बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं.
पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते.
साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार?
नुसती हळहळ शिल्लक राहाते.
दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं.
अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं.
आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो.
पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते.
इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.
हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते.
सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा.
नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
प्रतिक्रिया
20 Nov 2012 - 4:08 am | निनाद मुक्काम प...
लेखातील विचार आज मनापासून पटले. आणि त्यावेळी ह्या लेखामागील कळकळ मला समजली नव्हती हे देखील येथे नमूद करतो.
खूप वाईट आणि विचित्र वाटत आहे.
20 Nov 2012 - 12:21 pm | राही
आणि हा लेख वाचता वाचता यकुंसंबंधीचेच विचार डोक्यात घोळत होते.
मनोरुग्णांशी (ह्यात अनेक प्रकार येतात) अगदी निकटचा कौटुंबिक संबंध. यांची मानसिक तडफड अत्यंत जवळून पाहिलेली. द्विमनस्कत्व,निराशागर्तापतन,समाजभीती अथवा तिटकारा. अनेक रूपे.
या निमित्ताने मानसिक व्याधी,उपचार,आसरा,ते देणार्या संस्था/व्यक्ती यांची माहिती.
पण इथे माहिती आणि ज्ञान फारसे उपयोगाचे नाही हे लगेच लक्षात आले. हवी असते प्रदर्शन न करता दिलेली सहानुभूती,कमालीचा धीर(पेशन्स्),प्रेमळपणा आणि समजूतदारपणा. रुग्णाला सांभाळताना संबंधितांच्या, विशेषतः आईच्या माणूसपणाची कसोटी लागते. कुटुंबियांकडून योग्य इंटरवेन्शन हे अतिशय हवेहवेसे असते. मात्र फक्त सल्ले आणि उपदेश अगदी नकोनकोसे असतात.पीडिताशी मैत्री करणे (नुसते चॉकलेट्स किंवा भेटवस्तू देणे नव्हे),त्याचा विश्वास कमावणे,त्याची गार्हाणी शांतपणे ऐकून घेणे पण प्रसंगी त्याच्या चुकीच्या वागण्याला ठामपणे विरोध करणे, आठवड्यातले एक दोन तास त्याच्या सोबत घालवणे,(या मुळे रुग्णाच्या आईवडिलांना थोडा मोकळा वेळ मिळू शकतो)मंदबुद्धी असेल तर हस्तकला, चिकणमातीतून आकार घडवण्यासारखे छंद शिकवणे अशा गोष्टी करता येण्याजोग्या असतात.मुख्य म्हणजे जग वाईट आहे,ते आपल्यावर जाणूनबुजून अन्याय करतेय,ही भावना काढून टाकून मनाला सकारात्मक दिशा देणे महत्त्वाचे. असो.
यकुंच्या जाण्याने,ते अनपेक्षित नव्हते तरी,अतिशय दु:ख झाले. सोन्यासारखा जीव हकनाक(असे म्हणता येईल का?त्यांच्या दृष्टीने काहीतरी कारण असणारच.)गेला. त्यांना श्रद्धांजली.
21 Nov 2012 - 10:07 am | विटेकर
तुम्ही तुमच्याकडून पुरेशे प्रयत्न केले.. आभार.
यश-अपयश दैवाधीन असते.. पण तरीही यकु वाचायला हवा होता.
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम !
11 Sep 2016 - 8:57 am | आनंदयात्री
हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हापासून कैकवेळा वाचलाय. या तंत्राचा वापर एकेकाळच्या जवळच्या, पण गेल्या काही वर्षात दूर गेलेल्या एका मित्रासाठी करता येईल असे पटले होते. पण तशी ठोस पावले योग्य वेळी उचलली गेली नाहीत, आणि आता लेखात म्हटले आहे तशी फक्त हळहळ उरली आहे. तुमच्या ओळखीत कुणासाठी हे तंत्र वापरायला हवे असे तुमच्या मनात वाटून गेले असेल तर कृपया उशीर करू नका. योग्य वेळी मदत पोचवा , हे कळकळीने सांगण्यासाठी हा प्रतिसाद.