एप्रिल फळ (७)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Apr 2008 - 11:58 pm

द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते.
द्राक्षाची ही तर्‍हा तर कलिंगडाची तर्‍हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही .
खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी.
प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही. पण एकदा कापले की त्याच्या आतला गर्भरेशमी गाभा नजर बाजुला होउ देत नाही. खरबूजाचा करकरीत स्पर्श कडक कांजी केलेल्या खादीच्या नव्या लुगड्या सारखा करारी वाटतो.खरबूज जर गोल नसते तर ते बीकानेरच्या राजवाड्यातुन एखादे खांबावरचे शिल्प उचलुन आणले आहे असे भासले असते.
खरबूज पाहीले की मला रामनवमीची आठवण होते. लहानपणी आळीतल्या काळ्या रामाला रामनवमी ला रामनवरत्रात नऊ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असायची. गीत रामायण ,प्रवचन , कीर्तन , रामरक्षा आणि सन्ध्याकाळी आरती. गावतले बरेच लोक रात्री आरतीला जमायचे. एरवी सामसूम असणार्‍या मन्दीरात त्या दिवसात एक प्रकारचे कसले तरी चैतन्य असायचे. आळीतले बरेचसे लोक बाहेर कोठेही गेले असले तरी रामनवमी चा उत्सवाला घरी यायचे.काही लोक गावात स्वत:चे घर नसले तर आळीतल्याच कोणाकडे तरी पाहुणे म्हणुन राहायचे.
एकमेकांची विचारपुस व्हायचे. कोण कोठे कोण कोठे आहे याची खबर बात मिळायची. जग हे एक ग्लोबल व्हीलेज आहे याची जाणीव व्हायची.
रात्री आरतीला सगळे एकत्र यायचे.आणि आपली आळी वसुधैव कुटुम्बकम आहे ही जाणीव मनात कोठेतरी घर करुन. आरती च्या नन्तर आफळे बुवांचे कीर्तन असायचे. ते नेताजी सुभाशचन्द्र बोस , रामदास , शिवाजी अशा विवीध विषयांवर कीर्तन करायचे.युवकाना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी सांगायचे. कधी मोरोपन्तान्चे आख्यान ही लावायचे. आर्या दिन्ड्या साक्या यांचा अक्षरशः सुकाळ असायचा. रात्री बराच उशीरापर्यन्त कार्यक्रम चालायचे.कितीही झोप अनावर झालेली असली तरी आम्हा मुलाना मात्र नन्तर मिळणारा प्रसाद जाग्रुत ठेवायचा.
पपई , खरबूज , द्राक्षे , साखरकाकडी अशी नाना फळे त्या प्रसादात एकत्र झाले असायची. रामनवमी चा उत्साह जसा लोकाना जातपात वय ,हुद्दा सगळे विसरुन एकत्र आणयचा तसे हा प्रसादही. सर्व सामन्या पपई केळी मध्यम वर्गीय चिक्कु मखमली खरबूजा सोबत यायची. द्राक्षे त्या सगळ्या प्रसादातही अखंड राहुन आपले वेगळे आस्तित्व दाखवायची.
घरात सर्व प्रथम आणलेल्या खरबूजाला त्या रामाच्या प्रसादात वर्णी लागुन मान मिळायचा.
खरबूजाचे पन्हे हा एक अफलातुन प्रकार. साखर वेलदोडे घातलेले रेशमी भगव्या रंगाचे ते पन्हे तुमच्या मनात चाखताक्षणीच एक विलक्षण तृप्तीची जाणिव करुन देते. कितीही तळतळ्त्या उन्हातुन या एक वाटी पन्हे खा. जीव तृप्त होतो. जगातल्या कोणत्याही सॉफ्ट ड्रिन्क पेयाला ही सात्विक चव कधीच सापडणार नाही.
कलिंगडात हा सात्विक पणा जाउन एक बेरकीपणा आलेला असतो. वरुन काळेशार हिरवे कलिंगड आतुन भलतेच लाल असते. का कोणास ठाउक मला कलिंगड जुन्या चित्रपटातल्या शेट्ट्टीची आठवण करुन देते.स्वतः कलिंगड सुद्धा तसाच आब राखुन असते.
कलिंगड घरी आणण्याच्या दोन/तीन पद्धती आहेत्.एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.लहानपणी घरात फ्रीज वगैरे काही नसायचे . ते आणलेले कलिंगड उन्हाने गरम झालेले असायचे.मग ते धप्पकन आंगणातल्या हौदात टाकायचे. जेवणे होइपर्यन्त ते हौदात गार करायलाठेवायचे.बाबांचे जेवण होइतो आम्ही भावंडे हौदात तरंगणार्‍या कलिंगडावर टपला मारत धबक धबक करत बसायचो. बाबा जेवण आटोपुन मागुन यायचे.आम्हाला एखादी टप्पल बसायची
आणि कलिंगड महाराज पाण्यातुन बाहेर यायचे.लहान बाळाला पुसावे तसे बाबा त्याला टॉवेलने पुसत. मोठे पातेले घेतले जाई.
परात घेतली जाई कलिंगड परातीत स्थनपन्न व्हायचे. बाबा मग सुरीने कलिंगडाचे दोन भाग करायचे. आमचा डोळा त्या मधल्या स्पन्जा सारख्या गाभ्याकडे असायचे. बाबा तो तुकडा त्या दिवशी जो कोणी शहाण्यासारखा वागला असेल त्या भावंडाला द्यायचे.
बाहेरुन हिरवे गार दिसणारे कलिंगड आतुन एक वेगळेच रूप दाखवत असते. पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्‍या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो.
एरव्ही हिरवा सिग्नल निघा . लाल सिग्नल थांबा . पिवळा केशरी सिग्नल थांबा वाट पाहुन जा असे आपल्याला शाळेत पाठ करुन घेतलेले असते. एप्रिल फळांच्या दुनियेत हे सगळे उलटे पालटे होउन जाते. आंब्याची राजवर्खी केशरी फोड पाहिल्यावर कोण कशाची आणि कशासाठी वाट बघेल? कलिंगडाचा लाल भडक गर पाहील्यावर थांबण्यापेक्षा तर उलट जोरात सुरु करा असेच त्याचे म्हणणे असते असे समजुन वागतात.
ही एप्रिल फळे खाण्याची प्रत्येकाची वेगली पद्धत असते. द्राक्षे एकदम वीस्.तीस च्या संख्येने तोंडात बकणा भरली तर त्यांचा आतल्या आत बुकणा करायला मजा येते.
कलिंगडाचे करकरीत तुकडे काट्यावर धरुनते अगोदर ओठावर फिरवुन खायचे. अहाहा काय गार वाटते.
या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
पपई एखाद्या साधु सारखी वैराग्य भावाने खाल्ली जाते. खरबूजाला पन्ह्याशिवाय स्वतन्त्र असे फारसे ओळखले जात नाही.
चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ.
काही फळे डोळ्याना सूख देतात्.काही जिभेला . अननसासारख्या काही फळांचा वासच मोहोवतो. तर अन्जीर खरबुजे सारख्या फळांचा स्पर्श पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो.
आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो.
मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो.
नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्‍याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो..

..
..
..
मागील लेखांचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)

»

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

नंदन's picture

18 Apr 2008 - 2:11 am | नंदन

क्या बात है! लेखातला आवडणारा भाग उद्धृत करायचा म्हटला तर निम्मा लेखच पुन्हा चिकटवावा लागेल, तेव्हा तो मोह आवरतो :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2008 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है! लेखातला आवडणारा भाग उद्धृत करायचा म्हटला तर निम्मा लेखच पुन्हा चिकटवावा लागेल, तेव्हा तो मोह आवरतो :)

चित्रा's picture

19 Apr 2008 - 6:00 pm | चित्रा

असेच!

संदीप चित्रे's picture

18 Apr 2008 - 2:26 am | संदीप चित्रे

एकदम भारतात जाऊन वेगवेगळी फळं खातोय असं वाटलं.
मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :)
आता जूनच्या सुमारास 'पेरू'ची वाट पाहतो :)

मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :)
सन्दीप भौ ती फळे एप्रिल मध्ये कशी मिळणार. मे जून मध्ये येतील तेंव्हा बघु या. तोवर एप्रिल फळ मजेत चाखा.

स्वाती दिनेश's picture

18 Apr 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश

पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्‍या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो.
वावा...
जादुई चव ,गर्भरेशमी गाभा ,राजवर्खी हापुस
क्या बात है!
वसंतातल्या फळांचा वैभवोत्सव चैत्रगौरीपुढे मांडल्यासारखा वाटतो आहे.

इनोबा म्हणे's picture

18 Apr 2008 - 7:33 pm | इनोबा म्हणे

नेहमीसारखाच रसाळ भाग झाला बरं का.

मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा...
हे वर्णन तर झकासच.

या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
कलिंगड खायची खरी मजा यातच असते विजुभाऊ.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2008 - 10:05 pm | पिवळा डांबिस

विजुभाऊ, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही कडवे आंबाभक्त आहांत!
आता बघतो तर तुम्ही इतर फळांचीही वकिली करताय!
हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:)
काय हे!
शिव, शिव, शिव!!!!

विजुभाऊ's picture

21 Apr 2008 - 6:53 pm | विजुभाऊ

हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:)
तदमाताय ! :))))बेष्ट च की . पात्रओ बरे असा मु . तु अच्च गोयंकार दिस्ताव. सुशेगाद राव रे गोयंचे पात्राओ. तु होड जातलो पुता.
डांबिस काका याचे क्लासेस घेणार का?
दोन दिवस मी थोडा जालापासुन बाजुला गेलो होतो. त्यामुळे प्रतिक्रिया देउ शकलो नाही ( स्ट्रॉबेरी चे दहा भाग कोठे आहेत?:))

कोलबेर's picture

19 Apr 2008 - 10:10 am | कोलबेर

वा! विजुभाऊ तुमचे सगळे लेख आज वाचून काढले. मस्त लिहिले आहेत.

या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .

ह्या सारखे चित्रदर्शी वर्णन सुरेख जमले आहे. खूप आवडले

आर्य's picture

21 Apr 2008 - 2:13 pm | आर्य

हापुस आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी, एकेक तुकडा तोंडात घोळवत खाऊन टाकावा.
अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो. - हीच खरी पद्धत आहे,

(हापुस प्रिय) आर्य

स्वाती राजेश's picture

21 Apr 2008 - 2:28 pm | स्वाती राजेश

छान लेख आहे.
चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ.
खरे वाटते. रंग, वास नसला तरी चवीला मात्र खडीसाखरेसारखे.....
कोल्हापुरमधे रस्त्यावर हातगाडयावर चिकू विकतात. विकणारे खडीसाखर चिकू,खडीसाखर चिकू असे म्हणून गिर्‍हाईकांना आकर्षित करतात.

मदनबाण's picture

21 Apr 2008 - 6:59 pm | मदनबाण

जपानी लोक या कलिंगडाच्या आकाराने वैतागले,,,,, का तर ते त्यांच्या फ्रीज मधे नीट ठेवता येत नाही.....
पण गप्प बसतील तर ते जापानी लोक कसले?
त्यानी चौकोनी आकाराचा पोकळ लाकडाचा खोका बनवला,,,,,(पोकळ पण मजबुत)
जेव्हा कलिंगडाचे फळ लहान असते तेव्हाच त्याला या लाकडी खोक्यात घातले जाते.....मग जेव्हा ते फळ मोठे होते तेव्हा सहाजीकच चैकोनी आकार प्राप्त होतो !!!!!
आता फ्रीज मधे ते आरामात ठेवता येते.....
हीच कमाल आपल्या बिरबलाने मडक्यात कलिंगड बनवुन केली होती!!!!!

(चाट मसाला टाकुन कलिंगड खाणारा)
मदनबाण

चौकोन

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 1:08 pm | शक्तिमान

एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.

मस्त वर्णन आणि अचूक निरीक्षण!