विजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हे लेखन आता अद्ययवत करण्यात आलेले आहे.
- जनरल डायर.
बाजारात आंब्यांचा दरवळ असतो. कोठेही नजर फिरवली तरी आंबेच आंबे नजरेस पडतात. पिवळे धमक,पिवळसर केशरी, जर्द केशरी , लालसर हिरवे , हिरवट केसरी , संध्याकाळच्या लालसर प्रभेचे सगळे रंग ही आंब्यांची रास रंगवायला वापरले जातात्.एखादया नामचीन चित्रकाराने आव्हान स्वीकारुन केवळ एकाच रंगात चित्र काढायचे ठरवुन त्या रंगाच्या सगळ्या छटा मन लाउन चित्र काढावे तसे या आंब्यांकडे बघुन राहुन राहुन वाटते, तोतापुरी ला देवाच्या प्रसादात मान मिळायचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा रंग्.गोर्यापान बाळाला मस्त आंघोळ घालुन झोपवले असावे आणि झोपेतच त्याच्या गालाला खळी पडावी आणि गाल आणखीच खुलुन दिसावे तदवत या तोतापुरी चा रंग दिसतो.त्याची पांढरट साल त्यावर गुलाबीसर केसरी नव्हाळी. बाजीरावाच्या मस्तानीशी स्पर्धा करावी तर यानेच.
आंब्यांचे स्पर्श सुद्धा किती सांगावेत. तलम पातळ सालीचा केसर. जाड सालीचा दशेरी , करकरीत रेशमी स्पर्शाचा हापुस, गोर्याघार्या वर्णाचा कडक तोतापुरी. हातातच घोळवत ठेवावा असा गोटी आंबा,खडबडीत कावजी पाटील
चवीमध्ये सुद्धा इतकी विवीधता दुसर्या कोणत्या फळात क्वचितच दिसते.पाणचट, फिक्का तोतापुरी ,साखरी गोड दशेरा , किंचीत तुरट शेपु , केवळ कच्चाच खाता यावा यासाठीच निर्माण केला मोठ्ठा खोबरी आंबा, दातच काय पण डोके सुद्धा आंबेल इतका आंबट शेन्द्री आंबा. मला वाटायचे की आंबणे हा शब्द या आंब्या वरुनच आला आहे.चवीनुसार आम्ब्यात जाती जमाती आहेत. पण एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फान्दी वरुन काढलेल्या दोन आम्ब्यांच्या चवीत फरक आढळेल.
अर्थात अशी तुलना करुन शब्द्च्छल करण्यापेक्षा समोर दिसणार्या गोष्टीचा आनन्द घेणे हेच चांगले. हे सांगण्यासाठे आंब्या इतके दुसरे समर्पक उदाहरण दुर्मीळच.
काही आंबे जरा फारच तयारीचे असतात. ते रंग बदलायचे नावच घेत नाहीत. कितीही परिपक्व पणा आला तरी बाहेरुन हिरवेच असतात्.गोडी अवीट असते रसाळ असतात पण रंगाने हिरवेच असतात. त्याना पाहीले की अनन्त काणेकरांच्या " पांढरे केस हिरवी मने"मधली "आऊ" आठवते. वय झाले तरी उत्साह कमी होत नाही. काहीसे आशा भोसलेंच्या चिरतरुण आवाजासारखे. हे घोळुनच खायचे असतात. चिरुन फोडी करुन ताटलीत मांडुन असला नाजुक रेशमी प्रकार याना आवडत नाही. करंडीतुन आंबा घ्यायचा, गोड निघावा अशी प्रार्थना करायची, घोळायचा, वरचे टोक दातानीच काढुन टाकायचे आणि ओठानी थेट भेट घ्यायची. मामला कसा एकदम सरळ स्ट्रेट असतो.आंबा घोळुन खाण्यात आणखी एक मजा असते.तोंड वाकडे करत आवडती गोष्ट खुशीत चाखत माखत करणे हा अजब प्रकार फक्त आंबे चोखुन खातानच घडु शकतो
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात.
मी लहानपणी एका मित्राच्या गावी गेलो होतो. त्याचा गावात मोठा वाडा होता.आंब्याची बाग होती. सगळे गोटी.आंबे एक्जात सगळे एका आकाराचे. हिरवे कच्च. त्याच्या वडिलानी आम्हा मित्राना आंबे खायला बोलावले होते.आम्ही चर पाच जण होतो.
आंब्याच्या बागेत थोडे खेळुन झाल्यावर जेवायला वाड्यात आलो. तेथे चौकात आंब्याच्या टोपल्या ठेवल्या होत्या. बैलांपुढे आम्बोण ठेवावे तसे त्यानी आम्हा प्रत्येकापुढे एकेक रीकामी टोपली ठेवली. त्या मित्राचे वडील आमच्या समोर बसले प्रत्येकाला निवडुन त्यानी एकेक आंबा दीला म्हणाले हा चाखुन बघा बाठी साले त्या टोपल्यात टाका. असे पाच सहा वेळा झाले त्या नन्तर त्यानी दुसर्या टोपलीतले आंबे काढले म्हणाले तो मघाशी खाल्ला तो खालच्या बांधावरचा होता. हा तळ्याच्या डाव्या अंगाचा आहे. ते पाच सहा आंबे झाल्यावर मग तळ्याच्या उजव्या अंगाचा आला,तळ्याच्या वरच्या अंगाचा.ताली वरचा , खळ्या वरचा , असे करत करत तीस बत्तीस आंबे झाले.
तेवढे झाल्यावर त्याने आम्हा प्रत्येका पुढे एकेक मोठा वाडगा आमरस भरुन ठेवला. आम्ही तो रस भुरका मरुन खाउ लागलो. मित्राचे वडील म्हणाले."अरे काय लावलय असे कुचमत काय खाताय? उचला तो वाडगा". आम्ही वाडगा उचलला. "हां आता लावा तोंडाला".आम्ही आज्ञा धाराक बालकाप्रमाणे वाडगा तोंडाला लावला "आता करा रीकामा"
वाडगा रीकामा करुन खाली ठेवतोय न तोच तो वाड्यातल्या गड्याने पुन्हा काठोकाठ भरला. पुन्हा तशाच आज्ञा..पुन्हा तस्साच आमचा आज्ञाधारक पणा.......
पोटाला तडस लागणे म्हणजे काय हे त्या दिवशी कळाले. पण त्या दिवशी दीली तशी तृप्तीची ढेकर पुन्हा कधी निघेल असे या जन्मी तरी वाटत नाही
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 4:29 pm | आनंदयात्री
खात तुम्ही वर्णन करुन करुन आम्हाला आंबे खायची आस लावलीत बुवा !
10 Apr 2008 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजूभाऊ,आपल्या आंब्याच्या, आमरसाच्या आठवणींनी आम्हालाही आमच्या आजोळच्या आमराईची आठवण झाली.शाकाला लागलेल्या कै-या उतरवणे, पडलेल्या कै-या जमा करणे, पिकवणे, पिकले की नाही म्हणुन चाचपत राहणे, हाताच्या कोप-यावर ओघळत जातोय तरी आंब्यांचा रस चोखणे, मत पुछो यार वो बचपण की यादे !!!
आपल्या लेखणीला कै-या, आंब्याची गोडी लागली आहे, आता थांबू नका !!!
फक्त एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फान्दी वरुन काढलेल्या दोन आम्ब्यांच्या चवीत फरक आढळेल हे विधान तितकेसे पटणारे नाही. पीकलेले आंबा गोड लागणे आणि त्या पेक्षा कमी पीकलेला आंबट लागू शकतो हे माहित आहे, सदरील माहिती आमच्यासाठी जरा नवीनच आहे. पण किमयागारावर माझा विश्वास आहे म्हणुन धकून घेतो :))
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Apr 2008 - 12:19 am | विसोबा खेचर
आपल्या लेखणीला कै-या, आंब्याची गोडी लागली आहे, आता थांबू नका !!!
अगदी हेच म्हणतो...
आपला,
(कोकणाताला एक गरीब आंबाव्यापारी) तात्या.
10 Apr 2008 - 4:40 pm | स्वाती राजेश
तोतापुरी ला देवाच्या प्रसादात मान मिळायचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा रंग्.गोर्यापान बाळाला मस्त आंघोळ घालुन झोपवले असावे आणि झोपेतच त्याच्या गालाला खळी पडावी आणि गाल आणखीच खुलुन दिसावे तदवत या तोतापुरी चा रंग दिसतो.त्याची पांढरट साल त्यावर गुलाबीसर केसरी नव्हाळी. बाजीरावाच्या मस्तानीशी स्पर्धा करावी तर यानेच.
तोतापुरीचे हे वर्णन तर मस्त केले आहे.
दातच काय पण डोके सुद्धा आंबेल इतका आंबट शेन्द्री आंबा:))))) लहानपणचा तंतोतत अनुभव...
आंबा कसा खावा याचे ही छान वर्णन लिहीले आहे.
व्वा $$अजुनी आम्हाला आंबा पुराण वाचायला तर?
वाट पाहात आहे...
10 Apr 2008 - 4:42 pm | छोटा डॉन
विजूभाउ, तुम्ही आम्हा परमुलखात असलेल्या पोरांना असली वर्णने दाखवून आमच्यावर अत्याचार करत आहात अशी तुमच्यावर केस का ठोकू नये ?
जबरदस्त आहे साज लेखनाचा. एकदम आवडले आपल्याला ...
एकदम लहानपणाची आठवण आली. सकाळी बाबांबरोबर मंडईत जायचे. तिथल्या अंब्याचा सुवास छातीत भरून घ्यायचा. आंबेवाल्याने प्रेमाने "बघा टेस बघा, मग घ्या " म्हणत दिलेली फोड तिथेच खायची. तसेच आंबाळलेले ओठ घेऊन घरी यायचे. आल्याआल्या बाबा एक चांगला आंबा बघून " बिलबीलीत" करून देणार मग तोच निम्मा पोटात, थोडा शर्टावर , थोडा तसाच तोंडाला माखून असा खायचा. त्याची कोय "खेळण्यासाठी" जपून ठेवायची... दुपारी वाट्या च्या वाट्या "आमरस " खाऊन पोटाला तडस लागल्यावर लोळत पडायचे. अहाहा एकदम झक्कास ... थॅक्स विजूभाऊ ....
"पाणचट, फिक्का तोतापुरी ,साखरी गोड दशेरा , किंचीत तुरट शेपु , केवळ कच्चाच खाता यावा यासाठीच निर्माण केला मोठ्ठा खोबरी आंबा, दातच काय पण डोके सुद्धा आंबेल इतका आंबट शेन्द्री आंबा. मला वाटायचे की आंबणे हा शब्द या आंब्या वरुनच आला आहे.चवीनुसार आम्ब्यात जाती जमाती आहेत. पण एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फान्दी वरुन काढलेल्या दोन आम्ब्यांच्या चवीत फरक आढळेल.अर्थात अशी तुलना करुन शब्द्च्छल करण्यापेक्षा समोर दिसणार्या गोष्टीचा आनन्द घेणे हेच चांगले""
हे बाकी खरे ...
"आम्हा प्रत्येका पुढे एकेक मोठा वाडगा आमरस भरुन ठेवला. आम्ही तो रस भुरका मरुन खाउ लागलो. मित्राचे वडील म्हणाले."अरे काय लावलय असे कुचमत काय खाताय? उचला तो वाडगा". आम्ही वाडगा उचलला. "हां आता लावा तोंडाला".आम्ही आज्ञा धाराक बालकाप्रमाणे वाडगा तोंडाला लावला "आता करा रीकामा"
वाड्गा रीकामा करुन खाली ठेवतोय न तोच तो वाड्यातल्या गड्याने पुन्हा काठोकाठ भरला. पुन्हा तशाच आज्ञा..पुन्हा तस्साच आमचा आज्ञाधारक पणा.......
पोटाला तडस लागणे म्हणजे काय हे त्या दिवशी कळाले. पण त्या दिवशी दिली तशी तृप्तीची ढेकर पुन्हा कधी निघेल असे या जन्मी तरी वाटत नाह"
खलास .. बाकी अजून काय पाहिजे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 Apr 2008 - 4:42 pm | मदनबाण
विजुभाऊ लगे रहो हम तुम्हारे और तुम्हारे आम के साथ है !!!!!
आत्ताच वॉचमन घरी देऊन गेला.
दिसला आंबा काढला फोटो आणि टाकला इथ.....
(गार आमरस चापणारा)
मदनबाण
10 Apr 2008 - 5:10 pm | धमाल मुलगा
काय बोलु बॉ?
ह्या माणसानं तर आपली बोलतीच बंद करुन टाकली आहे.
कारण? ....कारण विचारताय?
इथं तोंडाला पाणी सुटुन टेबलाखाली तळं साचलंय....बोलणार काय? कप्पाळ?
वर आणि हा मदनदा...च्यामारी उठसुठ आंबा-कैरीचे फोटू टाकतोय.
लय भारी!!!
10 Apr 2008 - 7:14 pm | आनंद घारे
मिर्झा गालिबला एकदा कांही कारणाने तुरुंगात टाकले गेले. तुरुंगात होणार्या यातनांहून 'आमका मौसम चला जा रहा है' याची त्याला जास्त हळहळ वाटत होती असे सांगतात.
10 Apr 2008 - 7:36 pm | इनोबा म्हणे
करंडीतुन आंबा घ्यायचा, गोड निघावा अशी प्रार्थना करायची, घोळायचा, वरचे टोक दातानीच काढुन टाकायचे आणि ओठानी थेट भेट घ्यायची. मामला कसा एकदम सरळ स्ट्रेट असतो.आंबा घोळुन खाण्यात आणखी एक मजा असते.तोंड वाकडे करत आवडती गोष्ट खुशीत चाखत माखत करणे हा अजब प्रकार फक्त आंबे चोखुन खातानच घडु शकतो
अगदी बरोबर बोललात.आंबा चोखून खाल्ल्याशिवाय त्याची मजा नाय कळायची...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
10 Apr 2008 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या लहानपणी वडील रायवळ आंब्यांची करंडी घेऊन यायचे. रसाचे आंबे. असे आम्ही म्हणायचो.
आमच्या जुन्या घराला पुढचे दार, मागचे दार अशी दोन दारे आहेत. घरात आमरसाचा बेत असला की रस काढून बाजूला ठेवलेली आंब्यांची साले, कोयी खाण्यावर मी तुटून पडायचो. मागच्या दारी, कमरेला फक्त लज्जा रक्षणर्थ एक वस्त्र असायचे. आणि रसाने लडबडलेला मी नंतर आंघोळीसाठी डायरेक्ट बाथरुमात जायचो. विशेष म्हणजे, आमरसाच्या वासाने बाकी कधी वर्षभर दृष्टीस न पडणारी टपोरी हिरवी/मोरपंखी रंगाची माशी बरोबर हजर व्हायची. एका हाताने तिला हाकलत हाकलत ती आंब्याची सालं आणि कोयी चोखण्यातसुद्धा मजा यायची.
10 Apr 2008 - 8:09 pm | विजुभाऊ
आमरसाच्या वासाने बाकी कधी वर्षभर दृष्टीस न पडणारी टपोरी हिरवी/मोरपंखी रंगाची माशी बरोबर हजर व्हायची.
पेठकर काका ही टपोरी हिरवी/मोरपंखी रंगाची माशी केवळ मलगोवा या आंब्यापाठोपाठ येते. ती मलगोवा वर आंबा ताजा असताना बसते किंवा इतर आंब्यांच्या साली बाठीवर बसते. तोतापुरी वर पण बसते पण तो थोडावेळ उघडा ठेवल्यानन्तरच.पण ही माशी मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुन मधे येते. एप्रिल मधे नसते
अजुन एक प्रयोग करयचा असल्यास सातर्यात कासच्या जंगलात "चवरी" वनस्पती सारखे दिसणारे एक कीटकभक्षी झाड आहे. त्या झाडाची फांदी फुला सोबत आणली तरी या माशा लगेच येतात् कोणत्याही मोसमात
10 Apr 2008 - 9:21 pm | झकासराव
लेख जबरदस्त लिहिताय बर.
एका पेक्षा एक असे छान लिहिताय. :)
तुम्ही केलेले वर्णन आणि चपखल उपमा पाहुन वाटत की तुमच्याकडे सुंदर मराठी लेख लिहिण्याचा क्लास लावावा का :)
10 Apr 2008 - 10:45 pm | बेसनलाडू
आणखी एक चवदार भाग वाचला. मजा आली. छान लिहिलंय.
(चवदार)बेसनलाडू
10 Apr 2008 - 11:11 pm | प्राजु
आणखी एक चवदार भाग वाचला. मजा आली. छान लिहिलंय.
सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 11:03 pm | अभिज्ञ
विजुभाउ,
आपले ह्या विषयावरचे चारहि लेख वाचले.सगळेच एक से एक झाले आहेत.
काहि लेख संग्रहि ठेवावे असे असतात.आपल्या ह्या सर्वच लेखाना माझा मानाचा मुजरा.
अतिशय सुंदर आणि रसाळ भाषाशैली, आणि तितकाच गोड विषय...
आणि मदनबाण ह्यांनि काढलेलि छायाचित्रे तर अप्रतिमच ...
फारच आवडला...........
मि.पा. वरिल काहि अप्रतिम लेखांत हे नक्किच लक्षात राहतिल.
अबब.
11 Apr 2008 - 2:11 am | ब्रिटिश टिंग्या
जुन्या आठवणी ताज्या झाल्या......
मि.पा. वरील काही अप्रतिम लेखांत हे नक्किच लक्षात राहतील.
१००% सहमत!
-टिंग्या :)
11 Apr 2008 - 7:56 am | नंदन
म्हणतो. आत्तापर्यंतचे सगळेच भाग आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Apr 2008 - 12:23 am | चतुरंग
दोन्ही हातांवरुन कोपरापर्यंत आमरस आला की ओघळून!
मस्त चाललंय विजूशेठ, 'आम्रपुराण' हे १९ वे पुराण मानावे लागेल आता.;))
चतुरंग
11 Apr 2008 - 2:21 am | पिवळा डांबिस
एप्रिल फळ - (१)! तद माताय!
एप्रिल फळ - (२)! तद माताय! तद माताय!!
एप्रिल फळ - (३)! तद माताय! तद माताय!! तद माताय!!!
एप्रिल फळ - (४)! तद माताय! तद माताय!! तद माताय!!! तद माताय!!!!
च्यायला, आम्ही इथे हापुस/पायरीची आवड "केंट" आंब्यावर भागवतोय आणि तुम्ही खुशाल पोटाला तडस लागेपर्यंत आंबे खा! आणि वरती त्याची रसभरीत वर्णनं करा!! हा कसला न्याय!!:))
बधून घेईन! आता मी पण इथल्या "स्ट्रॉबेर्यांच्यावर" एक दहा भागाची लेखमालाच लिहितो! (कसं केविलवाणं वाटतं ना हे वाक्य!:))
झकास आहे लेखमाला, चालू राहू दे!
आपला,
पिवळा डांबिस
11 Apr 2008 - 11:57 am | बेसनलाडू
भारतातून निर्यात झालेला हापूस इथल्या भारतीय दुकानांत ५ डॉलरला एक भावात पडतो, असे ऐकून आहे. माझ्यासंगे भारतात आलात, तर ५ डॉलरमध्ये १ डझन तरी खाता येतील ;)
(भारतीय)बेसनलाडू
11 Apr 2008 - 10:11 am | विजुभाऊ
मित्रानो तुमचा प्रतिसाद भरुन पावलो. काही मिपा मित्रानी मला फोन करुन प्रतिसाद दिला.
मी खरे तर "एप्रिल फळ" हे एप्रिल महिन्यात असणार्या फळांबद्दल लिहीणार होतो. पण काय सांगू या आंब्याच्या दुलईत इतका अडकुन गेलो ;चार भाग झाले तरी अजून आटोपतं घेता येत नाहिये.
11 Apr 2008 - 12:01 pm | स्वाती दिनेश
जरा उशीरच झाला वाचायला तर इथे सर्वांनी मनसोक्त आंबे खाऊन नुसत्या साली बाठी ठेवल्या आहेत,:-)
अगदी रसभरित भाग! फक्त आम्हाला इथे नुसत्या वर्णनांवर आणि चित्रांवर समाधान मानावे लागत आहे :(
स्वाती
11 Apr 2008 - 6:53 pm | मनापासुन
मदनबाण तुमच्या फोटोनी जान आणली
14 Apr 2008 - 10:22 pm | विजुभाऊ
.
15 Apr 2008 - 3:18 am | चित्रा
छान वर्णन, आणि फोटो! तोतापुरी सालीसकट सुद्धा खायला चांगला लागतो!
आमच्याकडे एक खोबरी म्हणून आंबा मिळायचा (ही जात आहे का आमच्या आंब्याचे लाडके नाव हे माहिती नाही)- त्याच्या कैर्या अगदी छोट्या असतानाच पाडत असू..