टाईम मॅगझीन या साप्ताहीकाच्या दर वर्षाअखेरीस प्रसिद्ध केल्या जाणार्या "वर्षातली व्यक्ती" अर्थात "Person of the Year" ला खूप प्रसिद्धी मिळते. १९२७ सालापासून सुरू केलेल्या प्रथेमध्ये केवळ अमेरीकन व्यक्तीच, किंबहूना केवळ व्यक्तीच असते अशातला भाग नाही. १९८२ साली Machine of the year म्हणून संगणकाचे छायाचित्र आले (थँक्स टू अॅपल) तर १९८८ साली Planet of the year असे म्हणत प्रदुषणाने विनाशाकडे वाटचाल होऊ शकते या विचारांचे समर्थन करत "पृथ्वी"स पुढे केले होते.
एकूण या निवडीचा इतिहास बघितला तर बहुतांशी वेळेस ज्या वर्षात नव्याने अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडला गेलेला आहे तेंव्हा त्यात राष्ट्राध्यक्षास Person of the Year म्हणून घोषित केलेले दिसेल. मग तो ओबामा असेल, बुश असेल, क्लिंटन असेल का केनडी...
मात्र दांडीयात्रे नंतर गांधीजी, जगातील बहुतांशी कम्युनिझम आणि त्याबरोबरचे शितयुद्ध संपवू शकणारे गोर्बाचेव्ह, अपोलो ८ ची टिम, अमेरीकन शास्त्रज्ञ, दातृत्वासाठी बोनो, बिल-मिलेंडा गेट्स असे दिग्गज देखील आहेत. (गोर्बाचेव्हना तर person of the decade म्हणले गेले होते).
कधी कधी स्थल-काल-सापेक्ष माहितीनुसार याच टाईम मॅगझीनने १९३८ साली हिटलरला देखील person of the year म्हणले होते. तेच स्टॅलीनच्या बाबतीत नंतर हिटलर आणि नात्झी सेनेस हरवल्याबद्दल! अशी देखील यात वर्षे आहेत जेंव्हा कुठल्याही व्यक्तीस (अथवा ऑब्जेक्टला) न संबोधता केवळ समाजातील विशिष्ठ गटास त्या वर्षासाठी महत्वाचे मानले गेले. त्यात २००६ साली "तूम्ही" म्हणजे आंतर्जालीय विश्व चालवणारे सर्व आले होते.
पण या वेळेस मात्र असे अनेक वर्षांनी खर्या अर्थाने असे एक चेहरा नसलेले (faceless) जगातील विविध समाजाचे प्रातिनिधित्व करणारे व्यक्तीमत्व हे person of the year म्हणून घोषित केले आहे, आणि त्याचे नाव आहे: "निषेधकर्ता" अथवा "Protester".
मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांमधील निषेध, भारतातील भ्रष्ट्राचाराविरोधातील निषेध, युरोपातील अर्थव्यवस्थेवरील निषेध, अमेरीकेतील वॉलस्ट्रीट आणि अतीश्रीमंतांना मिळणार्या संरक्षणाच्या विरोधातील निषेध, आणि अगदी आत्ता आत्ता झालेला रशियातील निवडणूकांमधील अफरातफरींचा निषेध!
"मी मोर्चा नेला नाही... मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही" हे लोकप्रिय गीतातील अन्वयार्थच खोटे ठरवणारे पुणेकर आणि तसेच ज्या सामान्यांच्या वृत्तीवर ते लिहीले गेले, त्यांचे देखील "अती झाले" की काय होते ते दाखवणारे जगभरचे सामान्य!
अरब उठाव
वॉलस्ट्रीटच्या विरोधातील ठिय्या (Occupy) आंदोलन
युरोपातील असंतोषाचे एक प्रातिनिधिक उदाहरण - ग्रीस
निवडणूकीतील घोटाळ्याला पुतीनच्या विरोधात उभे राहीलेले रशियन्स
(पुणेकरांचे सकाळमधील चित्र येथून घेतले आहे. बाकी छायाचित्रे विकीपिडीयामधून)
त्यातून नक्की ठोस आणि तात्काळ काय मिळाले या वर चर्चा करता येईल आणि केली जातेच. पण सामान्य माणूस हा काही अपवाद वगळता एकूण शांतता राखत निषेध करत पुढे येऊ शकतो आणि उठाव करू शकतो हे २१ व्या शतकातले चित्र हे गेल्या अनेक शतकांच्या चित्रांपेक्षा फारच वेगळे आहे असे वाटते... म्हणूनच या निषेधकर्त्यास सलाम.
प्रतिक्रिया
15 Dec 2011 - 11:05 pm | अन्या दातार
जेंव्हा मतपेटी बोलेनाशी होते तेंव्हा लोक या मार्गाने जातात याचेच हे उदाहरण आहे. सर्व देशातील राजकारण्यांनी याचा सखोल विचार केला पाहिजे. हाच या सर्व घटनांचा अन्वयार्थ म्हणता येईल.
16 Dec 2011 - 5:10 am | अभिजीत राजवाडे
लेख आवडला. मला तुमचे जुने लेखही आवडले.
16 Dec 2011 - 11:19 am | मदनबाण
जास्त दाब वाढला तर फुगा देखील फुटतो ! हेच जनतेच्याही बाबतीत सत्य आहे असे दिसते...
16 Dec 2011 - 12:41 pm | मन१
जनतेचा उठाव आहे असे दाखवले जात आहे असे वाटते.
विशेषतः पाश्चात्त्य जग सोडून इत्ररत्र(भारत,अरब देश्,रशिया वगैरे) हा काही निव्वळ "जनतेचा आवाज" आहे हे पटत नाही. जनतेचा राग्/वैताग वापरून घेतला जात आहे, इतकेच.
16 Dec 2011 - 12:47 pm | अन्या दातार
आडात असेल तर पोहर्यात येईल ही म्हण कशी वाटते? जनतेचा राग वापरुन जरी घेतला जात असला तरी मुळात राग आहे हे तरी मान्य करालच ना? त्याचा वापर बाह्यशक्तींनी करुन घेऊ नये असे जर राज्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे, नाहीतर कुणी ना कुणीतरी वापर करुन घेणारच. जगरहाटी अशीच असते.
कोण कसे Interpretation करतो त्यावर सगळे अवलंबून आहे. एखाद्यावरचे संकट हे दुसर्यासाठी वरदान असू शकते ना. (आठवा कँपस इंटरव्ह्यूचे दिवस ;) )
16 Dec 2011 - 1:29 pm | दादा कोंडके
दरवेळी उगीच असल्या कॉन्स्पिरसी थिअरीज मांडून विचारवंतांकडून जनसामान्यातून होत असलेल्या असल्या निषेधाचा अवसानघात केला जातो. बरं, ह्या पाश्चात्य देशात तथाकथीत "लोकशाही" नसली तरी व्यक्तीस्वातंत्र्य, समानता या बाबतीत भारतासारख्या देशापेक्षा शंभर पटीनं चांगली आहेत. हेच लोण काही वर्षानी चीन मध्ये सुद्धा पोहोचेल. तिथल्या राजकारण्यांना याचा केंव्हाच वास आला अहे, पण ते किती दिवस थोपवू शकतात हे बघायचं.
16 Dec 2011 - 7:10 pm | मदनबाण
हेच लोण काही वर्षानी चीन मध्ये सुद्धा पोहोचेल. तिथल्या राजकारण्यांना याचा केंव्हाच वास आला अहे, पण ते किती दिवस थोपवू शकतात हे बघायचं.
सहमत... हिंदुस्थानाला असलेला पीएलए चा धोका पाहता,तिथल्या लोकांच्या असंतोषाला वाट देता आली तर... चीन ची असलेली आक्रमकता आणि धोका कमी करता येईल.
चीन मधे आंदोलने अत्यंत कॄरपणे दडपली जातात... चीन मधे मध्यंतरी बुलेट ट्रेनचा अपघात होउन लोक मारले गेले होते,ही बातमी दडपवुन टाकण्याचे चीन सरकारने अनेक प्रयत्न केले !चीन सरकारने तिथल्या वकील मंडळींना अपघात ग्रस्त मंडळींचे दावे घेण्यास मनाई करण्यात आली. (संदर्भ :--- http://goo.gl/cbw8I)
चीन चा धोका कमी करायचा असेल तर तिथल्या जनक्षोभाला मोकळी वाट करुन देण्याचे प्रयत्न सर्व देशांनी (ज्यांना चीन पासुन धोका आहे असे वाटते त्यांनी) करावयास हवे... नाहीतर ड्रॅगन आहेच आग ओकायला तयार !
16 Dec 2011 - 6:49 pm | अशोक पतिल
१००% सहमत !
16 Dec 2011 - 10:30 pm | देविदस्खोत
माहितीपूंर्ण, अभ्यासपूर्ण, लेख ..........!!!!!!!!!! आवडला !!!!!!!!!!