मेघस्पर्षी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
12 Apr 2011 - 1:11 pm

सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती. पण काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे त्याला माहिती होती. म्हणजे किमान अशी त्याने स्वतःची समजुन करुन घेतली होती. डोके न वापरता ज्या काही गोष्टी आयुष्यात आपोआप घडत जातात त्या "सवयी" असतात आणि डोके वापरायची फारशी सवय अशीही नसल्यामुळे आपल्या हातुन अश्या बर्‍याच गोष्टी नकळत होत राहतात अशी त्याने स्वतःच्या मनाची घातलेली अजुन एक समजुत.

दात घासता घासता त्याला एकदम सौम्या आठवली. मागच्या रविवारी तिच्याकडे पहाट पहाटे (म्हणजे ८ वाजता) गेलेलो असताना सौम्याने असेच दात घासत घासत येउन दार उघडलेले त्याला आठवले. वास्तविक दात घासणारी मैत्रीण बघुन कोणीही वेंधळ्यासारखे बेभान होउन बघत बसणार नाही. पण तो बघत बसला. सौम्या दिसतच तेवढी गोड होती त्याला तो तरी काय करणार. ते आठवुन त्याच्या मुखावर वीतभर स्माइल पसरले आणि पेस्ट शर्टावर सांडली. त्याला परत स्वतःचा राग आल. काही लोकांना स्वतःला उपेक्षेने मारायची जन्मजात सवय असते. तु ही त्यातलाच असे सौम्या त्याला नेहेमीच म्हणायची आणि मग गोड हसायची. ती अशी हसत असताना तो असेच तोंड उघडे ठेवुन वेंधळ्यासारखे बघत असतो आणि मग असे काय बघतो आहेस डंबो म्हणुन सौम्या एक हलकीशी टप्पल मारते तेव्हा त्याला स्वतःच्या त्या वेंधळेपणाचा प्रचंड राग येतो. कधीतरी छानपैकी गॉगल चढवुन, अर्मानीचे ब्लॅक जॅकेट आणि ली कूपरचे ३ इंच उंचीचे सोल असलेले लेदर शूज घालुन करिझ्मावरुन झोकात एंट्री घ्यावी आणि सौम्याला कॉफी प्यायला येणार का असे थाटात विचारावे असे त्याला नेहेमी वाटते पण तसे न करण्याची ४ कारणे होती. पहिली म्हणजे आपल्या काळ्या रंगाला ब्लॅक जॅकेट चांगले दिसत नाही हे त्याला माहिती होते, दुसरे म्हणजे ५ फूट ५ इंच उंचीच्या माणसाला ली कूपरचे हाय सोल शूज सुट होत नाहीत असे त्याचे मत होते, तिसरे म्हणजे त्याच्याकडे करिझ्मा नव्हती आणि चौथे म्हणजे असे तिला डायरेक्ट विचारण्याचा त्याच्या अंगात दम नव्हता.

सौम्याची आणि त्याची भेट पुरुषोत्तमच्या तालमी असताना झाली. कॉमर्स कॉलेजमध्ये असेही कला अंगात असणारे लोक फार कमी. त्यात बुटक्या काळ्या माणसाला नाटकात कोण भाव देणार आणि त्यात वर आपल्याला अभिनयाचा गंध नाही त्यामुळे आपला तिथे उपयोग नाही हेही त्याला माहिती होते. पण सौम्या नाटकात आहे या एकाच इंसेटिव वर तो रोज तालमीला जायचा नुसता बसुन असायचा. त्याचे असणेदेखील कोणाच्या खिजगणतीत नसायचे. सौम्या समोर नसेल तेव्हा तो सुद्धा मग त्याची कवितांची चोपडे उघडुन शांतपणे खरडत बसायचा. असेच एक दिवस त्याच्याही नकळत सौम्या सहजपणे त्याच्याशेजारी येउन बसली आणि अभावितपणे त्याच्या कविता तिने वाचल्या. नाटकातल्या एका अंकात त्याची एक कविता चपखल बसेल म्हणुन तिनेच शिफारस केली. उन्हाच्या काहिलीत भाजुन निघालेल्या मातीवर वळवाचा पहिला पाऊस पडुन जो मृदगंध पसरतो तो छातीत साठवुन घ्यावा तसे काहीसे फीलिंग त्याला त्यावेळेस आले. नंतर तिच्याच आग्रहाखातर त्याने नाटकात एक बर्‍यापैकी मोठी भूमिकाही केली आणि पुरुषोत्तमात बक्षिसही मिळवले. सगळेच स्वप्नवत.

पण ती झाली मागच्या वर्षीची गोष्ट तेव्हापासुन आत्तापर्यंत आपली प्रगती काय? सौम्या स्वतःच येउन बसते म्हणुन आपल्याला बोलण्याचे धाडस होते एरवी तोंड कितीही चालत असले आणि पाव किलोच्या मेंदुत कितीही हजरजबाबीपणा भरलेला असला तरीही सौम्यासमोर काय बोलायचे यामुळे त्याला नेहेमीच गोंधळल्यासारखे व्हायचे. शिवाय मुलींशी स्वतःहुन बोलायचे नाही हादेखील त्याचा एक नियम. अपवाद अर्थात फक्त मयुराचा. तिच्याशी मात्र तो तासनतास बोलत असायचा. फोनवर. घरी जाउन. कॉलेजात बसुन ते दोघे कधीच बोलले नाहीत. तिथे बडबड करण्याची सगळी जबाबदारी सौम्यावर असायची आणि सौम्यावर शायनिंग मारण्यासाठी गृपमधल्या इतर मुलांवर. त्याचे तोंड कधीमधी सौम्याने कविता वाचुन दाखवण्याचा आग्रह केला तरच उघडायचे. तो कविता वाचत असताना सर्वात उत्स्फुर्त दाद मात्र मयुराकडुन यायची. पुरुषोत्त्तमच्या तालमी चालु असताना त्यानेच मयुराचे बरेच संवाद दुरुस्त करुन दिले होते. तो अर्थही एवढा प्रवाही समजवुन सांगायचा की त्या भूमिकेत शिरणे अगदीच सोपे होउन जायचे. नाटकात खरे म्हणजे चेहेर्‍याच्या हावभावांना विशेष महत्व नाही. पण त्यांचा भूमिकेत शिरण्यासाठी कसा उपयोग होतो ते त्यानेच दाखवुन दिले. खरे म्हणजे त्याचाही तो नाटकाचा पहिलाच प्रयत्न. तो सुद्धा सौम्याने घोड्यावर बसवल्यामुळे. पण कला त्याच्या अंगात उपजतच होती. फक्त त्याला स्वत:ला त्याची जाणीव नव्हती. मयुरा त्याच्यात कधी गुंतत गेली तिलाही कळले नाही आणि स्वतःहुन त्याला सांगायचे धाडस तिच्यात नव्हते. तिने हळुहळु त्याला ते कळावे म्हणुन प्रयत्न मात्र भरपुर केले.

एक मुलगी आपणहुन आपल्याशी बोलते आहे याचेच त्याला अपृप. पुरुषोत्तमने एकदम सगळेच बदलुन टाकले. मुली त्याच्याशी आपणहुन बोलायला लागल्या. सौम्याशी ओळख झाली. मयुराशी मैत्री झाली. अगदी फास्ट फ्रेंड्स. मयुराशी तो बिनधास्त बोलायचा. आज भोपळ्याची भाजी खाल्ली किंवा कॉफीत आईने साखर जास्त घातले होती यापासुन ते तु केलेली बटाट्याची भाजी खाउन २ दात हलायला लागले इथपासुन सगळे. मयुरा फक्त फास्ट फ्रेंड नाही किमान तिच्याबाजुने तरी आपल्या नात्याला फक्त तेवढाच अर्थ नाही हे कळायला मात्र त्याला वर्ष लागले. ते सुद्धा मयुराने खुप स्पष्ट संकेत दिले त्यामुळे. त्याला ते कळाले आहेत हे मयुराला माहिती होते त्याने मात्र ते कळालेच नाहीत हे दाखवणे योग्य समजले. रोजच्या तासभराच्या गप्पा मात्र चालुच राहिल्या. कॉलेज संपल्यावर त्याही कमीकमी होत गेल्या. आठवड्यातुन एक दोनदा तरीही मयुरा फोन करायचीच. लँडलाइन वरच करायची. तो घरी नसेल तर त्याच्या आईशी गप्पा मारायची. आईनेही मयुरा चांगली मुलगी आहे म्हणुन त्याला आडुन आडुन सुचवुन झाले होते.

त्याचा मात्र गोंधळ चालु होता. सौम्या अजुन मनातुन हलत नव्हती आणि मयुराची मैत्री सोडवत नव्हती. समुद्राकाठची रेती तो हातात घट्ट धरु पाहत होता आणि दिवस त्या रेतीसारखे हातातुन निसटुन चालले होते. बर्‍याच वेळा त्याला वाटायचे की मयुराला सगळे खरे सांगुन टाकावे पण भिती वाटायची. ती समजुन घेणार नाही याची नाही. पण तिला वाईट वाटेल याची. त्याला सगळे सहन झाले असते अगदी सौम्याचा नकार सुद्धा पण खरे सांगितल्यामुळे मयुराच्या चेहेर्‍यावरचे दु:ख त्याला पहावले नसते.

मयुरा जेव्हा कधी फोन करायची तेव्हा घरच्यांकडुन लग्नासाठी प्रेशर वाढते आहे म्हणुन बोलायची. पण कधी स्पष्टपणे त्याला लग्नाविषयी मात्र तिने विचारले नाही. तिने कधीतरी विचारावे म्हणजे मग का होइना आपण तिला नकार देउन हे त्रांगडे सोडवु शकु असे त्याला नेहेमी वाटायचे. पण तो आणि मयुरा दोन समांतर रस्त्यांसारखे चालले होते एकमेकांना छेदही देता येत नव्हता आणि समांतर जाणेही अशक्य होउन बसले होते. मयुराला योग्य वेळेस सगळे स्पष्ट न करुन त्याने यु टर्नचा ऑप्शनही स्वतःपाशी ठेवला नव्हता. मनाचा तो कोंडमारा असह्य होउन शेवटी त्याने सौम्याला एक दिवस कॉफीसाठी बोलावलेच. वर्षानुवर्षे उराशी लपवुन ठेवलेले गुपित उघडे करण्यासाठी संध्याकाळी ७ वाजता सुद्धा गॉगल घालुन आणि पांढर्‍या टीशर्ट वर अर्मानीचे काळे जॅकेट चढवुन तो सौम्याला भेटण्यासाठी पोचला. आणि त्या संध्याकाळी त्याला मिळालेले उत्तर अपेक्षितच होते. ज्या मुलांना नाकारायचे असते त्यांना मुली भाऊ म्हणुन राखी तरी बांधतात किंवा तु फक्त माझा खुप चांगला मित्र आहेस रे मी तुझ्याकडे कधी त्या दृष्टीने पाहिलेच नव्हते असे म्हणुन बोळवण तरी करतात. कितीही लोकोत्तर सुंदर असली तरी सौम्या एक मुलगीच होती. तिने दुसर्‍या मार्गाने त्याची बोळवण केली. त्याला रडुही आले नाही. सगळे कसे अपेक्षितच होते. मनात एक सल फक्त राहिला की मयुराला आधी सांगितले नाही सौम्याबद्दल. कुठेतरी आपण मयुराची फसवणुक केली असे त्याला सारखे वाटत राहिले.

योगायोग असा की दुसर्‍याच दिवशी मयुराचा फोन आला. भेटायचय म्हणाली. जास्त काही बोलली नाही पण घरचे लग्नासाठी खुप मागे लागले आहेत. आता या आठवड्यात मला निर्णय घ्यावाच लागेल त्या आधी तुझ्याशी बोलावे म्हणुन फोन केला म्हणाली. याहुन स्पष्टपणे अजुन कुठली मुलगी बोलणार? त्यालाही मनोमन निर्णय घ्यायचाच होता. असेही सौम्या नाही म्हणालीच होती. त्याने झटकन प्लॅन बनवला. आज त्याला कुठल्याही प्रकारे मयुराला नाराज करायचे नव्हते. तो घरुन निघाला तेव्हा आभाळ दाटुन आले होते. त्याचे मनाचे प्रतिक जणू. मयुरा भेटली. तिच्या स्वभावाच्या प्रतिकूल तिने थोडा भडक मेक अप केला होता. परफ्युमचा वासा तर फर्लांगावरुनही आला असता. तिला बघुन तोही २ सेकंद देहभान हरपला. मयुरा एवढी सुंदर दिसत असेल असे त्यालाही कधी वाटले नव्हते. ती सुंदर असूनसुद्धा. तिला मागे बसवुन त्याने भर्रकन बाईक सुरु केली. कुठे जायचे त्याला आधीपासुनच माहिती होते. ते दोघे अर्ध्या रस्त्यात पोचेतोवर पावसाने भलताच वेग धरला होता. मुळा की मुठा त्याच्या मनात नेहेमीच गोंधळ व्हायचा पण त्यापैकी कुठलीतरी एक नदी, डोक्यावर कोसळणारा पाऊस, पावसाला भिउन झाडामागे लपलेले पुणेकर, पुलावर निवांत थांबुन एका सुंदर मुलीबरोबर भिजत तो पाऊस अंगावर घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याने कचकन ब्रेक दाबला. आणि कित्येक वर्षांत पहिल्यांदाच आत्मविश्वासाने त्याने मयुराच्या नजरेला नजर भिडवली. कुछ फसाने नजरो से बया होते है की काहीसा तो सरफरोशमधला आमीरचा शेर त्याला उगाच आठवला. आत्ताही तसेच झाले आणि नजरेतुनच तिला सगळे कळाले तर किती बरे होइल असे त्याला वाटले आणि तो क्षीणसा हसला. मयुरा पण प्रत्त्युत्तरादाखल खरेच खुप गोड हसली आणि मग तिला काही बोलु न देता त्याने तिला सौम्याबद्दल् सगळे सांगुन टाकले. मयुरा खुप सुंदर दिसत होती, पण आता खुप उशीर झाला होता. सौम्या नाही म्हणुन मयुरा हा विचारही त्याला सहन होत नव्हता. सौम्याचे नाही म्हणने त्याला सहन होते, नकारामुळे मयुराला होणारे दु:ख सुद्धा आता त्याला मान्य होते पण मैत्रीची ही प्रतारणा त्याला मान्य नव्हती. त्याने मयुरासमोर सगळ्या भावना उघड केल्या आणि मग मात्र तिच्या नजरेला नजर भिडवण्याची त्याची हिंमत नाही झाली. मयुराची आसवं मुसळधार पावसात मिसळुन गेली. ती काहीच न बोलता रिक्षा करुन निघुन गेली. त्याच्या मनातले वादळ मात्र आता शमले होते. त्याच्या डोळ्यातला पाउस आसमंतात विरुन गेला. काळ्या नभांनी त्यांचा खजिना धरतीवर रिता केल्यावर जे सुनेपण चहुकडे भरुन जाते तशीच काहीतरी अवस्था छातीत भरुन घेउन तो परत फिरला.

कथामांडणीसंस्कृतीवावरवाङ्मयविचारलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Apr 2011 - 1:16 pm | यशोधरा

आई गं..
चांगली कथा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान कथा. लेखनशैली ही मस्तच.
अजून येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

12 Apr 2011 - 1:30 pm | प्रचेतस

सुरेख कथा. मस्तच.

मराठमोळा's picture

12 Apr 2011 - 1:33 pm | मराठमोळा

सिंपली सुपर्ब!!!
मस्त!!!

प्रमोद्_पुणे's picture

12 Apr 2011 - 1:36 pm | प्रमोद्_पुणे

छान लिहिले आहेस..

प्रास's picture

12 Apr 2011 - 1:45 pm | प्रास

प्रवाही शैली.

सौम्या नाही म्हणुन मयुरा हा विचारही त्याला सहन होत नव्हता. सौम्याचे नाही म्हणने त्याला सहन होते, नकारामुळे मयुराला होणारे दु:ख सुद्धा आता त्याला मान्य होते पण मैत्रीची ही प्रतारणा त्याला मान्य नव्हती.

जीवनातला असा एखादा कठीण 'दोराहा' पार करताना स्वतःला दु:खी करणारा निर्णय घेतला जातो?

बाकी लिखाण आवडले.

:-)

पियुशा's picture

12 Apr 2011 - 1:50 pm | पियुशा

मस्त मस्त :)

सुहास..'s picture

12 Apr 2011 - 2:13 pm | सुहास..

एक नंबर ओ मालक्स !!

मस्त !!

प्रभो's picture

12 Apr 2011 - 7:38 pm | प्रभो

एक नंबर!!

मुलूखावेगळी's picture

12 Apr 2011 - 2:30 pm | मुलूखावेगळी

मन हेलावले वाचताना :(

काळ्या नभांनी त्यांचा खजिना धरतीवर केल्यावर जे सुनेपण चहुकडे भरुन जाते तशीच काहीतरी अवस्था छातीत भरुन घेउन तो परत फिरला.

शेवटी लटकंती टाळलीये हे ही विशेष

क्या बात..क्या बात..क्या बात..

वंडरफुल.. जे मिळतंय ते मलमासारखं स्वीकारुन स्वतःच्या ठणक्यावर फुंकर घालत बसण्याचा सोयीचा निर्णय नाकारुन अशी स्टेप घेऊ शकणार्‍या हिरोच्या सच्चेपणाची दाद देतो.

अशा अफलातून माणसाला अरमानी, करिझ्मा वगैरे चमको चिजांची काही गरज नाही.

मृत्यूंजय.. मस्त क्रिएशन आहे ही तुझी..

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2011 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

वेगळ्याच धर्तीची कथा रे दाद्या.

आवडली.

अगदी अशीच नाही पण थोडीशी ह्या वळणाने जाणारी सु. शिं. ची एक कथा आहे. हिलस्टेशनवर एकटिच हिंडायला गेलेली मुलगी त्या बेधुंद वातावरणात एका नुकत्याच हिलस्टेशनवर ओळख झालेल्या तरुणाला सर्वस्व देऊन बसते. पुढे जेंव्हा त्याच तरुणाचे स्थळ चालुन येते तेंव्हा ती ठामपणे नकार देते.

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 3:04 pm | स्मिता.

कथा छानच आहे, मस्त रंगवली आहे. पण शेवटी चुकल्यासारखं झालं.

आयच्या गावात जोरदार पाऊस, बाईकवर भिजलेले दोन जीव आणि नंतर ओघळणारी आसवं??? ये बात कुच हजम नय झाली की रे मृत्युन्जया!! पेक्षा दिलंच असतंस जमवून दोघांचं तर तिच्या त्या आसवांची आणि त्यानं तो सुनेपणा मनात भरुन घ्यायची गरज नव्हती की रे!!! समजा त्यानं त्या मयुराला रामायण-महाभारत सांगायच्या ऐवजी सरळ प्रपोज करुन टाकलं असतं तर काय गेलं असतं? सौम्याला पटवून स्वत:कडे वळवून घेण्यापेक्षा मनापासून त्याच्यावर प्रेम करणारी मयुराच +१ ना?

असलं हे कोणी रडलं की आपल्याला लै प्रश्न पडतात!!
इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असणं वाईट असतं का??? की इमोशनल असून चांगल्या गोष्टी हातच्या घालवून पळत्याच्या पाठी धावणं वाईट? की प्रॅक्टीकली विचार करुन समजूनउमजून एखादा सोयीस्कर निर्णय घेणं वाईट??

झक मारली आणि तुझा लेख वाचला! :-)

--असुर

गवि's picture

12 Apr 2011 - 4:34 pm | गवि

या कथानायकाने जे केलं ते प्रत्यक्षात कोणी करणार नाही. म्हणूनच वेगळेपण उठून दिसतंय. एरव्ही एक अरेंज्ड मॅरेज करावं तसं का होईना, पण मयुरीशी त्याने नातं जमवलं असतं तरी गैर, अनैतिक असं काही नव्हतं.

लग्न चांगली आणि आवश्यक अशी एक गोष्ट आहे पण प्रेमापेक्षा ते खूप वेगळं आहे.

अगदी तळापर्यंत जायचं तर आपण ज्या पोरीवर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम करतो, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये.

पटणार नाही कोणाला पण हे.. :)

गवि,
एक मुलगी हिरोला भयंकर आवडते आणि 'तिने त्याला नाकारलंय' हे सत्य पचवून हा हिरो पुढे गेला असता तर समजलो असतो, पण तोही त्याचं दु:ख कुरवाळत बसलाय ना? आणि त्याच्या या देवदास वृत्तीपायी त्याच्यावर मनापासून प्रेम करनारी एक मुलगी दुखावली गेलीये ना?? मग यात काय ते वेगळेपण??
नाय पटलं गवि!!! म्हणजे तुम्ही म्हणता ते असेल बरोबर, पण तरीही!! :-)

"आपण ज्या पोरीवर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम करतो, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये" हे इमोशनलीदेखील पटत नाही. पण त्याच न्यायाने, "ज्या पोरीनं आपल्यावर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम केलं, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये"असं कुणी इमोशनली तरी म्हणेल का??

आणि माझे बाकीचे प्रश्न अजून तसेच भीजत पडलेत. उत्तरं द्याच असा आग्रह नाही, पण द्याल तर बरंच आहे की!

--असुर

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 4:59 pm | मृत्युन्जय

असे बघ असुरा की त्याला प्रेमही नाही मिळाले आणि मैत्रीही नाही टिकली. पण किमान त्याने मैत्रीच्या नात्यातला सच्चेपणा टिकवला.

प्रेम हे काय असे हुकुमी सांगुन होते का रे? सौम्या नाही म्हणुन मयुरा ही तडजोड झाली असती आणि तो प्रेमाचा आणि मैत्रीचा दोन्हीचाही पराभव असला असता. तु नही तो और सही और नही और सही हे सुत्र प्रत्येकाने ठेवावे पण या विवक्षित घटनेत प्रश्न २ मित्रांचा होता.

प्रेम दोघांनाही नाही मिळाले पण दोन्ही केसेस मध्ये ते रेसिप्रोकेट होत नव्हते हे तर खरे आहे ना? मग मारुन मुटकुन कोणावर प्रेम करण्यात काय अर्थ आहे?

प्रश्न मारुन मुटकून प्रेम करण्याचा नाहीये. ते तर करताच येत नाही. पण त्यालाही मान्य आहे की त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा पार्ट ती मुलगी आहे जिला त्याने नाही म्हटलंय! मग असंही नाहीये की त्याला ती आवडत नाही! पण कुठल्या नात्याला काय म्हणावे या विवंचनेत अडकून गेला बिचारा आसं वाटलं.

जाऊ द्या!! आपण चर्चा करण्यात काय पॉईंट आहे? जे व्हायचं ते होऊन गेलंय!!! फारतर मृत्युन्जय कथेचा सिक्वल लिहून बदल करवून आणू शकतो, पण तो तसं काही करणार नाही याची मला खात्री आहे.

--असुर

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 5:46 pm | मृत्युन्जय

फारतर मृत्युन्जय कथेचा सिक्वल लिहून बदल करवून आणू शकतो, पण तो तसं काही करणार नाही याची मला खात्री आहे.

:).

"आपण ज्या पोरीवर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम करतो, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये" हे इमोशनलीदेखील पटत नाही. पण त्याच न्यायाने, "ज्या पोरीनं आपल्यावर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम केलं, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये"असं कुणी इमोशनली तरी म्हणेल का??

हो. जाड टायपात हो.

म्हणूनच म्हटलं.. पटणार नाही कोणाला. इमोशनलीही योग्य नाही वाटणार. किंवा कबूल नाही करणार म्हणू..

पण ज्यांचं प्रेमलग्न किंवा अरेंज्ड कसंही लग्न होऊन एकत्र राहात अनेक वर्षं झाली आहेत (विशेषतः "सुखी संसाराची", "एकमेकांना समजून घेत प्रेमाने भांडत आणि पुन्हा एक होत" वगैरे वगैरे प्रकारे यशस्वी संसाराची अनेक वर्षे झाली आहेत असे)
...त्यांना मी काय म्हणतोय कळेल. कदाचित त्यासाठी थोडा न घाबरता विचार करावा लागेल. कौलच काढावा खरं तर.

(संसारात सुखी) गवि.

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 4:54 pm | मृत्युन्जय

कथा पुर्णपणे काल्पनिकही नाही गवि :). असेही लोक असतात जगात. सेंटिमेंटल फूल्स म्हणुन सोडुन द्यायचे.

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 5:22 pm | मृत्युन्जय

तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो आहे रे . तुला पटेलच असे नाही. पण माझ्यातर्फे एक प्रयत्न

इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असणं वाईट असतं का???

प्रेमाच्या बाबतीत इमोशनलच असावे माणसाने. इतर बाबतीत प्रॅक्टिकल. कारण प्रेम हीच एक भावना आहे रे मुळात. तो काही व्यवहार नाही. भावनांची गोळाबेरीज नफ्यातोट्याच्या गणितात कशी बसवायची रे? या केसमध्ये मैत्रीशी प्रामाणिक राहुन त्याची कुचंबणाच झाली. जिच्यावर प्रेम केले ती नाही म्हटली. जिने प्रेम केले ती नाराज झाली. कथानायक तोट्यातच गेला की रे. पण मग आयुष्यात सगळ्याच गोष्टी व्यवहार फायद्यासाठी करायच्या नसतात रे. काही गोष्टी फायद्या तोट्यापेक्षा जास्त महत्वाच्या असतात.

की इमोशनल असून चांगल्या गोष्टी हातच्या घालवून पळत्याच्या पाठी धावणं वाईट?

परत तेच. जिथे प्रश्न ह्रिदयाचा येतो तिथे डोके काम करत नाही. जवळच्या मैत्रिणीशी अरेंज मेरेज केल्यासारखे लग्न करायचे? ती काय रिप्लेसमेंट आहे का? डीलरने टीव्ही पाठवला. खराब झाल.. आपण रिप्लेसमेंट मागवली. प्रेमाचे बंध अलवार हळुवारपणे उलगडत जातात तेव्हाच ते प्रेम ठरते. नाहीतर कोणाच्यातरी एकाच्या सुखासाठी किंवा कधीकधी दोघांच्याही नाइलाजातुन उमटलेली एक तडजोड ठरते.

प्रेम म्हणजे काही पक्षी नाही ना की अ बर्ड इन द हँड इज बेटर दॅन टु इन द बुश म्हणावे आणि निर्णय घ्यावा.

की प्रॅक्टीकली विचार करुन समजूनउमजून एखादा सोयीस्कर निर्णय घेणं वाईट??

प्रॅक्टीकली विचार करणे चांगले नक्कीच. पण मग "सोयीस्कर" निर्णय म्हणजे कोणाला सोयीचा असेल तो. मी, माझे, मला यात अडकुन पडलेला निर्णय जर इथे कथानायकाने घेतला असला असता त त्याने त्याच्या मैत्रिणीशी प्रतारणा नसती केली?

पण तोही त्याचं दु:ख कुरवाळत बसलाय ना?

बसलाय खरं. प्रेमात पडलेल्या माणसाला हे कोणी आणि कसे समजवावे?

आणि त्याच्या या देवदास वृत्तीपायी त्याच्यावर मनापासून प्रेम करनारी एक मुलगी दुखावली गेलीये ना?? मग यात काय ते वेगळेपण??

एक मुलगी दुखावली गेली रे बाबा. पण ते इनेव्हिटेबल आहे असे नाही का वाटत. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यामागे आयुष्य घालवण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याबरोबर घालवावे असे म्हणतात. पण मग दुनिया इतकी परफेक्ट असली असती तर ह्रिदयभंग झालेच नसते ना? शेवटी कथानायकाने हा रुल फोलो केला नाही तसा सौम्यानेही नाही ना केला?

"ज्या पोरीनं आपल्यावर अगदी पहिलं पहिलं आणि भयानक प्रेम केलं, तिच्याशी आपलं लग्न कधीही होऊ नये"असं कुणी इमोशनली तरी म्हणेल का??

हे मात्र पास ऑन टु गवि हा.

गवि's picture

12 Apr 2011 - 5:24 pm | गवि

मी काही प्रश्नांची उत्तरे माहीत असलेला ज्ञानी नव्हे पण खरेच जेन्युईन प्रश्न तू उपस्थित केल्याने लिहितो.

असलं हे कोणी रडलं की आपल्याला लै प्रश्न पडतात!!
इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असणं वाईट असतं का??? की इमोशनल असून चांगल्या गोष्टी हातच्या घालवून पळत्याच्या पाठी धावणं वाईट? की प्रॅक्टीकली विचार करुन समजूनउमजून एखादा सोयीस्कर निर्णय घेणं वाईट??

इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असणं कधीही चांगलं. पण प्रॅक्टिकल असणं याचं महत्व हे सगळं होऊन गेल्यावर बर्‍याच काळाने कळतं. योग्य वेळी कळत नाही. मारुतीची बेंबी गार असा प्रकार आहे.
ते कळेपर्यंत आपण प्रेमात झगडतच राहतो.

निदा फाजलीसाहेबांनी म्हटलंय ना..

किन राहों से पास है मंझिल कौनसा रस्ता (रिश्ता) मुश्किल है?
..हम भी जब थककर बैठेंगे, औरोंको समझायेंगे..

पण गाढ प्रेमात आपण आहोत अशा समजुतीच्या फेजमधे प्रॅक्टिकल वगैरे हे शब्दच कळण्या-वळण्यापलिकडचे असतात.
त्यामुळे त्यावेळी "इमोशनल असून चांगल्या गोष्टी हातच्या घालवून पळत्याच्या पाठी धावणं वाईट?" हे वाक्य अगदी दुरित वाटतं. म्हणजे त्यावेळी प्रेमवीराची रिअ‍ॅक्शन अशी असेल", अरे, ती मुलगी म्हणजे काही एखादी खेळण्यासारखी "वस्तू" किंवा शिकार नाही की जिच्या बाबतीत "हातची सोडून पळत्यापाठी लागणे" वगैरे वाक्प्रयोग करावेत. वगैरे वगैरे.

त्यामुळे जेव्हा भान येतं तोपर्यंत प्रेमभंग आणि दुसरीकडे लग्नबिग्न किंवा तिच्याशीच लग्न होऊन गेलेलं असतं.

आणि मग त्या आवेगयुक्त/ हुरहुरत्या वगैरे वगैरे नात्याची लग्नानंतरची अतिपरिचयात् अवज्ञा आणि त्या प्रेमाचं बदललेलं रूप हे प्रकार पाहून नीट विचार केल्यावर असंच वाटेल की जिच्यावर प्रेम केलं तिच्याशीच लग्न करुन मी त्या भावनेची वाट लावली. त्यापेक्षा ठरवून सवरुन व्यावहारिक लग्न केलं असतं तर नातं इतकं बदललं नसतं.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2011 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

कथेचा आनंद घ्या आणि इतरांना घेउ द्या रे मेल्यांनो.

मिपाचे प्रगल्भ मिपाक्रमात रुपांतर करायचे आहे का तुम्हाला? ;)

मुस्तफासुर

गवि's picture

12 Apr 2011 - 6:10 pm | गवि

जे काथ्याकूट वर केले आहे त्यालाच कथेचा आनंद घेणे म्हणतात. वाचून समाधी लावण्याला नव्हे.

मूळ विषय असो नसो, प्रदीर्घ चर्चा झडली पाहिजे तरच खरा आनंद, हे तत्व मी पुण्यातल्या मित्रांकडून गाडगीळ पुलावर शिकलो आणि मुम्बैत सोळा वर्षे राहूनही विसरलो नाही.

काय हे पराभौ. पुण्याचे ना तुम्ही ? ;)

एखादी कथा वाचून बरंच काय काय वाटून जातं. ते तिथंच बोलून टाकलं की नवीन कथा वाचायला मोकळे!! कथेची वाट लावणारी चर्चा करुन कथेच्या जीवाला घरघर लावण्यात आपल्याला काहीही इंटेरेष्ट नाही पराषेट!!

©º°¨¨°º© आयडीकथेतील मुस्तफाकुमार ©º°¨¨°º©
Only Airytales Have Happy Landings ...

गवि, माझी कदाचित लिहीण्यात गडबड झाली असावी! 'हातचे सोडून... ' लिहीण्यामागे वस्तू, शिकार वगैरे भावना नव्हती. म्हणायचे इतकेच आहे की जिच्यावर हिरोनं प्रेम केलंय तिच्या नकारामागे जावं की ज्या मुलीने हिरोवर प्रेम केलंय त्यानं त्याचं भान ठेवून तिच्या प्रेमाचा स्विकार करावा.. पण ते दुरित वगैरे स्टाईलने अजिबात नव्हतं बरं का!!

--असुर

अरे असुरमित्रा, ती मी त्या फेजमधल्या प्रेमवीराची काय प्रतिक्रिया असेल ते सांगितलं. एरवी तू म्हणतोस ते अगदी कोणत्याही अर्थाने खरं आहे.

sneharani's picture

12 Apr 2011 - 4:59 pm | sneharani

मस्त कथा!सुरेख!!

सांजसखी's picture

12 Apr 2011 - 5:15 pm | सांजसखी

>>त्याच्या डोळ्यातला पाउस आसमंतात विरुन गेला. काळ्या नभांनी त्यांचा खजिना धरतीवर रिता केल्यावर जे सुनेपण चहुकडे भरुन जाते तशीच काहीतरी अवस्था छातीत भरुन घेउन तो परत फिरला.

फार ओघावते लिहिले आहे तुम्ही... आवडले .

मन१'s picture

12 Apr 2011 - 5:55 pm | मन१

मी माझ्या मयुराला कधीच होकार देउन मोकळा झालोय.

--मनोबा.

कथा आवडली.
शेवटी झीरोचा हिरो झालाच म्हणायचा!;)

गोगोल's picture

12 Apr 2011 - 10:35 pm | गोगोल

कारण की तेल गेल तूप गेल हाती आल ..

तरी वाटलच मला अज्जून कोणी कसं बोललं नाही!;)
स्वत:च्या नजरेत शेवटी हिरो झाला.......बरेच दिवस मनात झुरून शेवटी खरं काय ते बोलला आणि त्याला मोकळं वाटू लागलं. मुलगी न मिळण्याचं म्हणाल तर आतापावेतो सवय व्हायला हवी. ;)

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 6:11 pm | प्यारे१

कथा म्हणून आवडली. मस्तच.

कुणी म्हणून गेलंय. 'शादी उनसे करो जो तुमसे प्यार करे ना की जिससे तुम प्यार करो'

असो.... त्रिकोणाचे तिन्ही टोके अजून उघडीच. एक तरी जुळवा रे कुणीतरी ;)

अरे बाप्रे! कथेवर काथ्याकूट?? चालूदेत, चालूदेत :)

फार छान लिहिलं आहे, पण उगाच माझ्या मनात शंका आली, त्याला एका मुलीनं नाकारणं आणि त्यानं दुस-या मुलीला होकार न देणं यातला फरक आता शोधतो आहे.

डावखुरा's picture

12 Apr 2011 - 6:44 pm | डावखुरा

मनभावन...मस्त ओघवती शैली

स्वानन्द's picture

12 Apr 2011 - 6:49 pm | स्वानन्द

मस्तच रे... कथा आवडली.

मराठे's picture

12 Apr 2011 - 8:05 pm | मराठे

खूप छान कथा! एकदम आवडली.

पैसा's picture

12 Apr 2011 - 8:10 pm | पैसा

वाचकाला शेवटी वाईट वाटतं, याचाच अर्थ ही कथा जमलीय.

काही नाही तरी आपण प्रामाणिक राहिल्याचं समाधान कथानायकाला पुढे जाण्याची उमेद देईल. शक्य आहे, की काही वेळानंतर कथानायकाचा हा पैलू लक्षात घेऊन मयुराच परत येईल!

असुराचे प्रश्नही पटले. एवढंच म्हणेन की जगात जास्त शोकान्तिका बघायला मिळतात, पुढची कथा सुखान्त करा, आम्हाला जास्त आवडेल.

आनंदयात्री's picture

13 Apr 2011 - 6:39 am | आनंदयात्री

सहमत आहे. कथा सुंदर आहे. अजुन एक पार्ट काढा (फ्लॉप झाला तरी हरकत नाही) आणि त्यात मयुरा हिरोला भेटते असे दाखवा .. आमच्यासारख्या येड्या वाचकांना बरे वाटेल :)

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 9:44 pm | शिल्पा ब

मस्त कथा.

कथा आवडली.
त्यावरचा उहापोह ही आवडला.

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 12:33 am | मेघवेडा

वा! अतिशय सुंदर कथा रे! शीर्षकही समर्पक! :)

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2011 - 6:58 am | भडकमकर मास्तर

कथा आवडली...
कथेवरचा काथ्याकूटही आवडला...

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 9:53 am | नगरीनिरंजन

कथा आवडली...
कथेवरचा काथ्याकूटही आवडला...
असेच म्हणतो.
कथानायकाचा निर्णय बरोबर वाटला असेही नमूद करतो.

अप्रतिम कथा ...
रिप्लाय पण छानच ...

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 3:06 pm | पुष्करिणी

कथा छान आहे, काथ्याकूटही.
हिरोचा शेवटचा निर्णय आवडला. तसा हिरो मयुराच्या बाबतीत शेवटपर्यंत प्रॅक्टीकल होताच, तिच्या भावना इतके दिवस माहित असुनसुद्धा एक मैत्रिण दुरावेल (स्वतःचा एक इमोशनल सपोर्ट, विरंगुळा ) म्हणून शेवटपर्यंत मयुराला खरं सांगितल नाही त्यानं. निदान शेवटी तरी सांगितलं हे बरं केलं. नसतं सांगितलं तर प्रॅक्टीकल नाही पण स्वार्थी नक्कीच वाटला असता हिरो.

यशोधरा's picture

13 Apr 2011 - 3:19 pm | यशोधरा

डिट्टो.

सखी's picture

13 Apr 2011 - 4:57 pm | सखी

अगदी हेच म्हणायचे होते - सांगितले नसते तर हिरो स्वार्थी नक्कीच वाटला असता. कथा आवडली.

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 3:24 pm | मृत्युन्जय

आयला आयुष्यात एका तरी धाग्याने हाफ सेंच्युरी मारली म्हणुन सुखावलो राव. उगाच खोटं कशाला बोला ;)

चांगली कथा आहे की हो! मस्त!

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 10:52 am | मृत्युन्जय

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. खोदकाम केल्याबद्दल श्री स्वॅप यांना डबल धन्यवाद :)

gogglya's picture

14 May 2015 - 2:44 pm | gogglya

किसीको अपना लो या किसीके हो जाओ...

मस्त आहे कथा... पुढचा भाग पण लिहा राव..

प्रेम आणि मैत्री यांच्यापेक्षा ही मनाची शांती करताना झालेल्या वेदना .. खरे पणातील एकटेपणा.. हे जरी अनुभव नायकाचे असले तरी आयुष्य असेच का कुठे थांबलेले राहते.. पुढे लिहिल्यास आवडेल..

एक सुचना :
'तो' असे म्हणुन तुम्ही लिहिता आहे, त्याला असे वाटले आणि असे..
हेच जर नायक स्वता बोलत आहे लेखात असे लिहिले तर मस्त वाटेल.. म्हणजे, सकाळीच उठलो आज मी.. दात घासताना अचानक चेहरा समोर आला सौम्याचा.. असे.