चाहूल.... नाटक...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 6:36 pm

चाहूल

चंद्रलेखा प्रकाशित
चिरंतन निर्मित

दोन अंकी नाटक... चाहूल..

लेखक : प्रशांत दळवी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : तुषार दळवी
सोनाली कुलकर्णी

कथासूत्र :
मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय...
मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते.... पावित्र्य म्हणजे काय?(किराणा सामान आणलेलं आहे...) त्यातल्या प्रत्येक चैनीच्या गोष्टीची ( शांपू, पावडर, बॊडी लोशन , डिओ स्प्रे वगैरे ) आपल्याला खरंच गरज आहे काय?...( मग थोडं फ़ार समर्थन सुरू होतं ) कदाचित आपली लाचारी, वाढत्या गरजा, आणि स्वप्नं त्याला दिसली होती .....सर्वच गोष्टींचं बाजारीकरण... गरज आणि चैन यातला फ़रक काय , गरज कुठे संपते आणि चैन कुठे सुरू होते??...दोघे दारू पिऊन बोलत राहतात... मग पुढेपुढे सगळे नैतिक अध:पतनाचं भाबडे, खोटे समर्थन करत करत दोघे झोपतात...... सकाळ होते, घाईघाईने आवराआवर , तयारी करत माधवी बाहेर पडते, बाहेर जाताना एवढंच विचारते " पुरेसे भांडलो ना रे आपण ?" तोही मोजकंच बोलतो ," तू नि:शंक मनाने जा... प्रामाणिकपणाची चैन परवडणारी नाहीये आपल्याला..."
ती गेल्यावर मात्र मकरंद पलंगावर कोसळतो आणि डोक्यावरून पांढरी चादर ओढून घेतो,आणि मागे सारे आकाश चिरून टाकणारा हा आवाज कसला येतोय? तो आतला आवाज तर नक्कीच नाही..
____________________-

मी हे नाटक पाहिलं त्याला आता १० वर्षं झाली... अजून तो शेवटचा सीन आणि अनंत अमेंबल यांचं शेवटचं संगीत आठवतं..... इतका परिणामकारक शेवट असलेलं अस्वस्थ करणार नाटक मी अजून पाहिलेलं नाही... मी एकटाच पहायला गेलो होतो, बरोबर कोणीच नव्हतं... अत्यंत अस्वस्थ होऊन, आत्ममग्न अवस्थेत थरथरत राहिलो होतो काही काळ... अध:पतनाचं समर्थन आपल्याला पटतंय की काय, या विचाराने चिडचिडच व्हायला लागली..हे आपलं अध:पतन म्हणायचं का नाटककाराचं यश? बराच वेळ झोप आली नाही... दुसया दिवशी मित्राला पूर्ण स्टोरी सांगितली , सर्व ग्रुप घेऊन पुन्हा ते नाटक बघायला गेलो... असं कुठे असतं का? असं कोणी करतं का ?हे नाटक आवडणारा माणूस स्वत: तरी असं करेल का? वगैरे वगैरे पुष्कळ प्रश्न मित्रांच्या चर्चेत पुढे आले...सगळ्यांची उत्तरं द्यायला मी समर्थ नव्हतोच...मी गप्प बसलो... accepting indecent proposal या घटनेपलिकडे जाऊन त्यातली चर्चा मनाला लावून घ्यायला कोणी तयार नव्हतं..
________________________

मग २००० साली पॉप्युलर प्रकाशनाने काढलेले नाटकाचे पुस्तक सापडले... त्यात संवादांपेक्षाही प्रशांत दळवी यांनी लिहितानाचे आणि नाटक स्टेजवरती आल्यानंतरचे काही अनुभव लिहिले आहेत... खास त्यासाठी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे..
त्या प्रस्तावनेतील काही खास भावलेली वाक्यं द्यायचा मोह इथे आवरत नाहीये...

"...मकरंद आणि माधवी.....स्त्रीत्त्व किंवा पुरुषत्व हे त्यांचं समसमान भागभांडवल होतं, बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती,त्यामुळे इथे कोणीच कोणावर अन्याय करायचा प्रश्न नव्हता..मकरंदच्या आग्रहाला बळी पडण्याइतकी माधवी भाबडी राहिली नव्हती किंवा फ़क्त माधवीच्या चैनी वृत्तीमुळे मकरंद असहाय्य होण्याइतका बिचारा उरला नव्हता. आंतरजातीय विवाह केला असला तरी दोघांची गरजेची जात एकच होती......"

चाहूलला विचारले गेलेले प्रश्न ....
१. बॊस आला असता तर संघर्ष अधिक गडद झाला असता... बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
२. त्यांच्याकडे एवढी सुबत्ता असताना ह्या तडजोडीची गरजच का वाटावी?
फ़ारच भाबडा प्रश्न झाला...फ़क्त गरीबच तडजोड करतात का? मग चंगळवादाचा जन्मच झाला नसता...
३.शेवट नकारात्मकच का?तिनं जायला नको होतं...
नाटकानं एकतर मनोरंजन करावं किंवा प्रबोधन ..ही एक परंपरागत अपेक्षा आहे त्यामुळे नाटकाचा शेवट हे लेखकाचं मत मानलं जातं, यातून माधवीच्या जाण्याचं आम्ही समर्थन करतोय अशी गल्लत काही जण करून बसतात..उलट तिचं जाणं आम्हाला जास्त क्लेशदायक होतं..
आणि समजा असा एंड दाखवणं टाळलं असतं तर " चला कितीही भांडले तरी शेवट गोड झाला " असं मानत परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले असते...
४.एका रात्रीत, इतक्या कमी वेळात हा निर्णय कसा घेतला जाईल?
ढासळण्याची प्रक्रिया फ़ार आधीपासूनच सुरू आहे,नकाराची शक्ती शोषून घेणारं एक मिंधेपण कधीच घरात शिरलं आहे... त्यामुळं हासाचा कालखंड लक्षात घेतला पाहिजे..
५. समस्या मांडणं पुरे झालं ..त्यावरचे उपाय सांगा ना...
परिस्थितीचं निदान करणं त्यावर रोखठोक भाष्य करणं माझं कर्तव्य आहे... उपाय ज्यानं त्यानं आपापल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा आहे..
चाहूल बघताना मकरंद माधवीच्या थरापर्यंत जाण्यापूर्वीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं,आपल्या आयुष्यातल्या तडजोडी आठवून शरमल्यासारखं झालं, मनात काही खूणगाठ बांधावीशी वाटली, ऒफ़िसला एखादं खोटं बिल लावताना, एखादा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं तर त्याहून अधिक फ़लित चाहूलचं दुसरं काय असणार?कारण आज स्वत:ची स्वत:लाच लाज वाटणंयापेक्षा अधिक कोणती जागृती असू शकणार? नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
__________________________________________________________-

काही काळानंतर " कळा या लागल्या जीवा " नावाचे नाटक आले होते ... (प्रयोग छानच होता मी सुबोध भावे आणि शृजा प्रभुदेसाई यांनी केलेला प्रयोग पाहिला..... )
एका मित्राने सांगितले की त्याच्या लेखकाने चाहूलवर चिडून त्याला उत्तर देण्यासाठी हे नाटक लिहिले.... मी मोठ्या आशेने हे नाटक पहायला गेलो...( पण फरक इतकाच
१. चर्चेच्या वेळी दोघे दारू पीत नाहीत
२. ती त्याला सोडून जात नाही..शेवट गोड ...) बाकी सारे नाटक तेच्...मग एवढे मोठे नाटक परत लिहायचे कशाला?? असो.. तेही नाटक छान चालले , चालते आहे...

नाट्यसाहित्यिकविचारमतप्रतिसादअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

झकासराव's picture

6 Jun 2008 - 7:14 pm | झकासराव

छान लिहिल आहात.
ह्याच नाटकाची समीक्षा मी बरच आधी वाचली होती पेपरात.
त्यानी देखील कौतुक केले होते.
पहायच होत पण नाही जमल.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

15 Jun 2008 - 4:59 pm | भडकमकर मास्तर

ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अनुस्वार's picture

29 Jul 2024 - 10:10 pm | अनुस्वार
मनिष's picture

6 Jun 2008 - 9:13 pm | मनिष

तुम्ही असे काही लिहिता आणि अस्वस्थ करून सोडता....

बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...

सलाम!!! किती नेमकेपणे लिहिले आहे...

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2008 - 10:20 pm | llपुण्याचे पेशवेll

मास्तर मागचे 'साठेच काय करायचे' आणि 'चाहूल' दोन्हीने अस्वस्थ करून सोडलत.
नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
हेच खरं.
पुण्याचे पेशवे

तुम्हाला दुसरे कुठले नाटक सापडले नाही का???
का असा त्रास देता..
आम्हाला तर हे नाटक बघत असताना सारखी आमच्या लेडी मॅकबेथचीच आठवण येत होती...
रात्रि घरी आल्यावर आम्हाला झोपच येत नव्हती...
मग तमसेच्या तीरावर बसून राहीलो..
एकच वेळी एखादी गोष्ट आवडते आणी आवडतही नाही असे प्रसंग आयुष्यात फार थोड्या वेळेस येतात...
असो..
(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 1:17 am | भडकमकर मास्तर

(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)
एका साउथच्या सिनेमात सोनालीने मॅक्बेथचा रोल केला आहे.... त्या सिनेमाबद्दल आणि एकूणच त्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सोनालीने २००० सालच्या मटा दिवाळी अंकात छान लेख लिहिला होता...
चित्रपटाचे नाव आठवत नाही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

7 Jun 2008 - 1:23 am | मुक्तसुनीत

पारंपारिक नीतीमत्तेच्या सीमारेषेच्या जवळचा नि पलिकडचा प्रदेश दाखविणे हा या नाटकाचा मूळ उद्देश असावा. ज्या नीतीबंधनांना आपण गृहित धरून चालतो, पुरुषार्थ, पातिव्रत्य, सहजीवन या सर्व रूढ संकल्पनाना आपण जे परमोच्च स्थान देतो , त्या गृहितकांना जेव्हा फाटा द्यायची वेळ येते, त्या आदर्शांना झुगारून जेव्हा जगण्याची निवड आपण करतो तेव्हा काय होते ? याची एक झलक हे नाटक दाखवते असे वरकरणी दिसते आहे.

पण तसा प्रयत्न असल्यास नाटकाच्या प्रेमिस मधे (मराठी शब्द ?) काहीतरी गोची आहे असे दिसते. कारण जोडप्याची जी चर्चा चालते ती आपल्या गरजा-चैनी आणि त्या गरजा भागवण्यासाठी कुठवर जायला हवे येथवर चालते असे दिसते. म्हणजे नीती-अनीतीच्यापलिकडचा जो न-नैतिकतेचा प्रदेश ( द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने हे चालले आहे असे दिसत नाही. हे चाललेले दिसते आहे रोजच्या नीतीमत्तेच्या अधिपत्याखालच्या आयुष्याची आर्थिक/सामाजिक/अधिभौतिक पातळी उंचावण्यासाठी एका रात्रीपुरते नैतिकतेच्या राज्याबाहेर मागच्या दरवाज्याने जाण्याविषयी नि पहाट व्हायच्या आधी पुन्हा त्या पारंपारिक नैतिकतेच्या अधिष्ठानाखाली परत येण्यापुरते. नीतीमत्तेच्या पलिकडे जाऊन जगण्यासाठी लागणरी किंमत कायमस्वरूपी मोजण्याची धगधग इथे कुठे आहे ? लैंगिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता गावकूसाबाहेर पडायची आणि तिथे रहायची तयारी लागते. ते इथे कुठे आहे ? र.धों कर्वे यांचे उदाहरण घ्या. आयुष्यभर हा माणूस"लैंगिकता आणि नीतीमत्ता यांचा कसलाही संबंध असण्याची गरज नाही. विधवांनाही लग्नाशिवाय लैंगिक सुख मिळ्ण्याचा हक्क आहे" या सारखे विचार १९२५ च्या काळात मांडत होता ! समाजाने त्यांचे काय हाल केले हे आपण सगळे जाणतोच. पण माणूस वाकला नाही.

त्यामुळे एकूण या नाटकाचे स्वरूप म्हणजे "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" इतपतच ठरते असे मानले तर चूक ठरेल काय ?

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 2:13 am | भडकमकर मास्तर

द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने वगैरे काय हे चालले आहे असे वाटत नाही....लेखकाला अपेक्षितही नसावे...
गावात राहून भौतिक प्रगतीच अपेक्षित आहे यांना...
त्यामुळे आपण म्हणता ते शब्द थोडे कठोर असले तरी "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" काही चूक वाटत नाहीत....
....पण त्यामुळे या नाटकाला याचे स्वरूप.... इतपतच म्हणणेही पटत नाही... असो, तुमचा असा समज व्हावा यात नाटकाची ओळख करून देण्यात माझा कुठेतरी गोंधळ झाला असणार.... ते जाउदेत....
... तुमच्या नाटकांच्या पुस्तकाच्या लिस्ट मध्ये हे पुस्तकसुद्धा ऍड करून टाका.... वाचल्यानंतर सगळा गैरसमज दूर होईल....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

7 Jun 2008 - 2:22 am | मुक्तसुनीत

माझ्या हातून थोडे कठोर शब्द वापरले गेले खरे. माझ्या पोस्ट मधील शेवटच्या विधानाला तर सरळ सरळ "जजमेंटल" होण्याचा वास आहे. असो.

एकूणच प्रशांत दळवी यांची एक नाटककार म्हणून मोठी झेप मला वाटली नाही. "चारचौघी" सारखे त्यांचे नाटक ८० च्या दशकात गाजले आणि स्त्रियांचा दृष्टीकोन त्यानी प्रभावीपणे मांडला हे खरे ; पण माणसामाणसामधल्या व्यवहारांमधली गूढता, खोली त्यानी टिपल्याचे मला स्मरत नाही. "चाहूल" च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले असावे.

तुम्ही करून दिलेली ओळख अपुरी नाही. माझी कदाचित छिद्रान्वेषक वृत्ती आड आली असावी. "काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य. (अर्थात गुणात्मक दृष्ट्या "काय असू शकले असते" याबद्दलचे वुइशफुल थिंकींग चालू रहातेच.)

भडकमकर मास्तर's picture

8 Jun 2008 - 5:36 pm | भडकमकर मास्तर

"काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य
हे वाक्य छान... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शेखस्पिअर's picture

7 Jun 2008 - 1:44 am | शेखस्पिअर

गुरूमंत्र द्या...

वाचक's picture

7 Jun 2008 - 2:01 am | वाचक

तुम्ही कशी करता ह्यावर ही गोष्ट 'शेण खाणे' किंवा 'तडजोड' ह्या पैकी एका गटात बसते. आणि माझ्या समजुती प्रमाणे नाटककाराचाही उद्देश तोच आहे.

सर्वात पहिला (आणि कदाचित महत्त्वाचाही) प्रश्न म्हणजे ' बॉसला अशी धाडसी मागणी करायची हिंमत तरी कशी झाली ? '
जोडप्याचे वागणे तशाच प्रकारात बसणारे असल्याशिवाय एवढी हिंमत होणेच शक्य नाही. तेव्हा आपोआपच जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच....

कदाचित हा एक अपरिहार्य शेवट असावा की आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जिथून परतीचा मार्ग नाही. मग आधीच केलेल्या अनेक तडजोडींवर कशाला पाणी सोडा ? (शेवटी एक रात्र काय आणि अनेक काय - कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली) :)

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 2:31 am | भडकमकर मास्तर

जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच....
........कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली
अगदी योग्य बोललात... सहमत....
________________
अजून एक सांगावेसे वाटते, असा जर विचार केला की या सार्‍यातून नेमका गुन्हा किंवा अपराध काय घडला ?.... सगळाच राजीखुशीचा मामला आहे, तीन कन्सेण्टिंग ऍडल्ट्स मधलं हे पर्सनल मॅटर आहे, तर तुम्ही आम्ही कोण यांना नैतिकतेचे धडे देणारे ? ज्याची त्याची नैतिकता काय आहे ते त्यांचं बघून घेतील....(च्यायला पण नैतिकता इतकी सापेक्ष असते का ? आमचा सगळाच वैचारिक गोंधळ... इथे याच विषयावरचा पेठकरकाका आणि तात्या यांचा एक संवाद आठवतो...) .... हां मग फसवणूक कोणाची झाली?... या सार्‍यातून लायकी नसताना मकरंद जी भराभरा प्रमोशन्स मिळवतो आहे, त्या वेळी एखाद्या लायक माणसाची वाट लागली असणार त्याचे हे दोघे अपराधी आहेत,त्याची नक्कीच फसवणूक होत आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक's picture

7 Jun 2008 - 7:59 am | वाचक

आता अजून विचार केला तर अस वाटतं की बॉसने अशी मागणी केली तिथे नाटक सुरु न होता संपले पाहिजे.
नाटकाची सुरुवात 'भौतिक प्रगतीकरता (किंवा चंगळवादाकरिता म्हणूया फार तर) सर्वसामान्यपणे अनैतिक समजली जाणारी कृती करावी की नाही ' ह्याचा उहापोह करताना व्हायला हवी म्हणजे मग त्या व्यक्तिरेखांचा प्रवास नैतिक अधःपतनाकडे कसा झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल. बॉसची मागणी ही खरे तर एक अपरिहार्य अशी परिणती आहे - सुरुवात नाही.

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 12:31 pm | विसोबा खेचर

मला असं वाटतं की ज्याला जे जमेल, पटेल तसा प्रयेकजण त्याच्या त्याच्या विचाराने वागत असतो. त्यात चूक काय, बरोबर काय, हे कुणीच ठरवू नये, तो अधिकार कुणालाच नाही!

(अर्थात, यात भादंसं मध्ये ज्याची 'गुन्हा' म्हणून नोंद झालेली आहे या गोष्टी येत नाहीत!)

असो..

मास्तर! बाकी छानच लिहिता तुम्ही. एखाद्या नाटकाकडे किती विविध अँगलने पाहता याचं कौतुक वाटतं! अजूनही मराठी रंगभूमीवरच्या अश्याच काही चांगल्या नाटकांचा आपण मिपावर परामर्श घ्यावा अशी आपल्याला विनंती! 'नाटक' हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले लेखन वाचायला मजा येते!

काय हो मास्तर, मला असं पुसटसं आठवतंय की शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं! (चूभूदेघे!)

कृपया खुलासा कराल का? ते नाटकही छान होतं!

आपला,
(नाट्यप्रेमी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 2:59 pm | भडकमकर मास्तर

शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं

नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी
त्यात तिला संपूर्ण नाटकभर स्वतःच्या मुलाच्या अस्तित्त्वाचा भास होत असतो परंतु तो नसतोच, अशा आशयाचे कथानक होते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर

नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी

येस्स! मास्तर, यू आर राईट! :)

माझाच काहितरी घोटाळा झाला होता...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2008 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चाहूल वाचले. नाटकाची कथा समजून घेतली आणि एक वाचक म्हणून आपल्या मित्रांच्या मनात जो विचार आला हा लेखकाच्या लेखनीचा अतिरेक तर नाही ना ? असे म्हणुन सोडून दिले असते. किंवा हॅ, असे होऊ शकते का ? याच्यावर जरा स्वतःशीच वाद करत बसलो असतो. वर काही प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, की बॉसने मकरंदला बोलण्याची हिम्मतच कशी केली ? मकरंद मधे नकार देण्याची क्षमता नसते का ? चंगळवादात त्याला आता कोणतेच पर्याय उरले नाहीत का ? आणि त्याचा आतला आवाज जो आहे, तो हताशपणाचा आहे. पावित्र्य, नैतिकता या केवळ गप्पा आहेत. त्याला सामोरे जा !!! असा संदेश नाटककाराला द्यायचा आहे असेच वाटले.

नाटक आणि राजकारण मराठी माणसाचे वीक प्वॉइंट. तेव्हा आरामात परिक्षणे येऊ दे, आम्हाला आपले परिक्षण वाचायला आवडतेच.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jun 2008 - 10:36 pm | प्रभाकर पेठकर

एकंदर कथानक इंग्रजी 'डॉल्स हाऊस' च्या कथेवरून प्रेरित झालेले वाटते आहे. तथाकथित उच्चभू समाजातील कांही उदाहरणे भौतिक सुखाच्या लालसे पोटी हा मार्ग स्विकारतात असे वाटते. 'डॉल्स हाऊस' ची नायिका नवर्‍याला प्रमोशन्स मिळवून देण्यासाठी वरील मार्गाने जाते (आपल्याला भराभर प्रमोशन्स का मिळतात आणि आपली आर्थिक, सामाजिक भरभराट का होते आहे ह्याचा नायकाला संभ्रम पडतो). हे नाटक १९७४ मध्ये वाचले होते. त्यामुळे तपशील चुकण्याची शक्यता आहे पण आशय तोच आहे.

नाटकांची ओळख करुन देऊन फार छान लिखाण करत आहात.

काय वापरुन काय मिळवायचं ह्यातला विवेक कोणत्याही कारणाने संपला की ह्या नाटकाची कथा सुरु होणार असं वाटतं!
मूळ संहिता वाचायला हवी.

चतुरंग

दंभकुठार's picture

8 Jun 2008 - 9:55 am | दंभकुठार

अरेच्या !!
हॉलिवूडकरांनी इनडिसेंट प्रपोजल नामक सिनेमा सदर मराठी नाटकावरून उचलला होता असे दिसते !!!

http://www.imdb.com/title/tt0107211/

शेखस्पिअर's picture

8 Jun 2008 - 3:27 pm | शेखस्पिअर

फक्त देवच मूळ आहे..
बाकी सगळ्या प्रतिक्रुती आहेत...

मेघना भुस्कुटे's picture

9 Jun 2008 - 10:06 am | मेघना भुस्कुटे

मास्तर, अप्रतिम परीक्षण.

सखाराम_गटणे™'s picture

15 Jun 2008 - 7:25 pm | सखाराम_गटणे™

आज जे काही समाजात चालले आहे ते पहाता हे नाटक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. 'पेशव्यांचे विलास जीवन' वाचावे. त्यात जो दुसरा बाजीराव पेशवे, नाना फडनिस यांच्या बद्दलचे उतारे वाचुन मनाला खुप वेदना होतात. दुसरा बाजीराव पेशवे यांनी पण हे केलेले आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे बरो बर आहे, असे मी म्हणत नाही.
ऐकदा माणुस षड रीपु च्या स्वाधिन झाले तरी कि बाकिचे सगळे क्षुल्लक वाट्ते.
ज्या क्षेत्रात ग्लैमर आहे, त्या ठिकाणी असे प्रकार खुप आहेत. ज्या ठिकाणी (उदा. आर & डी) खरोख्रर बुध्दीमत्त्ता लागते अशा ठिकाणी असे प्रकार फारसे नाहीत.
मी सुद्धा असे काही प्रकार बघितले आहेत.
'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हा प्रकार असतो.
आणि ह्या प्रकारातली लोक जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत खुप संक्रुती रक्षणाच्या घोषणा करतात.

बॉस ने अशी मागणी केली कारण त्याला म्हाहीत होते कि कोण मागणी पुर्ण करणार आहे. लोक आधी पाणी किती खोल आहे बघतात आणि मगच पाण्यात उतरतात.

हा विषय खुप मोठा आहे,
मास्तरांनी हा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद. नाटक परीकक्षण पण चांगले आहे. इतरांच्या प्रतिक्रीयाही आवड्ल्या.