जीवाची पोकळी-१
जीवाची पोकळी-२
जीवाची पोकळी-३
थोड्याच वेळात विमान खाली खाली जाऊ लागले. मस्त कोवळ्या उन्हात विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणि अधूनमधून असलेली निळीशार तळी दिसू लागली. आमच्या दोघांच्याही चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. लवकरच आपल्या आयुष्यात अविस्मरणीय असं काहीतरी घडणार आहे या विचारांनी आधीच आम्ही दोघेही अंतर्बाह्य बदलल्यासारखे झालो होतो. कधी नव्हे ते बायको माझ्याशी मनमोकळेपणी हसत होती. मीही उल्हसित होऊन काहीबाही बडबडत होतो. दोनतीन नेहमीसारखे पाण्चट पीजेही मी मारले आणि जीभ चावली पण बायकोने अजिबात न डाफरता स्मितहास्य करून तिकडे दुर्लक्ष केले.
कापुस्तिन यारच्या धावपट्टीवर आमचे आठ आसनी विमान उतरले तेव्हा दुपारचे बारा वाजले होते पण प्रसन्न हवा आणि गुलाबी थंडी यामुळे सकाळी आठ वाजल्यासारखे प्रसन्न वाटत होते. अशा स्वर्गीय म्हणाव्या अशा वातावरणात आम्ही विमानाची शिडी उतरलो. शिडीच्या समोरच एक उंचनिंच, गोरीपान आणि निळ्यानिळ्या डोळ्यांची तरुणी उभी होती. तिच्याकडे बघतबघतच मी शिडी उतरलो. तिच्या जवळ गेलो तेव्हा "वेलकम, मिस्तर अॅन्द मिसेस करबुदे" असा पुरुषी आवाज आला. मी दचकलो आणि मग माझ्या लक्षात आलं की त्या तरूणीच्या शेजारी एक साडेसहा फुटी उंच, दोन मीटर रुंद खांदे असलेला, पिळदार शरीरयष्टीचा एक दैत्य उभा आहे. मी बायकोकडे पाहिले. ती भलतीच इंप्रेस झालेली दिसत होती. माझा मूडच गेला. त्या ललनेशी हस्तांदोलन केल्यावर थोडे बरे वाटते न वाटते तोच त्याच्या मजबूत पकडीत माझा हात गेला आणि दाबल्या गेलेल्या हाताची सणक माझ्या डोक्यापर्यंत गेली.
" आये अॅम रस्लन ओद्झ्रचोवस्की अॅन्द दिस इज माये कोलिग मिस डुशा तोपोलोवा", दैत्याने बोबड्या इंग्रजीत ओळख करून दिली आणि आम्हाला गाडीकडे घेऊन गेला. कापुस्तिन यारच्या विमानतळातून गाडी बाहेर पडताना त्याने सांगितलं की आम्ही कापुस्तिन यार पासून काही अंतरावरच्या इमारतीत राहणार आहोत आणि तिथेच वजनरहीत अवस्थेत राहण्याचा आम्हाला सराव दिला जाणार आहे. तो आणखीही त्याच्या बोबड्या इंग्रजीत काहीबाही सांगत होता पण कान देऊन ऐकूनही आणि दोनदोनदा विचारूनही काहीच डोक्यात शिरत नसल्याने मी नाद सोडून दिला. थोड्यावेळाने त्यानेही नाद सोडला आणि तो त्या डुशा टोपीलावाशी गुलुगुलु त्यांच्या भाषेत बोलू लागला. ती दोघं काहीबाही बोलत होती आणि मध्येच गुदगुल्या झाल्यासारखी खुदुखुदु हसत होती. मी बायकोकडे पाहिलं. ती झोपेत गडप झाली होती.
नाही नाही म्हणता त्याने साठ-सत्तर किलोमीटर गाडी पिटाळली आणि शेवटी एका सात-आठ मजली उंच पण खूपच लांबलचक इमारतीसमोर थांबला. बराच वेळ डावीकडे दिसणारा कापुस्तिन यारचा तो रॉकेट लाँचिंग टॉवरही आता दिसेनासा झाला होता. हिरव्या काचांपासून बनलेली असल्यासारखी दिसणारी ती आधुनिक इमारत आकर्षक होती पण तिथे अंतराळ प्रवासासंबंधी प्रयोग किंवा सराव करायला लागणारी यंत्रणा असेल असे मला वाटले नाही. तरीही फार विचार न करता मी बायकोसह त्या दोघांच्या मागे गेलो. लिफ्टने आम्हाला सगळ्यात वरच्या मजल्यावर असलेल्या, एखाद्या पंचतारांकित हॉटेलात शोभेल अशा खोलीत सोडून ती दोघं निघून गेली. जाण्यापुर्वी घरच्या सारखं राहायला, हवे ते खाद्यपदार्थ मागवायला आणि संध्याकाळी ५ वाजता रिसेप्शन लॉबीत यायला सांगायचं विसरली नाहीत.
संध्याकाळी आम्ही लिफ्टमधून लॉबीत बाहेर पडलो तेव्हा तो ओक्साबोक्षी आणि ती टोपीलावा आमचीच वाट पाहात होते. औपचारिक विचारपूस संपल्यावर लगोलग ते आम्हाला एका लांबच लांब व्हरांड्यातून एका मोठ्ठ्या दरवाजापर्यंत घेऊन गेले. रस्लनने आपले कार्ड टॅप करताच दरवाजा सरकून उघडला आणि एक लांबच लांब, रुंदच रुंद आणि उंचच उंच अशा हॉलमध्ये आम्ही प्रवेशलो. थोड्या अंतरावर हॉलच्या मध्यभागी एक भलीमोठी स्प्रिंग असावी असे सहाफूट व्यासाच्या राखाडी रंगाच्या लोखंडी नळ्यांचे सर्पिलाकार भेंडोळे काँक्रीटच्या खोबणीत बसवले होते.
"हा पाहा आपला वेटलेसनेस सिम्युलेटर.", डुशा म्हणाली, "याच्या एका बाजूने कार्टमध्ये बसून वेगाने गेलं की प्रत्येक चक्राच्या वरच्या टोकाला वजनरहित अवस्था अनुभवाला येते. एका हेलपाट्यात सगळी भेंडोळी मिळून साधारण १० मिनीटांची वजनरहित अवस्था अनुभवास येते. तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते त्याचा अभ्यास करायला आणि तुमच्या शरीरालाही सवय व्हायला साधारण १२ तास होतील इतका वेळ सराव करायचे आपण ठरवले आहे."
"म्हणजे सहा दिवसात बहात्तर फेर्या. म्हणजे रोज १२ फेर्या म्हणजे रोज दोन तास.", मी लगेच फटाफट आकडेमोड करून तिला सांगितलं. ती हसली. इंप्रेस झाली असावी असं मला वाटलं.
हॉलमध्येच असलेल्या एका खोलीत बायकोला घेऊन डुशा गेली आणि दुसर्या खोलीत रस्लन मला घेऊन गेला. खोलीत एक डॉक्टर आणि नर्स आधीच बसलेले होते. आम्ही तिथे जाताच दोघांनी रबरी हातमोजे चढवायला सुरुवात केली. रस्लनने मला सगळे कपडे काढायची हुकूमवजा विनंती केली. मी लाजून तसाच उभा राहिलो.
"दोन्त बी शाय मिस्तर करबुदे, डॉक्टरांसमोर काय लाजायचं?", रस्लन म्हणाला, " तुमच्या शरीराची अवस्था समजण्यासाठी त्यावर आपल्याला वायरलेस सेन्सर्स आणि इलेक्ट्रोड्स लावावे लागणार आहेत. कृपया सहकार्य करा."
मग मी हळू हळू सगळे कपडे काढले आणि दिगंबरावस्थेत तिथल्या टेबलवर डोळे मिटून झोपलो. डाव्या हाताला तळव्याच्या मागे काही तरी टोचल्यासारखं वाटलं म्हणून मी डोळे उघडले तेव्हा मला समोर एक गोल पांढरा दिवा दिसला आणि मी नजर वळवायच्या आत तो हळूहळू मंद होत संपूर्ण अंधार झाला.
मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा खोलीत कोणीही नव्हतं. सगळ्या अंगभर जागजागी अॅक्युपंक्चरच्या सुया टोचून काढल्या असाव्यात अशी चुणचुण होत होती. त्वचेवर अगदी बारीक पुरळ आल्यासारखं वाटत होतं पण दिसत काहीच नव्हतं. मी उठलो. कपडे घातले आणि बाहेर आलो. बाहेर बायको, रस्लन, डुशा, डॉक्टर्स आणि नर्सेस गप्पा मारत कॉफी पीत होते.
"कसं वाटतंय तुम्हाला, मिस्तर करबुदे?", रस्लनने लांबूनच विचारले.
"फस्क्लास.", मी म्हणालो.
ते सगळे खो खो हसू लागले. बायकोही हसू लागली. मी ही हसलो. पण थोड्यावेळाने ते जरा जास्तच हसताहेत असं वाटून मी गप्प झालो. तेही हळू हळू हसायचे कमी होऊन थांबले.
"उद्यापासून आपला सराव सुरु, मिस्तर करबुदे.", रस्लन म्हणाला, " आता तुम्ही जाऊन आराम करा, दिनर घ्या आणि मस्त झोपा. गुदनाईत."
त्यांना गुदनाईत करून बायको आणि मी बाहेर पडलो. पुन्हा रिसेप्शन लॉबीत येऊन इमारतीसमोरच्या बागेत थोडं भटकलो. थंडी बोचू लागल्यावर आम्ही खोलीत परतलो. दोघांनी छानपैकी थोडे वोडकापान केले आणि मग शाशलिक कबाब आणि कार्प माशाचं गरमागरम जेवण करून सुस्तावलो.
दहा वाजता दिवे बंद केले. अतिउत्तेजनेमुळे मला झोप लागत नव्हती. कानात सतत रशियन संगीत वाजतंय असा भास होत होता. बायको मात्र पाचच मिनिटात एका लयीत श्वास घेऊ लागली. ती झोपेत अधूनमधून हसतेय की काय अशी मला शंका आली. दोन-तीन मिनीटे मी जरा चुळबूळ केली आणि निग्रहाने शेवटी पाठीवर पडून डोळे गच्च मिटून घेतले. कानातला रशियन संगीताचा भास जाऊन आता बासरी वाजतेय असा भास होऊ लागला. माझ्या पाठीचे, खांद्याचे स्नायू हळूहळू शिथील होऊ लागले आणि माझे डोळे जड जड होत मी कधी झोपलो ते मला कळले नाही.
सकाळी उठलो तेव्हा मी खूप ताजातवाना झालो होतो. रात्री स्वप्नात मी एका मोरपंखी पाण्याच्या आणि रुपेरी वाळूच्या समुद्रकिनार्यावर होतो आणि आजूबाजूला खूप छान छान माणसं होती असं मला अंधुक अंधुक आठवत होतं.
झटपट आंघोळी, नाश्ता वगैरे आवरून आम्ही लॉबीत गेलो. रस्लन आणि डुशा होतेच.
"शुभप्रभात मिस्तर करबुदे,"दोघंही म्हणाली.
"शुभप्रभात"
"तुम्ही काल छानछान स्वप्नं पाहिली असतील अशी आम्हाला आशा आहे,", रस्लन म्हणाला. मी काहीच बोललो नाही.
पुन्हा आम्ही कालच्याच हॉलमध्ये गेलो. सगळी तयारी होतीच. लगेचच कार्टमध्ये चढलो. कार्टच्या तळावर आम्हाला उताणं झोपवून बेल्ट वगैरे आवळले गेले. सगळं व्यवस्थित आहे याचं चेकींग झालं. हे सगळं व्हायलाच अर्धा-पाऊणतास गेला. मग ऑल-रेडी वगैरे कार्टमधल्या स्पीकरवर घोषणा झाली. कार्टच्या काचा काळ्या होऊन अपारदर्शक झाल्या आणि काही क्षणांतच कार्ट थरथरू लागली. थ्री...टू..वन...गो असं कोणाचं तरी काऊंटिंग ऐकू आलं आणि एकदम माझ्या छातीवरचा दाब वाढला. बायको किंचाळायचा प्रयत्न करू लागली पण तिला जमले नाही. काही वेळाने दाब नाहीसा झाला आणि अंग एकदम हलकं झालं. दाबाच्या विरुद्ध ताणलेले हातपाय एकदम हलके होऊन वर फेकले गेले. शरीर ही तरंगतंय असं वाटलं. बेल्ट होते म्हणून बरं. नाहीतर छतावर जाऊन आपटलो असतो असं वाटलं. काही सेकंदांनी पुन्हा शरीर तळाला टेकलं आणि आणखी काही सेकंदांनी दाब वाढला. असं दहा-वीसवेळा सगळं चक्र होऊन अखेर कार्ट थांबली. काचा पुन्हा पारदर्शक झाल्या आणि दार उघडले. रस्लन आणि डुशानी आत येऊन बेल्ट सोडवून आम्हाला मोकळं केलं. आम्ही बाहेर आलो तेव्हा सगळे डॉक्टर्स आणि नर्सेस एकमेकांना मिठ्या मारून ओरडून आनंद व्यक्त करत होते. रस्लन आणि डुशाही त्यांना सामील झाले. आमचे हात धरून आम्हाला त्यांच्यात ओढून सगळ्यांनी आरोळ्या ठोकत आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण तेच एवढे खूश आहेत म्हटल्यावर आम्हीही आमच्यापरीने आनंद व्यक्त केलाच.
सगळे शांत झाल्यावर एका बाजूला खुर्चीवर बसून मी घड्याळ पाहिले. तिथे येऊन आम्हाला दीडतास झाला होता. एका फेरीला दीडतास म्हणजे बारा फेर्यांना किती असा विचार केल्यावर माझं तोंड पडलं.
मी बायकोला हळूच त्याची कल्पना दिली. मी अडवायच्या आत ती लगेच डुशाकडे गेली आणि त्यांचं काही तरी बोलणं झालं. बायकोला घेऊन लगेच रस्लन, डुशा माझ्याकडे आले.
"काळजी करू नका मिस्तर करबुदे.", रस्लन म्हणाला, "पहिल्याच फेरीला तुम्ही अनपेक्षितरीत्या इतके उत्तम रिझल्ट्स दिले आहेत की रोज बारा फेर्या करायची गरज नाही. शिवाय तुम्हाला ऐकून आनंद वाटेल, मिस्तर करबुदे, आपल्याला सहा दिवस सराव करायचीही गरज नाही. या वेगाने प्रगती झाल्यास दोन दिवसातच तुम्हाला अंतराळात जाता येईल असं वाटतंय."
हे ऐकून मला फार बरं वाटलं आणि माझी छाती अभिमानाने एकदम फुगली.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
19 Sep 2011 - 2:07 am | शुचि
सॉलीड !!! वाचतेय.
19 Sep 2011 - 8:54 am | स्पा
लय भारी.. न नि
वाचतोय...
19 Sep 2011 - 11:02 am | सविता००१
लै भारी... सॉलिड आहे
19 Sep 2011 - 12:18 pm | मिहिर
मस्तच!
वाचतोय.
19 Sep 2011 - 5:45 pm | श्यामल
पहिले ३ भाग आणि हा भाग अधाशासारखे सलग वाचले. मस्त कथा ! :smile:
कथा वाचण्यात रंगून गेले. पण शेवटी क्रमशः हा शब्द वाचून (खूप राग येतो मला या क्रमशः शब्दाचा! ...रंगाचा भंग करून टाकतो मेला !) मन खट्टू झालं............................. ओ नगरीनिरंजन भाऊ, पुढचा भाग लगेच टाकायचं बघा जरा.
19 Sep 2011 - 8:43 pm | पैसा
खूपच इंटरेस्टिंग कथा!
19 Sep 2011 - 10:08 pm | यकु
इन्ट्रेस्टींग लिहीलं आहेच..
पण पुढे काय?