प्राध्यापक अशोक चक्रधर.
हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व..
माझे ज्येष्ठ मित्रवर्य दिवंगत वसंत पोतदारांसोबत एकदा दिल्लीला गेलो असताना त्यांच्यामुळे मला अशोक चक्रधर या विलक्षण माणसाला भेटण्याचा योग आला.. चांदनीचौकात घंटेवाला मिठाईवाल्याकडे एकत्र रबडी खाताना मला चांगले अर्धा-एक तास अशोक चक्रधर लाभले. कुसुमाग्रज आणि बा भ बोरकर हे अशोक चक्रधरांचे मराठीतले अत्यंत आवडते कवी हे मला तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं समजलं..
कुसुमाग्रजांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा कुसुमाग्रजांवर एक सुंदर लेख त्यांनी जामियामिलियाइस्लामिया मध्ये हिंदी विभागात प्रसिद्ध केला होता..शोकेस केला होता..!
गलियां.. (कृपया येथे ऐका)
ही त्यांचीच एक कविता. त्यांनी स्वतःच सादर केलेली. अगदी अवश्य ऐकावी अशी..विलक्षण अंतर्मुख करणारी कविता..!
हलक्याफुलक्या पद्धतीने सुरू झालेली की कविता हळूच गंभीर वळण घेते आणि बालकामगार या प्रश्नावर भाष्य करते..
इतर मुलांसारखी कुठली मजा नाही की धमाल नाही.. काय काय कामं करतात हे बालकामगार.. किती नानाविध कामं करतात त्याचं ओघवतं वर्णन..
या बालकामगारांवर त्यांच्या घरची जबाबदारी असते..
मिळालेल्या मेहनतान्यातून काय करतो हा बालकामगार..?
वह एक दिन की कमाई से बाप के लिये दवाई लाता है
दोन दिन की कमाई से बहन के लिये दुपट्टा लाता है..
और याद करें प्रेमचंद की वह कहानी..
की वह तीन पैसे में दादी के हाथो को जलता देख चिमटा खरीदकर लाता है..!
अवश्य ऐकावी अशी कविता..
कविवर्य अशोक चक्रधरांना दंडवत..!
-- तात्या.
प्रतिक्रिया
6 May 2013 - 1:07 pm | स्पंदना
कविता सुंदर आहेच. व्यक्तीमत्वही तेव्हढच सुंदर आहे.
कमाल आहे जेंव्हा माणस अस चांगल कमावललेल नाव टिकवुन ठेवतात. नाहीतर बहुतेकजण चार ओळी काय खरडल्या.....
6 May 2013 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर
अशोक चक्रधरांना ऐकले आहे हिन्दी कवी संमेलनात (अर्थात, दूरदर्शन संचावर). थेट मनाला भिडणार्या, हेलावून टा़कणार्या कविता असतात त्यांच्या.
6 May 2013 - 3:09 pm | ढालगज भवानी
ही कविता ऐकली होती पूर्वी. या कवितेने एकदा मिपावर मानाचे स्थान पटकाविले होते. खाली विजेटमध्ये ती झळकली होती. पुनर्श्रवणाचा आनंद मिळाला.
6 May 2013 - 3:11 pm | सन्दीप
कविता सुंदर आहे.
6 May 2013 - 3:28 pm | भावना कल्लोळ
तुमच्या मुळेच आम्हा आजच्या पिढीला असे दिग्गज भले वाचनातून का होईना ओळखायला मिळतात, वाचायला मिळतात. कविता खरेच सुंदर आहे.
6 May 2013 - 3:56 pm | मन१
कविता चांगली.
अशोक चक्रधरांबद्दल पूर्वी माहिती नव्हती.
6 May 2013 - 4:11 pm | सुधीर मुतालीक
तात्या तुमची कमाल आहे !! चक्रधराना मिपाच्या फलाटा वरती आणावेसे वाटले हेच माझ्यासाठी मुळात कौतुकास्पद आहे. बहुत खूब !! चक्रधर मला आवडणारे एक महान कवी आहेत. त्यांची कविता काळजात रुतून बसणारी. त्यांची सादर करण्याची स्टाईल ही मला भिडते. छान विषय छेडलात. मी नाशिकमध्ये राहतो त्यामुळे वसंत पोतदार हा अवलिया ही खुप चांगला परिचयाचा होता.
6 May 2013 - 4:16 pm | चौकटराजा
तात्या, अरे तुम्ही हे काय चालवलं आहे इथे ? पहिले अण्णा किरानावाले, आता चक्रधर दिल्ली वाले ! आम्हाला रोज
एकाची आठवण देऊन किती उसासे मारायला लावणार ? आता आणखी काही अण्णा सुचवितो. माडगूळकर, फडके, चितळकर . होउन जाउन द्या एकदा !!!!
6 May 2013 - 4:30 pm | विसोबा खेचर
>> आता आणखी काही अण्णा सुचवितो. माडगूळकर, फडके, चितळकर . होउन जाउन द्या एकदा !!!!
अण्णा माडगुळकरांच्या भेटीचं आमच्या नशिबात नाही..
त्यांचे बंधु आणि उत्तम ग्रामिण कथाकार व्यंकटेश तथा तात्या माडगुळकरांच्या पाया पडण्याचं भाग्य लाभलं आहे..
अण्णा चितळकरांना भेटण्याचं भाग्यात नव्हतं..
फडके आणि विशेष करून ललीमावशीशी खूप घरोब्याचे संबंध होते..
भाईकाकांच्या पाया पडण्याचं आणि त्यांच्याशी एकदा फोनवर व दोनतीनदा प्रत्यक्ष भेटीचं भाग्य लाभलं आहे.. ते गेल्यानंतरही एक्दा त्यांच्या घरी गेलो होतो..
नाशिकला कुसुमाग्रजांच्या घरी सकाळी भरणार्या सामान्य माणसांच्या दरबारात एकदा हजेरी लावून पाया पडलो होतो..
दीदीची भेट मिळू शकेल पण अजून तिच्यापुढे उभा रजायला घाबरतो..
असो..
6 May 2013 - 11:40 pm | सुबोध खरे
आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक भरजरी पदर असावा असं मनापासून वाटत असलं तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीने झपाटून टाकलं आहे.
कधी अंगावर चांदणं पडत नाही.
कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही.
कधी ओढ्यात अंघोळ होत नाही.
कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. परंतु तरीही रानावनातील अदभूत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे त्याचा हा वृतांत आहे.
व्यंकटेश माडगुळकर --जंगलातील दिवस.
7 May 2013 - 2:23 am | ढालगज भवानी
ह्म्म!! हेच्च म्हणते.
दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे
आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
6 May 2013 - 4:25 pm | तर्री
तात्या तुमच्या लेखणी मध्ये एक मस्त मस्त माधुर्य असते. मजा येते वाचताना.
हा कवी खरच जादुई होता. तो एक हिंदी गाण्यांचा प्रोग्राम सादर करत असे.....जाम आवडायचा.
6 May 2013 - 4:32 pm | विसोबा खेचर
अजून आहेत ते..!
6 May 2013 - 4:35 pm | तर्री
तो प्रोग्राम मस्त होता असे म्हणायचे होते.
जो अर्थ निघतो आहे त्याबद्दल क्षमा असावी.
6 May 2013 - 4:43 pm | सुधीर
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
6 May 2013 - 10:28 pm | मनोज श्रीनिवास जोशी
मूळ कविता आवडली - दुव्या बद्दल आभार.
तात्यांचे लेखन ही भावले.
6 May 2013 - 11:21 pm | बोका
अशोक चक्रधरांचे नाव घेतले की मला 'पोलखोलक यंत्र' आठवते.
समोरच्या व्यक्तिच्या मनात काय आहे हे सांगणारे यंत्र कविला मिळाल्यावर काय घडते ते इथे वाचा.
चक्रधरांच्या इतर कविता इथे वाचा.