होड्या सोडणे

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
29 Aug 2011 - 1:12 pm

hodi
होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत. मग त्यासाठी त्यांची मनधरणी करणे, तो नाहीच वठला तर त्याच्या मागं ‘होऽडी होऽडी होऽडी’ असा गलका करीत टुमणं लावणे, त्या गलक्यानेही काही झाले नाही तर चक्क भोकाड पसरणे! अशा क्लृप्त्यांनी आम्ही आमचा हेतू साध्य करून घेत असू. अखेर हाती पडलेल्या दोन चार होड्या पळत जाऊन पाण्यात सोडणे ही तर एक प्रकारची लगीनघाईच असायची. त्या पळापळीत कोणी पाय घसरून चिखलात सरपटला की या खेळाला हास्याचा सप्तरंग चढे आणि चिखलाने बरबटलेला तो मित्र रडवेल्या चेहऱ्याने माघार घेऊन कपडे बदलायला (आणि मार खायलाही!) आपल्या घरी निघून जाई...
पुढे होड्या स्वतःला तयार करता येऊ लागल्यावर पावसाची चातकासमान वाट पहावी लागायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हमखास पावसाचे वेध लागत. मग एकदाचा पाऊस सुरु होऊन डबकी साचू लागली की आम्हीही थेंबासारखे नाचू लागायचो. मिळेल त्या कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडल्यावर हरखून गेलेलो आम्ही टाळ्या पिटीत आनंदाने धुंद व्हायचो. मात्र त्यानंतर घरी परतल्यावर अमूक तमूक महत्वाच्या डायरीतली पाने फाडून (अक्षरशः) पाण्यात सोडल्यामुळे अनेकदा मार खाल्ल्याचेही आठवते. त्याकाळी रद्दी हा प्रकार फारसा साचलेला नव्हता. जे काही कागद, चिठ्ठ्याचपाट्या असत तो कोणाचातरी महत्वाचा ऐवज असे. त्यावरच आम्ही डल्ला मारल्यावर आमच्या पाठीवर वडीलधारे हल्ला करायचे. तर एकंदर असं हे होडी प्रकरण असे.
त्यानंतर नदीतली खरीखुरी होडी किंवा पंढरपूरच्या चंद्रभागेतळी नौका पाहण्याचा मौका मिळाला, तिच्यात बसणंही झालं. ती कशी वल्हवतात तेही शिकणं झालं. आपली कागदी होडी हिचा बोन्साय जरी असली तरी हिला मात्र तोड नाही असं वाटू लागलं. त्यानंतर वेण्णा लेकमध्ये मोटरबोट पळवायला मिळाली. तिचा स्पीड त्या लाकडी नावेच्या वेगापुढे असीम ठरला. मग मुंबई बंदरात मोठमोठी जहाजेही जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा अजस्त्रपणा कागदी होडीला फार मोठ्या वाकुल्या दाखवून गेला...
आणि तरीही आजकाल जेव्हा जेव्हा लहान मुले पावसाच्या पाण्यात होड्या सोडतांना दिसतात तेव्हा तेव्हा आपण केलेल्या असंख्य होड्यांच्या आठवणी पर्जन्यधारांसारख्या मनात एकच गर्दी करू लागतात. वाटतं, आपणही पुन्हा एकदा लहानगं मूल होऊन ह्यांच्यात मिसळावं... काटीबोट, आगबोट, साधी बोट, झेंड्याची बोट, शिडाची बोट अशा जमतील तितक्या प्रकारच्या कागदी होड्या ह्या मुलांना निमिषार्धात बनवून द्याव्यात आणि त्यांनी त्या पाण्यात सोडल्यावर केलेला जल्लोष पुन्हा पुन्हा अनुभवावा. शेवटी मग आपणही त्यांच्यासारख्या टाळ्या पिटून त्या चिखलराड्यात उड्या घेत सर्वांग चिखलफेकीने रंगवून घ्यावं... काय हरकत आहे?

बालकथाजीवनमानराहणीक्रीडामौजमजाछायाचित्रणअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

नेमक्या याच कारणासाठी पावसाळी ट्रेकला उपस्थिती लावली जाते, फक्त तिथे होड्या सोडल्या जात नाहीत :)

गणेशा's picture

29 Aug 2011 - 4:29 pm | गणेशा

अप्रतिम

शुचि's picture

29 Aug 2011 - 5:26 pm | शुचि

छान लेख.

सिद्धार्थ ४'s picture

30 Aug 2011 - 8:01 am | सिद्धार्थ ४

चित्र दिसत नहि... :(