फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तरुण तडफदार उमेदवार मा. श्री. स्पा राजे डोंबिवलीकर (ठाकुर्लीकर--- > चो... बस्स) यांचा मी हापिसात काम करीत असताना (ल्ह्यायचं आस्तंय ;) ) फोन आला. डोक्यात ऑफिस नि कानात स्पाचा आवाज! काही कळेना म्हणून थांब मीच तुला फोन करतो म्हणून फोन ठेवला. नंतर नेहमीप्रमाणे खरडाखरडीतच नक्की काय विषय होता असे विचारले असता स्पाने ऐतिहासिक शैलीत 'समर्थांनी बोलावलंय, शिवथरघळीत जायचंय' म्हणून खरडवलं. शोधाशोध करतो म्हणून सांगून कामाला लागलो. ११, १२ फेब्रुवारी शनिवार, रविवार ठरलं.
स्पा, सूड नी किसन हे त्रिदेव नेहमीप्रमाणे पाठीवर बॅग्ज घेऊन डोळ्यासमोर होतेच. बरोबर 'लीमाऊ नी तिचा बोका' ;) देखील येणार म्हटल्यावर आम्ही देखील घरी मोर्चेबांधणी सुरु केली. सौच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देऊन आम्ही यशस्वी झालो. खरडवही उचकपाचक नवसदस्य मोदक कोण कुणाला काय म्हणतंय बघताना त्याला माझी नी किसनाची खरड दिसली. भेटणार आहात तर कुठे, कसे इ.इ. चौकशी झाल्यावर तोदेखील बाईकच्या एका टायरवर यायला तयार झाला. सूड बाईकवर बसून येणार असं ठरल्यावर दुसरा टायर 'बसला'. मी आणि सौ. शुक्रवारी जायचं निश्चित झालं.
'मिन व्हाईल' मन१ ने 'रिंग' करुन त्याच्या 'क्वेरीज लिस्ट औट' करुन मला बुचकळ्यात टाकले. तो आणि त्याची 'गँग' रोहिडा की रायगड या 'डायलेमा' मध्ये होते. मला फोन केल्याने त्यांच्या क्वेरीज सॉर्ट करण्याचा त्यांचा एफर्ट फेल गेला. अर्थात यापैकी एक आणि शिवथरघळ फिक्स असं त्यांचं प्लॅन्ड होतं. शिवथर घळीतला काकडा एकदम 'प्लिजन्ट' असतो आणि नेचर पण ऑसम असतं हे त्यांना 'वेलनोन' होतं. त्यांचं वेहिकलनं येणं फिक्स होतं आणि ते शनिवारी स्टेसाठीच तिकडे येणार होते. वेल. लेट इट बी....
सगळं नियोजीत ठरल्याप्रमाणं होतं काय कधी?
घळीत फोन केल्यावर नेमकं 'आर्ट ऑफ लिव्हींग'चं शिबीर सुरु आहे असं समजलं. आठ जणांचं नियोजन होणं अवघड आहे , दोघांची सोय होऊ शकेल असं समजलं. सूडला फोन केला, तो म्हणे बघू होईल ते होईल. निघायचं ठरलं.
ठरल्याप्रमाणं शुक्रवारी दुपारी आईबाबांचा हात धरुन आम्ही दोघे निघालो. आईबाबांना बहिणीकडे जायचं होतंच. सातारा रस्त्याला लागून महाड फाट्यावर उतरायचं ठरलं. उतरलो. पुण्याहून येणार्या गाड्या कापूरहोळवरुन 'लेफ्ट' मारतात हे ज्ञान लगेच झालं नी आता बसा म्हणतो तोवरच शिरवळ भोर मिनीबस मिळाली. भोरला १ तासा ने एस्टी आहे असे समजल्याने जरा 'जाऊन' यावे म्हणेप र्यंत खेड एस टी समोर. 'तसाच' गाडीत. महामंडळ नेहमीप्रमाणं 'झिंदाबाद' .
सौ. कंडक्टरच्या मागच्या तर मी मागच्या टायरच्या मागच्या सीटवर.
भोर सोडलं की रस्ता अजिब्बात 'सरळ चालीचा नाही. त्यात चालक संतोष मानेचा जवळचा नातेवाईक असावा. याउप्पर माझ्याशेजारी 'मिक्स्ड थम्स अप' पिऊन कपड्यासकट चाळीस किलो असे एक काका सीट च्या या बाजूकडून त्या बाजूकडे डॅन्स करीत होते.
जवळून जाणारी नदी आम्हाला साथ देत होती.
सं. मा. ना.चालकानं घाटात तीन एस टीना ओव्हरटेक करुन, वरंधा घाटातल्या भुताटकी च्या तावडीत सापडायचं नाही असा निश्चय केलेला होता.
रॅक मधून पाण्यानं भरलेली एक बाटली उडून एका माणसाला आंघोळ घातली गेली एवढंच.
बायकोनं काय खाल्लंय हे सगळ्यांना समजेपर्यंत माजेरी आलं. आम्ही उतरलो तेव्हा 'शिवथर घळई'ची कमान आमचं स्वागत करत होती...
पोचायला जव'ल'पास 'सा' वाजलेन!... आता कसली 'विक्रम' (डुगडुग) मिलनार? असं म्हणत असतानाच कुंभे शिवथर गावातल्या एक पिकअप ने आम्ही दोघं मागच्या हौद्यात उभं राहून निघालो. घळईतल्या फोनवर पोचतोय असं सांगितलं होतंच. कुंभे, कसबे आणि आंबे शिवथर अशी मस्त छोट्या वाड्यांची नावं. पिकअपनं आम्हाला अगदी शिवथर घळईच्या पायथ्याला सोडून पैसे न घेताच ड्रायव्हर निघून गेला.
शिवथर घळ !
स्थानिकांच्या भाषेत घळई!
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी लिहीलेल्या ग्रंथराज दासबोधाचं जन्मस्थान! अतिशय सुंदर निसर्गसौंदर्य त्याचबरोबर, अतिशय निर्बीड अरण्यात, किर्र अंधार, प्रचंड जलप्रपात , हिंस्त्र श्वापदं अशा सगळ्या वातावरणात अद्वैताचं तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ समर्थांनी इथं लिहीला.
शिवाजीमहाराजांनंरच्या पेशवाई आणि नंतरच्या इंग्रज राजवटीत इतर ऐतिहासिक ठिकाणांप्रमाणंच ही घळई विस्मरणात गेलेली. समर्थ हृदय श्री. श्रीकृष्ण शंकर देव या समर्थ भक्तानं प्रचंड मेहनत घेऊन हे स्थान शोधून काढलं आणि नंतर प.पू. श्रीधरस्वामींच्या अध्यक्षतेखाली समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या पुढाकार/सौजन्याने तिथली डागडुजी करुन, भक्तनिवास बांधून इतर भक्तांची अतिशय छान सोय करुन घेतली गेली आहे.
पहिल्या पायरीला नमस्का र करीत 'जय जय रघुवीर समर्थ' असा मनाशीच जप करीत पायर्या चढायला सुरुवात केली.
वर पोचलो तोवर सायंउपासना सुरु झालेली. हातपाय धुवून घळईत समर्थांचं दर्शन घेतलं
रांगोळी
आणि उपासनेला येऊन बसलो. उपासना झाली, प्रसाद घेतला आणि घळईतल्या सेवेकरी आप्पा कुलकर्णी आणि मासिक व्यवस्थापक करंदीकर काका काकू दांपत्याबरोबर बोलत बसलो.
दुसर्या दिवशी पहाटे लवकर उठून प्रातःउपासनेला गेलो. उपासना झाली, प्रातर्विधी आटोपले आणि घळईत दर्शन/ जपासाठी गेलो.
माझ्यामागे घळई.
आप्पांची पूजा सुरु होती.
घळईतून दिसणारे सह्याद्रीचे कडे.
घळईच्या प्रसिद्ध धबधब्याचं ठिकाण ... पावसाळ्यात प्रचंड जलप्रपात असतो. समर्थ रामदास स्वामींचं यावर प्रसिद्ध कवन आहे. ...धबाबा तोय आदळे
घळईत श्री व सौ प्यारेंनी काढलेली रांगोळी. ;)
करंदीकर काकूंची रांगोळी.
खालची रांगोळी सौ.- सौ. प्यारे
दर्शन झाल्यावर आम्ही गावात फोन करण्यासाठी गेलो. जाताना सूड नी मोदक खाली भेटले. त्यांना पुढं जाऊन थांबायला सांगून आम्ही जाऊन आलो. तोवर एसटीनं स्पा आणि किसन आले. आम्ही चौघांनीच चहा घेतला नी पुढं जाऊन बघितलं तर सूड नी मोदक आज्ञाधारक मुलांसारखं पायर्यात बसलेले. बहुधा सूडच्या 'थ्री फोर्थ' मुळे आप्पा कुलकर्णी चिडलेले दिसले. प्रसादाला देखील कॉमन लोकांबरोबरच खिचडी नी नारळीभात असं खाल्लं.
अर्थात पुढं स्पा आणि सगळ्यांच्या 'शिन्शिअर' वागण्यानं आप्पांचा नूर पुन्हा बदलला नि नॉर्मल आला. तरुण मुलांचं वागणं आणि एकंदर वावर तिथं त्रासदायक होत असावा त्यामुळं साहजिकच आप्पा चिडले होते असं जाणवलं.
दुपारच्या थोड्याशा प्रसादामुळं ४-४.३० च्या आसपास भूक लागली. आवरुन खाली भजी खायला बसलो. भजी होईतोव र मस्त गप्पा रंगल्या. तेवढ्यात मन१ आणि सर्जा राजा गँग (सौजन्य : मन१) रायगड सर करुन आली. जेऊनच आल्याने मन१ ने मोदकच्या मिरची च्या आग्रहाचा अव्हेर करुन शास्त्रापुरता भजीचा तुकडा मोडला. दुर्दैवानं जागेची व्यवस्था न हो ऊ श कल्यानं त्या तिघांना दर्शन घेऊन परतावं लागलं. पुन्हा सायंउपासना, प्रसाद (यावेळी स्पेशल) असं झाल्यावर सकाळी रायगडच्या तयारीने मावळे गपा आवरत्या घेऊन झोपले.
सकाळी लवकर आटपून देखील एसटी गेलेली. आप्पा कुलकर्णी आणि करंदीकर काका काकूंचा परत या असा निरोप घेऊन पायीच शिवथर घळीतून कुंभे शिवथरला आलो.
होतकरु मेकॅनिक मोदक एसटीच्या दरवाजाचे हॅण्डल बसवताना!
महाडला जाताना नदी.
महाडात काही अपरिहार्य कारणानं ;) आणि वेळेअभावी रायगड न करताच परतीची वाट धरुन सगळे चारच्या सुमारास घरी परतले.... किसनदेवा, माफी देवा!
(फोटो नीट करा रे कुणीतरी! :()
प्रतिक्रिया
15 Feb 2012 - 5:55 pm | यकु
खुमासदार वृत्तांत.
मजा केलीत लेको.
थांबा, एक वरीसभर थांबा म्या पन येतो तिकडं तुमच्यासंगट बोंबलत हिंडायला.
फोटो दर्शन मात्र घरी गेल्यावर रे.
16 Feb 2012 - 9:57 am | स्पा
वा प्यारे कडक लीव्लयेस :)
ट्रेक मध्ये काहीतरी ट्विस्ट असायलाच हवा हे ठरलेल आहे
आदल्या दिवशी हापिसच्या क्रिकेट म्याच च्या तुर्णामेंत होत्या , घरी यायला १ वाजला , पाकिटात अजाबात पैसे नव्हते , म्हटल ठाण्याहून सकाळी ATM मधून काढू
तरी बोंबलत ३ ला उठलो , डॉट ४.१५ ला ठाकुर्ली स्टेशन ला पोचलो, ठाण्याहून ५.१५ ची बस होती , आधीच पहाटेच्या गाड्या फार कमी असतात, त्यातही म रे अजून रडली .
४.१८ ची लोकल रद्द , पुढची डायरेक्ट ४.४२ , चायला म्हटल हि ट्रेन तरी वेळेवर येउन दे . ४.५० झाले तरी ट्रेन चा पत्त्या नाय. हवा टाईट!!
किस्नाचे फोन यायला लागले , अरे बस आली डेपोत.. तेवढ्यात उपकार केल्यागत ट्रेन आली.. चढलो, आता तरी सुसाट जायचं...
नाय रोज म. रे. त्याला कोण रडे? ठाण्याला पोचेस्तोवर ५.२५ झाले, पैसे काढायला पण वेळ मिळाला नाही . ५ , १० मिनिटही वाट न पाहता त्या दयाळू ड्रायवर ने बस सुसाट सोडली. जेमतेम २ ३ मीन उशीर झाला , आम्ही मारे जोशात रिझरवेशन केलेलं , चायला पैसे पण वाया गेले..
पण विचार करण्यात वेळ न घालवता.. माननीय किसन यांनी रिक्षा पकडून.. कळवा नाक्याला पळवली.. निदान तिथे तरी मिळाली तर मिळेल, पण छे.... बस वाला बहुतेक लैच घाईत असावा ... तिथून एका कार वाल्याला हात दाखवला .. नशीब तो थांबला त्याने रबाळे पर्यंत लिफ्ट दिली , ठाणे - पनवेल बस जाताना दिसली , त्यात बसलो .. चायला... डोक ओउट झालेलं .. तिथून पनवेल.. आता तर एवढा वेळ गेलेला कि ती बस मिळण शक्यच नव्हत . मग डोक शांत केल जाऊन देत म्हटल.. मस्त चा मारला ... मग बाहेर आलो .. बर्याच प्रायवेट गाड्या महाड - पनवेल ट्रीप मारतात .. एका ओमनीत बसलो ... अहाहा काय ती सुखद गाडी.. बसल्यावर गुडघे डोक्यापर्यंत येत होते . पुढचा अडीच तास तसेच बसून होतो ,
हाटेल बाहेरच्या बागेतली ताजी फुल
मधेच जरा नाष्टा करायला उतरलो , अर्थात मिसळ ... :)


एवढ होऊनही आम्ही बर्यापैकी ऑन द शेड्युल होतो , माणगाव ला त्या ओमनीत अजून २ जण भरली गेली.. आता सर्व मिळून ८ माणस मागे होती , कहर ....

शेवटी १२० प्रत्येकी अशी दक्षिणा टेकवून महाड ला पोचलो ... महाड ला ATM बघायचा विचार होता , पण तेवढ्यात शिवथर ला जाणारी बस बाहेर पडताना दिसली , मग आता हि चुकायला नको म्हणून त्यात शिरलो .. बिरवली पर्यंत तसा बरा रस्ता होता , पण नंतर जे काय हाल सुरु झाले... हाडनहाड खिळखिळ झालं .. कशी बशी उसासे टाकत येष्टी शिवथर ला पोचली .



प्यारे दिसलाच, झकास चाय मारला ..
मोदक आणि सूड आलेले होतेच
दुपारी प्रसाद घेऊन घळीत सर्व ध्यानस्थ बसलो ... नेहमी चळवळणार मन, गप सुतासारख सरळ आलं.. शांतता अशी होती कि कानाला जणू दडे बसलेत ...
भरपूर जप झाला .. कधीतरी डोळे उघडले एक सव्वा तास झालेला होता , स्वतःलाच नवल वाटलं.
सायंकाळची उपासना म्हणजे , मनाचे श्लोक, राम रक्षा, मारुती स्तोत्र , दासबोध वाचन .... सर्व अतिशय खणखणीत आणि दणदणीत आवाजात .....
अक्ख वातावरण समर्थमय झालेलं होत ....
रात्री जेवल्यानंतर धमाल गप्पांना उत आला ..
आजूबाजूला वस्ती नवतीच , २ ४ काय ती घर ... गार रात्र ...वर तार्यांनी खच्चून भरलेलं आभाळ .. अहाहा चंगळ होती
परत जायला नक्की आवडेल अस ठिकाण , नेहमीच्या कामाच्या व्यापातून जेंव्हा मेंदू ह्नॅग होऊन बंद पडतो .. तेंव्हा अशा ठिकाणी नक्कीच जावे
जय जय रघुवीर समर्थ
16 Feb 2012 - 11:06 am | Pain
"अहाहा काय ती सुखद गाडी.. बसल्यावर गुडघे डोक्यापर्यंत येत होते"
हाहाहा! हे फार आवडले :))
16 Feb 2012 - 11:40 am | ५० फक्त
कोणाचे गुडघे कोणाच्या डोक्यापर्यंत आले होते, ते स्पष्ट करा की मा. स्पाजी.
17 Feb 2012 - 8:27 am | सूड
होय हो होय.....हे बाकी बरं विचारलंत. ;)
16 Feb 2012 - 1:20 pm | यकु
स्पावड्या,
विजय घाटे होते का रे तिथे??
आत्ता बातमी वाचली. जादु आहे या माणसाच्या हातात. आधी माहित असतं तर ती पहायला तिथपर्यंत आलो असतो मी.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/Details.aspx?id=20741&boxid=216125...
16 Feb 2012 - 2:24 pm | प्यारे१
अरे यकु,
हा सज्जनगडवरचा दासनवमी उत्सवातला कार्यक्रम दिसतोय...!
सज्जनगड 'वायला' नी शिवथर घळई 'वायली'... अर्थात सज्जनगड सुंदरच आहे आणि समर्थभक्तांसाठी दोन्ही तितकीच पूजनीथ तीर्थक्षेत्रं!
दिव्यमराठीतून गेलास तरी दुवे मात्र दिव्यमराठीचेच का? ;)
16 Feb 2012 - 3:21 pm | यकु
>>>सज्जनगड 'वायला' नी शिवथर घळई 'वायली'... अर्थात सज्जनगड सुंदरच आहे आणि समर्थभक्तांसाठी दोन्ही तितकीच पूजनीथ तीर्थक्षेत्रं!
---- हाव! हे खरंय. गोंधळ उडाला होता. :)
>>>दिव्यमराठीतून गेलास तरी दुवे मात्र दिव्यमराठीचेच का?
---- जुनी खोड! ;-)
16 Feb 2012 - 8:24 pm | रेवती
उपवृत्तांतही आवडला.
15 Feb 2012 - 6:07 pm | बिपिन कार्यकर्ते
एक फोटो सुधरला आहे. बाकीचे त्याप्रमाणे सुधरवा. पिकासामधून फोटोवर राइट क्लिक करून युआरएल घे आणि कोडमधे पेस्ट कर.
15 Feb 2012 - 6:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
भारीच झाली म्हणायची स्वारी!! :)
त्या फटूच बगा बा काहीतरी!! :(
15 Feb 2012 - 7:05 pm | वपाडाव
ही शंका प्रत्येकाच्या मनात डोकावत असेल नै का?
15 Feb 2012 - 7:14 pm | मी-सौरभ
आता हळुहळु दिसायला लागलेत फोटो.
ट्रिप छान झालेली दिसत्ये :)
15 Feb 2012 - 7:07 pm | मेघवेडा
या एका वाक्यानेच रायगड झिल्ल्यात पोहोचलो! बेष्ट वर्णन. फोटू दिसू लागले की अजून मजा यील! :D
15 Feb 2012 - 7:36 pm | गणपा
मस्त रे.
16 Feb 2012 - 12:53 am | सूड
प्यारे, लेट मी टेल यू समथिंग इज मिसिंग बरं का !! यू सेड फफ्रायडे इव्ह दॅट दे आर एबल टू अलोकेट डोक्यावरुन पाणी तीन खोल्या, दॅट वॉज ओके. सॅटर्डे मॉर्निंगग आय गॉट चकित्ड वेन दे सेड ओन्ली दोन खोल्या. इट वॉज नॉट पॉसिबल टू अपडेट मनोबा, मग काय करणार वी वर टोटली हेल्पलेस. मिळालं त्या ररुममध्ये मी, स्पा , मोदक अॅन्ड किसन मॅनेज्ड समहाव. असो. फार धमाल आली, रायगड करता आला असता तर आणखी आनंद झाला असता. पावसाळ्यात परत एक फेरी मारावी म्हणतो. शहरातल्या गोंगाट गडबडीपासनं लांब असलेली गावं पाह्यली की अशा गावांत राहणार्या लोकांचा हेवा वाटतो. पण एकदा का ही गावं लोकांच्या माहितीस आली की त्यांची रया जायलाही वेळ लागत नाही. ममध्यंतरी वेळासला गेलो तेव्हा तिथला समुद्र,तत्याकाठची वाळू बघून सहज म्हणालो की हे किती स्वच्छ, शांत आहे.शेजारी उभ्या ततिथल्या रहिवाश्यानं ताबडतोब उत्तर दिलंन, "अजून एमटीडीसी नाही आलं ना इथं"
15 Feb 2012 - 8:23 pm | शुचि
मस्त वृत्तांत ..... फोटो तर खल्लास सुंदर आहेत.
15 Feb 2012 - 8:35 pm | पैसा
झक्कास वृत्तांत आणि फोटो देखील! फोटोंच्या गोंधळामुळे पिकासावरचे ५७ फोटो बघायला मिळाले!
15 Feb 2012 - 9:00 pm | अन्या दातार
अत्यंत रमणीय स्थळी फारसा दंगा न केलेले मिपाकर बघून डोळे स्पाणावले ;)
फोटो बघून मन उल्हसित झाले. रांगोळ्याही छान आहेत.
15 Feb 2012 - 9:36 pm | गणेशा
आता ऑफिसातुन निघताना घाईने धागा पाहिला..
फोटो मस्त आलेत .. आवडेश ..
लिखान मात्र उद्या वाचल्या जाईन ..
15 Feb 2012 - 9:48 pm | प्रचेतस
गणेशा, पेढे हवेत आता.
फोटो दिसलेत तुला चक्क. :)
15 Feb 2012 - 10:22 pm | अन्या दातार
गणेशा, प्यार्टी हवीच रे. मी आलो की भेटूच पुणे गेटला
(च्यायला, गण्या थापा तर मारत नाय ना रे?? ;) )
15 Feb 2012 - 9:52 pm | प्रचेतस
फोटो फारच छान, वर्णनाने तर बहार आली.
चांडाळ चौकडी ज्याकेटात मनमुराद हसताना दिसतेय.
बाकी इतकं छान लिहितोस मग इतकं कमी का लिहितोस रे?
15 Feb 2012 - 10:05 pm | रामदास
असेच म्हणतो .
धागेकरी आणि त्यांचे सहभागी मित्र यांचे कल्याण करी रामराया.
16 Feb 2012 - 9:07 am | प्यारे१
काका,
तो वल्ली उगा चेष्टा करु र्हायलाय तर तुम्ही पण सामिल झालात का? अम्मळ गुदगुल्या झाल्या.
स्वगतः प्रत्यक्ष रामदासाने आमचे कल्याण करी रामराया म्हटल्यावर आणखी काय हवं रे प्यार्या?
15 Feb 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा
पहिल्यांदा वृत्तांतासाठी
प्यार्या....काय जबराट लिहिलायस रे वृत्तांत... मन भरुन पावलं बघ... मेली...ही आमची पुणे हरेश्वर गाडीच्या जुन्या मार्गावरची गावं...त्यांचा नामोल्लेख सुद्धा मला पार बेचैन करतोय.. शिवथर घळीत गेलोय बर्याचदा..पण ती भोर पासुन पुढे भेटत जाणारी लालमाती ची संस्कृती आहे ना..ती मनावर गारुड करुन गेलेली आहे,त्यात तु अशी काही त्या मातीतली वाक्य टाकलियेस की मी पुढची हरेश्वर ट्रीप पुन्हा व्हाया वरंध करणार...आणी घळीत तर चांगला २दिवस थांबणार...उन्हाळ्यातच जाइन म्हणजे पांडवटाक्याचं पाणी आणी अळू पण मिळतील खायला... :-)
15 Feb 2012 - 10:15 pm | प्रचेतस
म्याबी येतुया भटजी.
15 Feb 2012 - 10:39 pm | जोशी 'ले'
मस्त वर्णन व फोटो , जरा उपासने बद्दल पन लिहा
16 Feb 2012 - 1:50 am | मन१
ह्या ट्रिप साठी आम्हांस विचारना केल्याबद्दल मिपाकर दोस्ताम्चे आभार. येउ न शकल्याबद्दल क्षमस्व.
चार महत्वाच्या गोष्टी :-
१. सूडकडून प्रथम ट्रिपबद्द्ल समजले तेव्हा पुण्याहून नक्की कोण कोण खात्रीने निघणार, तेही शनीवारी निघणार्यांपैकी ह्याची निश्चित कल्पना नव्हती(फक्त सूडचे पुण्याहून शनिवारचे निघणे पक्के होते.). ती मिळाली बरीच नंतर तोवर दुसर्या उनाड कंपनीसोबत काहीएक आखणी करुन झालेली होती.
२.सार्वजनिक वाहन जाणे-येणे साठी वापरले जाणार असे समजले होते. आयत्यावेळी उफाळून आलेल्या तब्य्तीच्या कारणामुळे हे शक्य नव्हते; त्यासाठी अधिक आरामदायी खाजगी वाहन वापरणे भाग होते.
३. आम्हंस कंपनी देणारी माणसे "टुरिस्ट" छापाच्या जवळ जाणारी असल्याने अस्सल भटक्यांसोबत,मिपाकरांसोबत घेता येणारी मजा तिथे घेता येणार नव्हती. This or that अशी स्थिती होती. खाजगी वाहन आमच्या दुसर्या उनाड गँग कडे होते. ते अधिक सोयीस्कर होते.
४.शिवथरघळ हा अनुभव घेण्याची इच्छा होतीच; त्यासाठीच शनिवार रात्रीचा मुक्काम तिथे करायची योजना होती.
मात्र आता पुनश्च एकदा पावसाळ्यात खास निव्वळ शिवथरघळ मुक्काम करायची मनिषा आहे.
**************************************************************
आम्हांस विचारणा केल्याबद्द्ल मिपाकर दोस्तांचे आभारी आहोतच; तुमच्यासह ट्रिपला न येण्याचा उद्धटपणा केल्याबद्द्ल क्षमस्वही आहोत. येत्या पावसाळ्यात आम्हांस सामावून घेतले जाउन पापपरिमार्जनाची संधी मिळेल ही आशा व समर्थ चरणी प्रार्थना.योजना व्यवस्थित आखण्यात आपटी खाल्ली हेही कबूल आहे. ह्यावेळेस योग्य तसे प्लानिंग आमच्याकडून केले जाइल.
तिथल्या तेवढ्याश्या वास्तव्यानेही मोहून गेलेलो आहेच. "मन१" हा उल्लेख असलेला परिच्छेद आमची भाषा दर्शवण्यास केलेला असला तरीही आमची भाषा तशी आहे ह्यावर आमचा किंवा आमचे प्रतिसाद वाचणार्यांचा विश्वास बसणार नाही हा अंदाज व बसू नये ही इच्छा.
'मिन व्हाईल' 'रिंग' 'क्वेरीज लिस्ट औट' 'डायलेमा' क्वेरीज सॉर्ट एफर्ट फेल गेला. फिक्स प्लॅन्ड प्लिजन्ट नेचर ऑसम वेलनोन वेहिकल फिक्स स्टे वेल. लेट इट बी....
ह्या बदनामीबद्द्ल रिव्हेंज म्हणून पुढील एखाद्या धाग्यात जडाबोजड,शब्दबंबाळ प्रतिसाद दिला जाइल.
चला ते सोडा.
माझ्या ट्रिपचं थोडक्यात उरकून घेतो, त्यावरून मिपाकरांची एखादी ट्रिप ठरते का ते पाहुयात.
आम्ही सकाळी अकराला पोचलो रायगड रोप वे ला.दिवसभर रायगडाच्या वरती भटकण्यात, गप्पा हाणण्यात वेळ घालवला. संध्याकाळी कधीतरी शिवथर घळीला पोचलो. दर्शन घेतले. काही वेळ थांबलो. ती प्रसन्नता अन् शांतता मनात भरून घेउन पुढे रात्री मउक्काम्साठी पोचलो ते दिवेआगर ह्या सुप्रसिद्ध बीचवर, रात्री अकराला. सकाळी फक्त दोनेक तास तिथे घालवले, सोन्याच्या गणपतीचे दर्शन घेतले व लागलिच हरिहरेश्वरच्या रस्त्याला लागलो.
हरिहरेश्वरला आहे खडकाळ बीच. म्हण्जे काळेशार खडक, त्याभोवती सुंदर्,शांत्,स्वच्छ समुद्र.
तिथे ना, त्या टॅकडीभोवती एक प्रदक्षिणा घालायची होती, एका बाजूला काळ्याशार दगडाची टेकडी, डावीकडे समुद्राची गाज व मधून चिंचोळी,खडकाल पायवाट. ह्या टेकडी-प्रदक्षिणेस म्हणायचं विष्णुपाउल. हा एक रम्य अनुभव आहे. ह्यादरम्यान दूरूनच डॉल्फिनचेही दर्शन झाले. आख्खा दिवस तिथे गेला.
पण ह्यासर्वाहूनही काही भारी वाटले तर म्हणजे तो प्रवास. आम्ही बर्याच अनवट वाटांवरुन, एक पदरी रस्त्यावरून गेलो. अगदि ऐन शिशिर ऋतुतही रस्त्यावर भरदुपारीही दाट सावली होती झाडांची. दोन्ही कडे नैसर्गिक म्हणावे असे जंगल होते.आपण तर कोकणाच्या,लाल मातीच्या, उकडीच्या मोदकाच्या, गावोगावच्या परुशुराम स्थापित मंदिराच्या, उंचच उंच झाडांच्या,शहाळ्याच्या ताज्या पाण्याच्या , सुशेगात किनार्यांच्या अन् टुमदार गावांच्या प्रेमातच पडलोत. *कोकणस्थांच्या प्रेमात आधीच पडून झालेले आहे ; ) *
रविवारी मध्यरात्रीच्या थोडेसे आधी पुण्यत पोचलो.
आता मला सुचलेली कल्पना:-
मिपाची पुढची सहल पेण- गणपती पुळे -पावस अशा ठिकाणी काढुयात का? ह्याशिवायही बरीच ठिकाणं आहेत तिकडे तुम्ही सुचवाल तशी भर घालुत. मी संपूर्ण्वेळ मिपाकरांनाच देइन.
16 Feb 2012 - 11:44 am | प्यारे१
मस्त प्रतिसाद मनोबा......!
अरे नाही, ती भाषा तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या 'ड्युड' मित्रांसाठी होती रे! ह. घेशीलच. ;)
बाकी, जडबंबाळ शब्द वगैरे कळत नाही रे . बाऊन्सर जाईल...!
16 Feb 2012 - 2:42 am | रेवती
वृत्तांत आवडला. माझा तिथला अनुभव लिहित नाही आता. पुन्हा कधितरी.....संगणक नीट चालत नाहिये.
16 Feb 2012 - 8:13 am | ५० फक्त
मस्त रे, लई भारी फिरुन आलेले आहात. मी अजुन सुद्धा १००% फिट नाही अशा फिरण्यांसाठी, मे बी मे मध्ये पुन्हा घराबाहेर पडु शकेन.
रांगोळ्यांचे फोटो विशेष आवडले.
16 Feb 2012 - 1:31 pm | मृगनयनी
प्यारे..स्पा....मस्त आहे वृत्तांत!... फोटो तर लाजवाब... :) रान्गोळ्या... सुंदर :)
दासनवमीच्या मन्गलमय शुभेच्छा! जय जय रघुवीर समर्थ! :)
16 Feb 2012 - 11:14 am | गवि
सुंदर लिहिलं आहेस. रामदासकाकांशी सहमत.
उत्तम अनुभव असणार हे वर्णनावरुन कळतंच आहे.
पूर्वी शिवथरघळ केली आहे. अर्थात फार पूर्वी. इतक्या पूर्वी की ती त्यावेळी निर्जन जागा होती आणि भीतीह वाटायची त्या जागी जाताना. आता खूप बदल आणि अॅडिशन्स झालेल्या दिसताहेत.
16 Feb 2012 - 1:56 pm | गणेशा
प्यारे, मनोबा अणि स्पा
छान लिहिले आहे आवडले.
16 Feb 2012 - 2:23 pm | मेघवेडा
झकास फोटो! स्पावड्याच्या उपवृत्तांताने मजा आली! :)
16 Feb 2012 - 3:56 pm | प्यारे१
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
दासनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
16 Feb 2012 - 4:22 pm | इरसाल
सगळा व्रुत्तान्त अतिशय आवडला.खुप इछा आहे दोन्ही ठिकाणी जायची पाहू कधी बोलावणे येते ते ?
...............पैकी बैठकीला जाणारे कोण कोण आहेत ?
20 Feb 2012 - 3:04 pm | पियुशा
फोटो अन वृत्तांत आवडला :)
8 May 2013 - 3:47 pm | मोदक
आणखी एकदा भेट द्यायची का रे मुलांनो..? (मात्र या वेळी वन डे रिटर्न!)
8 May 2013 - 4:06 pm | ढालगज भवानी
हा वृत्तांत तेव्हाही आवडला होता व आताही खूप आवडला.
8 May 2013 - 4:14 pm | स्पा
:)
चला
8 May 2013 - 4:16 pm | प्यारे१
अरे पावसाळ्यात जाऊ आता. वातावरण मस्त असतंय तेव्हा.
8 May 2013 - 6:45 pm | ढालगज भवानी
ओ माय गॉड!!! पावसाळ्यात अतिशय रम्य असेल.
14 May 2013 - 12:03 pm | Bhagwanta Wayal
वॄत्तांत व फोटो दोन्हीही आवडले
14 May 2013 - 3:12 pm | विटेकर
घळीत जाणे होते. अश्यातच सुण्दर मठ सेवा समितीचे काही काम करण्याची संधी मिळाली.
घळीच्या व्यवस्थापनासाठी दर महिन्याला एक माणूस लागतो. नव -नवीन लोक मिळावेत असा प्रयत्न असतो.
कालावधी - किमान एक महिना / समर्थ कार्याची आणि भजन -प्रवचन - कीर्तनाची आवड असावी.
स्थानिक लोकांशी संपर्क करण्याची क्षमता असावी. काही लोकोपयोगी करता आले तर अधिक उत्तम ( उदा. आरोग्य सेवक / शेती तज्ञ / पशु वैद्यक ) इत्यादी - घळी मार्फत अनेक लोकोपयोगी कामे चलतात उदा. बाजूच्या गावातील विद्यार्थ्याना शिष्यव्रत्ती, अभ्यास वर्ग थोडक्यात समर्थांचा महंत असावा.
" येथे यावयास पुण्य लागते" असे म्हंणतात ते शब्दशः खरे आहे. अनेक वेळा थरवून जाणे होत नाही याचा अनेकदा अनुभव घेतला आहे !
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला " दासबोध सखोल अभ्यास " सप्ताहात न चुकता जाणे होते..
मिपा वर लेख पाहून आनंद वाटला.