शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार. आणी यात सगळ्यात मिळून क्रम वरखाली का होइना?त्यानी यातल्या कुठल्याही गोष्टीचं महत्व वाढतंही नाही,घटतंही नाही.
तर त्याचं झालं असं की.....
गेल्या शनिवारी...मी,वल्ली,किसनद्येव,आणी आपले विलासराव... असे अचानक डॉट कॉम या संकेतस्थळावर (जमत/उरत) जमलेले साथी सक्काळी सक्काळी पुण्यास्नं निघालो... शनिवारचा दिवस पूर्ण कोपेश्वरलाच अर्पण केलावता त्यामुळे,,, पुणे-खिद्रापूर/कोपेश्वर वारी अवरता अवरता सांज होत आली.हे मंदिर आणी देवाधिदेव कोपेश्वर नावाच्या अगदी म्हणजे अगदी विसंगत आहेत. मन/बुद्धी/चेतना सर्व म्हणजे सर्व बाजूनी सुप्रसन्न करणार्या/थक्क(ही) करणार्या या देवळातल्या देवाला कोपेश्वर हे नाव सुचणं हे देवाचंही दुर्दैव आहे...असो (हा प्रांत मज पामरानी पुंडाई करण्याचा नव्हे, त्याचा मान आपल्या गडकरी मिपाजोन्स वल्ली महाशयांचा आहे...ते या ठिकाणावरची सचित्र मालिका लवकरच लिवतील... :-) )
सालं... आमी येकदा का लेख लिवायला बसलं , की आमचं मिसळी सारखं प्लेटा लावण्यातच निम्म बळ खर्ची पडतं... तर असो... त्या दिवशी कोपेश्वराहून आपल्या मिपाकर स्नेहांकिता ताईंकडे(इचलकरंजी येथे) धावती भेट देऊन आंम्ही रात्रीला कोल्हापूर मुक्कामी गेलो. दुसर्या दिवशी सकाळी अवरा आवर झाली आणी आंम्ही आमचं CNG खेचर सुरू करून निघालो,ते थेट आदल्या रात्रीच्या कोल्हापूर मिसळ टेस्ट पूर्वानुभवाच्या काथ्याकुटातून पास झालेल्या फडतरे मिसळ कडे (कोल्हापुर पूर्वानुभवी किसनद्येव इतर वाटा चुकत असले[कोल्हापूर मधे फिरताना,ह्या अध्यार्हुत खुलाश्या सह मागिल वाक्य वाचावे..],तरी आमच्या लॉज पास्नं मिसळीच्या गल्लीत न चुकता घेऊन गेले आंम्हास्नी त्ये ;-) ) पण बाकि काहिही अस्लं ना,तरी एक मात्र नक्की हे फडतरे मिसळ गृह अगदी आमच्या किसनद्येवां सारखं साधं/सरळ पारावरच्या मारुती सारखं शिम्पल हाए. आणी तेव्हढच जागृतपण आहे. आंम्ही गाडी पार्क करून गेलो...वेळंही ८:३० च्या दरम्यानचीच होती,पण तरी आंम्हाला माफक का होइना? दर्शनबारीला थांबावं लागलचं.पण एकदा आत गेल्यावर भायेर हुबं र्हायल्याचा कंटाळा पार मंजे पार निघुन गेला. फडतरे मिसळ मधे साधी कोकणातल्या जुन्या हाटेलांसारखी डबल फळकुट श्टाइल आसन व्यवस्था आहे.आणी दर्शन बारी आत स्थानापन्न होइपर्यंत कंटिनिव्ह असल्यामुळे पुण्यातल्या मंगल कार्यालयात(प्राचीन काळी... ;-) ) ''जेवत्यापाना मागे खुर्ची धरून ऊभं'' हा जो काहि विलक्षण प्रकार होता... तशी दुसरी श्टाइल आहे. जो या श्टाइलमधे बसला,त्याच्यातच फडतर्यांची मिसळ ''बसू'' शकते. एरवी मामला अवघड आहे.
ही मिसळ म्हणजे मूलभूत कोल्हापुरी मिसळ आहे,अगदी आसन व्यवस्थेपासून ते तिथल्या शासन व्यवस्थे पर्यंत. पुढे वारंवार गेलं तर तिथले खास राजकीय शब्दही वळणी पडल्या शिवाय र्हात नाहीत... सुकीमिसळ... चिवडा.... पाव प्लेट... कट... भाजी... इ.इ.इ. ह्या शब्दांनाही आपल्याला लागणार्या पेक्षा काहि खास तिथले अर्थ आहेत. म्हणूनच तर मी हिला मूलभूत मिसळ म्हणतो... कारण या मिसळीत कोठचेही दिखाऊ/रंगीतपणा आणणारे घटक नाहित आणी हल्लीचा कोल्हापुर बाहेर नेऊन,कोल्हापुरी चविचा नुस्ताच झणका देणारा अभद्र तिखटपणाही नाही. फडतरे मिसळीत जे काहि तिखट आहे,ते हळूहळू फुलत आणी दरवळत जाणार्या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं.या मिसळची डायरेक्ट किक बसत नाय,हळूहळू फुलणार्या मादक शृंगारा सारखा हिचा मझा वाढतो.
हे सगळं झालं ते मिसळीच्या रंगरूप आणी सौंदर्याबद्दल...अता देहस्वभावाकडे जाऊ... मिसळीच्या मूलभूत देहस्वभावाची पहिली खूण तिच्या ठाई,म्हणजे प्लेटमधे हळद/मिठात मुरलेली मटकी आहे की नाही? यात आहे. नंतर नंबर येतो तो पोह्यांचा/बटाटा भाजी इत्यादी पर्यायी पदार्थांचा. ते तर या मिसळीत आहेतच. पण पुढे बहुसंख्य मराठी मुलुखात मिसळीत-जी जागा फरसाण नावाच्या बालेकिल्ल्याची आहे,ती इथे बदललेली आहे. फडतरे मिसळीत त्या जागी शेव/दगडी पोह्यांचा चिवडा वर्णी लाऊन जातो. मग त्यावर पात्तळ भाजी आणी कट आणी थोडं सायट्याचं दही...वरती सही केल्यासारखं टाकून येका प्लेट मदे कांदा/लिंबू/मिसळ वाटी येते...कडेनी छोट्या प्लेट मधे मिसळीसाठी अत्यावश्यक अश्याप्लेन चविचे स्लाइस येतात.
.........त्यानंतर जेव्हढा तुमचा ग्रुप असेल,त्या हिशोबात ५ ते १० एक्शट्रा पावांची लादि येउन पडते.हे सगळं टेबलावर लागे पर्यंत कडेला काऊंटर वरची चाललेली मिसळ लावण्याची गर्दी खरोखरच बघण्या सारखी असते. आणी नंतर एकदा साधनेला सुरवात झाली ,की आपल्याला सभोवतालचा (आपला.. ;-) ) मित्र परिवार सोडला,तर फक्त भाजी...पाव...कांदा... ''ए खाली चिवडा लाव रे...'', ''कट दे तिकडं...'', ''तुमची किती लोकं??? मग...थांबा कि जरा...!!!'' एव्हढेच आवाज ऐकू येतात... मधून मधून येणारा रस्स्सा तुंम्ही खास वेगळी वाटी मागून ''घेतलात'' तर, आपल्या स्वतःच्या वेगळ्या जगतात गेल्याचीही अनुभूती येते. (आंम्ही तर ती कुठेही गेलो,तरी हमेशा घेतोच... ;-) ) ...मिसळीचं मूळ तिच्या रश्यात असतं,हे फडतर्यांच्या मिसळीला चाखताना शेवट शेवट अगदी पूर्ण पटायला लागतं... कारण हा रस्सा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करून गरम गरम ओढताना,सुरवातीला मज्जा येते,पण नंतर चांगला श्टेनगन करंट बसायला लागतो...आपल्या कपाळावर जसा घाम चढतो,तसा मागं उभ्या ठाकलेल्या लाइनच्याही...!!! पण ''ते'' आपल्याला उठायची घाई ही करत नाहित,हेही तेव्हढचं खरं हां...!
आणी अश्या तर्हेनी एक परिपूर्ण मिसळ साधना झाल्यावर,तुंम्ही फडतरे मधून बाहेर आलात...तर तसेच जाऊ नका...हा आपला माझा फुकाचा सल्ला हो... मग करा काय??? तर शिर्षकात म्हटलेला करंट मस्त!!! आपण आत अनुभवलेला असतो... पण राहिलेला अविभाज्य दत्त दत्त!!! पहायचा असेल... तर फडतरे मिसळच्या तोंडावर उभ्या असलेल्या मिसळभक्तांच्या पाठमोर्या दर्शनात तो पहावा...!!! गेलात कोल्हापुरला,तर सकाळी सकाळी जरूर दर्शनाला जाऊन या...खात्रिनी सांगतो,पुण्य गाठीशी बांधुन याल.कुठचिही मिसळ नम्र आहे,की...जहाल...हे तिच्या भक्तांवरून ओळखावं असं म्हटलय,ते अगदीच खोटं नाही...
=======================================================================
१) ही बगा बगा तयारी...
२) हा मिसळीचा प्राण...मटकी-भाजी-पोहे
३) ह्याला आमी म्हन्तो... गर्दी... ''होणे''
४) ए .... कट लाव रे...
५) अस्सं लायनीत र्हायला पायजे...!
६)ही बगा आली टेबलावर...
७)तिसरी वाटी निम्मी ग्येल्याव ह्यो फोटू काहाडायचं ध्येनात आलं बगा ;-)
८) हा वाटिवरला तरंगणारा लाल/लाल ''कट'' फक्त कोल्हापुरलाच शिजतो... :-p
९) आणी ही भटारखान्याच्या मागं येका छोट्या जागेत... आमच्या करंटची हात-भट्टी लागलीया बगा...लय फ्फाटं फ्फाटं हुटून लावत्यात हिला...
१०) करंट बादलीत आलाय बगा.... ;-)
११) करंट झाला...त्यामुळं आता... दत्त...दत्त...!!! :-)
=============================================================================
प्रतिक्रिया
9 Mar 2013 - 5:17 pm | रमेश आठवले
एकदम झणझणीत
9 Mar 2013 - 5:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फडतर्यांच्या मिसळ एवढाचं चमचमीत लेख....बरेच दिवस झाले राव फडतरेंकडे जाऊन...गेल्या वेळेला गेलो तेव्हा बंद झालं होतं...!!!
(पुण्यात फडतरेंनी शाखा नं काढल्याबद्द्ल निषेध नोंदवणारा) अनिरुद्ध..!!
-----------------------------------------
9 Mar 2013 - 5:34 pm | धन्या
हो. या ओळी वाचून लाफ्टर चॅलेंजच्या "करंट मारे गोरैया"च्या एपिसोडची आठवण झाली.
मस्त लेख. मिसळ आणि सँपलची चित्रे पाहून तोंपासू.
10 Mar 2013 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा
खुलासा--- हे एक सांगायचं र्हाऊनच गेलं, शीर्षकातल्या ओळी ह्या ''देऊळ'' चित्रपटातील फोडा दत्त नाम टाहो.... या गाण्याच्या एका कडव्यातील आहेत... ते असं---''एकच सत्य ...दत्त दत्त... करंट मस्त...दत्त दत्त'' . तिथे जरी ते गाणं धर्माचा आशय विडंबनात्मक करून मांडलेलं असलं तरी,नीटपणे पाहिल्यास एक गोष्ट दिसते,ती...ही,की.. भक्ति ,मग ती कोणत्याही प्रांतातली-- गाण्यातली/खाण्यातली/धर्मातली...असो...भक्त तिच्या भजनी लागतो,कारण चालना देणारा ''करंट'' तिथं मिळतो... शब्द/रचना या मुळे वाइट वाटलं,तरी हि गोष्ट नाकारता येत नाही,हे ही तितकच खरं! :-)
9 Mar 2013 - 5:48 pm | अनन्न्या
कट पाहून तोंपासू.
9 Mar 2013 - 6:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ तोंपासु आणि तोंपासुच !
9 Mar 2013 - 6:12 pm | चौकटराजा
सगळे फोटो पाहून अल्लाउदीन ने आरशात पदमिनिला पाहिली त्याची काय अवस्था झाली असेल ते कळले. वर्णनावरून लाहीलाही झाली. शेवटी सकाळचे शिल्लक राहिलेले पोहे मायक्रिवेव्ह मधे गरम करून खाल्ले. आता थोडा रोगाला उतार पडलाय !
फुलत आणी दरवळत जाणार्या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं. GIT च्या नक्क्की कोणत्या शेवटाला आनंद ?
9 Mar 2013 - 6:13 pm | लॉरी टांगटूंगकर
या मिसळीत कोठचेही दिखाऊ/रंगीतपणा आणणारे घटक नाहित आणी हल्लीचा कोल्हापुर बाहेर नेऊन,कोल्हापुरी चविचा नुस्ताच झणका देणारा अभद्र तिखटपणाही नाही. फडतरे मिसळीत जे काहि तिखट आहे,ते हळूहळू फुलत आणी दरवळत जाणार्या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं.या मिसळची डायरेक्ट किक बसत नाय,हळूहळू फुलणार्या मादक शृंगारा सारखा हिचा मझा वाढतो.
फडतरेची मिसळ म्हणजे निव्वळ प्रेम!! शब्दात व्यक्त व्हायचं नाही ते ...
9 Mar 2013 - 7:05 pm | प्यारे१
छळ आहे.
गुर्जी, एक घास आमच्यासाठी काढून ठेवायचा ना? नाहीतर कावळा नाय शिवायचा पिंडाला!
9 Mar 2013 - 8:01 pm | सुबोध खरे
मिसळीचा फोटो मि दवाखान्याच्या डेस्क टॉप वर लावला आहे. रुग्णाच्या तोपासू पाहिजे
10 Mar 2013 - 12:12 am | शुचि
काय फोटो आहेत राव! जीव गेला.
10 Mar 2013 - 1:24 pm | स्वतन्त्र
एकदम पाणी सुटल बघा तोंडाला...पण आज महाशिवरात्री चा उपास असल्यामुळे कंट्रोल केलय.....
10 Mar 2013 - 1:29 pm | वेल्लाभट
अव्वल ! खाय्लाच हवी ! ! !
10 Mar 2013 - 2:18 pm | तुमचा अभिषेक
सात-आठ वर्षांपूर्वी वालचंद कॉलेज सांगलीला होतो वर्षभर. तिथे विश्रामबागला एके ठिकाणी खायचो अशी झणझणीत मिसळ. कोल्हापुरीच म्हणावे की काय माहीत नाही. पण वाडगाभर मिसळ संपेपर्यंत नाकाडोळ्यातून पाणी ठरलेले. मात्र त्यात शेव नाही तर फरसाणच असायचे. आणि तेथीला लोक पावापेक्षा नुसतीच ती खाणे पसंद करायचे. त्यांच्या या धाडसाचे आम्हाला कौतुकच वाटायचे.
10 Mar 2013 - 2:18 pm | अँग्री बर्ड
फडतरे बद्दल ऐकून होतो, वर्णन वाचून फडतरेत बाकावर टेकल्याचा आनंद झाला , स्क्रोल करत फोटोवर आलो आणि पहिल्या फोटोत sandwich bread बघितला आणि तिथेच निराशा झाली, मिसळ खावी तर ती गोल चवदार मऊ गुबगुबीत लादीपावाबरोबरच ! हा sandwich bread थोडासा कडवट असतो आणि त्याच्या कडा म्हणजे अरारारा ! ह्यामुळेच रामनाथ, टिळक रोड येथे एकदा गेलो तेवढेच ! ह्यापेक्षा आपले काटाकिर्र बरे,
स्वच्छ, हिरवळ युक्त, चवदार मिसळ, अप्रतिम चव, मोठाले लादीपाव, वर मठ्ठा ! जय हो काटाकिर्रर्र ! सकाळी नाश्त्याची वेळ टाळून उठावे, मग काटाकिर्रर्रचा रस्ता धरावा, मिसळ, तर्री,कमीत कमी ३-४ पावजोड्या हाणल्या कि मठ्ठा प्यावा ! मग कसेबसे उठत तिथल्या फिल्टर नळाच्या पाण्यात कौतुकाने हात धुवावेत, काउंटरवर त्या पांढरी दाढीवाल्या मामांच्या हातात पैसे टेकवावेत ( मागे त्यांनी माझं बिल १५ ररुपये कमी धरलं होत, चूक लक्षात आणून देऊन पैसे भरले तेव्हापासून ते मला हसून ओळख दाखवतात) आणि हापिसाची वाट धरावी ! अदरवाइज आमच्या सिंधूदुर्गातली वाटप घालून केलेली मिसळ छान आवडते !
11 Mar 2013 - 1:00 am | कपिलमुनी
फक्त पुणे -मुंबै ला..
सांगली कोल्हापूर ला ब्रेडच मिळतो
10 Mar 2013 - 5:30 pm | पिंगू
हाय हाय.. स्वर्गातच पोचलो. पण सध्यातरी मिसळचे स्वर्गसुख घ्यायला मनाई आहे. सध्या फक्त फोटो बघूनच समाधान घेतो..
10 Mar 2013 - 5:43 pm | अधिराज
कसलं खतरी लिवलयं हो. फोटो बघून आन वाचून नुस्ती जळजळ!
10 Mar 2013 - 5:46 pm | प्रचेतस
मिसळीचा वृत्तांत अगदी मिसळीसारखाच झणझणीत आणि तर्रीदार झालाय. बाकी फडतरे मिसळ अतिशय चवदार आहे यात काहीच शंका नाही पण आमच्यामते पौडातल्या हाटेल दिपकमधली मिसळ पैल्या नंबरावर येते.
10 Mar 2013 - 6:11 pm | jaypal
फोटो बघुन खपल्या गेलो आहोत.
10 Mar 2013 - 6:23 pm | नंदन
फोटू पाहूनच जीभ खवळली!
क्या बात है :)
10 Mar 2013 - 6:55 pm | जेनी...
मिसळीचा कट तर एमदम जीवघेणाय गुर्जि ...
मजाय यार तुमची ... :-/
10 Mar 2013 - 7:00 pm | पैसा
मिसळीसारखा झणझणीत लेख! फोटो पण एकदम जायंट - किंगसाईझ काढलेत!
10 Mar 2013 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...
आताच इटालियन पास्ता खाऊन मिपावर आलो.
आणि हा अंगार लेख पहिला ,
तोंडात मचनक पाणी आले.
जीव कासावीस झाला.
आयुष्य व खाणे झणझणीत हवे. हे मात्र खरे.
आमच्या बसल्या जागी खाण्याची वासना भडकवणार्या आयटम धाग्यावर बंदी आणली पाहिजे.
10 Mar 2013 - 7:36 pm | जेनी...
=))
ए निनाद अरे मचकन आलं असेल पाणि ... नीट चेक कर =))
मचनक कसं येइल ?? :( :!
10 Mar 2013 - 7:43 pm | निनाद मुक्काम प...
पूजा
तूच
पहा
काय अवस्था झाली माझी सचित्र मिसळ गाथा वाचून
लिहिण्यावर सुद्धा ताबा उरला नाही.
10 Mar 2013 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा
@आमच्या बसल्या जागी खाण्याची वासना भडकवणार्या आयटम धाग्यावर बंदी आणली पाहिजे.>> =)) धाग्यावर बंदी चालेल एकवेळ. ;-) पण आयटमवर नाय चालणार. :-p
10 Mar 2013 - 7:38 pm | विलासराव
बुवा ही मिसळ पाहील्यासारखी वाटतेय.
आनी खाल्ल्यासारखीही.
10 Mar 2013 - 9:16 pm | सस्नेह
कोल्लापुरी मिसळीचा ठसका अन कोल्लापुरी भाषेचा झटका...दोनीबी जमलंय...!
11 Mar 2013 - 1:05 am | कपिलमुनी
पण फडतरे च्या चवीमधे बराच बदल झालाय..
खासबाग मैदानाच्या इथे मिसळ चांगली मिळते..
बाहेरचे लोक्स फडतरे ची कीर्ती ऐकुन जातात.. पण कोल्हापूरामधले कमी असतात
11 Mar 2013 - 1:07 am | किसन शिंदे
एकदम खुसखूशीत लेखन!
11 Mar 2013 - 5:38 am | रेवती
मिसळीवरची तर्री एकदम कोल्लापूर ष्टाईल दिसतीये.
लेखन आवडलं हो बुवा!
12 Mar 2013 - 4:52 am | स्पंदना
मग...थांबा कि जरा...!!!''अगदी कानांना ऐकु आलं माझ्या हे बोलण!
अगदी तिथ्थ घेउन गेलात आत्मुसभाऊ! लेखन अस रंगदार की तुमचेच शब्द उधारीवर घेउन म्हणावं ,"हळूहळू फुलत आणी दरवळत जाणार्या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं."
बाकी मादक श्रुंगाराबद्दल टुमच मट ऐकुन मझाऽऽ वाटली.
12 Mar 2013 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी मादक श्रुंगाराबद्दल टुमच मट ऐकुन मझाऽऽ वाटली.>>>
तुंम्हाला मजा वाटली,याची आम्हाला बी मज्जा वाटली...
12 Mar 2013 - 7:23 pm | मराठे
खल्लास !