ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
15 Aug 2008 - 3:47 am

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२

१५ ऑगस्ट

एकदा ओसाकाहून कोबेला येत असताना अशाच गप्पा चालल्या होत्या. दहीकाला होऊन गेला नाही,१५ ऑगस्ट पण जवळ आला ना? असेच काहीबाही बोलत होतो तेवढ्यात एकाने हटकले."आप इंडियासे हो?" राष्ट्रभाषेतून सवाल आला." हाँ! "अशा आमच्या उत्तराची वाट न पाहताच " आपको मालूम है? शिन कोबेमे जहाँ इंडियन कॉन्सुलेट है,वहाँ हर १५ अगस्त,२६ जनवरीको फ्लॅग हॉइस्टिंग प्रोग्राम रहता है।अपने कॉन्सुलेट जनरल चीफ गेस्ट रहते है । " मग आम्हीही त्याला तुम्ही कोण,कुठले विचारले. तर किंचित गंभीर होत तो म्हणाला," हम वैसे तो लाहोरसे है । बटवारेके बाद हमारे पिताजी और दादाजी लाहौर चले गये और फिर १९५० मे यहाँ कोबेमे आगये और फिर यही बस गए,अब तो पासपोर्ट भी जापानकी है । आप १५ अगस्त के फंक्शनमे जरुर जाना,मै मी हर साल वहाँ जाता हूँ, काश पाकिस्तानी एंबसी भी ऐसा कुछ १४ अगस्तको यहाँ करती !"

फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या त्याला १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाला जावेसे वाटते ह्याचे आम्हाला फारच अप्रूप वाटले. त्याच्याकडून पत्ता आणि वेळ घेतली आणि जायचे ठरवले.जपानचे सरकार इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसांसाठी कामातून सवलत देते.त्यामुळे दिनेश आणि बाकी सर्वांनी कचेरीत तसे सांगून ठेवले.शाळा सुटल्यापासून झेंडावंदनाला गेलेच नव्हते कोणी ! इतक्या वर्षांनी आणि ते ही दूरदेशी असताना १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला जायची सार्‍यांनाच उत्सुकता वाटत होती. दोन दिवस आधी तिथपर्यंत जाऊन रस्ता पाहून ठेवला. हो,झेंडावंदनाला (तरी)उशीरा नको जायला. कॉन्सुलेटच्याच आवारात इंडोजापनीज कल्चरल सेंटर असल्याचे आम्ही पाहिले. आत शिरतानाच दिसतो गांधीजींचा अर्धपुतळा ज्याचे अनावरण डॉ. राजेंद्रप्रसादांच्या हस्ते झाले होते.

पांढरे कपडे घालून,कॅमेरे घेऊन तयार झाली सर्व मंडळी! जपानमधील ८ वाजता म्हणजे भारतातल्या ४.३० वाजताच आम्ही झेंड्याला सॅल्युट करणार होतो. लाल किल्ल्याच्या सोहळ्याआधीच! लाल किल्ल्यावरचा तो सोहळा टीव्हीवर पहायला म्हणजे तिन्ही दलांचे संचलन आणि त्यांनी दिलेली मानवंदना पहायला मला आवडते.

सव्वासातलाच सगळे तयार झाले आणि पावणेआठच्या सुमाराला कॉन्युलेटच्या इमारतीत पोहोचलो.बरेचजण आधीच तिथे आलेले होते. भारतीय चेहरे तर होतेच पण जपानी मंडळीही दिसली आणि काही शाळकरी जपानी मुलंही होती. ओळख नसतानाही सगळे एकमेकांना अभिवादन करत होते. त्यातच श्री.वर्माही होते. त्यांनीही आम्हाला गुड मॉर्निंग केले,आम्ही त्याचा हसून स्वीकार केला. नंतर जेव्हा ते झेंड्यापाशी गेले आणि त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण झाले तेव्हा समजले की हे तर आपले कॉन्युलेट जनरल! किती सहजपणे ते आमच्याशी बोलत होते! त्यांच्या बरोबर होते ह्यूगो प्रिफेक्चर चे चीफ मिनिस्टर! पोलिसांचा ताफा नव्हता की बॉडीगार्ड्स नव्हते.मिरवणं नव्हतं आणि मुख्यमंत्र्यांचा रुबाब तर अजिबातच नव्हता. ते फक्त वर्माजींच्या बाजूला उभे होते.

आता सारेजण रांगेत ताठ उभे राहिले."सावधान! झंडेको सलामी देंगे,सलामी दो!" अशी घोषणा झाली आणि सगळेजण झंडेको सलामी देत खड्या सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दूरदेशात तिरंगा फडकताना पाहून उर भरून आला आणि डोळे पाझरायला लागले.. एक विलक्षण भावना मनात दाटली. ह्यूगो प्रिफेक्चरचे मुख्यमंत्रीही आमच्याबरोबर तिरंग्याला सलामी देत होते आणि शाळकरी जपानी मुलं आमच्याबरोबर आपले राष्ट्रगीत गात होती. इंडोजपान कल्चरलच्या मंडळींनी ह्या मुलांकडून आपल्या राष्ट्रगीताची तालीम करून घेतली होती. सर्वांनी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.(असं हस्तांदोलन करून शुभेच्छा देणं सुध्दा आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं ) नंतर सर्वांनी आतील हॉलमध्ये बसावे अशी सूचना आली.

श्री.वर्मानी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्वांना १५ ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रपतींचा 'राष्ट्राला उद्देशून संदेश' वाचून दाखवला. डॉ.कलामांचे राष्ट्रपती म्हणून पहिलेच भाषण होणार होते आणि ते हुकणार असे वाटत होते पण वर्मासाहेबांनी सारे भाषणच वाचून दाखवले! त्याचबरोबर हे सुध्दा सांगितले की राष्ट्रपती भवनातून रात्री १.३० वाजता फॅक्स आला, त्यात स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा आणि भाषणाची प्रत होती. फॅक्सच्या पहिल्या पानावर खुद्द कलामांच्या हस्ताक्षरात रिमार्क होता,हे भाषण कार्यक्रामात वाचून दाखवले जावे. भाषण वाचून दाखवल्यानंतर ही प्रत आणि मिठाई आम्हा सर्वांमध्ये फिरवण्यात आली. हे सारं अनुभवताना आतून खूप भरून येत होतं.

नंतर चहापानासाठी तर वर्माजी आमच्यातच येऊन बसले. तुम्ही इथे नवीन दिसता?कुठून आलात? कुठे काम करता? सगळी चौकशी केली आणि स्वतःचे कार्ड देऊन काही अडचण आली तर विनासंकोच फोन करा..असेही सांगितले.सगळ्यांच्या चहाखाण्याकडे त्यांचे जातीने लक्ष होते एवढेच नव्हे तर ते आग्रह करुन वाढायला लावत होते. भारतीय सरकारी यंत्रणेचा इतका सुखद आणि जिव्हाळ्याचा अनुभव आम्ही प्रथमच घेत होतो.

चहाखाणे झाल्यावर अजून एक सुखद धक्का होता. एकीकडे काही जणांनी तिथे असलेल्या लहानशा स्टेजवर भारतीय बैठक सजवली.इंडोजपान कल्चरल सेंटर तर्फे जपानी युवकांनी बासरी,तबला आणि वीणेवर अभिजात भारतीय संगीत सादर केले.(क्योतो विद्यापीठातल्या मुलांनी दोन हिंदी एकांकिकाही सादर केल्या होत्या मागे एकदा आणि त्याचा प्रयोग अटलजींसमोर करून वाहवा मिळवली होती,त्यांच्या शुध्द हिंदीपुढे आमचे बंब्बेय्या बिनाअस्तराचे हिंदी बोलायलाही लाज वाटली होती.)
तिरंग्याच्या साक्षीने जपानी युवती तबल्यावर आणि एक तरुण बासरी वाजवित होता.वीणेवर अजून एक जपानी बाला साथ देत होती.. ही मैफल संपूच नये असं वाटत राहिले. ह्या मैफिलीची झलक आपण इथे आणि इथे पाहू शकता.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी जवळ आला की जपानमधला हा १५ ऑगस्ट हटकून आठवतोच.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

15 Aug 2008 - 4:06 am | रेवती

१५ ऑगस्टचे औचित्य साधून लिहिलेला अटोपशीर लेख!
जयहिंद!

रेवती

धनंजय's picture

15 Aug 2008 - 4:08 am | धनंजय

वाचून आनंद झाला.

स्वातंत्र्यदिनाबद्दल शुभेच्छा.

प्राजु's picture

15 Aug 2008 - 11:25 pm | प्राजु

तुझं हे वर्णन वाचून इथेच माझे ही डोळे पाझरायला लागले. अतिशय भाग्यवान आहेस स्वातीताई तू.
मस्त लेख आणि फोटो सुद्धा!
जय हिंद!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

15 Aug 2008 - 4:12 am | केशवसुमार

स्वातीताई,
मस्त लेख आणि चलचित्रे ही उत्तम
दोनवर्षापुर्वी बुडापेस्टला साजरा केलेल्या १५ ऑगस्टची आठवण झाली
जय हिंद!!
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
केशवसुमार

धमाल सर्किट's picture

15 Aug 2008 - 4:39 am | धमाल सर्किट (not verified)

आवडला लेख.

- सर्किट

बेसनलाडू's picture

15 Aug 2008 - 11:08 am | बेसनलाडू

(भारतीय)बेसनलाडू

वैशाली हसमनीस's picture

15 Aug 2008 - 7:06 am | वैशाली हसमनीस

तू हा प्रसंग सांगितला होतास,त्याची आठवण झाली.आज तर देशापासून लांब असताना डोळ्यात पाणी ऊभे राहिले.काहीच न सुचल्यामुळे मी उभे राहून 'जन गण मन'म्हणून झेंड्याला येथूनच सलामी दिली.गेल्या ४० वर्षांची संवय! पण मन भरून आले हे खरे!

विसोबा खेचर's picture

15 Aug 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

एकीकडे काही जणांनी तिथे असलेल्या लहानशा स्टेजवर भारतीय बैठक सजवली.इंडोजपान कल्चरल सेंटर तर्फे जपानी युवकांनी बासरी,तबला आणि वीणेवर अभिजात भारतीय संगीत सादर केले.

क्या बात है. दुवेही छान आहेत! :)

तिरंग्याच्या साक्षीने जपानी युवती तबल्यावर आणि एक तरुण बासरी वाजवित होता.वीणेवर अजून एक जपानी बाला साथ देत होती.. ही मैफल संपूच नये असं वाटत राहिले.

क्या बात है! स्वाती, सुंदर लेख...

जय हिंद!

तात्या.

यशोधरा's picture

15 Aug 2008 - 9:22 am | यशोधरा

स्वातीताई, मस्तच लेख!!

सखी's picture

15 Aug 2008 - 10:12 am | सखी

स्वाती छानच लेख आहे. वाचताना सगळ्याचच अप्रुप वाटलं. जपानी मुलं आमच्याबरोबर आपले राष्ट्रगीत गात होती - हे खरोखरचे घडले आहे, वाचुन बरे वाटले, मला वाटले होते या गोष्टी फक्त हिंदी चित्रपटातच होतात :)
दुवेही छान आहेत. त्या हिंदी एकांकिकाचेही दुवेही जमले तर दे, बघायला आवडेल.

सहज's picture

15 Aug 2008 - 11:25 am | सहज

अतिशय आवडला. लेखमालेत देखील सुंदर टायमिंग!

जयहिंद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2008 - 2:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय आवडला. लेखमालेत देखील सुंदर टायमिंग!

प्रमोद देव's picture

15 Aug 2008 - 3:49 pm | प्रमोद देव
लिखाळ's picture

15 Aug 2008 - 3:40 pm | लिखाळ

स्वातीताई,
लेख आवडला. दुवे सुद्धा छान.
--लिखाळ.

II राजे II's picture

15 Aug 2008 - 3:43 pm | II राजे II (not verified)

खुप छान !

वाचून डोळे आनंदाने भरुन आले तुम्हीतर स्वतःच अनुभव घेतला आहे !

लेख आवडला !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

तितकीच सुंदर प्रकाशचित्रे सुद्धा! (पाकिस्तानी नागरिकाची आठवणही अंतर्मुख करणारी)
वाचतानाही अभिमानाने ऊर भरुन आला!

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!!
जयहिंद!

चतुरंग

नंदन's picture

20 Aug 2008 - 1:20 am | नंदन

असेच म्हणतो. सुरेख आणि समयोचित लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

16 Aug 2008 - 5:00 am | मदनबाण

स्वातीताई, सुरेख लेख!!!!!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

स्वाती दिनेश's picture

19 Aug 2008 - 12:04 pm | स्वाती दिनेश

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

ऋषिकेश's picture

19 Aug 2008 - 11:25 pm | ऋषिकेश

स्वातीताई,
तुझ्या नेहेमीच्या शैलीने सजलेला सुंदर समयोचित लेख .. खूप आवडला.. एकदम भिडला :)

स्वगतः लेख समयोचित असला तरी प्रतिक्रिया समय समाप्तीच्या घोषणे नंतर देतोयस :)

-(भारतीय) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2008 - 11:28 pm | मुक्तसुनीत

पूर्ण लेखमालिकेतला हा सुरेल आणि सुरेख मोती ! :-)