ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
27 Jun 2013 - 9:55 am

२० जुन २०१३

आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला "बडी बोअर लगती है" .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती "बडी अच्छी लगती है" .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय. त्या सार्‍यांवर भाष्य न केलेलेच बरे पण आज मात्र माझा संयम सुटला !

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला., माझ्यासारख्या हाडाच्या क्रिकेटप्रेमीसाठी किती आनंदाचा हा क्षण.. मला फायनल स्कोअरबोर्ड बघायचा होता, झटपट हायलाईटस बघायची होती, बक्षीस समारंभाचा कौतुकसोहळा याची देही याची डोळा बघून, त्यानंतर एक्स्ट्रा इनिंगमध्ये अभिमानाने ऊर भरून येईस्तोवर कान तृप्त होईस्तोवर एक्सपर्ट कॉमेंट ऐकायच्या होत्या, पण..... विजयी चौकार लगावताच दुसर्‍याच क्षणाला... अरे अरे तो बॉल सीमापार तर जाऊदे म्हणेस्तोवर.. चॅनेल बदलला गेला होता !

संताप, चीडचीड, राग... अन सरतेशेवटी नेहमीचीच हतबलता..! येण्याच्या आधीच मी माझा निर्णय जाहीर केला, "मी हि सिरीअल चालू असताना जेवणार नाही, संपल्यावरच जेवेन" .. आणि आई पाटपाणी घेईस्तोवर बेडरूममध्ये निघून आलो, पण मागे वळून पाहता.. बेडरूमच्या दारात पाठोपाठ बायको हजर.. अन कंबरेवर हात ठेऊन उभी असल्यासारखी तिची मुद्रा..!

माझ्या बायकोचा राग म्हणजे राणीबागेतला वाघ..!
पिंजर्‍याबाहेर अचानक आला तर जशी तंतरेल तसेच काहीसे माझे झाले, मुकाटपणे मागे फिरलो.. पण डोके अजूनही गरम आणि पोटात भुकेने आग.. दोहोंना थंड करायचा एकच उपाय म्हणून अंड्याचे ऑमलेट आणि चार चपात्या घेऊन माझे ताट उचलले अन पुन्हा बेडरूमचा रस्ता धरला. तुम्ही खुशाल बाहेर बसून तुमची सिरीअल बघा, मी माझा आत कसा ते जेवतो !

खिडकीत उभा राहिलो की माझा नेहमीच छान मूड बनतो, म्हटलं आज तिथे जेऊनही बघूया.. दहाव्या मजल्यावरच्या ग्रिल नसलेल्या खिडकीत जेवायला बसणे तसे रिस्कीच, म्हणून एक पाय आत तर एक खिडकीच्या कठड्यावर पसरला, मांडीवरच ताट घेतले आणि सुरू झालो.. पाऊस नव्हता, पण गार वातावरण आणि थंड वारा.. पहिल्याच घासाला जाणवले की ही बैठक खासच आहे, एवढे कम्फर्टेबल एखाद्या वातानुकुलित उपहारगृहामध्ये वाटू नये. एखाद्या हिलस्टेशनवरील अगदी दरीच्या टोकाला वसलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये जेवतोय असे वाटत होते. एखाद्या बिल्डर किंवा आर्किटेकला अशी खिडकी कम डायनिंगची अभिनव कल्पना द्यायला हवी या विचारात, चार चपात्या चौदा घासांत कधी संपल्या समजलेही नाही. पण आज अन्नपुर्णा देवी माझ्यावर प्रसन्न होती. लागलीच बायको स्वताहून भात घेऊन हजर झाली. मला माकडासारखे खिडकीत बसलेले पाहून खळखळून हसली. त्याच खिडकीत मग थोडीशी जागा तिच्यासाठीही बनवली, ती देखील गप्पा मारत तिथेच रमली. ईतकेच नव्हे तर जाहिरातींचा ब्रेक संपून पुन्हा तिची सिरीअल सुरु झालीय हे देखील विसरली.. परीणामी नेहमीपेक्षा चार घास जास्तच जेवलो.. कधी नव्हे तो ढेकर आला.. कधी नव्हे ते खरकटे हात घेऊन बराच वेळ त्याच खिडकीत तिच्याशी गप्पा मारत तसाच बसून होतो.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.

१६ जुन २०१३

दहाव्या मजल्यावरील आमच्या घरकुलाचा मला भारीच अभिमान, पण गेले दोन दिवस त्या घरकुलाचा किल्ला झाला होता, ज्यात आम्ही अडकलो होतो. अर्थात सहपरीवार.. अन पुरेशी रसद होती सोबतीला, पण मन मात्र राहून राहून भरारी घेत होते अन न भिजताच परतत होते. पाऊस नुसताच आभाळ फाटल्यागत कोसळत होता. पावसाची एखादी सर यावी अन जावी.. पटकन तेवढ्यात जमेल तसे भिजून घ्यावे.. धो धो सुरुवात झाली अन सतत तेच ते बघत राहावे लागले तर नजर मरते तिथे भिजण्याची इच्छा कशी तगणार.. नेमके तेच होत होते, शनिवार घरात बसून काढला, रविवारची संध्याकाळही मावळत आली.. सोमवारी ऑफिसला जायची इच्छा खिडकीबाहेर नजर जाताच मरत होती.. सुटी म्हणजे रिफ्रेशमेंट, सुटी म्हणजे तेच ते पेक्षा काहीतरी वेगळे , पण गेले दोन दिवस अश्यातले काही घडले नव्हते.. पावसाने एखादा क्रिकेटचा सामना थांबवावा आणि खेळाडूंनी जिथे मैदानावर असायला हवे तिथे तंबूत बसून समोर मैदानाचे तळे झालेले बघत बसावे, अशीच काहीशी तगमग अनुभवत होतो..

पावसाचे एक रूप ओंगळवाणेही असते, पावसाचा एक मूड उदासीनही असतो.. अश्यावेळी ओढ लागते ती सुर्यप्रकाशाची.. ज्याला पश्चिमेने केव्हाच गिळंकृत केले होते.. ढगांची दाटी ही अशी होती, की आकाशाचा तळ दिसू नये.. पण सुदैवाने पावसाची रिपरिप थांबली, तसे याची वाटच बघत असलेलो आम्ही नाक्यावर सहज चक्कर टाकायला म्हणून बाहेर पडलो.

रस्ते अजूनही ओलेचिंब भिजलेले, अन आम्ही कोरडे ठाक.. म्हणूनच की काय चालताना बंध जुळत नव्हते, काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.. चिखलपाणी, छोटेमोठे डबके चुकवत.. ताडपत्री लाऊन उभारलेल्या वडापाव अन कांदाभजीच्या गाड्या, भूक चाळवत असूनही पावसापाण्याचे बाहेरचे नको म्हणून नजरेआड करत.. मात्र तीच नजर गरमागरम भाजलेली मक्याची कणसे हुडकत, भिरभिरवत, आम्ही नेहमीपेक्षा वेगळा रस्ता पकडला.. आता उतरलोच आहोत खाली तर काहीतरी खरेदी करून जावी, असे वाटेतले सहकारी भंडार बघून वाटून तर गेले, मात्र तेथील गर्दी पाहता ते वाटणे तेवढ्यापुरतेच उरले.. पावसाने उसंत घेतली तसे सारा गाव तिथे लोटला होता.. पण अजूनही आम्ही मात्र या पाऊसपाण्यात खाली उतरून योग्य निर्णय घेतला असे कोणी भासवत नव्हते..

लांबसडक एकाच रेषेत जाणार्‍या त्या रस्त्याच्या साधारण मध्यावर पोहोचल्यावर आम्ही परतायचा निर्णय घेतला. पाऊस कोणत्याही क्षणी परत चाल करून येईल अशी परिस्थिती होती आणि ढाल म्हणून आम्ही दोघांत केवळ एक छत्री घेतली होती. परतताना मात्र तोच तो रस्ता पुन्हा पायाखाली नको म्हणून समोरच्या फूटपाथवरून चालायचे ठरवले.. चालता चालता अचानक तिची पावले मंदावली.. अश्यावेळी तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांचा मागोवा घ्यायचा असतो हे मी जाणून होतो.. आवडीचे काही दिसले कि नेहमी तिच्यातील लहान मूल बाहेर येते, अन बालहट्टापुढे राजाचेही काही चालत नाही.. पण समोरील बेकरीच्या भट्टीतून ताजे ताजे बाहेर पडणारे पॅटीस पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले. आई कधीतरी इथले पॅटीस घेऊन यायची म्हणून चवही तोंडपाठ होती. एकेक आम्ही खाल्ले तर दोन घरच्यांसाठी म्हणून बांधून घेतले, अन पाण्याची तहान आईसक्रीमवर भागवायचे ठरवले.. खरे तर आईसक्रीम हा माझ्या खास आवडीचा असा प्रकार नाही पण तिचे एकेक चमचा भरवत राहाने.., आता बस झाले, असं बोलावसं कधी वाटत नाही.

तिथून परतताना मात्र एक सर आली.. जेव्हा घरकुल शंभर पावलांवर आले होते, हलकीशी बुंदाबांदी सुरू झाली.. गवतावर जसे दवकण तसे चमचमणारे थेंब हळूहळू तिच्या केसांवर जमू लागले.. ते पुरेसे टपोरे होईपर्यंत छत्री उघडायचा प्रश्नच उदभवत नव्हता.. जितकी भिजायची इच्छा, तितकाच बरसणारा पाऊस.. एका हातात तिचा हात आणि दुसर्‍यात मिटलेली छत्री.. थंड होत जाणार्‍या वातावरणात गारेगार आईसक्रीम.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.

- तुमचा अभिषेक

---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://misalpav.com/node/25031
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://misalpav.com/node/25051
---------------------------------------------------------------------------------------------------------

मुक्तकप्रकटनआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

विटेकर's picture

27 Jun 2013 - 2:03 pm | विटेकर

_/\_

Mrunalini's picture

27 Jun 2013 - 3:26 pm | Mrunalini

छान... आवडेश :)

रोहन अजय संसारे's picture

1 Jul 2013 - 12:16 pm | रोहन अजय संसारे

सोलिड सुख मनजे अजून काय असते .

मी चुकत नसेल तर तुमी नाही प्रसाद बेकरीत गेला होतात . मस्त गरम गरम पॅटीस. आणि खांरी पण गरम गरम पावसात एकदम मस्त , तसे प्रसाद बेकारी माझी पण आवडती जागा आआःए.

अजून लिखानाला मनपूर्वक शुभेचा .

तुमचा अभिषेक's picture

7 Jul 2013 - 2:52 pm | तुमचा अभिषेक

क्या बात है, तुम्ही कुठचे....??

अंदाज मात्र जरासा चुकला, प्रसाद बेकरी आमच्या पासून वेगळ्या दिशेला राहिली, मी सुपर बेकरीला टाळून पुढच्या सहकारी भंडार वर एक नजर मारून लवलेनमधील रोशन बेकरीला गेलो होतो .. :)

रोहन अजय संसारे's picture

8 Jul 2013 - 11:14 am | रोहन अजय संसारे

अंदाज चुकला त्या बद्दल शमा .

मी ज ज हॉस्पिटल जवळच राहतो .

योग आला तर भेट होईलच कधीतरी

लिखाण तसे तुमचे चालू राहूदे .

तुमचा अभिषेक's picture

8 Jul 2013 - 8:11 pm | तुमचा अभिषेक

ओह क्षमा वगैरे औपचारीकता नको, जर जेजेला राहत असाल तर हा अंदाज वर्तवणे हेच खूप मोठे आहे..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपल्यासारख्यांचा लोभ आहे तोपर्यंत लिखाणही असेच चालू राहीलच :)

स्पंदना's picture

3 Jul 2013 - 4:54 am | स्पंदना

जितकी भिजायची इच्छा, तितकाच बरसणारा पाऊस
+१

जेपी's picture

7 Jul 2013 - 4:21 pm | जेपी

सुंदर