याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४
जादूनगरी
युएसजे म्हणजेच युनिवर्सल स्टुडिओ जपान! मोशन पिक्चर मॅजिक! ही जादूई नगरी आहे ओसाकामध्ये.युनिवर्सल स्टुडिओ,हॉलिवूड या ओरिजिनल स्टुडिओची ही जपान शाखा!प्रसिध्द हॉलिवूडपटांवर आधारित मोठेमोठे सेट्स इथे उभारले आहेत.तेथे आपल्याला त्या त्या सिमेमावर आधारीत शो पाहता येतात,निरनिराळ्या राईड्स घेता येतात आणि त्या सिनेमातले अनुभवही प्रत्यक्ष घेता येतात. अतिप्रचंड आवार असलेली ती नगरी शनिवार,रविवारी तर गर्दीने फुललेली असते.
पहिल्यांदा आम्ही गेलो 'जॉज' मध्ये,एका बोटीत आपण १०,१२ जण बसतो.बोट चालवणारी बाई,बोटीची कप्तान! आमचा प्रवास सुरू झाला.वाटेत आम्हाला एक छोटं बेटं दिसलं, त्याला वळसा घालून आमची बोट पुढे निघाली आणि एक मोठी शेपटी दिसली.शार्क! शार्क! असा एकच ओरडा झाला.पाणी कापत ते धूड आमच्या बोटीच्या दिशेने येऊ लागले.आमच्या पुढे काही अंतरावर असलेली एक बोट उलथली,दुसरीला आग लागली.आम्ही पुढे जात होतो,पण शार्क आपला जबडा वासून येत होताच.आमची कॅप्टन किंचाळायला लागली.जपानीतून घाईघाईने सूचना द्यायला लागली आणि जवळ येत असलेल्या त्या धूडाची हार्पूनने तिने शिकार केली.पाणी उसळलं आणि बोट पुढे निघाली.अगदी खरा खरा वाटणारा तो खोटा शार्क! जॉज सिनेमातले ते चित्तथरारक प्रसंग आपण या तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष अनुभवतो.ज्युरासिक पार्क राईड हे इथले खास आकर्षण, त्याला भरपूर गर्दी असते.तासंतास रांगेत उभे राहून लोक ती राईड घेतात म्हणून आधीच त्याचं आरक्षण केलं आणि दुसर्या शोजची मजा घेण्यासाठी आम्ही पुढे वळलो.
बॅक ड्राफ्ट हा सगळा आगीचा खेळ होता.सिनेमात आग कशी लागते? किंबहुना कशी लावतात? याचं ते प्रात्यक्षिकच होतं म्हणा ना!आपल्या समोरच आग लागते,धूर येतो,मोठाली पिंपे,कॅन्स घरंगळत खाली पडतात,कडाकडा आवाज करत जिना खाली बसतो आणि सगळ्यात शेवटी तर कहर होतो.हे सारे पाहत आपण जिथे उभे असतो ना, तिथेच हादरे बसायला लागतात,समोरचा कठडा कोसळतो आणि वरचं छप्परच खाली येतं, आपल्यापासून अगदी चार हातांवर!वाटतं ,आता पडणार..पडणार हे आपल्या डोक्यात!साहजिकच आपण घाबरतो,दचकतो तर कधी किंचाळतो सुध्दा! हळूहळू सारे शांत होऊ लागते.पडलेला जिना परत जागेवर बसतो,घरंगळलेली पिंपे होती तिथे जातात,खाली आलेलं छत परत वर होतं. सगळं आपओआप होत असतं.सिनेमात आग कशी लागते? इमारती,जिने कसे कोसळतात?एकावर एक रचलेली पिंपे कशी धडाधडा खाली येऊन एकमेकांवर आदळतात?सिनेटेक्नॉलॉजीशी हळूहळू ओळख व्हायला लागते.
बॅक टू द फ्युचर नावाचा एक भन्नाट फोर-डी शो! चौथी मिती काळाची!एका उघड्या मोटारीत पुढच्या भागात ४,आणि मागच्या सीटवर ४ असे ८ जण बसतात.गाडीला फक्त दरवाजे।रुफटप नाही की विंडशिल्डची काच नाही.गाडी सुरू होते.हळूहळू वेग घेते.समोर आपल्याला बर्फाळ डोंगर दिसत असतात.त्या डोंगरातच आपली गाडी जाते.एकदम थंडावा जाणवायला लागतो.सगळीकडे गारवा मुरायला लागतो.हिमनग दिसायला लागतात आणि आपण पाण्यातच शिरतो.त्या समुद्रातील कॉरल्स,सागरी वनस्पती,प्राणी आणि छोटेमोठे मासे पाहत असतानाच अचानक आपली गाडी वर उचलली जाते आणि तिथे एक डायनॉसोर आ वासून वाटच पाहत असतो आपली. डायनॉसोरच्या युगातून,अश्मयुगातून थेट आपण भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे धावतो.उंचउंच गगनचुंबी इमारती आणि स्पेस शटल्स पाहताना आपल्या मोटारीचंच स्पेस शटल होतं.आपण अवकाशात विहार करू लागतो.२०५० मधील जग कसे असेल?याची चुणूक पाहत असतानाच आपण पुन्हा एकदा 'चालू वर्तमानात' येतो.मनात माहिती असतं, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने आपल्या समोर येतं की ते आपण नुसते पाहत न राहता आपण त्याचाच एक भाग बनतो आणि ते सारे अनुभवतो.
डिजिटल कार्टून शो म्हणजे धमालच धमाल!भाषेचा प्रश्न तंत्रज्ञान सोडवून टाकते.स्टेजवर वावरणारी खरी पात्रे,विडिओचा वापर आणि ऍनिमेशन असा तिहेरी गोफ आहे.कार्टूनिस्टचे पात्र खरे तर संपादक कायम पडद्यावर!फोन वाजतो आणि संपादकाची छबी पडद्यावर उमटते आणि दोघांचे संभाषण कम कार्टूनिस्टची खरडपट्टी सुरू होते.थोडक्यात गोष्ट अशी: एक असतो कार्टूनिस्ट,त्याला डेडलाइन सांभाळताना नेहमीच नाकीनऊ येत असतात.संपादक सतत त्याच्या मागे भुणभुणत असतो.एकदा कार्टूनिस्टने काढलेल्या बदकातच जीव येतो. ते बदक इतक्या गमती करतं,त्या कार्टूनिस्ट्च्या घरात नाचतं,गातं,चित्र काढतं,खोड्याही काढतं.त्याचे ब्रश,रंग,पेनं,कागद सारे काही विखरून टाकतं.बदकाला पकडायचा विचार करकरून हा थकतो.शेवटी त्याला युक्ती सुचते.एका वॅक्युम क्लिनरमध्ये तो बदकाला बंद करतो आणि ते बदक आता तो कागदावर उतरवणार तेवढ्यात बदकोबा बाहेर येऊन आपल्या हातात वॅक्युम क्लिनर घेतो आणि त्या कार्टूनिस्टलाच बंद करतो आणि कागदावर बदकाचे चित्र उतरण्याऐवजी याचंच कार्टून!थक्क होत,कसं काय बुवा केलं असेलं असे प्रश्न मनात घेऊन आपण त्या शोला सलाम करतो.
ज्युरासिक पार्क राईड हा आणि एक सुंदर अनुभव होता.त्या ज्युरासिक पार्क सिनेमातल्या सारखीच आमची बोट सफरीला निघाली.वाटेत बेटं,जंगलं,जंगलातील हरणं,ससे,कूजन करणारे पक्षी,आणि डायनॅसोर्सची पिल्लं ,अंडी आणि अंडी फोडून बाहेर पडत असलेली पिल्लं!सारं कुतुहल डोळ्यात घेऊन पाहत असताना आमची बोट वेडीवाकडी वळणं घेत उंच लाटेवर जात होती,कधी वेगात खाली येताना हिंदकळत होती.अचानक एक अतिमहाकाय,प्रचंड डायनॅसोर आपल्या बोटीवरच चालून येतो.भीतीने मंडळी गारठतात आणि सुसाट वेगाने पाणी कापत,स्प्लॅश करीत बोट जवळ जवळ ८० फूटांवरून धप्पकन खाली येते.त्या भिजलेल्या अवस्थेत सर्वांचेच चेहरे फोटो काढण्यासारखे झालेले असतात,आणि तिथे लपलेल्या यंत्रात तुमची छबी उतरतेही!पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Oct 2007 - 4:42 pm | गुंडोपंत
"पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं."
हे आवडले!
मस्त वाटले अगदी स्वतः फिरून आल्यासारखे...
खूपच छान!
पुढे येवू देत अजून...
आपला
गुंडोपंत
25 Oct 2007 - 4:45 pm | सहज
वाचनातून अनुभव येणे म्हणजे काय ते हा लेख वाचल्यावर लगेच कळते. :-)
खरे तर १० डॉलर तिकीट लावायला पाहीजे ह्या लेखाला!
:-)
25 Oct 2007 - 8:16 pm | प्रमोद देव
गुंडोपंत आणि सहजपंतांशी पूर्णपणे सहमत!
मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते.
तुमच्या निवेदनशैलीला सलाम!
26 Oct 2007 - 11:32 am | विसोबा खेचर
मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते.
तुमच्या निवेदनशैलीला सलाम!
अगदी हेच म्हणतो...
स्वाती, जियो....
(शाळूसोबती) तात्या.
25 Oct 2007 - 10:31 pm | बेसनलाडू
लेख मस्त. आजवर परिचित झालेली पण अत्यंत ओघवती कथनशैली आणि चित्रांमुळे तर मजा आलीच. ब्याक टु द फ्यूचर, बॅकड्राफ्ट, ज्युरासिक पार्क सगळे आठवले. पण यात टर्मिनेटर, श्रेक, ममी रिटर्न्स या राइड्सचा उल्लेख कसा नाही बरे? नव्हत्या का या राइड्स?
नजीकच्या भूतकाळातील लॉस एंजेलिसजवळच्या (वरिजनल!!!) युनिवर्सल स्टुडिओची सफर आठवली. ज्युरासिक पार्क राइडसुद्धा. बोटीवर चालून येणार्या महाकाय डायनासोरच्या तोंडात "तो" क्यामेरा असतो, ज्यातून उतरलेल्या छबीत एकेकाचे पाहण्यालायक चेहरे असतात (आमचीही "ती" छबी आहेच आमच्याकडे ;) )
(छबीदार)बेसनलाडू
26 Oct 2007 - 11:44 am | स्वाती दिनेश
आहे . टर्मिनेटर बिर्मिनेटर ही आहे...सगळ्या राइडस होत्या, वरिजिनलची अगदी फोटूकापी आहे इथे,पुढच्या भागात टाकत आहे.
('क्रमशः' चे 'अपूर्ण' करावे की काय या विचारात)स्वाती
26 Oct 2007 - 12:28 am | प्राजु
अगदी चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे.. मस्त लेख.
आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
- प्राजु.
26 Oct 2007 - 4:13 am | ख्रेडूत
फारिन लै आवडलं बरंका!! आमासनी हित गावात बसून सगळं जग फिराया मिळतय बगा!!
27 Oct 2007 - 9:10 am | राजे (not verified)
जबरदस्त लेखन हातोटी.
वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग .... ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
28 Oct 2007 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरदस्त लेखन हातोटी.
वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग लवकर येऊ द्या !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Oct 2007 - 12:25 pm | आजानुकर्ण
+१
लेख आवडला.
28 Oct 2007 - 2:03 pm | स्वाती दिनेश
धन्यवाद मित्रहो,
जादूनगरीची सफर तुम्हाला सर्वांना आवडली,खूप छान वाटले.
जादूनगरीचा उर्वरीत वृतांत ही चढवला आहे,वाचून आपले अभिप्राय कळवा,:)
स्वाती