मंडळी,
नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय. यालासुद्धा कारणीभूत असणारी दिव्य मंडळी म्हणजे हे ग्रह, तारे वगैरे आकाशस्थ पार्टी.
आपापल्या दिलेल्या कक्षेत गपगुमान फिरणारी, बाकी जगाच्या खोड्या सोडा पण एकमेकांच्यादेखील वाटेला ना जाणारी, जमलंच तर अधूनमधून मानवजातीकडे पाहून भुवया उडवणारी, सूर्याभोवती फिरणारी त्याची पोरं पाहीली की ही जनता कुणाच्या राशीला लागेल, किंवा कुणाला वक्री वगैरे जाईल असं मुळी वाटतच नाही. किंबहुना, शनी आणि मंगळ ग्रह जर दुर्बीणीतून पाहीले तर त्यांच्या मूळ सौंदर्यापुढे नतमस्तक व्हावं वाटतं, त्यांच्याबद्दल उगाच पसरवलेल्या भितीपोटी नाही. शनी-मंगळ युती, सूर्य-बुधाचं एकत्र येणं, सध्या आकाशात एकत्र आलेले शुक्र आणि गुरु आणि अजून कोण कोण कुणाकुणाच्या गळ्यात गळे घालून फिरतायेत अशी सेलेस्टियल हार्मनी 'याची देही याची डोळा' एकदा पाहून बघा महाराजा; एकदम ओरिगिनल, इमिटेसन नाय!
तर, आमच्या सोत्रिमित्राप्रमाणेच नमनालाच घडा उलटा करुन झाल्यावर आजच्या मूळ विषयाकडे वळूयात. आपण रोजच्या भाषेत वापरतो ते राशीला 'लागणे', नक्षत्रासारखे दिसणे, झगामगा मला बघा असणे, असले आणि अनेक वेगवेगळे वाक्प्रचार वापरतो, किंवा "सत्ताविसातून नऊ गेले तर खाली उरलं काय?" सारख्या बिरबलाच्या गोष्टी ऐकतो, मराठी क्यालेंडरं, ऋतू, सण साजरे करतो यात कुणाचा हात आहे सांगा पाहू?
सध्या आपण जी मराठी दिन-दर्शिका वापरतो, सध्या म्हणजे गेली हजार दोन हजार वर्षं आपण जी दिन-दर्शिका वापरतोय, त्यात १२ मराठी महिने आहेत. त्या १२ महिन्यांची नावं जर आपण जरा बारकाईने पाहीली तर आपल्या लक्षात येईल की ही नावं तर नक्षत्रांवरुन आली आहेत. उदाहरणार्थ, चित्रा नक्षत्रावारुन आलाय तो चैत्र महिना, विशाखा नक्षत्राचा वैशाख, ज्येष्ठा नक्षत्रानं नाव दिलं तो ज्येष्ठ आणि पूर्वाषाढा(पूर्वा) नक्षत्र असणारा आषाढ. असे बाराच्या बारा महिने बारा वेगवेगळ्या नक्षत्रांकडून नावं उसनी घेऊन आलेत. हे त्याचं कोष्टक :
(नक्षत्र - महिना याप्रमाणे)
चित्रा - चैत्र
विशाखा - वैशाख
ज्येष्ठा - ज्येष्ठ
पूर्वाषाढा (पूर्वा-आषाढा) - आषाढ
श्रवण - श्रावण
पूर्वा-भाद्रपदा - भाद्रपद
आश्विनी - आश्विन
कार्तिक - कृत्तिका
मृगशीर्ष - मार्गशीर्ष
पुष्य - पौष
मघा - माघ
पूर्वा-फाल्गुनी - फाल्गुन
आपल्याला माहीती असलेल्या नक्षत्रांपैकी ही १२ नक्षत्रं. बाकी १५ को क्या हुएला है? तीसुद्धा आहेत. मग तुम्ही नक्की विचारणार, की याच १२ नक्षत्रांचं काय कौतुक? अर्थात, याला कारणीभूत आहे तो चंद्र. येस्सार, हाच तो चंद्र. जो पृथ्वीभोवती फिरतो, अधूनमधून ग्रहणं दाखवतो, बाकी महिन्याकाठी आपल्या कलांचं प्रदर्शन मांडून बसतो, रोम्यांटीक शीन करुन प्रेमात पडलेल्यांना जळवतो, पिच्चरमधून गाणीगिणी करायला लावतो वगैरे वगैरे.
हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे चंद्राच्यादेखील आपसूकच सूर्याभोवती फेर्या होतात. पण हे सूर्याभोवती फिरताना चंद्राची थोडी धावपळच होते. म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरताना समजा, एका बिंदूपासून सुरुवात करुन गोल फेरी मारून परत तिथेच आला, तर पृथ्वी तर सूर्याभोवती फिरतफिरत पुढे गेलीये ना. मग याला अजून जास्त अंतर काटून तो सापेक्ष बिंदू गाठावा लागतो. आता किती पण पळापळ केली तरी साला लेट झाला तो झालाच. असा चंद्र आपल्या आकाशात रोज थोडाथोडा उशिरा उगवतो. असं करत करत तो दर महिन्याला भलत्याच तारखा-समूहात उगवतो. म्हणजे तो उगवतो त्यावेळेला त्याच्या बॅकग्राऊंडला जो कोण तारका-समूह असेल तो. आता अशा प्रत्येक तारका-समूहाचं आपल्याला जे कौतुक, की आपण आपल्या महिन्यांना त्यांची नावं देऊन टाकली.
आकाशात अनेक तारकासमूह आहेत. म्हणजे बघा, एकदम जगन्मान्य असे ८८ तारखा-समूह आहेत. अधिक जनरल क्याटलॉगप्रमाणे तर विचारुच नका. त्यात भर म्हणजे आपण दर रात्री वेगवेगळे तारे "ये तारा, वो तारा, हर तारा" प्रमाणे जोडत वाटेल ते आकार तयार करु शकतो. आता या इतक्या तारका-समूहातून बरोबर सत्तावीसच कसे काय बरं शोधून काढले असतील? अभी इसकू भी ये चंद्रच कारणीभूत हय. आणि याच्या जोडीला बाकीचे ग्रह आणि सूर्य. हे सगळे आकाशातून एका रांगेत गेल्यासारखे जातात. काय चार-सहा डिग्री इकडे-तिकडे. आकाशातल्या या काल्पनिक रेषेवर जितके तारका-समूह आहेत ते या सत्तावीस भागात विभागून टाकले आणि झाली सत्तावीस नक्षत्रं. या सत्ताविसांना बारा लिफाफ्यात बंद केलं ते बारा लिफाफे म्हणजे आपल्या राशी.
याच बारा राशी आणि त्यातलि ही सत्तावीस नक्षत्रं यांची आणि तुमची गाठभेट करुन देण्यासाठी हा लेखनप्रपंच. मला लिहिण्याची मजा आहेच, तुम्हाला वाचायची येत असेल तर उत्तमच.
चार-पाच लेखात आपण या सगळ्यांना भेटून येऊ. लिखाण जर फारच टेक्निकल होत असेल, समजायला अवघड वगैरे वाटेल तेव्हा जरुर सांगणे.
क्रमश:
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
13 Mar 2012 - 6:14 am | आबा
मजा येतेय वाचायला !
13 Mar 2012 - 7:43 am | प्राजु
सुरुवात चांगली झाली आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
13 Mar 2012 - 7:53 am | अशोक पतिल
वाचनीय .छान , अजुन येउ द्या !
13 Mar 2012 - 8:13 am | प्रचेतस
भारी सुरुवात.
13 Mar 2012 - 8:29 am | अन्या दातार
तारखा-समूह हा काय प्रकार आहे ब्वॉ? १ जानेवारी-७ जानेवारी, २१ फेब्रुवारी-२७ फेब्रुवारी,... असं का? ;)
अजुन एकः चंद्र पौर्णिमेत ज्या नक्षत्रात असतो त्यावरुन महिना ठरतो, असं काहीतरी लॉजिक ऐकल्याचे अंधूकसे आठवतेय. जरा प्रकाश टाकता का?
13 Mar 2012 - 8:32 am | प्रचेतस
तारका समूह आहे भाऊ ते.
13 Mar 2012 - 3:15 pm | अमोल केळकर
अन्या भाऊ साधारणपणे
असे म्हणता येईल की चैत्र महिन्यातल्या पोर्णीमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. कार्तीक महिन्यातील
पोर्णीमेला चंद्र कृतिका नक्षत्रात असतो इ.इ.इ.
अमोल
14 Mar 2012 - 4:12 am | असुर
परफेक्ट! पोर्णिमेलाच धरुन आपल्याकडे महिने मोजतात. हे कसं ते पुढेमागे कधी सांगता आलं तर बघतो.
आणि अन्याभाव, टायपो झाला ना रौ तो तारखा-समूहाचा! :-) जोर्रात स्वारी बगा!
संपादक्स लोक या टायपो मिष्टेकीला सुधारण्याचा मौका देतील काय? प्लीज्ज!!
--असुर
13 Mar 2012 - 7:08 pm | किचेन
अंगात वपा शिरलाय का? ;)
13 Mar 2012 - 9:13 am | चौकटराजा
मस्त विषय निवडला आहे. पण ज्याला आंतरजाल वापरण्याची आवड आहे व त्याचवेळी खगोलशास्त्राची आवड आहे त्याला ही माहिती नवीन
नाही. असे अनेक जण मिपावर असू शकतील. तरीही आपल्या यत्नाला दाद अशासाठी की यातूनच एखादा खगोलशास्त्र प्रेमी निर्माण होउ शकतो.
बक अप !
13 Mar 2012 - 9:41 am | सूड
नक्षत्रानुसार महिन्यांची नावं असतात हे मान्य पण त्याहीपेक्षा त्या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा एकदोन दिवस मागेपुढे जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रावरुन त्या महिन्याचं नाव येतं. उदा. या महिन्याच्या पौर्णिमेला /पपौर्णिमेनंतर पूर्वा-फाल्गुनी नक्षत्र असेल.
13 Mar 2012 - 9:52 am | गवि
अतिशय मस्तशा शैलीत तू हे सांगतोयस.. त्यामुळे एकदम इंटरेस्टिंग होऊन गेलंय.. आता पुढच्या भागांची वाट अत्यंत उत्सुकतेने पाहतो आहेच. पण त्याचसोबत तेज्यायला आपल्या शाळांमधे अशा पद्धतीने का शिकवत नाहीत याचं वाईट वाटायला लागलंय...
14 Mar 2012 - 3:25 pm | मेघवेडा
तंतोतंत.
13 Mar 2012 - 10:34 am | अमृत
आणि इंटरेस्ट सुद्धा.
अमृत
13 Mar 2012 - 10:46 am | हुप्प्या
हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावतो आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतील राशी आणि आपल्या राशी अगदी सारख्या नावाच्या कशा?
कोणी कुणाकडून उचलल्या आहेत का? अरब, पर्शियन लोकही अशाच राशी मानायचे का?
बाकी लेख ज्ञानवर्धक.
13 Mar 2012 - 1:15 pm | चौकटराजा
आकडेही सारखे आहेत. वारातही साम्य आहे. अमेरिका व ऑस्ट्रेलिया सोडली तर इतर जगाचे एकमेकाशी संबंध होते. मराठी भाषेत कितीतरी शब्द फारसी आहेत. आपण २७ नक्शत्रे मोजतो ते ८८ मोजतात . शेवटी हा खरा ओरिएंटेशन चा खेळ आहे. मूळ खगोलशास्त्रात या फिगर्सना काहीही अर्थ नाही. या सोयीच्या खुणा आहेत.
13 Mar 2012 - 7:12 pm | किचेन
मला पण ....राशीची चित्र पण त्यांची आणि आपली सेमच.बर या ज्यातीशी लोकांना पूर्वी काहीही तांत्रिक साधन नसताना कस काय कळायचं कधी चंद्र उगवणार कधी सूर्य मावळणार,कधी ग्रहण लागणार वगैरे?
13 Mar 2012 - 7:14 pm | बॅटमॅन
पाश्चिमात्य संस्कृतीतील जवळपास सर्वच गोष्टींप्रमाणेच राशीदेखील ग्रीकांपासूनच आलेल्या आहेत. आणि त्या राशी आपण ग्रीकांपासून घेतलेल्या आहेत. याला पुरावा म्हणून Mathematics Historian Kim Plofker यां च्या पुस्तकातील हा भाग पहा.
http://www.dam.brown.edu/people/mumford/Math191/lectures/Lecture3.pdf
संस्कृत मधील ज्योतिषाचा इतिहास वाचण्यासाठी हा पेपर पाहू शकता.
http://www.columbia.edu/itc/mealac/pollock/sks/papers/Minkowski-Astronom...
याच्या पान क्र. ३ वर आपल्या शंकेचे उत्तर आहे.
13 Mar 2012 - 10:47 am | यकु
लई भारी सुरुवात झालीय.
वाचायला मजा येणार.
पुलेशु
पुभाप्र
बाकी ग्रहांच्या फिरण्याचा माणसाच्या भाग्यावर/मनावर/वर्तनावर परिणाम होतो की नाही वादात न पडता, विशेषत: चंद्राच्या पूर्ण-अपूर्णतेचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो हे तसा परिणाम झालेल्या माणसाने म्हटलेलं आहे.
पटण्या न पटण्याचा मुद्दा नाही.
13 Mar 2012 - 11:01 am | श्रावण मोडक
वाचतो आहे. पुढचा मजकूरही इतरत्र पूर्वप्रसिद्ध असेल तर व्यनित लिंक दे. इथं वाट पाहण्यापेक्षा ते उत्तम. :)
13 Mar 2012 - 11:46 am | रणजित चितळे
मस्त आहे लेख
असुर व बाकी मिपा कर....
http://www.stellarium.org/
हे प्लॅनेटरी पोझीशन दाखवणारे सॉफ्टवेअर खूप रोचक आहे. बघा आपल्याला आवडेल.
13 Mar 2012 - 6:54 pm | चौकटराजा
मी आजच हे सॉफ्टवेअर उतरविले आहे. अजून त्यातील खाचाखोचा माहित झालेल्या नाहीत. पण त्यात फक्त पॅरीसचीच स्थिति दिसते काय ?
13 Mar 2012 - 7:04 pm | अन्या दातार
त्यात स्थान बदलू शकता. भरपूर काही करता येते त्या सॉफ्टवेअरमध्ये. शिकाल हळूहळू. मज्जा येते मग!
(स्टेलारिअमचा चाहता) अन्या
13 Mar 2012 - 12:50 pm | तर्री
लेखमाला वाचण्यास आतुर आहे.
पु.भा.प्र.
13 Mar 2012 - 1:03 pm | प्रभो
मस्त बे
13 Mar 2012 - 2:02 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय.
13 Mar 2012 - 2:02 pm | विसुनाना
लेखमाला माहितीपूर्ण असून मनोरंजक मांडणीने खुललेली आहे.
13 Mar 2012 - 2:10 pm | गणपा
वाचतोय.
13 Mar 2012 - 2:48 pm | चेतन
उत्तम लेख.
पूर्वा-फाल्गुनी - फाल्गुन म्हणजे पुर्वा नक्षत्र का?
मला आठवतात त्याप्रमाणे नक्षत्रे यातली फक्त मृग आणि कृतिका आकाशात मला ओळखता येतात. :-(
१. अश्विनी,
२. भरणी,
३. कृतिका,
४. रोहिणी,
५.मृग
६.आद्रा,
७.पुनर्वसु,
८.पुष्य,
९.अश्लेषा,
१०.मघा,
११.पुर्वा
१२. उत्तरा,
१३. हस्त,
१४.चित्रा,
१५.स्वाति,
१६.विशाखा,
१७.अनुराधा,
१८.ज्येष्ठा,
१९.मूळ,
२०. पुर्वाषाढ़ा,
२१. उत्तराषाढ़ा,
२२. श्रवण,
२३. धनिष्ठा,
२४. शततारका,
२५. पुर्वाभाद्रपदा,
२६. उत्तराभद्रपदा,
२७. रेवती
२८. अभिजीत
चेतन
अवांतरः मिपावर यातली उरलेली बरीच नक्षत्रे आहेत त्यावर कोणितरी लिहा रे ;)
13 Mar 2012 - 7:02 pm | चौकटराजा
कृतिका व मृग यामधे कोनासारखी फिगर त्यातील लाल रंगाचा ठळक तारा म्हणजे रोहिणी.
सिंह राशीतील सिंहाच्या पायातील तेजस्वी तारा म्हणजे ज्येष्ठा .
14 Mar 2012 - 4:06 am | असुर
मालक, तो तारा म्हणजे मघा. ज्येष्ठा वृश्चिकेत! :-)
--असुर
13 Mar 2012 - 7:13 pm | प्रीत-मोहर
मस्त लेख रे असुर्या. पुढचे भाग येवुंदेत लौकर :)
13 Mar 2012 - 8:21 pm | पैसा
तुझी लिहायची इश्टाईल पण एकदम झक्कास! फक्त काही आकृत्या, चित्रं वगैरे दिलंस तर आणखी आकर्षक होईल. (हे आता मी सांगायला पाहिजे का?)
13 Mar 2012 - 8:23 pm | रेवती
वाचतेय.
13 Mar 2012 - 10:58 pm | मन१
मस्त अगदि ओघवत्या भाषेत लिहिलत.,
जाम आवडलं. युरोपीय व आशियायी नक्षत्रांबद्द्ल आढळणार्या समानतेबद्दल वरतीच शंकानिरसन झालेलेच आहे, त्याच्याशी सहम्त.
14 Mar 2012 - 1:19 pm | स्वाती दिनेश
सुरुवात झकास..
रोचक माहिती, तितकीच लेखाची मांडणीही रोचक! वाचायला मजा आली.
स्वाती
14 Mar 2012 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला आंतरजाल वापरण्याची आवड आहे व त्याचवेळी खगोलशास्त्राची देखील आवड आहे त्यामुळे ही माहिती नवीन
नाही. तसेच पल्याडच्या निंदकांच्या संस्थळावरती आमचे येणे जाणे असल्याने अदितीचे काही लेख देखील वाचलेले आहेत.
असो....
पुढचा भाग कधी ?
16 May 2012 - 10:22 pm | सागर
असुरा,
पुन्हा आलास तू तुझ्या होम पीच वर
आनंद वाटला. अवश्य लिही. पुढच्या भागांची आवर्जून वाट पहातो आहे :)
सुरुवात तर एकदम झकास झाली आहे.
माझाही हा आवडता विषय आहेच. माझ्या अल्पमतीप्रमाणे या विषयावर अवश्य चर्चेत भाग घेईन.
पुढील भागांचे लेखन लवकर कर असा आग्रह.
अवांतर सूचना : लेखात चित्रांचा वापर करु शकलास तर खूप छान होईल. काही संकेतस्थळांचे दुवे देत आहे त्यावर अनेक नकाशे व माहिती उपलब्ध आहेत, त्याचा वापर करु शकलास तर तुझ्या मूळच्याच सोप्या शैलीला चित्रांमुळे अजून सोपेपणा येईल.
१. अर्थस्काय - उदाहरणादाखल या संकेतस्थळावरील हा दुवा बघ
२. स्टारमॅप - उच्च दर्जाच्या इमेजेसचा हा थेट दुवा
३. युवर स्काय
४. ग्रॅव्हिटी
अजून थोडे महत्त्वाचे दुवे
५......किड्स कॉसमॉस
६......आऊटर स्पेस युनिव्हर्स या साईटवर हा एक सुंदर नकाशा आहे
17 May 2012 - 1:23 pm | मनराव
वाचतो आहे.......
कोणी गुगल स्काय मॅप आपल्या फोन वर इन्स्टॉल करुन पाहिलं आहे का....??
रात्री तारे दिसतात तेव्हा वापरुन पहा.. ग्रह, तारे, नक्षत्र, राशी उत्तम दाखवतो..... तसा दिवसा हि दाखवतो पण रात्री पहिले कि खरच बरोबर दाखवतो आहे याची खात्री होईल.....
17 May 2012 - 3:06 pm | बालगंधर्व
मला कुनी अभिजित नशत्राबद्दल सांगू शकेल का? ते कुणाच आअहे का? माझ्या माहितीप्रमणे आजपर्यन्त तरी मी कुनाचच अभिजित नशत्र अस्लेल पाहिल नाही. जर हे नशत्र खरच हआहे तर मग कुणी यानशत्रावर का जनमत नाही ?
17 May 2012 - 3:07 pm | बालगंधर्व
आणि अजुन एक कि या नशत्राची रास कोनती अस्ते?