आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत. ती विनोदी, दु:खद, सुन्न करणारी, कुणाचातरी मूर्खपणा जाहिर करणारी कसलीही असू द्या, पण ती 'समथिंग रिअल फ्रॉम रिअॅलीटी' असावीत.
सुरुवात मी करतो.
-----------------------------------
आमची कॉलनी तशी रिटायर्ड लोकांची कॉलनी म्हणता येईल. पँटला पट्टा न लावता इन केलेले, पांढर्या सुती पँटी घालून सत्तरी-बहात्तरीतले आणि अनेक पावसाळ्या उन्हाळ्यातून आलेला घरंदाज जख्खपणा मिरवत सेकंड इनिंगवाले इकडेतिकडे फिरताना नेहमीच दिसतात. त्यामानाने तरुण मुले मुली तुरळक रस्त्यावर दिसतात - दिसले तरी भुर्रर्रकन गायब होण्यापुरतेच. मग पायी चालणारे हेच पैलतोगे काऊ कोकताहे वाल्या वृद्ध आणि वृद्धा!
कॉलनीतल्या कुठल्याही रस्त्यावर जा, शांतता तर एवढी की ही सुखवस्तू घरे उगाच बांधून ठेवली आहेत, तिथे खरंतर कुणीच रहात नाही, लोक घरे सोडून कुठेतरी निघून गेले आहेत असं वाटावं एवढी.
मी ज्या रस्त्याने ऑफिसकडे चालत येतो त्यावरील बंगल्यासमोर कधीकधी एक आजोबा बसलेले दिसतात. त्यांना कॅथेटर लावलेलं आहे. हे आजोबा पण जख्खच! ठेंगणी मूर्ती, गोल गरगरीत डोके आणि जाड गोलगोल वर्तुळे दिसणारा त्यांचा तो लठ्ठ काचेचा जुना चष्मा. बाबा सत्तरी-पंच्याहत्तरीचे सहज असतील, चेहेर्यावर मात्र दोन वर्षाच्या मुलाच्या चेहेर्यावर असतात तसे, जगाबद्दल कायम उत्सुक असल्यासारखे, आजूबाजूच्या हलणार्या जगाबद्दल परम आश्चर्य दाखवणारे भाव! आणि कधी कधी ते कॅथेटरची पिशवी हातात घेऊन बंगल्यासमोरच्या फूटपाथवरुन जवळपास दुडूदुडू धावत, त्याच नेहमीच्या आश्चर्यचकित चेहेर्याने इकडेतिकडे पहात शतपावली करतात ते पाहून तर 'वृद्धत्त्वी नीज शैशवास जाणे' या ओळी त्यांच्यात मूर्तीमंत झाल्यासारखे वाटते. सकाळी आणि सायंकाळी ते आपले आजूबाजूच्या हलत्या, चालत्या जगाचं निरीक्षण करीत, उत्सुक होऊन बसून असतात, हे मी नेहमी पहातो.
लांबून जवळ येणार्या माणसाकडे टक लाऊन पहाणे, आणि जवळ आल्यावरही कुणी त्यांच्या नजरेला नजर दिली की ते आजोबा नक्की काहीतरी बोलणार!
मलाही ते बर्याच वेळा बोलले आहेत - पण स्वत:च्या मनगटावर टिचकी मारुन त्यांचा तो ठरलेला प्रश्न!
''किती वाजलेत??''
किती वाजलेत हे त्यांना सांगताना मला फार आनंद होतो.
प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 4:13 pm | विसुनाना
एका धान्य दुकानात खरेदीसाठी गेलो होतो.
बाहेर आलो तर एक गृहस्थ तरंगत चाललेले होते.
वाटोळा, सुखवस्तु चेहरा - डोक्यावर अर्धचंद्र - बटबटीत डोळे. इस्त्रीचे शर्ट-पँट वगैरे.
जवळजवळ धडकलेच मला.
मला पाहताच त्यांच्या डोळ्यात चमक आली.
म्हणाले,"ओळखलं का?"
मी गोंधळून,"अं.. नाही. कोण?"
"मी एदलाबादकर" (किंवा हुमनाबादकर किंबा औरंगाबादकर किंवा कुणीतरीबादकर)
"असं काय?, हं , तुम्ही त्या अमूक कंपनीत होता काय? बघितल्यासारखं वाटतंय."मी काहीतरी बोलायचं म्हणून - कारण इथे महाराष्ट्राबाहेर आपल्याशी एकदम मराठीत बोलणारा मनुष्य कदाचित आपल्या ओळखीचा असायचा. उगाच अपमान नको.
"नाही हो, मी रिझर्व बँकेत आहे. असिस्टंट मॅनेजर" - ते.
"असं काय? बरं,बरं" मी अजूनही नॉनप्लस्डच!
एकदम ते म्हणाले, "तुम्ही कोण?"
आता मात्र मी बोल्ड. आँ? ओळखलं का असं विचारणारा मलाच तुम्ही कोण म्हणून विचारतोय?
"मी अमूक. इथे तमूक अपार्टमेंटमध्ये राहतो." - मी सांगितलं.
"हं, हं ,म्हणजे ते शहाणे रहातात तिथे" - ते विजयी स्वरात.
"बरोबर, ते आमच्या खालच्या मजल्यावर राहतात."
"माझा मुलगा त्यांच्या मुलाच्या वर्गात होता.आता ऑस्ट्रेलियात असतो. मरीनमध्ये आहे. एक मुलगीही आहे मला. तिचे मिस्टर..." ते सुसाट सुटले. मी हं , हं करत राहिलो.
"मग काय घेतलं? गहू?" माझ्या हातातल्या पिशवीकडे पहात.
"अं, नाही - डाळ घेतली."
"काय महागाई हो. पाचशेची नोट कशी जाते ते समजतही नाही." - ते.
एका अजिबात ओळख नसलेल्या माणसाशी काय बोलावं तेच मला कळत नव्हतं. "हो ना. च्यॅक!"
"बरं मग? काय करता आपण?" मग मी थोडक्यात माझ्या चरितार्थाच्या साधनाची माहिती दिली.
ते असे बरेच काही विचारत गेले, मी काहीसा अस्वस्थ. पण सभ्यपणे उत्तरे देत गेलो.
मग परत एकदा रिझर्व बँक मॅनेजर, मुलगा ऑस्ट्रेलियात मरीनमध्ये, मुलगी - जावई न्यू जर्सीत, नातवंडे असे विषय आले.
"निघतो आता. थोडा उशीर होतोय.",म्हणत मी सटकलो.
"बरंय, भेटू पुन्हा."त्यांनी हात हालवला.
***
सदर गृहस्थ बेंकेतून रिटायर होऊन आठ-दहा वर्षे झालेली असून पत्नीच्या निधनानंतर इथे एकटेच रहातात व हल्ली त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे असे परिचितांकडून कळले. मुला नातवंडांचा तपशील ठीकच आहे. (अगदी टिपिकल).
13 Apr 2012 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते
यकु, अतिशय सुंदर कल्पना. धन्यवाद. इतरही लोकांकडून वाचायला आवडेल.
***
एका अशाच अचानक दिसलेल्या दृश्यावर एक लघुकथा लिहिली होती ती इथे देत आहे. भारताबाहेर असताना एका सिग्नलवर दिसलेले दृश्य होते हे. अगदी एखाद मिनिटात घडलेले. मात्र कायम माझ्याबरोबर राहिलेले.
***
http://www.misalpav.com/node/11015
अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.
तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.
तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.
आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.
तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...
सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...
त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...
13 Apr 2012 - 4:47 pm | पियुशा
यकु छान लेख :)
@ बि.का.
तुमची लघुकथा एकदम वास्तववादी मनाच्या टीचर्या करणारी :(
13 Apr 2012 - 4:40 pm | स्पा
आज सुखाच्या अपेक्षा अक्षरश: गळून पडल्या
एवढी गाढ झोप तर कुठल्याही गुबगुबीत ,मखमली पलंगावरही कोणाला लागणार नाही
हा कामगार किती आरामात झोपलाय, (हा बेवडा नाही ;) रोज बघतो याला स्टेशन वर काम करताना )
बाजूला एवढ पब्लिक आहे, दर मिनटाला गाड्यांचा गोंधळ, स्टेशन वरची कर्कश उद्घोषणा.
बर हे परवडल.. पण झोपायला.........
अक्षरश: धोंडाच आहे हो
हा खरा सुखी :)
नाहीतर लोक आजकाल झोप येत नाही म्हणून लाखो रुपये खर्च करतात.
अंगमेहनत कमी झाल्याचे हे परिणाम
14 Apr 2012 - 7:11 am | ५० फक्त
यकुचा वेगळ्या विषयावरचा धागा , अन मा. श्रीस्पाजी यांचे चित्र देखील उत्तम. धन्यवाद.
16 Apr 2012 - 10:02 am | ऋषिकेश
वा काय नेमका फोटोय. याच्याकडेच बघून केशवकुमारांनी 'खाली आणि वर' लिहिली असावी
उंच पाटी पालशी उशाखाली
हात दोन्हीही आडवे कपाळी
फरसबंदीची शेज गार गार
शांत घोरत पसरला मजूर
:
:
:
13 Apr 2012 - 5:56 pm | सहज
यकु धागा उत्तम
बरेचदा आपल्या ऑफीसच्या वेळेत जाता येता किंवा घराजवळाच्या बाजारात आपण जर एका ठराविक वेळेत जात असु तर त्याच वेळेला ये-जा करणारे काही चेहरे, मग व्यक्ती म्हणून जरी नाही तरी ते चेहरे म्हणून परिचयाचे होतात. यात जरा एखादा भ्रमिष्ट किंवा किंचीत वेडसर वाटेल असाही एक चेहरा असतो. अशी लोक स्व:ताशी काहीतरी जोरात बोलत असतात पण समोरच्याला मधुनच एखादा प्रश्न विचारतात किंवा आपल्याला काहीतरी विचारले आहे असा भास होतो तशी त्यांची देहबोली असते. चार पावले पुढे जाउन गरकन दोन पावले मागे येउन कुठेतरी काहीतरी शोधल्यासारखे करतात. सामान्यता आपण, निदान मी तरी नजरेला नजर भिडू न देता मार्गस्थ होतोच. आजकाल एक १७ वर्षाचा वाटेल असा मोठ्या चेहर्याचा जाडसर तरुण मुलगा दिसतो, हसत असतो, काहीतरी पुटपटत असतो. खांद्यावर एक सॅक असते.
परवा असेच जवळच्या बाजारात (मॉल+ ऑफीस) एका इमारती मधे पाचव्या मजल्यावर काम झाल्यावर लिफ्ट साठी थांबलो होतो. खाली जायला लिफ्ट हवी होती. वर जाणारी लिफ्ट थांबली व दरवाजा उघडताच तो तरुण मुलगा, काहीतरी जोरात बोलला पण एक अक्षर कळले नाही बहुदा गाणे म्हणत असावा. लिफ्ट वर जाणार होती म्हणून मी आत गेलो नाही त्याने दरवाजा बंद केला व लिफ्ट वर गेली.
पुन्हा तीच लिफ्ट आली व त्यात तो होता, एखादा ओळखीच्या व्यक्तीची भेट संपल्यावर व अच्छा बाय म्हणल्यावर पुन्हा, दोन चार मिनटातच परत भेट व्हावी व तेव्हा एक वेगळेच हसु दोघांच्या चेहर्यावर यावे अगदी तसे हास्य त्याच्या चेहर्यावर होते, मी लिफ्ट मधे शिरलो व तोही माझ्याकडे पहातच होता. मी देखील त्याच्याकडे पाहून हसलो. स्टेशनरी चे दुकान नक्की कुठल्या मजल्यावर आहे?, असे त्याने मला विचारले. तिसर्या मजल्यावर असल्याचे मी त्याला म्हणताच, ओह मला वाटले सहाव्या म्हणुन मी वर गेलो असा खुलासा त्याने केला.
तो सरळ उभा नव्हता, त्याचा अवतार, (कपडे, केस) किंचीत इतर मुलांपेक्षा वेगळा होताच पण आमचा संवाद तर एकदम नॉर्मल होता. ठीक आहे, चुकून त्याचा मजल्याचा गोंधळ झाला असेल जो इतर मुलांचा होत नसेल. पण इतर वेळी वेडसर वाटणारा, ज्याची नजर शक्यतो माझ्यासकट सगळेच चुकवत असतील असा तो मुलगा, त्या लिफ्ट्च्या बंदीस्त चौकटीतही अस्वस्थ वाटू नये इतके अंतर त्याने स्व:ताच ठेवले होते. आवाजाने, शरीराने जरा थोराड दिसत असला तरी पण त्याच्या आत मात्र त्याच्या वयापेक्षा चार वर्ष लहान मुलगा असेल असे वाटले.
म्हातारे आजोबा किंवा आजी असे कुठे रस्त्याच्या कडेला, बागेत बेंचवर वगैरे बसले असतात , आपली व त्यांची नजरानजर होते. ते हसले व आपण प्रत्युतरादाखल हसलो की त्यावर त्यांचे हास्य अजुनच फुलते. तेव्हा ते बोळकं किंवा एखाद दुसरा दात असलेले ते तोंड मला तरी फार क्युट वाटते!
13 Apr 2012 - 8:33 pm | स्मिता.
यकु, एक चांगला धागा तुम्ही सुरू केलात. आपल्या रोजच्याच, त्याच त्या पायाखालच्या (गाडीखालच्या, बसखालच्या किंवा ट्रेनखालच्या) रस्त्यावर कधीतरी काहीतरी दिसते जे मनात घर करून राहते. दुर्दैवाने अश्या पैश्याभोवती फिरणार्या आणि स्वार्थी जगात सुखावणार्यांपेक्षा थोडे क्लेश देणारे किंवा मनाला औदासिन्य आणणारेच दृष्य जास्त दिसतात. पण कधीकधी काही दृष्य असेही दिसतात की ज्याने आपलाही मूड एकदम मस्त होतो आणि किमान तो दिवस तरी छान जातो.
एवढ्यातच नाही पण काही महिन्यांपूर्वी सहज फिरायला म्हणून एका चर्चजवळ गेलो होतो. तिथल्या प्रांगणात भरपूर कबूतरं (इथे कबूतरं तर कुठेही आणि कितीही असतात ही गोष्ट वेगळी) आणि चिमण्या दिसत होत्या. दुरून पाहिलं तर त्यातल्या चिमण्या कुणाच्या हातात काही बिस्किट किंवा ब्रेडचा तुकडा असला की झडप घालत होत्या. जवळ गेल्यावर कळलं की काही हौशी पर्यटक स्वत:च हातात ब्रेडचे तुकडे वर धरत होते आणि आसपासच्या चिमण्या ते तुकडे एका मिनिटाच्या आत फस्त करत होत्या. तिथेच बसलेला एक माणूस सगळ्यांना ते तुकडे देत होता. त्यावरून त्या त्याच्या पाळलेल्या / शिकवलेल्या चिमण्या असाव्या असा आम्ही अंदाज बांधला.
बघायला खूप मज्जा येत होती पण स्वत: हातात ब्रेड धरायची माझी हिंमत झाली नाही. मला त्या एवढ्या सगळ्या चिमण्यांच्या फडफडीची भीती वाटत होती . तेवढ्यात एक पिटुकली तयार झाली. ३-४ वर्षाची ती पिल्ली इतक्या निरागसपणे हातात ब्रेडचे तुकडे धरून उभी राहिली आणि तिच्या दोन्ही हातांसमोर चिमण्यांची गडबड सुरू झाली. जेमतेम १-२ मिनीट असलेला तो प्रसंग एवढा गोड होता की तिथले खूप लोक त्या मुलीचा फोटो काढण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही... आम्हीसुद्धा त्यातलेच! तिचे आई-वडीलही मोकळ्या स्वभावाचे दिसत होते. त्यांनी सगळ्यांनाच हसून सार्वजनीक परवानगी देवून टाकली. त्या निरागस चिमणीचे बाकीच्या चिमण्यांसोबत एक-दोन फोटो काढले आहेत.
13 Apr 2012 - 9:20 pm | Pearl
मस्त फोटो...
धीट आणि खूप गोंडस मुलगी आहे..
आणि चिमण्या पण माणसांना बर्याच सरावलेल्या दिसताहेत :-)
13 Apr 2012 - 9:40 pm | रेवती
मस्तच हां स्मिता.
यकूंचा धागा वेगळ्या विषयावर असल्याने आवडला.
13 Apr 2012 - 10:05 pm | पक्या
पक्ष्यांना ब्रेड किंवा तत्सम प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न देऊ नये. बर्याच बागांमध्ये ह्या विषयी पाट्या पण लावलेल्या असतात.
14 Apr 2012 - 12:28 am | अर्धवटराव
निव्वळ अप्रतीम !!
अर्धवटराव
13 Apr 2012 - 7:06 pm | मुक्त विहारि
सध्या आमचाच चेहरा आरशात बघणे चालू आहे....
बाकी धागा मस्त आहे...१००/१२५ तरी होतील असा अंदाज आहे...
13 Apr 2012 - 7:22 pm | प्रास
मस्त धागा यकुशेठ!
प्रतिसादही छान आहेत.
एका नवीन प्रकारच्या इंटरअॅक्टिव धाग्याबद्दल धन्यवाद यक्कू! अशावेळी तुम्हाला क्रूरसिंग म्हणवत नाही आहे :-)
13 Apr 2012 - 7:23 pm | Pearl
छान धागा. धन्यवाद.
अशातली नाही. जरा जुनी गोष्ट आहे...
एकदा लंडनच्या एका पार्कमध्ये फिरायला गेले असता तिथे एक माणूस हातात शेंगांचा पुडा घेऊन एका बाकावर बसलेला दिसला. तो खारींना शेंगा देत होता. तिथे खूप खारूताया होत्या. त्या तुरुतुरु पळत येऊन टूणकन उडी मारून त्याच्याजवळ जाऊन त्याच्याकडली शेंग घेऊन पळून जायच्या आणि दूर जाऊन दोन पायावर उभं राहून शेंगा फस्त करायच्या. खूप खारी असल्याने त्यांच्यात शेंगांसाठी थोडी स्पर्धा चालू होती.
त्यातच एक चतूर खारूताईही पाहिली. ती शेंग घेऊन थोड्या अंतरावर जाई आणि तिथल्या पालापाचोळ्यामध्ये शेंग लपवून परत त्या माणसाकडे जाई दुसरी शेंग आणायला :-) इवल्याशा प्राण्याची किती हुशारी ना. पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या घडामोडींवर दुरून एक पारवा लक्ष ठेवून होता. ती खार दुसरी शेंग आणायला गेल्यावर हा पठ्ठा दोन पायांवर नाचत नाचत तिथे आला आणि ती शेंग शोधून चोचीत घेऊन पसार. शेरास सव्वाशेर मिळाला :-)
13 Apr 2012 - 7:35 pm | गणपा
धमाल किस्सा. :)
13 Apr 2012 - 8:25 pm | स्मिता.
एकदम मजेशीर!
14 Apr 2012 - 3:31 pm | श्रावण मोडक
मस्तच किस्सा. पारवा डांबरट आहे. खारूताई ही खारूताईच आहे. वेल... हे ठीक. पण हेही पाहिलं पाहिजे की ती खारूताई आणि तो पारवा यांच्यात काही नातं नाही ना? कारण प्राणी-पक्षी यांच्यात असं सहकार्य असू शकतं. असतंच असं नाही!
14 Apr 2012 - 12:39 am | मन१
धाग्याला नक्की काय लेबल लावावे समजले नाही. उद्बोधकही नाही, रंअजक म्हणावे तर तसेही फारसे नाही, थ्रिलर किंवा विनोदीही नाही.
पण पुन्हा पुन्हा येउन इथे कुनीतरी काही नवीन टाकलय का हे सतत बघतोय.
एक वेगळिच क्याटेगरी उघडल्याबद्दल मानवसदृश यकुचे आभार.
14 Apr 2012 - 1:12 am | चित्रा
धागा आवडला.
मध्ये एका कामाच्या मिटींगसाठी काहीजणांबरोबर जेवायला बाहेर गेले होते. आम्ही एका कामावरून बोलत असताना बाजूला दोन बायका आपापल्या मुलांना घेऊन आल्या. त्यापैकी एक अगदीच पिल्लू मुलगी होती. तिला हाय चेअरमध्ये माझ्या बाजूला बसवून त्या जेवायला लागल्या. आमचेही बोलणे अगदी रंगात आले होते तेवढ्यात त्या बाळाने हाय चेअरमधून पुढे वाकून मला हात लावला, आणि माझे आणि सहकार्यांचेही लक्ष वेधून घेतले. बाळाच्या आईने डिस्टर्ब केल्याबद्दल जरा क्षमा करा म्हटले. आम्हीही आपले कुठे काय असे काहीतरी म्हणून परत काहीतरी रुक्ष बोलण्यात गुंतलो, मग दोन मिनिटांत पुन्हा त्या पिलूने माझे लक्ष वेधून घ्यायला मला हात लावला! त्या बाळाचा कोमल चेहरा लक्षात राहिला.
14 Apr 2012 - 4:38 am | शिल्पा ब
आम्ही एकदा पिझ्झा खायला गेलो होतो तेव्हा एक दाक्षिणात्य बाई तिच्या २-३ वर्षाच्या मुलीला बळंच पिझ्झा खायला लावत होती अन त्या पोरीला कै ते आवडत नव्हतं.
14 Apr 2012 - 6:12 pm | वपाडाव
एवढ्या चांगल्या विषयाच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला हीच एक घटना घडली होती का तुमच्या जीवनात?
14 Apr 2012 - 9:43 pm | शिल्पा ब
हो.
14 Apr 2012 - 10:44 am | ज्ञानोबाचे पैजार
माझ्या लाहानपणची गोष्ट आहे. दर गुरुवारी संध्याकाळी एक साधुबाबा "श्री गुरुदेव दत्त " असे म्हणत घरा समोरील रस्त्या वरुन भिक्षा मागायला यायचे. ते कोणाच्याही दारात जायचे नाहीत.
त्यांना मी प्रत्येक वेळी त्यांना दहा पैसे द्यायचो. माझ्या डोक्यावरुन हात फिरवुन ते निघुन जायचे. कमीत कमी १० ते १२ वर्ष हाच क्रम चालला होता. पण इतक्या वर्षांमधे त्यांच्या तोंडातुन दुसरा कोणताही शब्द ऐकला नाही. ना कधी ते माझ्या कडे बघुन साधे हसले. पण तरी सुध्दा मी त्यांच्या येण्याची वाट बघत असायचो. "श्री गुरुदेव दत्त " अशी खणखणीत आरोळी आली की मी १० पैसे घेउन धावत सुटायचो.
तोंडभर वाढलेली पांढरी दाढी, आणि दाढीच्याच रंगाची पांढरी कफनी हातात एक काठी आणि काखेत झोळी यात कधीही फरक झाला नाही.
मधे काही काळ ते यायचे बंद झाले होते. दर गुरुवारी मी त्यांची वाट बघायचो. साधारण १ ते १.५ वर्षांनंतर अचानक एकदा "श्री गुरुदेव दत्त " कानावर आले. पण आता त्या आवाजात पुर्वीचा जोर नव्हता. साधुबाबा मधे बरेच अजारी असावेत कारण यावेळी एक मुलगा त्यांच्या बरोबर होता. त्याच्या आधाराने ते चालत होते. मी त्यांना दक्षीणा दिली.
त्यांनी माझ्या डोक्यावरुन हात फिरवला आणि परत मागे न बघता चालायला लागले.
"श्री गुरुदेव दत्त "
14 Apr 2012 - 11:26 am | प्रभाकर पेठकर
आठवणी बर्याच आहेत. मनाच्या तळातून कधी कधी उसळी मारून तर कधी अगदी मोरपिसासारख्या अलगद मनाच्या पृष्ठभागी येतात. त्याच (त्यावेळी, त्याकाळी) अनुभवलेल्या संवेदना जाग्या करून हळूहळू पुन्हा तळाशी जातात, पुन्हा कधी तरी वर येण्यासाठी.
मी ७४-७५ साली श्रीरामपुरहून मुंबईकडे निघालो होतो. एस्टीत सर्वात मागच्या बाकावर जरा ऐसपैस बसलो होतो. एका थांब्यावर एस्टीत बरेच प्रवासी चढले. त्यांच्यात एक आज्जीबाई गुडघ्यांचा आधार घेत घेत सावकाश चढल्या. फारच गरीब, उन्हाने रापलेल्या, फाटकं धडूत नेसलेला अशा होत्या आज्जीबाई. बहुतेकांनी पटापट जागा पकडल्या होत्या. आज्जी बाईंना कुठे जागा दिसेना. मी जरा आवरून बसलो आणि आज्जी बाईंना माझ्या शेजारची जागा दिली बसायला. 'भलं होईल रं प्वॉरा तुजं' असं म्हटत आज्जी बाई टेकल्या. 'कुठं चाललायस?' वगैरे माझी प्रेमाने चौकशी करून झाल्यावर आज्जीबाईंनी आपली मुठ उघडली. त्यात काळा पडलेला (अतिशयोक्ती नाही) शीरा होता. 'घे. (अमुक अमुक्)देवीचा प्रसाद आहे.' मी दोन मिनिटं विचारातच पडलो. आज्जीबाईंच्या हातातील घामाने काळवंडलेला शीरा खायचा कसा? पण, त्यांचे मनही मोडवेना. मी तो शीरा घेतला आणि डोळे बंद करून, एका घासात, गिळून टाकला. आजींना वाटले फारच श्रद्धावान दिसतंय 'प्वॉर'. नंतर ३-४ तास मी सचिंत मुद्रेने प्रवास करीत होतो. 'पोटात ढवळतय का? काही विषबाधा वगैरे होणार तर नाही नं?' अशा विचारांनी त्रस्त होतो. पण देवी कृपेने काही झाले नाही. पण ती आठवण मनातून जात नाही.
तसेच, पेडररोडवर एके ठिकाणी युनिसेफचा इंग्रजी फलक होता. 'I complained that I had no shoes until I saw a man who had no feet.' कचेरीच्या कामानिमित्त अनेकदा त्या रस्त्यावरून बसने जाताना तो फलक आणि ते वाक्य मनाला फार टोचायचं. त्या फलकाने मनावर केलेला संस्कार कधीच पुसला जाणार नाही.
तसेच एक हिन्दी वचन वाचनात आले होते.'हाथ की लकिरोंपर इतना भरोसा न कर, जीनके हात नही होते उनकाभी कोई भविष्य होता है।'
दादरच्या रेल्वे पुलावर एक आंधळा माणूस लॉटरीची तिकिटे विकत होता. 'लास्ट तिकिट, लास्ट तिकिट. आपही लकी हो सकते है।' तेंव्हा महाराष्ट्र लॉटरी चा बराच बोलबाला होता. आजूबाजूला कोणाला हजार, कोणाला पन्नास हजार तर कोणाला ३ लाख अशी बक्षिसं लागली होती. मलाही मोह झाला. मी त्याच्याकडून ते लास्ट लकी तिकिट घेतलं आणि पुढे निघालो. १०-१५ पावलांवर पुन्हा त्याचाच आवाज कानी पडला, 'लास्ट तिकिट, लास्ट तिकिट. आपही लकी हो सकते है।' त्या आंधळ्याने खिशातून दुसरे तिकिट काढले होते. त्याचा धंदा (आणि तोही) चालू होता. मी गंडलो गेलो होतो. हसू आलं. ते तिकिट मला 'लकी' ठरले नाही.
14 Apr 2012 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्याकडे सांगायाल काही किस्सा वैग्रे नाही. पण 'येवढ्यात काय पाह्यलत' विचाराल, तर निर्व्याज निखळ निरागस हास्य पाहिले.
हे आमचे विमो आणि कडेवर रुद्र (छोटे धमालपंत). कोणाचे हसू जास्त निरागस निखळ आहे सांगा.
14 Apr 2012 - 12:18 pm | प्रभाकर पेठकर
अरे व्वा..! छोट्या धमालपंतांना मिपाचे सदस्य करून घ्या. पण नकोच, जाऊ दे, बिचार्याची निरागसता टिकली पाहिजे.
14 Apr 2012 - 3:35 pm | श्रावण मोडक
पोरगं बापावर गेलंय हो काका. काळजी नको. हल्ली त्याच्यामुळंच धम्या इथं फारसा असत नाही. :)
16 Apr 2012 - 11:27 pm | पिवळा डांबिस
चला त्या धम्याला रिटायर करा आणि त्याच्याजागी यालाच इथे मेंबर करून घ्या रे!!!!
14 Apr 2012 - 4:24 pm | प्रीत-मोहर
हा फटु माझा फेव्हरिट आहे :)
14 Apr 2012 - 4:24 pm | प्रीत-मोहर
हा फटु माझा फेव्हरिट आहे :)
14 Apr 2012 - 6:19 pm | स्मिता.
हा फोटो आधीही पाहिला होता आणि तेव्हाही आवडला होता :)
14 Apr 2012 - 3:11 pm | दादा कोंडके
काही वर्षापुर्वी रोज सकाळी चहा मारायला मी मित्रासोबत जवळच्या उडुपी कॉर्नरवर जायचो. त्याचवेळी मला चहासाठी एकटीच आलेली एक मुलगी दिसायची. तिथेच जवळपास रहात असेल. कोरमंगला सेवन्थ ब्लॉकमध्ये युपी, बिहार किंवा अगदी मिझोराम वगैरे मधून नोकरीच्या शोधात अलेली खूप मुलं-मुली रहातात. झाडाखालच्या कट्ट्या वर बसून मी मग चहा पीता पीता निरिक्षण करायचो. पाच फुटी कृश शरीर, डोळे खोल गेलेले पण गालाची हाडं वर आलेली आणि चेहर्यावर थोडेशे भेदरलेले भाव. अंगावर पंजाबी ड्रेस आणि ओढणी. सुरुवातीला ती एकटीच यायची पण नंतर एक-दोन मुलं मुली बरोबर दिसायलागल्या. ते सगळे हिंदीत बोलत असत. त्यांच्या हातात कुठल्यातरी बँकेच्या फाईली असत. बहुतेक हौसिंग लोन किंवा तत्सम काहीतरी फिरतीवरची कामं करत. कारण त्यांच्याकडे ३० रुपयांचा एका दिवसाचा बस पास असे.
थोड्या दिवसानी त्यापैकी च एका चश्मा घालणार्या जाड्या मुलाबरोबर ती खेटून बसून चहा पिउ लागली. मग नंतर तिच्या ओठांवर लिपस्टीक आलं, पंजाबी ड्रेस जाउन चुरगाळलेली जीन्स आणि काड्यांसारखे हात बाहेर आलेला टी-शर्ट आला. तो त्याच्या रूम पार्टनरच्या ऑफिसमधल्या ओळखीनं एक-दोन बँकेची गिर्हाईकं त्या मुलीला देत असे. अगदी नाटकात जसं सगळं कथानक स्टेजवरच घडवण्याची त्या दिग्दर्शकाला कसरत करावी लागते तस ते सगळं मी रोज ५-१० मिनिटात त्या कोपर्यावर बघत होतो. त्या मुलीच्या बोलण्यात आता शिव्या येत होत्या, गाल भरत चालले होते. एकदा तर चहा पिताना त्या मुलाच्या हातातली सिगारेट घेउन तिनं एक-दोन झुरकेही मारले.
जवळ आठ-दहा महिने जवळ-जवळ रोज मी हे बघत होतो. नंतर मात्र घर बदल्यामुळे ते चहाचं ठिकाण सुटलं. पण कधितरी ती मुलगी उगिचच आठवते. मला तीचं नावही माहीत नाही आणि तीलातर कुणीतरी एक गर्दीतलाच एक चेहरा बनून जवळ जवळ वर्षभर रोज चहा पिताना बघत होता हे देखिल माहीत नसेल. पण काही आठवणी कितीही नको म्हणत असताना घर करून बसतात.
14 Apr 2012 - 5:07 pm | ५० फक्त
सोलापुर - सोरेगांव रस्त्यावर एका आश्रमाच्या भिंतीवर एक वाक्य रंगवलेलं आहे.
कफन में जेब नही होती, फिर संग्रह किस लिए ? आपल्या संगणकाचा अँटिव्हायरस कसा त्याला सेफ ठेवतो ते वाक्य माझ्या सिस्टिमला सेफ ठेवतंय तेंव्हापासुन आज पर्यंत, आणि अजुन १५ वर्षे ठेवेल.
14 Apr 2012 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घर सोडून सकाळी बसस्टॉपवर जातांना माझ्या घरासमोरील बोळीत 'चंदु' सतत बसलेला असायचा. भीक मागून खातो म्हणून भिकारी. हा माझ्या गावातल्याच एका चांगल्या कुटुंबातला. पण, डोक्यावर परिणाम झालेला. कधी एखादा अभंग म्हणतांना , तर कधी एखादी गवळण, तर कधी जुनी गाणी सतत चाललेली असायची. दाढी वाढलेली, फाटके कपडे, सोबत एक चिंध्यांचं गबाळं, हाताचा कोपरा, तळहात अगदी मळकट, काळं काही तरी हाताला लागलेलं आणि सतत स्वतःशी बडबड चाललेली. घरातून बाहेर पडल्यावर अवघ्या पाच फूटाच्या बोळीतून मला या चंदुला ओलांडून जावं लागायचं. माझी ओळखच झाल्यामुळे रोख ठोक आवाजात ' दे ना रे एक रुपया' 'काय बिघडतं एखादा रुपया दिला तर' असं बोलायचा. इतकं स्वच्छ त्याचं बोलणं. मीही म्हणायचो, बेट्या, काम करना काही तरी, फूकट विड्या काड्या ओढत बसतो, असा संवाद व्हायचा. मी दिवसभरच्या राहाटगाड्यातून परतल्यावर चंदु कधी दिसायचा कधी नाही.
चंदु बायका दिसल्यावर मुद्दामहून मोठ्या आवाजात गाणी म्हणतो. कधी शीळ घालत गाणी म्हणतो असेही कधी ऐकायला यायचे. आजूबाजूची पोरं चंदु दिसल्यावर बाहेर पडायची नाहीत. कधी येडा चंद्या, येडा चंद्या, असं म्हणत धुम ठोकायची. कधी शेजारी-पाजारी त्याला गोड-धोड खायला देत. कधी लक्ष देऊन पाहिल्यावर बीड्या फुंकणारा चंद्या आणि कधी त्याच्या आजूबाजूला डुकरांनी नुसता उच्छाद मांडलेला असायचा.
बर्याच दिवसात चंद्या दिसला नाही. आम्हा शेजार्या-पाजार्यांनाही कधी त्याची आवर्जून आठवण झाली नाही. एक दिवस पुन्हा बोळीत चंद्याची जुनी गाणी ऐकायला आली आणि दुसर्या दिवशी पाहिलं तर चंद्याचा कोपरापासून हात गायब. हाताच्या कोपर्याला चिंध्या गुंडाळलेल्या. काय रे चंद्या, काय झालं हाताला. काही नाही. कुत्र चावलं. खरं तर नुसतं कुत्र चावलं नव्हतं तर कुत्री आणि डुकरांनी त्याच्या कोपरापासूनचे हाताचे लचके तोडले होते. सरकारी दवाखान्यात जाऊन त्याने उपचारही घेतले असे कोणीतरी मला सांगितल्याचे आठवते.
नोकरीला असल्यासारखा हा दिवसभर गाव फिरुन हा मुक्कामाला माझ्या घरासमोरील बोळीत यायचा. कधी फरफटत चाललेला, कधी कुत्री मागे लागलेला, कधी विड्या फुंकणारा, कधी नुसताच पडलेला आणि सतत गाणी म्हणनारा, थंडीच्या दिवसात चहाला पैसे द्यावेत म्हणून रस्ता अडवणारा. चंद्या, आठेक दिवस आजारी पडलेला असल्यासारखा पडून होता. आणि एका गारठलेल्या थंडीत एकदिवस अनेक प्रश्न मागे सोडून चंद्या गेला.
आता माझ्या घरासमोरची बोळी एकदम स्वच्छ आणि मोकळी असते. चंद्या दिसत नाही, चंद्याचं गबाळं नाही, चंद्याचं गाणं नाही. कधी कधी माझी पोरं त्याच्या आठवणी काढतात. आणि पोरांनी त्याच्या आठवणी काढायला सुरुवात केली की मीही लहान लेकरांसारखा त्यांच्या गोष्टी ऐकतो आणि हळवाही होतो. (मोबाईलचा माझ्या हाताला इतका चाळा पण सालं एकदाही त्याचा फोटो काढला नाही.)
-दिलीप बिरुटे
14 Apr 2012 - 9:51 pm | शिल्पा ब
अतिशय दुर्दैवी!! माझ्या पाहण्यातही असाच एक मनुष्य होता. :(
या चंदुला त्याच्या घरच्यांनी घराबाहेर काढलं का? जर त्याच गावातील असेल तर त्याचे हाल पाहुन त्यांना काहीचं वाटलं नाही? :(
15 Apr 2012 - 4:44 pm | भीमाईचा पिपळ्या.
सांगण्यासारखे भरपूर आहे पण ते शब्दबध्द करता येईल कि नाही त्याबद्दल साशंक आहे. तूर्त प्रतिसाद वाचत आहे.
एक चांगला धागा नि प्र. वाचल्याची पोच नि धागा वर येण्यासाठी हा प्रपंच.
16 Apr 2012 - 5:28 am | स्पंदना
हेच वाटत होत, मलाही, पण मग अचानक माझी अवस्था काखेत कळसा अशी असल्याची जाणिव झाली म्हणुन अन एक उत्तम धागा असाच विणला जावा म्हणुन हा लेखन प्रपंच.
इकडे (म्हणजे ऑस्ट्रेलियात ) आल्यावर पुन्हा एकदा एकटेपणा खायला उठला, त्यातच हवामानाचा फरक. आता आपण असे एकटेच पडणार अस वाटत असतानाच घर घेतल, अन घर पहायला आल्या दिवशीच, रस्त्याच्या पल्याड रहाणार एक वयोवृद्ध जोडप. आम्हाला भेटल.
आर्लेट अन डेव्हिड असे हे दोघे. डेव्ह ८८ चा तर आर्लेट ८३.
त्यातला डेव्ह भलता रंगेल. आल्या दिवशी मला बाजुला खेचुन 'वी कॅन हॅव फन ' अस डोळा घालत सांगुन रिकामा झाला. 'अर्ध्या शेणी मसणात पण द्वाडपणा बघा" असा माझा मनातल्या मनात अस्सल कोल्हापुरी शेरा. या पठ्ठ्याला, जवळ जवळ पंधरा भाषेत एकच वाक्य बोलता येत, 'आय लव यु." अन आता हिंदीत हे कस म्हणायच हे तो माझ्या नवर्याकडुन शिकायला बघतोय. आता माझ्या नवर्यान निदान माझ्या साठी तरी असल काय बाय म्हणत्यात ते कधी म्हण्ल नाही,मग त्याला काय शिकवणार कप्पाळ?
पण मग अवघ्या दोन महिन्यात हे जोडप इतक लळा लावुन गेल की काय सांगु? अन 'अश्यात काय पाहिलत' साठी ११ तारखेलाच घडलेला हा प्रसंग.
पंधरा दिवसापुर्वी माझ्या कन्येन छानसा केक बेक केला. नेमकी आर्लेट कश्या साठी तरी माझ्या कडे आली होती. मी आपला कौतुकान तिला त्यातला थोडा केक दिला. आता माझ्या लेकीविषयी आर्लेटला भारी प्रेम कारण ती आहे फ्रेंच, अन माझी कन्या तिच्याशी फ्रेंच मध्ये गप्पा मारु शकते.
त्या केकच्या टीन मध्ये आर्लेटन एक जेन्युइन अमेथिस्ट पेंडंटचा नेकलेस पाठवुन दिला. अग नको म्हणायला गेले तर बोलता बोलता ११ला त्यांची ५९थ लग्नाचा वाढदिवस असल्याच कळल.
मी अक्षयला त्या दिवशी घरातुन काम करायला सांगुन, फुल मागवली अन थोड्या कुकिज बेक केल्या. त्यांच्या कडे जायला बाहेर आलो तर हे दोघे कुठेसे बाहेर निघालेले, कार मध्ये, ड्राइव्ह करणारा डेव्हीड, थोडासा , अगदी थोडासा अस्वस्थ. त्याला ल्युकेमिया आहे, हे तो अगदी सर्दी पडस झाल्या सारख सांगतो. अन मी ही त्यात काय एव्हढ मोठ, तु एव्हढा पापी आहेस की ती सारी फेडल्या शिवाय तुझी सुटका नाही, अस चिडवुन मो़कळी होते. जरा डॉक्टर कड जाउन येतो, अस सांगुन दोघेही निघुन गेले. दुपारी मी परत सार्यांना घेउन गेले तर डेव्हिड झोपला होता. आर्लेट जराशी अस्वस्थ, पण फुल स्विकारुन 'सो काइंड ऑफ यु" म्हणाली. मग सांगते, तो गेले दोन दिवस झोपु ही शकला नाही आहे, म्हणुन आता सेडेट करुन आणलाय, वर थोड्याश्या तरळत्या नजरेन तीन अॅड केल, धिस इयर वी कुड नॉट गो एनिव्हेअर, बट मे बी नेक्स्ट इयर'
खरच इतक एकट (त्यांना अक्षयच्या वयाचा मुलगा आहे, पण तो नुसता नावालाच ) राहुन इतक नेटान अन धाडसान अश्या आजाराला तोंड देण्.अन इतक ऑप्टीमिस्टिक रहाण्...एकदा महिन्या पुर्वी बोलता बोलताआर्लेट म्हणाली होती "आय अॅम ट्राइंग टु किप हिम अॅज मच अॅज आय कुड..इतक आजारी असुनही तिला ड्राइव्ह न करायला देता त्याच स्वतः ड्राइव्ह करण, अगदी हॉस्पिटलला जातानाही, व्यवस्थित कपडे करुन निटनेटक जाण, चेहर्यावर त्या दु:खाचा लवलेशही न ठेवण...
माझा खरच त्या दोघांना ही सलाम, जाउन डेव्हीडला हिंदीत आय लव यु कस म्हणायच ते शिकवाव म्हणते.
16 Apr 2012 - 6:53 am | रेवती
छान.
माझे पूर्वीचे शेजारी जोडपे. शुगरमन आज्जी आजोबा असे होते.
कॅन्सर असूनही नेहमी आनंदी राहत असत.
त्या वयातही दर बुधवारी त्यांचा पणतू दिवसभर सांभाळत असत.
सगळे नातेवाईक मात्र येणारे जाणारे होते म्हणून बरं.
16 Apr 2012 - 5:55 am | मराठे
सर्वप्रथम एका चांगल्या धाग्यासाठी यकुला खूप खूप धन्स.
माझ्या लहानपणीच्या अगदी पहिली दुसरीत असतानाच्याही काही आठवणी अजून बर्यापैकी शाबूत आहेत. त्यात कित्येक ओळखीचे आणि अनोळखी चेहरे गर्दी करत असतात. त्यातलाच हा एक चेहरा.
आमच्या गल्लीत मला आठवत असल्यापासून एक चणेवाला यायचा. मळकट जांभळ्या निळ्यारंगाची भली मोठी पोतडी पाठीवर घेऊन 'कुर्र्म' का असंच काहीसा आवाज काढायचा. कित्येक वर्षात संध्याकाळच्या सहा वाजता त्याचं दर्शन चुकायचं नाही. साधारण पावणेपाच फुट उंच. .. कदाचीत पाच फुटही असेल पण खांद्यावरच्या ओझ्यापायी सतत वाकलेलाच बघितला होता. आमच्या गल्लीत इतक्या वर्षात त्याच्या कडून कोणी काही घेतल्याचं मला आठवत नाही, पण तरी त्याची फेरी कधी चुकली नाही. एकदा आम्ही सगळे गल्लीत क्रिकेट खेळत होतो. तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचं आगमन झालं. त्या दिवशी का कोणास ठाऊक त्याने आम्हा सगळ्यांना बोलाऊन हातावर थोडे चणे दाणे ठेवले. आम्ही काय ! फुकट म्हटल्यावर ताबडतोब मटकावले आणि परत खेळात गुंग झालो.
दुसर्या दिवशी खेळताना कधी नव्हे ते त्या चणेवाल्याची वाट बघत होतो. पण सहा वाजून गेले तरी तो आलाच नाही. कित्येक दिवस गेले. तो कधी परत आला नाही. अर्थात त्याच्यावाचून कोणाचं काही अडत नसल्यामुळे त्याचं न येणंही कोणाच्या खिसगणतीत नव्हतं. पण आमच्या खेळाच्या वेळी नेहमी तो यायचा म्हणून किंवा त्याच्या त्या स्पेशल 'कुर्र्म' वरून, आम्ही पोरं त्याला काही विसरलो नाही.
16 Apr 2012 - 7:03 am | रेवती
आजच दुपारी टेंपलमध्ये (हो, हो देवळातच) गेले असताना दिवस चांगला असल्याने की काय कोणास ठाऊक बरीच सौधिंडीयन मंडळी कुटुंबातल्या लहान लहान बाळांसाठी गुरुजींकडून कसलीशी पूजा करून घेत होते. एका फ्यामिलीची झाली की दुसर्या फ्यामिलीची पूजा होत होती. आपल्या नंबराची वाट पाहणारे कुटुंब साधारण अडीच तीन महिन्याच्या गुटगुटीत मुलीला मांडीवर घेऊन वाट पहात होते. ती मुलगी इतकी गोड होती म्हणून सांगू. गुलाबी आणि तपकिरी रंगाचे फुलाफुलांची छपाई असलेले कपडे घालून, असल्या नसल्या केसांना गुलाबी पीन लावून दिली होती आईने. तिला काहीही सजमत नव्हते पण टपोर्या डोळ्यांनी टुकूटुकू पहात होती आणि मुठी चोखत होती. दर्शन होऊन निघेपर्यंत मी देवाऐवजी तिलाच पहात होते. एका अनोळखी कुटुंबाने तर विनंती करून फोटोही काढून घेतला. त्या पालकांना थोडे अवघड वाटले पण 'हो' म्हणाले. मग मी गेले नाही विचारायला. त्यावेळी यकुंच्या या धाग्याची आठवण झाली.
16 Apr 2012 - 10:01 am | ऋषिकेश
धाग्याची कल्पना आवडली. नुकतंच अजित हरिसिंघानी यांचं 'बाईकवरचं बिर्हाड' पुस्तक वाचतोय त्यात ते म्हणतात.. (आठवणीतून लिहितोय. वाक्य अशी नाहीत आशय हाच) "आपण बाईकवरून जात असतो, भोवतीचं विश्व त्याच्या नेहमीच्या विश्वात मश्गूल असतं. त्यातलं आपल्या लक्षात काही मोजके क्षणच रहातात, ते का रहातात याची चिकित्सा करता येईल पण ती करण्यात मजा नसते. केवळ ते प्रसंग, मनात उमटलेलं ते चित्र इतरांना सांगता आलं की आनंद होतो. तोच आनंद लुटायचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे."
हा धागाच अश्याच स्वरूपाचा आहे. मनात कोरलेली चित्रे शब्दरूपात बघून मजा येतेय!
17 Apr 2012 - 11:41 am | पांथस्थ
सहि रे.
16 Apr 2012 - 1:23 pm | चाणक्य
मी ऑफिस ला येतान रोज एक तरुण मुलगा बघतो. पोलिओ आहे त्याला. दोन्ही पाय गुडघ्यापाशी एकमेकांजवळ असल्याने नीट चालता येत नाही त्याला. कुठेतरी काम करत असावा किंवा कॉलेज ला वगैरे तरी असावा. कारण त्याच्या पाठीवर रोज सॅक असते. मी रोज त्याला पहातो. एखाद्या दिवशी दिसला नाही तर चुकल्याचुकल्या सारखे होते.
तसंच आमच्या कॉलनीत रोज एक आई तिच्या १०-१२ वर्षाच्या मुलाला घेऊन फिरत असते. स्पेशल चाईल्ड आहे तो. पण चेह-यावर ईतके निरागस भाव असतात म्हणून सांगू. आणि त्याची आई पण हसतमुख असते.
या दोघांनाही बघितलं की मला वाटतं की आपण हाती-पायी धडधाकट आहोत, नीट विचार करू शकतो, ही केवढी मोठी देणगी आहे. त्यामुळे ऊगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ अजिबात करायचा नाही. स्वतःचं आयुष्य ही सुंदर करायचं, आणि जमेल तसं दुस-याचंही.
(यकु, धन्यवाद या धाग्याबद्द्ल)
16 Apr 2012 - 2:17 pm | सुहास..
छान धागा, चांगली कल्पना ..
वाचतोय, भर घालेन !
16 Apr 2012 - 11:59 pm | पिवळा डांबिस
एक आई, बाबा आणि ४-५ वर्षांचा छोटा मुलगा....
मत्स्यालयात मासे वगैरे बघण्यात गुंग झालेले....
काचेच्या टँकमधले मासे, शेवंड, पाणकासवं वगैरे बघून झाली....
सोबतीची १८-१९ वर्षांची मार्गदर्शिका सगळ्या प्राण्यांची अगदी रंगात येऊन माहिती देत होती...
करता करता मंडळी एका शेवटच्या टँकसमोर येऊन उभी राहिली...
आतमध्ये भल्यामोठया आकाराचे, रंगीत, साधारण एंजल्फिशसारखे दिसणारे मासे पोहत होते...
ते बघताक्षणी त्या मुलाच्या तोंडून आनंदाने चीत्कार बाहेर फुटले....
मार्गदर्शिकेने मोठया कौतुकाने विचारलं, "डू यू लाईक देम?"
"व्हेरी मच", पोराच्या डोळ्यात एक वेगळीच चमक, "आय वॉन्ट टू ईट देम!!!!"
या खणखणीत उत्तरामुळे आजूबाजूच्या लोकांनी चमकून पाहिलं. ...
मार्गदर्शिकेचा चेहरा एकदम कावराबावरा झालेला, तिला असं उत्तर यापूर्वी कधी मिळालं नसावं!!!!!
मुलाच्या आईने पब्लिकमध्ये आणखी लाज जायला नको म्हणून मुलाच्या मुसक्या बांधलेल्या....
बापाचा चेहरा मात्र अभिमानानं फुललेला!!!!
"हाण तिच्या मायला!! शेवटी माझंच सारस्वत रक्त आहे ते!!!!!"
:)
17 Apr 2012 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार
17 Apr 2012 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
18 Apr 2012 - 11:23 am | नंदन
=))
तेथीचा 'जिव्हा'ळा तेथे बिंबे!
23 Feb 2013 - 12:53 pm | यशोधरा
हेच म्हणते!
3 May 2012 - 6:23 pm | बॅटमॅन
हाण तिच्या मायला!!!!!!!
17 Apr 2012 - 10:58 am | यकु
डू यू लाईक देम?"
"आय वॉन्ट टू ईट देम!!!!"
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))
=))
शाब्बास रे पठ्ठ्या म्हणाव!!!!!
मुलाच्या आईने पब्लिकमध्ये आणखी लाज जायला नको म्हणून मुलाच्या मुसक्या बांधलेल्या....
बापाचा चेहरा मात्र अभिमानानं फुललेला!!!!
"हाण तिच्या मायला!! शेवटी माझंच सारस्वत रक्त आहे ते!!!!!"
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))
=))
हे लै भारी होतं.. ;-)
18 Apr 2012 - 1:00 pm | ५० फक्त
"हाण तिच्या मायला!! शेवटी माझंच सारस्वत रक्त आहे ते!!!!!" - हे पटायला ही वेळ यावी लागली, अरेरे काय वेळ आली आहे रे .
3 May 2012 - 4:21 pm | मी-सौरभ
काका लै भारी :)
18 Apr 2012 - 8:21 pm | पैसा
परवाच भावाकडे गेले होते. त्याच्या फ्लॅटच्या दारात केबलच्या वायर्सचा छोटासा गुंतवळा तयार झाला आहे. लहानसाच. नीरफणस असतो, साधारण तेवढा असेल. त्यात काही काड्या आणि गवत रचलेलं दिसत होतं. तिथून पक्ष्याचा आवाज येत होता, म्हणून विचारलं तर त्यात बुलबुलाची ३ पिल्लं आहेत असं कळलं. संबंध मजल्यावर कोणीच नव्हतं तेव्हा ३/४ दिवसात बुलबुलांच्या जोडीने ते घरटं तयार करून त्यात अंडी घातली होती. आता कोणी त्याना तिथून हुसकावून लावू शकत नव्हतं. काही दिवसात अंड्यातून पिल्लं बाहेर आली. सध्या पिल्लं मधेच आवाज करतात. मधेच त्यांचे आईबाप त्याना खायला आणून देत असतात. काही दिवसात ती उडायला लागतील. कदाचित घरट्यातून एखादं पिल्लू खाली पडलं तर? आपल्याला भीती वाटते. पण बुलबुल आईबाबा सध्या तरी निर्धास्त आहेत! ज्याने त्याना तिथे घरटं बांधायला दिलं तोच त्यांना वाचवील.
8 May 2012 - 11:46 pm | कापूसकोन्ड्या
सर्वप्रथम एका चांगल्या धाग्यासाठी यकु साहेबांना अनेक धन्यवाद.
साधारण ८८-८९ हे वर्ष असेल, मी आणि माझी पत्नी आमच्या एका परिचितांच्या मुली साठी स्थळं पहात होतो. तेव्हा असणार्या रूढ पध्दती प्रमाणे, माहिती काढणे, पत्रिका दाखवणे, प्रत्यक्ष कांदेपोहे असे कार्यक्रम चालू होते. आम्ही दोघे आमच्या स्कुटरवरून असेच मुलाची माहिती काढणे, जुजुबी ओळख करून घेणे अशा कारणासाठी एका घरी गेलो. प्राथमिक माहीती प्रमाणे घरी फक्त विधवा आई साधारण पन्नाशीची. आई आणि एकुलता एक मुलगा असेच दोघेच रहात होते. स्थळ चांगलेच होते. घर्री आत गेल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो, मातेने पाणी दिले .
चौकशी करताना चिरंजीव कुठे आहेत अशी विचारणा केली.मुलाची आई बाल्कनीत गेली आणि तिने वरच्या मजल्याकडे एकदा पहीले, आणि अंगठा आणि मधले बोट तोंडात घालून एक मस्त पैकी सणसणीत शिट्टी मारली. ते मातेचे मुलाला बोलावणे होते.
9 May 2012 - 1:55 am | रेवती
वा! भारी दिसतिये आई. हा हा हा.
अजिबात अपेक्षित नव्हते असे काही.
9 May 2012 - 7:08 pm | कापूसकोन्ड्या
अगदी अगदी आम्हाला पण काही सुधरत नव्हते.
9 May 2012 - 1:56 am | रेवती
मीही नुकताच एक छान प्रसंग पाहिला पण वर्णन करायची हातोटी नाही ना, काय करणार?
9 May 2012 - 10:42 am | पैसा
जमेल त्या शब्दात सांग ग, मग हातोटी आहे का नाही ते आम्ही ठरवू.
9 May 2012 - 7:19 pm | स्मिता.
रेवतीताई, तुम्हाला काय हे हातोटी वगैरे प्रश्न पडायला लागलेत? तुम्ही अनुभव सांगा, हातोटी आम्ही पाहून घेऊ.
9 May 2012 - 7:27 pm | यकु
आता सांगाच रेआ
9 May 2012 - 7:53 pm | रेवती
हो नाही करता करता मी पोहायला शिकायचे ठरवले आणि क्लबातला पोहणे इन्चार्ज डेनीस काही केल्या भेटत नव्हता. फोन केले, त्याच्या हापिसापाशी जाऊन वाट पाहून आल्यावर एकाने त्याचे व्हि. कार्ड दिले आणि इमेल करा म्हणाला. लगेच केली. उत्तर नाही. दुसर्या दिवशी रागारागाने फोन केला तर सापडला आणि व्हॉईसमेल, इमेल मिळाले, तुम्ही भेटायला या आणि लगेच क्लास जॉईन करा म्हणाला. संध्याकाळी त्याला भेटल्यावर पाहिले की डेनीस एका हाताने अधू आहे. शारीरिक दृष्ट्या 'फिट' म्हणावे असे आणि अत्यंत आनंदी व्यक्तिमत्व आहे ते. मनात जरा शरमच वाटली. पटापट त्याने माझी नावनोंदणी करून बुडलेल्या क्लासांचे पैसे वजा करून पाण्यात उतरायला सांगितले.
नवर्याशी याबद्दल बोलले तर म्हणाला की डेनीसचा उजवा हात कोपरापर्यंत एका अपघातामध्ये जायबंदी झालाय. नाहीतर तो पूर्वी स्वीमटीमचा कोच होता.
महिनाभराने मुलाचाही पोहायचा क्लास सुरु झाला आणि वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या लेव्हला पोहणारी मुले दिसायला लागली. मोठ्या मुलांचे पोहणे चालू असताना शेवटच्या लेनमध्ये डेनीसने वय वर्षे तीन ते पाच अश्या पिटुकल्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या वयातील मुले मुली भारी गोड दिसत होती. सगळ्या मुलींचे स्वीमसूट डोरा नाहीतर प्रिन्सेसचे आणि मुलांच्या स्वीमिंग ट्रंकवरही अशीच कोणतीतरी कॅरॅक्टर्स. त्यांचे पोहणे कमी आणि खेळणे जास्त सुरु झाल्यावर डेनीसने सगळ्यांना बाहेर काढले आणि हवेत हातवारे करून एक, दोन ,तीन या क्रमांकानुसार कोणत्या हालचाली झाल्या पाहिजेत हे समजावून सांगितले. एक म्हटल्याबरोबर हात वर. असे म्हणून त्याने त्याच्या उजवा हात वर केला. मुले तर इतकी निरागस, मुलांनीही त्यांचे अर्धेच हात वर केले. पाहून काय वाटले ते सांगू शकत नाही. मुलांच्या मनात डेनीसचे वेगळेपण हे कमतरता म्हणून अजिबात नसावे. त्यालाही याची सवय झाली असावी. त्याने हसून सगळ्यांचे अर्धे वर झालेले हात सरळ केले. हातवार्यांचे प्रशिक्षण झाल्यावर पाण्यात उतरून डेनीसने सटासट पोहून दाखवले आणि मी मनातल्या मनात त्याला सलाम केला.
9 May 2012 - 7:57 pm | यकु
पाणी काढलंत की डोळ्यातून.
अजून कसली हातोटी पाहिजे.
9 May 2012 - 8:01 pm | भडकमकर मास्तर
मुले तर इतकी निरागस, मुलांनीही त्यांचे अर्धेच हात वर केले. पाहून काय वाटले ते सांगू शकत नाही. मुलांच्या मनात डेनीसचे वेगळेपण हे कमतरता म्हणून अजिबात नसावे.. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आगदी अगदी.... प्रसंगाचे उत्तम वर्णन
9 May 2012 - 8:29 pm | स्मिता.
हे वाक्य मनाला भिडले. डेनिसला आमचाही सलाम.
10 May 2012 - 1:20 am | प्रभाकर पेठकर
काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. मुलांची निरागसता आणि श्री. डेनिस ह्यांची जगण्याची जीद्द, तसेच सकारात्मक दृष्टीकोन ह्यांनी एका वेगळ्याच पातळीवरील आनंद मनाला दिला. छान प्रसंग लिहिला आहे. अभिनंदन.
10 May 2012 - 9:36 am | ऋषिकेश
जर ही हातोटी नसेल तर .... असो!
मनस्वी प्रसंग आहे! कायम लक्षात राहिल असा
11 May 2012 - 12:09 pm | विसुनाना
आणि प्रसंगही तितकाच भावूक करून सोडणारा. सलाम!
10 May 2012 - 10:33 am | प्रीत-मोहर
मी परवा काकस्पर्श पहायला आमच्या एका मित्रासोबत गेले होते. चित्रपट सुरु व्हायला अवकाश होता म्हणुन आम्ही बाहेर टाईमपास करत उभे होतो. तेवढ्यात खाली एक आजी -आजोबा जोडप आल. माझ्या मते आज्जी ह्या आधी एलीवेटर स्टेरकेस वर आधी कधीच चढल्या नसाव्या. तर त्यांना आजोबा तिथुनच घेऊन जायला उत्सुक होते. आज्जी जाम घाबरल्या होत्या आणि आपले आजोबा आज्जींच्या दंडाला धरुन त्यांना धीर देत पुढे घेउन जात होते. ३-४ दा पुढे-पाठी केल्यावर शेवटी आजी चढल्या त्या स्टेरकेसवर. आणि त्यानंतर आजोबांच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णनीय असाच होता.
आज्जी आज्जोबांच्या मागे बरेच लोक खोळंबले होते त्यांनीही काही कुरबुर नाही केली. आणि वरचे सगळे लोकही कौतुकाने त्यांना पहात होते.
आजोबा छोट्याश्या गोष्टीतुन आयुष्याची शिकवण देउन गेले. :)
10 May 2012 - 10:34 am | शिल्पा ब
:)
10 May 2012 - 7:53 pm | रेवती
खूपच छान! लोकांनीही वाट पाहिली म्हणून आनंद झाला.
11 May 2012 - 11:08 am | ५० फक्त
हा अनुभव पुण्यातला वाटत नाही, इथल्या आजी असल्या गोष्टींना घाबरत नाहीत.
11 May 2012 - 11:20 am | कुंदन
>>हा अनुभव पुण्यातला वाटत नाही, इथल्या आजी असल्या गोष्टींना घाबरत नाहीत.
पण बाहेर गावच्या आल्या असतील तर त्यांनी पुण्यातल्या असल्या गोष्टींना घाबरुनच र्ह्यायला पायजेल नै का ?
मधीच लायटी गेल्या तर काय घ्या ...
11 May 2012 - 11:25 am | प्रीत-मोहर
५० फक्त. हा अनुभव तुमच्या पुण्यातलाच आहे.
धन्यवाद.
11 May 2012 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर
पुण्यात कोथरूडला सीटी प्राईड चित्रपटगृहात एका आजींना त्या सरकत्या जीन्यावर पाय ठेवायचा धीर होत नव्हता. पण कदाचित इतर लोकं काय म्हणतील ह्या संकोचापोटी त्यांनी त्या सरकत्या जीन्याच्या पायरीवर पाय ठेवलाच. मला वाटतं त्यांनी एकदम एक पायरी सोडून वरच्या पायरीवर पाय ठेवला आणि त्यावर त्या चढल्या पण त्यांचा तोल गेला. त्यांनी पटकन बाजूच्या सरकत्या पट्टीला धरले पण गेलेला तोल सावरण्याच्या खटपटीत त्यांचा दूसरा पाय तीन पायर्या खाली टेकला. त्यामुळे उजवा पाय तिसर्या पायरीवर आणि डावापाय पहिल्या पायरीवर, हात सरकत्या पट्टीवर घट्ट धरलेला, अशा त्या इंग्रजी अक्षर 'X' आकारात, पण खालच्या दिशेने झुकलेल्या, हळू हळू वर जाऊ लागल्या. घाबरून त्या एकदाच ओरडल्या पण नंतर तशाच अवस्थेत थरथरत उभ्या राहिल्या. आजोबा आधीच वर पोहोचले होते. ('वर' म्हणजे 'तसे' नाही. वरच्या मजल्यावर.) ते बिचारे झटकन वळले पण ते जसे आजींना मदत करायला खाली येऊ पाहात होते तसा जीना त्यांना पुन्हा वर घेऊन जात होता.
माझी सौ. आजींच्या मागेच होती. तिने आजींना आधार दिला आणि आम्ही सर्व त्यांना वरच्या मजल्यावर सुखरूप घेऊन गेलो. आजोबा हसत होते. आजी चक्क 'लाजल्या', त्यांनी आजोबांच्या दंडावर एक लाडीक चापटी मारली आणि माझ्या सौं.ला धन्यवाद दिले.
11 May 2012 - 1:00 pm | स्मिता.
:)
12 May 2012 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते
रेवतीचा अनुभव वाचून स्तब्ध झालो क्षणभर! बरंच काही आलं मनात.
प्रीमोचा अनुभवही अगदी हृद्य!
14 May 2012 - 2:51 pm | प्यारे१
२००५ मधली गोष्ट. तेव्हा मंचर (पुणे नाशिक रोडवर) ला साईट सुरु होती. शिवाजीनगर (पुण्याहून) एस टी पकडली. एक तीन सीटचं बाकडं रिकामं होतं. बसलो. ५ मिनिटांनी एक दिसायला बर्यापैकी मोठी मुलगी आणि तिचे आईबाबा एस्टीमध्ये चढलेले ओझरतं दिसलं. सभ्यपणाचा आव आणून आम्ही खिडकीबाहेर एक डोळा आणि इकडे एक डोळा. मुलगी येऊन माझ्या शेजारी बसली. तिच्या शेजारी तिची आई बसत होती. मुलीचे बाबा बॅगा वरच्या रॅकमध्ये ठेवण्यात आणि सीट शो धण्यात मग्न. सुखावलो. खरंच! बसमध्ये मुलगी शेजारी बसणं म्हणजे अलभ्य वाटणारी गोष्ट.....!
२० सेकंद /अर्धा मिनिटंच झाला असेल आणि त्या मुलीनं एकदम माझा हात पकडला. आणि जणू मिठी मारायची आहे असं काहीसं करायला लागली... बावचळलेला मी काय करावं ह्या मनःस्थितीत असताना तिच्या आईनं तिला माझ्यापासून थोडं दूर केलं आणि तिचा हात बाजूला केला. नीट बघितलं तर ती मतिमंद प्रकारातली मुलगी होती. दिसायला खरंच छान वाटणारी नी शारिरीक दृष्ट्या मोठी अशी ती मुलगी होती. तिला बोलताही येत नव्हतं.
अजून डोक्यातून जात नाही. तेव्हा नुकतंच मेघना पेठेंचं एक पुस्तक वाचलेलं (नाव आठवत नाही) व्यक्ती मतिमंद असली तरी तिच्या शारिरीक/ लैंगिक गरजा/ भुका असतात आणि कुठंतरी त्यावेळी ती भूक उफाळून आली असावी का असा प्रश्न मला पडला होता.
मात्र ह्या सगळ्या प्रकारामुळं तिचे आई वडील एकाच वेळी प्रचंड चिडलेले, हताश, खजिल, नाराज आणि त्याबरोबरच अतिशय उद्विग्न झालेले दिसले....! मी उठलो आणि माझी जागा त्यांना देऊन तिचे बाबा ज्या सीटवर बसणार त्या सीटवर जाऊन बसलो.
(लिहावं का नाही असं वाटत होतं इतके दिवस पण आज लिहीलंच)
15 May 2012 - 10:36 am | मोदक
मागच्या महिन्यात सूड बरोबर बदलापूरला जातानाची गोष्ट...
आमच्या समोर एक पस्तीशीतल्या काकू बसल्या होत्या. शेजारच्या सीटवर त्यांना टेकून त्यांची तीन साडेतीन वर्षांची मुलगी झोपली होती. अत्यंत निरागस अशी ती छकुली पाहून वेगळाच आनंद झाला. (दोन वर्षांचा भाचा सध्या परदेशात असल्याने असेल कदाचित...)
ट्रेनच्या त्या धबडग्यात आणि दंग्यात ती हेवा वाटावा इतक्या शांतपणे झोपली होती. सगळे स्थीरस्थावर झाल्यावर पिलू जागे झाले. इवल्याश्या हातांनी डोळे चोळणे वगैरे प्रकार झाले, तिच्या कार्टूनच्या फरबॅगेतून छोटीशी पाण्याची बाटली निघाली पाणी पिणे झाले, फळे खाणे झाले, आणि आम्हाला ड्रॅगन जागा झाल्याची जाणीव झाली. :-)
तिथून पुढे फक्त दंगा आणि दंगा.. विशेष म्हणजे काकू पण फुल्ल सामील होत्या. गाणी म्हणणे, खिडकीतून हात थोडासा बाहेर काढायला लावून "वारा लागतो का माऊ..?" असे प्रश्न. बोगद्यातून जाताना "माऊ ओरड ओरड" अशी आज्ञा.
वर "तुझ्या एवढे असताना आम्ही खूप दंगा करायचो" हाही पावशेर!
बोबड्या आवाजात चिवचिव सुरू होती, आम्ही दंगा एन्जॉय करत होतो, मिपावरच्या गप्पांना ऊत आला होता, त्यात मिपावरच्या संज्ञा इतर कुणाला कळत नसल्याने त्यांच्या चेहर्यावरचे गोंधळलेले भाव वाचताना मजा येत होती.
ट्रेन एकेठिकाणी सिग्नल ला थांबली होती व ट्रॅकजवळ बाजूला दोन शेळ्या चरत होत्या..
अचानक बोबडा आणि किणकिणणारा आवाज आला.. "तो बघ बैल" :-D
संकोच वगैरे गोष्टी राहिल्या बाजूला.. सूड, मी, त्या काकू, आमच्या समोरच उभ्या असलेल्या दोन मुली.. एकदम फुटल्यासारखे हसायला लागले सगळेजण.
मला सगळे हसताहेत या भावनेने ती बिचारी मात्र हमसून हमसून रडायला लागली. :-(
15 May 2012 - 10:50 am | प्यारे१
>>> "तो बघ बैल"
उशीरा 'नाव' लक्षात आलं असेल रे तिला! तुम्हीच होतात ना समोर??? ;)
15 May 2012 - 11:58 am | सूड
खरंय हो उशिराच लक्षात आलं नाव तिला. बाकी तुम्ही समोर असताना जर शेळ्या दिसल्या असत्या तर ती मुलगी, "अय्या ते बघ बदक!!" असं म्हणाली असती का याचा विचार करतोय. ;)
15 May 2012 - 12:01 pm | यकु
>>"अय्या ते बघ बदक!!"
--- आणि त्यानंतर बक्का बक्का नाच रे, तुझे पिल्ले पाच रे ;-)
15 May 2012 - 12:10 pm | प्यारे१
बदक कसलं रे? आम्हाला बघून तिला नक्कीच बेडूकच आठवला असता!
आम्हाला बदक म्हणून बदकाचा अप-मान का करतोस रे?
अवांतर : मोदकानं लिहीलंय म्हणून बैल ! सूड नं लिहीलं असतं तर???? ;)
15 May 2012 - 1:24 pm | प्रचेतस
काही स्त्रीदाक्षिण्यच नाही मुळी तुम्हाला.
दोन मुली समोर उभ्या आहेत आणि तुम्ही दोघे खुशाल शिटांवर बसून राहिलात.
16 May 2012 - 12:43 am | मोदक
सूड ला उठवून दोनच्या सीट वर आम्ही तिघे (मी + दोन मुली) अॅडजेस्ट केले असते रे... ;-)
पण त्याची रिझर्वेशन सीट होती, माझे तिकीट त्यानेच काढले होते आणि मेन म्हणजे मी विदाऊट रिझर्वेशन बसलो होतो. आता या परिस्थीतीत मी काही बोललो असतो तर त्याने मला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले नसते का..? :-D
म्हणून मग भिजलेल्या मांजरासारखा शांत बसलो. :-(
26 Nov 2012 - 4:56 pm | इनिगोय
हा धागा आणि प्रतिक्रिया दिसेलसं करता येईल काय?
26 Nov 2012 - 5:11 pm | पुष्करिणी
इनिगोय+१
मला आजकाल बर्याच धाग्यांवर असा प्रॉब्लेम येतोय
22 Feb 2013 - 1:39 pm | मन१
सुंदर धांदर, सुरेख प्रतिसाद.
1 Jun 2015 - 9:00 pm | मोदक
एक आळसावलेला शनिवार..
नेहमीप्रमाणे पुस्तके मिळवण्यासाठी एक रद्दीचे दुकान धुंडाळत होतो.
बरीच जीर्ण, माझ्या उपयोगी नसणारी पुस्तके आणि दिवाळी अंक चाळल्यानंतर धूळभरल्या एका कोपर्यात एक पुस्तक मिळाले.
"शंतनुराव"
शंतनुराव किर्लोस्करांच्या एकेकाळच्या स्वीय सचिवाने त्यांच्या अनवट आठवणी जागवल्या होत्या.
किर्लोस्कर फाऊंडेशनने ते पुस्तक कोणा भाग्यवान माणसाला भेट दिले होते.
त्याच्याकडून रद्दीत आले.
रद्दीवाल्याला ते पुस्तक दाखवले.
रद्दीवाला - "हे आहेत का अजुन..?"
मी - "नाही हो.. हे जावून बरीच वर्षे झाली"
रद्दीवाला - "देव माणूस बघा.."
मी - " ...!!! "
शंतनुरावांबद्दल असा आदर त्या ठिकाणी अनपेक्षीत होता.