आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.डॉ.माधव आत्माराम चितळे यांनी, भारताच्या निर्णयकर्त्या आणि व्यूहरचनात्मक नियोजनकर्त्यांना जलस्त्रोतांची जाण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जलस्त्रोतांची गुणवत्ता आणि उपलब्धता जपण्याची आवश्यकता नियोजनकर्त्यांना विषद केली आहे. जनजागृती केली आहे. १९८० मध्ये त्यांनी, दरसाल राष्ट्रीय-जलसंसाधन-दिन साजरा करण्याची सुरूवात करून दिली. दरवर्षी एक निराळी संकल्पना निवडली. अशा स्वरूपाच्या जलविषयक-माहिती-प्रसार-मोहिमांतून दक्षिण आशियातील शेजारील राष्ट्रेही प्रभावित झालेली आहेत.चितळे यांचा जन्म १९३४ मध्ये झाला. १९५५ साली ते स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा विशेष पात्रतेसह उत्तीर्ण झाले. मग १९५६ मध्ये ते महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवेत (प्रथम वर्ग) रुजू झाले. त्यांनी निरनिराळ्या नदीखोरे प्रकल्पांत, नियोजन, तपास आणि उभारणी संबधित निरनिराळी पदे भूषवली. १९८१ ते १९८३ ते महाराष्ट्र शासनाचे सचिव राहिले. १९८४ मध्ये ते केंद्रिय नदीखोरे आयोगाचे अध्यक्ष झाले. १९८५ मध्ये ते केंद्रिय जल आयोगाचे अध्यक्ष आणि म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचिव नियुक्त केले गेले. १९८९ मध्ये जलसंसाधन मंत्रालयात सचिव झाले. ऑगस्ट १९९२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.त्यामुळे, चितळे हे १९६० पासूनच जल-तपस्येत व्यग्र होते. देशाच्या निरनिराळ्या भागांतील कार्यक्षेत्रातील प्रकल्पांकरता त्यांची नियुक्ती होई. वरिष्ठ अधिकारी मोठ्या शहरात राहतात आणि प्रकल्पस्थळी काम सुरू राहते. अशीच खरे तर प्रथा. मात्र ह्या प्रथेस छेद देऊन चितळे स्वतः प्रकल्पस्थळी राहण्यास जात असत. मग ते १९६१ मधील पानशेत-परिस्थितीचे-पुनर्वसन असो, कोयना-भूकंपग्रस्त-प्रकल्पाचे पुनर्नियोजन असो किंवा भातसा-प्रकल्पाचे कार्यान्वयन असो. जलसंसाधन खात्याची प्रकल्प-कार्यालये मोठ्या शहरांतून हलवून, थेट प्रकल्पस्थळीच नेण्याची त्यांची संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरली.१९६१ मधील पानशेत-खडकवासला धरणफुटीपश्चात पुणेवासियांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु पावसाळा अजून सुरूच असल्याने नद्यांना विपुल पाणी होते. म्हणून शहरवासियांना त्यांच्या पावसाळ्यापश्चातच्या भीषण भवितव्याची जाण नव्हती. उर्वरित वर्षभर पुण्याला पाणी पुरववायचे कसे, ह्याचे उत्तर पावसाळा संपण्याच्या आत शोधून, ताबडतोब उपाय करून, हा यक्षप्रश्न चितळेंनी उद्भवूच दिला नाही. त्यांनी अत्यंत ऊर्जस्वलपणे पाणीपुरवठ्याची साधने पुनर्स्थापित करण्याकरताचे प्रयत्न अल्पावधीतच हाती घेतले आणि ’वेळेत’ यशस्वी करून लक्षणीय कीर्ती मिळवली.१९६० मध्ये मुंबई शहरास ६० किलोमीटर अंतरावरून बंद-जल-वाहिन्यांद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याची योजना वर्ल्ड बँकेच्या विद्यमाने बनवली गेली. चितळेंनी ह्या योजनेत सिंचन-कालवे, जल-विद्युत्-प्रकल्प आणि नदीखालूनच्या बोगद्यांनाही समाविष्ट करवून घेतले. योजना पूर्ण होताच दोन अब्ज लीटर पाणी दरदिवशी मुंबईत खेचले जाऊ लागले. जलाशय आणि मुंबई शहर यांदरम्यानच्या सुमारे २५० वर्ग किलोमीटर क्षेत्रातील लोक आणि शेते यांना अनुक्रमे पिण्याकरता आणि सिंचनासाठी पाणी मिळू लागले. पाणचक्क्या स्वस्त जलविद्युत पुरवू लागल्या.भारत सरकारमध्ये अभियंत्रज्ञ ज्या सर्वोच्च पदावर काम करू शकतो, त्या पदावर त्यांची नेमणूक, १९८९ मध्ये करण्यात आली. ते भारत सरकारच्या जलसंसाधन विभागाचे सचिव झाले. १९९० मध्ये राष्ट्रीय जल महामंडळाची निर्मिती झाली. ही संस्था आणि ती अंमलात आणणार असलेले राष्ट्रीय-जल-नियोजनव्यूह यांना गती देणार्यात चितळे प्रमुख राहिले.गंगा-ऍक्शन-प्लॅन म्हणून ओळखल्या गेलेल्या, भव्य गंगा-जल-शुद्धीकरण-प्रकल्पाचे ते एक संस्थापक आणि संघटक राहिले. ह्या प्रकल्पात पुढे अनेक नद्यांचा समावेश करून एका राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा विकास करण्यात आला. जानेवारी १९९३ मध्ये चितळे यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय सिंचन आणि जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून केली गेली [१]. ही भारतात मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सिंचन आणि जलनिस्सारण प्रणालींचा प्रभावीपणा सुधारणे आणि पूरपरिस्थितींचा यथोचित सामना करणे हेच तिचे उद्दिष्ट आहे.डॉ.चितळेंना त्यांच्या प्रयासांखातर निरनिराळ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. त्यांच्या प्रयासांमुळे भारतात सशक्त जलसंसाधन धोरणे सुरू झाली. जलप्रदूषण नियंत्रण आणि जल-गुणवत्ता-व्यवस्थापन यांचा त्यांत समावेश होता. १९९३ मध्ये जागतिक जलसंधारणातील त्यांचे हे योगदान विचारात घेऊन त्यांना स्टॉकहोम-जल-पुरस्कार जाहीर झाला [२]. जागतिक पाणी परिषदेच्या विकासात आणि जागतिक-जल-सहभागात ते सामिल होते. दक्षिण-आशियातील स्थानिक राष्ट्रीय-जल-सहभागास त्यांनी चालना दिली. महाराष्ट्र राज्य जल आणि सिंचन आयोगाने त्यांच्या अध्यक्षतेखाली, जलविकासाच्या तीस वर्षांची पार्श्वभूमी प्रकाशित केली. जलव्यवस्थापनातील स्वयंसेवी संघटनांच्या वाढीसाठी ते आज कार्यरत आहेत. जल ही एक अनमोल संपदा आहे. या जलसंपदेचं नियोजन करण्यासाठी अभ्यास संशोधन आणि योग्य कृतींची आवश्यकता आहे. भारतातील पाणी या महत्त्वाच्या प्रश्नावर कार्य करणारा हा शास्त्रज्ञ आहे. विज्ञानयात्री- डॉ.माधव चितळे हे पुस्तक डॉ. माधव चितळे यांच्या जल व्यवस्थापनेमधील अभूतपूर्व कार्याविषयी माहिती देते [३].चितळ्यांनी जलसंपदा अभियांत्रिकी या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे. सध्याचा गाजत असणारा मोठी धरणे बांधण्याबाबतचा प्रश्नही सोडवण्यात डॉ. माधव चितळे यांचे योगदान आहे. त्यांचे बहुतांशी कार्य महाराष्ट्राच्या जलसमस्यांविषयक होते. तरीही त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर "जल-विषयक-जागृतीचे कार्य हिरिरीने केले. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराच्या समकक्ष असणारा स्टॉकहोम जल पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या पत्नी सौ.विजया ह्यांनी, त्यांच्या लग्नास ५० वर्षे पूर्ण करत असतांना म्हणजेच ३१ डिसेंबर २००९ च्या प्रसंगाचे निमित्ताने प्रकाशित केलेल्या 'सुवर्णकिरण' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात, ह्या सर्व गोष्टींचा हृद्य आणि चित्तवेधक सारांश वाचायला मिळू शकेल [४].भूतलावर आज ७ अब्ज लोक राहतात. २०५० पर्यंत त्यांत आणखी २ अब्ज लोकांची भर पडणार आहे. सांख्यिकीशास्त्र सांगते की आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसाला २ ते ४ लीटर पाणी पितो. मात्र आपण पितो ते बव्हंशी पाणी आपल्या अन्नात असते. उदाहरणार्थ १ किलो मांस तयार होण्यास १५,००० लीटर पाणी लागते, तर १ किलो गव्हाच्या निर्मितीकरता १,५०० लीटर [५].जगातील अब्जावधी लोक आजच बद्धमूल उपासमारीत जगत आहेत आणि पाण्याच्या स्त्रोतांवर त्याचे दडपण आहे. ही समस्या इतरत्र असल्याचे सोंग आपण घेऊ शकत नाही. समस्या आपल्या आसपासच आहे. लोकसंख्यावाढीची समस्या सोडवणे आणि आपल्या प्रत्येकाकरता अन्नसुरक्षा निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच हाती घ्यावा लागणार आहे असा एक कार्यक्रम जागतिक पाणी संघटनेने (यू.एन.वॉटर- युनायटेडनेशन्स वॉटर ऑर्गनायझेशन) घोषित केलेला आहे. तो असाः१. आरोग्यपूर्ण, सातत्याने घेता येईल असा आहार अंगिकारणे.२. कमी-पाणी-खर्चिक-उत्पादनेच वापरणे.३. अन्नाचा नाहक अपव्यय टाळणेः जगातील ३०% अन्नपदार्थ कधीच खाल्ले जात नाहीत, त्यामुळे त्यांच्या निर्मितीकरता वापरलेले पाणी निश्चित स्वरूपाने व्यर्थ जाते.४. उत्कृष्ट गुणवत्तेचे, अधिक अन्न, कमी पाणी वापरून निर्माण करणे. ५. पाणीपुरवठा साखळीतील संचय, वाहतूक, वितरण व वापर ह्या सर्व कृतींत पाणी वाचवणे.ह्या सर्व उपायांनी आपण सार्यांनीच जर पाणी वाचवण्याचा निश्चय केला तर, चितळे ह्यांच्या कामाप्रती आपण यथोचित कृतज्ञता व्यक्त केली असे म्हणता येऊ शकेल.निरनिराळ्या प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय नेत्यांना स्वीकारार्ह वाटेल असे, अजातशत्रू, तांत्रिक नेतृत्व देऊन चितळेंनी भारतातील जल-संसाधन-धोरणास वांछनीय स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. मुंबईत २६-०७-२००५ रोजी एकाच दिवशी एक मीटरहून अधिक पाऊस पडून झालेल्या ढगफुटीच्या साद्यंत चौकशी आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निर्णयास संबंधित सगळेच पक्ष स्वीकारतील म्हणूनच त्यांची नियुक्ती झालेली होती. त्यांच्या नैसर्गिक न्यायबुद्धीवर आणि तांत्रिक ज्ञानावर सगळ्यांचाच अपार विश्वास होता. कोलंबोत झालेल्या दक्षिण-आशियाई-जल-सहभाग-परिषदेत तर, पाकीस्तानच्या समितीने, "चितळे अध्यक्ष होत असतील तर आम्हाला चालतील" [४] अशी भूमिका घेतली होती. अशा ज्ञानवंत, विज्ञानवंत, समाजहितैषी, प्रगल्भ व्यक्तीमत्वास, जागतिक-जलदिनी माझा मानाचा मुजरा.अशाच, निष्ठेने विधिलिखित कर्तव्ये पार पाडणार्या लोकांच्या, सशक्त आधारावर भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे. त्यांच्या उन्नत वारशाचा आपणा सार्यांस अभिमान असायला हवा!संदर्भवाचनः१. http://www.siwi.org/sa/node.asp?node=70 स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट या संस्थेचे संकेतस्थळ२. http://www.icid.org/past_sg.html#chitale इंटरनॅशनल कमिशन ऑन इर्रिगेशन अँड ड्रेनेज या संस्थेचे संकेतस्थळ३. विज्ञानयात्री - डॉ.माधव चितळे, अ.पां.देशपांडे, राजहंस प्रकाशन, पुष्ठेः१२०, किंमत: रु.१००/- फक्त४. सुवर्ण किरणे, सौ.विजया माधव चितळे, साकेत प्रकाशन, पृष्ठेः २९६, पहिली आवृत्तीः २०१०, किंमतः रु.२७५/- फक्त५. http://www.unwater.org/worldwaterday/ यू.एन.वॉटर, ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या २८ निरनिराळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी बनलेली संघटना आहे. हा दुवा त्या संघटनेच्या संकेतस्थळाचा आहे.
http://nvgole.blogspot.com/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
22 Mar 2012 - 11:48 am | विसुनाना
माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मूलभूत अशा 'पाणी' या स्त्रोताचे नियोजन आंतरराष्ट्रीय पातळीवरून करणार्या या आधुनिक भगिरथास मानाचा मुजरा.
22 Mar 2012 - 12:47 pm | मूकवाचक
(आधुनिक भगिरथ ही उपमा आवडली.)
22 Mar 2012 - 11:52 am | अन्या दातार
आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या निमित्ताने खरोखर सुंदर ओळख करुन दिलीत एका अवलिया व्यक्तित्वाची.
22 Mar 2012 - 12:56 pm | अमोल केळकर
असेच म्हणतो. धन्यवाद :)
अमोल केळकर
22 Mar 2012 - 12:37 pm | रणजित चितळे
आवडली.
22 Mar 2012 - 2:46 pm | पैसा
चितळे यांचं व्यक्तिमत्त्व खरंच प्रेरणादायी आहे.
22 Mar 2012 - 4:26 pm | स्वातीविशु
आधुनिक भगिरथाला मुजरा. छान माहिती.
23 Mar 2012 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिनानिमित्त चितळेंच्या कार्याविषयीचा उत्तम लेख.
आभार.....!
-दिलीप बिरुटे
23 Mar 2012 - 3:33 pm | सहज
आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिनानिमित्त चितळेंच्या कार्याविषयीचा उत्तम लेख.
आभार.....!
23 Mar 2012 - 10:15 am | नरेंद्र गोळे
विसुनाना, मूकवाचक, अन्या दातार, अमोल केळकर, रणजित चितळे, पैसा, स्वातीविशु आणि डॉ.बिरुटे
सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
विसुनाना, तुम्ही वापरलेला "आधुनिक भगिरथ" शब्द अत्यंत समर्पक आहे. आवडला.
23 Mar 2012 - 3:39 pm | बॅटमॅन
त्या आधुनिक भगीरथाला अनंत सलाम आणि त्यांच्यावर लेख लिहिल्याबद्दल +१^१०० टु नरेन्द्र गोळे :)