आवडलेले काही... ३

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
19 Aug 2012 - 11:32 pm

आवडलेले काही... १

आवडलेले काही... २

***

परत एकदा दुर्गाबाई

काही दिवसांपूर्वी दुर्गाबाईंचे 'आठवले तसे' हे पुस्तक हाती आले. त्यात एका प्रकरणात दुर्गाबाईंनी त्यांच्या कॉलेज जीवनातील काही आठवणी सांगितल्या आहेत. मानवी मनाचे विविधगुणदर्शन अतिशय रोचक पद्धतीने मांडले आहे. अर्थात, लिहिणार्‍या दुर्गाबाई, त्यामुळे लेखन अगदी थेट, फारसा आडपडदा न ठेवता केलेले असे आहे. त्यातील हा भाग, वाचल्यावर... शेवटचा भाग वाचल्यावर, अंगावर आलेला काटा बराच वेळ तसाच होता.

***

आता याच फादर लोकांचे एक विदारक चित्र मी देणार आहे. १९३२ चे वर्ष असावे. मी एम. ए. चा प्रबंध लिहीत होते. सुटीच्या दिवसांतही मी कॉलेजात जाऊन लिहीत बसायची. त्या वेळी केमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्रमुख आणि नुकतेच प्रिन्सिपॉल झालेले फादर सकासा अत्यवस्थ असून हॉस्पिटलमधे होते. महिन्यापूर्वीच मी झाडाखालून कॉलेजमधे येत असताना एका सरड्याने अंगावर उडी घेतली. हाताला बोचकारले. रक्त येऊ लागले. सकासांची नि माझी ओळखही नव्हती. पण ते मागून येत होते. त्यांनी ते पाहिले. ममतेने जवळ येऊन त्यांनी हात धरून मला केमिस्ट्रीच्या दालनात नेले आणि कापसाने रक्त पुसून काही औषध लावले. मग हसून "आता जा मुली!" असं म्हणाले. त्यांनी माझे नावही विचारले नाही. आभार मानून मी निघाले. ते सकासा शेवटचे क्षण मोजताहेत ही वार्ता ऐकून बरे वाटेना.

माझ्या पेनमधली शाई संपली होती. शाई घेण्यासाठी मी पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमधे गेले. शाई भरली. तोच खाली दारत मोटरचा आवाज ऐकला. अशुभाने मन शंकित झाले. मी खिडकीशी उभी रहिले. फादर पॅलेशिओंनी माझ्याकडे पाहूनच 'गेले' असे सांगितले. मी उदास होऊन खाली जाणार तोच आमच्या कॉलेजचे जुने हेडक्लार्क गोम्स बाहेर आले. ते म्हणाले, "जरा थांब. तुला मौज पाहायला मिळेल. परत अशी संधी येणार नाही!" मग गंभीर, दगडी चेहरा करून त्यांनी प्रिन्सिपॉलची सही असणार्‍या नोटिसा काढून घेतल्या. त्या ऑफिसमधे ठेवल्या आणि स्तब्ध बसून राहिले.

मी आता काय होणार या बुचकळ्यात होते तोवर पॅलेशिओ (त्यांना संध्याकाळी प्रिन्सिपॉल नेमण्यात आले), फादर लॉरेन्स आणि सगळे फादर्स ऑफिसात आले. "नोटिसा काढल्या?" त्यांनी विचारले. गोम्सनी नोटिसांचे कागद समोर धरले. त्या फादर लोकांच्या चर्येवर दु:खाचा लवलेशही नव्हता. ते उत्साहात होते. क्रौर्य त्यांच्या चेहर्‍यांवर दाटले होते. हे सारेजण जणू गिरकी घेतल्याप्रमाणे वाटोळे फिरले आणि अत्यंत बेशिस्तपणे फादर सकासांच्या खोलीत शिरले. त्यांनी सकासांना सर्व युरिपियन भाषांत अभद्र शिव्या दिल्या. ते नाचले. थुंकले. फादर लॉरेन्स म्हणाले, "May his soul go to purgatory. (त्यांचा आत्मा नरकात जावो)." हा डेथडान्स (मरणनाच) पाहून मी थक्क झाले. मनात आले : मी इथे आलेच का? होय, गोम्स म्हणाले होते की, "तू जा त्यांच्यामागून, मी येतोच!" म्हणून मी सकासांच्या खोलीपाशी बाहेर जाऊन उभी राहिले होते. त्या फादर लोकांनी सकासांच्या जेवढ्या वस्तू पळवता आल्या तेवढ्या पळवल्या. नष्ट करता येतील त्या नष्ट केल्या. आरडाओरडा तर चालूच होता. हे ख्रिस्तभक्ताचे शांतिनृत्य की सैतानाचा आतंकनाच?

हे भयानक दृश्य पाहून मी हादरले. मला त्यांची किळस आली. बरे झाले सुटीचे दिवस होते म्हणून, नाहीतर हे भयनाट्य विद्यार्थ्यांना मोफत पाहायला मिळते! पण आता ते सारे लाजलज्जेच्या पलिकडे गेले होते. गोम्स शांतपणे बाहेर उभे राहिले. त्यांना पाहून ही सेना पाय आदळीत बाहेर पडली आणि निघून गेली. गोम्सनी उसासा टाकला नि खोलीला सील केले. ते म्हणाले, "असंच असतं. मी ऑफिसमधे मुद्दामच बसून राहिलो. नाहीतर त्यांनी तिथेही नासधूस केली असती. जा तू आता."

माझे पाय जड झाले. चालवेना. मी कशीबशी भिंतीला धरून खाली आले. काम तर कसले होणार? सरळ घरी गेले.

दुसर्‍या दिवशी सकासांचे दफन होणार होते. त्यांचे अंत्यदर्शन घ्यावे म्हणून मी निघाले. मला वाटले, प्रेत हॉलमधे किंवा कॉलेजच्या चॅपलमध्ये असेल. पण कळले की प्रेत झेविअर शाळेच्या चॅपलमधे ठेवले होते. अगदी एकाकी. फक्त राहवेना म्हणून म्हातारा गोम्स रात्रभर जवळ बसून होता. एरवी ख्रिस्ती लोकांत अशा वेळी death watch चे- मृतावरच्या पहार्‍याचे- स्तोम किती माजवले जाते ते ख्रिस्ती वस्तीतल्या खोताच्या वाडीत राहून मला चांगलेच माहीत झाले होते. शिवाय वर समजले ते हे की, सकासांचे भूत येईल म्हणून सारे फादर लोक घाबरले होते. कोणी प्रेताजवळ बसायला तयार होईना. म्हणून कॉलेजातून प्रेत हलवले गेले. ऐकून मन उदास झाले. मी झेविअर शालेत जायचे ठरवले. इतक्यात रोझ जॅकोबेथ ही सकासांच्या हाताखाली बी. एस. सी. करणारी ज्यू मुलगी ओक्साबोक्शी रडत तिथे आली. तिच्याबद्दल व फादरबद्दल लोक बोलत. तेवढ्यात फादर लॉरेन्स आले नि तिला पाहून हसत कुचेष्टेने म्हणाले, "I am glad, that devil Father of yours is dead. May his soul go to hell." हे शब्द मलाही वज्राघातासारखे वाटले, मग तिला तर काय? अगदी असहाय्य होऊन ती तोंड झाकून रडू लागली. सारे जण तमाशा बघत होते उभे होते. पण कोणी काही बोलेना. फादर लॉरेन्सकडे बघत मी तिच्याभोवती हाताचा विळखा घातला. ते तुच्छतेने हसून निघून गेले. मग तिला हाती धरून मी झेविअर शाळेत जिथे प्रेत ठेवले होते तिथे गेले. फक्त स्निग्ध नि शांत तिथल्या मेणबत्त्याच होत्या. मृताबद्दलचा ओलावा कुठेच नव्हता. मला वाटले होते, इथे कुणी प्रार्थना करीत असतील. मुक्याने तरी. पण तसे काही या धर्मगुरूच्या प्रेताजवळ नव्हते.

जॅकोबेथ कोसळून खाली बसली. तिच्याकडे बघत जो तो बाहेर जाऊ लागला. मी दर्शन घेतले. जरा थांबले. जॅकोबेथला 'चल' म्हटले. ती येईना तेव्हा मी तिला तिथेच सोडून उदास होऊन बाहेर पडले. माझ्याही मनात सकासा नव्हतेच. फक्त भीषण विडंबन थैमान घालीत होते. क्रौर्य एवढे सर्वसंचारी असते का? धर्म, माणूसकी, श्रद्धा एका क्षणात भीषण क्रौर्य कोलमडून पाडू शकते?

किती वर्षे मग ती हुकलेली माणुसकी शोधीत आपण भटकत राहतो. पण तिची चर्या बदलते ती बदलतेच.

- 'कॉलेजातले काही किस्से', आठवले तसे, दुर्गा भागवत, वरदा बुक्स.

संस्कृतीधर्मइतिहासप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

20 Aug 2012 - 6:40 am | शुचि

शिव शिव!!! :(

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2012 - 9:32 am | प्रभाकर पेठकर

भयानक. फादर सकासांचा पूर्वेतिहास समजल्याशिवाय इतरांच्या वागण्याचे आकलन होणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2012 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असाच विचार मनात आला.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2012 - 7:14 pm | प्रकाश घाटपांडे

खर आहे. अन्यथा सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या समाजात असे वर्तन अनाकलनीय आहे.

कवितानागेश's picture

20 Aug 2012 - 11:22 am | कवितानागेश

भयानक!!
लोक रीटायर झाल्यावर/ मेल्यावर त्यांच्याबद्दल कंड्या पिकवणे आणि त्यांच्या वस्तू पळवणे हे प्रकार तसे कुठल्याच 'थोर समजल्या जाणार्‍या' क्षेत्रातही नविन नाहीत.
बाकी 'मृत्यूनंतर शत्रुत्वही संपते' हे कुणीच कधीच लक्षात घेत नाहीत.

राही's picture

20 Aug 2012 - 5:47 pm | राही

दुर्गाबाईंची शैली प्रवाही, लिखाण संदर्भबहुल आणि त्या स्वतः अनुभवसंपन्न, त्यामुळे त्यांचे कोणतेही पुस्तक वाचनीय असतेच. पण संबंधित पुस्तक मात्र त्यातील काही व्यक्तींविषयीच्या अनावश्यक शेरेताशेर्‍यांमुळे तितकेसे आवडले नव्हते. दुर्गाबाईंचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांनी इतरांचे मातीचे पाय दाखवण्याचा खटाटोप करावयास नको होता असे वाटत राहिले. असो.
अर्थात वरील उद्धृत लिखाण हे वाचनीय तसेच मननीय आहे हे खरे.

जाई.'s picture

22 Aug 2012 - 11:17 am | जाई.

+१

आनंदी गोपाळ's picture

22 Aug 2012 - 11:42 am | आनंदी गोपाळ
परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

दाहक !

पैसा's picture

22 Aug 2012 - 1:17 pm | पैसा

फादर सकासांची दुर्गाबाईंसारख्या अनोळखी मुलीबरोबरची वागणूक पाहता चांगला माणूस असावा असं वाटतं, पण इतर फादर लोकांबरोबर त्यांचे कसे संबंध असतील हे आपण सांगू शकत नाही. सगळेच फादर लोक धार्मिक ओढीने त्या व्यवसायात गेलेले असतात असं नाही. जबरदस्तीने मूळ प्रेरणा दाबून, लग्न न करता राहिल्याने किंवा इतर दडपणांमुळे ते अनेकदा विक्षिप्त झालेले असतात. बरे, गोम्स सांगतात की "जरा थांब, तुला मौज पहायला मिळेल." म्हणजेच कदाचित त्यानी अशा प्रकारचं वर्तन या फादर लोकांकडून आधीही पाहिलेलं असेल. मानवी स्वभाव ही अनाकलनीय गोष्ट आहे.

दुर्गबाईंच्या भाषेबद्दल आम्ही काय बोलावं! असे आणखी उतारे शोधून आमच्यापर्यंत पोचव. म्हणजे पुनःप्रत्यय घेता येईल!

किसन शिंदे's picture

24 Aug 2012 - 3:28 pm | किसन शिंदे

दुर्गाबाईंची साधी सरळ मांडणी आवडली.

तुम्हीच सुचवलेलं 'शुभ्र काही...' सुध्दा अतिशय सुंदर होतं.