील, आणि चांगले काय ते माहीत असूनही, ते साधण्याची शक्यता शिल्लक राहणार नाही. यासाठी, अशा माहितीचा प्रचार व प्रसार निरंतर करतच राहावा लागतो. त्याशिवाय, सतत लाभत राहणार्या नवनव्या अनुभवांनी, ह्या सर्व संकल्पना कायमच समृद्ध होत राहतात. त्यांचा शोध घेऊन त्या अभ्यासाचे सार, सर्वजनांपर्यंत पोहोचत राहावे, ह्याकरताही प्रचार व प्रसार निरंतर करतच राहावा लागतो.
http://nvgole.blogspot.in/ "नरेंद्र गोळे"
ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
21 Aug 2013 - 11:24 pm | पैसा
पुरातन भारतीय जीवनपद्धतीची थोडक्यात ओळख छान करून दिली आहे.
22 Aug 2013 - 12:14 am | धन्या
अतिशय सुंदर लेख !!!
22 Aug 2013 - 12:43 am | रामपुरी
आवडला
22 Aug 2013 - 2:30 am | प्रभाकर पेठकर
नीट कळण्यासाठी अजून एकदा वाचावा लागेल. पण प्रतिक्रिया द्यायची माझी योग्यता नाही.
22 Aug 2013 - 4:10 am | स्पंदना
हो! मलाही असच वाटतय. प्रतिक्रिया देण्याची माझी योग्यता नाही.
मात्र तुमच भाषा प्रभुत्व मानण्याजोगं.
मी आजपर्यंत "सर्वेऽपी सुखीना सन्तु:।" अस म्हणत होते, तुम्ही "सर्वे "म्हंटलय म्हणुन विचारते आहे, तुमच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही.
22 Aug 2013 - 12:10 pm | बॅटमॅन
"सर्वेऽपि सुखिनः सन्तु" हेच बरोबर आहे. सर्वेऽपि=सर्वे+अपि. जर नुसते सर्वे म्हटले तर ते वृत्तात बसत नाही.
22 Aug 2013 - 9:08 am | नरेंद्र गोळे
आपण बहुसंख्य भारतीय आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून असतो. भारतीत्वाच्या कोणत्या व्यवच्छेदक लक्षणांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भाव आहे? हे कदाचित आपल्यालाच नीटसे माहीत नसते. हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीविकासात “जगात वागावे कसे?” ह्या प्रश्नाचे सर्वात समर्पक उत्तर शोधण्याचे प्रयास निरंतर चालूच राहिले. त्यांदरम्यान मिळालेल्या उत्तरांचे सार आपल्या संस्कृत ग्रंथांत सूत्रबद्ध करून ठेवलेले आढळून येते, जे मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचले आहे. आज मात्र ज्ञानाची ही मौखिक परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते.
ही परंपरा नेमकी काय आहे, ही सूत्रे काय आहेत, ह्यांच्या अवलंबाने सर्वप्राण्यांचे निरंतर हित कसे साधले जाऊ शकेल, ह्या प्रश्नांची मला आढळून आलेली उत्तरे संगतवार लिहून काढण्याचा हा प्रयास आहे.
हे सर्व वाचून त्यावर अभिप्राय नोंदवणार्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
पैसाताई,
ही जीवनपद्धती पुरातन नाही. आपली आजचीच जीवनपद्धती कशी विकसित झाली ह्याचा हा पुरातन इतिहास आहे, असे म्हणता येईल हवे तर.
पेठकर साहेब,
एवढा का हो अनाकलनीय आहे हा लेख?
माझ्यासारख्या सामान्याने, सामान्यांकरता, मिसळपावाच्या चव्हाट्यावर लिहिलेला आपल्या आकलनाचा हा लेखाजोखा आहे. इथले सर्वच उपस्थित ह्यावर प्रतिक्रिया देण्यास, भाष्य करण्यास समर्थ आहेत. तुम्ही तर नक्कीच आहात. तेव्हा मनात येईल ते अवश्य बोला.
अपर्णा-अक्षय,
स्वनिंदेने अभिव्यक्त होणे योग्य नाही.
तसेच तपशीलाच्या उपहासाने, लेखनविषयावर भाष्य करणेही योग्य नाही.
मी आजपर्यंत "सर्वेऽपी सुखीना सन्तु:।" अस म्हणत होते, तुम्ही "सर्वे "म्हंटलय म्हणुन विचारते आहे, तुमच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही.>>>>
कुणाच्याही ज्ञानाबद्दल शंका आल्यास अजिबात लपवू नये. त्यात काहीही वावगे नाही.
“संन्तु” च्या ऐवजी “सन्तु” असायला हवे ही शुद्धलेखनातील चूक दुरूस्त करायलाच हवी.
सर्वेऽपि = सर्वच
सन्तु = राहावेत
भवन्तु = व्हावेत
इत्यादी अनेक पाठभेद (पठणातील) मीही ऐकलेले आहेत.
तरीही मला हे कबूल करायलाच हवे की संस्कृत ही माझी मातृभाषा नाही. संस्कृत भाषेचे औपचारिक शिक्षणही माझे फारसे झालेले नाही. मात्र, आपल्या संस्कृतीतील विकासाचे सार संस्कृतातच मौखिक परंपरेने साठवले असल्याने, ते जाणून घेण्याच्या उद्देशाने संस्कृत शिकण्याचा प्रयत्न मी करत राहिलेलो आहे.
त्यातून, मला माहीत नसलेले जर तुम्हाला नक्की माहीत असेल तर, त्याचे आधारेही आपली धारणा सुधारण्यास माझी ना नाही.
22 Aug 2013 - 12:03 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या ह्या वाक्याचा अर्थ तुमचे लेखन अनाकलनिय आहे असा अजिबात नाही. जेंव्हा आपण एखादे महत्त्वाचे लेखन वाचत असतो तेंव्हा आपली मनःस्थिती ते समजुन घेण्याच्या अवस्थेत असेलच असे नाही. डॉ. नरेन्द्र दाभोलकरांबद्दलच्या विचारांनी (मिपावर, गुगलवर, फेसबुकावर, दूरचित्रवाणी संचावरील बातम्यांधून) मन व्यापून राहिले असल्याने लेखन वाचण्यातील एकाग्रता जुळून येत नाहीए म्हणून पुन्हा एकदा निवांत क्षणी लेखातील विचारांशी मनाची जुळवणी करून लेखातील मुद्दे समजून घेतले पाहिजेत, असे मला वाटले म्हणून ते वाक्य.
आज ३२ वर्षे आखातात राहिल्याने मराठी वाचन (पुस्तकेच मिळत नसल्याने) बरेच मागे पडले आहे. कांही वैचारीक चर्चेसही (ह्या विषयावर) वाव मिळेल असे वातावरण आणि मित्र परिवार नाही ह्याने आपण 'शहाणपणा' ह्या अत्यंत आवश्यक पैलूवर मागासलेले राहात आहोत असे कधी कधी वाटते.
संस्कृत भाषेशी संबंध शाळेनंतर सुटलाच आहे. (तेंव्हाही उत्तीर्ण होण्याइतके अंक मिळविण्याइतपतच संबंध होता), आणि 'नरेद्र गोळे ह्यांचा लेख' हे दडपण ह्यासर्वाचा परिपाक म्हणून वाटले आपली योग्यता नाही.
22 Aug 2013 - 3:14 pm | स्पंदना
स्वनिंदेने अभिव्यक्त होणे योग्य नाही.
तसेच तपशीलाच्या उपहासाने, लेखनविषयावर भाष्य करणेही योग्य नाही.
स्वनिंदा नाही तर खतरनाक सत्य आहे. तुम्ही सुरेख लिहिल आहे त्यात उपाहास करण्याजोगे काहीही नाही आहे.
तपशिलाचा उपाहास नाही, माझ्या घरी मला "या कुंन्देन्दु.....मध्ये सरल सरळ या कुंदेदु अस म्हंटल जायच, त्यातच जो "जाद्ध्या" हा शब्द आहे तो सरळ सरळ "जाड्या" असा म्हंटला जायचा. मी एकटीच हे शोधुन काढुन जास्तीत जास्त शुद्ध म्हणायचा प्रयत्न केला. अर्थात निदान त्यांनी संध्याकळचा परवचा शिकवला हे ही थोरच.
मी वर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासुन होता. लायकी नसतान उगा तोंड उघडु नये माणसान हे कळत मला. तुम्ही अतिशय अप्रतिम लिहिलं आहे तुमच्या चुका येथे जास्तीत जास्त बॅटमॅन काढु शकेल मी नाही.
मला वाटल विचाराव म्हणुन विचारल त्यात उपाहास नव्हता.
22 Aug 2013 - 3:44 pm | बॅटमॅन
मूळ श्लोक
या कुन्देन्दु- तुषारहार- धवला या शुभ्र- वस्त्रावृता
या वीणावरदण्डमन्डितकरा या श्वेतपद्मासना ॥
या ब्रह्माच्युत- शंकर- प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥॥१॥॥
तो शेवटचा शब्द जाड्यापहा असाच आहे. नि:शेष +जाड्य+अपहा= समूळपणे जाड्य (जडत्व,मांद्य,अज्ञान,इ.) नाहीशी करणारी असा अर्थ आहे. उच्चार "जाड्ड्या" असा पाहिजे. "जाड्या रड्या" मधला "ड्या" चा उच्चार मराठीतच आढळतो त्यामुळे आपण श्लोकातही तसा उच्चार करू पाहतो पण संस्कृतमध्ये तसा उच्चार नाही. जोडाक्षर म्हटले की आघात ठरलेलाच आहे.
22 Aug 2013 - 5:02 pm | राही
मराठीतल्या तत्सम शब्दांमध्ये असे द्वित्त होते आणि तद्भव वा देशी शब्दांत ते होत नाही हे खरे. पण संस्कृतात ते झाले तर चालते; झालेच पाहिजे असे नाही. (असे असावे.) हिंदीतल्या तत्सम शब्दांत आणि उत्तर भारतातल्या संस्कृत उच्चारांत असे द्वित्त पुष्कळवेळा होत नाही. शक्य, कल्याण, विद्या, मिथ्या यांसारखे शब्द हलकेच उच्चारले जातात. संस्कृतातदेखील सर्व जोडाक्षरांच्या बाबतीत असे घडत नाही. धष्ट, पुष्ट, विकल्प, विसर्ग, गुप्त यांतली जोडाक्षरे आघाताविना उच्चारली जातात. फक्त जोडाक्षरातले अन्त्य अक्षर 'य' असेल तर आधीच्या अक्षराचे द्वित्त होऊ शकते.
अर्थात उत्तर भारताचे उदाहरण संस्कृत उच्चारांच्या बाबतीत देणे तितकेसे समर्पक नाही कारण त्यांच्याकडे 'अ'कारान्त शब्दांचा / उपान्त्य 'अ' स्वराचा पूर्ण उच्चार करण्याची पद्धत नाही. उदा. युध् (युद्ध), विकल्प् (विकल्प), गुप्त्(गुप्त), कल्प्ना (कल्पना), मंग्ला (मंगला) इ. चूभूदेघे.
23 Aug 2013 - 3:15 am | बॅटमॅन
तुमचा मुद्दा बरोबर आहे. एका लहानशा वाक्याबद्दल असहमती नोंदवतो फक्त.
द्वित्त इथेही होतेच-शक्य या शब्दात यकारान्त जोडाक्षर शेवटी आल्याने पूर्ण उच्चार होत नै इतकेच. नपेक्षा मराठी निराघात उच्चारांसारखे उत्तरभारतीय उच्चार कधीच ऐकलेले नाहीत.
22 Aug 2013 - 7:39 pm | यशोधरा
गोळेकाका, लेख आवडला. धन्यवाद.