एक टुमदार गाव - माझे माधवनगर

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 Mar 2010 - 11:55 am

एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी)

माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे.

पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार.

बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व. वसंतराव दादा पाटीलांच्या प्रेरणेने दिमाखात चाललेला साखऱ कारखाना. गावात विजेवर चालणाऱ्या मागावर धोतरांची निर्मिती करणारे गल्लोगल्ली अनेक छोटेछोटे कारखाने. रेल्वे मार्गाला लागून शेंगदाणातेलाची गिरणी. तर दुसऱ्या बाजूला वीजनिर्मितीचा कारखाना. भोंग्यांच्या शिस्तीत व मागांच्या खडखडाटात रमलेले गाव उद्योजकांचे आवडते होते तर जकात मर्यादेपलिकडील म्हणून मंगलोरी कौले व बांधकामाचे साहित्याच्या, साखर व धान्यांच्या गोडऊनचे माहेर घर.

गावाला आखीव सात पेठा. सांगलीकडून येताना रविवार पेठ पहिली लागे. नंतर वारांच्या संगतीप्रमाणे शनिवार पेठ रेर्ल्वे मार्गामुळे अर्ध्यावर तुटक झालेली. पेठांच्या मधोमध सांगलीहून तासगाव, विटयाकडे जाणारा एकमेव डांबरी रस्ता. प्रत्येक पेठेला दोन्ही बाजूंना दोन चौक. दोन पेठांच्या मध्यात एक बोळवजा सडक, मुख्यतः मैलावहन करणाऱ्या रेड्याच्या गाडीला वा अन्य वाममार्गीयांना लपतछपत जाण्याला सोईची वाट. मागल्यावाटेला शेंडाच्या झाडांचे कुंपण. तर पुढल्या कुंपणांना कोयनेलच्या रेखीव झुडुपांची तटबंदी. प्रत्येक घराला पुढेमागे अंगण त्यात छोटीशी बाग, श्रीमंतीची झलक दाखवणारी. म्हणतात, बुधगावकर संस्थानिकांनी १९२०-३० सालच्या सुमारास आखणीकरून तयार केलेली ही कॉलनी त्या काळातील आदर्श होती. शिवाय कापडपेठवाले आठवले-शहाडे व अन्य श्रीमंत मुंबईकरांच्या आकर्षक बंगल्यांनी सजलेली होती.

माधवनगरला पाण्याची (गैर)सोय फार मजेची होती. प्रत्येक घराच्या समोर एक खड्डा करुन त्यात ग्रामपंचायतीचे पाणी तास-दोन तास येत असे. ते घरात भरून ठेवणे काम असे. शिवाय उरलेले पाणी झाडांना तर कधी वाहनांना धुवायला लागे. दर आठवड्याला तो पाण्याचा हौद साफ करणे एक काम असे.

नातू शेठजींच्या कॉटन मिलमधे ब्राह्मण कामकऱ्यांचा जास्त भरणा होता. साखरकारखान्यात लालबावट्याचा दबाव होता. अनेक मारवाडी कापडव्यापारात व मागांच्या कारखानदारीत जम बसवून होते. चारमागांची किफायती युनिटे चालवून अनेक मंडळी निवृत्तीचे शांत जीवन आक्रमित होती. गावाला सुखवस्तू राहणीची छबी होती.

महिला मंडळे, भजनाचे क्लास, भिशीच्या चावड्या, हळदीकुंकु, नवरात्रीची धामधूम आदि धार्मिक समारंभ गावातील महिला वर्गाला खुष ठेवीत असे. घरच्यांच्या प्रोत्साहनाने गोडबोले, भिडे व ओक महिला कीर्तनकार म्हणून नाव मिळवून होत्या. गणेशचतुर्थीच्या काळात कॉटनमिल व साखरकारखान्यातील नाटके व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. शिवाय दसऱ्याच्या काळातील रात्री रामलीलात रंगून जायच्या. सांगलीला नाटकांना जाणे मोठा समारंभ असे. भारी साड्या, उठावदार दागिने व गजरे, वेण्यांचा सुगंधी दरवळवाल्या दर्दी सांगलीकर रसिकांचा आनंद, नाटकाची खुमारी द्विगुणित करत असे. शिव शाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांची भाषणमाला असो वा पुना ओकांच्या ताजमहलावरील व्याख्याने, माधवनगरकर धाऊन धाऊन आस्वाद घेत असत.

माधवनगरला कल्पक उद्योजक, मेहनती कामगार व भांडवल बाळगून असलेल्यांची जोवर कमतरता नव्हती तोवर त्याची भरभराट होत गेली. त्यात भिडे परिवारातील फॅक्टरीज, पापशेठजींची जिनिंग व वीव्हींग मिल, शहांची शेंगदाणातेलाची मिल, मधुकरभाईं प्रतापांची जिनिंग मिल, हळिंगळ्यांच्या, रानड्यांच्या, सांगल्यांच्या, नातूंच्या मोठ्या लूम्स होत्या. गोखल्यांची हॅचरी होती, बाळासाहेब कुलकर्ण्यांची मॉडर्न मिल, देवकरण मालूशेठ, जाखोटियाशेठ, बेदमुथा, मर्दां सारखे भांडवलदार होते, कॉटन मिलचे केळकर व गोरे, मुकुंदराव परांजपेंसारखे परिपक्व व्यवस्थापक होते. ग. म. पांडे, चंदरराव जॉबर कामगार पुढारी, साखरकारखान्यात वसंतरावदादांचे लोकप्रिय नेतृत्व होते. त्यांच्या एका शब्दावर जीव टाकणारे कामगार होते.

रेल्वे स्टेशन माधवनगरची शान होती. फाटका जवळच्या आनंद भुवन मधील शिरापुरी तर समोरच्या हाटेलातील चटकदार मिसळ, शेजारच्या शहांच्या दुकानातील गोलगोल हॅन्डल फिरवून बनलेल्या व कुईई करुन फुटणाऱ्या बाटलीतील फसफसणारा सोडावॉटर. रेल्वे स्टेशनवर भिडे समूहाच्या फाटकासमोर जनता हाटेलातील सुरळी केलेली चार आणेवाली कडक अंबोळी. बुधवार पेठेतील मनोहरांची खाणावळ. पठाणचे इस्त्रीचे दुकान इतर बऱ्याच कामाकरिता गर्दी करुन असे. पुर्वीच्या बंद पडलेल्या लक्ष्मी थिएटरचे नाव बदलून अनंत झाले. माधवनगरकरांना मनोरंजनासाठी सांगलीला जायला लागेनासे झाले.

साखरगाळपाच्या काळात उसाच्या बैलगाड्यातून ओढून ऊस चोरायची मजा न्यारीच होती. एरव्ही सायकल आरामात चालवत सांगलीला जाऊन येताना फार दमल्यासारखे वाटायचे नाही. सिटीबसमधे घाईच्यावेळा सोडता आरामात बसायला मिळे. सायंकाळी रेल्वेफलाटावरून पुढे जात सिग्नल केबीनपर्यंत फिरण्याचा छंद तरुणतरुणींचा होता. संध्याकाळची एक्सप्रेस जाईपर्यंत गप्पाटप्पांना ऊत येई. पुढे जाऊन वडाच्या झाडांच्या पारंब्यांना लोबकळताना मजा येई, तर कधी तेथे मॅट टाकून कुमार हळींगळे व हरीष प्रतापच्या टीमच्या क्रिकेटच्या मॅचेस रंगत असे. त्यातील बाळ्या कुलकर्णी, अंक्या कणेगावकर, पाप्या कुलकर्णी, अव्या रानडे नंबरी गडी होते. पाटणकरांचा जयंता संघाच्या मैदानावर ‘दक्ष-आरम’ करताना दिसे तर ओकांच्याकडे रिंगचा खेळ रंगे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्यांच्या डावाचे फड लागत. कधी ३०४, नॉटेटठोम (नॉट एट होम), चॅलेंज तर कधी रमी, बदामसात, तीन पत्तीमधे रंग भरे. गुरुवारपेठेत कॉटन मिलच्या चाळीपासून केळकरांच्या घरापर्यंत गल्लीटाईप आबादाबी, गलोऱ्या, विटीदांडू, क्रिकेट, फुटबॉल खेळात प्रत्येक पेठ रमत असे.

माधवनगरला आणखी एक परंपरा होती. सुखवस्तू राहाणी, व आस्थेवाईक भेटीमुळे प्रेम प्रकरणांना भरपूर वाव होता. पुढे चालू...

।। कालाय तस्मै नमः।।

संस्कृतीराहती जागाजीवनमानराहणीरेखाटनसद्भावनाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2010 - 12:01 pm | बिपिन कार्यकर्ते

छान !!!!

शेवटच्या ओळीमुळे पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे. ;)

अवांतर: हा लेख आधी कुठे प्रकाशित केला आहे का?

बिपिन कार्यकर्ते

प्रदीप's picture

13 Mar 2010 - 3:23 pm | प्रदीप

छान लेख, असेच म्हणतो, व पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

हा लेख विंग कमांडर ओकांनी काही महिन्यांपूर्वी उपक्रमावर टाकला होता, पण ललित लेख असल्याने तेथून तो काढला गेला (असावा).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2012 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लेख.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

13 Mar 2010 - 1:04 pm | शशिकांत ओक

बरोबर. बराच काळ लोटल्याने मला ही आठवत नव्हते. कारण मी नंतर त्याकडे पाहिले नव्हते. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

मोदक's picture

11 Aug 2012 - 1:55 am | मोदक

असले काहीतरी अजून लिहा, म्हणून हा धागा वर काढत आहे.

आणि हो.. दुसर्‍या लेखातल्या शेवटून दुसर्‍या वाक्यावर जोरदार आक्षेप! माधवनगर आजही टुमदारच आहे.. थोडी गर्दी वाढली आहे इतकीच पण मेन रोडवरून कोणत्याही पेठेत गाडी वळवली की लाईटचा स्वीच बंद केल्यावर अंधार होतो तसा सगळा कोलाहल क्षणात विरून जातो.

माधवनगरशी बर्‍याच आठवणी (या जन्मातल्याच!!) जोडल्या गेलेला - मोदक.

कवितानागेश's picture

12 Aug 2012 - 4:06 pm | कवितानागेश

सगळंच वर्णन छान आहे.

मूकवाचक's picture

13 Aug 2012 - 9:54 am | मूकवाचक

+१

महाराष्ट हा गलिच्छ खेडेगावांसाठी प्रसिद्ध आहे.( विशेषत: देशावरचा भाग ) वानगीदाखल खेड मंचर काही प्रमाणात नारायण गाव , पैठण , शेवगाव ई. अशा वेळी माधवनगरचे हे वर्णन आवडून गेले. असेच वालचंदनगर बाबत ऐकून आहे. मी त्या गावाला अजूनही गेलो नाही. त्या गावाचे वर्णन कोणी तिथला गावकरी मिपाकर करील काय ?
तालुक्यांचा गावाच्या बाबतीत म्हणाल तर वाई हे गाव बरेचसे बरे आहे. पण तेथील लोकही रस्त्यावरच्या स्वच्छतेत एकूण मागेच !

मोदक's picture

12 Aug 2012 - 4:42 pm | मोदक

>>>महाराष्ट हा गलिच्छ खेडेगावांसाठी प्रसिद्ध आहे.( विशेषत: देशावरचा भाग )

हे विधान कोणत्या आधारावर केले कळेल का?

नमुन्यासाठी पैठण येथे जावे ! आता सुधारले असेल तर काही कल्पना नाही.
मोदक राव , चांगली स्वच्छ गावेही असतील पण प्रमाण कमी. आपण एखादे स्वच्छ गावाचे नाव सुचवा ना पट्कन !

मोदक's picture

13 Aug 2012 - 9:52 am | मोदक

बरीच आहेत..

काही तीर्थक्षेत्रे गलीच्छ आणि बकाल आहेत हे मान्य / काही गावेही असतील तशी पण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर शिक्का मारणे योग्य वाटले नाही.

संपूर्ण महाराष्ट्रावर शिक्का मारणे योग्य वाटले नाही.

इतक्या भागाशी सहमत. प्रत्येक गावात स्वच्छ आणि बकाल असे दोन्ही भाग असतात. कोंकणात आणि देशात प्रत्येकी एकेक दशक राहून हे मात्र नक्की की कोंकणातलं कोणतंही गाव रँडमली घेतलं तरी ते देशावरच्या (सह्याद्रीच्या पूर्वेकडे), विशेषतः पश्चिम महाराष्ट्र / खानदेश यांतील कोणत्याही अ‍ॅव्हरेज गावापेक्षा खूपच स्वच्छ असतं. अगदी जनरलाईज्ड विधान टाकण्याइतक्या स्पष्टतेने हे दिसतं.

अर्थातच, रत्नागिरी हे शहर सांगलीपेक्षा खूपच स्वच्छ आहे. पण रत्नागिरीतला काही भाग गलिच्छ आहेच. आणि सांगलीतला अपमार्केट एरिया इतर भागांपेक्षा तुलनेने स्वच्छ आहे.. पण तुलना ही सरासरीने केली तर कोंकण कित्येक पट जास्त स्वच्छ आहे. काही प्रमाणात त्या त्या भागातल्या लोकांची वैयक्तिक स्वच्छतेची सवय आणि त्याउपर भौगोलिक कारणंही आहेत. कोंकणात पाण्याचा निचरा करणारी जमीन आणि सर्वत्र चढउतार.. त्याशिवाय चार महिने तरी धुवांधार पाऊस वगैरे असल्याने कोंकणात घाण साठून राहात नाही असंही असेल..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2012 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं आत्ता पैठण लय सुधारलंय. बाकी, तीर्थक्षेत्र म्हनल्यावर आणि मरणाच्या वक्ताच्या विधी-बीधी तिथं नागघाटावर व्हत्यात म्हणुन थोडं उन्नीस बीस हाय एवढचं.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

13 Aug 2012 - 10:46 am | आनंदी गोपाळ

गावात विजेवर चालणाऱ्या मागावर ..

याला यंत्रमाग असा सुटसुटीत शब्द मराठीत प्रचलित आहे.

गवि's picture

13 Aug 2012 - 10:52 am | गवि

हो.. आणि शिवाय मराठीतच त्याला पावरलूम असा अधिक शुद्ध शब्द आहे.

आनंदी गोपाळ's picture

13 Aug 2012 - 6:39 pm | आनंदी गोपाळ

एकदम बरोबर.
अन पावरलूमाच्या आसपास रहाणार्‍यांनी तिथे 'निरव शांतता' वगैरे असते म्हटले की त्यांचा ऑडिओग्राम कसा असेल याचा विचार मनात येतो...

अमोल केळकर's picture

13 Aug 2012 - 11:10 am | अमोल केळकर

लहानपणीच्या माधवनगरातील अनेक आठवणी जाग्या झाल्या :)

अमोल केळकर
गुरुवार पेठ, माधवनगर ( सांगली)

गावाचं वर्णन आवडलं. माझा या गावाशी काहीसा रोचक संबंध आहे. माझं ड्रायविंग लैसन माधवनगर आरटीओचं आहे. (अठरा वर्षांपूर्वीचं) आता दोन वर्षांनी ते एक्स्पायर होईल तेव्हा रोज खिशात बाळगला जाणारा हा बादरायण का होईना पण माधवनगरशी असलेला धागा तुटेल.

चित्रगुप्त's picture

15 Aug 2012 - 2:47 pm | चित्रगुप्त

मी साधारणतः१९६४- ६६ साली तीन वर्षे तिथे होतो, आधी ६वी-७वी तिथल्या प्राथमिक शाळेत नंतर ८वी शे.र.वि.गो. मधे. मी माझ्या आठवणी मिपावर लिहिल्या होत्या, त्यात त्याकाळचे वर्णन आहे:
http://www.misalpav.com/node/18587

शशिकांत ओक's picture

15 Aug 2012 - 5:58 pm | शशिकांत ओक

बालगंधर्व सिनेमा पाहिला तेंव्हा माधवनगरचे विठ्ठलमंदिर प्रकर्षाने आठवले ती शब्दांकित आठवण सादर करीन.