१० जुन २०१३
ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती.
ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..! दुपारच्या गोळ्यांचा डोस घ्यायचाच विसरलो.! तिचा आठवणीचा फोन जो नव्हता आला. आता ट्रेनमध्येच घेऊया म्हणत पटपट आवरून बाहेर तर पडलो, पण पुन्हा एकदा.. श्या..! वरतून पाऊस कोसळत होता आणि बॅगेतली छत्री काही सापडत नव्हती. ऑफिसमध्ये सुकायला टाकलेली.. तिथेच राहिली.. तिचा फोन आला असता, तर नक्कीच छत्रीचीही आठवण केली असती.. चरफडतच मागे फिरलो, छत्री घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी, बस्स पाऊस तेवढा थांबला होता.. अश्यावेळी हे चांगले झाले की वाईट, कळत नाही.. पण फायदाच झाला, पावले झपझप टाकत स्टेशनला पोहोचलो.. ट्रेन माझीच वाट बघत ताटकळत उभी होती.. मलाही तिच्यासोबत उभेच राहावे लागले.. कधीतरीच घडते असे, पण तेव्हाच बसायची जास्त गरज भासते.. नाहीतर कधीकधी अख्खी ट्रेन रिकामी, आणि मी दाराला लोंबकळत असतो..
तासाभराचा प्रवास, वीसएक मिनिटात बसायला मिळेल याची खात्री.. तोपर्यंत हिला फोन लावला, तिचा आवाज तर नाही पण गाण्याचा आनंद घेतला.. पुन्हा पुन्हा तेच गाणे, पुन्हा पुन्हा तेच कडवे.. कितींदा ऐकायचे.. श्या..! नाद सोडून दिला शेवटी, कामासाठीच गेली होती, बिझी असेल.. पण नेमके तेव्हाच तिच्याशी बोलायची जास्त गरज भासते, गर्दीतही एकटे एकटे वाटते..
पाऊस थांबून बराच वेळ झाला होता, उकाड्याने घामाच्या धारा अंगातून बरसत होत्या. सरीवर सरी, कानशिलापासून मानेपर्यंत.. श्या..! वातावरणही किती पटकन पलटते.. पुन्हा पलटले.. वाशीला बसायला जागा मिळाली, खिडकीपासून दुसरी.. थोडाफार थंड वारा माझ्याशीही खेळू लागला, अन तिचा फोन.. काम आटोपून सीएसटी स्टेशनला उभी होती.. ती डॉकयार्ड स्टेशनला पुढील दहापंधरा मिनिटांत पोहोचणार होती, तर मला तब्बल चाळीस मिनिटे लागणार होती.. तू हो पुढे बोलत मी फोन ठेवला, आता झोपणे हा एकच टाईमपास माझ्याकडे उरला होता.. एकटे असताना डोळे मिटून स्वप्नरंजन करणे.., माझ्या आवडीचा टाईमपास.. अश्यातच कधीतरी डोळा लागतो अन वेळ भर्रकन जाते.. पण श्या..! आज येणार्या प्रत्येक स्टेशनला डोळा उघडत होता.. वडाळ्याला पुन्हा तिचा विचार मनात आला.. एव्हाना घरी पोहोचली देखील असेल.. मग पुन्हा झोपच नाही..
डॉकयार्ड आले.. आळसावलेल्या अवस्थेतच, यांत्रिकपणे उतरलो. पुढची दहा-बारा मिनिटे आता ती जड झालेली पावले उचलत घर गाठायचेय, या विचारानेच डोकेही जड झाले.. आणि पुन्हा एकदा.. श्या..! समोरच्याच बाकड्यावर बसलेली ती मला दिसत होती, वेडी घरीच गेली नव्हती.. जवळपास अर्धा तास तिथेच माझी वाट बघत होती.. वैतागायचे नाटक मी पुरेपूर वठवले, शक्य तितके तोंडसुख घेतले.. पण ती मात्र हसतच होती.. ती नजरेस पडताच माझा खुललेला चेहरा, दुरूनच तिने पाहिला होता.. अगदी उत्स्फुर्तपणे आणि अगदी आतून आलेल्या त्या फिलींग्स.. नेमक्या तिला जाणवल्या होत्या.. आपल्यासाठी कोणी थांबलेय याचा आनंद, कोणासाठी आपण स्पेशल आहोत असा फील देणारा हा आनंद, कॅश करायला म्हणून अन तिचे थांबने वसूल करायला म्हणून.. मुद्दामच लांबच्या रस्त्याने फिरून जाणे, अन वाटेत तिच्या आवडीची पाणीपुरी खाणे.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते !
.
.
.
१४ जुन २०१३
संध्याकाळच्या चहात एक जादू असते. दिवसभराच्या कामाचा अन ऑफिस ते घर प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळवणारी. तरतरी तर येतेच, पण मूडही बदलवून जाते. आजही बदलला.. नेहमीसारखाच.. त्यालाच साजेसा सूर पकडला अन शब्द शोधायला सुरुवात केली..
"क्यूs.. ना रुठे मुझसे मोहन क्यूs.. है झुठे मुठे मोहन क्यूss.. कैsसे बताऊs, हाईsय कैसे बताऊs...."
मूळ गाण्यातला मूड जरी उदासीनता दर्शवणारा असला तरी मी मात्र माझ्या मूडनुसारच गात होतो.. आपल्याच नादात.. आपल्याच तालात.. अन इतक्यात..
"माकडा, वाट लावलीस त्या गाण्याची, सगळे तोडमरोडून टाकलेस.. ‘ना रुठे मुझसे मोहन क्यू’ कधी कोणी बोलेल का..?" .. बायको गरजली.
"त्यात काय झाले.. असेल एखादा मोहन सतत बडबड बडबड करणारा.. त्यावर त्याची राधा की मीरा वैतागून बोलतही असेल, रुठ बाबा एकदाचा, तेवढाच तुझ्या तोंडाचा पट्टा तरी थांबेल." .. मी माझ्या अकलेचे तारे तोडले.
"मार खाशील हा अबड्या" .. हा आजवर कधी पडला नाही, पण इथे नमते घ्यायचे हे सवयीने समजलेलो मी, "ठिक आहे, मग तूच सांग काय ते खरे गाणे.."
आता ती सुरू झाली..
"क्यूs.. ना बोले मोसे मोहन क्यूs.. है रुठे रुठे मोहन यूss.. कैsसे बताऊs, हाईsय कैसे बताऊs..."
अचूक शब्दांत अन सुरेल चालीत.. तिच्याच नादात, तिच्याच तालात.. पहिली ओळ संपून दुसरी सुरू झाली..
"बहे नैना, भरे मोरे नैनाs, झरे मोरे नैनाss..."
पहिले कडवे आटोपून दुसरे गायला लागली, अन मी समजून चुकलो की माझ्या चुकलेल्या गाण्याचा निशाणा अचूक लागला आहे.
ते गाणे संपताच त्याला दाद न देता... तिचे गाणे मी ऐकतोय याची तिला दाद लागू न देता... स्वताशीच आणखी एक गुणगुणायला सुरूवात केली..
ओs साथी रेs.. दिनs डुबे नाs... विशाल भारद्वाज यांचे हे गाणे तिच्या खास आवडीचे., हे माहीत होते मला.. ती गातेही छान., हे ही ठाऊक होते मला.. तर, हा ही निशाणा अचूक लागला. त्या गाण्याने बनवलेला मूड हलकेच बदलत "रात का नशा अभी, आंख से गया नही.." मी तिला सुरू करून दिले.., तर ते संपताच "गुंजासा है कोई, इकतारा इकतारा" तिने स्वत:च सुरू केले.. हि संधी साधून मी बेडवर तसेच टाकलेले शर्ट, जे गाण्याच्या नादात अजून तिच्या लक्षात आले नव्हते, गपचूप उचलून हॅंगरला लावत.. अगदी सहजच .. ‘पाणी दा रंग वेख के’ घेतले.. त्यातील मुद्दामच हावभाव करत गायलेल्या ‘तेरे उत्ते मरता, प्यार तेनू करता, मिलेगा तुझे ना कोई और’ ... या कडव्याला ती हसत हसतच लाजली.. अन सुरु झाले.. नैनो की मत मानियो रे, नैनो कि मत सुनियो.. नैनो कि मत सुनियो रे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे.. पण नेमके तेच घडत होते.. हळूहळू रंगत जाणारी एक सुरमयी संध्याकाळ.. त्या सूरांच्या नजरकैदेत बांधले गेलेलो मी आणि ती.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..
.
.
- तुमचा अभिषेक
---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://misalpav.com/node/25031
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
24 Jun 2013 - 5:19 pm | भुमन्यु
हेच सुख असेल तर लग्न करायला काय हरकत आहे ;)
------
राहुल
24 Jun 2013 - 9:34 pm | तुमचा अभिषेक
जर हे वाचून लग्न करायची इच्छा उत्पन्न झाली असेल तर लेख सार्थकी ;)
25 Jun 2013 - 12:30 pm | रोहन अजय संसारे
सुंदर सुरेख अप्रतिम
खूप खूप चं सुंदर लिहिले आहे .
रोज मी पण हेच रुटीन करतो पण त्यातला रोमान्तिक भाग आज वाचल्यावर कळला .
असेच लिहित राहा.
26 Jun 2013 - 10:20 am | तुमचा अभिषेक
धन्यवाद, मलाही लिहायला लागल्यावरच समजू लागलेय की प्रेम असेल तर रोमान्स या रुटीनमध्येच सापडतो.. त्यासाठी वाट वाकडी करून एखाद्या गार्डनचा रस्ता पकडायची गरज नसते :)
25 Jun 2013 - 3:50 pm | Mrunalini
वा... आवडला हा पण भाग. मस्त.
25 Jun 2013 - 7:52 pm | पैसा
डाय हार्ड रोमँटिक आहात! शक्य तेवढे दिवस-वर्षे असे रहा दोघेही!
26 Jun 2013 - 5:27 pm | भावना कल्लोळ
सहमत आहे
25 Jun 2013 - 10:51 pm | विजुभाऊ
लाजवाब.........
26 Jun 2013 - 11:52 am | ब़जरबट्टू
मस्त लेव्हलय... मज्जा आली वाचुन....
26 Jun 2013 - 5:11 pm | तुमचा अभिषेक
धन्यवाद सर्वांचे...
ज्योतीताई, शेवटपर्यंत नक्कीच :)
27 Jun 2013 - 12:54 am | प्यारे१
>>>ओs साथी रेs.. दिनs डुबे नाs...
सहीच्च!
ए अभ्या (तुमचा अभिषेक), लई त्रास देत जाऊ नको बे!
इतना रोमँटिक कोई हो सकता है भला? ;)
27 Jun 2013 - 11:51 am | बॅटमॅन
आता तुम्ही झालात वैराग्यपर म्हणून बाकीच्यांनीही तसेच करावे का ;)
("द बॅट" मध्ये बसून झूप्पकन पळून गेलेला) बॅटमॅन.