दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा.
चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय.
चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो. कलाकार पळून जातात.
चित्र तिसरे: लंडन, एक जोडपे बागेत हिंडत आहे.
या चित्रांपासून अजून काहीही बोध होत नाही, पण एकंदर पुढचा घटनाक्रम या तीन ठिकाणांमध्ये फिरणार हे कळलंय.
लंडन मधील एका ग्रोसरी शॉप मध्ये एक माणूस येऊन तिथल्या मालकाला सांगतो कि “तुझी मुलगी एका गोऱ्या मुलाबरोबर फिरतेय. त्यामुळे इस्लाम धर्म बुडतोय. आणि तुझ्या मुलीचे आणि तुझे उदाहरण देऊन माझी मुलगी माझे तोंड गप्प करतेय.” लगेच हा बाप मुलीच्या कॉलेज मध्ये जाऊन नक्की काय आहे प्रकरण ते बघतो आणि मुलीला घरी घेऊन येतो.
मगासच्या लाहोरमधील चित्राचा उलगडा पुढे होतो. हे दोघे भाऊ प्रथितयश गायक असतात. आणि त्यांच्या एका मित्राचे (शेरशहा) गाणे एका मौलवीने बंद केले आहे आणि याच कारणासाठी त्या मौलावीशी दोघांपैकी एका गायकाला भांडायचं आहे.
परत लंडन. मुलीच्या भवितव्याची सो कॉल्ड चिंता करणारा बाप बायकोशी बोलतोय. तिला मुलीला समजावण्यासाठी प्रयत्न करायला सांगतोय. पण बायको पक्की ब्रिटीश. बापाला मुलीने गैरइस्लामी मुलाशी लग्न करू नये यावर बाप ठाम आहे. आणि यासाठी लंगड्या सबबी देतोय. मुख्यत्वेकरून धार्मिक आणि पाकिस्तानी अस्मितेची करणे. मुलगी बाहेर हे सगळे ऐकतेय, पण काही करायचं या विचारात.
पुन्हा लाहोर. वजीर खान मशिदीत परदेशी पत्रकार जिहाद बद्दल एक इंटरव्ह्यू घेतेय. मौलवींची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. जिहाद सुरु होण्यामागे अमेरिकाच कशी जबाबदार आहे आणि जिहाद का महत्वाचा आहे यावर मौलवी भाष्य करत आहेत. या भागात आपली इतिहासाची उजळणी होते; पत्रकारांचा दुटप्पीपणाही समोर येतो. याच दरम्यान एक संगीतकार युवक मित्र शेरशहा बरोबर मौलवींची भेट घ्यायला येतो.
परत लंडन. व्यापाऱ्याचे घर. टीव्हीवर एका प्रोग्राम मध्ये या दोघा भावंडांची मुलाखत चाललेली. इथे एक उलगडा होतो. हे दोघे त्या व्यापाऱ्याचे पुतणे आहेत. पण या व्यापाऱ्याला त्यांची नवे माहित नाहीत. मुलीला सुद्धा आपले भाऊ संगीतकार-गायक आहेत हे बघून आनंद होतो.
लाहोर मधल्या मशिदीत खुतब्यासाठी आमंत्रण असल्याने आलेला हा संगीतकार युवक सरमत. आणि तिथून सुरु होतो त्याचा एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास; एक जिहादी बनण्याकडे चाललेला. दरम्यानच्या काळात सख्ख्या भावाशी तुटत चाललेला संवाद, एक अपराधीपणाची वाढत चाललेली भावना फार सुन्दर टिपली आहे दिग्दर्शकाने. या मुलाशी कसे वागावे या विवंचनेत असलेले इतर कुटुंबिय ‘येईल पुन्हा मूळ पदावर’ या आशेवर. आपण जे करतोय ते चूक कि बरोबर याचा निर्णय होत नाहीये. नक्की कुठली बाजू बरोबर आहे? मौलवींची कि आपल्या कुटुंबियांची? यावर त्याची समजूत काढताना मौलवी जे उत्तर देतात त्यातील एक वाक्य फार आवडले: “औरत से महोब्बत करते वक्त दिल से फैसला करते हो, अल्लाह कि दफा दिमाग याद आ जाता है!” आणि त्याला घरच्यांपासून लांब राहायचा सल्ला देतात. आणि त्याला आपल्या मशिदीत आश्रय देतात. सरमत आता विविध खळ-खट्याक छाप गोष्टींमध्ये सहभाग घेत असतो. इकडे घरी काका हुसेन (लंडन मधील व्यापारी) त्याच्या मुलीला तिच्या प्रियकराबरोबर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन १० दिवसांसाठी पाकिस्तानात आणतो.
घरी हुसेन आपल्या भावाकडे आपण खोटे बोलून मेरीला पाकिस्तानात आणल्याचे सांगतो, त्यामागची त्याची भूमिकाही स्पष्ट करतो. पुतण्यांपैकी एकाशी मेरीचा निकाह व्हावा अशी गळ घालतो. शेवटी हुसेनचा भाऊ त्याच्या मोठ्या मुलाशी, मन्सूरला विचारण्याचे वाचन देतो. पण आपण कुणावरही जबरदस्ती करणार नसल्याचे स्पष्ट करतो.
बोलता बोलता मन्सूरला मेरीच्या प्रियकराबद्दल कळते. आणि जेंव्हा काकाचा इथे येण्याचा हेतू कळतो तेंव्हा तो स्पष्टपणे या गुन्ह्यात सहभागी होण्यास नकार देतो. काका हुसेनने कितीही धर्माचा बागुलबुवा दाखवला तरीही बधत नाही. शेवटचा उपाय म्हणून हुसेन, इस्लामच्या कह्यात गेलेल्या आपल्या दुसऱ्या पुतण्याशी, सरमत बरोबर बोलतो. पुन्हा मौलवी साहेबांशी चर्चा करून तिच्या न समजेल अश्या पद्धतीने निकाहबद्ध होण्यासाठी काकासह वजिरीस्तान सारख्या दुर्गम ठिकाणी नेतो; जेथे निर्विघ्नपणे हा सोपस्कार उरकता येईल आणि कोणाला कळणारही नाही. आणि अश्या प्रकारे एकदाचे फसवणुकीचा प्रकार करून मेरीचा निकाह सरमतबरोबर संपन्न होतो. सरमतचा हळवेपणा अजून संपलेला नाहीये. त्या दोघांची मने जुळेपर्यंत तो थांबण्यास तयार आहे. आणि हा निकाह त्याने फक्त आणि फक्त त्याच्या सुखासाठी केलेला नाहीये.
सरमतचा मोठा भाऊ मन्सूर संगीत शिकण्यासाठी शिकागो मध्ये येतो. तिथे त्याची ओळख एका अमेरिकन मुलीशी(जेनी) व अपार्टमेंट शेअर करणाऱ्या एका भारतीय पंजाबी माणसाशी होते. इकडे मेरी शेरशहाच्या घरच्यांशी ओळखी करून घेत, वातावरणाशी, संस्कृतीशी जुळवून घेत दिवस काढत असते; पण डोक्यात एकच विचार पक्का आहे, पळून जायचा आणि बदला घेण्याचा!! हे ति सरमतकडे कबुल सुद्धा करते. पण सरमतला विश्वास आहे कि या ठिकाणाहून ति दूर जाऊ शकणार नाही. सरमतने आता घरातून बाहेर पडून जिहादी कार्याला वाहून घेतलेले आहे. जेनी व मन्सूर संगीताचा सराव करता करता एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे काळात नाही. मेरी घरातील सर्व स्त्रियांना आपलेसे करून पळून जायचा एक अयशस्वी प्रयत्न करते. आता मात्र सरमतचा नाईलाज होतो. मेरी पळून जाऊ नये याच एका motive ने तिच्यावर जबरदस्ती करतो.
अकरा सप्टेंबरची घटना घडल्यावर अमेरिकेत मुसलमान लोकांविरुद्ध विखारी प्रचाराचे पत्रक जेनीच्या हातात पडते. तिच्या मनातल्या शंकेचे निराकरण मन्सूर करतो. जेनी व मन्सूर लग्न करतात. त्या रात्री अपार्टमेंटमध्ये शिरताना पंजाब्यांच्या रागाचा आणि नशेचा शिकार बनतो. तू एक दहशतवादी आहेस असेही सुनावतो. नेमके हेच वाक्य एक ‘सुजाण व जागरूक’ बाई ऐकते आणि पोलिसांना फोन करते. इथून चालू होतात मन्सूरच्या दुर्दैवाचे दशावतार.
अफगाणिस्तान विरुद्ध अमेरिकेने युद्ध छेडले. त्यामुळे अर्थातच सरमत इस्लामचे रक्षण करण्यासाठी शेरशहाबरोबर युद्धभूमीवर जातो. ब्रेन वॉशिंग चा नवा अध्याय इथे दिसतो. तोवर मेरीचा पाळणा हललेला आहे. आता पळून जाणे सहजशक्य राहिले नाही हे ताडून ति वडिलांना लिहिलेले पत्र पोस्ट करायला सांगते. सरमत आपल्यासमोर दिसणारे मृत्यूचे तांडव सहन करू शकत नाही. पण जेंव्हा त्याच्यावर स्वतःचा जीव वाचवायची वेळ येते आणि दोस्त शेरशहासुद्धा हातावर हात ठेवून फक्त बघत राहतो, तेंव्हा मात्र याच्या हातून एक जीव घेतला जातो. मारणारा सुद्धा अल्लाहचा बंदा आहे हे कळून चुकल्यावर मात्र सरमतला राहवत नाही. तो पळ काढून बाहेर पडतो.
मेरीने वडलांना म्हणून लिहिलेलेपत्र वास्तविक तिच्या प्रियकराला, डेव्हला लिहिलेले असते. मग मात्र लंडन वरून उच्चस्तरीय सूत्रे हलतात. मेरीची सुटका होते व लंडनला जाते. पण अजून फक्त सुटकाच झालीये, बदला अभी बाकी है! मेरी सरमतवर बलात्कार व पळवून नेण्याचा आरोप करून लाहोरच्या कोर्टात केस दाखल करते. मौलवी साहेब त्याच्या सुटकेसाठी जामीन देतातच, शिवाय मेरीच्या मुलीचा ताबा मिळावा म्हणून एक उलट-तक्रार दाखल करतात. घरच्यांना मन्सूरबद्दल अजूनही काही माहिती मिळालेली नसते. जेनी स्वतः मूकमोर्चा, निदर्शने करून मन्सूरच्या सुटकेचे निष्फळ प्रयत्न करते.
लाहोरमध्ये खटला सुरु होतो. परस्परविरोधी फिर्यादी असल्याने व अत्यंत नाजूक विषयासंबंधी केस असल्याने स्त्रीमुक्ती संघटना व कट्टर धार्मिक संघटना घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरलेले असतात. सरमतच्या बाजूने खुद्द मौलवी जबानी देतात. सरमतने केलेले काम कसे इस्लामला अनुसरून आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. आता खरंच सरमत निर्दोष सुटतो का? मेरीचा बदला पूर्ण झाला का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मूळ चित्रपटच बघावा.
सध्या मिळत असलेली प्रिंट हि नेमकी शेवटच्या भागात काटछाट केलेली असलेने, केवळ एक हिंट म्हणून यु ट्यूब वरील एक दुवा देत आहे, ज्यात नसिरुद्दीन शाहने काम केले आहे. आपल्याकडे साध्यासुध्या कारणावरून जी सेन्सॉरशिप चालते ते बघता पाकिस्तानातही या शेवटच्या भागाविरोधात काही झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
चित्रपटाचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अप्रतिम संगीत. चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय आहेत. रॉक, फ्युजन या दोन्हीचा पुरेपूर वापर संगीतकाराने केला आहे.
चित्रपट: खुदा के लिये
वर्ष: २००७
लेखक: शोएब मन्सूर
अभिनेते-अभिनेत्री:
मन्सूर: शान, सरमत: फवाद अफजल खान, मेरी: इमान अली
संगीतकार: रोहेल हयात
प्रतिक्रिया
12 Jan 2012 - 10:48 pm | असुर
या चित्रपटाबद्दल एका मैत्रिणीकडून फार चांगला रिपोर्ट ऐकला होता. पण दुर्दैवाने प्रिंट सापडली नाही म्हणून बघू शकलो नव्हतो. आता पुन्हा हा हिट-लिस्ट वर आलाय.
परिक्षण मस्त. वेचक आणि मुद्देसुद! अधिक मुळ चित्रपटाच्या शेवटाचा गौप्यस्फोट केला नसल्याबद्दल पैकीच्यापैकी मार्क!
अन्या, भारी रे!!!
--असुर
12 Jan 2012 - 10:54 pm | प्रास
चित्रपटाची छान ओळख करून दिलेली आहे.
पुभाप्र
12 Jan 2012 - 11:04 pm | पैसा
पण हा चित्रपट मूळ स्वरूपात बघायला मिळेल का?
12 Jan 2012 - 11:04 pm | यकु
कॅलीडोस्कोपिक ओळख प्रचंड आवडली.
वर दिलेली क्लिप पाहून तरी चित्रपट बिलकुल प्रचारकी वाटत नाही.. उलट नसरु चाचांचे सर्व युक्तीवाद बिनतोड आहेत.
नक्की पहाणार.. आणि मुस्लिम मित्रांना शिफारस करणार.
चित्रपट पाहून आवर्जुन लिहील्याबद्दल थँक्स.
12 Jan 2012 - 11:06 pm | प्रचेतस
उत्तम परीक्षण रे अन्या.
हा चित्रपट जवळपास ३ वर्षापासून मजकडे आहे पण इतका खास नसेल असे वाटल्याने पाहिला नाही. पण आता मात्र नक्कीच पाहावा लागेल.
13 Jan 2012 - 3:34 pm | पियुशा
छान परिक्षण लिहील आहेस रे अन्या पहिल्याच प्रयत्नात !
मान गये :)
12 Jan 2012 - 11:18 pm | अन्या दातार
@ असुर, पैसातै
तुनळीवर उपलब्ध आहे. तिथुन उतरवुन घ्या.
@ यशवंत,
हाच या चित्रपटातला आवडलेला भाग आहे. अगदी मस्तपणे कथा उलगडत जाते. उगाच उत्कंठा ताणून ठेवायची हा उद्देश राखून भरमसाठ संवाद पेरणी केलेली नाही, अन तरीही उत्कंठा लागून राहते.
@ वल्ली,
निदान टप्प्याटप्प्याने तरी बघ. रोज एक मिनिट जरी बघितला असतास तरीपण २-३ पारायणे झाली असती की रे तुझी ;)
12 Jan 2012 - 11:30 pm | बिपिन कार्यकर्ते
हा एक उत्तम चित्रपट आहे. सुंदरच. आता पुढचा...
12 Jan 2012 - 11:37 pm | सुहास..
अन्या , यार, पाकिस्तान च नुसत नाव जरी काढल तरी सीएसटी आठवते, तुझी (ब्लॉग-सकट) लेखन शैली आवडते रे मित्रा !! पण हे गरजेचे आहे का ??? ही सारी नाटके वाटतात रे ( काळे काकांची आठवण होते बघ अश्या वेळी !! )
किमान तुला तरी पटत का रे ??
12 Jan 2012 - 11:39 pm | गणपा
चुकवू नये असा चित्रपट. मिळवून नक्की पहावा असा.
मला त्यातल्या कर्णमधुर अजानही (समजत नसल्या तरीही) फार फार आवडल्या.
12 Jan 2012 - 11:44 pm | स्मिता.
चित्रपट ओळख आवडली.
या चित्रपटाबद्दल आधीही एकदा ऐकलं होतं पण बघायची फारशी इच्छा झाली नाही. आता परिक्षण वाचून बघावासा वाटतोय. वरची क्लिप बघतांना उर्दू समजण्याची इतकी मारामार झाली की चित्रपट किती कळेल शंकाच आहे.
13 Jan 2012 - 3:24 am | अर्धवटराव
आपण जसं समजतो तसं मुल्ला-मौलवी = कट्टरपंथी दहशतवादी आणि उर्वरीत सुशिक्षीत समाज = व्हिक्टीम असं सरळधोप समीकरण असेल काय? मला नाहि वाटत. साधारण समाज मान्यता असल्याविना पाकिस्तान दहशतीचे आगर बनला नसता. आता स्वतः वर शेकायची वेळ आलि तर व्हिक्टीमायझेशनचं भांडवल करुन जगाची सिंपथी गोळा करायचा प्रयत्न म्हणुन असे चित्रपट बनतील तेथे. असो. हे झालं अवांतर.
चित्रपट परिक्षण आवडलं रे मित्रा अन्या...
अर्धवटराव
13 Jan 2012 - 6:03 am | सन्जोप राव
उतम ओळख. चित्रपट आता मिळवून बघणार. (परीक्षण /रसग्रहणातले मराठी वाचताना काही जागी ठेचाळलो. वाक्ये छोटी आणि सोपी असती तर अधिक बरे झाले असते. असो.)
अवांतरः काही प्रतिसाद वाचून प्रतिसादकर्त्यांची कीव आली. कलाकृती ही देश, धर्म, जात याच्यापलीकडे असते हे लोकांना अद्यापही सांगावे लागते हे केविलवाणे आहे. वुडहाऊसचे 'आय डोन्ट हेट इन प्ल्युरल्स' हे वाक्य आठवले. अर्थात असा विचार करण्याची क्षमता होती म्हणूनच तो वुडहाऊस झाला, हे आहेच. पुन्हा असो.)
13 Jan 2012 - 6:46 am | मराठमोळा
ष्टोरी/परीक्षण आवडले. बघणे होईल की नाही साशंक आहे.
अवांतरः मुस्लीम देशांमधे लोकांचे नुसतेच साक्षरीकण न होता 'एनलायटनमेंट' झाले तरच धर्मांधतेचे बरेचसे प्रॉब्लेम्स सुटतील. (अर्थात ही गरज आपल्याकडेही आहेच. आपणही बर्यापैकी 'एथनोसेंट्रीक' आहोतच.)
13 Jan 2012 - 8:37 am | स्पा
झकास... परीक्षण रे...
नक्की बघेन हा चित्रपट
13 Jan 2012 - 10:03 am | प्राजु
यू ट्यूब वर मिळाला.
बघतेय आज.
उत्तम परिक्षण. :)
13 Jan 2012 - 10:15 am | ५० फक्त
मस्त चित्रपट ओळख रे अन्या, पण हे ही खरंय की एवढा विचार करायला लावणार चित्रपट बघेन की नाही याची शंका वाटते हल्ली.
13 Jan 2012 - 1:26 pm | प्रचेतस
मी पण आधी हाच विचार करायचो, पण आता अन्याने इतकं सुंदर परिक्षण लिहिलंय की चित्रपट बघण्यावाचून गत्यंतर नाही.
13 Jan 2012 - 10:16 am | मराठी_माणूस
खरे आहे. घडणार्या घटना बघुन तेथिल सामान्य लोक जास्त पिचले असतील असे वाटते.
13 Jan 2012 - 1:45 pm | गणेशा
आज पर्यंत खुदा के लिये पाहिलाच नाहि असे वाटत होते..
परिक्षण वाचुन हा चित्रपट आपण पाहिला आहे, आणि तो खुप आवडला हि होता असे नमुद करतो ..
धन्यवाद
13 Jan 2012 - 2:32 pm | हंस
सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासुन ह्याच्याबद्द्ल ऐकले होते त्यामुळे रिलीज झाल्यानंतर पहील्यांदा आंजावर जी पहिली प्रिंट मिळाली ती पाहिली, आणि सिनेमा आवडला. ( ह्याचा प्रिमियर गोव्याच्या "इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल"मध्ये झाला होतो, कदाचित हा पहिलाच पाकिस्तानी सिनेमा आहे की ज्याचा प्रिमियर भारतात झाला आहे)
13 Jan 2012 - 3:11 pm | अन्या दातार
@ गणपा
अगदी अगदी. सुंदर ताना घेतल्यात त्या अजानींमध्ये.
@स्मिता.
अरेरे.पण आता तरी बघा. उर्दू समजत नसेल तर इथल्या काही आयडींची मदत घ्या.
@ ५०फक्त
हम्म्म! पण सध्या आपल्याकडे या प्रकारचे चित्रपट निघत नाहीयेत. म्हणून जेंव्हा आपल्याला विचार करावा वाटेल तेंव्हा आपली मानसिक आणि बौद्धिक गरज भागवण्यासाठी तरी या चित्रपटांचा वापर करुन घ्या.
@ हंस,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. भारतात या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता. नक्की कुठे ते माहित नाही.
14 Jan 2012 - 1:01 am | हुप्प्या
मी हा सिनेमा पाहिला आहे. मला आवडला. पण काही गोष्टी खुपल्या त्या अशा.
१. जिहादींच्या तोडीस तोड अमेरिकाही वाईट आहे असा चंग बांधून हा सिनेमा लिहिला आहे का अशी शंका येते. अमेरिकेत असणार्या भावावर तो लुळा पांगळा होईपर्यंत मारहाण वगैरे प्रसंग अतीरंजित वाटतात.
२. नासिरुद्दीनचे प्रचारकी बोलणे. प्रत्येक गोष्टीचे धर्माला प्रमाण मानून चांगले वाईट ठरवणे गरजेचे आहे का?
संगीत, वाद्ये वगैरे धार्मिक मुस्लिम वाईट मानतात. त्यावर धर्मातीलच उदाहरण देऊन प्रतिवाद करणे.
१४०० वर्षे जुने असणार्या तत्वज्ञानातील जुनाट गोष्टी धिक्कारून स्वतःच्या बुद्धीने चांगले वाईट ठरवण्याचे धाडस अजूनही का होत नाही? उलट हिंदू धर्मातील अनेक जुन्या चालिरितींना बदलून, त्याविरुद्ध कायदे बनवण्याचे धाडस हिंदूनी केले आहे.
कलाकारांनी कामे उत्कृष्ट केली आहेत. भाषेची विशेष अडचण आली नाही.
15 Jan 2012 - 1:29 pm | दादा कोंडके
तो झाकीर नाइक पण असलंच काहीतरी यंव पुस्तक त्यंव क्लॉज वगैरे सांगतो आणि पब्लिक टाळ्या वाजवतं!
बाकी चित्रपट परीक्षण मस्तच रे अन्या!
14 Jan 2012 - 9:16 am | शिल्पा ब
परीक्षण आवडले.
मी अजुन हा सिनेमा पाहीलेला नाही पण आता बघेन. एक सिनेमा म्हणुन चांगला असेल पण आता स्वत:वर शेकायला लागलं अन अमेरीकाही साथ देईना म्हणुन प्रचारकी थाटाचा सिनेमा काढला असावा असं क्लिप पाहुन वाटतंय. सगळेच पाकीस्तानी दहशतवादी आहेत असं नाही पण इतका खोलवर रुजलेला आहे तो सामान्य जनतेशिवाय का? थोडक्यात आपल्याकडच्या भ्रष्टाचारासारखं!! स्वत:च्याच धर्माची भिती वाटावी अशी परीस्थिती निर्माण करायला त्यांनीच हातभार लावलेला आहे अन जगभर जो दहशतवाद पसरलाय त्याचे मुळ ही इथेच आहे हे विसरुन चालणार नाही.
हुप्प्याशी सहमत आहे.
14 Jan 2012 - 10:16 am | प्राजु
http://www.youtube.com/watch?v=1ymzQHW_de8
इथे पाहिला.... उत्तम चित्रपट.
अप्रतिम!
14 Jan 2012 - 11:00 am | अन्या दातार
हा प्रतिसाद फक्त हुप्प्या व शिल्पा ब यांच्यासाठी.
एखाद्या चित्रपटात थोडीफार तरी 'Cinematic Liberty' अपेक्षित असते. या ठिकाणी तो विचार करायला हरकत नाही. लोकांना कुठल्याही गोष्टीपासून परावृत्त करायला बागुलबोवाच लागतो. जर लोकांना दहशतवादाचे चटके कसे बसतात हे दाखवायचे असेल तर अशी अतिरंजित दृष्ये दाखवण्यात काही वाईट्/चूक आहे असे वाटत नाही.
एकतर मला तसेच इतरही काही प्रतिसादकांना नसिरुद्दिनचे बोलणे प्रचारकी वाटले नाही. जर वाटलेच तरी हरकत नसावी. इस्लाम धर्माचे योग्य असे इंटरप्रिटेशन त्यात आहे, जे नक्कीच पुढे यावेसे वाटतेय.
दुसरा मुद्दा धर्माला प्रमाण मानण्याचा. जिथे धार्मिक गोष्टीवर खटला अवलंबून आहे तिथे धर्माचाच आधार घ्यावा लागणार ना. मग चुकले काय नेमके?
थोडे इतिहासात डोकावलेत तर कळेल की जनरल झिया उल हक यांनी धर्माधारीत शिक्षणव्यवस्थेचा पाया घातला. ते किती अत्यंत लघुदृष्टीने उचललेले पाऊल होते याची जाणीव तिथल्या काही पत्रकारांना आणि शोएब मन्सूर सारख्या लेखकांना होतेय. याच जाणीवेतून खुदा के लिये सारख्या चित्रपटांची निर्मिती होतेय ही खरंतर चांगली गोष्ट म्हणायला हवी. प्रत्येक वेळेस एकाच चष्म्यातून बघणे आपणही सोडायला हवे. नाहीतर चित्रपटातील पंजाब्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही.
14 Jan 2012 - 11:52 am | बिपिन कार्यकर्ते
मात्र, जे प्रसंग अतिरंजित वाटत आहेत ते खरं तर वाटायला नकोत. कारण, इराकमधे किंवा ग्वांतानामो मधे जे काही घडलंय ते सर्वश्रुत आहे. वर्दीची आणि सत्तेची मस्ती सगळीकडे सारखीच. मला तरी ते काहीही अतिरंजित वाटलेलं नाही.
शिवाय, आपल्याकडे 'पाकिस्तान' या शब्दातच भावना भडकवण्याचे जे सामर्थ्य आहे ते क्वचित दुसर्या कोणत्या शब्दात असेल. साहजिकही आहेच. त्या देशाच्या शासनव्यवस्थेने कृत्यं तशीच केली आहेत. पण म्हणून 'क्लबिंग एव्हरिथिंग टुगेदर' हे ही चूकच. जगात मोनोलिथिक असं काहीच नसतं. वेगवेगळे पदर असतात, प्रवाह असतात आणि ते सगळे समजून घेऊन मग मत बनवणं उत्तम.
आज पाकिस्तानात जी मंडळी कट्टरतेविरुद्ध, धर्मांधतेविरुद्ध लढत आहेत ती अक्षरशः तळहातावर शीर घेऊन लढत आहेत, नुसतीच आर्मचेअर इन्टलेक्चुअल्स / लिबरल्स नाहीत, हे आपल्यापैकी किती लोकांना माहित असतं?
14 Jan 2012 - 12:14 pm | मनिष
बिपिनदाला +१००००००००००
अगदी सहमत!
15 Jan 2012 - 12:15 am | वाहीदा
बिपीन अन अन्यास,
नफ़रत करने वालों के सीनें मे प्यार भर दो...
अरे तुम वोह परवाने हो , पत्थर को मोम कर दों ... ;-)
अन्या, सुंदर चित्रपटाचे सुंदर परिक्षण !! आवडले
असो आता बाकीचे मुद्दे
मला काही सिन्स चे भाग फार महत्वाचे वाटले
१. नसिरुद्दीन शहाचा
२.अन दुसरा चित्रपट संपण्याआधी चा जेव्हा सरमत त्या मौलवीला सलाम करतो पण मौलवी सलामाचे उत्तर देत नाही अन त्याला निहाळतो सरमत पुढे होऊन नमाजी साठी अझान देतो तर मौलवी त्याच्या माणसाला खुणावून त्याच्यासमोरुन माईक हटवतो व तो माणूस स्वतःही अझान द्यायला लागतो. अझान तीच आहे ण एकाच मस्जीद मधून दोन अझान ऐकायला येतात.
म्हणजे हे एक सिविल वॉर (मराठी??) ची सुरवात झाली आहे याचे प्रतिक आहे. (A civil war is a war between organized groups within the same nation state or republic)
निकाहमध्ये जेव्हा काझीसाहेब "क्या आपको यह निकाह कबुल है? " असे विचारतात तर ते नाही म्हणण्याचा मुलीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तो नाकारण्याचा किंवा स्विकारण्याचा तिला पूर्ण हक्क आहे.
माझ्या गावी आमचे एका वयस्कर नातेवाईक काझी म्हणून काम पहात होते त्यावेळी अशीच एक घटना घडली अन निकाह मध्ये त्यांनी मुलीला विचारले असताना तिने नकार दिला अन काझीसाहेबांनी तो निकाह Cancelled केला अन पढविला नाही. त्यानंतर त्यामुलीच्या वडिलांना अन भावाला निकाह जबरदस्तीने लावण्याच्या प्रयत्नाचा जाब विचारण्यात आला. (पण हे असे सगळीकडे होत नाही यावर सख्त अफसोस :-( )
Indeed consent of wali (The Wali or Legal Guardian) is very important for Nikah but on the other hand women cannot be forced for marriage.Whenever a woman is forced for Nikah that Nikah is invalid and a woman can break the ties of Nikah.
चित्रपटातील मौलवी जरी आवडले नाहीत तरी त्यांचे एक वाक्य मात्र खुप आवडले
"औरत से महोब्बत करते वक्त दिल से फैसला करते हो, अल्लाह कि दफा दिमाग याद आ जाता है ?? "
शक्यतो सर्व मुस्लिम हे आस्तिकच आसतात. नास्तिक मुस्लिम नसेलच बहुतेक किंवा अगदिच तुरळक ! त्यामुळे परमेश्वराशी शेवटी नाते हे दिलसे च होते कारण प्रत्येक नमाजीत दुवा ही दिलसे च मागीतली जाते अन मगच नमाज संपते. अक्कल-शक्कल लढवून मागीतलेली दुवा परमेश्वराकडे कधीच कबूल होत नाही अन होणारही नाही :-)
उसके आगे सारे कातील,
माहीर-शातीर कुछ भी नहीं !
खुदा नाम हैं उस अहेसास का, जो रहे सामने पर दिखाई न दे.
उसका होना, या ना होना,
खुदमे, जाहीर कुछ भी नही,
अगर है तो वोह अंदर ही है
वरना बाहर कुछ भी नही ! :-)
15 Jan 2012 - 12:28 am | अन्या दातार
हा शेवटचा सीन मुद्दामच सांगितला नव्हता. दोन व्यक्तींची एकाच धर्माकडे बघण्याची दृष्टी यात अधोरेखीत केली आहे. प्रतिकात्मक अर्थ बघायचा झाल्यास 'अंतर्विरोध' या प्रकारे बघता येईल. नागरी युद्ध हे जरा विचित्र वाटतेय. तो अर्थ अपेक्षितही नसावा.
नसिरुद्दिन शहा यांच्या सीनबद्दल आधीच पुरेशी चर्चा झाली आहे.
15 Jan 2012 - 1:10 am | वाहीदा
होय अंतर्विरोध' हा अर्थ योग्य आहे. पण सरमत ने दिलेला सलाम अन अझान ते नाकारत आहेत जे चुकीचे आहे. कारण सरमत ना चुकीच्या पध्दतीने अझान देत आहे ना चुकीच्या पध्दतीने सलाम करत आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे तो कुठेही कटूता ठेवत नाही म्हणूनच तो मौलवींला सलामही करतो.no grudges against anyone anymore. तरीही मौलवीं त्याच्या सलाम ला उत्तर देत नाही
सलाम ला उत्तर न देणे हे चुकीचे आहे. That shows holding Grudges, and it is all the way more shocking when answer not coming from Maulavi !!
असो ,
प्रतिसादासाठी धन्यवाद !
15 Jan 2012 - 1:18 pm | मन१
पूर्ण उपचर्चा आवडली...
16 Jan 2012 - 2:55 pm | अन्या दातार
हा मुद्दा अधोरेखीत करण्यासाठी आत्ताच बघितलेला व्हिडीओ इथे देत आहे.
16 Jan 2012 - 11:52 pm | वाहीदा
धन्यवाद अनिरुध्द !
हा व्हिडीयो खरंच खुप चांगला आहे. :-)
15 Jan 2012 - 5:43 am | अर्धवटराव
>>...नाहीतर चित्रपटातील पंजाब्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही.
-- मुस्लीम समजुन सरदार माणसाला अमेरीकनांनी काहि इजा केली असेल तर त्याने जी रिअॅक्शन दिली ती अत्यंत स्वाभावीक आहे. चित्रपटात देखील तेच दाखवले आहे.
बाकी धर्माधारीत खटल्यात नसिरने धार्मीक ग्रंथांच्या आधारवर स्पष्टीकरण देण्याचा मुद्दा पटला.
"मौसकी " वर मनापासुन प्रेम करणारा एक युवक संपूर्ण इल्लोजीकल प्रीचींग ऐकुन कट्टरवादी बनणे, त्याच्या भावाने ताजमहाल एका मुस्लीमाने बांधला "म्हणुन" गर्व करणे या गोष्टी फार लाऊड वाटल्या.... जर खरच असं होत असेल तर त्या देशात जे काहि चाललय ते स्वाभावीक म्हणावं लागेल. असो.
अर्धवटराव
14 Jan 2012 - 10:13 pm | स्वाती दिनेश
सिनेमा पाहिला तेव्हा आवडला होताच.
चित्रपटाचे परिक्षण आवडले.
स्वाती
15 Jan 2012 - 12:48 am | सुनील
परीक्षण आवडले. चित्रपट जमेल तेव्हा पहायचा आहे हे नक्की.
बिका आणि वाहिदा यांचे प्रतिसाददेखिल आवडले.
Civil war साठी मराठीत यादवी हा शब्द वापरला जातो.
15 Jan 2012 - 2:22 pm | मन१
पिक्चर चांगलाच दिसतोय. हा कोर्टातल्या प्रसंगात खरे तर नसीरुद्दीन्च्याच आधी एक रूढ मार्गाने "फैसले" देणारा मौलवी नसीरला विचारलेल्या प्रश्नांबद्द्लच जे बोलतो, त्या पार्शभूमीवर खरे तर नसीरचे बोलणे अधिक उठून दिसते. नक्की वाद कशाचा आहे, अगदिच पारंपारिक गोष्टी केल्या तर काय होइल हे दिसतं.
बाकी, हुप्प्या ह्यांचे म्हणणे क्वचितच पटते, पण ह्यावेळेस तरी ते पटले आहे. दर वेळी ज्याने त्याने धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला तर जिणे कठिण होइल. किंबहुना धार्मिक गोष्टॅएंनाच संदर्भ मानत बसले तर पुढे जाउन काय "शरिया" हाच कायदा म्हणून अंमलात आणणार का असा प्रश्न पडला. सर्व धर्मांचा आदर वगैरे ठीक आहे, मलाही आहे; पण शरियत कायदा कुणी लागू करतो म्हटले तर अवघडच आहे, धर्म ही मग सामाजिक गोष्ट होइल, वैयक्तिक राहणार नाही. असे केल्याने काय होते हे आपल्याला कित्येक देशांकडे पाहून समजतेच आहे.
पण अर्थातच अन्याच्या इस्लाम धर्माचे योग्य असे इंटरप्रिटेशन त्यात आहे, जे नक्कीच पुढे यावेसे वाटतेय.
ह्या गोष्टीवर विचार केला आणि एकूणच त्या समाजावरचा धार्मिकतेचा पगडा लक्षात घेतला तर नसीर मार्फत दाखवलेला मार्गच योग्य्/व्यवहार्य वाटतो. सूर्य आणि वारा ह्यांची गोष्ट आपणास ठाउक असेलच. एखाद्या कट्टर विश्वासाला कधी कधी जबरदस्तीने तोडण्यापेक्षा हळूवार समजावणे अधिक दूरगामी ठरावे.
राहता राहिला "अंतर्विरोध"चा उल्लेख. हा अंतर्विरोध इस्लाम मध्ये (किंवा सर्वच धर्मात कमीअधिक फरकाने ) सर्वत्र दिसतो. खुद्द इस्लाममध्ये बारा पंथ प्रामुख्याने मानतात. त्यातही सुन्नी व शिया हे सर्वाधिक ठळक म्हणता यावेत. जगभरात बहुसंख्य मुस्लिम सुन्नी (एकूण जनसंख्येच्या साठेक टक्क्याहून अधिक) आहेत. त्यापाठोपाठ शिया वीसेक टक्क्याच्या आसपास. ह्या सगळ्यांचा गाभा इस्लाम हाच असला तरी त्याचे रुपडे व आचरण काही प्रमाणात वेगळे आहे. कुणाकडे "contract marriage"सारखी कल्पना मान्य आहे, कुणाकडे नाही.कुणाकडे स्त्रीचा चेहरा दिसलेला चालतो, कुणाकडे नाही वगैरे.
मुळात इस्लाममध्ये कुठल्याही गोष्टीचा निवाडा कसा करतात? संदर्भ म्हणून काय वापरतात? तर ते म्हणजे:-
१.कुर् आन ए शरिफ :- पैगंबरास ईश्वर साक्षात्कार झाल्यवर त्याला ईश्वरी ज्या ईश्वरी सूचना मिळाल्या त्या लिहवून घेतल्या गेल्या व त्यांचाच संग्रह म्हणजे हा ग्रंथ. काहीही झाले की सर्वात आधी ह्यालाच refer केले जाते.
पण जर ह्यात एखाद्या घटनेबद्दल, प्रश्नाबद्दल स्पष्ट उल्लेख नसेल तर???
२. हदिस किंवा हदिथ :- कुरान मध्ये प्रश्नांचे समाधान नसेल, तर ह्याचा संदर्भ घेतला जातो. हा ग्रंथ म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील घटनांचा, गोष्टींचा संग्रह आहे. त्यांनी स्वतः दिलेल्या निवाड्यांचा संग्रह आहे. आणि इथेच काहीशी गोम आहे. हा प्रेषिताच्या अनुयायांनी (साहाबा),सहकार्यांनी व इतर समकालीन लोकांनी प्रेषिआतंचे सोबतचे अनुभव म्हणून कथन केलेल्या गोष्टी आहेत. स्वाभाविकच ज्याच्या त्याच्या कथा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या असू/भासू शकतात. काही कथा ह्या सर्व पंथात समान आहेत, थोडय कथांची काही पंथात अगदि वेगळ्या versions आहेत!
धार्मिकतेनुसार निर्णय घेताना ही अडचन येउ शकते. पण ह्यातूनही नीटसे काही समजत नसेल, एखादा निवाडा देता येत नसेल तर??
३. तर मग निर्णयकर्त्याने ईश्वरसाक्षीने स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने स्वतःच निर्णय घ्यावा असे खुद्द प्रेषितानेच एका कथेत म्हटले आहे.(नक्की कोणती कथा ते आता आठवत नाही.)
आता भारतीय उपखंडात सर्वाधिक प्रभावी विचारधारा म्हणजे सूफी व काही प्रमाणात वहाबी. वहाबी हे थोडेफार जहाल,अधिक धार्मिक मानले जातात.संगीत वगैरे त्यांना रुचत नाही. नसीरच्या आधी बोलणारा मौलवी ह्याच school of thoughts च्या जवळ जाणारे बोलतो.
नसीर जे बोलतो ते बरेचसे सूफी विचारसरणीच्या जवळ जाते. भारतात इस्लामचा प्रसार होण्यास सूफींचा वाटा प्रचंड आहेच. अगदि कित्येक हिंदूही सूफींच्या विचारसरणीचे अभ्यासक आहेत, सूफी दर्ग्यावर(मजार्-ए-शरीफ अजमेर, शाहनूर्मियाआँ दर्गाह औरंगाबद) सारख्या ठिकाणी भक्तिभावाने जातात. सूफींमध्ये संगीतातून ईश्वरभक्ती गृहितच धरली आहे. संगीतास विरोध नाही.(आठवा जोधा अकबर मधील "ख्वाजा मेरे ख्वाजा" हे गाणे.)
वहाबींना किंवा इतर मूलतत्ववादी* विचारसरणीला मात्र संगीत वगैरे मान्य नाही. दाढी ठेवणे ,बुरखा घाल्णे सक्तीचे असावे असे वाटते. पहिला मौलवी हा त्या विचारसरणीचा आहे.
इस्लाममधला अंतर्विरोध आहे तो हा असा.
* मूलतत्ववादी हा शब्द पारंपरिक,orthodox,जहाल किंवा चौकटित चालणारा ह्या अर्थाने वापरलाय. हल्ली दहशतवादी ह्या शब्दाला पर्याय म्हणून वापरतात तसा वापरला नाही. वापरुही नये असे माझे मत आहे. मूलतत्ववादी हा destructive असेलच असे नाही.आधुनिकतावादी हा constructive असेलच असे नाही. पण तो वेगळा मुद्दा, सध्या जाउ देत.
टीपः- माझी माहिती ऐकीव, गप्पांतून्,चर्चेतून,अर्धवट वाचनातून्,माहितीपटांतून आलेली आहे. लिखित संदर्भ लगेच देता येउ शकतील असे नाही.
15 Jan 2012 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते
एक दुरूस्ती :
इस्लाममधे तीन पंथ प्रामुख्याने आहेत. सुन्नी, शिया आणि इबादी. इबादी हा प्रकार आता फक्त ओमानमधेच दिसतो. सूफी हा ही एक प्रकार आहेच. पण तो रूढार्थाने पंथ नाही मानला जात.
शियांचे मात्र भरपूर प्रकार आहेत.
15 Jan 2012 - 3:06 pm | मन१
नक्की सांगणं कठिण आहे. द्रूझ आणि अहमदिया ह्यातील बहुतांश लोक स्वतःला मुस्लिमच मानतात. इतरांनी नाही मानले तरी. सध्या खालील दुवे मिळाले:-
http://en.wikipedia.org/wiki/Islam
http://en.wikipedia.org/wiki/Islamic_schools_and_branches
http://en.wikipedia.org/wiki/File:Islam_branches_and_schools.svg
सूफी व वहाबी हे पंथ म्हटलेले नाहित, तर विचारसरणी हाच शब्द माझ्या प्रतिसादात आहे. अर्थच्छटेचा बारिक फरक दोन्हिंत आहे.
15 Jan 2012 - 9:10 pm | बिपिन कार्यकर्ते
इस्लामचे पंथ, मुख्यत्वे तीनच. सुन्नी, शिया आणि इबादी.
इस्लाममधली पहिली फूट, ज्याला फितना म्हणतात, ती पैगंबरांच्या मृत्यूनंतर अगदीच लवकर पडली. ज्यांनी अबु बकर यांना वारस मानले ते सुन्नी. मात्र ज्यांनी पैगंबरांचा चुलतभाऊ आणि जावई अली यांना वारस मानले ते शि'या. शिया या शब्दाचा अर्थच मूळात 'सामिल असलेले, बाजू घेणारे' असा आहे. अलीला सामिल झाले ते शि'या. इबादी या पंथाचा उगमही फार नंतरचा नाही. तसा साधारण इस्लामच्या सुरूवातीच्या वर्षातलाच. आज हा पंथ ओमानमधे (आणि झांझिबारमधेही, जिथे अगदी आत्ता पर्यंत ओमानचे अधिपत्य होते.) बहुसंख्यांचा पंथ म्हणून नांदतोय. बाकी इतरत्र फारसा कुठेही नाही.
मात्र हे पंथ वेगळे असले तरी ते अल्लाहचं एकत्व आणि महंमदाचं शेवटचा प्रेषित असणं, इस्लामचे 'फाइव्ह पिलर्स' (शहादा (लाइलाहीइलल्लामुहंमदरसूलल्लाह), प्रार्थना (नमाज, सला), रमदानचे उपास, झकात, हाज), यावर ठाम आहे. तिथे कुठेही काही तडजोड नाही.
सुन्नींमधे उपपंथ असे नाहीत. पण विचारधारा आहेत. त्याही केवळ शरियाचं इन्टरप्रिटेशनशी संबंधित आहेत. त्यापुढे नाही. त्या आहेत... हनाफी, मलिकी, शाफी, हनबाली.
मात्र शियांमधे बरेचसे उपपंथ उदयाला आले. अजून एक रोचक प्रकार म्हणजे, इराण अरबांनी जिंकला आणि हळूहळू इस्लामीकरण झाले. पण इराणी, आपण अरब नाहीत हे कधीच विसरले नाहीत. विविध कारणांसाठी, मुख्यत्वे सामाजिक आणि आर्थिक लाभांसाठी, इस्लामीकरण वेगाने झाले, पण मग इराण्यांनी आपले एक वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठी शिया पंथाचा स्वीकार केला. आजही इराणी आणि अरब यांच्यातून विस्तव जात नाही. इस्लामचा स्वीकार केला असला तरी आजही बरेचसे इराणी व्यक्तिगत वर्तुळात बोलताना आपला इस्लामपूर्व गौरवशाली इतिहास आणि नंतरची वाताहत याबद्दल भावुकच असतात. ती कळ येतेच बाहेर.
शियांचे आपल्याकडे असलेले मुख्य प्रकार म्हणजे, ट्वेल्व्हर, इस्माइली, बोहरा इत्यादी.
शियांचा अजून एक मुख्य प्रकार म्हणजे अलावी. हा पंथ सिरिया आणि लेबनॉनमधे आहे. शिया विचारधारेचे सगळे म्हणणे मान्य करूनही त्यात परत अजून काही स्वतःचे असे मत घालून झालेला हा पंथ आहे. पण ते स्वतःला शियाच मानतात. सिरियाचे सत्ताधीश घराणे बशार अल-अस्साद याच पंथातले आहे. सिरियातही हा पंथ अल्पसंख्यच आहे.
तुम्ही ज्या अहमदियांचा उल्लेख केला आहे त्यांना बहुतांश मुस्लिम (सुन्नी असो किंवा शिया), मुस्लिम मानत नाहीत. त्याचं मुख्य कारण असं की ते मिर्झा गुलाम अहमद कादियानी यांचं पैगंबरांच्या नंतरचाही (ऑलमोस्ट) पैगंबर असणं मान्य करतात. म्हणजेच, महंमदाचं शेवटचा पैगंबर असणं यावरून भेद होतात. त्याशिवाय अजूनही काही वैचारिक भेद आहेतच. अजूनही त्यांना इस्लामचा एक पंथ म्हणून अजिबात मान्यता नाही.
द्रुझ हे स्वतःही स्वतःला मुस्लिम मानत नाहीत. त्यांचा असा वेगळाच एक धर्म आहे. आणि त्यात मुस्लिम धर्मातून घेतलेले बरेचसे काही आणी त्यात भर टाकलेले अजून बरेच काही यातून बनलेला धर्म आहे तो. मूळात, तो एक वांशिक गट आहे.
वहाबी आणि सूफी वगैरे या मुख्यत्वे विचारधारा आहेत हे ही ठीकच. वहाबी हे सुन्नी असतात पण सगळेच सुन्नी वहाबी नसतात असं हे नातं आहे. त्याशिवाय, देवबंदी, बरेलवी हे ही तात्विक मतभिन्नता असलेले सुन्नी गट आहेतच. वहाबी हे देवबंदी परिवाराशी जवळ जाणारे असतात.
अर्थात, माझी माहिती चुकीची असू शकतेच.
16 Jan 2012 - 11:26 am | यकु
बिका व मन यांच्या प्रतिसादातून बरीचशी नवी माहिती समजली.
दोघांचेही धन्यवाद.
17 Jan 2012 - 12:23 am | पुष्करिणी
अवांतर : अलेवी पंथाचे लोक मशिदीत जात नाहीत, बहुतांश स्त्रीया उच्चशिक्षित असतात. उत्तर इराक, इराणचा काही भाग, तुर्कस्थान्चा काही भाग ( थोडक्यात कुर्दिस्थान) मधे हे लोकं आहेत.
17 Jan 2012 - 3:53 pm | वाहीदा
पुष्करिणी , अलेवी हा पंथ नाही , ते शिया मुस्लिमच आहेत .
बाकी हे सर्व इस्लामचाच भाग आहे अन मुस्लिमच आहेत.
तेव्हा Day of Judgement - कयामतच्या दिवशी ही सारे समान, irrespective of Gender as well !
15 Jan 2012 - 3:55 pm | अन्या दातार
मनोबा, अंतर्विरोधाची बाब ही चित्रपटातील एका घटनेचा परामर्ष घेताना मांडली होती. त्याचा इस्लामशी/इस्लाममधील अंतर्विरोधाशी काहीएक संबंध नाही. माझा हा प्रतिसाद नीट वाचा. वाहिदाने ज्या सीनचा उल्लेख केला त्याची तुलना त्यांनी थेट यादवी/नागरी युद्धाशी केली; जे मला तितकेसे पटले नाही. आणि म्हणून मी अंतर्विरोध ही संज्ञा वापरली.
हा मुद्दा काही प्रमाणात योग्य आहे, पण जिथे धर्माचा प्रभाव प्रचंड आहे, तिथे धर्माचाच आधार देऊन काही प्रमाणात प्युरिफिकेशन करणे ही पहिली पायरी होऊ शकते. सुधारणा होतच राहतात यावर किमान विश्वास ठेवायला हरकत नसावी.
15 Jan 2012 - 3:47 pm | अप्पा जोगळेकर
किंबहुना धार्मिक गोष्टॅएंनाच संदर्भ मानत बसले तर पुढे जाउन काय "शरिया" हाच कायदा म्हणून अंमलात आणणार का असा प्रश्न पडला.
असेच म्हणतो.
आणि जर शरियतच प्रमाण मानायचा झाला तर तो सगळाच्या सगळा लागू करावा.
म्हणजे जर एखादा चोर हिंदू असेल तर त्याला सहा महिने कारावास द्यावा आणि जर तोच चोर मुस्लिम असेल तर त्याचे हात तोडावेत हे मान्य होणार आहे का ?
शरियत फक्त खूप बायका करण्यापुरताच आठवतो हे नवलच म्हणायचे.
नसिर दादांनी हदीसचे दाखले दिले आहेत. पण मुळामध्ये हदीस प्रमाण मानावे की मानू नये हे याबद्दल मुस्लिमांमध्येच मतभेद आहेत. जर हदीस प्रमाण नसेल तर ते सगळे दाखले रद्दबातलच ठरतील. जाउंदे. अधिक लिहित नाही. नाहीतर उगाच कोणी अंगावर धावून येईल.
पण एरवीसुद्धा प्रत्येक गोष्टीला धर्मातल्या दाखल्यांचे सर्टीफिकेट लावण्याची गरज का वाटावी ? हा प्रश्न उरतोच.
दातार साहेबांचे परीक्षण आवडलेच. हा पिक्चर बघणार. कॅलिडोस्कोपिक का काय म्हणतात तसे लिहिल्याने स्क्रोल बार फिरवत फिरवत वाचले. पण शैली आवडल्या गेली आहे.
16 Jan 2012 - 8:44 am | प्रचेतस
भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात बंदी आहे असे ऐकले होते. खरे खोटे माहित नाही. पण जर अशी बंदी असेल तर (कलेला कसलेही बंधन नसते हे मान्य करूनही) तेथील चित्रपट आपल्या इथे का दाखवावेत?
शेवटी निखळ कलात्मक असे चित्रपट फार कमी बनतात, येथे पाकिस्तानी चित्रपट दाखवणे हा निव्वळ पैसा कमावणे हा हेतूसुद्धा असू शकतो.
16 Jan 2012 - 9:02 am | मन१
पाकी चित्रपटाचा त्साही आपल्याकडे काही फार मोठा व्यवसाय वगैरे होत नाही. त्यामुळे तो मुद्द बाजूला ठेवू.
अशा प्रकारच्या चित्रपटासारख्या माध्यमातून प्रातिनिधिक का असेना समाजाचे चित्र उभे राहते, तिथले समाजमन समजण्यास मदत होते. ह्याचा फायदा म्हणजे शांतता काळात समाजाभिसरण होते. दुसरे म्हणजे समाजाची विचारशैली ओळखीची असेल तर हेरगिरी वगैरे करण्यास थोडिफार का असेना उपयुक्त थरते. इस्राइलची मोस्साद ही जगातील सर्वाधिक प्रभावशाली हेरगिरी करणार्यापै़ई एक आहे, अगदि आय एस आय, सी आय ए, के जीबी असल्या नावांच्याही आधी तिचे नाव घेता येइल. तिथल्या हरेक व्यक्तिला अरेबिक येणे व प्रसंगी अरब भासणे कंपलसरी आहे*!
भारतानेही त्यामुळे अवश्य पाकी चित्रपट दाखवावेत. व स्वतःचा राष्ट्रिय अजेंडा असलेले चित्रपट स्पॉन्सर करावेत(बॉर्डर,सरदार, वगैरे)
* काल का परवाच्याच पेपरात बातमी होती की इराण अणुप्रकल्पाचा अत्यंत महत्वाच्या शास्त्रज्ञाची "कुणीतरी" हत्या केली आहे. यथावकाश मोस्साद कडे बोट येणार हे स्पष्टच आहे. असे त्यांचे कित्येक उद्योग सुरुच असतात, बहुतांश कामगिर्यांच्या "बातम्या" होउ न देण्याचे कौशल्य ते दाकह्वतात.
16 Jan 2012 - 10:22 am | अन्या दातार
अगदी हेच. बाकी आयएसआय ची केजीबी-मोस्सादशी केलेली तुलना बघून डोळे पाणावले ;)
16 Jan 2012 - 3:29 pm | वाहीदा
हे वाचून माझे पण डोळ्ळे पाणावले
बाय द वे मनोबा ,
आपला अन्या कधी पासून हेर झाला रे ??
त्याची तुलना डायरे़क्ट मोस्साद, आय एस आय, सी आय ए, के जीबी :-? ????
कैच्या कै राव !
17 Jan 2012 - 9:36 am | मन१
अन्याला कोण हेर म्हणतय? हेर लोक असे जाहिर धागे काढत नाहित. चित्रपटाअंतून समजाची विचारशैली अपल्यातील लोकांना समजते. आपल्या लोकांमधील काहीजण जे हेरगिरी करनार आहेत त्यांचा गृहपाठ त्यामुळे पक्का होतो.
@ अन्या:- आय एस आय दक्षिण आशियात अत्यंत प्रभावशाली आहे म्हणूनच त्यांची दखल घेतली जाते, व त्यांचे नाव आपल्या कानावर येते.अणु तस्करी साठी ह्यांनीही पाक सरकारला मदत केली होती. असे करणे म्हणजे खाउ नाही. असो. अवांतर होइल. पुढील सर्व व्यनि खरडींतून करुयात. ठिक?
@बिपिनदा:- मुद्दे मान्य. मात्र द्रूझ लोकांबद्दल माझी वेगळी समजूत आहे/होती.
17 Jan 2012 - 10:43 am | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद!
हे बघा :
http://en.wikipedia.org/wiki/Druze
http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/Society_&_Culture/druze.html
17 Jan 2012 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त हो दातार शेठ.
एकदम सहीच ओळख करून दिली आहेत.
चित्रपट दोन वेळा बघितला आहे, आणि दोन्ही वेळा तेवढाच भावला आहे.
18 Jan 2012 - 1:37 pm | Maharani
हा खुपच सुंदर चित्रपट आहे...बघत आसताना अन्तर्मुख व्हायला होते....
3 Mar 2012 - 11:34 am | फारएन्ड
आवडली चित्रपटाची ओळख. अजून तुम्ही असे पाहिले असतील तर जरूर लिहा.
याची डीव्हीडी कोठतरी पाहिल्याचे आठवते. पण चित्रपटाबद्दल माहिती नव्हती त्यामुळे आणली नाही. धन्यवाद या लेखाबद्दल.