वाटाघाटी करण्यास नकार देणारा इस्राईल..
निर्णय न बदलणारे दहशतवादी..
जर्मनीचे त्यावेळचे नेतृत्व..
संपूर्ण ऑलंपीक..
आख्खे जग..
काहीतरी चमत्कार घडून हे कोडे सुटावे, ही परिस्थीती बदलावी अशी इच्छा करत होते.. आपआपल्या देवांना प्रार्थना करत होते...
Munich Massacre च्या घटनेचे प्रतिनिधित्व करणारे छायाचित्र.
परिस्थिती पुढे सरकण्यासाठी काहीतरी घडणे गरजेचे होते. अचानक ओलीसांच्या अपार्टमेंटची एक खिडकी उघडली आणि काही कागद फेकले गेले. ते दहशतवाद्यांचे मागणीपत्र होते. यावर इस्राईलच्या ताब्यातल्या २३४ कैद्यांची नावे टाईप केली होती. दहशतवाद्यांबद्दलही माहिती होती. "ब्लॅक सप्टेंबर" या क्रूर दहशतवादी गटाने हे अपहरण केले होते. यांचे नेतृत्व करत होता इस्सा (Luttif Afif) आणि त्याचा उजवा हात होता टोनी (Yusuf Nazzal.)
दहशतवाद्यांची ओळख पटली आणि एक एक धक्कादायक गोष्टी उजेडात येवू लागल्या.
दहशतवाद्यांपैकी कांही जण ऑलंपीक स्टेडीयम मध्ये वर्कर म्हणून काम करत होते. ऑलंपीक व्हिलेजची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्याहीपुढची बाब म्हणजे एक दहशतवादी इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंट मध्येच हल्ल्याच्या आधी कांही तास वावरत होता - वर्कर म्हणून.
त्याच अपार्टमेंट मध्ये रहाणारे उरूग्वे आणि हाँगकाँगचे खेळाडू सुखरूप बाहेर पडले आणि इस्राईल हेच लक्ष्य आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.
किती खेळाडू ओलीस ठेवले गेले आहेत याची खात्रीशीर माहिती कुणालाच नव्हती. ओलीसांपैकी किती जण सुरक्षीत आहेत, किती जण जखमी आहेत या बाबत उलटसुलट अफवा बाहेर पसरल्या होत्या आणि या सर्व अफवा न्यूज रिपोर्टर्स छातीठोकपणे प्रक्षेपीत करत होते. अफवांमध्ये अफवांचीच भर पडतच होती आणि हे सगळे नाट्य दहशतवादी ओलीसांसोबत "लाईव्ह" बघत होते. ४००० रिपोर्टर्स आणि २००० कॅमेरा क्रू ची अक्षरश: जत्रा भरली होती.
नक्की किती दहशतवादी आहेत हे ही अजूनही स्पष्ट झाले नव्हते.
वाटाघाटींचे आणखी प्रयत्न सुरू झाले.
वाटाघाटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक कमिटी स्थापन केली गेली या कमिटीमध्ये एक पोलीस प्रमुख Manfred Schreiber (श्रायबर) व दोन (राजकारणातले) मंत्री होते.
चेहरा ओळखू नये म्हणून चेहर्याला बूटपॉलीश लावलेले, स्कार्फ आणि मास्कने चेहरा लपवलेले दहशतवादी पोलीसांशी बोलू लागले. इस्साने पहिली वेळ दिली होती दुपारी १२ वाजताची. अपहरण केल्यापासून केवळ ७ तासात मागण्या पूर्ण होण्याचा हट्ट त्याला सोडावा लागला. ही वेळ पुढे ढकलली गेली. पोलीस प्रमुख श्रायबर ने इस्राईल 'हो' म्हणत आहे, 'सहकार्य करत आहे' अशी थाप मारून आणखी वेळ मिळवला. असा वेळ आणखी पाच वेळा मिळवला गेला... डेडलाईन पाच वेळा पुढे ढकलण्यात श्रायबर यशस्वी ठरला.
वाटाघाटी हळूहळू पुढे सरकत होत्या, ऑलंपीकमधले कांही स्पर्धाप्रकार मात्र अजूनही सुरूच होते. सगळीकडून वाढत्या दबावामुळे शेवटी ते थांबवले गेले. ऑलंपीक व्हिलेजमधले वातावरण खूप निवांत आणि आराम होते. या घटनेचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. खेळाडू सराव करत होते, बीच वर पहुडल्यासारखे निवांतपणे ऊन खात पडले होते आणि विक्रेते खाद्यपदार्थ विकत होते आणि या सगळ्याचेही "थेट प्रक्षेपण" सुरू होते. ओलीसांच्या अपार्टमेंटबाहेर गर्दी वाढतच होती. घटनेचे गांभीर्य बहुदा लक्षात आले नव्हते किंवा न लक्षात आल्यासारखे सगळे वातावरण होते.
इस्सा बरोबर वाटाघाटींचे बरेच प्रयत्न झाले. सगळे दहशतवादी अत्यंत आत्मविश्वासू आणि ठाम दिसत होते. चर्चेत कोणतीही गोष्ट सहजासहजी मान्य करत नव्हते आणि कोणताही कच्चा दुवा समोर येवून देत नव्हते.
कोणतीही माहिती मिळत नाही हे पाहून क्रायसीस टीम ने आणखी एक शक्कल लढवली व ओलीस जिवंत आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी ओलीसांशी प्रत्यक्ष बोलण्याचा आग्रह धरला. जर्मन बोलणर्या Andre Spitzer ला खिडकीजवळ हात बांधलेल्या अवस्थेत उभे केले गेले, दोन दहशतवादी बंदुका ताणून मागे उभे होते. संभाषण सुरू झाले..
"जिवंत ओलीसांची संख्या किती आहे?" या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना Andre ला मारहाण करत मागे ओढले गेले व खिडकी बंद झाली.
पुन्हा वाटाघाटींचे गुर्हाळ सुरू झाले. श्रायबर पुन्हा इस्साशी बोलण्याचा, त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला.
संध्याकाळचे पाच वाजले... वाटाघाटींचे फलीत म्हणजे दोन ऑलंपीक अधिकार्यांना आत येवून खेळाडूंची पाहणी करून देण्यासाठी इस्साने होकार दिला. श्रायबर पोलीस असल्याने त्याला इस्साने प्रवेश नाकारला.
आत अत्यंत हृदयद्रावक दृश्य होते. भिंतीवर; जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता, गोळीबाराने भिंतीचे पोपडे पडले होते, झटापटीच्या खुणा होत्या आणि रक्ताने माखलेले एक प्रेत पडले होते.
हातापा यांना बांधलेले ओलीसांना एका खोलीत एकत्र बसवले होते. दहशतवाद्यांचा सर्वत्र पहारा होता. आत जाणार्या एका अधिकार्याला श्रायबर ने एक विशेष काम दिले होते. आत किती दहशतवादी आहेत हे मोजायचे. या अधिकार्याला चार किंवा पाच दहशतवादी दिसले. बाहेर आल्यावर त्याने ही माहिती श्रायबर ला दिली. त्या क्षणापासून "चार किंवा पाच" दहशतवादी गृहीत धरून सगळी गणिते आखली गेली...
इस्राईल अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होते. इस्राईलने स्वत:ची कमांडो टीम पाठवण्याची तयारी जर्मनीकडे दर्शवली, जर्मनीने ही विनंती अमान्य केली.
शेवटी जर्मनीनेच पुढाकार घेत एक रेस्क्यू टीम पाठवून ओलीसांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.
ट्रॅकसूट घातलेल्या व सब मशिनगन ने सज्ज झालेल्या जर्मनीच्या पोलीसांचे पथक बोलावले गेले.
अपार्टमेंटच्या आजूबाजूला व छतावर "पोझीशन्स" घेवून ते पुढच्या आदेशाची वाट बघू लागले.
बाहेर काहीतरी घडते आहे याची जाणीव दहशतवाद्यांनाही झाली होती. अचानक श्रायबरच्या लक्षात आले रेस्क्यू टीम चा ठावठिकाणा त्यांना तंतोतंत कळत होता व त्या अनुषंगाने ते बाल्कनीत येवून छताकडे बघत होते. हेही उघड झाले की रेस्क्यू टीम च्या तयारीपासून ते पोझीशन्स पर्यंत सगळ्या गोष्टी "थेट प्रक्षेपीत" केल्या गेल्या होत्या.
रेस्क्यू टीमला मागे घेतले नाही तर दोन ओलीसांना ठार मारण्याची धमकी इस्साने दिली.
रेस्क्यू मिशन अचानकपणे सुसाईड मिशन मध्ये बदलले गेलेले पाहून, रेस्क्यू टीमला तातडीने मागे बोलावले गेले. हल्ल्याच्या आदेशांची वाट बघणार्या रेस्क्यू टीमला आदेश मिळाले ते मिशन रद्द झाल्याचे. ओलीसांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न थांबवले गेले.
वेळ निघून जात होता. काहीतरी होवून कोंडी फुटण्याची सर्वजण वाट बघत होते.
अचानक संध्याकाळी उशीरा इस्साने एका विमानाची मागणी केली व कैरो (इजिप्त) येथे जाण्याची मागणी केली.
ओलीसांना कोणत्याही परिस्थीतीत या प्रकारे जर्मनीबाहेर जावून देण्याची तयारी जर्मन सरकारची नव्हती. दहशतवादी ऑलंपीक व्हिलेज पासून विमानतळापर्यंत दोन हेलीकॉप्टर व तिथून पुढे एका मोठ्या विमानाने कैरोला जाणार होते. ओलीसांच्या सुटकेसाठी आणखी एक प्रयत्न करायचे पोलीसांनी ठरवले. दहशतवादी व ओलीस अपार्टमेंट पासून हेलीकॉप्टरपर्यंत पायी चालत जाताना दहशतवाद्यांवर हल्ला करायचा असा प्लॅन ठरला. इस्साने या मार्गाचे आधी निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जर्मन सरकारचा हा प्रयत्नही फसला.
या मार्गावर लपून बसलेले सगळे जर्मन अधिकारी हटवण्यात आले.
जर्मन पोलीसांची हल्ल्याची तयारी बघून इस्साने पायी जाण्यास नकार दिला व अपार्टमेंट पासून हेलीकॉप्टरपर्यंत चे केवळ २०० मीटर अंतर जाण्यासाठी बसची मागणी केली.
ओलीसांना घेवून दहशतवादी बसमध्ये चढले आणि एक धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला. ओलीसांचा ताबा एकूण आठ दहशतवाद्यांनी घेतला होता. "चार किंवा पाच दहशतवादी" या तयारीने असलेल्या सर्वांनाच हा जबरदस्त धक्का होता.
विमानतळाकडे जाण्यासाठी हेलीकॉप्टर्सनी टेक ऑफ घेतला आणि "मिडीया सर्कस" ही त्यांचा पाठलाग करत विमानतळाकडे निघाली.
तिकडे विमानतळावर आणखी एका रेस्क्यू प्लॅनची तयारी सुरू होती... कैरोला जाणार्या विमानातील संपूर्ण स्टाफची जागा वेष बदललेल्या जर्मन पोलीसांनी घेतली. कंट्रोल टॉवरवर तीन स्नायपर सज्ज केले गेले. आणखी एक स्नायपर विरूध्द दिशेला रनवेवर एका ट्रकच्या मागे आणि एक स्नायपर जमिनीवर एका अगदी छोट्या फूटभर उंचीच्या भिंतीच्या आडोशाला (झोपून) लपला होता.
इस्सा विमानाची तपासणी करायला गेला की त्याच्यावर विमानातील अधिकारी हल्ला करतील व बाकीच्या दहशतवाद्यांना स्नायपर्स टिपतील असा प्लॅन ठरला.
ऑलंपीक व्हिलेज ते विमानतळ हे २५ किमीचे अंतर पार करून हेलीकॉप्टर्स विमानतळावर पोहोचली आणि कंट्रोल टॉवरसमोर उतरली. विमानाची तपासणी करण्यासाठी इस्सा आणि एक दहशतवादी विमानाकडे गेले. आश्चर्यकारकरीत्या विमानात कोणीही नव्हते, रिकामे विमान बघून इस्साला धोक्याची जाणीव झाली.
शक्य तेवढ्या वेगाने तो व त्याचा सहकारी हेलीकॉप्टर कडे धावू लागले....
अचानक विमानतळाचा परिसर प्रखर प्रकाशाने उजळून निघाला आणि... प्रचंड गोळीबारास सुरूवात झाली...
(क्रमशः)
प्रतिक्रिया
12 Aug 2012 - 7:58 pm | अमोल खरे
अतिशय क्रुर प्रकार. पण अशा गोष्टी ह्या मराठीत यायलाच हव्यात. दहशतवाद हा कसा घातक असतो आणि त्याच्या समर्थनार्थ बोलणे कसे चुक आहे हे एखाद माणसाला तरी पटले तरी खुप झाले. हा भाग आवडला असं तरी कसे म्हणायचे, पण अनेक नवीन गोष्टी कळल्या आणि इज्रायलविषयी असणा-या अभिमानात आणखीन वाढ झाली एवढेच म्हणेन. पुढील भाग लवकर टाक रे मोदका.
12 Aug 2012 - 10:15 pm | मन१
अतिशय क्रुर प्रकार.
नक्कीच. पण हे सगळ्म का होत होतं ह्याची काही कल्पना आपल्याला अहे का अमोल राव?
दहशतवाद हा कसा घातक असतो
ह्या घटनेतील अपहरणकर्तेच तेवढे क्रूर निर्दयी आहेत असं आपल्याला वाटतं का अमोलराव?
इज्रायलविषयी असणा-या अभिमानात आणखीन वाढ झाली एवढेच म्हणेन. पुढील भाग लवकर टाक रे मोदका.
कशाचा अभिमान? आणि तुम्हाला(किंवा मला) काय म्हणून अभिमान? त्यात आपली काही अचिव्हमेंट आहे का?
13 Aug 2012 - 2:15 am | मोदक
>>>ह्या घटनेतील अपहरणकर्तेच तेवढे क्रूर निर्दयी आहेत असं आपल्याला वाटतं का अमोलराव?
हो. मला ठामपणे असं वाटतं की या घटनेतील अपहरणकर्ते क्रूर आणि निर्दयी आहेत.
इस्राईल पॅलेस्टाईन संबंधावर आणि त्यातही इस्राईलने केलेल्या अत्याचारावर रोख असेल तर मला असे वाटते की,
इस्राईल.. पॅलेस्टाईन.. अरब.. चुकले आहेत सगळेच जण. फक्त प्रत्येकजण 'माझी चूक कमी म्हणून मी बरोबर' असा स्टँड घेवून बसला आहे.
तिसर्या भागानंतर सविस्तर बोलू...
12 Aug 2012 - 8:14 pm | सुनील
हेही उघड झाले की रेस्क्यू टीम च्या तयारीपासून ते पोझीशन्स पर्यंत सगळ्या गोष्टी "थेट प्रक्षेपीत" केल्या गेल्या होत्या.
२००८ च्या मुंबई हल्ल्याच्या बाबतीतदेखिल हेच झाले.
हाही भाग उत्तम.
12 Aug 2012 - 10:00 pm | रेवती
एखाद्या चित्रपटातील दृष्ये असल्यासारखे वाटले.
भयानकच आहे सगळे.
12 Aug 2012 - 10:27 pm | तर्री
एकदम मस्त लिहिले आहेस. गोष्टीचा तुकडा अश्या जागी मोडतोस की तुझा "राग" येतो !
12 Aug 2012 - 11:05 pm | जाई.
हा ही भाग वाचनीय
13 Aug 2012 - 1:10 am | प्रभाकर पेठकर
हेही उघड झाले की रेस्क्यू टीम च्या तयारीपासून ते पोझीशन्स पर्यंत सगळ्या गोष्टी "थेट प्रक्षेपीत" केल्या गेल्या होत्या.
प्रक्षेपणाबाबत मुंबई हल्ल्यातही तीच चुक झाली होती. खरं पाहता गुन्हेगारीचा, दहशतवादाचा अभ्यास करताना भारतीय पोलीसदलातील अभ्यासकांना जगातील एवढ्या महत्त्वाच्या घटनेतील चुकांची कल्पना नव्हती? पुन्हा तीच चुक आपण का केली?
13 Aug 2012 - 7:04 am | मन१
निर्णायक टप्प्यावर घटना आलेली दिसते.
@सुनील, @प्रभकर पेठकरः- मुंबै हल्ल्यात delayed telecast सुरु होतं ना? म्हणजे अर्धा घंटा उशीरा वगैरे.
मी शेवटचे दोन दिवस पाहिलं तेव्हा तरी तसच सब टायटल लिहिऊन येत होतं. पॉपकॉर्न खातखात अनेकजण लाइव्ह ची मज्जा टॅएव्हीवर पहायल मिळाली नाही ह्याबद्दल हळहळत होते.
13 Aug 2012 - 9:37 am | प्रभाकर पेठकर
delayed telecast बद्दल कल्पना नाही. कारण मी पाहिले होते तेंव्हा तरी अशी काही तळटीप दिसत नव्हती. पण, वाहिनीवरील प्रक्षेपण पाहूनच पाकिस्तानात बसलेले त्यांचे साथीदार सर्व सुत्र हलवित होते असे वाचले होते. असो.
13 Aug 2012 - 9:27 pm | पैसा
लाइव्ह टेलेकास्ट चालू होता. अतिरेक्यांना सगळं कळतंय हे फार उशीरा लक्षात आलं. कमांडो कारवाई अगदी शेवटच्या टप्प्यात पोचल्यावर ते थांबवण्यात आलं.
13 Aug 2012 - 10:05 am | इरसाल
मिडीयाच्या तर !@#$%^ अजुन )(*&^^%$#.
मोदका लेख उत्तम उत्कंठावर्धक.पुढचा भाग लवकर टाकशील.
13 Aug 2012 - 10:37 am | मंदार दिलीप जोशी
सर्वांना खास विनंती. याच घटनेवर म्युनिक (Munich) नावाचा सिनेमा आला होता. तो बघायला मिळाला तर बघा. अप्रतीम आहे. एरिक बानाची प्रमुख भूमिका आहे त्यात.
13 Aug 2012 - 10:39 am | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस रे, आणि त्या फोटोंसाठी तळटिप टाकायला विसरु नकोस, - आंतरजालावरुन साभार.
13 Aug 2012 - 10:41 am | अन्या दातार
ज्या पोलिसांनी बिल्डींगला वेढा दिला होता त्यांना स्नायपर्स हाताळता येत नव्हत्या असेही वाचनात आले आहे.
मोदका, छान लेखमाला चालू केली आहेस. पुभाप्र.
13 Aug 2012 - 11:03 am | अमोल केळकर
उत्कंठा वाढली आहे पुढील भाग वाचायची
अमोल केळकर :)
13 Aug 2012 - 11:44 am | पिंगू
>>> ४००० रिपोर्टर्स आणि २००० कॅमेरा क्रू ची अक्षरश: जत्रा भरली होती.
पहिले ह्या लोकांनाच हटवायला पाहिजे. जिथे तिथे फक्त बाईट मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात लेकाचे. :(
13 Aug 2012 - 12:17 pm | प्रशांत
मस्त रे मोदका,
पुढचाहि भाग असाच लवकर येवु देत
13 Aug 2012 - 5:10 pm | गणेशा
उतकंठावर्धक लिखान .. दुर्दैवी घटना ..
असेच लिहित रहा.. वाचत आहे...
13 Aug 2012 - 6:22 pm | अक्षया
दुर्दैवी घटना आहे
हा ही भाग छान झाला आहे. लिखाण इंटरेस्टिंग..
13 Aug 2012 - 8:34 pm | श्रीरंग
मस्त लिहिलं आहेस रे.. लवकर येऊ दे पुढील भाग!
14 Aug 2012 - 8:56 pm | इनिगोय
उत्तम लेखमाला. जर्मन पोलिसांनी केलेले ओलिसांच्या सुटकेचे वेगवेगळे प्रयत्न वाचून थोडासा खेद वाटला, की या इच्छेबरोबरच अधिक योग्य तर्हेची तयारी असती तर या घटनेचा अंत काहीसा वेगळा होऊ शकला असता. पुरेसं प्रशिक्षण नसणारे टीम मेंबर्स, ज्या वेळी फायनल हल्ला करण्यात आला त्यावेळी येऊ शकणार्या मर्यादांवर न केलेला विचार, याच्यामुळे नुकसान जास्त झालं.
या घटनेचं वार्तांकन करणार्यांमध्ये हिटलरचे समर्थक असणारेही काही वार्ताहर उपस्थित होते असं नेटवर वाचलं, त्यासंदर्भात --- या काळात जर्मन जनतेच्या प्रतिक्रिया कशा होत्या? ज्या ज्यू समाजावर 'never again' असं वाटायला लावणारे अत्याचार या देशात झाले होते, त्याच समाजाच्या काही व्यक्तींना वाचवण्यासाठी होत असलेल्या हालचालींना कसं बघितलं गेलं?
13 Aug 2012 - 9:25 pm | सोत्रि
मोदकराव, खुपच छान लेखमाला!
थरार फार छान चितारला आहे. पुभाप्र
-(थरारलेला) सोकाजी
13 Aug 2012 - 9:29 pm | पैसा
आणि इतिहासाचं आपुलकीने केलेलं वर्णन. इतिहासातून आपण फारसं काही शिकत नाही हे परत परत समजून येतंय.
14 Aug 2012 - 10:06 am | मी_आहे_ना
+१ पैसाताईंना. मागच्या भागातल्या विकीच्या लिंकवरून वाचले, पण मराठीत वर्णिलेला थरार नक्कीच वाचनीय. जर्मनीसारख्या तत्कालीन पुढारलेल्या देशाकडूनाही अश्या चुका झाल्या म्हणजे कमाल आहे.
14 Aug 2012 - 2:11 pm | वपाडाव
प्रतिसाद पुढच्या भागानंतर...
14 Aug 2012 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदका, काहीच माहिती नव्हतं. दोनही भाग वाचुन काढले.
च्यायला, मस्त तरी कसं म्हणुन. पुढचा भाग लवकर टाकणे.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2012 - 7:04 pm | मन१
पुढील अंक कधी प्रकाशित करताय मालिकेचा?
14 Aug 2012 - 7:16 pm | मदनबाण
हा भाग ही मस्त झालाय... पुढचा भाग लवकर लिहावा.
14 Aug 2012 - 8:20 pm | किसन शिंदे
उत्कंठावर्धक!
पुढचा भाग लवकर येऊ दे.
17 Aug 2012 - 11:35 am | प्रचेतस
पुढचा भाग कधी?
17 Aug 2012 - 12:42 pm | मोदक
३ /४ दिवसांनी...
वेळ होतोय हे खरे आहे पण बरेच मुद्दे आहेत तिसर्या आणि शेवटच्या भागात.
17 Aug 2012 - 1:03 pm | गणपा
थरारक !!!
18 Aug 2012 - 4:30 pm | स्वप्निल घायाळ
मोदक लइ भारी !!! जबरदस्त ...