रिकामे विमान बघून इस्साला धोक्याची जाणीव झाली.
शक्य तेवढ्या वेगाने तो व त्याचा सहकारी (टोनी) हेलीकॉप्टर कडे धावू लागले....
अचानक विमानतळाचा परिसर प्रखर प्रकाशाने उजळून निघाला आणि... प्रचंड गोळीबारास सुरूवात झाली...
रात्री १०:३० वाजता विमानतळावर सगळे नाट्य सुरू झाले.
विमानाची तपासणी करायला गेलेले इस्सा आणि टोनी हेलीकॉप्टरच्या दिशेने धावत होते..
कंट्रोल टॉवरवरच्या एका स्नायपरने इस्सा आणि दुसर्याने टोनीला लक्ष्य बनवून गोळ्या झाडल्या. मांडीत गोळी लागल्याने टोनी जखमी झाला व रनवेवर कोसळला. तरीही तो कसाबसा उठला व धडपडत एका हेलीकॉप्टरच्या मागे पोहोचण्यात यशस्वी झाला. इस्साही सुखरूप हेलीकॉप्टर जवळ पोहोचला.
विमानाची तपासणी करायला गेलेल्या इस्सा आणि टोनीला विमानातले पोलीस जेरबंद करणार आणि राहिलेल्या "दोन किंवा तीन" दहशतवाद्यांना पाच स्नायपर ठार मारणार असा जर्मन पोलीसांचा प्लॅन पुरेपूर फसला. एकूण आठ दहशतवादी होते आणि आठ दहशतवाद्यांसाठी पाच स्नायपर अपुरे होते. दहशतवाद्यांचा खरा आकडा तीस मिनीटे आधी संपूर्ण जगाला कळाला होता पण विमानतळावरील स्नायपर्स पर्यंत ही माहिती पोहोचली नव्हती. कारण...? कारण त्यांच्याकडे संपर्कासाठी रेडीओ नव्हते. सगळे स्नायपर्स अजूनही "चार किंवा पाच" दहशतवाद्यांच्या प्रतिक्षेत होते. इस्साच्या आदेशावरून आता दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केला. गोळ्या कंट्रोल टॉवर वरून येत आहेत हे पाहून कंट्रोल टॉवर व त्याच्या जवळील लाईट्सवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यादरम्यान दहशतवाद्यांनी झाडलेली एक गोळी कंट्रोल टॉवरच्या तळमजल्यावर बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस अधिकार्याला डोक्यात लागली व तो तत्काळ मरण पावला. "चार किंवा पाच" ऐवजी "आठ" दहशतवादी प्रत्यूत्तर देवू लागल्यानंतर स्नायपर्स ही गडबडले व जमेल तसे तेही प्रत्यूत्तर देवू लागले.
कंट्रोल टॉवरवरून स्नायपरही गोळीबार करत होते, मात्र विमानतळावरचे लाईट्स आणि चुकीच्या पध्दतीने लँड झालेली हेलीकॉप्टर्स त्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी करत होते, नेम धरून गोळ्या झाडणे (Precision Shots) स्नायपर्सना कठीण जात होते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला तेही अंदाधुंदपणेच उत्तर देत होते. सुदैवाने दहशतवाद्यांना गोळ्या लागत होत्या, दहशतवादी जखमी होत होते. सर्वत्र गोंधळ माजला होता.
हे सर्व नाट्य ओलीस हेलीकॉप्टरमध्ये बसून पाहत होते... हात पाय बांधलेल्या अवस्थेत, असहाय्यपणे.
विमानतळावर काय घडते आहे याचे अंदाज बांधून विमानतळाबाहेर असलेली "मिडीया सर्कस" त्या बातम्याही "थेट प्रक्षेपीत" करत होती.
रात्रीचे ११ वाजले.. गोळीबाराला थोडा वेळ उसंत मिळाली. संधी पाहून हेलीकॉप्टरचे पायलट पळून गेले आता फक्त अपहरणकर्ते आणि ओलीस राहिले. ओलीसांनी दातांच्या सहाय्याने दोर सैल करायचा.. सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही.
एक तास भयाण शांततेत गेला.
अचानक दहशतवाद्यांना काही चिलखती गाड्या रनवेवर येताना दिसल्या. ते घाबरले व त्यांना आपण पकडले जाणार याची जाणीव झाली.
एक दहशतवादी पहिल्या हेलीकॉप्टरकडे तर आणखी एक जण दुसर्या हेलीकॉप्टरकडे धावला. हेलीकॉप्टरमध्ये चढून खूप जवळून खेळाडूंवर गोळ्या झाडल्या. सर्वजण काही क्षणात मरण पावले. दुसर्या हेलीकॉप्टरमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली फक्त या दहशतवाद्याने आणखी एक पराक्रम केला. या हेलीकॉप्टरमधल्या खेळाडूंवर गोळ्या झाडून त्याचे समाधान झाले नसावे. त्याने स्वत:जवळचा एक हँड ग्रेनेड घेतला, पीन काढली व हेलीकॉप्टरमध्ये खेळाडूंच्या पायाशी भिरकावला..
मो ऽ ऽ ठ्ठा स्फोट झाला.
हेलीकॉप्टरसह आतल्या खेळाडूंच्या अक्षरश: राख झाली. गोळीबारातून वाचले ते खरे दुर्दैवी ज्यांना या यातना जिवंतपणी भोगाव्या लागल्या.
स्फोट झाल्यानंतर झालेली हेलीकॉप्टरची अवस्था.
कंट्रोल टॉवर, आसपासचा परिसर आणि बेचीराख झालेले हेलीकॉप्टर...
("C" मार्क असलेल्या इमारतीच्या वरच्या भागात तीन स्नायपर्स व दोन्ही हेलीकॉप्टर्सच्या शेपटाच्या दिशेने जमिनीवर एक एक स्नायपर तैनात केले होते)
पुन्हा गोळीबार सुरू झाला... अखेर कंट्रोल टॉवरवरच्या स्नायपर्सना यश मिळाले. इस्साला गोळी लागली व तो रनवे वर कोसळला. टोनी व बाकीचे सहकारी गोळीबार करतच होते. आणखी काही दहशतवादी गोळ्या लागून कोसळले. एकूण चार दहशतवादी ठार झाले. चार जण अजूनही जिवंत होते, जखमी होते पण जिवंत होते.
एकही खेळाडू जिवंत नाही ही खात्री पटल्यावर ठार न झालेले तीन दहशतवादी पोलीसांना शरण गेले.
गंभीर जखमी अवस्थेत टोनीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोलीसांनी घेरले व दरम्यान झालेल्या गोळीबारात टोनी ठार झाला. पहाटे पहाटे सुरू झालेल्या घडामोडी रात्री ०१:३० वाजता संपल्या. एकूण १७ जीव घेवून.
बाहेर उलटसुलट बातम्या येतच होत्या, दुर्दैवाने सत्यता पडताळून न पाहता त्या प्रक्षेपीत होत होत्या आणि सगळेजण त्या बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होते.
अचानक एक बातमी आली की सर्व ओलीस सुरक्षीत आहेत आणि दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सगळीकडे जल्लोश सुरू झाला. ऑलंपीक व्हिलेजमध्ये ही बातमी पोहोचली. जर्मनीमध्ये, इस्राईलमध्ये आणि जगभर ही बातमी पोहोचली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. इस्राईलच्या राजदूतांनी सर्वांचे अभिनंदन केले. अभिनंदनाचा स्वीकार करायला एका व्यक्तीने स्पष्ट नकार दिला...
अँकी स्पिट्झर. फेन्सींग कोच अँड्रे स्पिट्झरची पत्नी.
जोपर्यंत अँड्रेशी प्रत्यक्ष बोलणे होत नाही तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला अँकी तयार नव्हती.
विमानतळावर हळूहळू अॅम्ब्यूलन्स आणि पोलीसांच्या गाड्यांची वर्दळ वाढू लागली. अधिकृत व खरी बातमी आली, रात्री ०३:३० च्या दरम्यान..
"सर्वच्या सर्व खेळाडू विमानतळावर मरण पावले"
जल्लोश करणारे इस्रायली दु:खात बुडून गेले. ऑलंपीक स्पर्धेतील एक काळा दिवस संपला.
या गुणी खेळाडूंना कायमचे नाहीसे करून.
जर्मनीच्या विमानतळावर असलेले खेळाडूंचे स्मारक.
काही तासातच दुसरा दिवस उजाडला. सकाळी खेळ सुरू होण्याच्या वेळेस ऑलंपीक स्टेडीयममध्ये ८० हजार प्रेक्षक आणि ३ हजार खेळाडूंच्या उपस्थितीत शोकसभा सुरू झाली. मरण पावलेल्या खेळाडूंचा ओझरता उल्लेख करून ऑलंपीक चळवळ किती मजबूत आहे आणि त्याची महती वगैरे वगैरे भाषण सुरू झाले. या सभेला इस्रायली खेळाडूंचे नातेवाईक ही हजर होते. यांपैकी कार्मेल इलियाह या मोशे वाईनबर्ग च्या बहिणीला (Cousin) ला हा ताण सहन झाला नाही, रडत रडतच ती कोसळली व हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावली.
सकाळी जर्मनीला पोहोचून अँकी सुध्दा शोकसभेला हजर होती.
मृत खेळाडूंना मानवंदना देण्यासाठी आणि शोक दर्शवण्यासाठी ऑलंपीकचा ध्वज आणि सर्व सहभागी देशांचे ध्वज अर्ध्यावर आणले गेले.
१० मुस्लीम / अरब राष्ट्रांनी त्यांचे ध्वज अर्ध्यावर आणण्यावर आक्षेप घेतला. त्यांचे ध्वज लगेचच वर घेतले गेले.
(या दरम्यानची उल्लेखनीय बाब म्हणजे मुस्लीम / अरब राष्ट्रांपैकी फक्त जॉर्डनचे राजे किंग हसन यांनी या हत्याकांडाचा स्पष्ट शब्दात निषेध केला)
काही न घडल्याप्रमाणे खेळ सुरू झाले. या घटनेमुळे इतर देशांचेही अनेक खेळाडू ऑलंपीक सोडून परत फिरले. काही खेळत राहिले. खूप थोड्या खेळाडूंनी हेही मान्य केले की त्यांची खेळण्याची, स्पर्धा करण्याची इच्छाशक्ती मरून गेली आहे पण ते स्पर्धेत थांबले.
जड मनाने इस्रायली टीम परत फिरली. त्यांच्यासाठी एक दु:खद अध्याय संपला होता.
पण काहीजणांसाठी हा अध्याय इथेच संपणार नव्हता.. ही तर सुरूवात होती.
इस्त्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर आणि मोस्साद 'इस्रायली मार्ग' शोधण्यात गुंतले आणि अँकी स्पिट्झर तिचा स्वत:चा...
म्यूनीकमध्ये पोहोचल्यावर अँकीने इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंटला भेट दिली; जिथे दोन खेळाडूंची हत्या झाली होती, जिथे सर्वांना ओलीस ठेवले गेले होते व जिथे जगाने अँड्रे स्पिट्झरला खिडकीतून ऑलंपीक अधिकार्यांशी बोलताना शेवटचे जिवंत बघितले होते.
पुढे २० वर्षे अँकीने जर्मन सरकारचा सतत पिच्छा पुरवला. या घटनेचा अधिकृत अहवाल मिळावा म्हणून जंग जंग पछाडू लागली. अँकीची एक खूप साधी अपेक्षा होती. या घटनेची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी. पण तिच्या हाती काहीच लागले नाही. जर्मन सरकारने असा कोणताही अहवाल नाही हेच पालूपद कायम ठेवले. अचानक १९९२ च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती अँकीला या घटनेचे जर्मनीचे सरकारी अहवाल आणि कागदपत्रे पाठवू लागली. या अज्ञात व्यक्तीने किती कागदपत्रे पाठवावीत..? तब्बल ३८०० फाईल्स.
हे सगळे विश्लेशण करून नक्की काय झाले हे समजण्यासाठी अँकीने एका तज्ञाची मदत घेतली - लीरॉय थॉमसन. लीरॉय थॉमसन हा निवृत्त अमेरीकन आर्मी अधिकारी. ओलीस आणि अपहरण क्षेत्रातील तज्ञ.
निघालेले निष्कर्ष आणि परिस्थिती धक्कादायक होती..
(१) ऑलंपीक व्हिलेजची सुरक्षाव्यवस्था फक्त कागदावर मजबूत दिसत होती. प्रत्यक्षात सुरक्षाव्यवस्था अत्यंत ढिली व अकार्यक्षम होती. सहा सात फुटी कुंपणावरून कुणीही ये जा करू शकत होते. चेकपोस्ट व सिक्यूरीटी गार्ड्सचा कोणाताही वचक नव्हता.
(२) ओलीसांच्या सुटकेचा पहिला प्रयत्न ओलीस आणि अपहरणकर्ते अपार्टमेंटमध्ये असताना केला गेला. या प्रयत्नाच्यावेळी दहशतवाद्यांची नक्की संख्या, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, शस्त्रांची क्षमता, दारूगोळा, दहशतवाद्यांचा नक्की ठावठिकाणा (कोणत्या खोलीमध्ये आहेत, एकत्र आहेत की विखूरलेले आहेत) इमारतीची रचना, नकाशे व प्लॅन. ओलीस जखमी आहेत की नाही याची वस्तुस्थिती, ओलीसांना कोणत्या अवस्थेत ठेवले आहे, कुठे ठेवले आहे. अशी अत्यंत महत्वाची माहिती नसताना आणि कोणत्याही रेस्क्यू प्लॅनशिवाय दहशतवाद्यांवर हल्ला करायला निघालेले हे पोलीस यशस्वी ठरले असते तर ते बहुदा मोठे आश्चर्य ठरले असते.
ट्रॅकसूटमध्ये रेस्क्यूसाठी निघालेल्या या टीमकडे फक्त सब मशिन गन होत्या. ही रेस्क्यू टीम ट्रॅकसूट मध्ये अवघडून वावरत होती. शस्त्रांच्या हाताळणीत सराईतपणा नव्हता आणि त्यांच्या हालचाली नवशिक्यासारख्या होत्या. हे सगळेजण कोणतेही कमांडो पथक किंवा स्पेशल युनीट वगैरे नव्हते. हे सगळे जण स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते. ज्यांच्याकडे अशाप्रकारच्या परिस्थितीत काय करावे याचे विशेष ज्ञान आणि प्रशिक्षण नव्हते.
वरील फोटो निरखून बघितला तर लक्षात येते की हे पोलीस बंदुका नवशिक्यासारख्या हाताळत आहेत. बंदुकीची नळी स्वत:कडे करून देवाण घेवाण सुरू आहे. कोणत्याही परीस्थीतीत बंदूक हाताळताना किंवा बंदूक घेवून कोणतीही हालचाल करताना बंदुकीची नळी स्वत:कडे किंवा आपल्या सहकार्याकडे करायची नाही हा शस्त्रे हाताळायचा महत्वाचा संकेतही पाळला जात नव्हता (हा संकेत आपल्याकडे NCC पासून शिकवायला सुरू करतात व नियम म्हणून मनावर बिंबवला जातो) यावरून या रेस्क्यू टीमचे कौशल्य लक्षात यावे.
याही पुढची बाब म्हणजे रेस्क्यू प्लॅन रद्द झाल्यानंतर एक पोलीस अपहरणकर्त्यांच्या इमारतीवरून सिगरेट फुंकत खाली उतरला. यावरून रेस्क्यू दरम्यान ते किती गंभीर होते हेही लक्षात येते.
आणि हास्यास्पद बाब म्हणजे या सगळ्याचे "थेट प्रक्षेपण" सुरू होते. रेस्क्यू टीम च्या ठावठिकाण्यासहित...
(३) या घटनेदरम्यान बघ्यांची गर्दी वाढतच होती व ती नियंत्रणात आणण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत की ती गर्दी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. गर्दीमध्ये एकूण बघ्यांची संख्या होती तब्बल ७५ ते ८० हजार....!!!!
अपहरणकर्त्यांनी एखादा ग्रेनेड किंवा ऑटोमेटीक रायफलची एखादी फैर झाडली असती तर ओलीसांपेक्षा कित्येक पटीने जास्ती बळी गेले असते.
(४) अतीउत्साही मिडीया सर्कसला आवरण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
(५) विमानतळावर घडलेल्या घटनांदरम्यान जर्मन पोलीसांनी केलेल्या चुका पाहिल्या तर या हत्याकांडाला जर्मनीचा पाठिंबा होता की काय असा प्रश्न पडतो...
(अ) दहशतवाद्यांचा खरा आकडा अर्धा तास आधी कळून सुध्दा प्लॅनमध्ये कोणताही बदल केला गेला नाही.
विमानतळाभोवती असलेल्या ५ स्नायपर्स कडे बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि रेडीयो नव्हते. या स्नायपर्स कडे स्नायपर गन नव्हत्या, ज्या साध्या गन होत्या त्याला दुर्बीणी नव्हत्या, नाईट व्हिजन नव्हते आणि हे स्नायपर्स सुध्दा स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते, त्यांना स्नायपर शूटींगचे कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नव्हते. जर्मनीच्या नियमाप्रमाणे लष्कर अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू शकत नव्हते त्यामुळे स्नायपर बॅटलमध्ये दुसर्या महायुध्दात नावलौकीक मिळवणार्या जर्मनीने या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या ठिकाणी साधे पोलीस नेमले.
(ब) संपूर्ण हल्ल्यादरम्यान कंट्रोलरूम / लीडर, स्नायपर्स व विमानातले वेष बदललेले पोलीस यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता, कोणतेही संभाषण नव्हते.
(क) विमानातल्या पोलीस टीमने हेलीकॉप्टर लँड होण्याच्या केवळ अर्धा सेकंद आधी प्लॅनमध्ये बदल केला व 'इंधन भरलेल्या विमानात दहशतवाद्यांनी एका ग्रेनेडचा स्फोट केला तर कोणीच जिवंत राहणार नाही' या भीतीने ते पळून गेले. या बदलाची कोणालाही काहीही माहिती दिली गेली नाही. (यामुळे ८ दहशतवादी विरूध्द ५ स्नायपर्स अशी स्थिती तयार झाली.)
(ड) ठरलेल्या प्लॅनप्रमाणे हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे बाजूचे दरवाजे करून उतरणार होते जेणेकरून सर्व स्नायपर्स ना दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणे सोपे गेले असते पण काही अनाकलनीय कारणामुळे दोन्ही हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे तोंड करून उतरले. त्यामुळे स्नायपर्स ना दहशतवाद्यांचा वेध घेणे अवघड गेले. एक स्नायपर दहशतवाद्यांपासून केवळ ५० मीटर अंतरावर होता. पण चुकीच्या पध्दतीने लँड झालेल्या हेलीकॉप्टर मुळे तो कंट्रोल टॉवर वरच्या स्नायपर्सच्या थेट मारक्षेत्रात आला. सरळ त्याच्या दिशेने येणार्या त्याच्याच सहकार्यांच्या गोळ्यांमुळे जमिनीवरच्या स्नायपरला एकही गोळी झाडायची संधी मिळाली नाही. (५ स्नायपर्स पैकी एक निकामी - म्हणजे ८ दहशतवादी विरूध्द ४ स्नायपर्स)
(इ) रात्री ११ च्या दरम्यान गोळीबार थांबल्यानंतर चिलखती गाड्या (APC) विमानतळावर येण्यासाठी तब्बल एक तास लागला. कारण? चिलखती गाड्या म्यूनीकमध्ये संरक्षणासाठी नेमल्या होत्या व जर्मन पोलीस या गाड्यांना बोलवायचे विसरले! (हो! विसरले!!!!!) लक्षात आल्यावर रेडीयोने संपर्क साधून या गाड्यांना अवताण धाडले गेले पण या गाडयांचा मार्ग मिडीया आणि बघ्या प्रेक्षकांनी व्यापलेला होता, जर्मन पोलीस हा मार्ग मोकळा करायचेही विसरले. म्यूनीकमधून विमानतळावर येण्यासाठी या गाड्यांना बरेच अडथळे पार करावे लागले व त्यात बराच वेळ वाया गेला.
(फ) या गोळीबारादरम्यान स्नायपर्ससुध्दा अंदाधुंद गोळीबार करत होते. नेम धरून गोळ्या मारण्याचा प्रयत्न (Precision Shots) खूप कमीवेळा केला गेला.
(ग) संपूर्ण रेस्क्यूप्लॅनवर, चालू घडामोडींवर कोणाचेही नियंत्रण नव्हते.
या सर्व चुकांची परीणीती ९ खेळाडूंच्या दुर्दैवी मॄत्यूत झाली.
ऑलंपीक खेळ चालू राहतील तोपर्यंत ही रक्तरंजीत घटना कुणीही विसरू शकणार नाही.
ऑलंपीकच्या पाच कड्यांपैकी एक रक्तवर्णी कडे कदाचित ही घटना विसरू देणार नाही.
************************************************************
या घटनेनंतर दीड महिन्यातच एका लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या बोईंगचे अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी Munich Massacre मधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली... आणि जर्मनीने ती मान्य करत तीनही दहशतवाद्यांना लगेचच सोडून दिले.
या बोईंगचे अपहरण हाही एक विवादास्पद मुद्दा आहे. या अजस्त्र विमानात त्यावेळी फक्त १२ प्रवासी होते, एकही स्त्री आणि लहान मूल नव्हते आणि Munich Massacre मधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांना मुक्त करताना जर्मनीने इस्राईलला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही.
************************************************************
Munich Massacre ही घटना इथेच जरी संपली असली तरी इस्राईलने हे सगळे सहजासहजी संपवले नाही. म्यूनीकमधून जिवंत बाहेर पडलेल्या तीन पैकी दोन अपहरणकर्त्यांना ते लपलेल्या देशात, त्यांच्या ठिकाणी घुसून ठार मारले. यासोबत Munich Massacre "प्लॅन" करणारे डझनभर प्लॅनरही असेच ठार मारले गेले.
(या मालिकेचा पुढील भाग - Operation Wrath of God)
************************************************************
सर्व फोटो आणि माहिती अंतर्जालावरून साभार.
************************************************************
प्रतिक्रिया
21 Aug 2012 - 4:46 am | रेवती
देवा!
किती दुर्दैवी!
प्रभावी वर्णनामुळे वाचणे नकोसे झाले.
21 Aug 2012 - 12:16 pm | अस्मी
खरंच दुर्दैवी!!
वाचताना सुद्धा अंगावर शहारा आला. ओघवते आणि स्पष्ट लिखाण.
लिहीत राहा.
21 Aug 2012 - 5:10 am | सोत्रि
मोदकराव,
जबरदस्त. पु.ले.प्र.
-(एकेकाळी स्नायपर व्हायची इच्छा असलेला) सोकाजी
21 Aug 2012 - 7:33 am | Pearl
चांगली माहिती. आणि चांगली लेखमाला.
पण हे सगळं खूप धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या प्रकारात जर्मनीचा हलगर्जीपणा कोड्यात टाकणारा आहे. आणि मिडियाचा वेडेपणा तर (ताजच्या वेळी) आपल्यालाही चांगलाच भोवला होता.
इस्त्राइल मात्र जबरदस्त आहे. असं पाहिजे. एकदम चुन चुन के बदला..
21 Aug 2012 - 8:05 am | ५० फक्त
मस्त झाली रे लेखमाला, धन्यवाद.
21 Aug 2012 - 8:34 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
21 Aug 2012 - 12:43 pm | किसन शिंदे
जर्मनीचा हलगर्जीपणा त्या बिचार्या खेळाडूंच्या जीवावर बेतला.
21 Aug 2012 - 9:20 am | अक्षया
लेखमाला चांगली झाली आहे.
या घटनेची इतकी माहिती नव्हती, ती मिळाली.
धन्यु. :)
21 Aug 2012 - 9:25 am | इरसाल
मोदका मस्त लिहीले आहेस.
तुझ्याकडुन अपेक्षा वाढल्यात बघ !
21 Aug 2012 - 11:00 am | अमोल खरे
कुठुन तुला म्युनिकचा शेवटचा भाग लवकर टाकायला सांगितला असं झालंय..... भयंकर सुन्न झालोय. त्या वेळी हेलिकॉप्टर मध्ये बसलेल्या खेळाडुंची काय वाईट मनःस्थिती असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. ह्या भागाला सुंदर तरी कसं म्हणायचं. पण तिथे काय झालं हे इतक्या डीटेलमध्ये कळलं तरी. पुढील सिरिज टाक लवकर.
21 Aug 2012 - 11:16 am | मी_आहे_ना
खरंच दुर्दैवी घटना. ओघवत्या भाषाशैलीतले वर्णन प्रभावी झाले आहे. आता 'ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड' च्या प्रतिक्षेत...
21 Aug 2012 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा
:)
21 Aug 2012 - 11:46 am | प्रचेतस
एकदम गंभीर विषय.
आणि तुम्ही का हसताय स्मायली टाकून.
बुवा, एक आगावू सल्ला- स्मायल्यांचा अतिरेक टाळा हो. तुमची स्मायली हीच ओळख होवून राह्यलीय आता.
21 Aug 2012 - 11:51 am | मोदक
+१
21 Aug 2012 - 11:53 am | गणामास्तर
+२
21 Aug 2012 - 11:30 am | बॅटमॅन
अतिशय जबरी बे मोदका. एक नंबर!!!!!
21 Aug 2012 - 12:00 pm | स्पा
सुन्न झालो
cst वरच्या थरारनाट्याची आठवण झाली
मिडिया मूळे बाहेरच्या सर्व बातम्या आत असलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोचवल्या जात होत्या..
मोदक राव
थरार नाट्य तेवढ्याच प्रभावी पणे मांडलेत
धन्यवाद
21 Aug 2012 - 12:03 pm | प्रचेतस
का बरे दुकान बंद?
21 Aug 2012 - 12:11 pm | गणामास्तर
मस्त लेखमाला.. ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड, ऑपरेशन एंटेबी सारखे ऑपरेशन शोधून शोधून (फक्त इस्त्राइल चे बरं का.;)) एक लेखमाला बनव आता.
त्यानिमित्ताने तुला काय गोळा करायचाय तो विदा पन होईल जमवून.
21 Aug 2012 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर
किती भयानक अनुभव..मन सुन्न करणारा थरथराट...अंगावर काटा आला. जर्मनीचा हलगर्जीपणा, पोलीसांच्या अक्षम्य चुका आणि खेळाडूंचे हत्याकांड.
इस्राईल न्याय वाखाणण्यासारखा आहे.
21 Aug 2012 - 1:06 pm | कवितानागेश
'मिडिया सर्कस' हा योग्य शब्दप्रयोग आहे.
21 Aug 2012 - 1:22 pm | इनिगोय
छान, उत्तम असे म्हणवत नाही इतके हे सगळे दुर्दैवी आहे. त्या खेळाडूंनी शेवटचे काही तास कोणत्या मनःस्थितीत घालवले असतील याचा विचारही करता येत नाही. (त्यातला एक खेळाडू जो ग्रेनेडच्या स्फोटातूनही बचावला होता, तो थोड्या वेळाने धुरामुळे गुदमरून मेला!)
दुसरा भाग वाचताना जो प्रश्न पडला होता, त्याला या भागातल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली.
जर्मनीची यातली भूमिका संशयास्पद आहेच. कदाचित प्लॅनर्सनी ही बाब लक्षात घेऊनच या देशाची निवड केली असेल. कदाचित यापुढचीही काही शक्यता असेल!
कालांतराने प्लॅनर्सना मोस्सादने ठार मारलं, तेव्हा मारण्यापूर्वी जर त्यांना बोलतं केलं असेल, तर याबाबतचे अधिक तपशील मोस्सादकडे असणार.
श्रेष्ठ-कनिष्ठ, न्याय्य-अन्याय्य, सूड, द्वेष यांच्या संकल्पना माणसाने किती ताणाव्या? किती काळ? सारे जग आंधळे होईस्तोवर?
"हे असे घडले होते" हे आमच्यापर्यंत पोचवलंस, त्याबद्दल तुझे आभार.
21 Aug 2012 - 3:06 pm | गणपा
तीन भागांची ही लेखमाला तुझ्या प्रवाही आणि प्रभावी लेखणीमुळे फार फार आवडली रे मादका.
जणु काही सारं डोळ्यांसमोरच घडतय. उत्तम.
21 Aug 2012 - 9:42 pm | मराठे
+१
21 Aug 2012 - 3:51 pm | स्वप्निल घायाळ
मोदक मस्त लेख आहे !!!...
21 Aug 2012 - 4:39 pm | दिपक
लेखमाला प्रभावी. अत्यंत आवडली. एखादी डॉक्युमेंटरी पाहतोय असे वाटले.
पुढिल लेखनाच्या प्रतिक्षेत.
21 Aug 2012 - 6:12 pm | प्यारे१
फार भेदकपणं अंगावर येतंय खरं तर जे झालं ते !
पण व्यवस्थित मांडणीमुळं छान प्रकारे 'पोचलं'.
पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत
-प्यारे१
21 Aug 2012 - 7:06 pm | पैसा
वाचताना शहारे आले. इस्रायल त्याच्या एकेक नागरिकाचा हिशेब चुकता करतो आणि आपले कित्येक सेनाधिकारी आणि पोलीस अधिकारी, ज्यांना तयार करण्यासाठी खूप कष्ट आणि पैसा खर्च करावा लागतो, त्यांचा जीव आपल्या देशात किती स्वस्त आहे हे प्रकर्षाने आठवलं. इतक्या घटना समोर असूनही आपण काहीच शिकत नाही हे सगळ्यात मोठं आश्चर्य. :(
21 Aug 2012 - 7:32 pm | मदनबाण
उत्तम लेखन !
म्यूनीकमधून जिवंत बाहेर पडलेल्या तीन पैकी दोन अपहरणकर्त्यांना ते लपलेल्या देशात, त्यांच्या ठिकाणी घुसून ठार मारले.
असेच ठेचले पाहिजे !
21 Aug 2012 - 9:00 pm | गोंधळी
:(
21 Aug 2012 - 9:15 pm | सस्नेह
फोटो अद्वितिय आहेत. त्यामुळे घटनांचा थरार ठळकपणे जाणवतो.
दहशतवादाचा वाढता प्रभाव सुन्न करून सोडतो आहे. ज्वलंत समस्येवरचे थरारक लेखन.
21 Aug 2012 - 10:26 pm | सुनील
उत्तम लेख मालिका,
विमानतळावर घडलेल्या घटनांदरम्यान जर्मन पोलीसांनी केलेल्या चुका पाहिल्या तर या हत्याकांडाला जर्मनीचा पाठिंबा होता की काय असा प्रश्न पडतो...
एकंदरीत ढिसाळपणा पाहून तुम्ही बांधलेला कयास आहे की, खरोखरच आंतरराष्ट्रीय स्तरावर असा आरोप झाला होता? हे मी कुतुहल म्हणून विचारत आहे. कारण हिटलर पर्व संपून जेमतेम २५ वर्षे झाली होती. हिटलरच्या प्रभावाखाली असलेल्या जर्मनांची पिढी अद्याप जिवंत होती.
22 Aug 2012 - 2:31 am | मोदक
>>>एकंदरीत ढिसाळपणा पाहून तुम्ही बांधलेला कयास आहे की, खरोखरच आंतरराष्ट्रीय स्तरावर असा आरोप झाला होता?
हा माझा कयास आहे.
सर्वसाधारणपणे पोलीसदल इतके अकार्यक्षम कधीच नसते की अशा बालीश चुका घडाव्यात.
१) म्यूनीक ऑलंपीक व्हिलेज हे अत्यंत गुंतागुंतीचे ठिकाण होते त्यातून नेमके इस्रायली खेळाडूंचे अपार्ट्मेंट शोधणे खरोखरी कौशल्याचे काम म्हणता येईल पण अपहरणकर्त्यांनी ते लिलया पार पाडले.
१९७२ चे म्यूनीक ऑलंपीक व्हिलेज.
२) बघ्यांची गर्दी आणि मिडीया ला का हटवले गेले नाही..?
३) पहिले रेस्क्यू ऑपरेशन फेल गेल्यानंतर दुसर्या ऑपरेशन च्या वेळी इतका हलगर्जीपणा का झाला?
४) कोणताही रिपोर्ट नाही असे अँकी स्पिट्झर ला सांगीतले असताना अचानक तिच्याकडे कागदपत्रे येवू लागली तीही ३८०० फाईल्स इतकी... (अँकी परदेशी नागरीक असताना असे सरकारी अहवाल तीला देणे कदाचित शक्य नसेल तर इस्रायली दुतावासामार्फत / राजदूतांमार्फत काहीतरी तोडगा निघाला असता)
५) इस्रायलने स्वत:ची कमांडो टीम पाठवायची तयारी दर्शवली असताना त्या विनंतीकडे दुर्लक्ष करून जर्मनीने आपल्याकडच्या अकार्यक्षम पोलीसांचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा?
६) पोलीसांचे स्कील हा एक महत्वाचा मुद्दा. मी स्वत: NCC मध्ये असताना ३०३ चुकीच्या पध्दतीने पकडल्या बद्दल (तेही विश्रांती दरम्यान, फायरींग अॅक्टीविटी सुरू असताना नाही.) घेतलेली पनीशमेंट कधीच विसरू शकणार नाही. हे तर प्रशिक्षीत पोलीस होते..
७) लुफ्तान्सा चे अपहरण आणि त्या ओलीसांच्या सोडवणुकीसाठी केलेली अपहरणकर्त्यांची सुटका...
८) विमानतळावरील रेस्क्यू दरम्यान व्यवस्थीत.. न चुकता घडलेली एकही गोष्ट समोर येत नाहीये. अपहरणकर्त्यांचा आकडा चुकला... विमानातले पोलीस स्वतःचा जीव वाचवून पळून गेले. हेलीकॉप्टर्स चुकीच्या पद्धतीने उतरली. चिलखती गाड्यांना कोणी कसे विसरू शकते..?
९) स्नायपर्स चा आनंदी आनंद होता. खालच्या चित्रासारखे पाच स्नायपर असते तर किती मिनीटात दहशतवाद्यांचा फडशा पाडला गेला असता? (हे चित्र जरी १९७२ चे नसले तरी गिली सूट आणि स्नायपर गन या गोष्टी पहिल्या / दुसर्या महायुध्दापासून आहेतच)
स्नायपर्स बरोबर स्पॉटर असला पाहिजे. इथे रेडीयो मिळायची मारामार. स्पॉटर ही कन्सेप्ट दूरच राहिली.
असे बरेच बरेच मुद्दे आहेत.
(वरची सगळी मते माझी स्वत:ची आहेत.)
21 Aug 2012 - 10:30 pm | सानिकास्वप्निल
लेखमाला चांगली झाली,पण हे सगळे वाचवत नाही रे :(
खरचं दुर्दैवी , वाचून मन बिथरले, अगदी खिन्न झाले
तुझे लिखाण अप्रतिम आहे अजून लेख येऊ दे.
शुभेच्छा
21 Aug 2012 - 11:31 pm | Dhananjay Borgaonkar
मित्रा, लेखमाला एवढी प्रभावी झाली आहे की मी परत एकदा म्युनिक पाहिला.
ही घटना ७२ साली घडली. घटना घडवुन आणणारा अतिरेकी ७९ साली मारला गेला.
यावरुनच इस्राईलची चिकाटी, देशाभिमान दिसुन येतो.
22 Aug 2012 - 12:34 am | श्रीरंग
जबरदस्त लिहिलं आहेस, साहेबा! wrath of god वरील लेख लवकर येऊदे
22 Aug 2012 - 1:00 am | मन१
अवघड आहे. खरोखरच पाश्चात्त्य जगातही असा ढिसाळपणा होताना पाहून आश्चर्य वाटतें. (९/११ च्या हल्ल्यातही काही अनाकलनीय कच्चे दुवे राहून गेले खुद्द सुरक्षा यंत्रणेकडून म्हणतात. जर्मनी, अमेरिका असे प्रगत म्हण्वले जाणारे देशही असे ब्रम्हघोळ घालतात हे पटणे कठीण आहे.)
सुनील रावांशी सहमत. तेच टंकनार होतो. कुथलाही प्रबहव एकाएकी नाहिसा होत नाही. बाहेरच्यांनी दबाव टाकला म्हणून तर नाहीच नाही. नवनाझी(neo nazis) विचारधारा आजही छुप्या रुपात जिवंत असल्याचं बोललं जातंच.
हे उद्योग बघून जर्मनीचा थेट पाठिंबा नसला तरी मूक सहमती होती का काय असे वाटून जाउ शकते.(खरं तर मी इतक्या कमी दिटेल्सवर बोलणच चूक आहे. पण..... गेलं तोंडातून निघून,.)
22 Aug 2012 - 10:26 am | मोदक
>>>९/११ च्या हल्ल्यातही काही अनाकलनीय कच्चे दुवे राहून गेले खुद्द सुरक्षा यंत्रणेकडून म्हणतात
अधिक महिती वाचायला आवडेल.
22 Aug 2012 - 6:06 pm | विटेकर
फार सुंदर लेखन केले आहे आपण !
लेखन आवडले . प्रभावी वर्णनामुळे प्रत्यक्ष दर्शी असल्यासारखे वाटले.
विदा आणि चित्रे गोळे करुन आपण लेख अप्रतिम केला आहे...
बाकी घडलेल्या घटनेवर काय बोलू..?
इस्त्रायल ची जिद्द पाहिली की अम्हाला आमची लाज वाटू लागते...!
- सुहास
23 Aug 2012 - 6:35 pm | मिहिर
लेखन खूप आवडले. आणखी लेखमालांच्या प्रतीक्षेत.
23 Aug 2012 - 11:16 pm | एस
स्टिवन स्पिएलबेर्ग चा म्युनिक चित्रपट अप्रतिम आहेच, पण तो बेतला आहे Vengeance: The True Story of an Israeli Counter-Terrorist Team या George Jonas ह्या कॅनडाच्या पत्रकाराच्या पुस्तकावर. आणि हे पुस्तक आधारित होते स्वतःला मोसाद एजंट म्हणवून घेणार्या Uval Aviv याच्या कथेवर..
ह्या चित्रपटावर अनेक आक्षेप घेतले गेले, त्यापैकी काही असे -
१. मोसादच्या एजंट्सना पश्चाताप झाल्याचा किंवा ते ऑपरेशन व्रॅथ् ऑफ् गॉड च्या उद्देशाशी किंवा परिणामकतेशी सहमत नसल्याचा कुठलाही ठोस पुरावा आढळत नाही.
२. महमूद हामशिरी पॅरिसमध्ये एका बॉंम्बस्फोटात मारला गेला. चित्रपटात बॉम्ब हा दूरध्वनीसंचात लपवल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात बॉम्ब टेबलाखाली लपवला होता.
३. ब्लॅक सप्टेंबरचे दहशतवादी शोधण्यासाठी मोसादने वापरलेले तंत्र हे चित्रपटात दाखवल्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी गुंतागुंतीचे होते. फक्त एका खबर्याकडून एवढी माहिती मिळवणे तद्दन फिल्मी आहे.
४. संपूर्ण ऑपरेशन व्रॅथ् ऑफ् गॉड केवळ एका लहान टीमने तडीस नेले हे खरे नाही. चित्रपटात दाखवल्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या टीम्सकडून ही कामगिरी करवून घेतली गेली.
५. हे ऑपरेशन मोसादच्या एजंट्सकडून याच्या यशस्वितेबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्याने थांबवण्यात आले नव्हते, तर त्याला कारणीभूत ठरले Lillehammer affair. मोसादच्या एजंट्सनी जुलै २१, १९७३ रोजी Ahmed Bouchiki या मोरोक्कन वेटरला नॉर्वेतील लिलेहामेर शहरात Ali Hassan Salameh समजून मारले. पण यात बरीचशी मोसाद टीम पकडली गेली व त्यांना शिक्षाही झाली. स्पिएलबेर्गच्या चित्रपटात लिलेहामेर शहराचे नाव फक्त येते तेही टायटल्स मधील एका मोंताज् मध्ये.
६. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुठल्याही फ्रेंच गँगस्टर वगैरेने मोसादला ऑपरेशन व्रॅथ् ऑफ् गॉड साठी मदत केली नव्हती.
७. ऑपरेशन व्रॅथ् ऑफ् गॉड हे फक्त म्युनिक रक्तपाताशी संबंधित नव्हते, तसेच ते केवळ ब्लॅक सप्टेंबर च्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठीही नव्हते.
८. ऑपरेशन व्रॅथ् ऑफ् गॉड च्या मागे मोसादमधीलच एक अतिशय छुपा विभाग किडोन होता. याच किडोन कडे हत्त्या व अपहरणांची जबाबदारी असते.
मोदकजी, तुमची ही लेखमाला अप्रतिम होतीच. Operation Wrath of God ची वाट पहात आहे.
24 Aug 2012 - 2:14 am | मोदक
धन्यवाद.
Operation Wrath of God बद्दल बरेच प्रवाद आहेत..
ते एक छुपे ऑपरेशन होते. त्या दरम्यान पसरलेल्या आणि पसरवलेल्या अफवांमुळे नक्की काय घडले ते बहुदा जगासमोर कधीच येणार नाही.
6 Sep 2012 - 2:02 pm | मधुरा ashay
लिखाण तर अप्रतिम झालेच आहे. पण कथानकाचा वेग आणि वाचकाचा उत्साह कायम राखण्यात पुरेपूर यशस्वी झाला आहेस. वेगवान घटना तितक्याच वेगात सादर करून "खिळून राहणे " याचा आणि लेखमालेच्या शेवटी "सुन्न होणे " याचा अनुभव दिलास.
6 Sep 2012 - 2:03 pm | मधुरा ashay
लिखाण तर अप्रतिम झालेच आहे. पण कथानकाचा वेग आणि वाचकाचा उत्साह कायम राखण्यात पुरेपूर यशस्वी झाला आहेस. वेगवान घटना तितक्याच वेगात सादर करून "खिळून राहणे " याचा आणि लेखमालेच्या शेवटी "सुन्न होणे " याचा अनुभव दिलास.
6 Sep 2012 - 6:02 pm | चौकटराजा
या लेखमालेने काही आठवले ते असे- मी १९७२ मधे १९ वर्षाचा युवक होतो. व " ब्लॅक सप्टेंबर" ही दहशतवादी संघटना आहे हे सकाळ मधे वाचल्याचे आठवते. पण दहशतवादाचे खरे भय कळले ते WTC मुळे .पण ब्लॅक सप्टेंबर ला कधी विसरता आले नाही. त्यावेळी माध्यमे भारतात तरी तांत्रिक बाबतीत
मागासलेलीच होती. त्यामुळे एक काहीतरी वाईट घटना तिथे घडली इतकेच आठवत आहे.
लेखमाला माहितीपूर्ण तर आहेच , लेखनशैलीही वाखाणण्याजोगी. सर्वात धक्कादायक म्हणजे तिसर्या भागात आलेले निष्कर्ष.
11 Sep 2012 - 12:59 am | निनाद मुक्काम प...
सुंदररीत्या विषय हाताळल्या गेला आहे. त्यावर अधिक भाष्य करत नाही.
म्युनशन मध्ये आमचे वास्तव्य असल्याने ह्या विषयावर बोलणे होते.
त्यांना जर्मनी कडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मान्य नाही.
मुळात त्याकाळात ह्या दोन राष्ट्रांच्या भांडणात जर्मनी ला युद्ध भूमी बनवले जाईल ह्यांची जर्मनी आणी दोस्त राष्ट्रांना अजिबात कल्पना नव्हती.
शीत युद्धाच्या काळात युरोपात जर्मनी चे विघटन होऊन रशिया व अमेरिकेसाठी जर्मनी
मोक्याची व युद्ध भूमी बनले होते.
जगभरातील हेर संस्था जर्मनीत हो त्या. पण झाली घटना एवढी अकस्मात झाली तेव्हा जर्मनी ज्यू खेळाडूंच्या विषयी काय भूमिका घेते ह्यावर जगाचे लक्ष असल्याने त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होते.
हे झाले जर्मन लोकांचे मत
मोदक च्या मुद्द्यांवर विचार केला असता असा निष्कर्ष निघतो की जरी जर्मनी कडून हलगर्जीपणा झाला असला तरी वेस्ट राष्ट्रांचा वेस्ट जर्मनी प्रमुख सहकारी असल्याने
त्यांच्यावर टीका झाली नसावी.
ए क्यू खान ने जर्मनी मधून अणू तंत्रांद्यान चोरले मात्र जर्मन कंपन्यांच्या वर बालंट
आले नाही.