Munich Massacre... (भाग ५) - Operation Wrath of God

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
28 Nov 2012 - 7:29 pm

Munich Massacre...

Munich Massacre... (भाग २)

Munich Massacre... (भाग ३)

Munich Massacre... (भाग ४) - Operation Wrath of God

*******************************************************************************
(Operation Wrath of God हे संपूर्णपणे छूपे ऑपरेशन होते. २० पेक्षा जास्ती वर्षे सुरू असणार्‍या या ऑपरेशनमध्ये कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. खालील लेखामध्ये आंतरजालावरील वेगवेगळ्या लेखांचा संदर्भ घेतला आहे, या लेखात टिपलेल्या घटनांसंदर्भात आणखी नवीन माहिती असल्यास प्रतिसादामध्ये

अवश्य उल्लेख करावा - पुढचा भाग लिहीताना त्या संदर्भांची मदत होईल.)
*******************************************************************************

अचानक २९ ऑक्टोबर ला लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या एका बोईंगचे रहस्यमयरीत्या अपहरण झाले. अपहरणकर्त्यांच्या मागणीला तत्काळ मान्यता देत जर्मनीने म्यूनीक घटनेदरम्यान विमानतळावर जिवंत बचावलेल्या तीन दहशतवाद्यांना लगेचच सोडून दिले
सुटका झालेल्या दहशतवाद्यांचे लिबीयामध्ये एखाद्या अभूतपूर्व स्वागत झाले, मुलाखती घेतल्या गेल्या, या मुलाखती जगभर दाखवल्या गेल्या. हत्याकांडाबद्दल बोलताना या दहशतवाद्यांच्या चेहर्‍यावर अभिमान झळकत होता.

सुरूवातीला या ऑपरेशनला साशंक मनाने परवानगी देणार्‍या गोल्डा मेअरनी आता मोसाद ला आक्रमकपणे हालचाली करण्याची पूर्ण मुभा दिली. मोसादने ऑपरेशनचा वेग आणि तीव्रता आणखी वाढवली.

Operation Wrath of God ला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली...

८ डिसेंबर १९७२ - पॅरीस - फ्रान्स.

.

डॉ. महमूद हम्शारी. मोसादचे पुढचे लक्ष्य.

डॉ. हम्शारी फ्रान्समध्ये आपल्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. पॅलेस्टाईन व इस्राईल यांची सद्यस्थिती, वाद याबाबत फ्रान्समध्ये पॅलेस्टाईनची वैचारिक बाजू मांडणार्‍या थोड्या लोकांपैकी एक. मोसादच्या मते हम्शारी हे पीएलओचे फ्रान्समधील प्रतिनिधी होते. पॅलेस्टाईनची बाजू मांडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना भेटणे, मुलाखती देणे वगैरे हम्शारींचे नित्याचे काम होते. असेच एकदा एक इटालीयन पत्रकार हम्शारींची मुलाखत घेण्यासाठी आला, मुलाखत घेताना त्याने कुणाच्याही नकळत त्याच्या घराचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. हम्शारी व कुटूंबावर मोसादने पाळत ठेवली होतीच, तो इटालीयन पत्रकारही मोसाद एजंट होता. एकदा डॉ. हम्शारी व कुणीही कुटूंबीय घरी नसताना काही एजंट्सनी गुप्तपणे प्रवेश मिळवला व टेलीफोनजवळ एक रेडीओ सिग्नलने स्फोट करता येण्यासारखा छोटा बाँब लावला व घर बंद करून निघून गेले. बाँब कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी लावल्याने व घरातील बाकी कोणत्याही वस्तूची हलवाहलव न केल्याने कुणालाही कसलीही शंका आली नाही.
दुसर्‍या दिवशी डॉ. हम्शारींच्या घरातला फोन वाजला, फोनवर बोलायला स्वत: हम्शारीच आले, पलीकडच्या व्यक्तीने नाव विचारले व अपेक्षीत उत्तर मिळताच बाँबचा स्फोट झाला. या स्फोटात डॉ. हम्शारी जबर जखमी झाले व कांही आठवड्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हम्शारींच्या मृत्यूनंतर मोसादने आणखी एका व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केले. अली हसन सलामेह. म्यूनीक हल्ल्यांमागचा मास्टरमाईंड. मिळेल ती किंमत मोजून याची माहिती मिळवली जात होती. एका मोसादचा एक गट फक्त याच्याच मागावर राहू लागला.

कांही दिवसात एका पॅलेस्टाईन तरूणाचा लंडनमध्ये 'अपघाती' मृत्यू झाला. गर्दीचा फायदा घेवून त्याला कुणीतरी बस खाली ढकलले व त्यातच त्याचा शेवट झाला.

२४ जानेवारी १९७३ - निकासिया - सायप्रस.
पीएलओच्या फताह या एका संघटनेचा सायप्रसमधील एक प्रतिनिधी हुसेन अल् बशीर एके रात्री 'निकासिया' या सायप्रसच्या राजधानीच्या शहरात हॉटेलमध्ये झोपला असताना त्याच्या पलंगाखाली लपवलेल्या बाँबचा स्फोट झाला. हुसेन अल् बशीरचा तत्काळ मृत्यू झाला.
इस्राईलच्या मते हुसेन अल् बशीर हा ब्लॅक सप्टेंबरचा सायप्रसमधील नेता होता, केजीबी शी असलेल्या संबंधांमुळेही तो मोसादच्या हिट्लिस्ट वर होता.

६ एप्रिल १९७३ - पॅरीस - फ्रान्स.
डॉ बसील अल् कुबैस्सी या एका कायदेतज्ञाला पॅरीसमध्ये गोळ्या घालून ठार केले गेले. मोसादच्या मते डॉ कुबैस्सींचा ब्लॅक सप्टेंबर संघटनेला शस्त्रे पुरवण्यात हात होता. वाईल झ्वेटर प्रमाणेच हेही रात्री जेवण करून घरी परतत होते व दोन मारेकर्‍यांनी अगदी जवळून ११ गोळ्या घातल्या. इथेही एका खेळाडूसाठी एक गोळी.

यानंतर तीनच दिवसांनी ९ एप्रिल १९७३ ला मोसाद ने ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ पार पाडले. लेबेनॉनची राजधानी बैरूत येथे एक धाडसी छापा. लक्ष्य होते तीन पीएलओ अधिकारी अबु युसूफ, कमाल अड्वन आणि कमाल नास्सर. हे तीनही जण पीएलओ चे वरिष्ठ अधिकारी होते आणि म्यूनीक हल्ल्यात, वेस्टबँक आणि गाझा पट्टीतल्या सशस्त्र कारवायांमध्ये यांचा मोठा सहभाग होता.

मोसाद आणि सायरेत मत्कल दोन्ही युनीटचे कमांडो या ऑपरेशनची तयारी बरेच दिवसांपासून करत होते. पश्चिम बैरूतमधल्या उच्चभ्रू नागरी भागात कडेकोट बंदोबस्तात वसलेल्या दोन टुमदार इमारतींवर हल्ला करून लक्ष्य टिपण्याची अवघड आणि क्लिष्ट जबाबदारी पेलली होती येहुद बराक आणि योनाथन नेतान्याहू यांनी.
(येहुद बराकने पुढे लष्करप्रमुख, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्रीपदासारख्या महत्वाच्या पदांवर काम केले - सध्याही संरक्षण मंत्रीपद भूषवत आहे.
योनाथन नेतान्याहू - १९७६ च्या ऑपरेशन एंटबेचा सेकंड इन कमांड आणि त्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला एकमेव इस्रायली सैनीक, याने एंटबे हल्ल्यामध्ये बजावलेली भूमीका इतकी महत्त्वाची होती की त्या ऑपरेशनचे नाव "ऑपरेशन थंडरबोल्ड" असे असताना याला श्रध्दांजली म्हणून तत्कालीन इस्रायली पंतप्रधानांनी "ऑपरेशन योनाथन" असे बदलले.)

९ एप्रिल ला इस्रायली क्षेपणास्त्र वाहू नौकांनी नौदलाच्या एका तळावरून कमांडोंच्या चार तुकड्यां आणि स्पीडबोटींसह लेबेनॉनच्या समुद्र क्षेत्रात प्रवेश केला, समुद्राच्या आत अज्ञात ठिकाणी स्पीडबोटींना पाण्यात सोडले गेले व उरलेले अंतर स्पीडबोटींच्या सहाय्याने पार करून बैरूतच्या समुद्रकिनार्‍यावर हा सगळा लवाजमा आला, स्पीडबोटींच्या मोटारींचा आवाज येवू नये म्हणून शेवटचे काही मैल या बोटी वल्हवत आणल्या गेल्या. मोसाद एजंट्स बैरूतच्या समुद्रकिनार्‍यावर भाड्याच्या मोटारींसह तयार होतेच. सर्व कमांडोज व मोसाद एजंट्स मोटारीने १० किलोमीटर अंतर कापून पश्चिम बैरूतमध्ये पोहोचले. या ऑपरेशनच्या दरम्यान काही मोसाद एजंट्स स्त्री वेषात वावरत होते. चपळ हालचालींसाठी बनवलेला खास स्त्रीवेष, मेकप, विग वगैरे नी सज्ज झालेले हे कमांडोज इमारतींमध्ये प्रवेश मिळवताना सोबत असलेल्या पुरूष कमांडोजसोबत प्रेमीयुगुलाप्रमाणे खेटून चालत होते. (त्यांना याचेही प्रशिक्षण मिळाले होते!) प्रेमीयुगुलांचा एक घोळका या इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी आला व आपल्या कपड्यांमध्ये लपवलेल्या शस्त्रांसह या सर्वांनी इमारतींमध्ये प्रवेश मिळवला. इमारतीबाहेरून होणारा दहशतवाद्यांच्या साथीदारांचा आणि पोलीसांचा हल्ला थोपवण्यासाठी येहुद बराक आणि त्याचे निवडक कमांडोज प्रवेशद्वारापाशीच दबा धरून राहिले, बाकीचे सर्वजण इमारतींमध्ये शिरले व काही वेळातच त्यांना नेमूद दिलेल्या लक्ष्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. सोबत असलेल्या एका गटाने महत्वाची कागदपत्रे गोळा केली व काही मिनिटांमध्येच सर्वजण सुखरूप बाहेर पडले. मोसादने लेबेनॉनसारख्या देशातल्या कडेकोट बंदोबस्तात वसलेल्या या इमारतींचे अंतर्गत नकाशे आणि खोल्यांच्या रचनेची इत्यंभूत माहिती मिळवली होती त्यामुळे जिने, दरवाजे आणि पॅसेजमधून हे सर्व कमांडोज लीलया वावरत होते.

तीनही लक्ष्यांना यशस्वीपणे टिपून परतताना इमारतींबाहेर सर्वांना पोलीस आणि दहशतवाद्यांचा किरकोळ प्रतिकार झाला परंतु तो लगेच निपटून सर्वजण मोटारीने पुन्हा समुद्रकिनार्‍याकडे परतले आणि स्पीडबोटींमधून इस्रायली क्षेपणास्त्रवाहू नौकांवर पोहोचले. मोसाद एजंट्सही या कमांडोजसह इस्रायल ला परतले. या संपूर्ण घटनाक्रमासाठी नेमून दिलेला वेळ होता २० मिनिटे, सर्वजण इस्रायल ला रवाना झाले तेंव्हा एकूण वेळ लागला होता ३० मिनीटे.

याच दरम्यान आणखी एका स्पेशल युनीटच्या, 'सायरेत तझ्नाहनिम' च्या १४ कमांडो नी एका इमारतीवर हल्ला करून २० ते ४० पीएफएलपी सैनीकांना ठार मारले. या छाप्यामध्ये २ इस्रायली कमांडो मारले गेले. राहिलेल्या संपूर्ण युनीटने लेबेनॉनबाहेर जाण्यासाठी इस्रायली हवाईदलाच्या हेलीकॉप्टर्सची मदत घेतली.

एक स्पेशल युनीट "सायरेत १३" ने पीएलओच्या उत्तर बैरूतमधल्या एका स्फोटकांच्या वर्कशॉपला आग लावली व उध्वस्त केले.

अशाच दोन युनीट्सनी दक्षिण बैरूतमधल्या एका फताह या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढवला.

आणखी एका पॅराट्रूप युनीटने लेबेनॉनमधल्याच एका दुसर्‍या शहरातल्या सिडॉन मधल्या पीएलओ च्या एका तळावर हल्ला केला व ते उध्वस्त केले.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये २ इस्रायली कमांडोज, ३ पीएलओ अधिकारी आणि १०० पेक्षा जास्त पीएलओ सैनीक मारले गेले. बरेच नागरीकही मारले गेले. संपर्काची कमी साधने उपलब्ध असताना, एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागात पार पाडलेल्या या ऑपरेशनमध्ये इस्रायली सैनीकांच्या धाडसासोबत अचूक माहिती पुरवणार्‍या इस्रायली गुप्तचर संघटनांचा मोलाचा वाटा होता.

या हल्ल्याने पीएलओ आणि पीएफएलपी संघटना खर्‍या अर्थाने हादरून गेल्या. इस्रायल जगात कधीही, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही मार्गाने हल्ला करू शकते अशी भिती त्यांना सतावू लागली. (या ऑपरेशनदरम्यान इस्रायलची मोठी डोकेदुखी 'यासर अराफत' बैरूतमध्येच होते व सुरूवातीला हल्ला केलेल्या इमारतींपासून केवळ काही मीटर अंतरावर असणार्‍या दुसर्‍या एका इमारतीमध्ये लपून राहिले होते. मोसाद ला या गोष्टीचा कोणतीही खबर नव्हती!)

ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ हे आजही इस्रायली कारवायांमध्ये मानाचे स्थान पटकावून आहे.

हे हत्यासत्र सुरू असतानाच मोसाद एजंट्सनी आणखी एक अविश्वसनीय प्रकार केला. प्रत्येक 'टारगेट' च्या हत्येच्या काही तास आधी त्याच्या कुटुंबियांना एक सहवेदना पत्र (condolence card) आणि फुले पाठवली पत्रावर एकच ओळ ठसठशीतपणे छापली होती.

"A reminder we do not forget or forgive"

हीच ओळ प्रत्येक हत्येच्या दुसर्‍या दिवशी मध्यपूर्वेतल्या सगळ्या वर्तमानपत्रात छापून आणली गेली.

हेच मोसाद एजंट्स मृत इस्रायली खेळाडूंच्या कुटूंबीयांनाही हत्येचे निरोप पोहोचवत होते.

मोसाद एजंट्सनी बर्‍याच पीएलओ अधिकार्‍यांकडे लेटर बाँब पाठवले. हे बाँब प्राणघातक हल्ल्यासाठी नव्हते तर फक्त पीएलओ अधिकार्‍यांवर जरब बसवण्यासाठी होते.

ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ ने मोसाद आणि इस्रायली स्पेशल युनीट्सचाही आत्मविश्वास वाढवला. यानंतर सुरू झाला अव्याहत रक्तपात.

या नंतर दोनच दिवसांनी ११ एप्रिल १९७३ ला, सायप्रसमधील नेता झैद मुचासी ला अथेन्स मधील हॉटेलमध्येच बाँबस्फोट करून ठार केले गेले. झैद मुचासी ने हुसेन अल् बशीर ची जागा घेतली होती, ज्याला २४ जानेवारी १९७३ ला मोसादनेच ठार मारले होते.

याच दरम्यान रोम मध्ये दोन ब्लॅक सप्टेंबरच्या आणखी दोन सदस्यांच्या मोटारीवर हल्ला झाला व ते त्यामध्ये जखमी झाले.

२८ जुन १९७३ - पॅरीस
मुहम्मद बुंदिया हा ब्लॅक सप्टेंबर चा फ्रान्समधील अधिकारी, त्याच्या मोटारीच्या सीटखाली एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला व त्यातच तो मारला गेला.

४ जानेवारी १९७८ - लंडन.
सैद हमामी या लंडनमधील पीएलओ अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले गेले.

३ ऑगस्ट १९७८ - पॅरीस - फ्रान्स
पॅरीसमधील पीएलओ कार्यायलावर हल्ला करून तिथला प्रमुख ऐझदीन कलाक आणि त्याचा मदतनीस हमाद अद्नान या दोघांना ठार मारले गेले.

२७ जुलै १९७९ - कान्स, फ्रान्स
झुहैर मोहसीन या पीएलओ मिलिटरी ऑपरेशन्स हेडला एका कसीनो बाहेर गोळ्या मारून ठार केले.

१५ डिसेंबर १९७९ - सायप्रस
अली सालेम अहमफ आणि इब्राहीम अब्दुल अझीझ या दोघांना खूप जवळून गोळ्या घालून ठार मारले गेले.

१ जुन १९८१ - ब्रुसेल्स
नईम खादर या बेल्जीयम मधल्या अधिकार्‍याला ब्रुसेल्स येथे ठार मारले गेले.

१ ऑगस्ट १९८१ - वॉर्सा - पोलंड
अबु दाऊद या ब्लॅक सप्टेंबर ऑपरेशन कमांडरला गोळ्या मारण्यात आल्या. या हल्ल्यातून अबु दाऊद बचावला.

१ मार्च १९८२ - माद्रीद - स्पेन
नाबील वादी अरांकी या पीएलओ अधिकार्‍याला माद्रीद येथे ठार मारले गेले.

१७ जुन १९८२ - रोम
नझाए मायेर या पीएलओ च्या रोम मधील अधिकार्‍याला त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. याच्या हत्येसंदर्भात पोलीसांना भेटून परतणार्‍या कमाल हुसैन या आणखी एका पीएलओ अधिकार्‍याच्या मोटारीच्या सीटखाली ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला व तोही मारला गेला.

२३ जुलै १९८२ - पॅरीस.
फदल दॅनी या पॅरीसमधील पीएलओ अधिकार्‍याच्या मोटारीमध्ये ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला. त्याचाही मृत्यू झाला.

२१ ऑगस्ट १९८३ - अथेन्स
ममोन मेरैश या अधिकार्‍याला त्याच्या मोटारीमध्येच गोळ्या घालून ठार करण्यात आले. गोळीबार करणारे दोन मोसाद एजंट्सनी मोटारसाईकलींवरून पसार झाले.

१० जुन १९८६ - अथेन्स
खालीद अहमद नझल या पीएलओ च्या उच्चाधिकार्‍याला तो राहत असलेल्या हॉटेलबाहेर गोळ्या मारून ठार केले गेले.

२१ ऑक्टोबर १९८६ - पुन्हा अथेन्स!
मन्झर अबु घझाला या पीएलओ च्या उच्चाधिकार्‍याला मोटारीमध्ये स्फोट करून ठार केले गेले.

१४ फेब्रुवारी १९८८ - लिमास्सोल - सायप्रस
सायप्रसमधील लिमास्सोल या एका मोठ्या शहरात एका मोटारीत स्फोट झाला आणि अबु अल् हसन कासीम, हम्दी अड्वान या दोन पॅलेस्टीनीयन तरूणांचा मृत्यू झाला तर आणखी एक जण जखमी झाला.

८ जुन १९९२ - पॅरीस
पीएलओ इंटेलिजन्स हेड आतीफ बिइसो याला पॅरीसमध्ये गोळ्या मारून ठार करण्यात आले.

या सर्व पीएलओ अधिकार्‍यांमध्ये हुषार ठरला तो अली हसन सलामेह, मोसाद ला बरीच वर्षे गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला.
२१ जुन १९७३ ला लिलहॅमर या नॉर्वे मधील शहरात मोसाद एजंट्सनी एका मोरोक्कन वेटरला अली हसन सलामेह समजून ठार मारले. ही चूक मोसाद्ला बरीच महागात पडली. त्यांचे ६ एजंट्स पकडले गेले. मोसादच्या नॉर्वेमधील घराचा पोलीसांना छडा लागला आणि बरीच महत्वाची कागदपत्रे नॉर्वे पोलीसांच्या हाती पडली व ६ पैकी ५ एजंट्सना तुरूंगवासाची शिक्षा झाली.
१२ जानेवारी १९७४ ला स्वित्झर्लंड येथे एका चर्च वर मोसार एजंट्स नी छापा मारून तीन अरबांना ठार मारले. अली हसन सलामेह तिथे असण्याची माहिती चुकीची निघाली. मोसाद एजंट्स तत्काळ तिथून पसार झाले.

यानंतर काही दिवसांतच तीन मोसाद एजंट्स अली हसन सलामेह ची माहिती मिळविण्यासाठी लंडन येथे गेले परंतु अपेक्षीत माहिती घेवून येणारा खबर्‍या न आल्याने हा प्रयत्नही वाया गेला. या दरम्यान एका तरूणीने मोसाद एजंटला भुलवून त्याच्यासह खोलीत प्रवेश केला व त्या एजंटला ठार मारले. ती तरूणीने एका अज्ञात व्यक्तीकडून या एजंटच्या हत्येची सुपारी घेतली होती. त्या तरूणीला काही महिन्यांनी इतर मोसाद एजंट्सनी पकडून ठार केले. ( या हत्येबद्दल त्या मोसाद एजंट्सच्या लीडरवर कारवाई केली गेली - कारण? या हत्येच आदेश मोसादने दिले नव्हते!)

यानंतर अली हसन सलामेहच्या हत्येचे प्रयत्न (अधिकृतरीत्या) सोडून देण्यात आले. तरीही एका मोसाद एजंट्सच्या गटाने त्याचा जिब्राल्टर येथे शोध लावला व तिकडे हत्येसाठी रवाना झाले. या तीन एजंट्चा संशय आल्याने एका अरब सिक्यूरीटी गार्डने आपली बंदूक उगारली, एजंट्सनी त्या गार्डला गोळ्या घालून ठार मारले व ते सर्वजण पसार झाले.

मोसादने पुन्हा १९७७ - ७८ च्या दरम्यान अली हसन सलामेह ला शोधण्यास सुरूवात केली. यावेळी मात्र त्यांना विश्वासार्ह माहिती मिळाली, अली हसन सलामेह बैरूत मध्ये लपला होता.२२ जानेवारी १९७९ ला सलामेह आणि त्याचे चार बॉडीगार्ड एका मोठ्या मोटारीतून जात असताना रस्त्यावरील एका दुसर्‍या मोटारीत लपवलेला एका अत्यंत शक्तीशाली बाँबचा स्फोट झाला. चारही बॉडीगार्ड आणि अली हसन सलामेह तत्काळ मरण पावले. पाच अयशस्वी प्रयत्नांनंतर मोसादला हे यश मिळाले. या स्फोटात आणखी चार नागरीकही मारले गेले.

म्यूनीक विमानतळावर बचावलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी अदनान अल् गाशेय १९७० चे दशक संपताना रहस्यमयरीत्या नाहीसा झाला. यालाही मोसाद ने संपविले असावे अशी शंका व्यक्त केली जाते. दुसरा दहशतवादी मोहम्मद सफादे याचाही असाच अंत झाला असण्याची शक्यता आहे. तिसरा दहशतवादी 'जमाल अल् गाशेय ' आजही जिवंत आहे आणि आफ्रिकेमध्ये कोणत्यातरी देशात आपली ओळख बदलून राहतो आहे. (याला शोधण्यासाठी मोसाद आणि इस्रायलने जंग जंग पछाडले आहे)

हा हत्येचा घटनाक्रम सुरू असताना पीएलओ, पीएफएलपी ब्लॅक सप्टेंबर या संघटना शांत बसून नव्हत्या. मोसादच्या लेटर बॉम्बला यांनीही लेटर बाँबने उत्तर दिले. यामुळे ब्रिटनमध्ये एका इस्रायली सरकारी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. कांही मोसाद एजंट्सवर प्राणघातक हल्ले झाले, कांहीजण त्यात मारले गेले.

युरोप आणि मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या या नाट्याचे पडसाद उमटले युरोप पासून दूर, बँकॉक येथे.
२८ डिसेंबर १९७२ ला बँकॉक मधील इस्रायली दूतावासावर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ओलीस ठेवले. मागणी होती ३६ दहशतवाद्यांच्या सुटकेची. परंतु परिस्थिती चिघळण्याआधीच थाई पोलीसांच्या मुत्सद्देगिरीला यश आले व दहशतवाद्यांनी सर्वच्या सर्व ओलीसांना सुखरूप सोडले. दहशतवादी सुरक्षीतपणे कैरो ला निघून गेले.

एका अर्थाने ही पीएलओ ची हार होती. परंतु मोसादच्या अंदाजाप्रमाणे पीएलओने ही हार मुद्दामहून पत्करली होती. संपूर्ण जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी, कोणत्यातरी मोठ्या घटनेसाठी इस्राईलला गाफील ठेवण्यासाठी..

मोसादचा अंदाज खरा ठरला, पीएलओ ची पुढची चाल होती..

इस्रायली पंतप्रधाना गोल्डा मेअर यांची हत्या...

(क्रमशः)

******************************************************************************
सर्व माहिती आणि छायाचित्रे अंतर्जालावरून साभार.
******************************************************************************
अंतर्जालावर या घटनेसंदर्भात वेगवेगळी माहिती देणारे बरेच संदर्भ उपलब्ध आहेत. त्या संदर्भांपैकी योग्य वाटणार्‍या अशा संदर्भांची मदत घेतली आहे, आणखी वेगळे संदर्भ उपलब्ध असतील तर प्रतिसादामध्ये जरूर उल्लेख करावा.
******************************************************************************

धर्मसद्भावना

प्रतिक्रिया

गणपा's picture

28 Nov 2012 - 7:48 pm | गणपा

हा ही भाग आवडला.
मला वाटतं यावर एखादा चित्रपट येऊन गेलाय आणि पाहिलाही आहे पण नाव आत्ता आठवत नाहीये.
पु भा प्र.

इष्टुर फाकडा's picture

28 Nov 2012 - 9:00 pm | इष्टुर फाकडा

चित्रपट- म्युनिक

अमोल खरे's picture

28 Nov 2012 - 7:50 pm | अमोल खरे

जबरदस्त अभ्यास करुन लिहिलेला लेख. इस्त्रायलने त्या अतिरेक्यांना मारले होते ते माहिती होते, पण एकजण अजुनही जिवंत आहे हे ऐकल्यावर वाईट वाटले. पण निदान बाकी तरी मेले. आता नाही म्हणले तरी आपल्या देशाशी तुलना होतेच. त्यातल्या त्यात कसाबला लटकवला म्हणुन आशा जागृत झाल्या आहेत. आपले सरकार (काँग्रेस+ भाजपा) तितकेही दुर्बळ नाही अशी मनाची समजुत घालण्यात आली आहे.

पुन्हा भीतीदायक लेख. एखादा रहस्यमय चित्रपट असल्यासारखा.यानंतर तरी इस्रायली लोकांच्या विमानांचे अपहरण थांबले की नाही? भारताची गुप्तचर यंत्रणा इतकी चांगली आहे का?

>>यानंतर तरी इस्रायली लोकांच्या विमानांचे अपहरण थांबले की नाही
नाही. २७ जुन १९७६ ला एंटबे हायजॅकींग झाले. इस्रायलने ४००० किलोमीटर दूर असलेल्या युगांडा मध्ये अविश्वसनीय कमांडो ऑपरेशन केले व आपले प्रवासी सोडवून आणले.

जगातले सर्वात यशस्वी हॉस्टेज रेस्क्यू ऑपरेशन.

अत्यंत गुंतागुंतीच्या या ऑपरेशन मध्ये विमाने उतरल्यानंतर, दहशतवाद्यांना ठार मारून, ओलीसांना सोडवून विमानात चढवण्यासाठी आखलेला वेळ होता ५५ मिनीटे आणि प्रत्यक्षात इस्रायली कमांडोंनी घेतलेला वेळ होता ५३ मिनीटे.

या ऑपरेशनमधल्या अनेक अचाट घटनांपैकी ही एक!

होय. आहे. भारतीय मुत्सद्दी, लष्कर व गुप्तहेर संघटनांइतकं आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या वातावरणात जगात कुणाचा बापही काम करत नाही. सीआयए, केजीबी, मोसाद वा आयएसआय...

म्हणजे गोल्डा मायरसारखा आदेश देण्याचीच काय ती कमी! :)

बाकी असे आदेश दिले जातच नाहीत व ते बजावले जात नाहीत असेही नाही - आपल्या माहितीसाठी.

अपूर्व कात्रे's picture

28 Nov 2012 - 8:58 pm | अपूर्व कात्रे

आधीच्या भागांप्रमाणे हाही भाग रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. असेच लिहित रहा.
Israel या देशाबद्दल असलेला आदर अजूनच वाढला.
या देशाची आणि आपली तुलना शक्य नाही. त्यामुळे दाउद, लखवी वगैरे नैसर्गिक रीतीने किंवा ISI/ अमेरिकेला डोईजड झाले किंवा त्यांची उपयुक्तता संपली की ते मेल्याचे पेपरात वाचण्याचे सुख मिळावे एवढीच इच्छा...
बाकी १९९९च्या कारगिल हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार परवेझ मुशर्रफ राजरोसपणे भारतात येऊन भाषणे देऊन जातो आणि देशात त्याबद्दल कोणालाही काहीही वाटत नाही याचे वाईट वाटते.

इष्टुर फाकडा's picture

28 Nov 2012 - 9:00 pm | इष्टुर फाकडा

हाही भाग जहबहर्या झालाय. पुभाप्र !

पैसा's picture

28 Nov 2012 - 9:40 pm | पैसा

एकदम थरारक आणि खिळवून ठेवणारे लिखाण.

प्रचेतस's picture

29 Nov 2012 - 12:23 pm | प्रचेतस

असेच म्हणतो.
येऊ देत पुढचा भाग लवकर.

कवितानागेश's picture

28 Nov 2012 - 9:55 pm | कवितानागेश

खतर्नाक!!!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2012 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा

वाचतांना...नॉनस्टॉप गेलो...आणी काहि मिनिटं खल्लास झालो...

सस्नेह's picture

28 Nov 2012 - 10:03 pm | सस्नेह

बापरे ! इस्रायल अन मोसाद हे प्रकर्ण भलतंच चिवट अन खुनशी होतं तर !
पुढच्या भागाची उत्सुकतापूर्वक प्रतिक्षा.

प्रशांत's picture

6 Dec 2012 - 12:05 pm | प्रशांत

+१ असेच म्हणतो

५० फक्त's picture

28 Nov 2012 - 10:40 pm | ५० फक्त

लई भारी, पण सवयीप्रमाणे एक विनंती ब-याच मोठ्या लोकांचे उल्लेख एकेरी झालेत, ते टाळता आलं तर पहा.

मादका सॉरी सॉरी मोदका खत्रुड लिहले आहेस. :)

हुप्प्या's picture

28 Nov 2012 - 11:09 pm | हुप्प्या

असाच लेख २६/११ च्या हल्ल्यावर लिहिला जातो आहे. मोसादच्या ऐवजी रॉ च्या शूर कर्मचार्‍यांनी ह्या हल्ल्यामागे जे जे कुणी होते त्यांना शोधून, वेचून वेचून कुत्र्याच्या मौतीने मारले त्याची चित्तथरारक हकीकत कुणी मोदक लिहितो आहे. ह्या सूडाच्या चित्तथरारक वर्णनांवर आधारित अनेक कादंबर्‍या लिहिल्या जात आहेत, सिनेमे निघत आहेत. आमच्या देशात येऊन आमचे लोक मारले म्हणून पाक बोंबाबोंब करतोय, अमेरिका बिन लादेन प्रकरणाकडे बघून भारताच्या कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे. सौदी व इजिप्तसारखी अमेरिकी ताटाखालची मांजरे तो अंतर्गत मामला आहे म्हणून अंग काढून घेत आहेत. वगैरे वगैरे वगैरे.
असो. फार वाहवत जाऊ नये.

सोत्रि's picture

28 Nov 2012 - 11:59 pm | सोत्रि

या संपूर्ण घटनाक्रमासाठी नेमून दिलेला वेळ होता २० मिनिटे, सर्वजण इस्रायल ला रवाना झाले तेंव्हा एकूण वेळ लागला होता ३० मिनीटे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Nov 2012 - 1:00 am | निनाद मुक्काम प...

नववी मध्ये असतांना ह्या संबंधी भाषांतरित लेख वाचला होता,
पुढे हा सिनेमा पाहण्यात आला.
ह्या सिनेमाचा दिग्दर्शक जगप्रसिद्ध स्टीवन स्पीलबर्ग हा ज्यू आहे.
हा जगप्रसिद्ध सिनेमा बनवून त्याने ह्या आधीच आपल्या धर्मियांवर झालेल्या अन्यायाची गोष्ट खर्या अर्थाने जगभर पसरवली.
त्यांच्या परिवारातील अनेक नातलग पोलंड व युक्रेन मध्ये नरसंहारात मारल्या गेली.
होती.

लेख सुसुत्रतेचे सर्व निकषावर पूर्णपणे उतरला आहे व ओघवत्या शैलीमुळे
आपण एखादी थ्रिलर कथा वाचल्याचा आनंद मिळतो. पण ही नुसती कथा नव्हे तर हेरगिरी विश्वातील जिवंत दंतकथा आहे.
असा आनंद ,समाधान आमचे हेरखाते आम्हाला कधी देणार त्यावर
अमेरिकेतून भारतीय वंशाचा नाईट श्यामलन मुंबई अश्या नावाने कधी सिनेमा काढणार ? ह्याकडे डोळे लागून राहिले आहेत.

साहेब..सलाम!!! नेहमी प्रमाणेच जबरदस्त लेख. पहिल्यांदा क्रमश पाहुन बर वाटलं.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

स्पा's picture

29 Nov 2012 - 11:04 am | स्पा

एक नंबर लिहितोयस

लवकर टाक बाबा पुढचे भाग

जबर्‍या लिहितोयस मोदका...नाद खुळा!!!!

अक्षया's picture

29 Nov 2012 - 11:54 am | अक्षया

हा ही भाग आवडला..:)

लाल टोपी's picture

29 Nov 2012 - 12:02 pm | लाल टोपी

म्युनिक बद्द्ल माहित होते , मोसादने त्यांचा बदला घेतला हेही वाचून माहित होते पण इतके मुद्देसूद आणि तपशीलवार माहित नव्ह्ते. मोसाद खरोखरच अफलातून आहे. मोदक आपल्या सर्वच लेखनाचा मी चाहता आहे. पुलेशु..

गणेशा's picture

29 Nov 2012 - 1:33 pm | गणेशा

अतिषय सुंदर भाग

येवुद्या आनखिन

इरसाल's picture

29 Nov 2012 - 1:36 pm | इरसाल

पुढचा भाग लवकर टाक्शीलच.
उत्कंठा वाढीस लागली आहे.

झकासराव's picture

29 Nov 2012 - 2:23 pm | झकासराव

भारीच :)

एकदम जबर्‍या.. पुढचाही भाग येऊ दे..

- पिंगू

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Nov 2012 - 4:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

खूप वाट बघायला लावलीस. परत असे झाले तर पुण्याला येऊन बदला घेईन
"I also neither forget nor forgive"

असो, लेख आवडला रे :-) पुढचा भाग लवकर येऊ दे.

बायडी's picture

30 Nov 2012 - 9:30 am | बायडी

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.