“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“नाहीतर काय? औरंगजेबाचा जिझिया कर काय वेगळा होता ह्याच्याहून?”, घारुअण्णा चिंतोपंतांची बाजू उचलून धरत.
“अहो, पंत आणि अण्णा नेमके काय झाले ते तरी सांगाल का?”, इति नारुतात्या.
“अहो नारुतात्या, वर्तमानात राहतं चला की जरा!”, घारुअण्णा चिडून.
“अहो, सरकारने घर खरेदी करताना द्यावयाच्या मुद्रांक शुल्कासाठी ग्राह्य धरल्या जाणार्या रेडी रेकनर दरात ५ ते ३० टक्क्यांनी वाढ करून टाकली आहे ह्या नवीन वर्षात. नववर्षाची सप्रेम भेट!”, चिंतोपंत तणतणत.
“काय असते हे रेडी रेकनर?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.
“नारुतात्या, एखाद्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्यूटी ठरविण्यासाठी शासनाने ठरविलेला दर म्हणजे रेडी रेकनर.”, इति भुजबळकाका.
“अजून जरा इस्कटून सांगा ना, नेमके काय ते कळले नाही.”, नारुतात्या एकदम बावचळून.
“अहो, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा, त्या एरियातल्या प्लॉटच्या सर्वे नंबरप्रमाणे, तेथील सदनिकांचा दर शासन ठरवते, म्हणजे सरकारी दर. त्या दराप्रमाणे प्रॉपर्टीच्या स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते. हा दर बाजारभावापेक्षा वेगळा असू शकतो.”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“म्हणजे, जर समजा एखाद्याकडे खूप काळा पैसा आहे आणि त्याने तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवायचा ठरवला आणि स्टॅम्प ड्यूटी कमी करण्यासाठी सदनिकेचा दर अत्यल्प दाखवून रजिस्ट्रेशन करायचे ठरवले तर स्टॅम्प ड्यूटीची किंमत कमी होऊन सरकारचा महसूल बुडेल ना? तसे सुरुवातीला हे खूप मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे सरकार ते तसे होऊ नते म्हणून, त्यावर ‘शासन’ म्हणून, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा सरकारी दर ठरवते. त्याप्रमाणे त्या सरकारी दरानुसार स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते.”, भुजबळकाका.
“च्यायला असे आहे होय, किचकटच मामला आहे हा!”, नारुतात्या अचंबित होऊन.
“नारुतात्या, काही किचकट नाहीयेय, समजून घेतले की सगळे कळते. उगाच ह्याचा बाऊ आपण करतो आणि सरकार व बिल्डरांनाही तेच हवे असते.”, इति बारामतीकर.
“पण काय हो बारामतीकर, हे बिल्डर तर तुमच्याच साहेबांचे कच्चे बच्चे आणि फायनांन्सर ना?”, घारुअण्णा उपहासाने.
“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.
“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! ५ ते ३० टक्के झालेली ही वाढ ‘कार्पेट’ आणि ‘बिल्ट-अप’ एरिया ह्याच्यात असलेल्या, किंबहुना जाणून बुजून करून ठेवलेल्या घोळामुळे, प्रत्यक्षात ५० टक्के असेल असे ह्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.”, बारामतीकर शांतपणे.
“बांधकामाच्या वस्तूंचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, माझ्या मते तर ते जाणून बुजून भिडवले असावेत, त्याने घराच्या किमती आधीच वाढलेल्या, त्यात पुन्हा हा नवा बोजा, मध्यमवर्गाने घरं घ्यायची कशी? ”, चिंतोपंत.
“सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने तो महसूल ह्या मुद्रांकाच्या मार्गाने तिजोरीत भरण्याचा मार्ग शासनाने अवलंबला आहे.”, इति भुजबळकाका.
“तेच तर, माझा मुख्य मुद्दा आणि आक्षेप हाच आहे, तो म्हणजे, हा जो काही जादा महसूल गोळा होणार आहे त्याच्या विनियोगा मध्ये काही पारदर्शकता असणार आहे का? दरवेळी असा जनतेच्या खिशातून ओरबाडलेला हा पैसा, जनकल्याणासाठी वापरला जातो का?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.
“च्यायला ही तर मोगलाई झाली, म्हणजे आमच्या खिशातून लागेल तसा पैसा काढायचा आणि त्याला हव्या त्या मार्गाने आपल्याच खिशात किंवा घशात टाकायचा ही राजकारण्यांची ‘शासन’पद्धत अफलातूनच आहे!”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.
“अहो, ते मोगल परकीय तरी होते, ते मुळात बाहेरुन आलेच होते लुटालूट करायला. हे तर हरामखोर सगळे आपलेच भारतीय बांधव ना? ”, घारुअण्णा रागाने तांबडेलाल होत.
“त्यात पुन्हा बिल्डर लॉबी आहेच वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळायला, फ्लोअर इंडेक्स, सुपर बिल्ट अप, वॅट अन् काय काय.”, भुजबळकाका खिन्नतेने.
“अहो त्याच्या जोडीला मेंटेनन्स ही भली मोठी कटकट आहेच. माझ्या एका मुंबैच्या नातेवाइकाच्या मुलाने त्याचा मुंबईतला फ्लॅट विकून टाकला मेंटेनन्स परवडत नव्हता म्हणून. EMI च्या ¼ होत होता म्हणे त्याचा मेंटेनन्स. पुण्यातही हे फॅड बोकाळायला वेळ लागणार नाही.”, घारुअण्णा घुश्शात.
“अहो, मग सर्वसामान्य माणसाने घराचे स्वप्न बघायचेच नाही की काय?”, नारुतात्या हताश होत.
“ऑ! अहो, मग मी काय म्हणत होतो आल्या आल्या?”, चिंतोपंत डोक्यावर हात मारत.
“सोकाजीनाना, म्हणजे आता पुण्यातही एक ‘धारावी’ येऊ घातलीय तर!”, नारुतात्या सोकाजीनानांकडे बघत.
“ही राजकारणी आणि बिल्डरांची अभद्र युती अशीच राहिली तर तसे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“आधी, काळ्या पैशाचा ओघ थांबवण्यासाठी आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी सुरू केलेला हा 'रेडी रेकनर', पैसा छापण्याची टाकसाळ आहे हे लक्षात यायला राजकारण्यांना जराही वेळ लागला नाही. ज्या पद्धतीने सगळीकडे हे बिल्डिंगांचे पेव फुटले आहे त्यानुसार रोजची रजिस्ट्रेशनांची संख्या बघितली तरी त्यातून मिळणारा महसूल कोणाचेही डोळे फिरवेल. शिवाय रजिस्ट्रेशनच्या वेळी घेतली जाणार्या ‘फी’च्या काळ्या पैशाचा आकडा काढला तर सर्वसामान्य माणसाचे डोळेच पांढरे होतील. त्यातून कोणत्या आधारावर, सर्व्हेवर, ही दरवाढ केली गेली ह्याचाही काही पत्ता नाही. आंधळी-मुकी जनता तिला कसेही हाका! हाच मंत्र झाला आहे आजच्या राजकारणाचा. आणि वर्षाला जवळजवळ २० हजार कोटी इतका महसूल जो गोळा होतो त्याचे नेमके काय होते हे गुलदस्त्यातच राहते. त्यामुळे हालवले की पैसा देणार्या ह्या ‘मागच्या दारातल्या’ पैशाच्या झाडाला काही सरकार पानगळ येऊ देणार नाही. त्याला खतपाणी घालून हिरवेगार ठेवण्याचाच हा एक प्रकार आहे, झालं.”, सोकाजीनाना उद्विग्नपणे.
“सोडा हो, आता आपल्याला घरं घ्यायची नाहीत, ह्याच्यातच मनाचे समाधान मानून घ्या आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.
सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.
प्रतिक्रिया
3 Jan 2013 - 7:00 pm | श्रीरंग_जोशी
आधीच घरे महाग असताना नवी भाववाढ झाल्याने ओढून ताडून घर-खरेदी करणाऱ्यांना घर खरेदी लांबवावी लागून मागणी कमी व्हावी व या क्षेत्रात मंदी यावी. घरांच्या किमतीच नाहीत तर घरभाडेही कमी व्हावे...
एका संवेदनशील विषयावर चिंतन केल्याबद्दल चावडीकारांना धन्यवाद.
3 Jan 2013 - 8:23 pm | सूड
सोकाजीनानांची याबद्दल काहीतरी खरमरीत प्रतिक्रिया ऐकायला मिळेल म्हणून धागा उघडला. त्यांनीही उद्विग्नपणे प्रतिक्रिया दिलेली बघून काहीसा हिरमोड झाला.
3 Jan 2013 - 8:26 pm | पैसा
मी फ्लॅट घेतला तेव्हा बिल्डरला एकरकमी पैशांची गरज होती त्यामुळे सरकारी दराच्या २०% कमी दरात मला फ्लॅट मिळाला होता. पूर्ण पांढर्या पैशांत व्यवहार होऊनही किमतीच्या मानाने जास्त स्टँप ड्युटी भरावी लागली होती. आताच्या या वाढीमुळे "घोडं मेलं ओझ्याने आणि शिंगरू हेलपाट्यानं" असली गत व्हायची! सरकार कोणत्याही महसुलाच्या पैशांचा विनियोग कसा करते हे कधी तरी कळतं काय? मंत्र्यांच्या परदेश दौर्यांचा खर्च एकूण सरकारी खर्चाच्या किती % आहे हे कधी तरी उघडपणे सांगितलं जातं का? त्यासाठी दर वेळी तुम्हाला माहिती अधिकाराचा वापर करावा लागेल. असो. जास्त विचार करू नका. चहा मागवा!!
3 Jan 2013 - 8:49 pm | राही
मेट्रो शहरांमध्ये अगदी कळीचा बनलेला मुद्दा चावडीवर आणल्याबद्दल धन्यवाद. काही शहरांत,विशेषतः मुंबईत गेल्या काही वर्षांत काही ठराविक उपनगरांमध्ये वेगवेगळ्या विकासकार्यक्रमांमुळे(उदा.फ्लाय्-ओवर्स्,मेट्रो,सहावा रेल्-मार्ग,ईस्टर्न फ्रीवे, रस्तेरुंदीकरण,झो.पु. इ.)जागांचे भाव सरकारी जुन्या रेडीरेकनरपेक्षा कितीतरी वाढलेले होते.पण स्टँप्-ड्यूटी भरताना मात्र रेडीरेकनरप्रमाणेच किंमत दाखवली जाई.निवडणुका तोंडावर आल्या असताना पैसा गोळा करण्याची अशी सुवर्णसंधी सरकारकडून सोडली जाणे शक्यच नव्हते. जे काही करबीर वाढवायचे आहेत ते आताच वाढवले जातील. नंतर निवडणुकीच्या ऐन मोक्याला सवलतींची तात्पुरती खैरात होणारच आहे.
3 Jan 2013 - 9:07 pm | उपास
सरकार पैसे लुटतेच, टोल वसुलीसारखे पण लेख एकांगी वाटला.. चावडीवर दुसरी बाजू मांडणारा कोणी अस्ता तर अजून मजा आली असती.. काळ्याबाजाराला चाप बसवण्याचा प्रयत्न म्हणून रेडी रेकनर वाढवलाय निदान तेवढं तरी करायलाचं हव्ण नाहीतर बिल्डर अजून डोक्यावर बसतील..
3 Jan 2013 - 9:31 pm | सोत्रि
कसा ते सांगाल का ?
- (चाप नसलेला) सोकाजी
3 Jan 2013 - 10:12 pm | सूड
>>काळ्याबाजाराला चाप बसवण्याचा प्रयत्न म्हणून रेडी रेकनर वाढवलाय निदान तेवढं तरी करायलाचं हव्ण नाहीतर बिल्डर अजून डोक्यावर बसतील..
या सगळ्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण वाचायला आवडेल.
4 Jan 2013 - 12:24 am | उपास
ह्या ना त्या मार्गे सरकार पैसे खाते ह्याबाबतीत वादच नाही. पण ज्या वेगाने गेल्या काही वर्षात भाव वाढतायत आणि इन्वेंटरी सुद्धा वाढतेय, करेक्शन हे यायलाच हवे. मागणी कमी झाली की भाव खालती यायला लागतीलच. काळ्या पैशावर चाप बसेल का हा गहन प्रश्न आहे पण जागांचे प्रत्य्क्ष व्यवहार करतानाचे भाव रेडीरेकनरपेक्षा खूपच वाढते असल्याने ती तफावत कमी झाल्यास, निदान तेवढी तरी गंगाजळी सरकारला मिळेल.
जर सरकार मध्यमवर्गीयांना घरे देण्याची जबाबदारी उचलत असेल (उदा. म्हाडाची लॉटरी, झोपडपट्टीवासीयांना घरे) किंवा तसे दाखवत असेल तर इतर लोकांना व्यवस्थित फाट्यावरुन आपली तिजोरी भरायची हा मुद्दा चाणाक्ष बाबू लोकांनी लावून धरला असणारच. एवढे करुन जागांचे भाव खरच खाली येतात का ते पहायचे :)
खाली पिडाकाकांनी म्हटल्याप्रमाणे, एखादा तरी प्रतिवादी असता चावडीवर तर चर्चा अजून रंगतदार झाली असती असं वाटलं. ;)
3 Jan 2013 - 11:42 pm | पिवळा डांबिस
नाय म्हनजे मी काय म्हणतंय,
वाढीवलां सरकारान रेडी रेकनर तर काय तेंचा काय चुकलां?
नाय म्हनजे ७०-८० लाखाचे फिलॅट घेवूंक पैशे गांवतंत आनि मग सरकारांक २-४ लाख देतेवेळी कुचकुच कित्यां?
आता एक्स्प्रेसवे पासून तुमच्या घरापर्यंत जो रस्तो येतां तो सरकारांनच बांधलो ना? तुमच्याय गाडीचो टायर सुरक्षित रवंता आणि आमच्यासारख्या गरिबाकही धुळीतून चालूंक लागणा नाय, दोघांचीही सोय!!!
तेंव्हा वगीच नाय तिकडची रडारड करू नकांत, काय समजलेंत?
-सोकाजीनानांचो प्रामाणिक (पण आता बहुतेक ढिसमिस!!) बाल्या
पिवळो डांबिस
:)
4 Jan 2013 - 8:25 am | स्पंदना
+१
पर मला येक उलगडुन सांगल का कुनी? न्हाय म्हणजे हे जे रेडी रेकणार हाय ती कवा रेकणार आता नव्या फुटणार्या घरांसाठन का आमची गरिबाची पयल्यापास्न जी भरल्याली घर हायती (श्टँप डुट्टी) त्यास्नी आनी एक डाव भरायला लागनार का काय ह्ये रेडीन रेकन सुरु केल की?
लय मनापासन इचारलय.
तसबी पिडां काका तुमास्नी तर फिस्कलन हात दिलाया, मग तुमी रस्त्यान का चालतायसा?
4 Jan 2013 - 8:41 pm | सोत्रि
पिडांकाक,
बरेच मुद्दे आलेत तुमच्या प्रतिसादात:
१.
चावडीवर असलेल्या कोणाचीही ७०-८० लाखाचे फिलॅट घ्यायची ऐपत नाहीयेय. सरकार पाच लाखांपर्यंतच्या फ्लॅटवर फक्त ७०००+ (नक्की आकडा आत्ता आठवत नाही) एवढाच मुद्रांक शुल्क आकारायचे. आता तेही बंद केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना (ज्यांना ७०-८० लाखाचे फिलॅट घ्यायची ऐपत नाहीयेय) अशांनाही ह्या वाढीव रेडी रेकनरचा दणका बसतो आहे. ज्या उदात्त भावनेने हा रेडी रेकनर सुरू केला होता, त्याला हरताळ फासला गेलाय. घरांच्या किमतीवर नियंत्रण (मध्यमवर्गीयांसाठी) ठेवणे तर राहिले लांबच, लूटच चालू आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट हे कारण सांगून हा रेडी रेकनर वाढवला आहे. आता सरकारी तिजोरीत खडखडाट का? हे विचारणे चूक आहे का?
२.
एक्स्प्रेसवे पासून आमच्या घरापर्यंत जो रस्तो येतो सरकारनेच बांधला आहे. पण त्या रस्त्यांवर गाडीचे टायर सुरक्षित नाहीयेत. गाडीचे सस्पेंशनही सुरक्षित नाहीयेय. तो रस्ता कुठेही सलग ५०० मि. पर्यंत सपाट आणि हादरे न ब्सवणारा नाहीयेय. बाइकने प्रवास करणार्या मध्यमवर्गीयांना याच रस्त्यामुळे पाठीचे आणि मानेचे विकार जडत आहे. पण ह्या रेडी रेकनर सारख्या माध्यमातून पैसे ओरबाडणारे बीएमडब्ल्यु, ऑडि सारख्या अति लक्झुरियस गाड्या उडवत फिरत आहेत.
३.
हा गरिब नेमका कुठे राहतो सांगता का? मीही तिथेच जाऊन राहवे म्हणतो.
२-४ लाख देतेवेळी कुचकुच करायचीच नाहीयेय आम्हाला. २-४ काय ५-१० देऊ पण अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी तरी यातायात करायाला सरकारने लावू नये एवढीच रास्त अपेक्षरास्त, नाय तिकडची रडारड अजिबातच नाहीयेय.
- (ढिसमिस) सोकाजी
4 Jan 2013 - 9:30 pm | श्रीरंग
पर्फेक्ट!!
5 Jan 2013 - 1:33 am | पिवळा डांबिस
आता मी पडलंय रामा गडी, तेंव्हा तुमच्यासारख्या मुद्देसूद झंटलमनसारख्यां उत्तर देऊंक जमूचां नाय माकां. तरीपण प्रयत्न करतंय. तुमचो रामा म्हणान संपर्कान आमच्याही अंगात काय झंटलमनपना शिरलोसां का काय तां बघंया!!!
ह्यां तुमचां तुमीच ठरवल्यांत. माकां तर चावडीवरचे सगळे म्हातारे पोचलेले छुपे श्रीमंत वाटतंत. सगळ्यांची झील्/चेडवां कुठे ना कुठे इंग्लंडातून नाय तर ऑस्ट्रेलियातून (नाय त्या शिंदळीच्या अमेरिकेचां नांव नाय घेणसंय मी!) पैशे धाडत असतंले. जर्मनीची ती मरकेलबाय तर पैशे वाटूकच बसलेली आंसा असो आमचो थंयसर असलेलो रामा मित्र सांगी होतो. रोजची फुकट चहाटळकी करांन वर शेवटी चाय पितंत ता काय उगीच? :)
तां सरकारचा काम नाय. वस्तूची किंमत ही तेंका असलेल्या मागणीवर अवलंबून आसंता. जर 'मी डोईजड कर्ज घेऊन फिलॅट घेंवचंय नाय' आसां प्रत्येकान ठरवलां तर घरांच्यो किंमती कोसळतले का नाय? एकीकडे जितक्या जास्त कर्ज मिळांत तितक्या घेऊन शक्य तितको मोठ्ठो फिलॅट घेतंत आणि मग जरा काय असो आकस्मिक खर्च आयलों की बोंबा मारूक तयार!! जितक्या किंमतीचां घर असांत तेच्या १/६ रक्कम आकस्मिक खर्चासाठी किती लोकां शिल्लक ठेवतंत? आपल्या इथेच नाय पण तिथे (त्या शिंदळीच्या) अमेरिकेत पण काही लोकांनी असो अविचार केलो आणि आतां भोगतसंत त्याची फळां असो आमचो तिकडचो नंदूरामा सांगी होतो!!!
सरकारची तिजोरी गेल्या साठ वर्षांत कधी भरान वहात होती? इतके थोरले थेरडे झाले तुमचे चावडीकर आणि या प्रश्नाचां उत्तर अजून म्हायती नाय? हे काय लहानपणपासून काय हिमालयातले बालयोगी म्हणान वाढले काय!! छ्या, हयापेक्षा आमी अशिक्षित रामागडी बरे!!!!
प्रत्येक सज्ञान माणसांक ह्येचां उत्तर माहिती आसतां...
हळूहळू (तुमच्या नातवापर्यंत!!) होतलो चांगलो. आता आमी जुनी मान्सां त्या ओल्ड मुंबय-पुणे रस्त्यावर हाडां मोडून घेतंच होतंव तेंव्हा कुठे आता तुमकां गुळगुळीत आणि झुळझुळीत एक्स्प्रेस् वे मिळालो ना, मारूती आणि सुम्मो उडवूंक? घाय कित्यां? तरी बरां तुमकां त्या प्रिमियर पद्मिनी टॅक्शीतून (किंवा त्यापेक्षा जुन्या खिळखिळ्या येष्टीन) जुन्या रस्त्यान खंडाळ्याचो घाट चढूक लागणां नाय!!! उगीच किरकिर करू नकांत!!!
आता 'दगडांच्या देशा, खडकांच्या देशा' अशा महाराष्ट्रात रवंल्यानंतर सपाटी खंयसून गावतली? छत्रपतींचे मावळे असांन चढ-उताराक घाबरतांस? मगे तुमी यूपी-बिहारात जावंन रवलेला बरां, सगळी सपाटीच सपाटी!!!!
आमच्या पुण्यनगरीत बाईकवाले फुटपाथवरून चालणार्या बिचार्या पादचार्यांवर चढतंत. तेंव्हा तेंका असां जर काई झालां तर चालणार्या गरिबांक काय्येक वाईट वाटूचां नाय!!!
आजूबाजूंक बघितल्यात तर नक्की सापडतलो. ह्या जगात कुणाहीपेक्षा जास्त गरीब आणि कुणाहीपेक्षा (बिल गेटस सोडांन) जास्त श्रीमंत माणूस नक्की सापडतां. तेच्यासाठी आणखी दुसरां खंय जावंन रवाक नको!!
जीव एकदा जन्माक आयलों की तेकां मरेपर्यंत यातायातच करूचीच लागतां. ह्या विश्व साध्या गांडूळाकही अन्न आणि निवार्यासाठी (तेका वस्त्राचो फारसो प्रॉब्लेम नाय, लकी असां मेलो!!) वळवळ केल्याशिवाय जगू देणां नाय. आता आमी तुमचे रामा म्हणान काम करतोंव, तुम्ही कोणां लोकांचे कॉम्यूटर मोडतांस, पण वळवळ ही आसांच नशिबाक!!!
असो. दमलंय मी ह्यां रवळनाथाचां गार्हाणां घालून! आता चाय तरी पाजा कपभर!!!!!
:)
5 Jan 2013 - 12:01 pm | सोत्रि
:) :) :)
छान! पण काहीसे अवांतर वाटले. असो!
च्यामारी, ह्या सरकारचे नेमके काम ते काय हाच प्रश्न आता पडून राहिला आहे ;)
-(झंटलमन) सोकाजी
5 Jan 2013 - 12:19 pm | ५० फक्त
उत्तम प्रतिसाद,कोकणी वाचुन मजा आली. धन्यवाद.
5 Jan 2013 - 5:19 pm | उपास
मुद्देसूद लिहिलतं.. काळ्या पैशाने मार्केट असमतोल झालय हे खरं असलं तरी करेक्शन यायला हवच आहे. एकदा आयटीवाल्याना दणका बसला की ते होईलच पण वाढीव इन्वेंटरी दाबण्याची बिल्डरची कपॅसिटी कमी व्हायला हवेय.
बाकी शासनाने काय दिलय आणि काय नाही हा मुद्दा वेगळा पण तो एक्स्प्रेस वे झाला नसता आणि मायबाप सरकारने हिंजवडी/ मगरपट्त्यात एस. ई. झी. आणलं नसतं तर आपण तर मुंबई सोडली नसती व्चा ! :)
5 Jan 2013 - 7:54 pm | सोत्रि
एक्स्प्रेस वे आणि हिंजवडी/ मगरपट्टा एस. ई. झी. यांचा रेडी रेकनरशी काय संबंध?
- (आयटीवाला) सोकाजी
6 Jan 2013 - 11:10 pm | उपास
रेडीरेकनर वरुन चर्चा चालू असताना 'सरकार काय करते आमच्यासाठी?' हा मुद्दा निघाला म्हणून माझा अनुभव शेअर केला इत्कच.. र्त्याचा संबंध असा की सरकारने (पक्षी राजकारण्यांनी) काहीच केलं नाही असं मला वाटत नाही.. त्यांनी पैसे खाल्लेत ह्यात वाद नाही, ते चुकीचे आहेच ह्यातही वाद नाही पण त्यानी (असमतोल का होईना) विकास केला आहेच किंवा त्यांच्या धोरणांनी. असो!
6 Jan 2013 - 2:02 pm | नंदन
अगागागा, जीव गेलो माझो हसान हसान.
_/\_ स. न. वि. वि.*
(* निळ्याचा आत्मसंबोधन हो ह्या)
5 Jan 2013 - 10:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम बरोबर. एवढा पैसा सरकारच्या **त सारुन आपल्याला काय फायदा होतोय? हे साले सग्ळा पैसा गोळा कर्णार आणि नव्या नव्या योजना मधुन स्वतच्या नर्ड्यात घालणार.
4 Jan 2013 - 10:05 am | स्पा
साल जगण हराम केलंय या सरकार ने .
मिळेल तिथून, जमले तसं जनतेच्या खिशातून पैसा ओरबाडून काढून स्वताच्या पोटात घालणारे षंढ साले.
हि मंन्त्र्यांची जात साली .. कीड लागलीये लोकशाहीला ,
4 Jan 2013 - 2:32 pm | वपाडाव
स्पावड्या, हे लिंबु पिळुन घे पाहु आधी...
5 Jan 2013 - 12:21 pm | ५० फक्त
तुम्ही उभे रहा की निवडणुकीला दादर मधुन नाहीतर ठाकुर्लीतुन्,निदान ख-या आयडिंपैकी निम्म्या आयडिंची तरी मतं मिळतीलच की तुम्हाला. मग बघु तुम्ही स्वताच्या खिशातुन पैसे काढुन वाटताय का जनतेला.
4 Jan 2013 - 11:11 am | ऋषिकेश
नै जम्या! :(
यावेळी सोकाजीनानांची भुमिका 'आततायी' (केवळ वृत्तपत्रातील बातम्या वाचुन बनवलेली / प्रश्नाच्या मुळाशी न जाणारी)
वाटली.
5 Jan 2013 - 11:25 am | अभिजित - १
जेव्हा ३० / ३५ हजार कोटि. ( नक्कि आकडा माहित नाहि ) एका खात्यात ( जलसिन्चन ) सरकार खाते तरि इथे सरकार कसे बरोबर आहे. मध्यमवर्गिय लोकनि २/४ लाख जास्त भरायला कशि खळखळ करु नये हे पटवुन द्यायचा प्रयत्न होतो तेव्हा भ्रष्टचार किति तळापर्य्न्त मुरला आहे भारतिय लोकान्म्धे याचि जाणिव होते.
7 Jan 2013 - 12:47 am | उपास
अभिजीत, क्षमस्व पण तुमच्या वाक्यात विपर्यास दिसतो. सरकार पैसे खात नाही किवा ते चांगले/ बरोबर आहे असे कुणीच म्हणत नाही, पण सरकारी धोरणांमध्ये बाजारापणे लवचिकणपणा असायलाच हवा. हे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होतात कुण्या मंत्र्या-संत्र्याच्या घरात नाहीत, तो पुढे त्याचं भ्रश्टाचाराने कसं लोणचं घालतो तो सर्वस्ची वेगळा (आणि इथे गैरलागू ) मुद्दा आहे. तुमचाच मुद्दा पुढे रेटायचं तर उद्या, सरकारी मंत्री भ्रष्टाचारी आहेत म्हणून टॅक्स द्यायचा नाही अशी जर भूमिका कुणी घेतली तर ते हास्यस्पद नाही का.
7 Jan 2013 - 5:59 pm | अभिजित - १
काय विपर्यास दिसतो ? जर स्पष्ट करून सांगा. विपर्यास = misrepresentation ( of words, in this case here. ). To generate a meaning which is suitable for oneself, from opposition's speech ( or article ), by playing tricks of words .
पिवळा डांबिस जे काय म्हणतोय त्याच्या भोळ्या भाबड्या कोकणी बोलीत, त्याच्या वर ( आणि फक्त त्याच्यावरच ) माझी हि रोखठोक प्रतिक्रिया. बस्स . रेडि रेकनर मध्ये सरकारने काय पण करावे. मी त्याच्यावर काय पण बोलत नाही आहे. what I want to say is lot of Indians support corruption. I have met lot of people with same kind of mentality as of this bhola ( ? ) dambis. Its a fact.
जे तुम्ही म्हणताय कि - " उद्या, सरकारी मंत्री भ्रष्टाचारी आहेत म्हणून टॅक्स द्यायचा नाही अशी जर भूमिका ......" याला अतिशयोक्ती म्हणतात . exaggeration . Too much tax ? I won't pay.
पण मग हे तुम्ही म्हणताय .. . मी नाही .. . माझ्या वरील उत्तरात मी असे कुठे म्हणालो बरे ?
योग्य मराठी शब्द तुम्ही वापरावा, म्हणून आणि केवळ म्हणून हा प्रपंच !!
7 Jan 2013 - 6:07 pm | अभिजित - १
Addn to above – I have not tried to play with Pivla Dambis’s reply and generate a meaning which he is not intended to say. “ Viparyas of his word” . I have just plainly replied in bit harsh words, which UPAS did not like. I can not help !!
7 Jan 2013 - 7:38 pm | उपास
अभिजित, मराठी सुधारण्याचा प्रयत्न अव्याहत चालूच आहे. तुमच्या अनुभवांवरुन तुम्ही म्हणालात, बरोबर आहेच. पण शासन भ्रष्टाचार करतं हे बरोबर आहे हे सांगणारे (निवासी/ अनिवासी) भारतिय मला तरी नाही भेटले अजून. भ्रष्टाचार्यांना कायम शिव्या शापच मिळतात मग ते सरकार असो किंवा शभरची नोट हवलदारापुढे टेकवणारा 'स्ट्रीट स्मार्ट'(!).
असो, तुमच्या मतांबद्दल आदर आहेच, जसा (माझा) अनुभव वाढेल तसा (माझ्या) डोक्यात प्रकाश पडेल अशी अपेक्षा.
7 Jan 2013 - 12:19 am | निनाद मुक्काम प...
ह्या आधी
ह्या विषयी विशेष माहिती नसलेल्या मूळे मूळ लेखापेक्षा वीतभर जास्त लांबीचा प्रतिसाद व माझ्या प्रतिसादावर त्याहून मोठा प्रतिसाद देणे टाळत आहे ,
ह्या विषयावर माहिती घेणे चालले आहे ,
भारतात घर घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसणे असा काहीसा निष्कर्ष निघत आहे ह्या लेखातून
तेव्हा जर्मनीत घर घेतो कसा
येथे गृह कर्ज साडे तीन ते चार टक्क्याने मिळते , असे कानावर आले आहे.