एप्रिल फळ (८)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 9:55 am

या पूर्वीचे दुवे

http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)

आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो.
मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो.
नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्‍याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो..

मे संपता संपता पावसाची चाहुल लागते.आकाशात वारंवार नजरा जाऊ लागतात. आई वहिनी आत्या वगैरे महिला वर्ग लोणचे करणे आम्बोळ्या कुरडया, पापड सालपापडाचे वाळवण इत्यादी बेगमीच्या कामात मग्न असतात. मुलानाही शाळेचे वेध लागलेले असतात. सूट्टी संपता संपत नसते लोळत पडण्याचाही कंटाळा आलेला असतो. पत्ते , बुद्धीबळे , कॆरम अस्ताव्यस्त विखुरलेले असतात.
काय करावे हा मोठाच प्रश्न असतो. आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
अशात एकदम दूरून एक मस्त आरोळी ऐकु येते...........आssssssssssल्फ़ीये कुल्फ़ी मलाsssssssय. कुल्फ़ी मलैssssssय.
पाउल जागच्या जागी थबकते. कंटाळ्यामुळे बधीर झालेले डोके एकदम चालु लागते.खीडकीतुन कुल्फ़ीवाला कुठे दिसतो याचा अंदाज घेत प्यान्टचे खिसे , टेबलाचे ड्रॊवर , पेन स्टेन्ड , गादीखाली , उशीच्या अभ्र्यात असे ठेवणीच्या गुप्त जागेत लपवलेले चिल्लर धन बाहेर येउ लागते. डोक्यावर माठ ठेवलेला कुल्फ़ीवाला दिसला की अक्षरश: भक्ताला देव भेटल्याचा आनन्द होतो.
आसपासच्या दोनचार खिडक्यातुन ओ कुल्फ़ी......थांबा अशा हाका ऐकु येतात.आणि मुले घराबाहेर पळ काधतात. घराच्या दारात्च कुल्फ़ीवाला त्याची ती माठ असलेले बाम्बुची टोपली अलगद उतरवुन ठेवतो तेंव्हा त्याचा थाट पहाण्यासारखा असतो. त्या्चा तो मिठाच्या बर्फ़ाने भरले्ला माठ. एखाद्या खालसा संस्थानाच्या कारभा-याने संस्थानचा खजी्ना दाखवावा तसा तो अलगद माठावरचे कापड बाजुला करतो त्यात बर्फ़ाच्या पाण्यात तरंगणा-या कुल्फ़ीच्या लोखंडे साचाच्या डब्या मुले अगदी अधाशासारखी पहात असतात.कुल्फ़ीचा साचा धरण्याची ती ढब . साचाच्या डबीवरील ते कणकेचे सील नखाने बाजुला काढले जाते.मुलांची इत्सुकता शीगेला पोहचलेली असते. साच्याचे डबीचे झाकण मोकळे होते . ती शंकु च्या आकाराची काळपट डबी तिरकी धरुन गुढग्यावर मूठ आपटत त्यातुन पांढरी शुभ्र कुलफ़ी बाहेर काढली जाते. बाहेर येणा-या कुल्फ़ीबरोबर पहाणाराचे डोळे विस्फ़ारत जातात.
अखेर शेवटी ती कुल्फ़ी वडाच्या पानावर आडवी ठेवुन चाकुने तीचे काप होऊन जेंव्हा ते वडाचे पान कुल्फ़ी सहीत हातात पडते तेंव्हा मनात कुल्फ़ीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही.
इतकी एकाग्रता जर कोणी देवधर्मात प्रार्थनेत दाखवली तर देव ती प्रार्थना संपायच्या आतच प्रसन्न होऊन दर्शन देईल. वडच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.कुल्फ़ी एकच खाउन थांबला असे जर कुणाच्या बबतीत झाले असेल तर तो मनुष्य हा जितेंद्रिय पदाला पोहोचलेलाच असला पाहिजे. हळुहळु त्या कुल्फ़ीवाल्या जवळ गर्दी जमते. मघाशी त्या पापडकुरडया जवळ फ़िरकु न देणा-या आयाबाया ती कामे सोडुन कुल्फ़ीच्या खजिन्या भोवती गोळा होतात. कुल्फ़ीवाल्याच्या माठातुन शेवटीशेवटी शोधुन्शोधुन कुल्फ़्या काढल्या जातात. माठातल्या कुल्फ़्या संपल्या की मगच कुल्फ़ीवल्याला जाऊ दिले जाते.
कुल्फ़ीवाला जातो ना जातो तोच दुसरा एक आवाज येतो..........हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
मुली याची वाटच बघत असतात. काळीशार करवंदे....निरागस पण अवखळ लहान मुलाच्या खट्याळ डोळ्यांची आठवण व्हावी असेच ती पाटीत ठेवलेली मण्यांसारखी करवंदे पाहुन वाटते.
किंचित आम्बट आणि गोड अशी चव...नुसती सांगुन कलणार नाही ती चाखायलाच हवीत. करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो. ज्याला जास्त कावळे तो त्या दिवशी जिंकला असे आम्हाला वाटायचे.
करवंदे खाताना एक गम्मत असते...करवंदे खावीत तर गच्चीत बसुन नाहीतर घराच्या कट्ट्यावर बसुन....करवंद हे फ़ळ सोफ़्यावर बसुन सगळे शिष्ठाचार पाळुन खाण्याचे नव्हेच. ते चाखत माखतच खायचे असते. करवंदांच्या फ़्यामिलीत जमा होईल असा चन्यामन्या नावाचा बोरांचा एक प्रकार असतो. नुसते नाव काढले तरी जिभेला पाणी सुटते. लालसर केशरी बारीक मोत्या सारखी दिसणारी किंचीत सुरकुतलेली ती फ़ळे इतकी आम्बट असतात की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. त्याला मिठाची जोड असेल तर काय विचारु नका.
पण ती सुद्धा खायची एक पद्धत आहे. कागदाचा त्रिकोनी द्रोण करुन त्यात अंदाज लागणार नाहीत इतकी चन्यामन्या बोरे त्यात भरायची आणि रस्त्याने रमतगमत जात खायची. आंबटपणामुळे जीभ जास्त वेळा टॊक्क करते की डोळे जास्त वेळा मिचकावले जातात आशी स्पर्धा सुरु असते.
करवंदे इतकी आंबट नसतात. पण ती त्यांच्या जादूई चवीमुळे वेड लावतात हे मात्र नक्की.
करवंदे एकेक करुन चाखत माखत खाणे आणि एकदम त्यांचा बकणा भरणे ...हे दोन्ही प्रकार अजबच आनन्द देतात. एकेक करवंद जिभेवर घोळवत खायचे.आणि दहाबारा करवंदे एकदम चावायची मजा वेगळीच. करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते.
करवंदांबरोबरच येतात ती जांभळे.आमच्या गावात जवळच एक जाम्भळाचे जंगल आहे. बघावे तिकडे जांभळाचेच झाड. अक्षरश: झोपुन तोडता येतील इतक्या खाली वाकलेल्या फ़ांद्याम्वर असतात जांभळे तेथे ही छोटी जाम्भळे मिळतात. साल आणि बी यात अंतर फ़ारसे नसते. गर वगैरे चैन नसते.
पण ही जांभळे चवीत मात्र लाखात एक. खाताना असेच हवे तसेच हवे अशी उगाच मिजास नसते. जे मिळेल त्या भांड्यात घेउन खावी. न मिळाल्यास ओंजळीत घेउन खावी. हां पण एक आहे जेथे रस्ता जवळ असेल अशाच जागेवर बसुन / उभे राहुन खावी. लहानपणी आम्ही भावंडे ही जाम्भळे घराच्या खीडकीत उभे राहुन खायचो.आणि बीया जोरात रस्त्यावर उडवायचो. तोंडाने उडवुन कोणाची बी जास्त लाम्ब जाईल ते पहायचो.
दुसरी जांभळे असतात ती जरा जाड खात्यापित्या घरची. त्याना गर असतो. आम्बटपणा कमी असतो पन गोडवाही कमी असतो. ही जाम्भळे खाताना साल दातानी सोलुन आतला पांढरा नीळा गर उगाचच टिनोपालच्या जहिरातीची आठवण करुन देतात.
जाम्भळे करवंदे डहाणु घोलवडकडे मिळणारे पाण्याच्या चवीचे जाम. ही सारे असतात कोकणचा मेवा त्याना आंब्याइतके कोणी फ़ारसे ओळखत ही नाही. पण ज्याना ती माहित आहेत त्याना ते कोठेही असो प्रत्येक मोसमात या मेव्याची हटकुन आठवण होतेच.
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

(क्रमशः)

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2008 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ,

कुल्फी, करवंद, जांभळाची आठवण लै भारी !!!
पण फोटू पाहिजे होते राव जांभळाचे, करवंदाचे, आणि कुल्फीवाल्याचे नाही ते माठाचे सुद्धा !!!

( आता जरा गडबडीत आहे, सायंकाळी पुन्हा एकदा करवंद, जांभळं आणि कुल्फी खाईन. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

11 Jul 2008 - 10:22 am | मदनबाण

व्वा विजुभाऊ..
आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
साबुदाण्याच्या पापड्या,,लोणच,,चिंचा..काय मिळेल गच्चीत ते सरळ हादडायचे,,,आमची तर टोळीच होती,,कोणाला जरी कुठ काय वाळत ठेवल आहे ह्याचा सुगावा लागला की तिथ धाड मारुन त्या वस्तुवर आम्ही डल्ला मारुन मोकळे व्हायचो..
कुल्फी वरुन आठवले बर्‍याच वेळा कुल्फी वाल्याला ऐ कुल्फीवाले अशी हाक मारुन आम्ही मुले लपुन बसायचो,,तो बिचारा इकडे तिकडे बघत बसायचा...मग एकदा दोनदा त्याला असे तंगवले की मग त्याच्या कडुन कुल्फी विकत घ्यायची ...
करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो.
आम्ही ह्याच कोंबडा आणि कोंबडी अशी नाव ठेवली होती,लाल =कोंबडा,पांढर= कोंबडी..
करवंदाच्या जाळीत जाऊन करवंद वेचण्याची मजा कही औरच !!!!!

(जंगलातला हा रानमेवा मनसोक्त हादणारा)
मदनबाण.....

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 11:38 am | मनस्वी

ही पण बालपणीची एक सुरेख आठवण आहे. आम्ही वाड्यात रहायचो. आमची पण धमाल टोळी होती.
दुपारी गोरेआजी अन् लिमयेआजी वाळवण टाकायच्या.. साबुदाण्याच्या पापड्या, पापड, शिंगाडे, चिंचा, सांडगे. ते सगळ्यांना खायला आवडो वा ना आवडो.. पण त्यावर गनिमी काव्याने फडशा पाडण्यात एक वेगळीच मजा असायची.
दुपारी सगळे झोपले की आम्ही हळूच बोळातून सुगावा घेत असू.. कोण येतंय.. गॅलरीत कोण आहे.. लिमयेआजी आमच्यावर दबा धरून बसल्यात का.. नेमके लिमयेकाका गॅलरीत पेपर वाचत बसलेले दिसायचे.. मग ते जास्तोवर आमचे हळूच पहाणे.. कोण कसे जाणार ते ठरविणे.. मग शेवटी सगळे चिडीचूप झाल्यावर..... धाड टाकायचो.. आणि सभेचा जिना.. आमचा अड्डा.. तिथे बसून आज्यांना कसे गंडवले याची चर्चा करत सगळं फस्त!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 10:34 am | मनस्वी

काय विजुभाऊ जांभळांची आठवण करून दिलीत!

मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

काय बोललात!
लहानपणी सुट्टीत मामाच्या घरी गेल्यावर मागच्या टेकड्यांवर असलेल्या जंगलात करवंद खादडत बोकाळणे हा आमच्या भावंडांचा आवडीचा उद्योग होता.

मस्त लिहिलंय.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आनंदयात्री's picture

11 Jul 2008 - 10:41 am | आनंदयात्री

छान लेख.

इनोबा म्हणे's picture

11 Jul 2008 - 11:22 am | इनोबा म्हणे

विजुभाऊ... छान लेख.
मनस्वीने दिलेला फोटुही मस्तच

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सहज's picture

11 Jul 2008 - 11:43 am | सहज

फळांइतकाच रसाळ गर असलेला लेख!!!

डोमकावळा's picture

11 Jul 2008 - 11:47 am | डोमकावळा

करवंदाच्या जाळीत शिरुन तोडून आणणे आणि मग वाड्याच्या ओसरीवर निवांत पाय पसरुन खात बसणे...
व्वा.. नुस्ती मज्जा.. :)
जांभळं फक्त खायला आवडतात, ती तोडायच्या भानगडीत नाही बॉ पडत.
एकदा प्रयत्न केला होता जांभळाच्या झाडावर चढायचा, पण असा आपटलो की परत चढायची ईच्छाच नाही झाली.. :D

झकासराव's picture

11 Jul 2008 - 11:48 am | झकासराव

ही घ्या करवंद आमच्या पुरंदरच्या भटकंतीमध्ये सापडलेली.
जर दिसत नसतील तर
http://picasaweb.google.com/zakasrao/Purandar/photo#5192109913189526274
इथे क्लिक करा.

विजुभाउ लेख नेहमीप्रमाणेच छान. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

झकासराव's picture

11 Jul 2008 - 11:50 am | झकासराव

मे महिन्यात गेलो होतो त्यामुळे कच्चीच होती म्हणा.
पण कित्येक वर्षानी करवंदाची जाळी पाहिली आणि दिल खुष झाला. :)
करवंद पिकलेली असती तर गड चढायला अजुन तासभर उशीर झाला असता ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

संजय अभ्यंकर's picture

11 Jul 2008 - 12:00 pm | संजय अभ्यंकर

माझे अत्यंत प्रिय फळ.
डिसेंबर / जानेवारी सुमारास बाजारात येते.

परंतु मुंबईत मिळत नाही. पुण्यास विपुल प्रमाणात मिळते.
हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे गरवारे पुलावरचा (चितळ्यांच्या दारातला) बागवान.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनिष's picture

11 Jul 2008 - 12:54 pm | मनिष

माझेही आवडते फळ....इथे "काळी मैना" म्हणून ओळखले जाते. आजकल मिळत नाही सहज.... :(
आंब्याचे वर्णन खासच.

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 1:01 pm | यशोधरा

लहानपणी आजोळी कोकणात जात असे, त्या आठवणी परत एकदा जिवंत झाल्या!

नंदन's picture

11 Jul 2008 - 1:04 pm | नंदन

>>> वडच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.

-- अगदी :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शितल's picture

11 Jul 2008 - 5:38 pm | शितल

कुल्फी काय, करव॑दे काय, जा॑भळे काय
विजुभाऊ किती छळता हो,
नुसत्या आठवणी नी परत जिभेवर तीच चव जागी होते.:)
जिभेवरच्या चवी जागवणारा लेख.

वरदा's picture

11 Jul 2008 - 5:47 pm | वरदा

प्राजु म्हणते तश्शा सगळ्या आठ्वणी जाग्या झाल्या....मस्तच लेख्....परत एक चान्स मिळू शकतो का छोटं व्ह्यायचा? :(
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

11 Jul 2008 - 7:01 pm | प्राजु

संग्रह करून ठेवण्यासारखी आहे विजुभाऊ. किती सुंदर लिहिता तुम्ही..! मानलं बुवा..
आणि हे सगळं.. म्हणजे आंबे, कुल्फीवाला, करवंदे आणि जांभळं.. हे इतकं खाल्ल आहे या ट्रीपमध्ये की बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 12:48 pm | विसोबा खेचर

प्राजूशी सहमत. संपूर्ण लेखमालाच संग्रह करून ठेवावा अशी!

अजूनही येऊ द्या विजूभाऊ...

आपला,
(करवंदप्रेमी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 9:03 pm | llपुण्याचे पेशवेll

मला पण आमच्या घरापाशी येणार्‍या कुल्फीवाल्याची आठवण आली. पण आमचा कुल्फीवाला हातगाडीवर कुल्फीचा लाकडी खोका घेऊन यायचा. हातगाडीला खालती घंटा बांधलेली असायची. ती किणकीणावर कुल्फीवाला आला की पोरांचा गराडा पडलाच गाडीला. तसाच यायचा गोळेवाला.
(अवांतर: बरेचदा मी कुल्फीचे पाणी चांगले नसते या कारणामुळे कुल्फीला मुकलो आहे. :( तसे कुल्फीवाल्याच्या आरोळीवरून आमच्या इथे येणार्‍या कल्हई वाल्याची आरोळी आठवली. 'ए क्लैSSSSSSSSSSSSS' अशी मजेदार आरोळी द्यायचा. तसेच एक मोडाची कडधान्ये विकणारा देखील यायचा. त्याची पण आरोळी गंमतशीर होती. 'क्वाSSSचाचैSSSचैSSSSSSSSS मोडाचै, मटकी येSS, वाटाणा येSSSS, हरभरा ये'. यातला क्वाSSSचाचैSSSचै चा अर्थ मला तर कधीच नाही कळला. :) कदाचित त्याच्या आरोळीच्या आधीची ती तान असेल. :) )

करवंदे तर को़कणात उदंड खाल्ली. आमच्या गावापासून माझ्या आत्याची सासुरवाडी असलेल्या 'मणचे' या गावापर्यंत चालत जावे लागे. तेव्हा उदंड करवंदाच्या जाळ्या लागत मधे. आमची आजी कसल्याश्या मोठ्या पानाचा झटपट द्रोण करून द्यायची. मग आमची नातवंडांची पैज कोणाचा द्रोण आधी भरतो. करवंदाचा चीक देखील आवडायचा खायला. विजुभाऊ मस्त आठवण करून दिलीत हो......
पुण्याचे पेशवे

शब्द वाचून, चित्रे बघून तरसलो.

ऋषिकेश's picture

12 Jul 2008 - 7:35 pm | ऋषिकेश

वा सुरेख! करवंद आणि जांभळं हा लहानपणीचा खास मेनु :)
अजून येऊ द्या

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Jul 2008 - 8:06 pm | श्रीकृष्ण सामंत

विजुभाऊ,
आठवणी येतात असं आपण म्हणतो आठवणी जातात असं कधी म्हणत नाही.
तुमचा हा सुंदर लेख वाचून मला आठवणी आल्या.

देशील कां रे देवा
फिरूनी माझे बालपण
करीन मी माझे
सर्वस्व तुला अर्पण

देशील कां रे देवा
फेरूनी माझे ते
अमोल क्षण
ती माझी
कागदाची होडी
अन
ते खळखळ्ते पाणी
ते आंबे,गरे,फणस
अन
ती टपोर करवंदे,जांभळे,

ऐकशील कां रे देवा
फिरूनी माझी
ही विनवणी
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

स्वाती राजेश's picture

13 Jul 2008 - 2:58 am | स्वाती राजेश

नेहमीप्रमाणे मस्त लेख झाला आहे...
परत जुन्या आठवणींना उजाळा....
हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
अशी आरोळी खेडेगावचा एक शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरची ती चौकोनी टोपली...अजूनी डोळ्यासमोर येते...बिचारा उन्हात फिरून थंडगार पाणी पिण्यासाठी आमच्याकडे येत होता...आई त्याला आंबिल प्यायला द्यायची....जाताना भरपूर करवंद देऊन जात होता...आठवड्यातून एकदा त्याची फेरी असायची....
कुल्फीवरून आठवले आम्ही असे बर्फाचा गोळा खायचो....मस्त मजा यायची कधी कधी दोन दोन कलर एकाच गोळ्याला लावून ते कलर एकमेकांत कसे मिक्स होतात ते पाहात असू.....
कुरड्या आणि सालपापड्या काय विचारता? तो तर विक पॉइंट्...जी चोरून खाण्यात मजा ती कशात नाही असे त्यावेळी वाटायचे....आता नाही....:)
सालपापड्या ओल्याच छान लागतात्....पण कुरडया जरा उन्हात वाळवून अर्धवट ओल्या खाण्यात मजा...:)

या लेखावरून परत वाटते लहानपण देगा देवा...
येऊ दे अजूनी पुढील लेख्.....वाट पाहात आहे....खूप वाट पाहायला लावू नका....:)

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jul 2008 - 8:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

बहोत अच्छे विजूभाऊ!

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 1:13 pm | शक्तिमान

हाही लेख सुरेख!

>>करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते.
अगदी खरे...

विजुभाऊ's picture

27 Mar 2016 - 1:01 am | विजुभाऊ

आला एप्रिल आला.........