*******************************************************************************
(Operation Wrath of God हे संपूर्णपणे छूपे ऑपरेशन होते. २० पेक्षा जास्ती वर्षे सुरू असणार्या या ऑपरेशनमध्ये कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. खालील लेखामध्ये आंतरजालावरील वेगवेगळ्या लेखांचा संदर्भ घेतला आहे, या लेखात टिपलेल्या घटनांसंदर्भात आणखी नवीन माहिती असल्यास प्रतिसादामध्ये अवश्य उल्लेख करावा - पुढचे भाग लिहीताना त्या संदर्भांची मदत होईल.)
*******************************************************************************
पूर्वसूत्र
११ इस्रायली खेळाडूंच्या दुर्दैवी मृत्यूबरोबर १९७२ च्या म्यूनीक ऑलंपीकमध्ये सुरू असलेला भीषण घटनाक्रम संपुष्टात आला. संपूर्ण इस्राईल दु:खात बुडाला. या घटनेमुळे ऑलंपीक चळवळीवर एक कधीही न विसरता येणारा काळा अध्याय कोरला गेला. भल्या पहाटे ऑलंपीक व्हिलेजमध्ये सुरू झालेले नाट्य ज्या पद्धतीने विमानतळावर संपले, सर्वच्या सर्व खेळाडूंना ज्या भयानक रीतीने मरण आले, तो बहुदा इस्राईलला बसलेला सर्वात मोठा धक्का असावा.
ऑलंपीक खेळ पुढे सुरूच राहिले. इस्रायली टीम खेळ अर्धवट सोडून लगेचच मायदेशी परतली. नक्की काय घडले ते संपूर्ण जगाने "लाईव्ह" बघितलेच होते. परतलेल्या खेळाडूंनीही बरीच माहिती पुरवली. दुसऱ्या महायुद्धाचे व्रण बरे होत असतानाच घडलेल्या या घटनेमुळे 'या हत्याकांडाच्या सूत्रधारांना शासन मिळाले पाहिजे' ही मागणी इस्राईलमध्ये मूकपणे जोर धरू लागली.
१४ मे १९४८ साली निर्माण झालेला इस्राईल अस्तित्वात आल्यापासून सदैव अस्तित्वासाठीच लढतो आहे - निसर्गाशी, परिस्थितीशी आणि चहुबाजूने वेढलेल्या शत्रुराष्ट्रांशी. शेजारी देशांसोबत झालेली युद्धे, मिळवलेले विजय आणि त्यासाठी द्यावी लागलेली किंमत यांतून इस्राईलला कधीच उसंत मिळाली नाही. या संघर्षांना एक संधी मानून शस्त्रास्त्रांच्या मार्गाने आपली पाळेमुळे घट्ट करणारे इस्रायली सैनिक आणि त्यांच्यावर देशाच्या रक्षणाची मदार सोपवणारी "इस्रायली विचारधारा" जशी अस्तित्वात होती तसेच अबी नाथन सारखे शांततामय मार्गाचा आग्रह धरणारेही काही विचारवंत होते, या सर्व परिस्थितीवर शांततेने तोडगा निघू शकेल यावर त्यांचा विश्वास होता. तेही आपले विचार पुढे मांडत होते. युद्धामार्गाने मिळाणार्या न्यायाचं रक्तरंजित मोल त्यांना अस्वस्थ करत होतं. लढायांतून व रक्तपातातून काय साध्य होणार हा त्यांचा प्रश्न रास्त होता.
११ खेळाडूंच्या हत्येला इस्राईल सहजासहजी विसरणार नाही, याचा बदला नक्की घेतला जाईल याची खात्री सामान्य इस्रायली नागरिकाला होतीच. पण कधी..???
इस्रायल सरकारने लगेचच उत्तर दिले, हत्याकांडाच्या तिसर्याच दिवशी.
८ सप्टेंबर १९७२-
७५ इस्रायली विमानांनी सिरीया आणि लेबेनॉन मधल्या १० पीएलओ (पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन) छावण्यांवर हल्ला चढवला. हवाई हल्ल्यात २०० पीएलओ सैनिक ठार झाले व शेकडो जखमी झाले. लेबेनॉनच्या सीमेपार इस्रायली सैनिकांच्या तुकड्या उतरवून पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर हल्ले चढवले. या धामधुमीत इस्रायली लढाऊ विमानांनी लेबेनॉनची तीन विमाने पाडली, या हल्ल्यामध्ये इस्रायलनेही दोन विमाने गमावली.
इस्राईलचं दुसरं पाऊल होतं 'कमिटी एक्स'. म्युनीकच्या घटनेला इस्राईलचं प्रत्युत्तर कशा स्वरूपाचं असावं हे ठरवण्यासाठी पंतप्रधान गोल्डा मेअर यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली ही कमिटी स्थापन केली. या कमिटीवर संरक्षण मंत्री मोशे दायान, जनरल एहरॉन युरीव्ह आणि मोसाद डिरेक्टर झुवी झमीर होते.
पंतप्रधान गोल्डा मेअर.
इस्रायलची पोलादी स्त्री, एक कणखर नेतृत्व आणि जगभर पसरलेल्या ज्यूंची तितक्याच ममत्वाने काळजी घेणारी प्रेमळ आजीबाई.
या कमिटीने एकच नि:संदिग्ध निष्कर्ष काढला.
"म्यूनीकच्या मारेकर्यांना शासन करायचे असेल आणि भविष्यातल्या दहशतवादी हल्ल्यांना रोखायचे असेल तर दहशतवाद्यांच्या सल्लागारांना, ऑपरेशन प्लॅनर्सना आणि ज्यांचा हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग होता त्या सर्वांना ठार मारणे."
वेगवेगळ्या देशात विखुरलेल्या आणि वेगवेगळ्या नावाने वावरणार्या २० ते ३५ पीएलओ अधिकारी व ब्लॅक सप्टेंबर या दहशतवादी संघटनेच्या उच्चपदस्थांची यादी मोसादने या कमिटीकडे सोपवली. पीएलओ व ब्लॅक सप्टेंबरच्या अधिकार्यांची संख्या आणि ऑपरेशनचा आवाका लक्षात येताच गोल्डा मेअर थोड्या सबुरीने पावले उचलू लागल्या. इस्रायली जनता आणि सैन्यदलातील अधिकार्यांच्या दबावामुळे त्यांनी ऑपरेशनला होकार दिला पण थोड्या नाखुशीनेच. इस्रायली विचारवंत आणि लष्करी विचारधारा दोन टोकाच्या मार्गांमधून एखादा मार्ग निघतो आहे का याचीही शक्यता पडताळून पाहिली जात होती.
शेवटी लष्करी विचारधारेनेच उचल खाल्ली.
इस्रायलचीच पण इस्रायल बाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना (overseas intelligence) "मोसाद"
देशांतर्गत गुप्तहेर संघटना "शिन बेट"
लष्करी गुप्तहेर संघटना "अमन"
लष्कराचे एक स्पेशल फोर्स युनिट "सायरेत मत्कल" (Sayeret Matkal)
इस्रायली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स
इस्रायली राजकारणी
हे सर्वजण प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. (पुढे इस्रायली सरकारने या ऑपरेशनची जबाबदारी वारंवार नाकारली असली तरी सरकारनेच हेच ऑपरेशन पार पाडले याचेही अनेक पुरावे उजेडात आले)
गोल्डा मेअर यांनी साशंक मनाने ऑपरेशनला परवानगी दिली.
या ऑपरेशनचे उद्दीष्ट फक्त 'बदला' हे नव्हते तर दहशतवाद्यांच्या मनात भीती उत्पन्न करणे, त्यांच्यावर मृत्यूची दहशत बसवणे हे होते. दहशतवाद्यांना पकडणे, अटक, खटला वगैरे मार्ग न वापरता फक्त ठार मारणे हेच या ऑपरेशनचे ध्येय ठरले. त्यातही गोळ्या घालण्यासारख्या सोप्या पद्धतीऐवजी हत्या करताना मोसाद एजंट्सनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून भयानक व वेदनादायी मरण देण्याचेही निश्चित केले. या सर्व हत्या करताना प्रत्येक हत्येला शक्य तितकी प्रसिद्धी देऊन जगभर पसरलेल्या पॅलेस्टीनियन दहशतवाद्यांना 'योग्य संदेश' मिळेल व यापुढे कोणत्याही इस्रायली नागरिकावर हल्ला करण्याचे एकाही शत्रूला धाडस होणार नाही याचीही मोसादने आखणी केली.
इस्रायली नागरिकांवर झालेल्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर मिळते हा अध्याय लिहायला मोसाद, शिन बेट आणि ऑपरेशन पार पाडणारे 'नागरिक' सज्ज झाले.
मात्र हे हल्ले करताना एकही निष्पाप बळी जाऊ नये याचीही खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना ऑपरेशन पार पाडणार्या टीम्सना दिल्या गेल्या.
'जगाच्या पाठीवर कुठेही आपण सुरक्षित नाही, मृत्यू कोणत्याही क्षणी आपल्यावर झडप घालू शकतो' या जळजळीत वास्तवाची जाणीव दहशतवाद्यांना करून देण्याच्या उद्देशाने सर्व हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी इस्रायली सरकारला सर्व हालचालींमधून नामानिराळे ठेवून मिळेल त्या मार्गाने व मिळेल ती किंमत मोजून मोसाद एजंट्स माहिती मिळवू लागले.
दहशतवाद्यांवर मानसिक दबाव आणण्यासाठी मोसादने आणखी काही चाली खेळल्या.
'आपल्यावर कोणीतरी सतत पाळत ठेवून आहे' हा संदेश पोचवण्यासाठी या सर्व 'टार्गेट्स' च्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टींची / दैनंदिन घटनांची यादी त्यांनाच पाठवणे; पीएलओ अधिकारी जिवंत असतानाच बड्या बड्या वर्तमानपत्रात त्यांच्या श्रद्धांजलीचे व निधनाचे लेख छापून आणणे असे उद्योग सुरू झाले.
पाच ते सात वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी टारगेट्स गाठून त्यांना ठार करतील. एका टीममध्ये दोन मारेकरी, या दोन मारेकर्यांना संरक्षण देणारे आणि मदत करणारे त्यांचे दोन बॉडी गार्ड्स, संपूर्ण टीमच्या रहाण्याची अणि वाहनांची सोय करणारे दोन ते तीन एजंट्स, हत्येदरम्यानच्या तिथे हजर राहून आयत्यावेळी उद्भवणार्या अडचणींचा सामना करणारे व हत्येनंतर सुरक्षीत पणे त्या देशातून बाहेर पडण्याची सोय बघणारे अनुभवी सहा ते आठ एजंट्स. शस्त्रास्त्रे स्मगल करून संपूर्ण टीमपर्यंत पोहोचविणारे एजंट्स, दोन कम्यूनीकेशन एक्स्पर्ट्स अशी टीमची रचना केली गेली.
या रचनेमुळे 'टॉप सिक्रेट मिशन' वर इतकी मोठी टीम काम करत असूनही बातम्या फुटण्याचे प्रमाण नगण्य होते.
...आणि एक सूडाचा प्रवास सुरू झाला.
१६ ऑक्टोबर १९७२ -
पहिले लक्ष्य होते Wael Zwaiter (वाईल झ्वेटर).
वाईल झ्वेटर या पीएलओ चा रोम (इटली) मधील काँटॅक्ट होता. जेवण करून रात्री घरी परतताना इमारतीच्या लॉबीमध्ये दोन तरूण पोरसवदा मोसाद एजंट्सनी त्याला गाठले. सहजच नाव विचारून खात्री केली व अपेक्षीत उत्तर मिळताच अत्यंत चपळाईने, अगदी जवळून ११ गोळ्या झाडून ठार मारले.
एक गोळी एका मृत खेळाडूसाठी.
मोसाद च्या मते वाईल हा ब्लॅक सप्टेंबरचा दहशतवादी होता व एल् अल् या इस्रायली एअरलाईनच्या एका विमानावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्नात त्याचा हात होता.
अचानक २९ ऑक्टोबर ला लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या एका बोईंगचे रहस्यमयरीत्या अपहरण झाले. अपहरणकर्त्यांच्या मागणीला तत्काळ मान्यता देत जर्मनीने म्यूनीक घटनेदरम्यान विमानतळावर जिवंत बचावलेल्या तीन दहशतवाद्यांना लगेचच सोडून दिले. या दहशतवाद्यांना मुक्त करताना जर्मनीने इस्राईलला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही.
सुटका झालेल्या दहशतवाद्यांचे लिबीयामध्ये अभूतपूर्व स्वागत झाले, मुलाखती घेतल्या गेल्या, या मुलाखती जगभर दाखवल्या गेल्या. हत्याकांडाबद्दल बोलताना या दहशतवाद्यांच्या चेहर्यावर अभिमान झळकत होता.
सुरूवातीला या ऑपरेशनला साशंक मनाने परवानगी देणार्या गोल्डा मेअरनी आता मोसाद ला आक्रमकपणे हालचाली करण्याची पूर्ण मुभा दिली. मोसादने ऑपरेशनचा वेग आणि तीव्रता आणखी वाढवली.
Operation Wrath of God ला खर्या अर्थाने सुरूवात झाली...
(क्रमशः)
प्रतिक्रिया
19 Oct 2012 - 3:30 pm | वसईचे किल्लेदार
कधि नव्हे तो लेखा-शेवटि (क्रमशः) पाहुन बरं वाटलं.
19 Oct 2012 - 3:45 pm | Dhananjay Borgaonkar
खतरनाक!!!!
परत लेखमाला चालु केल्या बद्दल धन्यवाद. फारच इन्ट्रेस्टिंग विषय आहे.
19 Oct 2012 - 3:49 pm | अक्षया
छान !!
उत्कंठा वाढली आहे पुढील भाग वाचण्याची.
19 Oct 2012 - 4:02 pm | चौकटराजा
मिपावर सुद्धा दपा खांबेटे, विग कानिटकर , विस वाळींबे आहेत याचा अनुभव म्हणजे हा लेख. अॅन्टीक्लायमॅक्स ठेऊन
" मोदका" ने गोल्डा मायरलही मागे टाकलेय ! तरूण असताना गोल्डा मायर व मोशे दायान ही नांवे सतत वाचलेली.
ओडेसा फाईल हा चित्रपटही डोळयासमोरून सरकून गेला.
मोसाद ही एकच गुपप्तहेर संघटना इझरेल कडे होती ही आमची माहिती अपुरी ठरली याबद्द्ल धन्यवाद
पु ले शु पु ले प्र ,
19 Oct 2012 - 5:02 pm | झकासराव
अरे वाह!!!
:)
19 Oct 2012 - 5:38 pm | llपुण्याचे पेशवेll
झक्कस.
19 Oct 2012 - 5:45 pm | किसन शिंदे
गुड!
थरारक मांडणी केलीये. पुभाप्र.
19 Oct 2012 - 5:59 pm | मदनबाण
वाचतोय...
पुढच्या भागाची उत्कंठेने वाट पाहतो आहे.
19 Oct 2012 - 6:07 pm | प्रचेतस
मस्त.
पुढचा भाग लवकर येऊ देत.
19 Oct 2012 - 9:31 pm | श्रीरंग
"या ऑपरेशनचे उद्दीष्ट फक्त 'बदला' हे नव्हते तर दहशतवाद्यांच्या मनात भीती उत्पन्न करणे, त्यांच्यावर मृत्यूची दहशत बसवणे हे होते. दहशतवाद्यांना पकडणे, अटक, खटला वगैरे मार्ग न वापरता फक्त ठार मारणे हेच या ऑपरेशनचे ध्येय ठरले. त्यातही गोळ्या घालण्यासारख्या सोप्या पद्धतीऐवजी हत्या करताना मोसाद एजंट्सनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून भयानक व वेदनादायी मरण देण्याचेही निश्चित केले"
क्लास!
19 Oct 2012 - 9:41 pm | जाई.
वाचत आहे
19 Oct 2012 - 11:07 pm | पैसा
मस्त लिहिलंस! थरारक घटनांची मालिका वाचण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे!लवकर लिही!
19 Oct 2012 - 11:17 pm | लॉरी टांगटूंगकर
डार्क नाईटच्या इंटरवल मध्ये वाटले होते की इथेच संपला सिनेमा ,काहीसा तसेच झाल.. मागच्या लेखानंतर वाटलेला इथेच संपले पण इथे खरी सुरुवात होते आहे असे वाटतंय !!!!!
खत्रेश लिहिलयस!!
21 Oct 2012 - 12:30 am | श्रीरंग_जोशी
भन्नाट सुरू आहे लेखमालिका.
पु.भा.प्र.
21 Oct 2012 - 12:44 am | बॅटमॅन
आक्रमण!!!!!!!
24 Oct 2012 - 2:39 pm | sagarpdy
+१
मोदका मस्तच!
पु.भा.प्र.
21 Oct 2012 - 9:20 am | ५० फक्त
मस्त रे, सुडाचा आदर्श प्रवासाचं वर्णन वाचायला आवडेल.
21 Oct 2012 - 10:20 pm | एस
एखादी थरारक गोष्ट सांगावी तशी ही लेखमाला वळणे घेते आहे.वाचकांना जागेवरच खिळवून ठेवणे हे तुमच्या भाषाशैलीचं वैशिष्ट्य इथेही तितक्याच सामर्थ्यानं उतरलंय यात शंकाच नाही.
मोदकजी, पुढील भागांबद्दल काही सूचनावजा विनंती करतो -
पुढचे भाग थोडे विस्ताराने लिहा.
शक्यतो विश्लेषणही देऊ शकाल का, नुसतीच गोष्ट नको.
योग्य तेथे संदर्भ व अजून माहितीसाठी दुवे दिल्यास जिज्ञासू वाचकांची सोय होईल.
समर्थनीय व असमर्थनीय अशा दोन्ही बाबी दोन्ही बाजूंकडे होत्या, ह्या दृष्टिकोनातूनही या सर्व घटनेकडे जरूर पहा.
ऑपरेशन व्रॅथ ऑफ् गॉडबद्दल वाचताना कित्येक वाचकांना इस्राएल व भारत यांच्या गुप्तहेर संघटनांची तुलना करायचा मोह आवरणार नाही. इथे जास्त न बोलता फक्त एकच सांगतो. आपल्या गुप्तहेर संघटनांबद्दल सर्व जगातील गुप्तहेर जगतात तितकाच आदर आहे जितका मोस्साद, सीआयए किंवा केजीबीबद्दल आहे. याबाबतही कधी सवडीने लिहू शकलात तर जरूर लिहा.
'Munich' ह्या स्टीवन स्पीएलबेर्गच्या चित्रपटातून ह्या ऑपरेशनवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी तो चित्रपट 'Vengeance: The True Story of an Israeli Counter-Terrorist Team' ह्या जॉर्ज योनासच्या पुस्तकावर आधारित आहे व त्याच्या सत्यासत्यतेबद्दल काही मतभेद आहेत. ते मी आधीही नमूद केले होतेच. त्यापेक्षा 'One Day in September' ह्या सायमन रीव यांच्या पुस्तकाचा आधार घ्या असे सुचवू इच्छितो. मराठीत याबद्दलच्या पुस्तकांची मात्र मला वानवा जाणवली. अभ्यासूंना जर एखादे या विषयावरील मराठी पुस्तक माहित असेल तर मला जरूर सांगा.
जाताजाता अजून एक मुद्दा ओझरता... जर्मनीची शंकास्पद भूमिका या प्रकरणी कधीच उघड पडली नाही. आपल्याला वाटल्यास याचा समावेश एखाद्या पूर्ण विश्लेषणात्मक भागात करता येईल.
25 Oct 2012 - 2:31 pm | कपिलमुनी
आपण कधीही अझर मेह्मूद इत्यादी प्रभुतींना तिकडे जाउन मारल्याचे ऐकीवात नाही..
28 Oct 2012 - 12:01 am | एस
गुप्तहेर संघटना नक्की कशासाठी असतात? :)
असो. भारतीय गुप्तचर संघटनांचे कार्य नक्की कसे चालते याबाबत अगदी वर उल्लेखलेल्या परकीय संघटनांनाही तितकीशी ठोस माहिती नाहीये यातच सगळं आलं. येथे जर आपण भारतीय हेरसंघटनांना कमी लेखत असाल तर चांगलेच आहे. हेरगिरीच्या क्षेत्रात तेच तर हवं असतं. अमेरिकेने जेव्हा ओसामा बिन् लादेनला पाकिस्तानात घुसून मारले होते तेव्हा साहजिकच आपल्या अशा संघटनांमध्ये अशी क्षमता आहे का असा प्रश्न वारंवार विचारला गेला होता. तेव्हाच्या लष्करप्रमुखांना फक्त एवढेच म्हटले होते की "हो, आहे." जगातल्या इतर सर्व कुप्रसिद्ध हेरसंघटना जी जी कामगिरी करू शकतात ती सर्व कामगिरी पार पाडण्याची भारतीय संघटनांचीही तेवढीच क्षमता आहे.
वास्तविक पाहता अशी हेरगिरीच्या भाषेत म्हटली जाणारी Spec-Ops त्या पूर्वीपासूनच पार पाडत आल्या आहेत. उदा. भारताचे इस्राएलशी राजनैतिक संबंध नसताना तेव्हाचे इस्राएलचे पंतप्रधान आणि मोरारजी देसाई यांची नवी दिल्लीत झालेली गुप्त भेट, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन मेघदूत, एलटीटीईचा पूर्ण उदयास्त, भिंद्रनवाल्यांची निर्मिती व नंतर त्यांचा निःपात, सिक्कीम विलीनीकरण, म्यानमार, भूतान व बांगलादेशातील उल्फाचे तळ उध्वस्त करणे, अफगाणिस्तानातील दोस्त मेहमूद व नॉर्दर्न अलायन्सला मदत, पाकिस्तानातील वेळोवेळी केलेले हस्तक्षेप - मग ते मुहाजिर कौमी मूव्हमेंट असो किंवा मुशर्रफांचे जिवंत पलायन, आणि इतर असंख्य बाबी. भारतीय गुप्तहेर संघटना थेट पंतप्रधानांच्या अधिकाराखाली कार्य करत असल्याने व भारतात De-Classification वगैरे बाबी नसल्याने त्यांचे अमर्याद अधिकार व जाणीवपूर्वक निर्माण केलेले जगभरातील जाळे कित्येक सामान्य लोक, विशेषतः भारतीय कमी लेखतात. पण त्यांनी ते तसेच समजावे हेच भारतीय परराष्ट्रधोरणाचे तत्त्व आहे आणि आपल्या अशा काही गुप्तहेर संघटना आहेत किंवा त्या हेरगिरी व संबंधित बाबी करतात हे भारताने कधीच मान्य केलेले नाही व करणारही नाही.
जाताजाता तुमचा मूळ प्रश्न - आपण अशा प्रकारच्या हत्त्या घडविलेल्या आहेत, पण कधीही थेट सहभागाने नाही. नुसत्याच हत्त्याच नव्हेत तर आपण कित्येक snatch operations यशस्वीरित्या पार पाडली आहेत. कसे, कधी, कुठे हा सगळा भाग इतका गुंतागुंतीचा आहे की ते कधीच उघड होऊ दिले जाईल असे वाटत नाही.
आणि हो, RAW हे RAW चे खरे नाव तरी आहे का याबाबत मला खरंच शंका आहे... :)
28 Oct 2012 - 12:04 am | एस
अधिकृत उत्तर:
- नाही. भारताची कुठलीही गुप्तहेर संघटना नाही व भारत हेरगिरी करत नाही.
22 Oct 2012 - 3:01 pm | आदिजोशी
मेजवानी सुरू झाली आहे. ताट सावरून बसलो आहोत. येऊ द्या पटापट.
9 Nov 2012 - 3:21 pm | टिवटिव
आता हात वाळायला लागले..येऊ द्या पटापट.
23 Oct 2012 - 5:11 pm | प्यारे१
थ रा र क....!
स्पिलबर्गचा म्युनिक बघतोय असंच!
25 Oct 2012 - 7:38 am | इनिगोय
मोदकजी, पुढचा भाग कधी??
25 Oct 2012 - 2:08 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे ... पुड्।ए वाचण्यास उत्सुक
8 Nov 2012 - 9:17 pm | दिव्यश्री
छान लिहिले आहे.मी सद्धा म्युनिक मध्ये आहे. ओल्मपिया टोवर पाहिला आहे.पणहा इतिहास माहिती नव्हता तेव्हा.:(