जग दर्शनका मेला

क्रेमर's picture
क्रेमर in जनातलं, मनातलं
16 Sep 2011 - 8:20 am

('उड जायेगा हंस अकेला' ही बहूधा कबीराची रचना अनेकदा कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकली होती. आज असेच सूचल्यावर पुन्हा ऐकली. तेव्हा सूचलेले काही विचार.)

मी हंस एकटाच काय टोळक्यात/नेही उडतांना पाहिलेला नाही. त/नेवरून आठवले. टोळक्याने की टोळक्यात? म्हणजे या दोन शब्दांत नेमका काय फरक असावा? 'टोळक्याने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेने' किंवा 'धीराने तोंड दिले' किंवा 'साल्याने नाहीच दिले' सारखे असावे. टोळके - एक शस्त्र किंवा ढाल किंवा उगाचचपणा. 'टोळक्यात'म्हणजे 'जगात काहीच नाही', 'पावसाळ्यात चिखल', 'टेम्पोत बसवला' किंवा 'रिक्षात चिंतन' वगैरे. थोडक्यात छोटा, मर्यादीत. कशाततरी बसणारा. टोळक्यात मावणारा - त्याला पकडून राहणारा - त्याच्या पकडीत सापडलेला. किंवा अनेक. पण भजनातला हंस एकटाच आहे. जे मला अनेकदा जाणवते. एकटेपणा आणि साहस. साहस म्हणजेच एकटेपणा काय? काहीही असो. कबीर म्हणतो तसे 'हंस अकेला'च उडून जातो. म्हणजे शेवटी. अगदी शेवटी.

जग बघतच बसते - 'जग दर्शनका मेला'. बघते ते ठीकच पण फक्त बघतच बसते असे काही ओळीतून जाणवते. पण तसे नाही. जग इतरांच्या जाण्याला बघते तेव्हा तुम्ही बघणारे (केवळ बघणारेच) असता. तुम्ही इतर बघणार्‍यांना बघता. मग एकटेच उडतांना त्या सगळ्या बघणार्‍या डोळ्यांतले बघितलेपण नैसर्गिकपणेच कल्पनेचे रिकामपण भरून टाकते. तुम्ही ठरवता आत्ता उडतो - निरपेक्षपणे? कदाचित नाही कदाचित होपण. जग बघतेच हे मात्र खरे. पण बघतच बसते असे नाही. बघते - हो. आणखी बरेच बघते. बघत बसत नाही. बसले तर इतर बघ्यांना काहीच काम-धंदा उरणार नाही.

'जैसे पात गिरे तरूवरके, मिलना बहूत दुहेरा'. पात म्हणजे झाडाची पाने असावीत. जी शेजारी-शेजारी अनेक शेजारांत टिकून असतात. वारा येतो. त्याच्या दिशेप्रमाणे कुठे-कुठे पडतात. शेजार्‍यांना पुन्हा भेटतीलच असे नाही. पुन्हा भेटणे दुरापास्तच. 'ना जानू किधर गिरेगा, लग गया (लग्ग्या) पवनका रेला'. वार्‍याचे काय सांगावे? न जाणो कुठल्या दिशेने जाईल?

'जब होवे उमर पुरी, जब झूटेगा हूकुम हूजुरी'. वय जास्त होईल तेव्हा किंवा 'मालकां'च्या मनात येईल तेव्हा. का बरे या लोकांना (कबीराला) कुठला हुकूम सूटत असेल असे वाटते? मला तर वाटत नाही. पण माझ्या ठरवण्याला मर्यादा आहे. मी ठरवू शकतो. किंवा नाही. माझे कर्तेपण नष्ट होणे म्हणजे कोणाच्या कर्तेपणाची पावती आहे काय? माहीत नाही. पण मी ठरवल्याशिवायही साहसी अनुभव आपसूकच येऊन गेला आहे. मी आणि साहस हे समीकरण (की एकपण) माझ्या मनात आता आपासुकतेमुळे (की रँडमपणामुळे) घट्ट होऊ लागले आहे.

'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला'. तुला आवडले नसल्यास तुझ्या सामर्थ्याला एकवटून उभा रहा आणि विचार, काय विचारशील? का? का? सामर्थ्य - अस्तित्त्व की अस्तित्त्वाच्या जाणीवेचा हँगओवर? विचार रे. होऊन जाऊ दे राडा - तुझ्यापुरता.

'दास कबीर हरके गूण गावे, वा हरको परम पावे' 'गुरूकी करणी गुरू जायेगा, चेले की करणी चेला'. कसल्याच निश्चयापासून (निश्चितीकरण) मुक्ती नाही. शेवटपर्यंत. तुमची पारर्शिकता तुमच्याही कधी ध्यानी आली आहे का? तुम्ही कोण आहात? तुमच्या ज्ञानाचे शिष्य की तुमच्या ज्ञानाचे विश्लेषक (गुरू (गुरू विश्लेषकच असल्यास तुम्ही शिष्य आहात))?

(कविता काय आहे? याचा अनेकदा विचार केल्यावर कविता 'नेमकेपण नसणे' किंवा 'अनिश्चितपण' असे मला जाणवले. मग जुन्या अनेकांना हे कसे भासले असावे आणि त्यांनी ते कसे मांडले असावे असा विचार मनात आला. या भजनात मला उत्तर मिळाले. आम्ही वाचक 'पाहणारे' आहोत. साहस म्हणजेच कविता, असे वाटत राहीले.)

कलासंगीतसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

अभिजीत राजवाडे's picture

16 Sep 2011 - 8:24 am | अभिजीत राजवाडे

जबरीच!!!

स्पा's picture

16 Sep 2011 - 8:36 am | स्पा

छान मुक्तक..
आवडल

अर्धवट's picture

16 Sep 2011 - 8:48 am | अर्धवट

माझे अत्यंत आवडते भजन आहे हे.. निर्गुणी भजन या प्रकारातील ही रचना, मला नेहेमीच अंतर्मुख करते.. जे काही कर्म करताय ते आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून करा.. तुम्ही इथे कायमचे रहाणार नाही, शेवट होणारच आहे असा काहिसा अर्थ आहे असे मला वाटते..

यातील प्रत्येक चरणाचा संदर्भ शेवटच्या चरणाशी जुळवला आहे,

"उड जायेगा हंस अकेला, जगदर्शनका मेला."

तुला येथून काहीही घेउन जायचं नाहीये, एकटंच जायचंय जगाच्या जत्रेतून. हंस हे बहुदा आत्मा यासाठी रूपक वापरलं आहे. म्हणून..

"जैसे पात गिरे तरूवरके, मिलना बहूत दुहेरा'
'ना जानू किधर गिरेगा, लग्ग्या पवनका रेला'

एकदा पान झाडावरून गळालं की ते काही परत येत नाही, आणि आपल्या कर्मांच फळही आपल्याला सांगता येत नाही, वार्‍याच्या झोतात उडून जाणार्‍या एखाद्या पानासारखं आयुष्य आपलं. म्हणून..

"जब होवे उमर पुरी, जब झूटेगा हूकुम हूजुरी'"

पिकलं पान केव्हा गळून पडेल ते सांगता येत नाही आणी गळून पडण्यासाठी पान पिकायचीही जरूर नाही केव्हाही 'वरून ऑर्डर' येउ शकते म्हणून..

"'जमके दूत बडे मजबूत, जमसे पडा झमेला'"

या चरणात रूपक अजून स्पष्ट केलेलं आहे, (त्या बोलीमधे 'य' चा 'ज' झालेला आहे वास्तवीक, यमाच्या दूतांचा उल्लेख आहे.) यमाचे दूत सर्वशक्तीमान आहेत, ते कुणाचं ऐकणार, म्हणून..

म्हणून कबीर म्हणतो, हरीनामात वेळ घालवा, चांगले कर्म करा..

"'दास कबीर हरके गूण गावे, वा हरको परम पावे'"

निर्गुणी भजन हा प्रकारच मला खूप आवडतो, वेगेवेगेळ्या रूपकांमधून कर्मसिद्धांत सांगणारा, निर्गुणी इश्वराची आठवण करून देणारा प्रकार, कुमारजींच्या आर्त आवाजात तर नेहेमीच वेगळा अनुभव देउन जातो..

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2011 - 8:57 am | राजेश घासकडवी

संज्ञाप्रवाही शैली आवडली. प्रकाशात धरून हिरा फिरवल्यावर कुठचा पैलू कधी चमकेल हे माहीत नसतं. पण त्या छोट्या तुकड्यांच्या एकामागोमाग एक प्रकाशमान होण्यातून हिऱ्याची प्रतिमा जाणवतो. तुम्ही या कवितेतून प्रतीत होणारा अर्थ अशाच तुकड्यांतून दाखवला आहे.

विचाराच्या प्रत्येक तुकड्याशी सहमत नाही. उदाहरणार्थ 'जग दर्शन का मेला' मध्ये जग बघतंय पेक्षा जग म्हणजे काही काळची जत्रा असा अर्थ मला जाणवला. या जत्रेत वेगवेगळ्या ठिकाणी पंचेद्रियांना सुखावणारी गंमत करायची. घोळक्यात जाऊन मिसळायचं, एकत्र आनंद घ्यायचा. मात्र मृत्यूच्या वेळी एकटा हंस उडून जावा तसा तू जाशील. झाडावर एकत्र असलेल्या पानांपैकी तू एकदा गळालास की मग वाऱ्याच्या अधीन हा तसाच पूरक अर्थ. तो तुम्ही लिहिलेला आहेच.

'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.

असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते

०१. जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.

असेच आहे.

०२. असो. तुम्ही लिहिते झालात, भरून पावलो.

असेच म्हणतो.

नंदन's picture

16 Sep 2011 - 9:16 am | नंदन

मुक्तक आवडलं.

बघते ते ठीकच पण फक्त बघतच बसते असे काही ओळीतून जाणवते. पण तसे नाही. जग इतरांच्या जाण्याला बघते तेव्हा तुम्ही बघणारे (केवळ बघणारेच) असता. तुम्ही इतर बघणार्‍यांना बघता. मग एकटेच उडतांना त्या सगळ्या बघणार्‍या डोळ्यांतले बघितलेपण नैसर्गिकपणेच कल्पनेचे रिकामपण भरून टाकते. तुम्ही ठरवता आत्ता उडतो - निरपेक्षपणे? कदाचित नाही कदाचित होपण. जग बघतेच हे मात्र खरे. पण बघतच बसते असे नाही.

मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

क्रेमर + घासु = _/\_

तिथेच अजूनही काही अप्रतिम निर्गुणी भजने ऐकायला मिळतील. कलापिनी कोमकली यांचेही गायन ऐकण्यासारखे आहे.

मन१'s picture

16 Sep 2011 - 3:48 pm | मन१

पण खरच सांगतो, बहुतांश आवडत्या भजन्-अभंग्-ओवी-दोहे ह्यांचा अर्थ काही केल्या समजत नाही बुवा.
कुणीतरी आमच्या मुक्ताईचं "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...." ह्या अभंगाचं असच स्पष्टिकरण देइल का? किंवा "आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा आनंदसोहळा" असं आमच्या तुकोबारायांना मरणात नक्की काय रम्य वाटलं असावं? खरच मरण अनुभवल्यावर पुन्हा जगात येउन "मरणाबद्दल" का बोलावसं वाटलं असावं?

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

तुकोबारायांनी ज्या मरणाबद्दल लिहिले आहे ते देहाचे नसून देहबुद्धीचे मरण आहे. जेव्ह देहबुद्धी नाहीशी होते तेव्हाच ब्रह्मज्ञान प्राप्त होते असा फंडा आहे. त्या अर्थाने आहे ते.

बाकी, सविस्तर धनाजीरावांनी लिहावे. टंकाळा आलाय! :)

अर्धवटरावांची प्रतिक्रिया फार आवडली ! :) ( काय म्हणुन त्यांनी असे नाव त्यांच्या आयडीसाठी घेतले ते कळेना बाँ.;) )

बाकी या धाग्यामुळे मला हा धागा आठवला. 'उड जायेगा हंस अकेला'
तसेच मला सुनता है गुरु ग्यानी हे निर्गुणी भजन फार फार आवडते...राहुल देशपांडे यांनी गायलेले जास्त आवडते. :)

जाता जाता :--- च्यामारी परत हिथ आत्मा बित्मा आला की राव ! ज्या प्रमाणे १० आयडी घेतले तरी त्या मागचं टाळक एकच असतं,त्याच प्रमाणे १० देह बदलले तरी आत्मा तोच राहतो असं समजायला हरकत नसावी काय ? ;)
असो माझे टंकन कष्ट आवरते घेतो कसे ! ;)

(निर्गुणी भजन आवडणारा) :)

क्रेमर's picture

16 Sep 2011 - 10:05 pm | क्रेमर

'जमके तू तबरे मजबूत, जमसे पडा झमेला' ही ओळ बहुधा 'यम के दूत बडे मजबूत, यमसे पडा झमेला' अशी असावी.

'यम के दूत बडे मजबूत' अशीच ओळ आहे. पण मी पहिल्यांदा ''जमके तू तबरे मजबूत' असे ऐकले होते. नंतर ती ओळ वाचल्यानंतरही आणि अनेकदा ऐकल्यानंतरही मला तशीच जाणवते. भजन ऐकतांना मनात येणारे विचार भरभर टंकायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे तारांबळ उडाली आणि शुद्धलेखनही गंडलेले आहे.

या भजनाचा अर्थ अनेकांनी समर्थपणे लावला आहे. तसे काही करणे माझा हेतू नव्हता. कबीराला जेव्हा हे सूचले तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालले असावे याची कल्पना नाही. प्रतिभेच्या आविष्कारासाठी हंस हे रूपक आहे असे काहीसे मला सूचले होते. इतर कुठेतरी कविता कितपत अवघड असावी, वाचकाला समजण्यासारखी असावी काय यावर चर्चा वाचत असतांना अचानक वाटले की कविता या भजनातला हंसच नाही काय? नेहमीप्रमाणे आळस न करता टंकून ठेवावेसे वाटले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 2:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा वाचलं, समजलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाचलं. मुक्तक, चिंतन आवडलं. स्वतः कधी असा विचार न केल्यामुळे त्यापुढे लिहू शकत नाही, पण वाचायला नक्कीच आवडलं.
गुर्जींचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला.

मेघना पेठेंची 'एक ननैतिक बघ्या' ही कथा आठवली.

नंदनशी सहमती.

अभिजीत राजवाडे's picture

17 Sep 2011 - 4:43 am | अभिजीत राजवाडे

दुजे के संग नही जाऊंगी हे निर्गुणी भजन कोणाकडे असल्यास दुवा येथे द्यावा.

आभार,

अविनाशकुलकर्णी's picture

19 Sep 2011 - 1:49 pm | अविनाशकुलकर्णी

केमर...अप्रतिम रस ग्रहण..आवडले..
कुमारजेींचे हे गाण ऐकताना मन विभोर होते..