जीवाची पोकळी - १
जीवाची पोकळी - २
खांदे पाडून मी पाय घासत आत कपडे बदलायला निघून गेलो. बरीच भवति न भवति करून दोन-चार आठवड्यांनी बायकोचा विजय होणार आणि माझं कोलेस्टरॉल आणखी वाढणार हे मला कळून चुकलं. म्हणूनच जास्त तकतक न करता गपगुमान पैशांची सोय करायचं मी ठरवलं. शिवाय आपण पैसे कशाला कमावतो? आयुष्यात एकदाच मिळणारा हा अनुभव आपण घेतला नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असा स्वतःच्या मनाला समजावण्याचा एक बहाणाही मला मिळाला. या अशा उदात्त विचारांनीच बायकोबरोबरचे अनेक वाद मी तिला न हरवता जिंकत आलो आहे.
दोनतीन एफड्या मोडून आणि फारशी वापरली न जाणारी माझी कार विकून मी पैसे उभे केले आणि ल्युबोवनिक डॉल्सवाल्यांना ईमेल करून मी तयार असल्याचे कळवले. त्यांनीही तत्परतेने पुन्हा एकदा माझे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढे काय करायचे त्याची एक यादी पाठवून दिली. अंतराळ प्रवास करण्याआधी सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे आवश्यक होते. त्यानंतर आम्हाला एक आठवडाभर वजनरहित वगैरे अवस्थेत राहण्याचा सराव दिला जाणार होता. आणि हे सगळं करण्याआधी त्यांना पैसे पाठवणे आणि साशा किंवा मिशा यापैकी एकाची निवड करणे ही दोन महत्वाची आणि अत्यंत कठीण अशी कामं होती.
मी एकदोनदा त्या ऑर्बिटॉल कंपनीच्या ऑफिसमध्ये फोन करून आणि वकीलाचा सल्ला वगैरे घेऊन कंपनी खरीच असल्याची खात्री करून पैसे पाठवून दिले. परस्पर साशा निवडावी असा एक विचार मला चाटून गेला पण बायकोला न सांगता काही केलं तर नंतर व्हर्च्युअल रिअॅलिटीत तर जाऊद्या खर्या रिअॅलिटीतही जगणे अशक्य होईल हे माहित असल्याने मी तो विचार झटकून टाकला.
"ते.... निवडायचंय ना आपल्याला..", एक दिवस ऑफिसमधून आल्यावर चहा पिता पिता मी हळूच बायकोला म्हणालो.
"काय निवडायचंय?"
"ते...ल्यूबोवनिक डॉल.", मी रिंगणात उतरलो.
"हं.....तुला काय वाटतं?",
दोन सुमो एकमेकांना भिडण्याआधी पाय आपटत एकमेकांचा अंदाज घेत रिंगणात फिरतात तसं चाललंय असं मला वाटलं.
".....", मी खांदे उडवले.
"मला तर मिशाच हवा.", बायको भिडली.
"चालेल. पण मग माझ्या मागे शॉपिंगला बरोबर चलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, घरकामात मदत करण्यासाठी भुणभुण करायची नाही.", मी आधीच ठरवून ठेवलेला डाव टाकला.
"ते शक्य नाही."
"मग मिशा शक्य नाही."
दोन मिनीटे शांतता.
"ठीके. मग मला नको मिशा", बायको इतक्या लवकर रिंगणाबाहेर जाईल असे वाटले नव्हते.
"ओके. मग साशाच निवडावी लागेल.", मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवत म्हणालो
"ओके. पण मग तू माझ्या बरोबर शॉपिंगला यायचंस."
"हो हो. का नाही?"
"म्हणजे मी शॉपिंग करायला तुझी हरकत नाही तर...", बायकोने धोबीपछाड टाकला.
तोंडावर पडताना पुन्हा एकदा बायकोला न हरवता जिंकण्यात मी यशस्वी झालो याचाच मला आनंद होता.
सगळ्या तपासण्या संपत आल्या तसे आम्हाला मॉस्कोला जायचे वेध लागले. मॉस्कोपर्यंतच स्वखर्चाने जायचं होतं तिथून पुढे सगळं ते करणार होते. बायकोच्या उत्साहाला उधाण आलं होतं. तिकडच्या थंडीत घालायला फरचा ओव्हरकोट, गुडघ्यापर्यंतचे बूट वगैरे बापजन्मात न केलेली हौस ती भागवून घेत होती आणि रिकाम्या होत जाणार्या अकाउंटकडे बघताना माझे तपमान इथेच शून्याखाली जाऊ लागले होते. मॉस्कोला एक दिवस राहून लगेच आम्हाला अस्त्राखान ओब्लास्टच्या कापुस्तिन यार कॉस्मोड्रोमवर जायचं होतं.
झटपट एअर इंडियाचं तिकीट बुक झालं, सामानाची बांधाबांध झाली आणि हा हा म्हणता एक दिवस आम्ही मॉस्कोच्या दोमोदेदोवो का असलंच काहीतरी नाव असलेल्या विमानतळावर उतरलो. ल्यूबोवनिक डॉलवाल्यांची गाडी आणि आर्तेम नावाचा एक महाकाय ड्रायव्हर आमच्या दिमतीला तिथे वाट पाहातच होते. एक दिवस मॉस्कोमध्ये फिरून आणि खास तेवढ्यासाठी घेतलेले कपडे, वस्तू वगैरे वापरून झालं आणि हुरहुरत्या अंतःकरणाने दुसर्या दिवशी अस्त्राखानला जायच्या छोट्या विमानात पाऊल टाकलं
आता पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करता करता बायको आणि मी दोघेही नि:शब्द होऊन विमानाच्या खिडकीतून बाहेर दिसणार्या निळ्या पोकळीकडे बघत बसलो.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Sep 2011 - 10:26 pm | प्रचेतस
हाही भाग उत्कंठावर्धक.
ननि पटापट लिहा हो तुम्ही, जास्त गॅप ठेवू नका लिखाणात.
14 Sep 2011 - 12:24 am | यकु
आत्ता मागचे दोन्ही भाग वाचले..
विण्ट्रेष्टींग लिहीलंय
पुभालटा
:)
14 Sep 2011 - 1:18 am | बहुगुणी
उत्कंठापूर्ण लिखाण.
14 Sep 2011 - 4:24 am | ५० फक्त
मस्त मस्त लिखाण, तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढी थोडीच.
14 Sep 2011 - 6:03 am | स्पंदना
हा हा ! एकुण साशा मिळाली तर. अभिनंदन, अन बेस्टलक !
फारच छान जमलय नवर्याची अवस्था चितारायला. अन नाव काय काय ती अगदी जिभ हातात घेउन वळवावी लागतेय उच्चार करण्या साठी, अफाट डोकेबाज लिखाण. अन काय हो जेंव्हा तेंव्हा बायको समोर आपटताय काय, जरा कधी तरी हिसका दाखवा, आमच पण समाधान !
14 Sep 2011 - 6:26 am | शुचि
खूपच रोचक.
14 Sep 2011 - 1:24 pm | प्रास
येम्मारा....!
अखेर साशा तर ताब्यात आलीच..... अभिनंदन!! ;-)
मस्त लिहिताय भौ!!! मजा येतेय आणि उत्कण्ठा वाढतेय......
एअरोफ्लोटद्वारे रशियावारीचा अनुभव असल्याने एअर इण्डिया दगडापेक्षा वीट मऊ प्रकार असावासा अंदाज ;-) थोड्याप्रमाणात त्या प्रवासाचा अनुभव आला असता तर बहार येती पण कथेचा वेग उत्तम राखला असल्याने, हे चालसे...
व्यस्त आहात हे मान्य पण त्यातली थोडी व्यस्तता पुढचे भाग लिहिण्यासाठी वापरावी ही विनंती.
पुलेप्र असलेला :-)
14 Sep 2011 - 1:41 pm | स्पा
चायला नन्नी
काय एवढे नानू भाग टाकत आहात?
काही लिंक लागत नाही.
पटापट लिवा..
भारी होतेय कथा
14 Sep 2011 - 2:40 pm | Mrunalini
आज पहिल्या भागा पासुन वाचले. भन्नाट कल्पना आहे. पुढचा भाग लवकर येउद्या.
14 Sep 2011 - 3:46 pm | मोहनराव
जरा मोठे भाग लिहा.
३ भाग एकदम वाचले.
उत्कण्ठा वाढतेय!!