भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
28 Nov 2011 - 6:12 pm

पुर्व-प्रकाशित

वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली.

' देइन मी तुला इडली '
' तु दे मला डोसा '
' पाहिन कोणी आपल्याकडे '
' तर देइन त्याला ठोसा '

अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही ! एक तर नुसते कविता म्हटले तरी आजकाल मला अत्यानंद होतो, नाही म्हणजे वाचायला वगैरै म्हणुन ठीक आहे पण अर्थ सांगा म्हटले की त्या पेक्षा गणित,मॅकॅनिकल,कायदा,धर्म , अ‍ॅस्ट्रॉनॉमी, उत्खनन आणि मोबाइल टेक,हे सगळे अवघड विषय सोप्पे वाटायला लागतो. पण माझी काव्य-लेखन खुमखुमी (याचा सोयीस्कर अर्थ ' किडे ' असा पण होतो .) मला गप्प बसु देत नाही आणि मग आमच्या लेखणीतून र ला ट कविता प्रसवतात. आता हेच बघा ना

'माझिया प्रियाला प्रित कळेना`
`चुलीमध्ये लाकडं बी जळेना `
`आणि मुडदा बशिवला या कढईचा`
`त्याल ताप-तापवल तरी एक जिलेबी तळेना`

बघा मित्रांनो , किती गहन अर्थ लपविला होता आम्ही या चारोळीत , एक तर प्रियाला प्रित कळत नाही, म्हणुन तिचे जिलेबीने तोंड गोड करण्याच्या नादात प्रियकर कढईत चुलीवर तेल तापवितो आहे, गॅस परवडत नाही, कढई काळपटलेली आहे आणि तेल महागलेले, भेसळलेले ! आता या सामजिक समस्या प्रियेला कश्या कळणार ? विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाषेचं आम्ही किती बेमालुमपणे (कसलं डोंबलाचे बेमालुम काय माहीत ! ) मिश्रण केले आहे या कवितेत ! पण आम्ही जेव्हा ही कविता आमच्या कॉलेज-प्रियेला एकविली, तेव्हा तिने आमच्या सहा फुटी शरीराच्या यथायोग्य भागावर तिच्या सॅन्डल चा शिक्का उमटवला आणि वर " भंगार !! " असा एक शब्द उच्चारला आणि चालती झाली.(सध्या आमची हिच कविता थोडासा बदल करुन कुठल्या तरी वाहिनी वर धारावाहिकेच्या आगमन गीताच्या निमीत्ताने अजुन जिवंत आहे असे ऐकिवात आहे. ) पण आम्ही निराश नाही झालो. आम्ही आमच्या जवळपासच्या मित्रांना 'कवी कसे व्हावे ?' असा सल्ला विचारला. ऋणानुबंधाच्या भितीने सल्ले मिळाले. कोणी म्हणे वृत्त बदल तर कोणी म्हणे गण बदल ! एका मित्राने मात्रा बदलायला हवी असे म्हटल्यावर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी मात्रा बदलण्याकरिता इंग्रजाळलेल्या दुकानात जाण्याऐवजी ' देशप्रेमी ' झालो (आमची बारवाल्या "अण्णा" कडे उधारी बाकी आहे हे धादांत खोटे आहे.) पण काही फरक पडला नाही, सरते शेवटी एका मित्राने मैत्रीण बदल असा सल्ला दिल्यावर आम्ही तत्परतेने तो मानला.

ही गेली आणि ती आली ! आम्ही काही रम्य क्षण काढले आणि पुन्हा र ला ट जोडले आणि तिला खाली दिलेला काव्याविष्कार वाचुन दाखविला.( येथे आम्ही आमची पाठ थोपटून घेतो.)

आठव, तु ,मी आणि ते झाड !
तु माझ्या फासळ्या मोजत होतीस !
आणि मी त्या झाडाच्या फांद्या !
फांद्या भरल्या सात !
दे हातात हात !
करु उत-मात, रानात पिकला भात !
भात-डाळ-लोणचे , एक मामा अठरा भाचे !
त्यातल्या एकाचे नाव मोनु !
आणि तुच माझी सोनु !
.
.

.

.
ती दोन दिवस बेशुध्द होती.ती कॉलेजमधुन नाव काढुन घेणार असल्याचे समजल्याने प्रिन्सिपलने मला बोलावुन घेतले. माझी कविता मला वाचावयास लावली. वाचुन झाल्यावर आधी ते माझ्या पाया पडले व नंतर मला दोन थोबाडीत ठेवून दिल्या. माझ्या डाव्या बाजुला माझ्या मराठीच्या सरांच्या तोंडाला फेस आलेला मला स्पष्ट दिसत होता.मला कॉलेजमधुन सस्पेन्ड करण्याची धमकी दिली.पण माझी खुम-खुमी काही कमी झाली नाही. ध्येयाने पेटलेल्या अवस्थेत मी माझी काव्य प्रतिभा भुमिगत रुपाने सदोदित चालु ठेवली. माझ्या वहीत अश्या कित्येक कविता मी कोरुन ठेवल्या होत्या. पण कालपरवा च माझी वही चोरीला गेली. माझ्या घरा-शेजारच्या इस्पितळात रुग्णांची संख्या का वाढली ते मला समजले नाही.असो ..पण त्या नंतर कॉलेजात मात्र माझा जाम वट वाढला. पोर-टोरं एकमेकांना " जास्त बोललास तर सुहाश्याच्या कविता ऐकवेन !! " असा दम देउ लागले. मी ही महिन्याभरातुन एकदाच दाढी करु लागलो, जोडीला बापाची शबनम रुपी झोळी होतीच. हे सर्व पाहुन बापाने मला मनो-विश्लेषकाकडे नेले. त्यानी काही गोळ्या मला दिल्या मि त्या गटारात फेकून दिल्या त्यामुळे आमचं आधी ड्रेनेज तुंबले आणी नंतर मला बापाने तुंबवुन काढला ...पुन्हा असो..!

हे सर्व पाहून माझ्या एक मित्राने मला एक सुप्रसिध्द कवीकडे नेले, ते मला मार्गदर्शन करतील असे मला सांगितले. मी त्यांच्या पुढ्यात बसलो होतो, माझी व्यथा एकुन घेतल्यावर त्यांनी मला माझी एखादी कविता वाचावयास सांगीतले..' माझ्या ठेचाळलेल्या डाव्या पायाच्या अंगठ्याकडे ...मी सुरु केले, त्यांनी मध्येच मला थांबविले..मला विचारले कुठला छंद आहे. मी म्हंटलं " हाच कविता करण्याचा ! शिवाय हिंडणे, फिरणे " त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले. पुन्हा एकदा असोच !! आता ही कविता आम्ही आपल्याला ऐकवितो...

माझ्या ठेचाळलेल्या डाव्या पायाच्या
अंगठ्याकडे मीच निरखुन पहात होतो.
दगड म्हणाला मला
रस्त्यात कडमडायला मीच भेटलो का रे ?
नैऋत्येचे वारे, ईशान्याचा मॉल
किरकेटचा बॉल, द्रिविडी वॉल
वॉलला लागला धक्का
माझा मदिना मक्का
झाला इरादा पक्का
तुच माझी मोना

बघा किती छान अर्थ दडविला होता या कवितेत, मक्का मदिने पासुन ते द्रविड वॉल पर्यंत आम्ही आमच्या मोनाला नेले होते, तरी मला सांगा.. या कवितेतील पहिले दोन शब्द एकुन हाकलुन देण्यासारखे काय आहे ? पण " भिक नको पण कविता आवर " या चालीवर आम्हाला जिथुन-तिथुन हाकलुन देण्यात आले. पण आम्ही निराश झालो नाही, मिपा वर आपल्यासारखे आमचे मायबाप जाणकार आहेतच .." उमेश कणकवलीकरांच्या चालीवर मी देखील " मी कवि होणारच " असे करत आम्ही आमचे काव्य प्रसव चालुच ठेवले आहे. आज कित्येक लोक आमच्या पाठीशी उभे आहेत (आणि पाठीवर गुद्दे घालत आहेत.) आज आम्ही कवि झालो आहोत (फक्त त्या कवी या उपाधीच्या आधी भंगार, डबडा आणी पंचर अश्या काही संज्ञा जोडल्या गेल्या आहेत.) त्याची आम्ही तमा बाळगण्याचा प्रश्न च येत नाही..आता हेच बोलता-बोलता एक कविता सुचली...

तुझी स्कूटीवरची छबी पाहुन ,
माझे थोबाड झाले पंचर ,
तु स्कूटीवर दिसे अशी,
जसे सायकलवरी डंपर ..

अरे !!..कुठे चाललात ??? ..अहो....एका तर खर ! ..अहो प्लीज !!....पुढे एका तर खर !!!.........अहो प्लीज.!!!............

चारोळ्याप्रेमकाव्यगझलबालगीतमुक्तकविडंबनअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Nov 2011 - 6:17 pm | विजुभाऊ

हे लिखाण इथे पूर्वप्रकाशित होते तर धागा वर आणायचा ना. नवा धागा कशाला काढलात?

पाषाणभेद's picture

28 Nov 2011 - 6:41 pm | पाषाणभेद

ओ विजू भौ, वरील तुमचे वाक्य दुसरे वाक्य आहे काय?
कारण त्या आधी 'जबरा रे सुहास्या, मजा आला बघ' असले काहीतरी ऐकू आले मला.

सुहास..'s picture

28 Nov 2011 - 10:18 pm | सुहास..

हे लिखाण इथे पूर्वप्रकाशित होते तर धागा वर आणायचा ना. नवा धागा कशाला काढलात? >>>

काय विजु भौ !! तब्येत वगैरै ठीक ना !!

नाही म्हणजे तुमची ही दुसरी वेळ !! नेमकं काय होतय ??? ;)

कुठे काय लिहीले आहे हे समजेना की काय ??

काळ्जी घ्या (स्वताची, बाकी चे पाहुन घेतील ;) )

अवांतर : स्वताच्या धाग्यावर लिहायला आवडत नाही 'सर' अजुन ही :)

विजुभाऊ's picture

29 Nov 2011 - 2:43 pm | विजुभाऊ

ऑ.... इथे बहुतेकानी हे लिखाण पूर्वी वाचलेले आहे. म्हणजे मला केवळ एकट्यालाच पुनर्वाचनाचा आनंद मिळालेला आहे असे नाही.
असो.
माझी तब्येत टुणटुणीत आहे,
कल्जी क्रु न्ये.

ईजुभौ ईजुभौ.... वाश्याने मी मराठीवर टाकलय हे.
तिथेच वाचल असणार तुम्ही.
:)

पुनर्वाचनाचा 'लुफ्त' घेतला. :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2011 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

+१ गणपा.

हेच बोल्तो.

काही लेख कितीही वेळा वाचले तरी आनंदच देतात, त्यातला हा एक लेख.

sneharani's picture

29 Nov 2011 - 1:16 pm | sneharani

काही लेख कितीही वेळा वाचले तरी आनंदच देतात, त्यातला हा एक लेख.
अगदी हेच!! मजा आली परत वाचताना!
:)

पैसा's picture

28 Nov 2011 - 7:27 pm | पैसा

कधी भेटशील तेव्हा कवितांची वही आणू नको! :D

आनंदी गोपाळ's picture

28 Nov 2011 - 8:47 pm | आनंदी गोपाळ

त्यांच्या कविता मुखोद्गत अस्ल्या मग?

(इयर प्लग म्यान्युफ्यक्चरर कर्नारा आनंदी) गोपाळ

पैसा's picture

28 Nov 2011 - 9:58 pm | पैसा

एक कविता ऐकली तर एक इयरप्लग फ्री. कविता तुम्ही ऐकायच्या, इयरप्लग आम्हाला.

शिल्पा ब's picture

29 Nov 2011 - 5:14 am | शिल्पा ब

भारी!!
आधिचा धागा नव्हता वाचला.

मस्त

साराभाई v/s साराभाई मधल्या रोशेसची आठवण झाली.

सोत्रि's picture

29 Nov 2011 - 11:25 am | सोत्रि

आहाहा,

जाई,
काय मस्त आठवण करून दिलीत, साराभाई v/s साराभाई :)
संपूर्ण सिरीयलचा डाउन्लोड आहे माझ्याकडे, आता परत बघावा लागणार.

- (रोशेसचे 'मॉमा' असे बोलणे आवडणारा) सोकाजी

जाई.'s picture

29 Nov 2011 - 11:30 am | जाई.

सोकाजी नक्कीच बघा
मी माझ्याकडचे एपिसोड कालच परत बघितले
मनोरंजनाची फुलटु गँरटी

अगदी मनातल बोललीस...मला हि रोसेषची आठवण झाली.मी सगळ्या कविता रोसेषच्या stylemadhye म्हणून बघितल्या.जम मजा आली.
काही काही आठवतायत....
१. पोपटलाल कि आत्मा का पोपट उड गया उड गया उड गया रे,
स्तृष्टी के तारणहार से पोपट जुड गया जुड गया जुड गया रे!

२. मेरे दिल कि धडकन सून
खतर खून खतर खुन खतर खून
तेरे प्यार ने बनाया हीन इसे
गुन गुन गुन गुन गुन गुन

३.दुध कि व्यथा ,चाय बनू या बचाडे कि खुराक?
....याच्या पुढच आठवत नाही.

किचेन's picture

29 Nov 2011 - 11:58 am | किचेन

यु त्युब्वारही सगळे भाग आहेत...नक्की बघा!
रोसेश मोनिशाची श्रद्धांजली लिहितो (ती पण चांगली) तो एपिसोडे बघाच!

चिंतामणी's picture

29 Nov 2011 - 11:37 pm | चिंतामणी

जाई ही मालीका तु, सोकाजी आणि किचेन प्रमाणे माझी आणि माझ्या मुलिची फेवरीट आहे.

कंटाळा आला असेल की एखादा भाग पहातो आणि फ्रेश होउन पुन्हा कामाला लागतो.

प्यारे१'s picture

29 Nov 2011 - 11:27 am | प्यारे१

मस्त रे वाश्या.....

पुनर्वाचनाचा पूर्ण आनंद घेतला. ;)

रच्याकने, पूर्वप्रकाशित म्हणजे फक्त मिपावरच पूर्व प्रकाशित असं थोडंच आहे? ;)

प्रास's picture

29 Nov 2011 - 11:47 am | प्रास

पूर्वप्रकाशित म्हणजे फक्त मिपावरच पूर्व प्रकाशित असं थोडंच आहे?

हेच म्हणतो मी....

बाकी लेख मस्तच!

:-)

सोनल कर्णिक वायकुळ's picture

29 Nov 2011 - 12:35 pm | सोनल कर्णिक वायकुळ

सहिच ... अशा कविता लिहिता येण सुद्ध 'चालेन्ज' आहे. आता माझ्या कविता या चश्म्यातुन लिहु म्हणते.:) बाकी लेख फक्कड.

चिगो's picture

29 Nov 2011 - 12:41 pm | चिगो

मला पुलंच्या "काहीच्या काही" कवितांमध्ये त्यांनी नवकवींची उडवलेली रेवडी आठवली..

आणि "हृद्यस्पर्श" मधल्या सुशिंच्या "तुझ्या परीटघडीच्या धोतराला विचार" ह्या ओळी..
येकदम मस्त भरकटलेल्या आहेत कविता तुझ्या..

मोहनराव's picture

29 Nov 2011 - 1:49 pm | मोहनराव

लेख चांगला आहे.... पण कविता आवरा!! ;)

ऋषिकेश's picture

29 Nov 2011 - 3:02 pm | ऋषिकेश

हे आधी वाचलं नव्हतं.. मजेशीर आहे :)

५० फक्त's picture

29 Nov 2011 - 3:45 pm | ५० फक्त

मजा आली पुन्हा एकदा.

डाव्या पायाच्या अंगठ्याची कविता जास्त आवडली.

चाणक्य's picture

5 Jan 2014 - 10:36 pm | चाणक्य

हे वाचलंच नव्हतं. तुफान लिहिलंय. ह.ह.पु.वा.

जोशी 'ले''s picture

6 Jan 2014 - 7:31 am | जोशी 'ले'

मस्त ,लेख आवडला..भन्नाट
असेच काहि धागे वर काढा रे...:-)

खटपट्या's picture

6 Jan 2014 - 7:50 am | खटपट्या

मस्तै ! येवूद्या आणखी अशा कविता…आम्ही वाचू (आम्ही = आदरार्थी बहुवचन)

सुहास भौ, तुमचे नि आमचे एकदम शंभर टक्के जुळते की हो. आता तुमचा सारखा आमचा मराठी चा व्यासअंगा दांडगा नाही आहे पण फारच कमी पण नाही आहे.

त्याचे असे झाले की, १२ वि त असताना एका टापटीका केली. म्हणजे जुळवळी म्हणा ना.

मी म्हणालो "अम"
ती म्हणाली "हं"
तिचा बाप म्हणाला "उ हं"

आता सांगा ह्या कवितेत काय वाईट आहे. खरे तर समाजाच्या जाज्वल्या प्रश्नाचा केवढा चांगला उहापोहा केवळ तीन ओळीत केला आहे. पण शिक्षणाला मुकता मुकता वाचलो. पुढे इंजिनियरिंग केले आणि त्यात साले मराठीच नव्हते.

आणि नंतर खरेच जेव्हन "उम" म्हणून विचारले तेव्हां ती आणि तीच बाप दोघेही "उ हं" म्हणाले हो.

अशा "उ हं" म्हणणार्‍या लोकांना कधी कळेल का की त्यांच्या मुळे समाज किती थोर कवीला मुकला ते?

अनुप ढेरे's picture

6 Jan 2014 - 10:12 am | अनुप ढेरे

हा धागा आठवला

http://www.misalpav.com/node/22752

मला वाटलं नेहमीच्या जीवनदर्शन छापाचा लेख असेल पण सुखद अपेक्षाभंग झाल्याने हहपुवा झाली =))

इन्स्पिरेशन दिल्याबद्दल धन्यवाद =))

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2014 - 2:53 pm | टवाळ कार्टा

लय भारी

रश्मि दाते's picture

10 Jan 2014 - 4:28 pm | रश्मि दाते

मस्त मजा आली,आधि वाचला नव्हता

जेनी...'s picture

10 Jan 2014 - 10:26 pm | जेनी...

ओ सुहास राव एक काम करा ... तुमच्या सहित ' माझे मिपावरील लेखन ' असे टीचकिदार वाक्य टाका म्हणजे
आम्हाला तुमचे जुने पराक्रम वाचायला तरी मिळतील ;)

बाबा पाटील's picture

11 Jan 2014 - 8:28 pm | बाबा पाटील

अत्रे असते तर म्ह्णाले असते,मागच्या दहा हजार वर्षात.....................पुढच तुम्हेी समजुन घ्या.