प्यार का पंचनामा.
दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली.
तूनळीवरची झलक
http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY
गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत. ते अर्थातच तीन भिन्न स्वभावाचे आणि आर्थिक परिस्थितीतले वगैरे आहेत आणि त्यांच्या आयुष्यात तीन मैत्रिणी येतात. आपापल्या स्वभावाप्रमाणे तिघे त्यांच्या प्रेमाबिमात (कोणी जोरात कोणी सावकाश) पडतात. रजत आपल्या मैत्रिणीबरोबर जवळच एका फ़्लॅटमध्ये "लिव्ह इन" राहायला जातो. निशांतच्या ऑफ़िसात त्याला एक मैत्रीण भेटते जिचा हैद्राबादचा पूर्वीचा एक बॉयफ़्रेन्ड आहे पण तिच्या मते निशांत तिचा जवळचा मित्र आहे... ( मग साहजिकच तिला फ़्लॅट डिपॉजिटसाठी मदत,तिचे ऑफ़िसचे काम स्वत: करून देणे वगैरे सुरू होते).. चौधरी आर्थिकदृष्ट्या थोडा बरा, स्वत:ची जीप वगैरे असलेला.त्यालाही एक नुकत्याच मोडलेल्या रिलेशनशिपमधून सावरणारी आधुनिक मॉडेल्टाईपची मैत्रीण भेटते. मग या सार्यांची प्रेमकथा कशी कशी पुढे जाते किंवा जाते की नाही , त्याचा सारा पंचनामा म्हणजे हा सिनेमा.
संवाद एकदम झकास. रजत एक दिवस वैतागून " गर्लफ़्रेन्डबरोबर राहणं किती अवघड आहे " याबद्दल चौधरीजवळ बोल बोल बोलतो.... तो अख्खा पाच मिनिटाचा संवाद अप्रतिम जमलाय. लेखनात आणि अभिनयातही...सर्व नवोदित कलाकारांची कामे चांगली झाली आहेत.. विशेषत: निशांत आणि रजत यांचा अभिनय उत्तम. यातल्या निशांतचा सिनेमाभर ( त्याला " आपला वापर होतोय" हे समजत असतानाही) जो वापर होतो तो अप्रतिम आहे....
निशान्तची कथा पाहत असताना मला आपला अभिजितचा " तसल्या नजरा " अशा शीर्षकाचा मिपावरचा एक जुना लेख आठवला आणि त्यावरच्या डानराव,प्राजु, वरदा, धमु यांच्या प्रतिक्रिया....
http://www.misalpav.com/node/794
पुपे: थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात..
भडकमकर मास्तर :
मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे, त्यामुळे राबणार्या पोराला एकदम निगेटिव्ह सिग्नल दिला तर तो यापुढे राबणार नाही आणि फार पॉझिटिव्ह देणे मनातून आवडत नसते त्यामुळे काही मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, त्यामुळे मुलगा राबत राहतो आणि लगेच प्रपोजही करत नाही....
....त्यामुळे " काय बोलतोय्स तू हे? मला तर धक्का बसला , मी तसल्या नजरेने तुला पाहिले नाही" वगैरे सगळे झूठ असते,
वरदा :अरे पण बावळटांनो (सॉरी पर्सनल नका बरं घेऊ) तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता? अशी कीती जणं दिसतात जरा एखादी मुलगी गोड बोल्ली एखाद्या दिवशी त्यांच्याबरोबर घरापर्यंत आली..प्रेमाने म्हणाली माझं जरनल पुर्ण करशील का रे की गेले ढगात्..स्वतःचं काम ठेवणार बाजुला आणि तिचं काम करत बसणार ती मस्त दुसर्याबरोबर पिक्चरला जायला मोकळी आणि मग बसा बोंबलंत्...कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग? सांगा की मलाही माझं काम आहे आपण हवं तर एकत्र करु मी सांगेन कसं करायचं ते..पण ते नाही जमत कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..मुलं पण काही कमी नसतात.....
( ब्याचलर पुरुष आय्टी इन्जिनियरांना हा सिनेमा विशेष आवडावा अशी आमची एक विशेष टिप्पणी )
एकूणच हा सिनेमा पुरुषांच्या बाजूने लिहिलेला आहे असे समजण्यास वाव आहे... स्त्रियांना कदाचित हा सिनेमा आवडणार नाही असे माझे वैयक्तिक निरीक्षण.. यातल्या तीनही स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारे कळत नकळत तिघांचा वापर करतात. अर्थात त्याबद्दल प्रत्येकीकडे तिचंतिचं स्पष्टीकरणही आहे , हे मजेदार....
फ़ार वैचारिक वगैरे पहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवली नाही तर पहायला मजा येइल असा सिनेमा...
प्रतिक्रिया
26 Jul 2011 - 6:09 pm | गणपा
संग्रही आहे. आता तुम्ही शिफारस करताहात तर लवकरच पहावा म्हणतो.
26 Jul 2011 - 6:11 pm | सन्जोप राव
कुतुहल चाळवणारे परीक्षण. हा सिनेमा पहावासा वाटत आहे. असले सिनेमे कधी येतात आणि कधी जातात हे कळत नाही, हे लेखकाचे निरीक्षण एकूण समाजाच्या आवडीनिवडीवरच भाष्य करते असे वाटते.
26 Jul 2011 - 6:23 pm | मुलूखावेगळी
-१
आवडला म्हनुन ३ दा बघितला
छान परीक्षण
26 Jul 2011 - 6:25 pm | सहज
झाला पंचनामा - मास्तरांच्या निरिक्षणाचा!
26 Jul 2011 - 6:27 pm | स्वैर परी
सिनेमा फार्फार आवडला! एक दोन गोष्टींची गफलत केलेली दिसतीये मास्तरांनी!
१. ते तिघेही आय टी ईंजीनियर नाहियेत.
२. तो ५ मिनिटांचा मोनोलॉग आहे चांगला, परंतु अभिनय तितकासा खास नाही वाट्ला. अर्थात, पहिला चित्रपट म्हटल्यावर ते माफ! ;)
शिवाय, बर्याच मुलींना हा चित्रपट आवडलेला आहे! :)
26 Jul 2011 - 6:34 pm | स्वाती दिनेश
मास्तरांचे परिक्षण आणि खालच्या प्रतिक्रिया वाचून चित्रपट बघावासा वाटतो आहे.
सर्व नवे चेहरे दिसत आहेत, त्यामुळे तर बघेनच..
(जुन्या खानावळीला कंटाळलेली) स्वाती
26 Jul 2011 - 7:10 pm | असुर
चित्रपटाचे थोडक्यात आणि शेलके परिक्षण कसे असावे, याचे उत्कृष्ट उदाहरण!!!
मास्तर, परिक्षण आवडल्याचे वेगळे सांगणे न लगे!! :-)
--असुर
26 Jul 2011 - 7:21 pm | गणेशा
आजच कळले हा चित्रपट आहे म्हणुन.
परिक्षण छान.
चित्रपट्गृहातच चित्रपट पहायला आवडत असल्याने कधी पाहण्याचा योग येणार नाही असे वाटते.
26 Jul 2011 - 8:56 pm | राजेश घासकडवी
सिनेमाची छोटेखानी ओळख आवडली. त्याचबरोबर मूळ लेख वाचायला मिळाला त्याने बहार आली.
27 Jul 2011 - 10:05 am | फारएन्ड
मस्त ओळख. याची जाहिरात काही दिवस टीव्हीवर दाखवत होते, बरा वाटला होता त्यावरून. बघतो आता. लेखातील बाकी मुद्दे मजेदार आहेत :)
27 Jul 2011 - 10:46 am | सविता
प्रोमोज मध्ये जेवढ्या पंचलाईन आहेत तेच आणि तेवढेच बघण्यासारखे आहे.
"पण बर्याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो"
हे वाक्य मला तरी या चित्रपटाबद्दल खरे वाटले.
५० रुपये मोजून सीडी भाड्याने आणली पण दोघे इतके बोअर झालो.. नवरा १५ मिनिटांनी चक्क घोरत होता आणि एक सीडी संपल्यानंतर दुसरी सीडी घालण्यासाठी कष्ट घ्यावेत इतकी पण लायकी न वाटल्याने मी उरलेला अर्धा चित्रपट बघितलाच नाही.
५० रुपये वाया गेले... त्यापेक्षा अजून १० रुपये घालून दोघांना काटाकिर्रची मिसळ खाता आली असती!
27 Jul 2011 - 2:26 pm | मालोजीराव
असं फक्त तुम्हाला वाटलं असेल कारण मेट्रोज मध्ये चांगला चालला.
बाकी नवख्या कलाकारांच्या मानाने चित्रपट नक्कीच चांगला होता,शेवटपर्यंत वेग चांगला होता,पण शेवट इतका खास नाई वाटला.
27 Jul 2011 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते
बघावा लागेल.
27 Jul 2011 - 5:37 pm | छोटा डॉन
बघु नकाच असा सल्ला देईन.
अर्थात ४ लोकं ज्या गोष्टीला 'नको' म्हणतात ती गोष्ट तुम्ही हटकुन करता हा पुर्वानुभव असल्याने जास्त अपेक्षा नाहीत.
पिक्चर भिकार आहे असे सांगतो.
मी शेवटी शेवटी तर अगदी धरुन आणल्यासारखे बसलो होतो, मला तर कैच्या कै बोर झाला पिक्चर.
बाकी आजकाल असे पिक्चर बघायला थेट्रात जाणारे पब्लिक ( त्यात आम्हीही आलो, पण त्याला पर्याय नाही, असो ), त्यांचा पिक्चर बघण्यातला आवेश आणि नंतर त्यांच्या प्रतिक्रिया हा फार गंमतशीर विषय आहे. ह्या सर्वांवर एकदा सवड काढुन लिहीन असे सांगतो.
- छोटा डॉन
27 Jul 2011 - 5:54 pm | भडकमकर मास्तर
या सिनेमांचं एक बरं असतं...
बनवणारे, अभिनेते, दिग्दर्शक सारे अनोळखी आणि हिन्दी भाषिक वगैरे असल्याने खरी प्रतिक्रिया लिहिता येते...
त्यामुळे आवडला पासून भिक्कार होता पर्यंत सार्या प्रतिक्रिया बिन्धास्त देता येतात...
अतिअवांतर : मराठीचं असं होत नाही... कोणी बनवलाय, कोणावर बनवलाय वगैरे पहावं लागतं... :)
28 Jul 2011 - 1:18 am | अनामिक
ऑनलाईन पाहिला... एकवेळ बघण्यासारखा आहे. बिग बजेट, आणि माजुरडे प्रसिद्ध अॅक्टर्स उगाच त्यांच्या चित्रपटांची हवा करतात आणि मग पाहिल्यावर चित्रपट अगदीच फुस्स निघतो, त्यापेक्षा नक्कीच बरा आहे.
28 Jul 2011 - 2:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
परीक्षण मजेशीर आणि अनेक प्रतिक्रियाही!
बायकांनी वापरून घेतलं आहे मग पिक्चर नावडण्याचं काही कारण दिसत तरी नाही. पण आमचे राको म्हणत आहेत म्हणून मी पहाणार नाही.
28 Jul 2011 - 2:44 am | रेवती
परिक्षण आवडले.
सिनेमा आवडेलच असे नाही.;)
28 Jul 2011 - 3:04 am | धनंजय
मस्त परीक्षण
28 Jul 2011 - 3:13 am | स्मिता.
हा सिनेमा लोकांना आवडलेला पाहून आश्चर्य वाटले. माझी तर फेसबूकावर त्याचे प्रोमोज पाहूनच बघण्याची इच्छा मेली! बघणार्यांचेही अनुभव सविता आणि डॉन सारखेच होते.